Home Blog Page 1489

कंपनी सी.एस.आर. फंडाचे पैसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकने घेऊ नयेत – माधव पाटील

पुणे-तळवडे येथे होऊ घातलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी पालिकेने चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी मधील कंपन्यांनाचा  सी.एस.आर. फंड वापरू नये अशी मागणी अंघोळीची गोळी या संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी येथे केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकने शहरातील सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली होती. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी आगामी काळात करण्यात येणारे पर्यावरणविषयक कामाचे सादरीकरण केले आणि संस्थांना यावर सूचना करण्यास सांगितले. यावेळी अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी काही सूचना मांडल्या. तळवडे येथे होऊ घातलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी पालिकेने चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी मधील कंपन्यांनाचा  सी.एस.आर. फंड वापरू नये कारण अनेक छोट्या सामाजिक संस्था सी.एस.आर. फंड वापरून महिला सक्षमीकरणास हातभार लावतात. तसेच अनेक दुर्बल घटकांना या फंडामुळे सहाय्य्य मिळते.पालिकेचे वार्षिक बजेट सुमारे ५००० कोटींचे आहे त्यामुळे तळवडेमधील या उपक्रमासाठी फक्त पालिकेचेच  पैसे असावे. यावर आयुक्त म्हणाले कि एक कंपनी फक्त ३ कोटी देणार आहे जे उपक्रमाच्या फक्त ३ ते ५ टक्के असणार आहेत. यावर माधव पाटील म्हणाले कि ३ कोटीच्या या सी.एस.आर. फंडातून अनेक महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते. अनेक सामाजिक संस्था हा सी.एस.आर फंड वापरून आरोग्य आणि शिक्षण यात भरीव काम करू शकतील. तसेच पालिकेने नदीपात्रातील जलपर्णीचा योग्य वापर करून महिला बचत गटांना काम द्यावे. पालिकेने जलपर्णीवर झालेले जगभरातील संशोधन शोधून त्यातून ट्री – गार्ड किंवा कुंड्या बनवण्यासाठी बचत गटांना प्रशिक्षण द्यावे आणि यासाठी खाजगी कंपन्यांचा सी.एस.आर. फंड वापरण्यात यावा असे मत माधव पाटील यांनी व्यक्त केले.

जिओ मामीमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आशियातून ३०० सिनेमांच्या प्रवेशिका, प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३

दक्षिण आशियातील नव्या सिनेमांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिओ मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे प्रवेशिका पाठवण्याचे

आवाहन, दक्षिण आशियाई गुणवत्तेचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट

