Home Blog Page 1495

शिंदेसेनेचा वृत्तपत्रांतून जाहिरातींचा मारा,ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो,ना फडणवीसांचा:मोदींनंतर एकनाथरावच

राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात देत शिंदेसेनेने आज चांगलीच खळबळ उडवून दिली. झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेवर ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे.यावर खासदार संजय राऊत यांनी म्हटले कि जर शिवसेना नाव वापरता , धनुष्यबाण वापरता , बाळासाहेब ठाकरेंचे देखील नाव वापरता तर मग बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही ? तो नसल्याने आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला आहे तर छगन भुजबळ यांनी असे म्हटले आहे कि, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी झेप आहे.

या सर्व्हेक्षणातील सर्वात ठळक बाब म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षण. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. यासंदर्भात शिंदेसेनेने दिलेल्या जाहीरात केवळ शिंदे व मोदी यांचाच फोटो आहे. वर ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, असा दावाही केला आहे. जाहीरातीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

जाहीरातीतून देवेंद्र फडणवीसांना वगळणे, ही एकनाथ शिंदे यांची मोठी झेप आहे, असा टोला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे. या सर्व्हे व जाहीरातीमधून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून विरोधकही भाजप व देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत आहे. पाहुयात या सर्व्हेत आणखी काय म्हटले आहे.

गेल्या काही काळामध्ये आलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे समोर आले होते. परंतु ‘झी न्यूज’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा कौल शिंदे फडणवीस सरकारच्या दिशेने दिसत आहे. या सर्वेनुसार जर आज निवडणुका झाल्या, तर युतीला 46 टक्के मते मिळू शकतील. महाविकास आघाडीला 35 टक्के मतदान होऊ शकते. मनसेला 3 टक्के मते मिळू शकतात. त्याचबरोबर 2019 मध्ये काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता की, अयोग्य? या प्रश्नावर 57 टक्के मतदारांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणून कुणाची कामगिरी चांगली होती? या प्रश्नावर केवळ 27 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली होती, असे म्हटले आहे. तर 45 टक्के मतदारांनी ठाकरेंची कामगिरी अत्यंत वाईट होती, असे म्हंटले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची कामगिरी चांगली असल्याचे 51 टक्के लोकांनी म्हंटले आहे.

लाच घेताना पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षितला पोलीस ठाण्यातच पडल्या बेड्या

पुणे: येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडण्यात आले.पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर संबंधित हवालदाराला सहाय्य करणाऱ्या आणखी दोन हवालदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर या दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मोटारीला झालेल्या अपघाताची दखल घेण्यासाठी त्यांनी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार व्यक्तीचा खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यांच्या एका गाडीला अपघात झाला होता. याची तक्रार देण्यासाठी ते येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. तीनही हवालदारांनी त्यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा सर्व व्यवहार १३ हजार रुपयात ठरला होता.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाचे अधिकारी येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात नजर ठेवून होते. त्यानंतर मध्यरात्री तक्रारदार व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली. आणि त्यानंतर लाच स्वीकारत असताना दीक्षित याला रंगेहात पकडले.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, एएसआय मुकुंद आयाचीत, पोलिस शिपाई भूषण ठाकूर,चालक पो शि पांडुरंग माळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर केमिकलच्या टँकरला आग; चार जणांचा मृत्यू, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन टँकर रस्त्यामध्ये पलटी झाला व टँकरला भीषण आग लागल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट उसळले आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ घडली आहे

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर कोणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली. त्यामध्ये चार जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात टँकरने पेट घेतल्याने त्याला भीषण आग लागली. त्यामुळे ब्रीजखालून जाणाऱ्या गाडयावरही ऑईल सांडून गाडयांनी पेट घतला. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर ऑईल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला. तर, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले.दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण 4 ठार आणि 3 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सध्या या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली. युध्दपातळीवर बचाव कार्य करत येथील वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे दुतगती महार्गावर वाहतूकीची कोंडी झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

लग्न होत नसल्यामुळे शरद पवारांना धमकी-बर्वेची अजब जबानी

पुणे-केवळ लग्न जमत नसल्यामुळे सागर बर्वेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे या तरुणाला बेड्या ठोकल्यात.पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्यात. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही झाला होता.मात्र सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे समजते.’राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती.सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करून कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. तर ‘मी धमकीची मी चिंता करीत नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांच्या हातात सूत्र त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी यासंबंधी जबाबदारी घ्यावी,’ असे म्हणत सुरक्षेचा चेंडू शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला होता.

