पुणे- पुण्यातील वाहतूक कोंडी चा प्रश्न प्रामुख्याने धसास लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविलेले असून या प्रश्नाच्या सोडवणुकीवर विशेष फोकस असेल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आपल्या सरकारच्या कामाचं कौतुक करतात. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी देखील आज राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि संपर्क प्रमुख अजय भोसले ,किरण साळी प्रसिद्धीप्रमुख संजय अगरवाल , सुधीर कुरुमकर आणि एकूणच शिंदे समर्थकांनी आज पुण्यात एका मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत शिंदे उपस्थित होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले,’ मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेले. या मार्गाचे काम रेकॉर्ड टाईममध्ये करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. आज पुण्यात अनेक विद्यापीठ आहेत, हॉस्टेल चे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. लाल महाल मधील लाईट आणि साउंड शो कसा सुरू होईल याचा निर्णय लवकर होईल पुण्यातील वाहतूक कोंडी प्रश्न मोठा आहे, वाहतूक कोंडी कमी कशी होईल याचा ही विचार आमच्या पक्षाकडून केला जातोय, असंही शिंदे म्हणाले.
अडीच वर्षात जे काम झाले नाही ते पाच महिन्यात या सरकारने केले आहे. विविध निर्णय या सरकारने घेतले. फक्त घोषणा नाही, त्याची अंबलबजावणी देखील सरकार करत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री फक्त आपण असले पाहिजे, असं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे उठाव झाला. यामुळे आज ५० आमदार आणि १३ खासदार आमच्या बरोबर आहेत, हा इतिहास आहे.
अडीच वर्ष आमदार, खासदार, मंत्र्यांची खंत होती म्हणून आज हे पाऊल उचलले. शेतकऱ्यांसाठी जी मदत देण्यात आली, ती कोणतेही अट न घालता देण्यात आली. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास देण्याचा निर्णय आपण घेताल. आज २ कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. पेट्रोल, डिझेल किंमती कमी झाल्याचंही शिंदे म्हणाले.दरम्यान “वर्षा” ची दारे नेहमी बंद होती, ती आज शेतकऱ्यासाठी, सामान्य माणसासाठी खुली आहेत. आज उठले की खंजीर, खोके, गद्दार एवढेच विषय करतात, यांच्याकडे दुसरे विषयच नाही, यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. हे खोके कोणाकडे यायचे, कोण मोजायचे हे महाराष्ट्राला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी कधी ही या टीकेला उत्तर देत नाही, ते म्हणतात याचे उत्तर कामातून दिले जाईल, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला आहे.