पुणे (शरद लोणकर ) – भारतातील सर्वात लोकप्रिय फेस्टिव्हल्सपैकी एक जिओ मामी (मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज)
मुंबई फिल्म फेस्टिव्हल २०२३ २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबईत भरवला जाणार आहे. यंदाचा सोहळा
आणखी भव्य करण्यासाठी जिओ मामीने दक्षिण आशियाई सिनेमा व गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा फेस्टिव्हल दक्षिण आशिया, तेथील समाज आणि आंतरराष्ट्रीय सिनेमातील सर्वोत्तम प्रवाह दाखवणार असून त्याचबरोबर स्वतंत्र आणि उदयोन्मुख दिग्दर्शकांना वाव दिला जाणार आहे. जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलने सिनेमा क्षेत्रातील नवे प्रवाह
दर्शवण्यासाठी, संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी, व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी
नवी यंत्रणा उभारण्याचे ठरवले आहे. त्याचसाठी सिनेमातील सर्वोत्तम आशय मुंबईत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
भारतातील बहुप्रतीक्षित फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक असलेल्या जिओ मामीमध्ये जगभरातील सिनेमाप्रेमी व गुणवान कलाकार
सहभागी होत असतात. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली प्राथमिक मुदत ३१ मे रोजी संपली असली, तरी आता ती
३० जून २०२३ पर्यंत वाढवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत २९४ प्रवेशिका आल्या असून ही संख्या वाढेल असा
अंदाज आहे. आतापर्यंत आलेल्या वैविध्यपूर्ण प्रवेशिकांच्या संख्येवरून भिन्न संस्कृती, प्रवाह आणि आशय असलेले सिनेमे निवडूनसर्वांपुढे आणण्याची फेस्टिव्हलची बांधिलकी दिसून येते. जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवहल २०२३ चा अनुभव सिनेप्रेमी, या
क्षेत्रातील व्यावसायिक तसेच दिग्दर्शकांसाठी अनोखा असेल.याविषयी फेस्टिव्हलच्या संचालक अनुपमा चोप्रा म्हणाल्या, ‘प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन केल्यापासून फक्त १५ दिवसांत
इतक्या प्रवेशिका येणे उत्साहवर्धक आहे. खरे स्टार्स असलेल्या लोकांच्या सहभागामुळेच हा फेस्टिव्हल आणखी खास ठरतो.
भारतातील सिनेप्रेमी उत्सुकतेनं या फेस्टिव्हलची वाट पाहात असतात. आम्ही सिनेमा क्षेत्रातील नवे आणि धाडसी प्रवाह,
सांस्कृतिक बारकावे, वैविध्यपूर्ण कथाकथन आणि प्रतिनिधीत्व यांना महत्त्व देतो. दक्षिण आशिया, दक्षिण आशियाई समाज आणि
आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांचे सिनेमे दाखल करून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही कायमच स्वतंत्र सिनेमे व दिग्दर्शकांना आपले
काम सादर करण्यासाठी व्यासपीठ पुरवले आहे. त्यांना इतरांबरोबर नेटवर्किंग करत सिनेमाबरोबर प्रवास करण्यासाठी मदत
केली आहे. सर्व प्रकारचे सिनेमे आणि दिग्दर्शकांचे आम्ही स्वागत करतो. सिनेमा विश्वातील नवे, वेगळे विचार जाणून घेण्यासाठी
आम्ही उत्सुक आहोत.’
जिओ मामी मुंबई फेस्टिवलने दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित केल्याने फेस्टिवल तसेच कलाकार- तंत्रज्ञांसाठी नवे
विश्व खुले होणार आहे. फेस्टिवलमध्ये सहभागी होत असलेल्या दिग्दर्शकांना त्यांच्या कामाच्या सर्वोत्तम
पद्धतींची माहिती देण्याची, कार्यशाळांमध्ये उपस्थित राहाण्याची, सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेबाबत नव्या
कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल. यानिमित्ताने त्यांना सर्व सीमा पार करून खऱ्या अर्थाने
आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरता येईल. सिनेमा माध्यमाप्रती वेगळा आणि कल्पक दृष्टीकोन मांडण्यासाठी बांधील
असलेले जिओ मामी मुंबई फेस्टिवल सिनेमा क्षेत्रातल्या पारंपरिकतेला आव्हान देणाऱ्या, नवी समीकरणे
प्रस्थापित करणाऱ्या दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळवून देते.
दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित करण्याविषयी जिओ मामी मुंबई फेस्टिवलच्या आर्टिस्टिक डिरेक्टर दीप्ती डीकुन्हा
म्हणाल्या, ‘यावर्षी आम्ही फेस्टिवलचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. भारतीय सिनेमे व दिग्दर्शकांबरोबरचदक्षिण आशियाई गुणवत्ता शोधण्यावर भर दिला जाणार आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियाई दिग्दर्शक
खूप चांगले काम करत आहेत. एक फेस्टिवल म्हणून त्यांचे सिनेमे मुंबईतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा
सन्मान आहे. जिओ मामीने नवीन दक्षिण आशियाई गुणवत्ता शोधण्याचे, त्यांचा विकास करण्याचे व स्वतंत्र
सिनेमा निर्मितीला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या फेस्टिवलमध्ये प्रस्थापित सिने कलाकारांच्या गुणवत्तेची
दखल घेतली जाते. त्यामुळे तुम्ही अनुभवी दिग्दर्शक असाल किंवा नवीन सुरुवात करत असाल, तुमचे काम
दाखल करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. दिग्दर्शकांना फेस्टिवलमध्ये असामान्य अनुभव देण्यासाठी
तसंच त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. दक्षिण आशियाई दिग्दर्शकांना समकालीन
सहकाऱ्यांबरोबर नाते जोडण्यासाठी व पर्यायाने कम्युनिटी तयार करण्यासाठीही मदत केली जाणार आहे.’

