Home Blog Page 1492

अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस..86 व्या वर्षात पदार्पण..वाचा त्यांचा संदेश त्यांच्याच शब्दात..

आदरणीय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस..86 व्या वर्षात पदार्पण.. अण्णा खूप खूप शुभेच्छा…

अण्णा हजारे यांचा संदेश:

युवाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे युवाशक्ती जागृत झाली तर गाव समाज देशाचे उज्वल भविष्य दूर नाही असं मला वाटतं. कारण मी 25 वर्षाचा युवक होतो सारखा विचार करीत होतो की जन्माला येताना प्रत्येक माणूस रिकाम्या हाताने येतो आणि आयुष्याच्या शेवटी जातानाही रिकाम्या हातानेच जातो. मग त्याचा जगण्याचा उद्देश काय? स्वामी विवेकानंदजी, महात्मा गांधीजींच्या विचारांचा जीवनावर प्रभाव पडला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1938 मध्ये माझा जन्म झालेला असल्यामुळे 1857 ते 1947 च्या स्वातंत्र्यलढ्याची वाचून, ऐकून जाणीव झाल्यामुळे आणि अनेक वेळा फक्त स्वतःसाठीच जीवन जगणारी माणसं कायमचीच मरतात. मग ती लखपती असू द्या अथवा करोडपती असू द्या.

मात्र जी माणसं माझा गाव माझा समाज आणि माझा देश यांचा विचार करतात ती माणसं कायमचीच जगत असतात. ती फक्त शरीराने जातात अशा माणसांच्या कामातून गाव, समाज, देशातील कार्यकर्त्यांना दिशा मिळत असते. मी युवक असताना पंचवीस वर्षाच्या वयात निर्णय घेतला की लग्न नाही करायचं. कारण लग्न करावं तर चूल आणि मूलांमध्येच वेळ जाईल. मगं गाव समाज आणि देशाची सेवा करता येणार नाही.

आज माझे वय 85 वर्ष पूर्ण झाले आहे 86 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गावच्या यादवबाबा मंदिरात राहतो. प्रत्येक युवकाने अविवाहित राहण्याची गरज नाही प्रपंच करून ही गाव समाजाची सेवा करता येते. फक्त जीवनात आपले आचार शुद्ध असावेत, विचार शुद्ध असावेत, जीवन निष्कलंक असावं, जीवनात त्या करावा आणि अपमान पचवण्याची शक्ती असावी म्हणजे प्रपंच करूनही माझ्यापेक्षा अधिक चांगल कार्य करू शकतात.

धन्यवाद.

आपला,  

कि. बा. तथा अण्णा हजारे

विठ्ठलनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर …दिवे घाट भक्ती रसाने चिंब..

सवंत्सरनगरीत माउली विसावली

संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

सासवड:

टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीने पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज ( दि . १४ ) रोजी संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरीत विसावला. उद्या गुरुवार दि. १५ रोजी संत सोपानदेव पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.

पुणे मुक्कामी पहाटे सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांच्या हस्ते माऊलींची नित्यपूजा व आरती करून सकाळी ६ वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेवून सासवडकडे मार्गक्रमण केले. पुणे ते सासवड हा समारे ३० कि.मी. चा टप्पा. हा पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी ७.४५ वाजता हा सोहळा शिंदेछत्री येथे पोहोचला. तेथे आरती झाल्यानंतर सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला. माऊलींच्या सोहळ्या पाठोपाठच तुकोबारायांचा सोहळा याच मार्गाने लोणी-काळभोरकडे मार्गस्थ झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. आज एकादशी असल्याने ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळांच्या पदार्थाचे वाटप केले जात होते. सकाळी ९. १५ वाजता हा सोहळा हडपसर येथे पोहोचला. हडपसर येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अल्पशा विश्रांतीनंतर सकाळी १०.१५ वाजता माऊलींचा सोहळा सासवडकडे तर सकाळी १० वाजता तुकोबांचा सोहळा लोणी- काळभोरकडे मार्गस्थ झाला.

