Home Blog Page 1488

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावचा स्टार स्टडेड अवॉर्ड्स नाईटमध्ये आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान!

” पुरस्कार ” मय वर्ष ! 
यंदा च वर्ष अभिनेता राजकुमार राव याच्यासाठी खास मानलं जातंय आणि त्याचं कारण देखील तितकच खास आहे. त्याच्या चमकदार कामगिरीसह 2023 मध्ये त्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेक पुरस्कारांच्या सोबतीने “मोनिका ओ माय डार्लिंगमधील ” अभिनयासाठी बी-टाउनच्या शेपशिफ्टरने डिजिटल फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) पुरस्कार जिंकला. अनेक प्रतिष्ठित अवॉर्ड ने हे वर्ष राजकुमार साठी ” पुरस्कार ” मय वर्ष झाल्याचं बघायला मिळतंय. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम  कथा आणि आणखी कमालीच्या भूमिकावर हा राजकुमार काम करताना दिसतोय. 
सह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि  अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्यांच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
राजकुमार याने अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित स्त्री  2 च्या रिलीजची तारीख त्यांच्या टीमसोबत जाहीर केली. 2023 मध्ये राजकुमार राव मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक मध्ये दिसणार आहे.

Sharad Lonkar

मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी आणू नका,यावर्षीही पीओपीच्याच गणेशमुर्ती

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

मुंबई-
कोटींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा गणेशमूर्ती कारखाने हा उद्योग बंद करुन मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका, यावर्षी ही पिओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या म्हणजे मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार उपस्थितत होते.

यावेळी ते म्हणाले की, मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्माण करणारे राज्यातलं मोठं साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रातला निर्माण केलेल्या या मुर्त्याच्या देवाण-घेवाणीमधून 70 हजार 80 हजार कोटीपर्यंत उलाढाल होते.
एवढं मोठं काम असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाकडे बोट दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा विरोध आहे.पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही. महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मुर्त्यासुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरता सुद्धा विसर्जन होऊ शकते, या गोष्टी समोर आणल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा.
विशेषतः मुंबई महानगरपालिकेने जे परिपत्रक काढले आहे की, चार फुटाकांच्या खालील मुर्ती ह्या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पालिका आयुक्त मा. उपमुख्यमंत्री, मा. मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. सकारात्मक चर्चा आहे, न्यायालयीन काही आदेश असले तरी या पद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे. पण हा मराठी माणसाचा रोजगार कुठे बंद होता कामा नये, यासाठीच भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
जी मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे मुंबईतील 3,500 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करात सोडते आहे त्या मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा अधिकार आहे का? 80 हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवाल यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

भारतीय वारसा का आक्रसला याचा अभ्यास व्हावा : शेफाली वैद्य

पुणे :
 विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित ,सौ.दीपाली पाटवदकर लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’  या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ  पुण्यात  लेखक -समीक्षक सौ. शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग तसेच साप्ताहिक विवेकच्या संपादक सौ. अश्विनी मयेकर, किरण कीर्तने यांच्या हस्ते  झाले. रविवार, १८ जून २०२३ रोजी,सायंकाळी सहा वाजता स्वा. सावरकर अध्यासन केंद्र ( कर्वे रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला. 

शेफाली वैद्य म्हणाल्या,’ आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्ह पावलोपावली दिसतात. तेथील आचार विचार, रितीरिवाजावर भारतीय संस्कृतीचा ठसा आहे. हे ठसे विनाशकारी नव्हती तर मंगलमय होती.भारताने जगाला काय काय दिले, याचा अभ्यास करताना आपण काय हरवलं याचीही नोंद ठेवली पाहिजे. आपण पूर्वी महान होतो, हा अभिमान मानून थांबता कामा नये, तर आपल्या देशाचा विस्तार कमी कमी का होत गेला, याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि इथून पुढे सतर्क राहिले पाहिजे. धडा घेतला पाहिजे.आपला वारसा का आक्रसला याचा अभ्यास करून तसे पुन्हा होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे ‘.
‘ असत्यमेव जयते ‘ पुस्तकाचे लेखक अभिजीत जोग म्हणाले, ‘ आपण कोण होतो, कुठून आलो हा प्रवास म्हणजे इतिहास आहे. खरा इतिहास हीच आपली ओळख आहे. आपल्या देशाची खरी ओळख शोधली पाहिजे. भविष्यासाठी ते आवश्यक आहे.काही शक्तींनी चुकीची ओळख देशावर लादली.इस्लामी आक्रमकांनी वास्तूंचा विध्वंस केला, माणसं मारली. पण,ब्रिटिशांनी कारकुनी लादून आपल्याला गुलाम केले. संस्कृती विसरायला लावली. तत्पूर्वी सर्व ज्ञानशाखांचा पाया भारताने घातला, हे मान्य केले पाहिजे ‘.
‘सनावळयांच्या पालिकडे इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा, पूरक वाचन म्हणून  अशी पुस्तके अभ्यासक्रमात घेतली पाहिजे ‘, असे मत अश्विनी मयेकर यांनी व्यक्त केले.
पुस्तकाच्या लेखिका दीपाली पाटवदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाती कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. वसुधा करंदीकर यांनी प्रास्ताविक केले.  मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले.दीप्ती खरे यांनी आभार मानले.
मनोवेधक प्रवास : ” स्वस्तिचिन्हे “