सिनेमे दाखल करण्यासाठीची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जिओ मुंबई फिल्म फेस्टिवल
दिग्दर्शकांना त्यांचे सिनेमे दाखवण्यासाठी, इतर दिग्दर्शकांबरोबर चर्चा करण्यासाठी व जागतिक पातळीवर नेटवर्क
तयार करण्यासाठी मुबलक संधी देण्याचे आश्वासन देत आहे. दक्षिण आशियाई सिनेमा दाखवण्यासाठी सर्वात
विश्वासार्ह भागीदार बनण्यसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याच प्रयत्नांतून यंदा सर्वोत्तम जागतिक सिनेमे
प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिले जातील. तुमचा सिनेमा आजच दाखल करा. अधिक माहिती व सिनेमा दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा – www.mumbaifilmfestival.com.

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चास मान्यता- वैद्यकीय शिक्षण मंत्री

  मुंबईदि. १७ : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली.

            मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,युती शासनाचा मागील ०९ वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना  शासनाने  दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार

मंत्री गिरीष महाजन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास ६० वर्षात केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन २०१४ पासून २०२३ पर्यंत ०९ वर्षात १० वैद्यकीय महाविद्यालये राज्याच्या सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे.

मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु

रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, अशा ०९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार

  रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला असून या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता १०८६ पद निर्मीतीस मान्यता

याच बरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मीतीसही मान्यतेचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यापोटी १०९.१९ कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.

रत्नागिरी येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु झाल्याने कोकणवासीयांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून दूहेरी भेटच मिळाली आहे.

कोकणातील  ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळणार

            त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषोपचार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्‍ध होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत होणार आहे. कोकणातील आसपासच्या ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

अभिनेता दिग्दर्शक आर. माधवनने त्याच्या आगामी ‘टेस्ट’ चित्रपटाचे शूटिंग केलं पूर्ण !

अभिनेता आर माधव आणि दिग्दर्शक शशिकांत यांचा पोर्ट्स ड्रामा ‘टेस्ट’ या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग नुकतंच संपल आहे. आर माधवन याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं समजतंय. अष्टपैलू अभिनेता आणि अभिनयाची अनोखी शैली असलेला अभिनेता यात अतिशय मनोरंजक पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं आणि मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची लक्षणीय चर्चा सुरू आहे. 
” टेस्ट ” हा चित्रपट  क्रिकेट टेस्ट मॅच वर आधारित तो क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. आर माधवन आणि सिद्धार्थ या चित्रपटासाठी 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले असून नयनताराच्या या चित्रपटा मध्ये असल्याने या चित्रपटाला चार चाँद लागणार आहेत.
या पॅन-इंडिया स्पोर्ट्स ड्रामामध्ये नयनतारा आणि सिद्धार्थ देखील प्रमुख भूमिकेत असल्याचं कळतंय. 
अलीकडेच आर माधवनने ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केल्याबद्दल ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा पुरस्कारही जिंकला आहे. ” टेस्ट ” साठी सगळेच पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.

sharad lonkar (Pune)

आशिष शेलार यांच्या पुढाकाराने म्हाडा इमारतीतील अतिरिक्त गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्याचा निर्णय रद्द