शरद पवारांना अमरावती येथील भाजपच्या सौरभ पिंपळकर या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचे आरोप झाले होते. मात्र, त्याने पवारांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शिवाय, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी धर्मनिरपक्षतेचा तिरस्कार करतो, असा उल्लेखही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर असल्याचे समोर आले आहे.

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सौरभ पिंपळकरचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. त्यात एका फोटोत तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत तर दुसऱ्या फोटोमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत तो दिसतो आहे. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

पर्जन्य यज्ञातून वारकऱ्यांचे ‘वरुणराजा’ला साकडे; पाद्यपूजन सोहळ्याने भारावले!

पुणे-  सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या  हजारो  वैष्णवांनी पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे  अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे!  अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी बागुल परिवार व मित्रमंडळीने केलेल्या पाद्यपूजनाच्या सोहळ्याने वारकरी भारावले. 


  दरवर्षी माजी उपमहापौर, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल  व मित्रपरिवार आणि  पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे    वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.  यंदाही  वारकऱ्यांचे  पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले.  चौरंग पाट , सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी  हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. प्रारंभी वारकऱ्यांच्या हस्ते पर्जन्य यज्ञ संपन्न झाला. यावेळी वारकऱ्यांनी  दुष्काळ कायमस्वरूपी हटू दे, बळीराजा सुखी होऊ दे… सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे,असे साकडे वरुणराजाला घातले. माजी उपमहापौर  व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली.  सिनसन फार्मास्युटिकल केझर  व आबा बागुल मित्रपरिवार  यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉ. कल्पेश पाटील यांच्यासह मोहन आगलावे, ओमप्रसाद बिरादार , लखन पाटील यांनी वारकऱ्यांची ब्लडप्रेशर, शुगर तपासणी करून औषधोपचार केले तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्तीही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था  श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचेही  आबा बागुल यांनी सांगितले. 
यावेळी आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत.  पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या  वैष्णवांचे  पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.  कोरोनासारखे  संकट पुन्हा जगावर येऊ नये,सामान्यांचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात एकोपा कायम राहावा, बळीराजा सुखी होऊ दे   यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल   म्हणाले. 

यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे  पदाधिकारी  नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल,सागर बागुल,हेमंत बागुल  तसेच महेश ढवळे  सागर आरोळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, संतोष पवार, बाबासाहेब पोळके,सुरज सोनावणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

मार्केटयार्ड जवळील हॉटेलला आग: २ कामगारांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची घटना घडली. या आगीत २ कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.अग्निशामक विभागाचे नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर एक जवळ असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धी येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हॉटेलच्या आतील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावर तीन कामगार झोपले होते. त्यातील दोघांचा या आगीत जागीच मृत्यू झाला. तर एकावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचबरोबर या घटनेमधील मृतांची नावे समजू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.

बिपरजॉय गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज

 ६७ रेल्वे गाड्या रद्द अरबी समद्राला उधाणकच्छमध्ये जमावबंदी, गुजरातमधील ५ जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद

बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समद्र उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे १५ आणि १६ जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत असताना रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून या स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे पुरेशा साठ्यासह उघडे राहतील याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बिपरजॉय वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद हे विभाग येतात. वेरावळ- जुनागढ विभाग, पोरबंदर-कनालूस विभाग, राजकोट-ओखा विभाग हे भाग सर्वात संवेदनशील आहेत. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारीही वाऱ्याचा वेग हा ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जून रोजी कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, जुनागड आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कच्छमध्ये जमावबंदी, गुजरातमधील ५ जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद

अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ बिपरजॉय ताशी ७ किमी वेगाने पुढे सरकत आहे. गेल्या गुरुवारी दुपारी त्याचे अत्यंत गंभीर चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर आता ते जखौ बंदराला (गुजरात) ताशी १२५ ते १५० किमी वेगाने धडकणार आहे. हे पाहता आयएमडीने गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर आणि मोरबी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यानंतर कच्छमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कच्छ, सौराष्ट्र येथील किनारपट्टीतील ७,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

कांडला बंदरावरील कामकाज थांबवले
सोमवारी सकाळी कांडला बंदरावरील सर्व कामकाज थांबवण्यात आले. मंगळवारपासून येथील लोकांना किनारपट्टी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम राबवली जाईल. मच्छीमारांनी पुढील पाच दिवस किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. वादळाचा परिणाम म्हणून वलसाड, गिर, सोमनाथ, भावनगर आणि अमरेलीमध्ये हलका पाऊस झाला.

कच्छच्या समुद्रकिनारी नौका ‘पार्क’ झाल्या.

मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, भूगर्भशास्त्र सचिव एम. रविचंद्रन, कमल किशोर, एनडीआरएफ, आयएमडीचे डीजी मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. एनडीआरएफची चार अतिरिक्त पथके तैनात केल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. याशिवाय पुण्याची चार पथके तयार असल्याचेही ते म्हणाले.

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी ही FY23 मध्ये भारताची नंबर 1* इलेक्ट्रिक 3-व्हीलर उत्पादक कंपनी 

मुंबई: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी (LMM), महिंद्रा अँड महिंद्राच्या विभागाने, FY23 मध्ये तिचा क्रमांक 1* इलेक्ट्रिक 3-व्हीलर उत्पादक दर्जा वाढवला आहे. या कालावधीत, LMM 36 816 EV विकले आणि 14.6% मार्केट शेअर केले. हे FY22 च्या 17522 युनिट्स आणि 7.6% मार्केट शेअरच्या कामगिरीपेक्षा लक्षणीय आहे. संपूर्ण भारतभर पसरलेले 1150 टचपॉइंट्स,10000+ चार्जिंग स्टेशन्स तसेच महिंद्राच्या ब्रँडची विश्वासार्हता यामुळे LMM ला त्याचे नंबर 1* EV उत्पादक स्थान टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. FY23 मध्ये, LMM ने पॉवर-पॅक्ड 3व्हीलर EV, झोर ग्रँड जोडले आणि यामुळे लॉन्च झाल्याच्या एका वर्षात 23000 पेक्षा जास्त ऑर्डर बुक करण्यात योगदान मिळाले. झोर ग्रँड व्यतिरिक्त, LMM च्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये वाहनांची Treo श्रेणी आणि Alfas Mini आणि Cargo यांचा समावेश आहे. आमच्या ग्राहकांच्या विश्वासावर आधारित, LMM ने आत्तापर्यंत तब्बल एक लाख थ्री-व्हीलर ईव्हीची विक्री केली आहे ज्यामुळे तिचा नंबर 1* 3-व्हीलर ईव्ही उत्पादक दर्जा मजबूत झाला आहे.

LMM चे CEO सुमन मिश्रा म्हणाली, “आर्थिक वर्ष 23 मध्ये, आम्ही सर्वात जास्त मार्केट शेअरसह इलेक्ट्रिक 3-व्हीलरमध्ये आमचे मार्केट लीडरशिप सुरू ठेवलेजून 23 मध्ये, आम्ही या क्षेत्रातील आमचा सखोल अनुभव आणि नेतृत्व प्रतिबिंबित करणारा एक लाख ईव्ही विक्रीचा टप्पा देखील गाठला आहेआम्ही नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परवडणारी शेवटची मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी काम करत आहोत, जे देशाच्या कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देत आमच्या मौल्यवान ग्राहकांचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात.