देव, धर्म, भाषा, शब्द, लिपी, ग्रंथ, कथा, काव्य, पंचांग, गणित, विज्ञान, कला या क्षेत्राद्वारे जी भारतीय संस्कृती देशविदेशात पोचली, तिथल्या मूळ संस्कृतीशी एकजीव झाली, तिचा मनोवेधक प्रवास ” स्वस्तिचिन्हे ” या ग्रंथातून लेखिकेने घेतला आहे. रामकथेच्या अशाच वाटचालीवरच्या रामकथामाला या ग्रंथानंतरचे लेखिकेचे हे नवे पुस्तक आहे.

कंबोडियाच्या ध्वजावर विष्णूचे मंदिर, थायलंडच्या राज्याच्या झेंड्यावर ऐरावत, इंडोनेशियामधील विद्यापीठांच्या लोगोवर गणपती, आग्नेय आशियाई देशांच्या समुद्री स्पर्धेचे चिन्ह समुद्रस्नान करणारा हनुमान,आशियाई तिरंदाजी खेळांचे चिन्ह धनुर्धारी राम, पांडव वंशातील मातेच्या पोटी घटोत्कचाचा पुनर्जन्म आणि त्याचा बदला घेण्यासाठी आलेला चिरंजीव अश्वत्थामा यांची कहाणी सांगणारा इंडोनेशियाचा 2021 चा चित्रपट ” क्षत्रिय देव घटोत्कच अशा अनेक गोष्टींचा या पुस्तकात समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी-२०’ निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १७: शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जी- २० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, समन्वयक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध शैक्षणिक साधने आणि शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा समावेश आहे. आदर्श बालवाडी, ५५ भाषांतील पुस्तके, आयुकाद्वारे निर्मित ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी ‘द वेलो ग्यानेश्वरी’ सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपरिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा, गोष्टी, कविता, डिजिटल साहित्य आदीची रेलचेल प्रदर्शनात आहे.

पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाबरोबर मुलांचा गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य शिक्षण, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित व्हाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात शिक्षणसंस्था, उत्पादक, स्टार्टअप आदींची सुमारे १०८ दालने असून २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. यापैकी ३६ राज्यांची दालनेदेखील आहेत.

प्रदर्शनात सहभागी प्रमुख संस्था
युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टम्स्‌‍ डिव्हिजन (आयकेएस), मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, आयसर, विविध स्टार्ट अप यांच्यासह विविध राज्य शासनांचे शिक्षण विभाग अशा एकूण १०८ प्रदर्शन दालनांचा प्रदर्शनात सहभाग आहे.

प्रदर्शनाचे महत्व:
पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक विकास, बौद्धिक व कौशल्य वृद्धी यासह लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठीची कौशल्ये येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी या प्रदर्शनातील बाबी सहाय्यभूत ठरणार आहेत.
000

मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी

मुंबई-मुंबईत आयोजित युथ काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी झाली असून दोन गटांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या आहेत. कुणाल राऊत यांना विरोध केल्याने सदरील प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्लावर हे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. मात्र, बैठक सुरू असतानाच युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधातील एक गट आक्रमक झाला. काँग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी देखील कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना बदलण्याची मागणी केली. त्यामुळे कुणाल राऊत समर्थक आक्रमक झाले.

सध्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कुणाल राऊत यांना पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यातील शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना बैठकीमध्येच विरोध केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आप चे राजकारण सगे सोयरे भाऊकीच्या पुढे जाणारे!प्रस्थापित पक्षांबाबतची मतदारांची श्रद्धा भाबडीच!

-अजित फाटके पाटील यांचे मत

पुणे-महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाही भावकी आणि खोके- बोके यामध्ये गुरुफटले गेले असून जनतेचा आवाज प्रस्थापित विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही उमटत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच जनहिताचे राजकारण करू शकते असे आप चे अजित फाटके पाटील यांनी स्वराज्य संवाद सभेदरम्यान सांगितले.