मुंबई
लालबागमधील म्हाडाच्या बदानी बोहरी इमारतीतील अतिरिक्त गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मूळ करार रद्द करण्यात यश आले. रहिवाशांची गृहनिर्माण संस्था होण्यास अडचणी निर्माण झाल्याने रहिवाश्यांनी केलेले उपोषण आ. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने मागे घेण्यात आले.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लालबागमधील म्हाडाच्या बदानी बोहरी इमारतीतील अतिरिक्त गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक रहिवाशांवर अन्याय झाला होता. म्हाडाने ६ मार्च २०२३ रोजी नवीन श्री. यशोमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित या इमारतीतील ६४ गाळे संक्रमण शिबिर म्हणून देण्याचा ठराव परस्पर मंजूर केला. या ठरावाला रहिवाशी विरोध करत असून देखील प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ठाकरे सरकारचा हा तुघलकी निर्णय रद्द करण्याची मागणी रहिवाशांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात रहिवाशांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या अनेक तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरले जात आहे. शिंदे – फडणवीस सरकार मुंबईकरांच्या पाठीशी असून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायमच लढा दिला जाईल असे आश्वासन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

बोपखेल ते खडकी जोडणारा पूल आमदार शिरोळे यांनी केली बांधकामाची पाहणी

पुणे – येथील मुळा नदीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोपखेल ते खडकी असा पूल बांधत आहे. पुलाच्या बांधकामाची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) केली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

पूलाची लांबी १ हजार ८६६ मीटर आहे. पुलाचे जवळपास ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झालेले असून पूल सुरु होण्यासाठी जवळपास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

हा पूल सुरु झाल्यानंतर खडकी व बोपखेल भागातील नागरिकांची सोय होईल. काम लवकरात लवकर होण्यासाठी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करेन, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.

या पाहणीच्या वेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, धर्मेश शहा, तसेच पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

तब्बल 42 वर्षांचा लढा:जिल्हा व्हावा म्हणून आज पुन्हा श्रीरामपूर बंद

श्रीरामपूर :श्रीरामपूर जिल्हा व्हावा व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरलाच व्हावे, यासाठी श्रीरामपूर मर्चंट असो. श्रीरामपूर यांचे वतीने आज शनिवार दि. 17 जून रोजी श्रीरामपूर व बाजारपेठ बंदचा इशारा देण्यात आला आहे.42वर्षांपासून मागणी होऊन अनेकदा बंद ठेऊन अद्याप यश आलेले नाही, दरम्यान श्रीरामपूर जिल्हा कृती समिती चे देखील अस्तित्व लयास गेले, आता संघर्ष समिती लढा देण्यासाठी पुढे आली आहे.

शासनाने मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाचा फेर विचार करून श्रीरामपूरकरांची भावना लक्षात घेऊन श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी किंवा शिर्डी ऐवजी श्रीरामपूरातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करावे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करू नये, यासाठी महात्मा गांधी पुतळ्याला हार घालून निषेध व्यक्त केला. नंतर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, ऍड. सुभाष जंगले, लकी सेठी, अनंत निकम, मुज्जफर शेख, अण्णासाहेब डावखर, चंद्रकांत परदेशी, अरुण पाटील, कुणाल करंडे, अभिजित बोर्डे, सचिन बडधे, शामभाऊ गोसावी, नानासाहेब तुपे, तिलक डुंगरवाल, सुभाष त्रिभुवन, राजेंद्र सोनवणे, बाबा शिंदे, जयेश सावंत, शरद डोळसे, विजय नवघरे, शेखर दुबय्या, किशोर झिंजाड, विजय नवघरे, दीपक थोरात आदि उपस्थित होते.

42 वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. पूर्वीचा प्रस्तावित जिल्हा श्रीरामपूर हाच जिल्ह्यासाठी सर्वसामान्यांना मध्यवर्ती ठरणार आहे. राज्यातील भौगोलिक दृष्टीने व क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर या नव्या प्रस्तावित जिल्ह्याची निर्मिती व्हावी म्हणून गेल्या 42वर्षांपासून मागणी होत आहे.