लीआयन पॉवरवर चालणारी महिंद्रा ट्रीओ ऑटो ही आघाडीची इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा आहे, तर तिची मालवाहू आवृत्ती, ट्रीओ झोर आणि झोर ग्रँड, 32% शेअरसह त्यांच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. अलीकडेच, 50 000 वा महिंद्रा ई-अल्फा हा माइलस्टोन हरिद्वार प्लांटमधून आणण्यात आला. LMM ने तिच्या हरिद्वार सुविधेवर तिच्या ट्रीओ ऑटोसाठी अतिरिक्त लाइनची घोषणा केली आहे, तर झहीराबाद प्लांटच्या विस्ताराचे काम देखील सुरू केले आहे. झहीराबाद मध्ये शेवटच्या मैलाच्या मोबिलिटीसाठी इलेक्ट्रिक 3- आणि 4-चाकी वाहनांचे उत्पादन होईल.

शहीद पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 12 :- गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेत अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी 7,472 कोटी, तर गोव्याला 457कोटी रूपये

नवी दिल्ली, 12 जून 2023

केंद्र सरकारने राज्य सरकारांना  59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी 1,18,280 कोटी रुपये 12 जून  2023 रोजी वितरित केले. महाराष्‍ट्राला 7,472 कोटी, तर गोव्याला 457कोटी रूपये मिळाले.

राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे ज्यामुळे त्यांना भांडवली खर्चाला गती देता  येईल, त्यांच्या विकास/कल्याण संबंधित खर्चासाठी वित्तपुरवठा करता येईल आणि प्राधान्य प्रकल्प/योजनांसाठी संसाधने उपलब्ध होतील.

जारी केलेल्या रकमेचे राज्यवार विभाजन खाली तक्त्यामध्ये दिले आहे:

जून 2023 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण

Sl. NoName of StateTotal (₹ Crore)
1ANDHRA PRADESH4787
2ARUNACHAL PRADESH2078
3ASSAM3700
4BIHAR11897
5CHHATTISGARH4030
6GOA457
7GUJARAT4114
8HARYANA1293
9HIMACHAL PRADESH982
10JHARKHAND3912
11KARNATAKA4314
12KERALA2277
13MADHYA PRADESH9285
14MAHARASHTRA7472
15MANIPUR847
16MEGHALAYA907
17MIZORAM591
18NAGALAND673
19ODISHA5356
20PUNJAB2137
21RAJASTHAN7128
22SIKKIM459
23TAMIL NADU4825
24TELANGANA2486
25TRIPURA837
26UTTAR PRADESH21218
27UTTARAKHAND1322
28WEST BENGAL8898
 Grand Total118280

शैलेश प्रमोद ब्रह्मे, फिरदोश फिरोज पूनीवाला आणि जितेंद्र शांतीलाल जैन मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश

नवी दिल्ली, 12 जून 2023

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 224 च्या खंड (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करत,राष्ट्रपतींनी  तीन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्‍ये   (i) शैलेश प्रमोद ब्रह्मे, (ii) फिरदोश फिरोज पूनीवाला आणि (iii) जितेंद्र शांतीलाल जैन, या वकिलांचा समावेश आहे. ही नियुक्ती  त्यांच्या ज्येष्ठतेनुसार, त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आहे.

भारताने अर्मेनिया, सिएरा लिओन आणि सुरीनाम या तीन देशांबरोबर, लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित डिजिटल उपाययोजनांची यशस्वी अंमलबजावणी, यावरील सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

पुणे, 12 जून 2023

जी 20 डीईडब्ल्यूजी  ची तिसरी बैठक आज पुणे येथे जागतिक डीपीआय परिषद आणि जागतिक डीपीआय प्रदर्शनाच्या उद्घाटनाने सुरू झाली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि एमएसडीई राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी डीपीआय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी सुरीनाम, आर्मेनिया, सिएरा लिओन, टांझानिया, अँटिगुवा आणि बारबुडा, केनिया, श्रीलंका, मलावी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या नाऊ देशांचे सन्माननीय मंत्री उपस्थित होते. 