मागील पंधरवड्यामध्ये आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी आठ जिल्ह्यातून जाणारी स्वराज्य यात्रा काढली होती. आता त्यानंतर प्रभाग पातळीवरती संवादासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी फुले वाडा येथे सभा घेण्यात आली. पाऊस असतानाही त्यास स्थानिक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र मध्ये चार वर्ष सर्वचपक्ष हे एकमेकांशी सत्तेसाठीच्या तडजोडी करताना दिसले आहेत. त्यामध्ये कुठली विचारधारा अथवा समान कार्यक्रमही दिसत नाही. त्यामुळे एखाद्या सत्ताधारी पक्षाला मतदारांचे प्रश्न सोडवण्यास अपयश आल्यावर पर्याय म्हणून असणारे विरोधी पक्ष हेही हा प्रश्न सोडवत नाहीत असा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. एकमेकांची उणिदुणी काढणे, शाब्दिक कुरघोडी करणे यामध्येच हे सर्व नेते मग्न आहेत. प्रस्थापित पक्ष आपले प्रश्न सोडवेल ही श्रद्धा भाबडी ठरेली आहे. आता जनतेने आपला आवाज उठवणाऱ्या आम आदमी पार्टी याला संधी देण्याची गरज आहे. दिल्ली मधली कामे ही प्रत्यक्षामध्ये दिसलेली आणि जगभर कौतुक झालेली अशी असून गुजरात मॉडेल प्रमाणे ती फसवी नाहीत. महिलांसाठी मोफत बस योजना, मोफत उत्तम शिक्षण योजना घरोघरी घरपोच कागदपत्र सेवा, मोफत वीज अशी पंजाब आणि दिल्लीमध्ये केलेल्या कामांची मोठी यादी आहे असे यावेळी जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

फुलेवाडा परिसरातील जनतेचे राहणीमान उंचावण्याचे सर्व प्रयत्न आम आदमी पार्टी करेल असे आश्वासन यावेळेस शेखर ढगे यांनी दिले.
आनंद अंकुश यांनी सरकारी तिजोरीत जमा होणारा कर हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाकडूनच जमा होत असल्याने तो सरकारने कल्याणकारी कामांसाठी राबवावा अशी मागणी केली.
तरुणांना हातास काम ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी उत्तम कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इरफान रोड्डे यांनी केले. रुबीना काझमी यांनी दिल्ली मॉडेलमुळे महिलांचे सक्षमीकरण झाल्याचे सांगितले.

यावेळेस एकनाथ ढोले यांनी प्रास्ताविक केले व किरण कद्रे यांनी सूत्रसंचालन केले.पैठणकर यांनी आभार मानले.

एम. टी. डी. सी. च्या पर्यटक निवासांमध्ये योग दिवस साजरा करणार…॥

भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये योगसाधनेला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या आधुनिक काळात प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगभरामध्ये योगसाधनेचे, योगाचे पालन करणे आवश्यक आहे. मानव जातीचे दीर्घ आयुष्य दर्शविणारा दिवस म्हणजेच वर्षभरातील सर्वात मोठा दिवस म्हणुन गणल्या जाणाऱ्या 21 जुन रोजी संपुर्ण जगभरामध्ये जागतिक योग दिन साजरा केला जातो. शाररिक व मानसिक अनारोग्याचे निवारण करणे अत्यंत महत्वाचे असुन 2023 यावर्षीच्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन शरीर आणि मन सुदृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने, योगाचा प्रचार व प्रसार वाढवुन योगमय वातावरण निर्माण व्हावे तसेच योगदिनाची जागृती करुन आरोग्य सुद्दढ कसे राखता येईल यांची पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दि. 21 जुन 2022 या दिवशी महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी मा. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाजी हे खासकरुन आग्रही आहेत.
पर्यटक निवासाच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलवुन वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना योगाचे जीवनामधील महत्व, योगाचे प्रकार, योग केल्याचे शरीरास त्याचा होणारा फायदा तसेच आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात मनाच्या एकाग्रतेसाठी योग किती गरजेचे आहे हे एखादया व्याख्यानाव्दारे पर्यटकांना पटवुन देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनांना त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे तसेच सर्वांचे आरोग्य सुधारण्याकरिता प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन करण्यात येत आहे.