पुणे -जी 20  शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे  आयोजन करणार

पुणे येथे जी -20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी शिक्षण मंत्रालय सज्ज होत आहे. हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम 20 – 21 जून 2023 या कालावधीत होणार आहे आणि G-20 सदस्य देश, अतिथी देश आणि ओईसीडी , युनेस्को आणि युनिसेफ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील 85 प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

युनिसेफ, ओईसीडी आणि युनेस्कोच्या वरिष्ठ प्रतिनिधीं व्यतिरिक्त, 15 देशांतील मंत्र्यांनी 22 जून 2023 रोजी होणाऱ्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे कळवले आहे. या बैठकीच्या निमित्ताने उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुण्यात जी -20 शिक्षण कार्यगटाची चौथी बैठक , मंत्रिस्तरीय बैठक, जन भागिदारी कार्यक्रम आणि जी -20 बैठकीनिमित्त आयोजित अन्य  कार्यक्रमांची माहिती दिली.

के. संजय मूर्ती यांनी IISER, पुणे आणि ELSEVIER च्या सहकार्याने आयोजित ‘सुगम्य विज्ञान : सहकार्याला चालना ‘ या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख केला. “जी 20 राष्ट्रांच्या अनुषंगाने विकासासाठी संशोधन सहकार्याची  स्थिती आणि प्रासंगिकता” या शीर्षकाचा अहवाल  शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी आयआयएसईआर, पुणे येथे आज प्रसिद्ध केला असून भारताच्या  संशोधन सहकार्य आणि वाढीबद्दल वैज्ञानिक समुदायात आवश्यक समज त्यात निहित असल्याची माहिती त्यांनी दिली.

जी 20 शिक्षण कार्यगटाच्या मुख्य बैठकीपूर्वी एक परिसंवाद आणि प्रदर्शन होईल. 19 जून 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुनिश्चित करणे,  ” या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री  राजकुमार रंजन सिंग करणार आहेत.

महाराष्ट्र सरकारचे  उच्च आणि  तंत्रशिक्षण मंत्री   चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण सचिव  संजय कुमार यांसारख्या  मान्यवर वक्त्यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. प्रा. मंजुल भार्गव मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान  (एफएलएन ) या विषयावर सादरीकरण करतील. परिसंवादात  तीन चर्चासत्र  देखील असतील, ती   खालीलप्रमाणे आहेत:

i) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी मिश्र पद्धतीद्वारे शिकण्याचे दृष्टीकोन आणि अध्यापनशास्त्र शिक्षण

ii) महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राऊत   यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (गृह शिक्षण ), सामाजिक-भावनिक कौशल्ये तसेच  मुलांचे आरोग्य आणि पोषण यासाठी पालक, काळजीवाहक आणि समुदाय सदस्यांची भूमिका.

iii) सीबीएसईच्या अध्यक्ष निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहुभाषिकतेच्या संदर्भात  मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी  आणि प्रशिक्षण’.

चर्चासत्रांमध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात , इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका , चीन, युके  आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना आणि युनिसेफ  सारख्या बहुस्तरीय  संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल.

शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करणारे  मल्टीमीडिया प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद,  नॅशनल बुक ट्रस्ट  ट्रस्ट, भारतीय ज्ञान प्रणाली विभाग (आयकेएस ) आणि स्टार्टअप उपक्रमांसह 100 हून अधिक प्रदर्शक त्यांचे योगदान या प्रदर्शनात सादर करतील. या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 जून 2023 रोजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन 19 जून वगळता 17 ते 22 जून 2023 या कालावधीत स्थानिक संस्था, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी खुले असेल.

