Home Blog Page 1491

तरुण आणि महिलांचे मतदार यादीत प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

उस्मानाबाद:- महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आणि बीएलओ यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, प्रियंवदा म्हाडदळकर (भा.प्र.से.), अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, मतदार नोंदणी करताना 18 ते 19 वयोगटातील तरुणांचा समावेश वाढविण्यासाठी तसेच महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन याबाबत जनजागृती करावी. तरुणांना मताधिकारांचे महत्व सांगावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणीसाठी लागणारा फॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी त्या महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य यांची मदत घ्यावी. स्वत: महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी.

देशाच्या विकासात महिलांचाही मोठा सहभाग असतो. मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी त्यांच्याही नोंदणी शंभर टक्के व्हावी यासाठी वेगवेगळ्या महिला संघटना, बचत गट आणि प्रसिध्दी माध्यमांचा वापर करुन महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री.देशपांडे यांनी यावेळी केल्या.

नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज पुरस्कार जाहीर

पुणे – नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी व कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने पं.बिरजूमहाराज यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज राष्ट्रीय पुरस्कार मुंबई च्या जेष्ठ कथक नर्तिका पदमा शर्मा व आसाम चे जेष्ठ कथक नर्तक बिपुल चन्द्र दास यांना देण्यात येणार आहे तर नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज युवा पुरस्कार बनारसचे कथक नर्तक सौरव व गौरव मिश्रा यांना देण्यात येणार आहे. सन्मान चिह्न, मानपत्र, शाल, व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्यास आमदार उमा खापरे व उद्योजक कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर नर्तिका पद्मा शर्मा, नर्तक बिपुल चन्द्र दास, नर्तक सौरव- गौरव मिश्रा यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम या द्वितीय नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज नृत्य महोत्सवात होणार आहे. हा कार्यक्रम बुधवार दिनांक २१ जुन रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास कुठलेही प्रवेश मुल्य नाही. या आधी पं.बिरजूमहाराज यांच्या नावाने दिला जाणारा पहिला नृत्य सम्राट पं.बिरजूमहाराज पुरस्कार दिल्लीच्या पद्मश्री शोवना नारायण व पं.दीपक महाराज यांना देण्यात आला होता. अशी माहीती केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी दिली.

वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथ करातून सूट; स्टिकर्स, पासेस घेण्याचे आवाहन

पुणे, दि. १५: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना १३ जून ते ३ जुलै या कालावधीत पथकरातून सूट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना आपल्या वाहनास पथकरातून सूट मिळणेबाबतचा पास हवा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागामध्ये सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, पीयुसी, कर, परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदी सर्व विधिग्राह्य कागदपत्रांसह अर्ज सादर करून स्टिकर्स/ पास प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहनही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७ ते ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरिता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद बाळासाहेब चौगुले, महिलांमधून सोनाली अर्जुनराव म्हात्रे तसेच मागासवर्ग उमेदवारांमधून विशाल महादेव  यादव हे राज्यात प्रथम आले आहेत.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका , उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

राजीव गांधी ई- लर्निंग स्कूलमध्ये स्कुल चले हम’चा नारा !;आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी;सुखावले!

पुणे -शिक्षणाशिवाय आयुष्य घडत नाही…हे सत्य कायम स्मरणात ठेवून ज्ञानाचा वटवृक्ष बहरावा. या उद्देशाने  पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील  राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे शाळेचा पहिला दिवस ‘स्कुल चले हम’ या घोषणांनी  अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.हसतमुखाने स्वागत करणारे  विदुषक आणि कॅटबरीची भेट यामुळे विद्यार्थीवर्गांचे चेहरे फुलले होते. 
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर  आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅटबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागुल आणि शिक्षक वृदांने  जंगी स्वागत केले. यावेळी  तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या  स्वागतासाठी खास उपस्थित राहत त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले.     
या प्रसंगी माजी उपमहापौर  आबा बागुल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व ही मुले देशाचे भविष्य आहेत. देश महासत्ता होण्यासाठी  मुलांना आत्ताच दर्जेदार व मोफत शिक्षण काळाची गरज आहे आणि सर्वच शाळात  विद्यार्थी पटसंख्या वाढणेही महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी ज्या विद्यार्थ्यांची  वर्गातील  वर्षभराची उपस्थिती  शंभर टक्के असेल, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत   मोफत ‘महाबळेश्वर  सहलीचा आनंद’ ही योजनाही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी यावेळी जाहीर केली.   
याप्रसंगी प्रशाकीय अधिकारी डॉ मीनाक्षी राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, शाळेचे  मुख्याध्यापक जांबुवंत मसळकर, प्रभारी मुख्याध्यापक  अश्विनी ताटे आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक निखिल सानप, सतीश सुरुडे, दीपाली गोळे,नेहा रोकडे,प्राची सर्जेराव,अस्मा सय्यद आणि शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन पुन्हा भाजपात यावे ..यु पी च्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले थेट मोदी- शहांशी बोला …