नियमित योगाचे महत्त्व जाणता योग माणसांना आपसांत जोडुन परस्पर प्रेम आणि सध्दभावनेची भावना विकसित करतो त्यामुळे महामंडळाच्या पर्यटक निसासांमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध धर्मांचे लोक जाती, पंथ आणि देशप्रेमाच्या भावनेने प्रेम, सद्भावना आणि आत्मीयतेने योगा करण्यास मार्गदर्शन करण्यात येईल. त्या अनुषंगाने महामंडळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना व्यवस्थापकिय संचालक मा. श्रध्दा जोशी-शर्मा मॅडम यांनी दिल्या आहेत.
सध्याच्या वातावरणात कोरोना सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि निरोगी जीवन शैलीबारोबरच निसर्गाचा आणि पर्यटनाचा आनंद घेणे यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणुन रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अन्नपदार्थ असणारे रुचकर जेवण आणि योगोपचार याबाबत मार्गदर्शन शिबिर पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटकांसाठी आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गातुन सावरलेल्या पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार पध्दती आणि योगोपचार याबाबत माहीती देणे, योगा सत्र सुरु करणे, त्रासलेल्या आणि मनस्वास्थ्य भरकटलेल्या मनाला शांती देण्यासाठी मेडीटेशन-ध्यानधारणा सुरु करणे, अशा विविध सुविधा आगामी काळात पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर निसर्गाचे वैभवशाली रुप जपण्यासाठी आण‍ि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदार पर्यटनाचा (Responsible Tourism) अंगिकार करणे, प्लॅस्टिक आणि प्रदुषण करणाऱ्या वस्तुंचा वापर कमी करणे या बाबींवरही भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यस्थापक मा. श्री चंद्रशेखर जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची जागतिक वारसा स्थळे असलेल्या आणि बौध्द-हिंदु इ. साधु-महंत यांनी ध्यानध्यारणा करण्यासाठी निवडलेल्या अशा अजंठा, वेरुळ आणि निसर्गरम्य असलेल्या लोणार तसेच ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटक निवासामध्येही योगा आयोजित केला जाणार आहे.
ऐतिहासिक गडकिल्ले, निसर्गरम्य डोगररांगांवर आणि समुद्राच्या किनारी असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये योगा करणे ही एक अनोखी पर्वणी असुन त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.
श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी-मोहन जोशी

पुणे- पुण्याच्या राजेंद्रनगर १००४/५ येथील अगोदर पासून पात्र असलेल्या २७ कुटुंबांचे दीर्घकाळ रेंगाळलेले पुनर्वसन त्वरित केले जाईल. त्यासाठी एसआरएच्या जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना हलवले जाईल. उर्वरित कुटुंबाची यादी मनपा विभागीय कार्यालय कडून घेऊन पात्रता तपासून त्यांचे देखील पुनर्वसन त्याच परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या एसआरए इमारतीत केले जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कॉंग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर, महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे आणि सचिव रेखा कांबळे या बैठकीत सहभागी झाले होते. तेथील स्थानिक रहिवासी देखील या बैठकीत उपस्थित होते.

या संदर्भात जोशी म्हणाले की, राजेंद्रनगर १००४/५ येथील पुनर्वसन रखडलेल्या कुटुंबांनी या संदर्भात कॉंग्रेस आमदार धंगेकर यांच्या कडे निवेदन दिल्यावर त्यांच्यासह मी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले. या वस्तीचे २००७ ते २०१३ दरम्यान काहीसे पुनर्वसन झाले. परंतु तेव्हा काही कुटुंबांचे पुनर्वसन झाले नाही. नंतर २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला पूर आला. शासनाने या परिसरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन करण्याचा निर्णय जाहीर केला. येथील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घरेलु कामगार महिला आहेत. या सर्व कुटुंबांच्या प्रश्नाचा पाठपुरावा पुणे जिल्हा घरकामगार संघटना २०१९ पासून करीत आहे. परंतु पुणे मनपा आणि एसआरए मधील ताळमेळ अभावी त्यांना न्याय मिळत नव्हता. आता हा निर्णय झाल्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे असे मोहन जोशी म्हणाले.

या पूरग्रस्त नागरिकांना या पूर्वीच न्याय मिळायला हवा होता असे सांगून आमदार धंगेकर म्हणाले की, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी या कामी मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीतच राहू असे ते म्हणाले.

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या व्यापारी मेळाव्यात PM मोदींचे भरभरून कौतुक

पुणे | भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतच्या वाटचालीतील मोदी सरकारची 9 वर्षे ही सुवर्ण वर्षे आहेत. त्यांच्या या काळात जेवढं काम झालं तेवढं काम कधीच झाले नाही, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे.