जनभागीदारी कार्यक्रमासह अनेक कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद आणि परिषदांसह अनेक उपक्रम 1 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली. लोकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य, जिल्हा, गट, पंचायत, शालेय आणि उच्च शिक्षण स्तरावर हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. जी 20 च्या चौथ्या शैक्षणिक कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे उपक्रम राबवले जात आहेत. जन भागीदारी कार्यक्रमांचे नेतृत्व केंद्रीय विद्यालये, उच्च शिक्षण संस्था, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तसेच जवाहर नवोदय विद्यालयांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहे. आत्तापर्यंत एकूण 4 कोटी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवला आहे. हा सहभाग अभूतपूर्व आहेच पण लोकांना वाटत असलेला रस आणि त्यांच्या उत्साहाचे द्योतक  आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठात 17 ते 18 जून दरम्यान मूलभूत  साक्षरता आणि संख्याशास्त्र – ‘ आजीवन अध्यनासाठी पाया निर्मिती’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाईल. ही परिषद विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुलभ करणारे वातावरण तयार करण्यासाठी राज्ये स्वीकारत असलेल्या सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी मदत करेल, असे त्यांनी पुढे सांगितले. यात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण विभाग, केंद्र सरकारचे ज्ञान भागीदार,  संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) आणि युनिसेफ तसेच नागरी समाज संस्था यांचा सहभाग असेल.जी 20 प्रतिनिधी सांस्कृतिक कार्यक्रमात आणि रात्रीच्या भोजनाचाही आस्वाद घेतील. या कार्यक्रमात पुण्यातील सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध पाककला यांचे दर्शन घडेल. याव्यतिरिक्त, पुणे शहराचा हेरिटेज वॉक आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यासारख्या सहलींमुळे सहभागींना पुण्याचा समृद्ध वारसा आणि परंपरा अनुभवण्याची संधी मिळेल. 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोपानंतर सर्व शिक्षण मंत्री शनिवार वाडा पहायला जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरू राहील-मुख्यमंत्री

पुणे, दि. १६ : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यात २ लाख ८६ हजार २७८ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. १०४ शिबिराच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.

मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे निर्णय
मंत्रीमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला भगिनींसाठी महत्वाचे निर्णय घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत व महिलांसाठी प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपये भर घालणार येणार असल्याने १२ हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील १८ हजार कोटी रुपयांच्या २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे ६ ते ७ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट निधी देण्याचा आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड परिसर विकासासाठी महत्वाचे निर्णय
पिंपरी चिंचवड विकासासाठी अनेक निर्णय घेतले. २०१८ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय. एप्रिल २०२३ पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्याच्या विकासाला गती
पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणासाठी निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊले
‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाने बचत गटाच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देण्याचा आणि फिरता निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात २ कोटी पेक्षा अधिक महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत ५ वर्ष करण्यात येईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना
लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्वासामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून गेल्या सुमारे ११ महिन्यात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री.बारणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनातर्फे जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांना शासन आपल्या दारी अभियानांतर्गत एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत.

आमदार श्रीमती जगताप यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेत चांगले काम झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली. शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. यावर्षीपासून महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून शिक्षण साहाय्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभांचे वितरण तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील सहा इमारतींमधील २५२ सदनिकांचे वाटप यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. कोविड संकटाच्या काळात महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेल्या मयत कामगारांच्या वारसांना कोरोना विषाणू विमा कवच योजनेच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. शेवटी कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

शिबिरात विविध योजनांची माहिती
या कार्यक्रमासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडपात विविध कक्ष तयार करण्यात आले होते. नागरिकांना याठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, ३३ टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला देण्याची सुविधा करण्यात आली होती. आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला देणे आदी सेवाही यावेळी देण्यात आल्या.
0000

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे आवाहन

पुणे, दि. १६:- नवीन शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी, शाळा प्रशासन व शालेय विद्यार्थी वाहतूकदारांच्या सोयीसाठी पूर्वनियोजित दिनांक व वेळ निर्धारित करून शासकीय सुट्टीच्या दिवशी स्कुल बस, व्हॅनकरीता योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीचे कामकाज सुरु राहणार आहे. अशा वाहनधारकांनी वाहन सुट्टीच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीकरीता सादर करण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमपुल, पुणे येथील परिवहन बस विभागातून मॅन्युअल पध्दतीने अपॉइंटमेंट प्राप्त करुन घ्यावी व कार्यालयात शुल्क भरणा करावा. अपॉइंटमेंट किंवा शुल्क भरणा न केलेल्या वाहने योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात संसंदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला- मुख्यमंत्री

पुणे, दि. १६: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’ च्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, बसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली. इंग्लंडमधील मॅग्नाकार्टा या संसदीय प्रणालीच्या आधीच त्यांनी ‘अनुभव मंटप’च्या माध्यमातून लोकशाही प्रणालीची व्यवस्था निर्माण केली. स्त्री-पुरुष, धर्म, जात- पात, पंथ भेदाच्या पलिकडे जाऊन कोणीही ‘अनुभवमंटप’ मध्ये आपले अनुभव मांडू शकत होते. श्रम हीच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था इतके साधे सोपे तत्त्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सरळ सोप्या भाषेत मांडले.