आज सकाळ पासूनच उकाडा जाणवत होता . पाऊस न झाल्याने राज्यातील पेरण्याही खोळंबल्याने त्याचा आषाढी पायी वारीवर परिणाम जाणवत होता . गतवर्षीपेक्षा निम्याने वारकऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची जाणवत होती . पुणे ते दिवेघाट या वाटचालीत मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. या मध्ये तरुण मुलामुलींची संख्या अधिक दिसून येत होती . माऊलींचा हा सोहळा उरळी देवाची मार्गे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी दुपारी १.३० वाजता वडकीनाला येथे पोहोचला. येथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर दुपारी २.३० वाजता हा सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला.
सुरवातीला काहीसे ढगाळ वातावरण होते. घाटात मेघराजा आपली हजेरी लावेल अशी वारकऱ्यांची अपेक्षा होती . पण वारकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला . तळपत्या उन्हात दिवेघाट चढताना वारकऱ्यांसह सोहळ्यात सहभागी झालेले पुणेकर घामाने ओलेचिंब झाले . शासनाने व खाजगी सेवाभावी संस्थानी घाटात पाण्याचे टॅंकर उभा केल्याने भाविकांना काहीसा दिलासा मिळाला .
आळंदीत प्रस्थानाचे दिवशी वारकऱ्यांवर झालेला कथीत लाठीचार्ज व त्याचा विरोधी पक्षांनी केलेला निषेध लक्षात घेता दिवेघाटात पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली . रथाच्या जवळपास केवळ आठदहा पोलिस चालताना दिसत होते पण ते कोणालाही गर्दीपासून दूर करताना दिसत नव्हते . पण काही शेतकऱ्यांची उत्साही तरुण मुले रथाच्या पुढे गाडीच्या चाबकाचा आवाज काढीत रथापुढील गर्दी कमी करताना दिसत होते .
राज्यात अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने दिवेघाटातील सह्याद्रिच्या पर्वतरांगाही उघड्या बोडक्या दिसत होत्या . या पर्वतरांगा मध्ये ज्ञानोबा तुकोबांचा अखंड जयघोष चालू होता. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते.

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलवितो हरिवीण !!

या अभंगाप्रमाणे भाविकांची स्थिती झाली होती. सुमारे साडेचार कि. मी. चा दिवेघाट चढताना वारकऱ्यांच्या भक्तीमध्ये आणि उत्साहामध्ये कोठेही खंड पडत नव्हता. दिंड्यादिंड्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने मधूर चालीमध्ये अभंग गायले जात होते. अबालवृद्ध या भजनात तल्लीन होवून गेले होते. या वाटचालीत मध्येच एखादी वाऱ्याची झुळुक वारकऱ्यांना सुखावत होती. डोंगरमाथ्यावर हजारो भाविक घाटातील वाटचाल पाहण्यासाठी व माऊलींच्या दर्शनासाठी आसुसली होती. माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाट पार करून सायंकाळी ४. ५० वाजता दत्त मंदिराजवळ पोहोचला. वडकीनाला ते झेंडेवाडी हा केवळ सात कि.मी. चा टप्पा पार करुन सायंकाळी ५ वाजता सोहळा झेंडेवाडी येथे पोहोचला.
पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्याचे स्वागत पुरंदरचे आमदार संजय जगताप,माजी राज्यमंत्री दादा जाधवराव ,माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुब्रम्ह्ण्यम स्वामी, प्रांताधिकारी मिनहाज मुल्ला , नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी,मुख्याधिकारी निखिल मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी केले. सायंकाळी सोहळा सासवड मुक्कामी विसावला .

पीएमपीएमएलकडून स्वारगेट व मार्केटयार्ड हून १० मार्ग पूर्ववत सुरू

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ( पीएमपीएमएल) कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले १० बस मार्ग प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट/मार्केटयार्ड या ठिकाणाहून दिनांक १५ जून पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत.

पूर्ववत सुरू करण्यात आलेले बसमार्ग खालीलप्रमाणे :–
मार्ग क्रमांक पासून-पर्यंत मार्गाचा तपशील बस संख्या वारंवारिता

६९- मार्केटयार्ड ते घोटावडेगांव/मुगावडे – स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो ०२ २ तास
७०- मार्केटयार्ड ते मालेगांव (शेडाणी फाटा) – स्वारगेट, कोथरूड डेपो, पौडगांव, मालेगांव ०२ २ तास

२२७- मार्केटयार्ड ते उरावडेगांव (मारणेवाडी) – कोथरूड डेपो, भूगांव, उरावडेगांव ०१ ४ तास
२२७ अ- मार्केटयार्ड ते खारावडे (लव्हार्डेगांव) – पिरंगुट, उरावडेगांव, मुठा ०३ १ तास१५ मि.

