पुणे ः अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी प्रचंड गोंधळात हिंदी राष्ट्रभाषेच्या कार्यालयात पार पडली.
सभेला प्रमुख कार्यवाह यांच्यासह निम्मे कार्यकारिणी सदस्य गैरहजर राहिल्याने वादानेच या सभेला सुरुवात झाली. कार्यपत्रिकेवरील विषयानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभेला सुरूवात न केल्यामुळे सभागृहात सदस्यांनी एकच गोंधळ घातला. त्याच वेळी दोन्ही बाजूने सदस्य उठले. त्यांनी व्यासपीठासमोर जावून एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. सुमारे 15 ते 20 मिनीट हा गोंधळ सुरुच राहिला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोंधळ थांबला नाही, तर सभा थांबवू अशी भूमिका मांडली.
त्यानंतर काही सदस्यांनी मिळून दोन्ही बाजूच्या सदस्यांना जाग्यावर बसविले. त्यानंतर माजी सहकार्यवाह सुनील महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी निवडक कार्यालयात दिलेल्या पत्रानुसार निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. महाजन हे व्यासपीठावरच आंदोलनाला बसले. त्यानंतर दोन दिवसांत महाजन यांनी मागितलेली माहिती देण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केले. पुन्हा सभा सुरू झाली. मात्र कार्यपत्रिकेनुसार विषय घेतले जात नसल्याने वादाला सुरूवात झाली. त्याच वेळी ही निवडणूक बेकायदा आहे. त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणी विजय शेडगे यांनी केली. अनेकांना सभेचे पत्र मिळाले नाही. अनेकांचे मतदार यादीतून नावे वगळली. शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावरुन पुन्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला. याच गोंधळा दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी ज.गं.फगरे यांनी माझ्याकडे अकरा जागेसाठी अकराच अर्ज आल्याने पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली. या निवडीला सभागृहातील काही सदस्यांनी विरोध केला. मात्र राजन लाखे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष डाॕ. संगीता बर्वे. निवडणूक निर्णय अधिकारी ज.गं. फगरे . कोषाध्यक्ष दिलीप गरुड उपस्थित होते. विजय शेडगे यांनी कायद्यानुसार निवडणूक घेण्याची मागणी केली. तसेच सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन ही बेकायदा निवडणूक रद्द करावी. अशी मागणी केली. विनोद सिनकर, विश्वनाथ ससे, संजय ऐलवाड यांनी शांखांना मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच संस्थेत ज्या पध्दतीने राजकारण सुरू आहे. ते मुलांच्या आणि संस्थेच्या हिताचे नाही असे सांगत सभेतच संजय ऐलवाड यांनी कार्यकारिणीच्या यादीतून नाव मागे घेतले. नंतरच्या मनोगतात. नयन राजमाने लातुर, सुभाष कवडे सांगली, विनोद सिन्नकर औरंगाबाद, स्वप्निल पोरे पुणे, वृषाली गोखले डोबिंवली. आदींनी बेकायदा निवडणूकीचा आरोप होण्यापेक्षा निवडणूक का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केले. नंतर संस्थेच्या अध्यक्ष डाॕ. संगीत बर्वे यांनी निवृत्तीची घोषणा केली.