उद्घाटन सत्रात जी-20  डीईडब्ल्यूजी चे अध्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत केले आणि या तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. एक भविष्य संघटना, जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संचय, सायबर प्रशिक्षण टूलकिट आणि सायबर अवेअरनेस ऑफ चिल्ड्रेन अँड युथ, अर्थात मुले आणि तरुणांमध्ये सायबर जागरुकता, आणि व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE), अर्थात राष्ट्रीय कौशल्य चौकटीसाठी आभासी उत्कृष्टता केंद्र यासारख्या डीपीआयशी संबंधित गोष्टींसह प्राधान्य क्षेत्रांवर त्यांनी भर दिला.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि एमएसडीई राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर म्हणाले की, डीपीआय हे सर्वांसाठी लागू होणारे एकच प्रमाण नसून, ते खुल्या स्त्रोताच्या आणि भागीदारीच्या सामर्थ्याचा वापर आणि नवोन्मेषी डीपीआय व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सहयोग करते आणि ते देश आणि देशाच्या नागरिकांच्या हितासाठी काम करते. त्यांनी हे दशक ‘TechAde’ (तंत्रज्ञान युग) बनविण्यावर भर दिला आणि ते म्हणाले की भारत हा डीपीआयला मिळालेल्या यशाचे एक प्रमाण असून, डिजिटल परिवर्तनासाठी जगभरातील देश भारताचे अनुकरण करू शकतील. भारताने आर्मेनिया, सिएरा लिओन आणि सुरीनाम या तीन देशांबरोबर, ‘INDIA STACK’  ची देवाण घेवाण, म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित डिजिटल उपायोजनांची यशस्वी अंमलबजावणी, याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी डीपीआय विषयाशी संबंधित चर्चासत्रांचे आयोजन केले होते. ‘ओव्हरव्ह्यू ऑफ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय)’ या समूह चर्चेचे अध्यक्ष अँटिगुआ  आणि बारबुडाचे मंत्री,   मेलफोर्ड वॉल्टर फिट्झगेराल्ड निकोलस होते आणि सत्राचे संचालन  अभिषेक सिंग यांनी केले. तर ‘डिजिटल आयडेंटिटीज फॉर एम्पॉवरिंग पीपल’ या चर्चासत्राचे अध्यक्ष केनियाचे कॅबिनेट सचिव  एल्युड  ओकेच ओवालो होते आणि सत्राचे संचालन यूआयडीएआयचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी  रुपिंदर सिंग यांनी केले.‘डिजिटल पेमेंट्स अँड फायनान्शिअल इन्क्लूजन’ या शीर्षकाच्या  चर्चेचे अध्यक्ष टांझानियाचे  स्थायी सचिव, मोहम्मद खामीस अब्दुल्ला, यांनी केले आणि सत्राचे संचालन भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी  दिलीप आसबे यांनी केले.

या परिषदेत जोनाथन मार्सकेल, जागतिक बँक, विवेक राघवन, एकस्टेपचे मुख्य एआय प्रचारक, रेने सी. मेंडोझा, असिस्टंट नॅशनल एसएस आणि आयएसएस, फिलीपीन, बार्बरा उबाल्डी, OECD यांचा समावेश होता. डिजिटल ओळख हा डिजिटल परिवर्तन, राष्ट्रीय प्राधान्यांचा आधार आणि सामाजिक एकतेचा पाया आहे, यावर चर्चेत भर देण्यात आला. केंद्रीकृत, संघीकृत आणि विकेंद्रीकृत, यासारख्या अंमलबजावणीच्या विविध मॉडेल्सचा चर्चेत समावेश समावेश होता. भारताचे आधार आणि फिलीपिन्सचे फिलसिस यावर विस्तृत चर्चा झाली.

जागतिक डीपीआय प्रदर्शनात डिजिटल आयडेंटिटी, फास्ट पेमेंट, डिजीलॉकर, सॉईल हेल्थ कार्ड (मृदा आरोग्य कार्ड), ई-नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट, नव्या युगातील प्रशासनासाठी युनिफाइड मोबाइल अॅप, डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठी ओपन नेटवर्क, अॅनामॉर्फिक अनुभव, विमानतळावरील अखंड प्रवासाचा अनुभव, भाषांतर, प्रशिक्षण उपाययोजना, टेलि-वैद्यकीय सल्लामसलत अनुभव आणि डिजिटल इंडिया प्रवासाचे गेमिफिकेशन, या 14 विभागांची माहिती देण्यात आली.