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित व्यापारी स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य बोलत होते. बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे हा मेळावा संपन्न झाला. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाले त्यांच्या या 9 वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना देशभरात राबवण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर मोदी @ 9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात आले आहे. या निमित्त प्रमुख व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आल. यावेळी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार अमर साबळे, राजेश पांडे, सुनील कांबळे, पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जैन, उमेश चोधरी, कौस्तुभ दवडगे, पंकज उणेचा, कल्पेश ओसवाल,अंकित जैन, दत्ता सावंत यांच्यासह पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी चे पदाधिकारी आणि मान्यवर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी @ 9 ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री, आमदार, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन तळागाळातील लोकांना मोदीजींचे या 9 वर्षातील कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे यामागचे मूळ उद्दिष्ट आहे. मोदींच्या कामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण येथे जमले आहोत. GST (वस्तू आणि सेवा कर ) सारखा क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतला. २०२३ मध्ये रेकॉर्ड ब्रेक संकलन हे GST मुळे झाले आहे. वन नेशन वन टॅक्स हा कायदा लागू केल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्या देशात झाला आहे. आज व्यापारी सहजतेने ऑनलाईन व्यवहार करू शकतो. डिजिटल इंडियाची दुसरी योजना म्हणजे सर्वदूर ऑप्टीकल केबल टाकण्यात आली. देशात केवळ २ मोबाईल कंपन्या होत्या आज देशात १२० झाल्या आहेत त्यामध्ये 5G सेवेचा आपल्याला लाभ घेता येतोय. हे फक्त मोदीजींमुळे घडू शकले. त्यानंतर युपीआय ही कल्पना देखील त्यांनी आपल्या समोर आणली, असेही मौर्य यांनी सांगितले.
मोदी हैं तो मुमकिन हैं – मौर्य
जो उत्साह भगवान श्रीराम यांच्या सेनेत पाहायला मिळाला होता तितकाच उत्साह आज व्यापारी लोकांमध्ये पाहायला मिळाला. मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षातच खूप विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी व्यापारी, युवा, शेतकरी अशा सगळ्यांचा विचार केला आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे राज्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला भाजपला निवडून देणे आपल्या हातात आहे. कारण आपण सरकार आणू पण शकतो आणि सरकार पाडू पण शकतो. व्यापारी लोकांसाठी नरेंद्र मोदी यांनी खूप काही केले आहे.

  • केशव प्रसाद मौर्य (उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश)

व्यापारासाठी मोठं योगदान – मुळीक
व्यापाऱ्यांचे सुख-दुःख मला दोन्ही माहिती आहे. देशाचे प्रत्येक क्षेत्र ज्यामध्ये आपण पुढे चाललो आहे, त्यामध्ये मोदीजींचे मोलाचे योगदान आहे. या देशाला २०२७ पर्यंत पूर्णतः आत्मनिर्भर करण्याचे उदिष्ट आहे आणि मला अभिमान आहे की मी ज्या पक्षासाठी काम करतोय तो पक्ष जनतेसाठी काम करतोय. ५६ इंचाची छाती असणारा पंतप्रधान आपल्या देशाला आहे त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. २०२४ मध्ये आपल्याला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचे आहे. भारतासाठी मोदी महत्वाचे आहेत.

  • जगदीश मुळीक (शहराध्यक्ष, भाजप, पुणे शहर)

मोदींमुळे व्यापार आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त झाला – महेंद्र व्यास
जेव्हा या डिजिटल पेमेंटची घोषणा झाली तेव्हा अनेकांनी विचारलं हे कस शक्य होणार एक गरीब महीला, भाजीवाले हे मोबाईल कुठून आणणार? इंटरनेट कुठून आणणार पण आज जर पाहिलं तर अभिमान वाटतो पान टपरीवर देखील UPI पेमेंट केलं जात. जे 40 वर्षात कोणी केलं नाही ते 9 वर्षात मोदींनी करून दाखवलं. देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या रूपात ओळख मिळाली. अशा अनेक प्रकारच्या योजना केवळ मोदीजींमुळे शक्य झाल्या.

  • महेंद्र व्यास (अध्यक्ष, पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी)

मोदी सरकारचे पारदर्शक काम – संतोष जैन
मोदींची जी पारदर्शकपणे काम करण्याची जी शैली आहे त्यामुळे मी भाजपसोबत जोडलो आहे. त्याचबरोबर जीएसटी, वृध्द पेन्शन योजना अशा अनेक योजना आहेत ज्या नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहेत.

