Home Blog Page 1508

फर्ग्युसनमध्ये ‘ॲडव्हान्सड् बायोटेक्नॉलॉजी’ पदविका

पुणे-

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात (स्वायत्त) औषध निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असणाऱ्या लुपिन कंपनीच्या सहकार्याने ‘ॲडव्हान्सड् बायोटेक्नॉलॉजी’ हा सहा महिन्यांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

फर्ग्युसनची गौरवशाली शैक्षणिक परंपरा आणि लुपिनची उद्योगक्षेत्रातील अनुभवसिद्धता याचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. जानेवारी 2023 पासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. एम. एस्सी., बी. एस्सी. आणि बी. टेक उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. http://www.fergusson.edu या संकेत स्थळावर प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

फर्ग्सुसन आणि लुपिन यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी आणि लुपिनच्या एचआर उपाध्यक्षा अरनाबी मरजित यांनी  स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. सोनाली जोशी, डॉ. धनश्री गोडबोले, डॉ. संजय तिवारी, स्वप्निल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्र्यांनी चालविलेली गाड़ी बिल्डरची,आता राज्यही बिल्डरला चालवायला देणार काय ? काँग्रेसचा सवाल

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘ समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी MH 49 BR 0007 क्रमांकाच्या मर्सिडीज ने सव्वाचार तासात 520 किमी अंतराचा प्रवास केला. आता ही गाडी नेमकी कुणाची आहे याचा तपास R T O च्या ऐप्प वरुन घेण्यात आल्याचे दिसते आहे. काँग्रेस पक्षाने फेसबुक वरील आपल्या पेज वरुन याबाबत पर्दाफाश केला आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीच स्टेअरिंग स्वतः फडणवीसांनी हाती घेतल्याने दुपारपासूनच गाडींची चर्चा सुरू झाली होती. या दौऱ्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. फडणवीस यांनी चालवलेली गाडी Mercedes-Benz G350d होती. फडणवीसांनी स्वतः 520 किमी ही गाडी चालवली. या गाडीची किंमत 2 कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात येत असताना आता ही गाडी बिल्डरची असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसच्या फेसबुकवरून करण्यात आला आहे. यावेळी पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये गाडी कोणाच्या नावावर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. फोटोवरून ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचं दिसून येत आहे.

वादग्रस्त वक्तव्यापेक्षा विकासकामे महत्वाची :खासदार श्रीकांत शिंदे

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेगाने काम होत आहे

खोके मिळायचे बंद झाल्यानेच ओरड

बाळासाहेबांची शिवसेना’ चा मेळावा संपन्न

पुणे- इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत, रोज नवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला संबंधित नेत्यांना लगावला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मेळावा झाला. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,अजय भोसले, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , मावळचे खासदार श्रीरंग बारणे ,सुधीर कुरूमकर, संजय अगरवाल महिला आघाडीच्या लीना पानसरे. यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.

दररोज सकाळी भोंगा वाजतो. खंजीर, खोके, गद्दार हेच शब्द त्यातून बाहेर पडतात. परंतु पूर्वी हे खोके कोणाकडे जायचे, पैसे कोण मोजायचे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.आता ते खोके बंद झाले म्हणून ओरड सुरू झाली आहे,’ अशा शब्दात बाळासाहबेंची शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी पलटवार केला. या आधी वर्षां बंगल्याचे दरवाजे सर्वांसाठी बंद होते. आता ते सर्वांसाठी खुले झाले आहेत, असेही ते म्हणाले.

पुण्यात मी पहिल्यांदाच येत आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ”नेतृत्वावर विश्‍वास राहिला नाही, म्हणून उठाव झाला. मंत्री, आमदार, खासदार यांना भेटायचे नाही. तर सामान्य शिवसैनिकांची भेट होणे तर सोडाच. अडीच वर्ष मुख्यमंत्री असून शिवसैनिक काय यातना भोगत होते, हे पाहिला यांचा वेळ देखील नव्हता. म्हणून सत्तेला लाथ मारून पन्नास आमदार आणि १३ खासदार आज बाहेर पडले. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री झाला. गेली अडीच वर्ष बंद असलेल्या वर्षाबंगल्याची दारे सर्वासामान्यांसठी खुली झाली.”