२३१- स्वारगेट ते काशिंगगांव कमान – डेक्कन कॉर्नर, पौडगांव, कोळवणगांव ०१ ४ तास
२३२- स्वारगेट ते बेलावडे – कोथरूड डेपो, पौडगांव, कोंढावळे ०१ ३ तास ३० मि.

२३३- मार्केटयार्ड ते पौडगांव शासकीय वसतिगृह – स्वारगेट, भूगांव, घोटावडे फाटा ०७ ३० मि.
२३३ अ- मार्केटयार्ड ते कोळवणगांव – स्वारगेट, कोथरूड, दारवली, डोंगरगांव ०३ १ तास

२३३ ब- स्वारगेट ते भादसगांव – स्वारगेट, कोथरूड, पौडगांव, रावडेवाडी ०१ ४ तास
२७९- मार्केटयार्ड ते खांबोली (कातरखडक) – कोथरूड डेपो, पिरंगुट, रिहेफाटा, खांबोली ०१ ४ तास ३० मि.

उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

अशोक चव्हाण पुन्हा कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होऊ शकतात

आगामी लोकसभा आणि सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले जाणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.आणि अशोक चव्हाण पुन्हा कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता असल्याचे म्हटले आहे. अध्यक्षपदी – अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात किंवा सतेज पाटील यांच्यातील एका नेत्याची वर्णी लागू शकते. त्यावर हायकमांड विचार करत आहे. तसेच कार्याध्यक्षपदी यशोमती ठाकूर, भाई जगताप किंवा इतर नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पुढे कार्यकरणीत बदल केल्यानंतर विधीमंडळ गटनेते पदी नाना पटोले किंवा पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या सर्वांबाबत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विचार करत आहेत.

राज्यात 2014 पासून राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरु झाली. 2019 मध्ये तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. लोकसभेत कसाबसा एक खासदार आणि विधानसभेत 44 आमदार निवडून आले होते. गेल्या चार वर्षांत पक्ष वाढीसाठी फार काही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पुढील काळात काँग्रेसला चांगलं यश मिळण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी हे काँग्रेस महाराष्ट्र कार्यकारिणीत आता बदल केले जाणार आहेत.

विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरुन हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार तसेच कार्यकारिणीतही काही बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढे देखील मीच अध्यक्ष राहिन असं नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्यात करण्याचे नियोजन : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 14 जून 2023

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्याच्या उत्तरार्धांत नियोजित असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित भव्य जनसभेच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या, तर इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान-3 चे प्रक्षेपण  करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शित करणे, हे या चे उद्दिष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 अवकाश यानाने आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, यामधून यानाची प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या प्रवासादरम्यान कठोर वातावरणाचा सामना करण्याची क्षमता प्रमाणित केली गेली, असे ते म्हणाले.

चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा पाठपुरावा करणारे अभियान असल्याचे नमूद करणे उचित ठरेल, असे ते म्हणाले. “चंद्राचे विज्ञान” या संकल्पनेनुसार, चांद्रयानाची चंद्रावर उतरण्याची प्रणाली (लँडर) आणि रोव्हरवरील वैज्ञानिक उपकरणे चंद्राचे पर्यावरण आणि जल-भौतिक गुणधर्मांसह चंद्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सक्षम असतील. त्याच बरोबर, चांद्रयान-3 अभियानात समाविष्ट केलेले आणखी एक प्रायोगिक साधन पृथ्वीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठीही  सक्षम असेल. ज्यामुळे ‘चंद्रावरून विज्ञान’ या संकल्पनेचीही प्रचिती येईल. 

त्यापूर्वी जनसभेला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत आणलेल्या विविध लोक-केंद्रित योजना या समाजातील यापूर्वीच्या  राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या  घटकांसाठी परिवर्तन तर घडवतीलच त्याचबरोबर या योजना दीर्घकाळात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणतील तसेच आपली सामाजिक संस्कृती आणि वर्तनात्मक परिवर्तन घडवतील. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या रोजगार मेळा, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना यासारख्या अनेक लोक-केंद्रित उपक्रमांमागे मोठी संवेदनशीलता आणि करुणा हा दृष्टीकोन असून, तरुणांना त्यांची क्षमता आणि परिश्रम याचे योग्य मोल मिळावे यासाठी समान संधींचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी आश्वस्त करण्याच्या  दृष्टीने आखण्यात आल्या आहेत.