भाजपचे दरवाजे नेहमीच खुली असतात

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा म्हणजे युतीत पुन्हा समाविष्ट होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मौर्य यांचे सध्या महाराष्ट्रात मोदी @9 महाजनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यात त्यांनी ठाकरेंपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे.

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपचे दरवाजे केव्हाच बंद नसतात. आमच्या पक्षाची कवाडे नेहमीच खुली असतात. पण त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना पुढाकार घ्यावा लागेल. भाजप प्रस्ताव ठेवणार नाही, कारण या प्रकरणी भाजपने नाही तर त्यांनी चूक केली आहे,” असे केशवप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.

मौर्य यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. “ज्यांचे 4 खासदार आहेत ते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात आहेत. जे 50 खासदार निवडून आणू शकत नाहीत ते मोदींना रोखण्यासाठी एकत्र येत आहेत,” असे ते म्हणाले.वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून सत्ताधारी शिवसेना व भाजपत राजकीय कलगीतुरा रंगला असताना भाजपच्या या बड्याने नेत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या ऑफरमुळे भाजपच्या मनात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

PMPMLला मिळणार ९००बसेस,कर्मचाऱ्यांना जुलैपासून १०० टक्के पुर्ण सातवा वेतन आयोग-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येत्या काही महिन्यांमध्ये ९०० ई-बस दाखल होणार आहेत.
त्यामध्ये सात मीटर लांबीच्या ३०० ई-बसेस जी. सी. सी. तत्वावर तसेच संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या ३०० बसेस
व केंद्र सरकारकडून ३०० बसेस अशा एकूण ९०० बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल
होतील अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरूवारी पुणे महानगर परिवहन
महामंडळाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे मध्ये दिली.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळा कडील कर्मचारी
संघटना, खासगी बस पुरवठादार व सी. एन. जी. पुरवठादार एम.एन.जी.एल. यांच्या प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारी पुणे
महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीसाठी पुणे मनपाचे आयुक्त
मा. विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त मा. शेखर सिंग, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल
उपस्थित होते.
बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, की पुणे महानगर परिवहन
महामंडळाला चांगली सेवा देण्यासाठी बसची आवश्यकता आहे. मेट्रो सेवा सुरू होईपर्यंत सात मीटरच्या ३०० ई-बस
पीएमपीच्या ताफ्यात येतील. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतून पीएमपीला ३०० ई-बस मिळणार आहेत. तसेच, पुणे व
पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या माध्यमातून ३०० बसेस महामंडळास मिळणार आहेत. यामध्ये जी. सी. सी.
तत्वावर १०० ई-बसेस व २०० सीएनजी बसेस असणार आहेत. तसेच सदर बैठकीमध्ये पुणे महानगर परिवहन
महामंडळाचे कर्मचारी, खासगी बस पुरवठादार व सी. एन. जी. पुरवठादार एम.एन.जी.एल. यांच्या प्रलंबित प्रश्नावर
समाधानकारक तोडगा निघाल्याचे मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना जुलैपासून १०० टक्के सातवा वेतन आयोग
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू करण्यात आलेला ५० टक्के सातवा वेतन
आयोग, येत्या जुलै २०२३ पासून संपूर्ण लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के
फरकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरूवात होणार आहे. त्यासाठी महिन्याला चार कोटी रुपये
लागणार आहेत.

आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग सुरु ठेवा

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

पुणे, दि. १५: पुण्याचे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक तसेच राजकीय महत्त्व लक्षात घेता प्रसारभारतीने आकाशवाणीच्या पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्राद्वारे केली आहे.