दरम्यान, पुण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी नाना भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली. त्याचा उल्लेख करून डॉ.शिंदे यांनी रिंग रोडसाठी १० हजार ५०० कोटी मंजूर केले असून, अन्य प्रश्नही सोडविण्यात येतील, असे सांगितले.

गोगावले म्हणाले, ”घरात बसून सगळे निर्णय होत नसतात. काही जनतेत येऊन निर्णय घ्यायचे असतात. मुख्यमंत्र्यांनी आता कामातून जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. ते पंधरा-पंधरा तास काम करतात. त्यांना कधी थकलेले पाहिले नाही.” यावेळी आढळराव यांची देखील भाषण झाले. यावेळी शिंदे यांच्या उपस्थित अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला.यावेळी खासदार डॉ. शिंदे यांचा सत्कार भानगिरे यांनी केला.

पुण्यात स्वतंत्र बैठक घ्यावी : प्रमोद भानगिरे
महापालिका प्रशासन काहीच काम करत नाही. आगामी पालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना तयार असून पालिकेवर भगवा पडकविल्या शिवाय राहणार नाही. पुणे शहरातील अशाच विविध समस्या सोडविण्यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज असून पुण्याच्या प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली.

‘त्या ‘ १६ आमदारांना निलंबित करावेच लागेल – पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

कराड -शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या त्या १६ आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार निलंबित करावेच लागेल आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री वा मंत्री वा कोणतेही पद घेता येणार नाही असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले आहे. कराड येथे आयोजीत संविधान बचाव, भाजप हटाव रॅलीत श्री. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, देशातील लोकशाही, संविधानावर घाला घालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन सुरु आहे. त्याविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढुन लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम, देशातील संविधान कायम ठेवण्याचे काम सुरु केले आहे. पुढे हे वातावरण कायम राहिले पाहिजे. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे. त्यासाठी संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापन होताना पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. १९८५ साली पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधींनी अंमलात आणला. २००३ साली त्या कायद्यात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाजपचे सरकार सत्तेत असताना त्या कायद्यात बदल कऱण्यात आला आहे. भाजपनेच बदल केलेल्या कायदयानुसार राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सर्वोच्य न्यायालयाला १६ आमदारांना निलंबीत करावेच लागेल. त्याचबरोबर त्यांना कोणतेही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद घेता येणार नाही, असे ते म्हणाले.  त्यामुळे चालढकल करण्याचे काम सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच घेतलेली नाही. राज्यात २३ मंत्रीपदे रिक्त आहेत. २० मंत्र्यांवरच काम सुरु आहे. मंत्रीपदाचा विस्तारच करता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. प्रत्येक संविधानिक पदे, संस्था हस्तगत करुन त्यामध्ये हस्तक्षेप सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात कोणते न्यायाधीश नेमायचे यावरुन केद्र आणि न्याय व्यवस्थेत वाद सुरु आहे. संविधानीत संस्था एका व्यक्तीने ताब्यात घेतल्या तर निवडणुका होतील, खटले चालतील मात्र त्यातुन निष्पन्न काहीच होणार नाही.नरेंद्र मोदीच्या काळात संस्था ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. कोणालाही निपक्षपाती काम करता येत नाही, अशी स्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे फोकस – खा. श्रीकांत शिंदे

पुणे- पुण्यातील वाहतूक कोंडी चा प्रश्न प्रामुख्याने धसास लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविलेले असून या प्रश्नाच्या सोडवणुकीवर विशेष फोकस असेल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आपल्या सरकारच्या कामाचं कौतुक करतात. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी देखील आज राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि संपर्क प्रमुख अजय भोसले ,किरण साळी प्रसिद्धीप्रमुख संजय अगरवाल , सुधीर कुरुमकर आणि एकूणच शिंदे समर्थकांनी आज पुण्यात एका मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत शिंदे उपस्थित होते .

यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले,’ मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेले. या मार्गाचे काम रेकॉर्ड टाईममध्ये करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. आज पुण्यात अनेक विद्यापीठ आहेत, हॉस्टेल चे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. लाल महाल मधील लाईट आणि साउंड शो कसा सुरू होईल याचा निर्णय लवकर होईल पुण्यातील वाहतूक कोंडी प्रश्न मोठा आहे, वाहतूक कोंडी कमी कशी होईल याचा ही विचार आमच्या पक्षाकडून केला जातोय, असंही शिंदे म्हणाले.