देवाशी म्हणजे शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली. महात्मा बसवेश्वर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही.

महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. महात्मा बसवेश्वरांचा लंडन येथेही पुतळा उभारण्यात आला आहे. हे महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. निगडी येथील हा पुतळा लोकवर्गणी लोकसहभागातून केला याला जास्त महत्त्व आहे. त्यांचा त्याग, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण हे मोठे काम केले आहे, असे श्री.शिंदे म्हणाले. यापुढेही पुतळा परिसर सुशोभिकरण संबंधित आवश्यक कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या परिसरातील दफन भूमीचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष आहे. हीदेखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन शासन काम करत आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडविण्यासाठी अनेक नियम बदलले, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी पुतळा उभारणीमागची संकल्पना स्पष्ट केली. समतावादी मूल्ये रुजविण्यासाठी महात्मा बसेवश्वरांनी उभे आयुष्य प्रयत्न केले. त्यांनी न्याय, बंधूता आणि एकतेची शिकवण दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार मानवी जीवनाला प्रगत करणारे त्यांचे विचार होते. महापुरुषांच्या अशा विचारांमुळे नव्या पिढीला दिशा मिळते असे त्यांनी सांगितले.

यावेळी नारायणराव बहिरवडे यांनीही विचार व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी प्राधिकरण येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सुमारे ३ हजार १५० चौरस मीटर क्षेत्र परिसरात पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्यासमोरील जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पुतळ्याभोवती २२५ मीटर लांबीची सीमाभिंत बांधण्यात आली आहे.
0000

अमेरिका  आणि चीनच्या खालोखाल 2022 मध्ये ब्रिटनला  मागे टाकत  भारताने वैज्ञानिक संशोधनात तिसरे स्थान पटकावले आहे’- निक फॉलर

पुणे:

एल्सेव्हियर या डच प्रकाशन कंपनीच्या सहकार्याने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत  “अॅक्सेसिबल सायन्स: फोस्टरिंग कोलॅबोरेशन” या विषयावर आज  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . पुण्यात होणाऱ्या आगामी चौथ्या जी 20 शिक्षण कार्यगट आणि शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आयोजित विविध कार्यक्रमांची सुरुवात या चर्चासत्राने झाली.

या चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.  उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती , पुण्याच्या आयआयएसईआरचे संचालक  सुनील एस भागवत,  इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एसटीएम पब्लिशर्सचे  अध्यक्ष आणि एल्सेव्हियरचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. निक फॉलर ,  रिसर्च नेटवर्क्स, एल्सेव्हियरचे वरिष्ठ उपाध्यक्ष  आणि  प्रोफेसर एमेरिटस, कॅम्पिनास, युनिकॅम्प, ब्राझीलचे कार्लोस हेनरिक डी ब्रिटो क्रूझ आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी जागतिक विकासासाठी सुगम्य विज्ञानासाठी सर्वोत्तम पद्धतींवर सकारात्मक चर्चा केली आणि जी -20 देशांना पुढील वाटचालीसाठी एक सुस्पष्ट दृष्टिकोन दिला.

शिक्षण  राज्यमंत्री  डॉ. सुभाष सरकार यांनी  यावेळी  “जी 20 राष्ट्रांच्या अनुषंगाने  विकासासाठी संशोधन सहकार्याची  स्थिती आणि प्रासंगिकता” या शीर्षकाचा अहवालही प्रकाशित केला.