श्री. पाटील आपल्या पत्रात म्हणतात, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रादेशिक वृत्त विभागामार्फत दररोज मराठी भाषेत प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्यांचे बातमीपत्र प्रसारित होत असते. प्रसारभारतीद्वारे पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचा आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रे प्रसारित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजून अतिशय दुःख झाले. यासोबतच आकाशवाणीच्या विविध भारतीद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, पुणे वृत्तांत आणि इतर सर्व बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे श्रोत्यांशी अतूट नाते असून या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल श्रोत्यांमध्ये आत्मियता आहे. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे सर्व वयोगटातील श्रोते आहेत. गेली अनेक वर्षे हे श्रोता आणि पुणे केंद्राचे कार्यक्रम यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. गेल्या दोन पिढ्यांतील सभासदांना आकाशवाणीबद्दल खूप आपुलकी आहे. यामुळेच आकाशवाणीच्या देशातील विविध केंद्रांपैकी पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते मिळाले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या सुमारे २४ लाख आहे.

भारत सरकारचे अनेक मंत्री विविध सरकारी प्रकल्पांच्या शुभारंभासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी दररोज पुण्यात येतात. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जी-२० बैठकीसारखे विविध महत्त्वाचे कार्यक्रमही पुण्यात नियमितपणे आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचे वृत्तांकन करून ते इतर वृत्त विभागांसह दिल्लीला पाठविण्याचे महत्त्वाचे काम या प्रादेशिक वृत्त विभागाकडून केले जाते. ते बंद करण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींना बातमीपत्रात स्थान मिळण्याविषयी शंका उपस्थित होते. विशेषत: ज्येष्ठ आणि प्रतिष्ठीत नागरिकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड नाराजी आहे.

या बाबी लक्षात घेता प्रसार भारतीच्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि लोकभावनेचा आदर करून हा निर्णय मागे घ्यावा विनंती करत असल्याचेही श्री. पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. १५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची/ मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी दिवे (ता. पुरंदर), तरंगवाडी (ता. इंदापूर), पेठ (ता. आंबेगाव) अशा तीन तर मुलींसाठी चांडोली (ता. खेड) या ठिकाणी शासकीय निवासी शाळा असून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दौंड येथेही मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येत आहे.

या निवासी शाळेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के तर दिव्यांगासाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असेही कळविण्यात आले आहे.
0000

पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार !अनुराग ठाकूर यांनी दिली स्थगिती

पुणे –पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे.

पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा श्री. जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर होणार आहे.

कच्छ-सौराष्ट्रात मुसळधार पाऊस,बिपरजॉय कच्छपासून 80 किमी दूर, 6 ते 8 वाजता धडकण्याची शक्यता

चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून ते अत्यंत धोकादायक बनले आहे. ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने ताशी 90 किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. बिपरजॉय कच्छपासून 80KM दूर आहे, जे गुरुवारी रात्री 6 ते 8 पर्यंत कच्छच्या जाखाऊ बंदरात पोहोचू शकते. या काळात परिस्थिती खूप वाईट होऊ शकते.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव इतर 10 राज्यांमध्ये दिसत आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांचा समावेश आहे. येथील अनेक भागांत जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.दक्षिण अरबी समुद्रात वादळाची उत्पत्ती झाल्यानंतर, गुजरात किनारपट्टीजवळ येईपर्यंत त्याचा मार्ग अनेक वेळा बदलला. यामुळे ते कमकुवत झाले आहे, परंतु काही वेळा ते धोकादायक बनले. गुजरातमधील 8 प्रभावित जिल्ह्यांमधून 75 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार त्याचा परिणाम गुजरात आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि पश्चिम राजस्थानमध्ये दिसत आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.

IMD गुजरातचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी संध्याकाळी 5 वाजता सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय जखाऊपासून 100KM अंतरावर आहे. ईशान्येकडे जाताना कच्छ, सौराष्ट्र ओलांडणार आहे. मग त्याचा वेग ताशी 115-125KM असेल. यानंतर संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील.