 अडीच वर्षात जे काम झाले नाही ते पाच महिन्यात या सरकारने केले आहे. विविध निर्णय या सरकारने घेतले. फक्त घोषणा नाही, त्याची अंबलबजावणी देखील सरकार करत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री फक्त आपण असले पाहिजे, असं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे उठाव झाला. यामुळे आज ५० आमदार आणि १३ खासदार आमच्या बरोबर आहेत, हा इतिहास आहे.

अडीच वर्ष आमदार, खासदार, मंत्र्यांची खंत होती म्हणून आज हे पाऊल उचलले. शेतकऱ्यांसाठी जी मदत देण्यात आली, ती कोणतेही अट न घालता देण्यात आली. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास देण्याचा निर्णय आपण घेताल. आज २ कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. पेट्रोल, डिझेल किंमती कमी झाल्याचंही शिंदे म्हणाले.दरम्यान “वर्षा” ची दारे नेहमी बंद होती, ती आज शेतकऱ्यासाठी, सामान्य माणसासाठी खुली आहेत. आज उठले की खंजीर, खोके, गद्दार एवढेच विषय करतात, यांच्याकडे दुसरे विषयच नाही, यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. हे खोके कोणाकडे यायचे, कोण मोजायचे हे महाराष्ट्राला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी कधी ही या टीकेला उत्तर देत नाही, ते म्हणतात याचे उत्तर कामातून दिले जाईल, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला आहे.

राज्यपाल जाण्याच्या तयारीत -आमदार भरत गोगावले

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महाराष्ट्रातील थोर आदर्श दैवतांंबाबत अनुचित विधाने केल्याच्या आरोपाने घायाळ झालेल्या भारतीय जनता पार्टीला आता राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गुजरात च्या मतदाना नंतर त्यांना या पदावरून काढून अन्य राज्यपालांची नियुक्ती होईल असे बोलले जात असताना आज पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यपाल आता जाण्याच्या तयारीत आहेत असे ते म्हणाले आहेत. थोड्या दिवसात ते जातील असेही ते म्हणाले आहेत.

पुण्यात नाना भानगिरे आणि अजय भोसले,किरण साळी यांच्यासह संजय अगरवाल,सुधीर कुरुमकर आणि एकूणच एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या मेळाव्यासाठी गोगावले येथे आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली सव्वा आठ कोटीची खंडणी

पुणे- येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने ईमेलद्वारे तब्बल 60 बिटकॉईन म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.(एक बिटकॉइनची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही 13 लाख 84 हजार 27 रूपये आहे.)याप्रकरणी संबंधीत बिल्डरने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीत ईमेलधारक व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीत ब्रॅंड हेड म्हणून काम करणार्‍या महिलेनी संबंधीत आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर पासून सुरूअसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे..शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने म्हणाले कि,’बांधकाम व्यावसायिकाला फोटो व्हायरल करून ईमेलवरून तब्बल 60 बिटकॉईन खंडणी स्वरूपात मागितल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर तो गुन्हा आमच्या पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आमची सायबर टीम करत आहे.

फिर्यादी ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत 2017 पासून बँड हेड म्हणून काम करतात. त्यांच्याकडे कंपनीच्या चेअरमन तसेच इतर ईमेल तपासणे व ईमेल पाठविण्याचे काम आहे. दि. 29 रोजी फिर्यादी हे त्यांचे काम करत असताना त्यांना एका ईमेल आयडीवरून तीन वेगवेगळ्या कंपनीसंबंधीत ईमेलवर मेल प्राप्त झाले. त्यामध्ये ईमेल करणार्‍या आरोपीने कंपनीचे चेअरमन यांचे खासगी फोटो सामाजिक माध्यमांवर शेयर करण्याची तसेच कंपनीतील अधिकारी, माध्यम प्रतिनिधींसह इतरांना टॅग करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच बदनामी टाळायची असल्यास 60 बिटकॉईनची म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची मागणी करण्यात आली.

