Home Blog Page 1496

झाड रिक्षावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू

0

पुणे- सहकारनगर परिसरामध्ये झाड रिक्षावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी रिक्षातील इतर 3 महिलांना आणि एका मुलाला तात्काळ बाहेर काढले आहे.दुपारी ०४•५४ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सहकार नगर, मुक्तांगण शाळेजवळ रिक्षावर झाड पडून महिला जखमी अवस्थेत असल्याची खबर मिळताच जनता अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तार कंपाउंडमधे असलेले एक मोठे झाड रिक्षावर पडून आतमधे एक महिला गंभीर स्वरुपात जखमी अवस्थेत अडकली आहे. रिक्षामधे एकुण चार महिला व एक लहान मुलगा प्रवास करत होते. त्यापैंकी तीन महिला व लहान मुलगा (वय वर्ष तीन) यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले होते. तसेच रिक्षाचालक किरकोळ स्वरूपात जखमी होता. दलाच्या जवानांनी सदर गंभीर जखमी असलेल्या महिलेची सुटका करुन शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ यामधून रुग्णालयात रवाना केले. या घटनेत रिक्षाचे व एका टपरीचे ही नुकसान झाले आहे. दलाचे जवानांनी सॉ, घन, पहार, रश्शी अशा विविध अग्निशमन साहित्याचा वापर केला.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी रविंद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल संदिप घडशीआणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भुषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी सहभाग घेतला.

जाहिरातींचे होर्डिंग्ज लोकांचे बळी घेत आहेत ,सरकारने गंभीरतेने लक्ष घालावे – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, ता. १२ : गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज पडण्याच्या भयावह घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना जीवाला मुकावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत राज्य सरकारने गंभीरतेने लक्ष द्यावे, याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी आज मुख्यमंत्री, नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

पुणे – अहमदनगर, पुणे – नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गांवर हे जाहिरातींचे होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात उभे राहिले असल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी आवश्यक नसल्याने असे होर्डिंग्ज महामार्गाच्या लगत, इमारतींच्या छतावर, फुटपाथवर, गावाजवळ अनधिकृतपणे अतिशय वेगाने लावण्यात येत आहेत. त्यासाठी कोणत्याही नियमांची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे यामध्ये उघडकीला येत आहे. या होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपन्या अत्यंत निष्काळजीपणे हे काम करीत असल्याचे निष्पन्न होत आहे.

पुणे नगर महामार्गावर वाघोली जकात नाका ते रांजणगाव दरम्यान दोन्ही बाजूने २६४, वाघोली ते लोणीकंद या सहा किलोमीटर अंतरावर १३१; पुणे नाशिक महामार्गावर मोशी ते चाकण दरम्यान ११४ होर्डिंग्ज उभारली गेली आहेत. यातील अनेक ठिकाणी फक्त सांगाडे उभे आहेत. मागच्या काही दिवसांत किवळे, हिंजवडी, पिंपरी येथे होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडल्या होत्या. मागच्या काही दिवसांत किवळे, हिंजवडी, पिंपरी येथे होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडल्या होत्या. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातही अशी घटना घडली होती.त्यावरही डॉ. गोर्‍हे यांनी निवेदन दिलेले होते. तसेच याबाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. अशाच प्रकारच्या घटना भविष्यातही इतर शहरांमध्येही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनचविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारकडे याबाबत लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातातील पीडितांना मदतीचा हात पुढे केला

पुणेपीव्हीसी-यू पाइप्स आणि फिटिंग्जची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाऊंडेशन (MMF) यांनी ओडिशा मधील बालासोर येथे अलीकडेच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अपघात झालेल्या जागेच्या परिस्थितीचे आकलन केल्यानंतर, कटकमधील पीडितांना आणि बाधित लोकांवर उपचार करण्यात गुंतलेल्यांना सर्वसमावेशक मदत करण्यासाठी फिनोलेक्स आणि एमएमएफ (MMF) एकत्र आले. या भागात रुग्णांची वर्दळ जास्त असल्याने अपघातग्रस्त, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक आणि सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अन्न आणि पिण्याचे शुद्ध पाणी प्रमुख गरजा असल्याचे लक्षात आले आणि कंपनीने त्या अनुषंगाने  सहाय्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकले. फाऊंडेशन कटक रुग्णालय आणि प्रदेशाबाहेरील ट्राउमा सेंटरमधील गरजू लोकांपर्यंत पोहोचले. स्थानिक स्त्रोतांच्या मार्फत खाद्य पदार्थ आणि जेवणाची सोय करणे या स्वरूपात अजूनही मदत कार्य चालू आहे.