डीपीआय परिषदेमध्ये सुमारे 50 देश आणि 150 परदेशी प्रतिनिधी सहभागी झाले होते;  सुरीनाम, आर्मेनिया, सिएरा लिओन, टांझानिया, अँटिग्वा आणि बारबुडा, केनिया, श्रीलंका, मलावी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांचे मंत्री सहभागी झाले

या परिषदेत, उद्या, डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकी अंतर्गत, बंद दरवाजा बैठक होणार आहे. जागतिक डीपीआय परिषदेत डेटा एक्सचेंज, सार्वजनिक प्रमुख पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, हवामान बदल प्रतिसाद, कृषी परिसंस्था आणि जागतिक डीपीआय परीसंस्थेची निर्मिती, यावरील विशेष सत्रांचा समावेश असेल.

महाराष्ट्राच्या लोकनृत्यांनी परदेशी पाहुण्यांना दिला निखळ आनंद

पुणे, दि.१२: ‘जी-२०’ डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे जी-२० प्रतिनिधींसाठीं महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि आसीसीआरच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या लोकनृत्याचा निखळ आनंद लुटला. लावणी आणि गोविंदा नृत्य सर्वाधिक आवडल्याची प्रतिक्रियाही त्यांनी उत्स्फुर्तपणे दिली.

कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव अल्पेश कुमार शर्मा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री श्री.पाटील यांनी जी-२० प्रतिनिधींचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. जिजाऊ वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर विविध लोककला प्रकारांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. गोंधळी नृत्य, गोविंदा नृत्य, धनगर नृत्य, ओवी असे विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील लोकसंस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने पाहुण्यांना घडले. विविध रंगी पारंपरिक पोषाखातली कला मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह पाहुण्यांना आवरला नाही. गोविंदा नृत्यात एकमेकांच्या खांद्यावर उभ्या राहणाऱ्या गोविंदांना त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

कार्यक्रमाच्या मध्यावर भक्तीरसाचा अविष्कारही होता, वीर रसातील पोवाडा आणि सोबत हातात तलवार घेतलेल्या मावळ्यांच्या दृष्यालाही प्रतिसाद मिळाला. शिवराज्याभिषेकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रात अनेकदा येऊनही प्रत्येक वेळा लोकसंस्कृतीचा नवा अविष्कार पहायला मिळतो अशी प्रतिक्रीया सचिव अल्पेश कुमार यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केली.
0000

जी-२० प्रतिनिधींनी अनुभवला,याची देही याची डोळा पालखी सोहळा

पुणे, दि. १२: जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

पालकमंत्री चंदकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.

ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाईलमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.

पालकमंत्र्यांसह परदेशी प्रतिनिधींनी घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
यावेळी दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधीही पालखीच्या दर्शनासाठी सरसावले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील आणि जी- २० प्रतिनिधींनी भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले.
0000

विठुनामाच्या गजरात ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या पुण्यात विसावल्या.

पुणे-संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात मुक्कामासाठी आगमन झालं आहे.सायंकाळच्या सुमारास या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन होताच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशी अनुभूती विठुमाऊलीच्या भक्तांना आली.

.पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं.संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या वारीसाठी शनिवारी देहूमधून प्रस्थान ठेवलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं निघाली. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं.

दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ भेटीसाठी एकमेकांना सामोऱ्या आल्या, त्यावेळी विलोभनीय दृश्य तयार झालं. पंढरपूरच्या वारीदरम्यान माउली आणि तुकोबारायांच्या पालख्यांची होणारी ही पहिली भेट असते. त्यानंतर या दोन्ही पालख्या वाखरीत एकत्र येतात. ज्ञानोबा माउली आणि तुकोबारायांच्या पालख्या आता दोन दिवस पुण्यात मुक्कामाला आहेत. माउलींची पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबारायांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात विसावली आहे.काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांसह नागरिकांनी फुगड्यांचा फेर धरला. टाळ-मृदंगांच्या तालावर ठेकाही धरला. या क्षणाची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे त्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.