हा सर्व प्रकार गंभीर असल्याने फिर्यादी यांनी चेअरमन यांना याबाबत कळवीले. त्यावर त्यांनी ‘कोणीतरी खोडसाळपणा करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा’ असे सांगितले. त्यानंतर 30 तारखेला त्यांना पुन्हा दुपारी ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर पुन्हा आठ वाजता आणखी एक मेल आला. त्यावर ‘त्यांना माझ्या संयमाची वाट पाहू नका’ म्हणत चेअरमन यांचे खासगी फोटो पाठवून 60 बिटकॉईनची मागणी करण्यात आली. तसेच 5 बिटकॉईन तात्काळ पाठविण्याची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. तसेच 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेपर्यंत एका वॉलेटवर 60 बिटकॉईनची खंडणी पाठविण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर संबधीत बिल्डरने (चेअरमनने) तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यासंबंधीत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. बी. जाधव, सुभाष माने यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सायबर पथक गुन्ह्याचा तपास करत आहे.


– ,

गोंधळात उरकली बालकुमार संस्थेची सभा सदस्यांनीही निवडणूक प्रक्रियेवर केली नाराजी व्यक्त


पुणे ः अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी प्रचंड गोंधळात हिंदी राष्ट्रभाषेच्या कार्यालयात पार पडली.
सभेला प्रमुख कार्यवाह यांच्यासह निम्मे कार्यकारिणी सदस्य गैरहजर राहिल्याने वादानेच या सभेला सुरुवात झाली. कार्यपत्रिकेवरील विषयानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभेला सुरूवात न केल्यामुळे सभागृहात सदस्यांनी एकच गोंधळ घातला. त्याच वेळी दोन्ही बाजूने सदस्य उठले. त्यांनी व्यासपीठासमोर जावून एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. सुमारे 15 ते 20 मिनीट हा गोंधळ सुरुच राहिला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोंधळ थांबला नाही, तर सभा थांबवू अशी भूमिका मांडली.
त्यानंतर काही सदस्यांनी मिळून दोन्ही बाजूच्या सदस्यांना जाग्यावर बसविले. त्यानंतर माजी सहकार्यवाह सुनील महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी निवडक कार्यालयात दिलेल्या पत्रानुसार निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. महाजन हे व्यासपीठावरच आंदोलनाला बसले. त्यानंतर दोन दिवसांत महाजन यांनी मागितलेली माहिती देण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केले. पुन्हा सभा सुरू झाली. मात्र कार्यपत्रिकेनुसार विषय घेतले जात नसल्याने वादाला सुरूवात झाली. त्याच वेळी ही निवडणूक बेकायदा आहे. त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणी विजय शेडगे यांनी केली. अनेकांना सभेचे पत्र मिळाले नाही. अनेकांचे मतदार यादीतून नावे वगळली. शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावरुन पुन्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला. याच गोंधळा दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी ज.गं.फगरे यांनी माझ्याकडे अकरा जागेसाठी अकराच अर्ज आल्याने पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली. या निवडीला सभागृहातील काही सदस्यांनी विरोध केला. मात्र राजन लाखे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष डाॕ. संगीता बर्वे. निवडणूक निर्णय अधिकारी ज.गं. फगरे . कोषाध्यक्ष दिलीप गरुड उपस्थित होते. विजय शेडगे यांनी कायद्यानुसार निवडणूक घेण्याची मागणी केली. तसेच सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन ही बेकायदा निवडणूक रद्द करावी. अशी मागणी केली. विनोद सिनकर, विश्वनाथ ससे, संजय ऐलवाड यांनी शांखांना मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच संस्थेत ज्या पध्दतीने राजकारण सुरू आहे. ते मुलांच्या आणि संस्थेच्या हिताचे नाही असे सांगत सभेतच संजय ऐलवाड यांनी कार्यकारिणीच्या यादीतून नाव मागे घेतले. नंतरच्या मनोगतात. नयन राजमाने लातुर, सुभाष कवडे सांगली, विनोद सिन्नकर औरंगाबाद, स्वप्निल पोरे पुणे, वृषाली गोखले डोबिंवली. आदींनी बेकायदा निवडणूकीचा आरोप होण्यापेक्षा निवडणूक का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केले. नंतर संस्थेच्या अध्यक्ष डाॕ. संगीत बर्वे यांनी निवृत्तीची घोषणा केली.

विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत

नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तत्पूर्वी या महामार्गाची पाहणी रस्ते मार्गाने करण्याचे काल त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त भेट दिली. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्हे २६ तालुके ३९२ गावातून हा महामार्ग जात आहे. त्यामुळे नागपूर येथील झिरो पॉईंट या ठिकाणावरून उभय नेत्यांनी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काही मिनिटांसाठी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक ठिकाणी खास आग्रहाने त्यांचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली होती. विदर्भ मराठवाडा व विदर्भातील दुर्गम भागांचे मुंबईपासून अंतर कमी करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. एक नवा इकॉनॉमिक कॉरीडॉर उभारण्याचा हा प्रयत्न प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गाची सुरुवात या प्रदेशातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची व जिव्हाळ्याची घटना ठरत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता विदर्भ, मराठवाड्यात असून आज या पाहणी दौऱ्यानिमित्त या रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी,व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता.

विदर्भात ठिकठिकाणी स्वागत

विदर्भात खासदार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसर, यांच्यासह उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, पुरुषोत्तम भुसारी हे पाहणी दौऱ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फुंडकर आमदार संजय रायमुलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री वीसपुते यांनी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले.  नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन आदींनी त्यांचे स्वागत केले.

समृद्धी महामार्गाची पाहणी करताना शिंदे -फडणवीसांचे औरंगाबाद व जालन्यात स्वागत

औरंगाबाद दि.4 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून 54 तर जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित होते.

जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील जामवाडी येथे मोटार वाहनाने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी येथील इंटरपासलगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री संदिपान भूमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.

औरंगाबाद जिल्ह्यात 54 किमीचा मार्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापुर तालुक्यातून जातो. या दरम्यान 2 टोल, 4 फ्लायओव्हर, 05 इंटरचेंज्‍ (सावंगी व शेंद्रा/ जयपुर एमआयडीसी, माळीवाडा, हडसपिंपळगाव व जांबरगांव) आहेत.

जालना जिल्ह्यात 42 किमीचा मार्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.

“मनपा कंत्राटी कामगारांवर अन्याय सहन करणार नाही” कामगार नेते सुनील शिंदे 

पुणे:- महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. असा इशारा आज कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिला. ते पुणे महानगरपालिका मधील कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना, कायम कामगारां एवढाच बोनस मिळाला पाहिजे. त्याचबरोबर किमान वेतन, वाढीव रकमेच्या फरकाची रक्कम मिळाली पाहिजे. समान कामासाठी समान वेतन मिळालेच पाहिजे, त्याचबरोबर कंत्राटदार बदलला तरी कंत्राटी कामगार तेच राहतील, या मागण्या या मेळाव्यात करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध खात्यांमधील कंत्राटी कामगारांनी आपले प्रश्न, होत असलेला अन्याय, या मेळाव्यामध्ये मांडला यावेळी शिंदे म्हणाले पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार पावती दिली जात नाही, प्र. फंडाचे रक्कम भरली जात नाही, ईएसआयचे कार्ड दिले जात नाही, शुल्लक कारणावरून कामावरून काढून टाकण्यात येते, अशा अनेक प्रकारे या कामगारांवर अन्याय चालू आहे नुकतेच सुरक्षा रक्षकांची नवीन कंत्राट आले असून या नवीन कंत्रालदारा मार्फत 45 पेक्षा जास्त वयाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्याचे काम चालू आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. वास्तविक पाहता कुठेही निवृत्तीचे वय हे 58 ते 60 असताना महापालिकेमधील सुरक्षा रक्षकांचे वयाची अट 45 ठेवण्यात आली आहे. हा या सर्व सुरक्षारक्षक यांच्यावर अन्याय होत आहे. मनपा मधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढंच बोनस देण्याबाबतची चर्चा महापालिकेमधील अधिकाऱ्यांशी चालू असून, त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल असे असे शिंदे यांनी यावेळी सांगितले कंत्राटी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास त्यासाठी आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारावा लागेल असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा विभाग, झाडू खाते, आरोग्य विभाग, स्मशानभूमी अशा विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये दीप दीप प्रज्वलन करून कामगार नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले. सिताराम चव्हाण संघटनेचे उपाध्यक्ष यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले विजय पांडव यांनी सूत्रसंचालन केले.

पाहणी दौरा.. रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार..!