             हा सहभागीदारीतील एकत्र येऊन केलेला प्रयत्न संकटाच्या वेळी सार्वजनिक व खासगी भागीदारी आणि समाजाच्या सहभागाचे महत्व दर्शवतो. बाधित लोकांच्या तत्काळ गरजा पूर्ण करून फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाऊंडेशन (MMF) सकारात्मक प्रभाव पडत आहेत आणि समाजासमोरील आव्हाने दूर करण्यास मदत करत आहेत.

             देशाला मूळापासून हदारवून टाकणाऱ्या या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुकुल माधव फाऊंडेशन (MMF)च्या व्यवस्थापकीय विश्वस्त सुश्री. रितु छाबरिया म्हणाल्या की, या विनाशकारी शोकांतिकेमुळे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करते. या संकटाला तोंड देण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी आलेल्या   टीम्सत्यांचे अथक परिश्रम व त्यांच्यातील माणुसकी पाहणे हे भारावून टाकणारे आहे. संकटाच्या वेळी नेहमी पुढे येऊन मदत करणारी एक परिसंस्था असणे हा एक सन्मान आहे.

             मागील काळात एमएमएफ (MMF) ने चक्रीवादळ, पूर, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पीडितांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि कोविड बाधितांना देखील मदत केली आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण

मुंबई, दि. 12 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये दिनांक ०१ जुलै २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह दिनांक २३ जून २०२३ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३० व्या सत्राचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा, प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक /आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे दिनांक २३ जून २०२३ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आनेवाडी येथे जळालेल्या एसटी बसची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी

सातारा दि. 12 :- पुणे-बेगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटीबसला आज सकाळी 11.15 वाजता आनेवाडी टोलनाक्या जवळ अचानक आग लागली. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. देसाई यांनी एसटीबस कशामुळे जळाली याची प्राथमिक माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून घेतली. प्राथमिक तपासणी अहवाल तात्काळ देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.व्यवस्थापकीय संचालकांशी दूरध्वनीवरुन चर्चायावेळी श्री. देसाई यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व कोल्हापूर विभागीय कार्यशाळेचे सहायक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी यांच्याशी दूरध्वनीवरुन झालेल्या घटने विषयी चर्चा केली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.ही एसटी बस राधानगरी डेपोची होती यामध्ये एकूण 27 प्रवासी होते. प्रसंगावधान बाळगून चालकाने वेळेतच सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणा

मुंबई, दि. 12 :- पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 यात सुधारणा करण्यात आली असून या अधिनियमानुसार सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदावधी, हा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांचा पदावधीइतका असणार आहे.

या अधिनियमास पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम 2023 असे संबोधण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना दि.22 मे 2023 रोजी जारी करण्यात आली आहे.

क्लस्टर डेव्हलमेंटच्या सवलतींचा फायदा सरसकट सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी व्हावा:- नसीम खान.

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठीही क्लस्टरप्रमाणे सवलती द्या.

‘केरला स्टोरी’प्रमाणे मुंब्रा स्टोरीही बोगस..

मुंबई, दि. १२ जून २०२३

शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना देय असलेल्या प्रीमियमवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला हा निर्णय मुंबईतील चार पाच बिल्डरांच्या फायद्यासाठीच घेतलेला आहे. या निर्णयात शिंदे सरकारने बदल करून ही सवलत सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी द्यावी अन्यथा काँग्रेस न्यायालयात जाईल असा इशारा माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी दिला आहे.या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व भरतसिंह उपस्थित होते.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, मुंबई व उपनगरात आज २० हजारांपेक्षा जास्त इमारती धोकादायक आहेत. यातील ९ हजार इमारतीतील ५० हजार लोकांना अतिधोकादायक इमारत असल्याने मुंबई महानगरपालिका जबरदस्तीने घरातून बाहेर काढत आहे. या लोकांच्या पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या लोकांनी फुटपाथवर रहायचे काय? या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे पण शिंदे सरकारची क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतील सवलत या लोकांना लागू होत नाही.