महिलांच्या बाबतीत, उज्ज्वला आणि स्वच्छता (शौचालये) या योजनांनी भारतीय महिलांना, सन्मान आणि प्रतिष्ठेसह, सुविधा आणि सुरक्षा प्रदान केली आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सुरू ठेवावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रसारभारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्यपालांना दिले पत्र…

मुंबई दि.१४: प्रसार भारतीने पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग इतरत्र न हलवता तो जेथे आहे तिथेच सुरू ठेवावा. पुणे येथील कार्यालयात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, तब्बल सात दशके आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र प्रसारित केले जाते. सुमारे २.४ दशलक्ष श्रोतावर्ग याचा लाभ घेत आहेत. हा विभाग बंद झाल्यास श्रोत्यांची गैरसोय होईल. पुणे विभागाने अडचणीच्या काळात देखील उत्कृष्ट काम करून दाखवलेले आहे. असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यापूर्वीदेखील, पुणे आकाशवाणी केंद्रावरील स्थानिक कार्यक्रम रद्द करून मुंबई केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा आदेश तातडीने रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकप्रिय आकाशवाणी पुणे केंद्र बंद करण्याऐवजी अधिकाधिक सक्षम कसा होईल याकरिता पूर्णवेळ सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

यासंदर्भात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गौरव द्विवेदी आणि राज्यपाल मा. श्री. रमेश बैस यांना पत्र देण्यात आले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेनंतर आता स्वराज्य संवाद


आम आदमी पार्टी आपले मुद्दे घरा घरापर्यंत पोहोचवणार.
पाच लाख नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी आपची स्वराज्य संवाद मोहीम

पुणे:

नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘स्वराज्य संवाद’ नावाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे असे आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

आप ने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ही पश्चिम महाराष्ट्रातील स्वराज्य यात्रा काढून विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांशी छोट्या कोपरा सभा घेत, संवाद साधत नवीन कार्यकर्ते जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या कोपरा सभेमध्ये या संवाद यात्रेचे महत्त्व तसेच दिल्ली आणि पंजाब मधील दिलेल्या कामांची माहिती व महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आम आदमी पार्टीचे महत्त्व याविषयी स्थानिक कार्यकर्ते माहिती देतील व सदस्य नोंदणी करतील

गुजरात मधील सुरतच्या महानगरपालिकेमध्ये 23 नगरसेवक निवडून आणण्याची किमया करणारे युवा नेते व महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवली जाणार आहे. गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये शिंदे व फडणीस सरकार सत्तेत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही जनतेचे प्रश्न बाजूला ठेवत एकमेकांची उणीदूणी काढण्यामध्ये गर्क आहेत. पालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्व कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणे अवघड झाले आहे. यामुळेच आम आदमी पार्टी जनसंवाद मोहीम राबवत असल्याचे यावेळेस सांगण्यात आले.

पुणे शहरामध्ये तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटांच्या गावांमध्ये रोज संध्याकाळी कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत.

आम आदमी पार्टी पत्रकार परिषदेत उपस्थित:
विजय कुंभार पुणे शहर कार्याध्यक्ष, मुकुंद किर्दत जिल्हाध्यक्ष, अजित फाटके पाटील, एकनाथ ढोले शहर संघटक, धनंजय बनकर प्रवक्ते, अमित म्हस्के मीडिया प्रमुख पुणे शहर, सतिश

पंढरपूर वारीतील वाहन चालकांना,सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन

पुणे-अपुरे रस्ते, बेसुमार होत असणारी वाढत्या वाहनांची संख्या,पर्यायाने होणारी जीवित व विक्त हानी टाळावी,या साठी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल,मालक संघटनेच्या वतीने गेली 3 दिवस वाहतूक नियमावली व वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याचे प्रबोधन करण्याचे काम वारी दरम्यान करण्यात येते आहे. पंढरपूर यात्रेसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जात असणाऱ्या टेम्पो, कार, ट्रॅक्टर,ट्रक ई.वाहनांच्या चालकांना याबाबत सूचित करण्यात आले,वाहतुक नियमाचे पालन करण्याबरोबरच वाहन रस्त्यावर आणताना घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका,गुलाब पुष्प, श्री.फळ देऊन वारीतील वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले.राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल मेहता यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पुणे वाहतूक पोलिस,यांच्या सह कृष्णा दाभाडे,महेश शिळीमकर, एकनाथ ढोले,अनिल भिसे,सचिन खिलारे,आशिष बाहेती ई.सहभागी झाले होते.

भाजपा प्रवक्त्यालाही दिले खोटे आश्वासन :महापालिकेचा कारभार

मेट्रो व एल अँड टी च्या ढिसाळ कामांबाबत जबाबदारी कोणाची ?संदीप खर्डेकरांचा सवाल
पुणे- भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनाही महालिका आयुक्त आणि पथ विभागाने खोटे आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात संतप्त खर्डेकर यांनी आयुक्तांच्या नावे एक प्रसिद्धीपत्रक पाठविले आहे . त्यात असे म्हटले आहे कि,’
एरंडवणे व कर्वेनगर भागात मेट्रो व एल अँड टी च्या प्रलंबित कामांबाबत मी दिनांक 11 मे रोजी आपणास तक्रार अर्ज दिला होता. सदर कामं 18 मे पूर्वी पूर्ण होतील व रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल असे आपण व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र महिना उलटून गेला तरी खोदकाम जैसे थे च स्थितीत आहे. मनपा ने विठ्ठल मंदिर रस्त्यावर मेट्रो च्या खोदकामाचा भाग सोडून इतरत्र डांबरीकरण करून टाकले आहे.
तर समर्थ पथावरील महत्वाच्या शक्ती 98 चौकात ( देवेश चितळे, रमांबिका मंदिरासमोर ) एल टी ने भर चौकात खोदकाम करून अर्धवट अवस्थेत सोडले आहे व येथे बरेच दिवस कामं बंद आहे व तेथे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.… तसेच शैलेश पुलावरील कामं झाले तरी सर्वत्र राडारोडा पडलेला असून, धुळीचा प्रचंड त्रास होत आहे व तेथे मोठे पाईप देखील पडून आहेत. तरी कृपया त्वरित ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत व दुरावस्था झालेल्या समर्थ पथचे डांबरीकरण करावे. पावसाळा आलाच आहे / मग कधी डांबर मिळणार नाही, कधी प्लॅन्ट बंद असेल तर कधी धो धो पाऊस !! मात्र ह्या कारणांच्या आड प्रशासन दडेल आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागेल.यास नेमके आपण जबाबदार नाहीत काय ? तरी त्वरित हे कामं पूर्ण करावे अशी आग्रही मागणी करत आहे.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांठी राज्य बँकेची अभिनव कर्ज योजना

• केवळ 4 तासात संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा होते.
• जागतिक बँक अर्थसहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत गोदाम पावतीवर ऑनलाईन कर्जाचे वितरण.
• ब्लॉक चेन संगणक प्रणालीचा यशस्वी वापर.
• महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या मदतीने आजपर्यंत 100 कोटी कर्जाचे वितरण.

आपल्या शेती मालाला योग्य भाव येईपर्यंत मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तारणावर, मुल्याच्या 70% इतका कर्जपुरवठा केवळ 9% व्याजदराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बॅंकेने सन 2020 पासून आखले आहे.

या योजनेसाठी राज्य बँकेला, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व व्हर्ल कंपनी व जागतिक बँक अर्थसहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसीत केलेल्या ब्लॉक चेन संगणक प्रणालीचे सहकार्य लाभले आहे. आजतागायत या योजनेअंतर्गत प्राफ्त झालेल्या 4,543 अर्जाद्वारे बॅंकेने रु.100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्ज वाटप केले आहे.