  • संतोष जैन (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी)

पुण्यात मुख्यमंत्र्यांची समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

पुणे- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर प्रसारित करून विद्वेष पसरविणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहर शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व शेकडो शिवसैनिकांच्या (शिंदे गट) वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले, अभय नामक ट्विटर अकाउंट वरून गेल्या अनेक दिवसांपासून बदनामीकारक मजकूर,मॉर्फ केलेले फोटो तसेच आक्षेपार्ह लिखाण केले जात असून मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या या नराधमावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज पुणे पोलीस आयुक्तालयात शिवसैनिक,पदाधिकारी एकवटले होते, पोलीस आयुक्तांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून सदर आरोपीवर आयपीसी ऍक्ट 469,499,500 नुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यावेळी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे,सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे,शहर संघटक श्रीकांत पुजारी,महिला आघाडी शहरप्रमुख सौ. लिनाताई पानसरे, उपशहरप्रमुख विकास भांबुरे, सुधीर कुरुमकर, संजय डोंगरे, विकी माने, संतोष राजपूत, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, युवासेना उपशहर प्रमुख गौरव साईनकर, उपशहर प्रमुख महिला आघाडी चैत्राली गुरव, उपशहरप्रमुख संघटिका श्रद्धा शिंदे, शहर संघटक प्रमोद प्रभुणे, गणेश काची, विभाग प्रमुख अक्षय तारू, मयूर पानसरे, नितीन लगस, निखिल पवार, शंकर संगम, नेहा शिंदे, उपविभाग प्रमुख संदीप धुमाळ, डेविड खोडे, सचिन चव्हाण, नवनाथ निवंगुणे, प्रभाग प्रमुख कैवल्य पासलकर, अमर घुले व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

राष्ट्राच्या उन्नतीसाठी जनतेच्या शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्व- केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी

पुणे, दि. १७: जनतेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टीकोनातून सशक्तीकरण होत असताना राष्ट्राच्या उन्नतीसाठी शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केले. नागरिक जितके अधिक सशक्ष होतील तेवढे राष्ट्र अधिक सशक्त होत जाईल, असेही त्या म्हणाल्या.

जी -२० शिक्षण कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते तथा चित्रपट निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत विविध राज्यात सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमाबाबत या परिषदेत चर्चा होईल असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, या परिषदेच्या निमित्ताने तसेच आयोजित प्रदर्शनातूनही शिक्षणाचे महत्त्व दिसून येत आहे. भारत सरकार मूलभूत शिक्षण आणि संख्यज्ञान, कौशल्य विकास याला खूप महत्व देत आहे. जी-२० चे एक उदि्दष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यांमधील तफावत कमी करणे हेदेखील आहे. त्यादृष्टीने या बैठकींतून चर्चा होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, बालकांची शिक्षण क्षमता विकसित करणे, त्यांचे संख्याज्ञान समज विकसित करण्यासाठी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता तसेच संख्याशास्त्र हे या परिषदेचे केंद्रबिंदू आहे. तथापि, ही राष्ट्र निर्माणामध्ये शिक्षणाच्या योगदानाचे अवलोकन करण्याची संधीदेखील आहे. राष्ट्र म्हणजे केवळ जमीन नव्हे तर राष्ट्रातील नागरिक जितके अधिक सक्षम होतील तेवढेच राष्ट्र अधिक सशक्त होत जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात २०२५ पर्यंत प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर भर देण्यात आला आहे. यासाठी २०२१ मध्ये निपूण भारतची सुरुवात करण्यात आले. त्यानुसार २०२६-२७ पर्यंत कालबद्ध पद्धतीने उद्दिष्टे प्राप्त करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. आपल्या बालकांना बदलत्या गरजेनुसार आव्हानांना तयार केले पाहिजे. शैक्षणिक विकासात आपण पुढे गेल्यास खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र बनू. त्यादृष्टीने भारत सरकार प्रयत्नशील असल्याचेही श्रीमती अन्नपूर्णा देवी म्हणाल्या.

सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या या विद्यापीठात ही राष्ट्रीय परिषद होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन श्रीमती देवी म्हणाल्या, जेव्हा महिलांसाठी घराबाहेर निघणे कठीण होते त्या काळी अनेक कठिण प्रसंगाला सामोरे जात, संघर्ष करत सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी काम केले.

