नवी दिल्ली, १८ मे: टाटा समूहाचे अध्यक्ष श्री. एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. श्री. एन चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे.
फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनर श्री. एन. चंद्रशेखरन यांना प्रदान केला.
टाटा समूहाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे, “आमचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती कॅथरीन कोलोना यांनी शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरने सन्मानित केले आहे. भारत आणि फ्रान्सदरम्यानचे व्यापारी संबंध दृढ करण्यात श्री. एन. चंद्रशेखरन यांनी योगदानाबद्दल त्यांना फ्रान्सने स्वतःचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे.”
पुरस्कार प्रदान केल्यानंतर श्रीमती कोलोना यांनी देखील ट्विट केले, “टाटा समूहातील कंपन्या फ्रँको-इंडियन भागीदारीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने टाटा समूहाच्या सीईओना शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरचे मानचिन्ह प्रदान केल्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रिय नटराजन चंद्रशेखरन, आपण फ्रान्सचे मित्र आहात.”
भारतात फ्रान्सचे राजदूत श्री. इमॅन्युएल लेनेन यांनी देखील एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “प्रिय नटराजन चंद्रशेखरन आपण फ्रान्सचे खरे मित्र आहात.”
या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबससोबत एअरबसकडून २५० विमाने खरेदी करण्यासाठी एक मल्टी-बिलियन डॉलर्सचा व्यवहार केला होता, ज्यामध्ये २१० ए-३२० नियो विमाने आणि ४० ए-३५० विमाने होती.
जागतिक पातळीवरील एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राच्या नव्या युगाच्या उत्पादन अभियांत्रिकी व डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजने गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये फ्रान्सच्या टुलूजमध्ये आपले इनोव्हेशन सेंटर सुरु केले.