मुंबई विमानतळ परिसरातील सहार गाव, अंधेरी, कुर्ला भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास करण्याची गरज आहे पण नागरी विमान वाहतूक विभागाच्या नियमांमुळे त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. या भागात १५ ते २० मजल्यांच्या इमारतींना परवानगी दिल्याशिवाय क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवताच येत नाही. केवळ चार पाच बिल्डरांना फायदा होत असलेली क्लस्टर योजना सवलत मुंबई व उपनगरातील हजारो इमारतींनाही झाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे नसीम खान म्हणाले.

‘केरला स्टोरी’प्रमाणे मुंब्रा स्टोरीही बोगस..

मुंब्र्यात ४०० लोकांचे धर्मांतरण केल्याचा दावा केला जात आहे पण त्यात तथ्य नाही. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद पोलीसांनी फोनवरील संभाषणावरून येथे येऊन एकाला अटक करून धर्मांतरणाच्या मुद्द्याला प्रसिद्धी देण्याचे काम केले. ४०० लोकांच्या धर्मांतरण झाले असेल तर सरकराने त्या लोकांची यादी जाहीर करावी आव्हान नसीम खान यांनी दिले आहे.
केरला स्टोरीमध्ये चित्रपटात ३० हजार महिलांचे धर्मांतरण करुन आयसीस मध्ये भरती करण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. हा चित्रपट कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रदर्शीत केला. या चित्रपटाचे प्रमोशन स्वतः पंतप्रधान मोदींनी केले. पण केरला स्टोरीचे प्रकरण हाय कोर्टात गेल्यावर चित्रपट निर्मात्यांनेच हा चित्रपट खऱ्या घटनेवर नाही तर काल्पनिक आहे हे स्पष्ट केले. कर्नाटकात केरला स्टोरीच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला कर्नाटकच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. केरला स्टोरी ही बोगस होती तशीच मुंब्रा स्टोरीही बोगस आहे, असे नसीम खान म्हणाले.

भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १२: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते आणि परदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले.

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि उपस्थित प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली. भारतातील डिजीटल प्रगतीसंदर्भात सदस्यांनी माहिती घेतली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विशेष रुची दाखवली.

प्रदर्शनातून भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन
भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून बैठकीसाठी उपस्थित परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले. या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीट प्लॅटफॉर्म बाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली. यामध्ये डिजिटल इंडिया जर्नी हा सिम्युलेटरद्वारे भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनुभव दर्शविणारे साधनही आकर्षण ठरले आहे.

‘आधार’बाबत जाणून घेतले
भारत सरकारने राबविलेल्या आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती सर्वांनी बारकाईने जाणून घेतली. जगातील हा एक मोठा आणि यशस्वी उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. आधार ओळख प्रणालीच्या सहाय्याने जगातील सर्वाधिक बँक खाती भारतात काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधार क्रमांकाचा, ई- केवायसी चा उपयोग करुन थेट लाभ हस्तांतरण, अर्थसहाय्याचे थेट बॅंक खात्यात हस्तांतरण तसेच अनेक ई सुविधांशी आधारची जोडणी याबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सांगण्यात आली.

पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शित
पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या प्रकल्पांचे आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी डिजिटल सादरीकरण स्क्रीनद्वारे तसेच चित्रफीतीद्वारे केले आहे. पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या दालनातून पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दर्शविण्यात आली आहे. अत्याधुनिक स्काडा यंत्रणेचा उपयोग केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, एंटरप्राईज जीआयएस प्रणाली, पुणे मनपाचे संकेतस्थळ व नागरिक सहभागाचे विविध डिजिटल उपक्रम, बहुविध उपयोगाचे चॅटबोट यांचे सादरीकरण यातून करण्यात आले असून मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाविषयी चित्रफीतीद्वारे माहिती देण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महानरगपालिकेने आपल्या दालनातून शहरातमध्ये १२३ शाळांत राबविलेल्या ई-क्लासरुम प्रकल्प, जीआयएस आधारित मालमत्ता मॅपींग प्रकल्प, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मार्ट पाणी व्यवस्थापन, नागरिकांना सूचना देण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणीचा प्रकल्प आदी प्रकल्पांची माहिती सादर केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण केले.
0000

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी

पुणे, दि. १२: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानानंतर सोहळ्यातील मांगल्याचे वातावरण कायम ठेवत संपूर्ण आळंदी शहरात स्वच्छता करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे.

आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी आदी कामे तीन पाळीमध्ये करण्यात आली. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालयाचे एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्स तसेच १ हजार ५०० फिरते शौचालय भाविकांना वापरण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच ते वापरण्यायोग्य राहतील याची पालिकेने दक्षता घेतली. यासाठी १०० सेवेकऱ्यांनाही सहभागी करुन घेण्यात आले.

शहरात संसर्गजन्य आजार पसरू नये याकरीता शहरात नियमितपणे जंतूनाशके व धुर फवारणी करण्यात आली. पालखी प्रस्थाच्या अगोदच्या रात्री १०० सफाई कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुढील आठ तासात इंद्रायणी घाटासह संपूर्ण आळंदी शहरातील स्वच्छता पूर्ण झाली असून रोगराई प्रतिबंधकरीता आवश्यक ती फवारणीदेखील पूर्ण करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या एकूण १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ ट्रॅक्टर, २ सक्शन मशीन आदी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी पूर्णवेळ कार्यरत होते. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासोबतच १०० सेवेकऱ्यांना स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घेण्यात आले. वारीप्रस्थानानंतर राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेअंतर्गत ६० टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. इंद्रायणी घाटासह गर्दीच्या ठिकाणांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देवून मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतल्याने आळंदी नगरपरिषद आळंदी शहर स्वच्छ करण्यास मदत झाल्याची माहिती नगरपरिषचे मुख्याधिकारी श्री.केंद्रे यांनी दिली आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुणे दि. १२ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.

पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात आले आहे.

वैष्णवांचे महावितरणकडून स्वागत-अल्पोपाहाराची सेवा

पुणे, दि. १२ जून २०२३: जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडींचे सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता नाशिकफाटा येथे आगमन झाले. यावेळी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार तसेच वरिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी वैष्णवांचे स्वागत केले.

महावितरणच्या वतीने नाशिक फाटा येथे पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या स्वागतासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. संजीव राठोड, कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रेय साळी व श्री. उदय भोसले यांच्यासह अभियंता व जनमित्रांनी वैष्णवांचे स्वागत केले. यावेळी महावितरणकडून चिवडा व बुंदीचे २० हजार पाकिटे वितरीत करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. यानंतर मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिडींत वारकरी म्हणून नाशिक फाटा ते दापोडीपर्यंत सहभाग घेतला.

दरम्यान जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पुणे परिमंडल अंतर्गत पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे १५० अभियंता व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासह वीज सुरक्षेसाठी उपाययोजना करीत दिडींतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपाहार आदींची महावितरणकडून सेवा देण्यात येत आहे.

पुण्यात उपनगर वार्ताहरावर गाेळीबार ! 10 ते 12 दिवसांपूर्वीही डोळ्यात टाकली होती मिरची पूड

पुणे-माहिती अधिकार अंर्तगत पुणे महानगरपालिकेत  अनाधिकृत बांधकामांची माहिती विचारणाऱ्या उपनगर वार्ताहरावर रविवारी रात्री महर्षीनगर परिसरात माेटारसायकलवर आलेल्या दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची घटना घडली आहे.हर्षद कटारिया (वय-३४) असे या वार्ताहराचे नाव असून या घटनेत त्यास काेणतीही इजा झालेली नाही. याप्रकरणी स्वारगेट पाेलीस ठाण्यात दाेन अनाेळखी हल्लेखाेरां विराेधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली आहे.हर्षद कटारिया हे रिअल इस्टेट एजंट म्हणून प्रामुख्याने काम करीत आहे. त्यासाेबत बिबवेवाडी भागात एका दैनिकाचा उपनगर वार्ताहर म्हणून ते काम करीत आहेत.