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी-चंद्रकांतदादा पाटील
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात शालेय शिक्षण विभाग केंद्र शासनाच्या निर्देषानुसार शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करेल. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात राज्याने विशेष पुढाकार घेतला आहे. यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार २७० पदव्युत्तर शिक्षणाची महाविद्यालये, ८७ स्वायत्त कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालये, संस्था तसेच ५० स्वायत्त तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये अशा १ हजार ४०० ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयांसाठी चौकट तयार होत आहे. मात्र पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

प्रदर्शनाला ५ लाख विद्यार्थी भेट देण्याचे नियोजन
राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करणारे मल्टीमीडिया प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने शिक्षणामध्ये काय नाविन्यपूर्ण बाबी केल्या आहेत हे यातून पहायला मिळणार आहे या प्रदर्शनाला पहिली ते पदव्युत्तर वर्गातील पुणे व परिसरातून ५ लाख विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

विद्यार्थ्याला भाषा, गणित, संख्याशास्त्राचे ज्ञान देणे गरजेचे-दीपक केसरकर
शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, जगात शिक्षणाच्या अनुषंगाने विविध तंत्र विकसित झाली आहेत. आपण त्यांचा अवलंब करत आहोत. त्याच वेळी आपल्याला आपल्या स्वत:च्या शिक्षणपद्धतीचा विचार करावा लागेल. सहाव्या शतकाच्या अखेरीस पहिली शाळा युनायटेड किंगडम येथे स्थापन झाली. त्यावेळी आपल्याकडे आपली गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. पाचव्या शतकात नालंदा, तक्षशीला अशी विश्वविद्यापीठे कार्यरत होती.

ते पुढे म्हणाले, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय संवाद भाषा आहे यात शंका नाही. परंतु, प्रत्येक युरोपीय देशाची स्वत:ची मातृभाषा आहे. रशिया, जर्मनी, फ्रान्स, चीन आदी देशांचे उदाहरण पाहता तेथील बहुतांश नागरिकांना इंग्रजीचे ज्ञान नसले तरी त्या देशांनी ज्ञान, तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञानाला कोणतीही भाषा नाही. म्हणून मातृभाषेतूनच चांगले ज्ञान देता येऊ शकते असे म्हटले जाते. जेव्हा आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. भाषा, गणित, संख्याशास्त्र याचे ज्ञान चांगल्याप्रकारे देणे गरजेचे आहे. आपली पारंपरिक शिक्षण पद्धती प्रत्येकालाच रोजगार देतेच असे नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा समावेश करत आहे.

आपली तरुणांची लोकसंख्या मोठी असताना आपल्या मनुष्यबळाला आपली संपदा बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण, भाषांचे शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी असला पाहिजे असे प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून स्काऊट आणि गाईड बंधनकारक करत आहोत. तसेच आपला देश कृषिप्रधान असल्याने शिक्षणामध्ये कृषिचा समावेश करत आहोत. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या दृष्टीने यावर्षीपासून अभियांत्रिकी चे शिक्षण मराठीतून सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षणही मराठीतून देण्याचा मानस आहे, असेह श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी श्री. द्विवेदी म्हणाले, आज विविध मतांच्या, विचारांच्या नावावर संघर्ष पाहता समन्वयाची गरज आहे. शिक्षणाचा उद्देश असा समन्वय असलेला समाज निर्माण करणे असावा. बदलत्या काळानुसार बदलत्या समाजासमोर विद्यार्थ्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म, समाजमाध्यमे, टीव्ही, गेम्स वर अधिक वेळ घालविण्याचे आव्हान दिसून येते. या नवतंत्रज्ञानाची आव्हाने लक्षात घेऊन आपल्या शिक्षण धोरणात बदल करत राहावे लागेल. नवीन माध्यमांनाही, प्लॅटफॉर्मलाही गुरू मनावे लागेल. मात्र त्यावर नियमन ही करावे लागेल, असेही द्विवेदी म्हणाले.

सचिव श्री. संजय कुमार यांनी भारत सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

या परिषदेसाठी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागाचे सचिव आदी उपस्थित आहेत.
0000

महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव सह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार

नवी दिल्ली, १७ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

कडेगाव चा झाला असा कायापालट

कडेगाव हे खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकुल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळयातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.
यासह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. कापूस आणि मूग, सोयाबीन आणि तूर अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले. सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर करण्यात आला. कापूस पिकात ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम – नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता वाढविण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम गावातील पाणी टंचाईवर पुर्णपूणे मात करण्यात आली. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कडेगावाची मोहर राष्ट्रीय पातळीवर उमटली.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगरपरिषदेस उत्कृष्ट नागरी स्थान‍िक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आज केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगर पालिकेसह विभागून देण्यात आला.