कमांडर तटरक्षक क्षेत्र-उत्तर पश्चिम विभागाचे महानिरीक्षक ए.के. हरबोला म्हणाले- आम्ही गुजरातमध्ये 15 जहाजे आणि 7 विमाने तयार ठेवली आहेत. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान धडकेच्या शक्यतेमुळे NDRFच्या 27 तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

४ जून ते १५ जून चा चक्रीवादळाचा साटेलाईट नकाशा

दुपारी 2:30च्या अपडेटनुसार, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, चक्रीवादळ बिपरजॉय जखाऊपासून सुमारे 140 किमी आणि द्वारकापासून 190 किमी अंतरावर आहे. ताशी 125-135 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

IMD नुसार, गुजरातमधील द्वारका, जामनगर, पोरबंदर, मोरबी, राजकोट, जुनागढ, अमरेली, भावनगर गिर सोमनाथ आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये 5-15 मिमी/तास वेगाने पाऊस आणि वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी अपेक्षित आहे.

बिपरजॉय हे गेल्या 25 वर्षांतील जून महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणारे पहिले वादळ असेल. यापूर्वी 9 जून 1998 रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर वादळ आले होते. त्यानंतर पोरबंदरजवळ 166 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते.

गेल्या 58 वर्षांचा विचार केला तर 1965 ते 2022 दरम्यान अरबी समुद्रात 13 चक्रीवादळे निर्माण झाली. यातील दोन गुजरातच्या किनारपट्टीला धडकले. एक महाराष्ट्र, एक पाकिस्तान, तीन ओमान-येमेन आणि सहा समुद्रावर कमकुवत झाले.

महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांस मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हे

पुणे, दि. १५ जून २०२२: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना कुमशेत येथे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभागातील जुन्नर उपविभाग अंतर्गत सहायक अभियंता कृष्णा कोळी व रोहिणी आंबेकर तसेच जनमित्र सुखानंद डोणे, अजरुद्दीन शेख, कुंडलिक तळपे व योगेश अंबलकार यांच्याकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान कुमशेत येथील वीजग्राहक बाळासाहेब बबन डोके याच्याकडे वीजबिलापोटी ५ हजार ५९० रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत होती. मात्र ‘तुम्ही इथे आलेच कसे’ असे म्हणत आरोपी बाळासाहेब बबन डोके व सुधीर बाळासाहेब डोके यांनी मोठ्या आवाजात शिविगाळ सुरु केली. सहायक अभियंता कृष्णा कोळी व जनमित्रांना धक्काबुक्की, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला.

या प्रकरणी महावितरणकडून जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जुन्नर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.

पाणी कपातीचा फार्स टँकर माफियांसाठी तर नाही ? नितीन कदमांचा थेट सवाल

पुणे- गेली १० वर्षे पुण्याला पावसाने मुबलक नव्हे तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी पुरवठा केला.पण दर वर्षी महापालिकेने मात्र पाणी कपातीचा खेळ केलाच आता हि पाणी कपात खरोखर पुणेकरांच्या हितासाठी पाणी जपणुकीसाठी असावी अशी समजूत आपली असते पण जिथे टाक्या भरल्या जातात .तिथूनच एकाकीकडे पाणीकपात आणि दुसरीकडे टँकर मागे टँकर पाणी भरून पाण्याची जणू तस्करी होते कि काय ? असा प्रश्न पडेल असे चित्र दिसत असेल तर ?तर हि पाणी कपात टँकर माफियांसाठी तर नाही ?अशी शंका मानता आल्या शिवाय राहत नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी चे अर्बन सेलचे प्रमुख नितीन कदम यांनी येथे व्यक्त केले आहे.

त्यांनी आज सकाळी बारा वाजता पद्मावती पंपिंग स्टेशन येथील पुणे मनपाच्या टँकर पॉईंटला भेट दिली आणि सांगितले ,’
आपण बघत आहात या ठिकाणी शेकडो टँकर भरले जात असून कित्येक टँकर भरण्यासाठी रांगेत उभे आहेत.
दर गुरुवार प्रमाणे संपूर्ण पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा बंद आहे .मग हा नियम यांना लागू नाही का..? प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्या पुणेकर आज पाण्यासाठी हवालदिल झाले असताना हे टँकर कुठे खाली केले जात आहेत..??लांबलेल्या पावसामुळे धरणातील कमी झालेला पाण्यासाठ्या मुळे सहकार्याची भूमिका ठेवत पुणेकर निमुटपणे पाणी कपात सहन करीत असताना पुणे महापालिकेने मात्र टँकर माफियांना मोकळीक दिल्याचे दिसते.याबाबत तातडीने चौकशी जावून संबंधितांवर कठोर शासन व्हायला व्हावे अशी राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहराची भूमिका आणि मागणी आहे अन्यथा याबाबत तीव्र असे आंदोलन आम्ही करू असेही त्यांनी म्हटले आहे.

