६७ रेल्वे गाड्या रद्द –अरबी समद्राला उधाण–कच्छमध्ये जमावबंदी, गुजरातमधील ५ जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद
बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समद्र उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे १५ आणि १६ जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत असताना रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून या स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे पुरेशा साठ्यासह उघडे राहतील याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बिपरजॉय वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद हे विभाग येतात. वेरावळ- जुनागढ विभाग, पोरबंदर-कनालूस विभाग, राजकोट-ओखा विभाग हे भाग सर्वात संवेदनशील आहेत. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारीही वाऱ्याचा वेग हा ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जून रोजी कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, जुनागड आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कच्छमध्ये जमावबंदी, गुजरातमधील ५ जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ बिपरजॉय ताशी ७ किमी वेगाने पुढे सरकत आहे. गेल्या गुरुवारी दुपारी त्याचे अत्यंत गंभीर चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर आता ते जखौ बंदराला (गुजरात) ताशी १२५ ते १५० किमी वेगाने धडकणार आहे. हे पाहता आयएमडीने गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर आणि मोरबी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यानंतर कच्छमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कच्छ, सौराष्ट्र येथील किनारपट्टीतील ७,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
कांडला बंदरावरील कामकाज थांबवले
सोमवारी सकाळी कांडला बंदरावरील सर्व कामकाज थांबवण्यात आले. मंगळवारपासून येथील लोकांना किनारपट्टी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम राबवली जाईल. मच्छीमारांनी पुढील पाच दिवस किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. वादळाचा परिणाम म्हणून वलसाड, गिर, सोमनाथ, भावनगर आणि अमरेलीमध्ये हलका पाऊस झाला.
कच्छच्या समुद्रकिनारी नौका ‘पार्क’ झाल्या.
मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, भूगर्भशास्त्र सचिव एम. रविचंद्रन, कमल किशोर, एनडीआरएफ, आयएमडीचे डीजी मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. एनडीआरएफची चार अतिरिक्त पथके तैनात केल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. याशिवाय पुण्याची चार पथके तयार असल्याचेही ते म्हणाले.