नागपूर, दि. 4 : पाहणी दौरा… रस्त्याची भव्य रूंदी…गतीचा थरार…. विदर्भासाठी खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’चा महामार्ग ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आज उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले… निमित्त होते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्याचे.

कुठल्याही देशाच्या विकासात रस्ते विकासाचे जाळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे म्हणतात. देशाच्या विकासाचा मानबिंदू हा रस्ते असतो. या रस्त्यांचे जाळे गतिमान असेल तर गतिमान विकासाला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात 11 डिसेंबर रोजी लोकार्पण होत असलेला हिंदुहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भाला पर्यायाने राज्याला अग्रेसर करण्याचे एक माध्यम ठरणार आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्याचा उत्साह आज शिगेला पोहोचला होता. या उत्साहानंतर खऱ्या अर्थाने या रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना आज अनुभवायला मिळाला. लवकरच तो सर्वसामान्यांनाही अनुभवायला मिळणार आहे.

राज्याच्या विकासात अत्यंत मोलाची भूमिका बजावणऱ्या समृद्धी महामार्गाविषयी एक आपुलकीचे चित्र आज समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पहायला मिळाले. नागपूरपासून सुरू झालेला हा दौरा शिर्डीपर्यंत आयोजित करण्यात आला. विमानतळापासूनच याचा प्रत्यय आलेला पहायला मिळाला. विमानतळावर अनेक नागरिक हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायला, आभार मानायला उत्सुक होते.

विदर्भवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा आनंद वैदर्भीयांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला. केवळ विमानतळावरच नव्हे तर पाहणी दौऱ्याच्या झिरो पॅाईंट या ठिकाणीही स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही या महामार्गामुळे वाढणार असून यातून विदर्भाचा विकास होण्यास मदत होणार असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया स्थानिकांनी यावेळी दिली.

थोडक्यात समृद्धी मार्ग

एकूण लांबी:- 701 किमी. ,

रस्त्याची रुंदी :-  120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)

मार्गिका :- 3+3 मार्गिका

वाहन वेग प्रस्तावित :- 150 किमी/तास ( डोंगराळ भागासाठी 120 किमी./तास)

प्रस्तावित इंटरचेंजेंस :- 25

रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या नवनगरांची संख्या:- 18

मोठे पूल :- 32

लहान पूल :- 317

बोगदे :- 7

रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8

व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73

कल्व्हर्ट :- 762

किती जिल्हा, तालुका व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे

वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)

साधू-संतांचे विचार आचरणात आणल्यास देश बदलेल -गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा ; १२५ वा दत्तजयंती सोहळा
पुणे : आज देशामध्ये काय चालले आहे, हे आपण पहात आहोत. आई-वडिलांची सेवा मुलांनी करायला हवी. परंतु समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. वृद्धाश्रम स्थापन करणे ही समाजाची परंपरा नाही. तरी देखील ती संख्या वाढत आहे. साधू-संतांचे विचार अनेकजण ऐकायला जातात. पण नंतर ते विचार विसरले जातात. ते विचार आचारणात आणले तर देश बदलायला वेळ लागणार नाही, असे मत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.  
बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, आशा कामत, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. 
धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार कोव्हिशिल्ड लसीची निर्मीती करणारे सिरम इन्स्टिटयूटचे प्रमुख डॉ.सायरस पूनावाला देखील पुरस्कार देण्यात येणार आहे. महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. 
उल्हास पवार म्हणाले, धार्मिकतेला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड ट्रस्टतर्फे दिली जात आहे. गुरुचा महिमा व गुरुचे स्थान महत्वाचे आहे. मातृ देवो, पितृ देवो, आचार्य देवो भव हे आपण म्हणतो, त्याप्रमाणे यांच्यामध्ये परमेश्वराला आपण पहायला हवे. प्रत्येकाच्या जीवनात गुरुला महत्वाचे स्थान असल्याचे आपल्याला दिसून येते. 
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, दत्तप्रभू माझ्या जीवनात निर्णायक ठरले आहेत. त्यांच्या नावाच्या ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पुरस्कार मी गुरुप्रसाद म्हणून स्विकारला आहे. हे शरीर यापुढे रामकार्याकरिता राहिल. देशात परिवर्तन घडत आहे, ते पुढे चालत होवो. देशाचे सांस्कृतिक संरक्षण करायचे असेल, तर वेगवान पद्धतीने करायला हवे. 
हणमंतराव गायकवाड म्हणाले, जवळपास १०० देशात बीव्हीजी घेऊन जायची, हा संकल्प मी केला आहे. बीव्हीजी अनेक मंदिरांचे काम करीत आहे. आता अयोध्येतील श्रीराम मंदिराची सेवा करण्याची देखील संधी मिळावी, असेही त्यांनी सांगितले. 
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय दररोज  सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. डॉ.पराग काळकर यांनी स्वागत केले. अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी

शिर्डी, ४ डिसेंबर :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली.

नागपूर येथील समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे पोहोचला. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, सदाशिवराव लोखंडे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.  या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी कोपरगांव इंटरचेंज येथे आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी ५२० किलोमीटर आहे.  समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. कोपरगांव इंटरचेंज पासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे.

आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मसमर्पण उंचावणारा ग्रंथ म्हणजे गीता -स्वामी गोविंददेव गिरी महाराज

गीता परिवार पुणे शाखेतर्फे गीता जयंती सोहळ्याचे आयोजन
पुणे : माणसाने जीवन कसे जगावे, याची दिशा श्रीकृष्णाने गीतेतून दिली आहे. मानवी जीवनाचा सदुपयोग करण्याचे मार्गदर्शन गीतेमध्ये करण्यात आले आहे. माणसामधील आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसमर्पण उंचावणारा तसेच ते मानवाला शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. त्यामुळे गीता आपण आपल्या जीवनात आचरणात आणायला हवी, असे मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

गीता परिवार पुणे शाखेच्या वतीने गीता जयंती निमित्त गणेश कला क्रीडा येथे स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान सोहळा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.संजय मालपाणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.शां.ब.मुजुमदार, सुधीर मांडके, बापूजी पाडळकर, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, विश्वस्त सुनील रुकारी, गीता परिवारच्या संतोषी मुंदडा, लक्ष्मण जोशी, अंजली तापडीया, सत्यनारायण मुंदडा, प्रदीप राठी ,शाम मणियार, विद्या म्हात्रे ,नरेन्द्र कोटक आदी उपस्थित होते.

उत्सवात ९२ वर्षीय दादा जोशी यांना योग क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शिंदेशाही पगडी, महावस्त्र, पुष्पमाला व ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी डॉ. संजय मालपाणी यांचे जानो गीता – बनो विजेता या विषयावर व्याख्यान देखील झाले.
स्वामी गोविंददेव गिरि महाराजांनी या प्रसंगी गीता परिवारातर्फे चालवल्या जाणा-या लर्न गीता या विश्वव्यापी उपक्रमाची प्रशंसा केली. बारा भाषांमधून चालणा-या या प्रकल्पात १३६ देशातील पाच लाख लोक सहभागी झाले आहेत. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना वाटण्यात जीवनाचे सार्थक असते. म्हणूनच या उपक्रमासाठी वेळ देणा-या गीता परिवाराच्या सुमारे पाच हजार प्रशिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ.संजय मालपाणी म्हणाले, गीता हे केवळ भक्तीचे शास्त्र नसून व्यवस्थापन, मानोविज्ञान, युद्धशास्त्र आणि योगशास्त्राची शिकवण देणारा ग्रंथ आहे. गीता हा ज्ञान आणि विज्ञानाचा ग्रंथ असल्याने पाच हजार वर्षांनंतर आजही तो सार्थक आह. संवाद आणि सुहास्य हे जिंकण्याचे मार्ग आहेत, असे गीता सांगते. त्यामुळे तो एक संवादग्रंथ म्हणून देखील परिचित आहे. धर्माची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. मात्र, धर्म म्हणजे कर्तव्य ही व्याख्या गीतेमध्ये अधिक व्यापकतेने दिली आहे. गीता हे धर्मशास्त्राचे सर्वोत्तम पुस्तक असून यशस्वीतेचे अनेक मंत्र या पुस्तकात प्राप्त होतात असे  त्यांनी सांगितले. दादा जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी गीता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह सर्वांनीच पारंपरिक वेशात सहभाग घेतला. संगिता मणियार यांनी सूत्रसंचालन केले.