मलकापूर नगर परिषदेतील २४x७ नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प

 मलकापूर नगरपरिषदेने वर्ष २००९ पासून २४x७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग १५ वर्षे अखंडितपणे ही योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. २४x७ नळ पाणी पुरवठा योजनेस वर्ष २०११ चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

ही योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. 24 तास पाणी मीटरद्वारे देण्यात येते. यामध्ये जे स्थान‍िक नागरीक दर महिण्याच्या १५ तारखेच्या आत पाणीपट्टी कर भरतात त्यांना १० टक्के सवलत दिली जात असल्याने ९९ टक्के लोग पाणीपट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष श्री. शिंदे यांनी सांगितले. २४x७ नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर २४x७ शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डीआय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपुर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. मलकापूर नगरपरिषद २४x७ नळ पाणी पुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. त्यांच्या एकूण कार्याचा गौरव आज राजधानी दिल्लीत करण्यात आला.

गैर सरकारी संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील भारतीय जैन संघटनेस (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बीजेएस ही संस्था मागील ३७ वर्षांपासून जलस्त्रोत विकास, मुल्य आधारित शालेय शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर काम करीत आहे. २०१३ पासून जल व्यवस्थापनावर संस्था कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, जल संस्थांचे पुनरुज्जीवन, शेतीसाठी वापरण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे नापीक झालेली जमीन सुपीक होत आहे. शेतकरी गाळ शेतात टाकण्याचा ६५ टक्के खर्च स्वत: उचलतात, हे विशेष. राज्यातील बुलढाणा जिल्ह्याला पुरेसे ठरेल असे १०० टक्के पाण्याचे नियोजन संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे.
00000000000

जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा-पालकमंत्री

पुणे दि.१७-जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय पुणे येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर आणि शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सुमारे ४ ते ५ लाख विद्यार्थी भेट देण्याची शक्यता आहे. विद्यार्थी शाळेच्या बसेसने येणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षाविषयक समन्वयासाठी कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली असून वाहतूक नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना भेटीची पूर्वनियोजित वेळ देण्यात येत असून एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

..या कारणास्तव ४० आमदार आले भाजपात -चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

पुढच्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री; मविआत करार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

पुणे-काँग्रेसला दिलेला एक मत धर्मांतर विरोधी कायदा रद्द करते, काँग्रेसला दिलेले एक मत गो हत्या बंदी कायदा रद्द करते, याचे उत्तम उदाहरण कर्नाटक मध्ये दिसून आले असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच पुढच्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा करार महाविकास आघाडीमध्ये करण्यात आला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या करारानुसार उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदार हरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहितेची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना दिली, यावेळी ते बोलत होते. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

जनतेला कायम कन्फ्युज करून ठेवण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी केले आहे. सरकार जनतेच्या हितासाठी असते हे कधीच काँग्रेस पार्टीने जनतेला कळू दिले नाही. धर्माधर्मात समाज-समाजात वाद लावण्याचे काम काँग्रेसने केले, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शरद पवार यांनी कायमच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता व्यक्त केली, त्यामुळे समाजातील वातावरण खराब झाले, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी कायम समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन समाजातील वाद झाले. त्याच्या फक्त दोन दिवसानंतर बंटी पाटील यांनी कोल्हापुरात असेच वक्तव्य केले. त्यानंतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारणात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे राहिला आहे, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दिव्याला मिळाली ‘विठूराया’ ची साथ

अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या विठ्ठल माझा सोबती असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर  नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी विठ्ठल माझा सोबती  या चित्रपटात विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.  फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल माझा सोबती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून संदीप मनोहर नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘विठ्ठल माझा सोबती या चित्रपटाच्या निमित्ताने वारी न अनुभवता येणाऱ्या रसिकांना या चित्रपटाच्या रूपाने वारीचा सोहळा आणि लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. ‘आषाढी एकादशी’चं औचित्य साधून २३ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल. 

दिव्या सांगते, ‘विठ्ठलाला मानणारी ही व्यक्तिरेखा असून ‘विठ्ठल’ तिचा ‘सोबती’  बनून तिला कशाप्रकारे मदत करतो, हे दाखवतानाच भक्तीचा मार्ग तुम्हाला संकटातून तारून नेत असतो हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. 

कुटुंबकलहाला कंटाळलेल्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण ‘विठ्ठल’ नामक मदतनीस येतो. ‘विठ्ठल’च्या येण्याने नेमकी काय जादू घडते? त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का? हा ‘विठ्ठल’ नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला?  याची हृदयस्पर्शी कथा विठ्ठल माझा सोबती चित्रपटातून पहाता  येणार आहे. 

पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित विठ्ठल माझा सोबती या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे. शिवाय नाईंटी नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे आणि बॉम्बे बरोडा वेब टॉकीज हे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर आहेत.