३४ लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी ८० कोटींचा परतावा

पुणे, दि. १५ जून २०२२: महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. .

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये पुणे परिमंडलातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. कृषिपंपधारक वीजग्राहकांना त्रैमासिक वीजबिल देण्यात येत असल्याने त्यांच्या येत्या जून महिन्याच्या वीजबिलात परताव्याची रक्कम समायोजित करण्यात येणार आहे.

लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ३४ लाख ४१ हजार ५७५ वीजग्राहकांना ३९ कोटी २० लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरातील १७ लाख ८४ हजार ३६ ग्राहकांना २१ कोटी ६० लाख ९० हजार रुपयांचा, पिंपरी व चिंचवड शहरातील ७ लाख ८८ हजार ९१० वीजग्राहकांना ९ कोटी २२ लाख ८७ हजार तर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ८ लाख ६८ हजार ६२९ ग्राहकांना ८ कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तसेच पुणे परिमंडलातील उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच इतर ५ हजार ४०३ वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी ४० कोटी ७६ लाख ३५ हजार रुपयांचा परतावा वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती( एनए)परवान्याची!

जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या सुधारणेमुळे एनए परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पण, शासनाचा नवीन निर्णय काय आहे? यामुळे सध्याच्या प्रक्रियेत काय बदल होणार आहेत? मूळात एनए म्हणजे काय आणि जमीन एनए करणं का महत्त्वाचं आहे? गेल्या काही वर्षांत एनए प्रक्रियेत कोणते बदल झाले आहेत? याची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

एनए म्हणजे काय? का करतात?

सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन ॲग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक ‘रुपांतरण कर’ आकारला जातो. याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही. तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.

नवीन सुधारणा

महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार, बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. याआधी एखाद्या प्लॉटवर बांधकाम करायचं असल्यास, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना दोन प्राधिकरणांकडे अर्ज करावा लागत असे. बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे आणि एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागांकडे जाण्याची गरज नसणार आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जमिनीच्या अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.
बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारकडून ‘बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली’चा (building plan management system) वापर केला जात आहे. आता याच प्रणालीअंतर्गत बांधकाम परवानगीसोबतच जमिनीच्या अकृषिक वापरासाठीची परवानगी ऑनलाईन पद्धतीनं एकत्रितपणे देण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात नमूद केलं आहे.

वर्ग १ आणि वर्ग २ जमिनींनाही परवानगी

भोगवटादार वर्ग-1 पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, असा याचा अर्थ होतो. नवीन सुधारणेनुसार, भोगवटादार वर्ग-1 च्या जमिनींच्या बाबतीत building plan management system प्रणालीत गरज असेल तर रुपांतर कर वसूल केला जाईल आणि मग बांधकाम परवानगीसोबत अकृषिक वापराची सनद दिली जाईल.

भोगवटादार वर्ग-2 पद्धतीमधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो. नवीन सुधारणेनुसार, भोगवटादार वर्ग 2 च्या बाबतीत, नजराणा आणि इतर शासकीय रकमांची देणी दिल्यास आणि तहसिलदारांनी परवानगी दिल्यास building plan management system प्रणालीअंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल. या बांधकाम परवानगीसोबत अकृषिक वापराची सनद दिली जाईल.

याआधी झालेल्या सुधारणा

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमिनीच्या अकृषिक (एनए) वापरासाठी परवानगी देण्यात येते. कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कलम 42 (अ), (ब), (क) आणि (ड) अशाप्रकारे ओळखल्या जातात. या सुधारणांमुळे जमिनीच्या अकृषिक (एनए) परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला होता. त्यात नमूद केलयं की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारणेनुसार, जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल, तर अशा क्षेत्रातील जमीन एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही.

कलम 42 (क) या सुधारणेनुसार, तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल, तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल. तर, कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे, अशा शेतमालकांना एनए परवानगीची आवश्यकता असणार नाही, अशी सुधारणा कलम 42 (ड)मध्ये करण्यात आली आहे. पण, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात एनए परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून, त्यासाठीचं रुपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं गरजेचं आहे.