कर्ज प्रक्रिया पध्दतः
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या राज्यामधील 202 ठिकाणी वखार केंद्रांमधून शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालापोटी त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास, संबंधित वखार केंद्राद्वारे बॅंकेने पुरस्कृत केलेला विहीत नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वखार महामंडळाकडून केली जाते. के.वाय.सी. नुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता एकदाच केली जाते. सदर दस्तऐवज ब्लॉक चेन प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने बॅंकेस प्राफ्त होतात. कागदपत्रांची छाननी होऊन, संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाईन पध्दतीनेच बॅंकेच्या कर्ज बोजाची नोंद होते. त्यानंतर वखार महामंडळाने निश्चित केलेल्या मुल्याच्या 70% इतकी रक्कम कर्ज मागणी केलेल्या शेतकऱयाच्या बँक खात्यावर आरटीजीएस/एनईएफटीद्वारे कर्जाची रक्कम वितरीत केली जाते. या सर्व प्रक्रियेस जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱयास बँकेत यावे लागत नाही. किंबहुना शेतकरी व बॅंक यांची भेटच होत नाही. या कर्जाची मुदत 6 महिने असल्याने सदर मुदतीत आवश्यकतेनुसार कर्जाची परतफेड करुन शेतकरी मालाची सोडवणूक व विक्री करतात.

2
अत्यंत जलद पध्दतीने होणाऱ्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना जशी तातडीची आर्थिक मदत मिळते, तसेच योग्यवेळी माल बाजारात विक्री करणे शक्य असल्याने त्याचा फायदाही होतो.

राज्य सहकारी बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाद्वारे या कर्जाचे वितरण होत आहे. आजपर्यंत प्राफ्त झालेल्या एकूण 4,543 शेतकऱ्यांच्या अर्जापोटी केलेल्या 100 कोटी कर्जवितरणापैकी एकूण 2,555 शेतकऱ्यांनी सुमारे 55 कोटी इतक्या कर्जाची परतफेड केली असुन उर्वरित 1,988 शेतकऱ्यांकडे 45 कोटींची येणे बाकी आहे.

याच धर्तीवर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता बॅंकेची प्रस्तावित कर्ज योजना

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कापूस व पणन महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गतही शेतकऱ्यांना अशाच प्रकारे कर्जपुरवठा करण्याचे राज्य बँकेचे धोरण प्रस्तावित आहे.

त्यासाठी बँकेचे प्रशासक व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच नागपूर येथे स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत कापूस व पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेउढन चर्चा केली आहे.

या योजनेमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन केले जाणार असून, महामंडळातर्फे या शेतकऱ्यांच्या कापसाची प्रत उंचवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अशा कापसाचे जिनिंग प्रेसींग करुन त्याच्या गाठी बनविणे, योग्य भाव येईपर्यंत त्याची साठवणूक महामंडळाच्या गोदामामध्ये करणे, अशा कापसाचे योग्य वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर ई-ऑक्शनद्वारे विक्री करणे इ. सर्व कामे महामंडळाकडून केली जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत साठवणूक केल्या जाणाऱया कापसाच्या तारणावर अत्यंत जलद रित्या कर्ज मंजूरी व वितरण करुन देण्याची योजना कापूस महामंडळ व ब्लॉक चेनच्या सहकार्याने राज्य बँकेतर्फे लवकरच राबविली जाणार आहे.

स्वच्छ, निर्मल वारीसाठी शासन कटिबद्ध; २१ कोटींचा निधी मंजूर – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

पुणे, दि.१४: आषाढी वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या वारीसाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

ग्रामस्वच्छता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आळंदी ते पंढरपूर मार्गावरील स्वच्छता दिंडीचा शुभारंभ व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विधानभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, वारकऱ्यांसाठी दिवाळी, दसऱ्यापेक्षाही आषाढी वारी हा मोठा उत्सव आहे. राज्यातील विविध भागातून वारकरी पंढरपूरला येत असतात. प्रशासनाच्यावतीने वारकऱ्यांसाठी शौचालये, उष्णतेपासून संरक्षणाकरिता तात्पुरता निवारा, पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा, स्वच्छतेविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्ते व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याने सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. गावांमध्ये प्रत्येकाने शौचालये बांधावित. शौचालय बांधण्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा, आपलेही गाव हागणदारीमुक्त करून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी  प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता पाळावी असे आवाहन त्यांनी केले.  वारीमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार कांबळे म्हणाले, स्वच्छता दिंडीच्या निमित्ताने शासनाने चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छतेविषयी लोकजागृती होईल व संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देऊन वारी स्वच्छ, हरित व निर्मल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी वारीपूर्वी प्रत्यक्ष पालखी तळ व मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावर एकूण २ हजार ७०० शौचायले उपलब्ध असून मागच्या वर्षीपेक्षा ६० टक्के जास्त शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के शौचालये देण्यात आली आहेत.