१० ते १२ दिवसापूर्वीच हर्षद कटारिया यास तीनजणांनी अडवून त्यांच्या डाेळ्यात मिरची पावडर टाकून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला हाेता. माहिती अधिकार अंर्तगत त्याने पुणे महनगरपालिकेत सात ते आठ अर्ज दाखल केलेले असून नुकतीच त्याच्या एका अर्जाची दखल घेऊन बिबवेवाडी परिसरात एक अनाधिकृत इमारत जमीनदाेस्त करण्यात आलेली हाेती. रविवारी रात्री हर्षद कटारिया हे महर्षीनगर परिसरातून पुणे-सातारा रस्त्याने अतिथी हाॅटेल जवळून घरी जात हाेते. ते साेसायटीच्या गेटजवळ आले असताना त्यावेळी त्याच्या पाठलाग करत दुचाकीवरुन आलेल्या दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी त्याला अडवून त्याच्या डाेळयात मिरची पूड टाकून त्याच्यावर रिव्हाॅलवर राेखून त्याच्या दिशेने दाेन राऊंड फायर केले.परंतु, ते लगेचच वाकल्याने हल्लेखाेरांचा नेम चुकला व ते तातडीने पसार झाले. दरम्यान, याबाबतची तक्रार कटारिया यांनी पाेलिसांना दिली आहे. त्यानुसार दाेन अज्ञात हल्लेखाेरांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यांतर, ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली. त्यावेळी पाेलिसांना दाेन पुंगळ्या घटनास्थळी आढळून आल्या. तसेच जवळील परिसरात एका सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरुन पसार हाेणारे हल्लेखाेर कैद झाले असून त्याआधारे आराेपींचा शाेध घेण्यात येत आहे. नेमके काेणत्या कारणास्तव कटारिया याचेवर हल्ला करण्यात आला याबाबत खुलासा झालेला नाही. स्वारगेट पाेलीस या गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.

शरद पवारांना धमकी:आयटी इंजिनीअर सागर बर्वे गजाआड

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी अटक केली.न्यायालयाने बर्वेला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं यासंदर्भात कारवाई केली. स्थानिक न्यायालयाकडून 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध सुरू आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमास गोखलेनगरमध्ये उस्फूर्त प्रतिसाद

पुणे – शासकीय दाखले आणि योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारच्या वतीने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला गोखलेनगरमध्ये नागरिकांचा आज (रविवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शासनाच्या विविध हितकारी योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक नागरिक या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी अभियान गोखलेनगरमध्ये राबविले. सरकारी सेवा आणि लाभ मिळविण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत, त्याचबरोबर विविध महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा एकाच ठिकाणी सुलभतेने मिळावीत याउद्देशाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तहसील कार्यालय अंतर्गत या उपक्रमात सर्व शासकीय दाखले व योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

यावेळी दत्ताभाऊ खाडे, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, आदित्य माळवे, राजश्रीताई काळे, अपर्णाताई कुऱ्हाडे, अपर्णाताई गोसावी, शाम आप्पा सातपुते, किरण ओरसे, रामभाऊ म्हेत्रे, संतोष काळे, विकास डाबी, राजेश धोत्रे, सुजित गोटेकर, रमेश भंडारी, रोहित लिंबोळे, सुरेश शिंदे, बाळासाहेब दारवटकर, ईश्वर बनपट्टे, सचिन वाडेकर, रविराज यादव तसेच भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘पदवीधर विकास’च्या बांधिलकी विशेषांकाचे प्रकाशन

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकणाऱ्या पदवीधर विकासच्या बांधिलकी या विशेषांकाचे प्रकाशन ना.‌पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ लॉन्स येथे करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड विधानसभा निवडणूक प्रमुख पुनीत जोशी, संपादक भालचंद्र कुलकर्णी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील यांचा ६४ वा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखून आरोग्य सेवेसाठी समर्पित केला. पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकणारा पुणे पदवीधर विकास या मासिकाच्या वतीने ‘बांधिलकी’ हा तयार करण्यात आला होता.

या विशेषांकात चंद्रकांत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेले निर्णय, पुणे जिल्ह्याच्या विकासातील योगदान आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी विशेषांका पाठिमागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पुणे पदवीधर मतदार संघासाठी गेल्या १२ वर्षांपासून पदवीधर विकास हे मासिक प्रकाशित होत आहे व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे जनते प्रति समर्पित व्यक्तीमत्व असून, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांचे दु:ख दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. उच्च व तंत्रशिक्षण विभाग व पुणे जिल्ह्याच्या विकासात ही त्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेषांक प्रकाशित करत असल्याचे त्यांनी सांगितले.