उष्णतेची तीव्रता कमी झालेली नसल्याने वारकऱ्यांसाठी दीड पट जास्त टँकर तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे केले आहेत. त्याठिकाणी आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत चौथा टप्पा सुरु करण्यात आला असून प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते २०१८- २०१९ व २०१९-२०२० यावर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी, टिकेकरवाडी, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी, सोलापूर जिल्ह्यातील मांडवे व सांगली जिल्ह्यातील कुंडल व चिखली ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच टिकेकरवाडी ग्रामपंयाचतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, मान्याचीवाडी व सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.

आरोग्य, ग्रामस्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या घडीपुस्तिका, माहिती पुस्तिकांचे प्रकाशन आणि शौचालय उपयोजकाचे उद्घाटन यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दिंडी प्रमुखांना औषध किटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनीही स्वच्छता दिंडीविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात उपायुक्त विजय मुळीक यांनी स्वच्छता दिंडीविषयी माहिती दिली. यावेळी विभागातील पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कलापथकांचे प्रतिनिधी, आरोग्यदूत, आशा सेविका,  वारकरी उपस्थित होते.

स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी

स्वच्छता वारीच्या निमित्ताने पालखी मुक्काम, विसावा, रस्त्यावर निर्माण होणारा कचरा, गाव व परिसर स्वच्छ  ठेवण्याबाबत स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ८ चित्ररथाच्या माध्यमातून कलापथकाद्वारे व ५० आरोग्यदूतांमार्फत  स्वच्छतेचा संदेश गावोगावी देण्यात येणार आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विषयक पुस्तिका, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरुक पालक, सुदृढ बालक, नियमित लसीकरण असे स्वच्छता व आरोग्य विषयक संदेशाद्वारे वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटींची योजना – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

नवी दिल्ली :  देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या  मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये  पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची  महत्त्वाची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी येथे केली.

आज येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार झाली. या बैठकीत श्री. शाह यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये  मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन @2047 अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी तसेच देशातील आपत्ती जोखीम कमी करण्याची आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अधिक मजबूत करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणे हा या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यावेळी म्हणाले.

श्री. शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 8 हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 5 हजार कोटींचे प्रकल्प उभारले जातील. शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी 2,500 कोटींचे प्रकल्प उभारले  जातील.  तसेच भूस्खलन शमन करण्यासाठी 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 825 कोटी रूपयांची राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन असे महत्त्वाचे  प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी यावेळी केल्या.

यासह 350 अति जोखीम आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्‍याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे आपत्ती उद्भवल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आपदा मित्र  आठ हजाराच्या वर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

आज झालेल्या बैठकीत राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर माहितीची देवाण घेवाण केली.

पुणे आकाशवाणीच्या ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुलाचे कटकारस्थान माजी मंत्री प्रकाश जावडेकरांनी हाणून पाडावे -मोहन जोशी

पुणे-आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपति संभाजीनगरला  स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हंटले आहे.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच त्यांनी घेतलेल्या केंद्र धार्जिण्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरबद्दल प्रेम आहे अशावेळी ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला साथ देऊन ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांनी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यी मर्जी संपादन केलीही असेल मात्र पुणेकर आता त्यांच्या पुणे विरोधी कटकारस्थानांना क्षमा करणार नाहीत. आता तरी याचे प्रायश्चित्त म्हणून ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे रदबदली करून पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे. कॉंग्रेस पक्ष  पुणेकरांचे हित सांभाळण्यासाठी या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करेल असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.  

राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम

भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल. कार्ला – आचार्य चाणक्य म्युझियमसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती, अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म नीती व याचसोबत ७  दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरिता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे  निवास व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब

नव्या पिढीला पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचे जतन करावे, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

अंगणवाडीत योग दिवस साजरा होणार

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृद्धींगत व्हावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन)  यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार  करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के  विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.

ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास ४७२.१९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.

सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत

सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.