उद्घाटन सत्रात बोलताना डॉ.सुभाष सरकार यांनी ज्ञानवर्धनातील अडथळे दूर करणे, पारदर्शकतेला चालना देणे आणि बहुविद्याशाखीय सहकार्यांना चालना देण्याच्या महत्वावर भर दिला. शिक्षण राज्यमंत्र्यांनी   सरकारच्या  लस मैत्री, जीनोम इंडिया प्रकल्प, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे भुवन, ई-शोधगंगा, स्वयंम आणि स्वयंम-एनपीटीईएल मंच या, सार्थ  बदल आणि शाश्वत विकासाला कारणीभूत असलेल्या यशस्वी सहयोगी प्रयत्नांच्या उदाहरणांसह अनेक ‘सुलभ  विज्ञान’ उपक्रमांचा उल्लेख केला. गणिता आणि ज्‍यामिती (भारतीय गणित आणि भूमिती प्रणाली) आणि वास्तुविद्या (भारतीय वास्तुकला प्रणाली) यासह भारतीय ज्ञान प्रणालीच्या बहुआयामी पैलूंचा शोध घेण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या संभाव्यतेवरही त्यांनी जोर दिला.

एल्सेव्हियरचे मुख्य शैक्षणिक अधिकारी निक फॉलर यांनी यावेळी बोलताना  वैज्ञानिक संशोधनातील  भारताची उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय यशाचा  उल्लेख केला. भारताची  विद्वत्तापूर्ण फलनिष्पत्ती  सातत्याने वाढत आहे. 2022 मध्ये यूकेला मागे टाकत भारत वैज्ञानिक संशोधनाचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे, असे त्यांनी नमूद केले. मात्र भारताने केवळ संशोधानाच्या प्रमाणातच  यश मिळवलेले  नाही, तर शैक्षणिक गुणवत्तेतही यश मिळवले आहे.फील्ड वेटेड सायटेशन प्रभाव  2019 मधील 0.85 वरून 2021 मध्ये 1.05 पर्यंत वाढवत प्रकाशनातही भारताला  जागतिक सरासरीपेक्षा पुढे  ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. निक यांनी जागतिक संशोधन आणि नवोन्मेषात  देशाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी  गुणात्मक संशोधन करण्यासंदर्भातील  भारत सरकारने  लक्ष केंद्रित केल्याबद्दल प्रशंसा केली.   परिणामी भारत जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या  जागतिक नवोन्मेष  निर्देशांक  2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर पोहोचला, असे ते म्हणाले.

एल्सेव्हियरचे वरिष्ठ उपाध्यक्ष कार्लोस हेनरिक  डी ब्रिटो

क्रूझ यांनी अहवालातील ठळक मुद्दे देखील सादर केले. जागतिक वैज्ञानिक समुदायात भारताची प्रगती त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी त्यांच्या सादरीकरणात नमूद केले आहे की भारत कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित विषयांमध्ये  भारत जगातील दुसरा सर्वातमोठा प्रकाशक ठरणार असून  कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी लिहिलेला सर्वात जुना लेख भारतीय लेखकाचा ऑगस्ट 1968 प्रकाशित झाला असल्याचे   त्यांनी आपल्या सादरीकरणात नमूद केले.

भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती यांनी,  हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल  आयआयएसईआर, पुणे आणि एल्सेव्हियरचे आभार मानले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये संशोधन परिणामात सुधारणा करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील संस्थांपर्यंत पोहोचण्याविषयी तरतूद करण्यात आली असल्याचे के. संजय मूर्ती यांनी यावेळी सांगितले. आज सुरू झालेल्या चर्चेतून आणि सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे जागतिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी संशोधन सहयोग आणि योग्य नियामक आराखडा तयार करण्याचे नवे मार्ग आणि ज्ञान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हा परिसंवाद महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचा भाग आहे. हा परिसंवाद 19 ते 21 जून 2023 या कालावधीत होणार आहे. “विशेषत्वाने मिश्रित शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे” ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. शिक्षण  कार्यगटाच्या  बैठकीत विविध पूर्ववर्ती कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, वारसा स्थळांच्या सहलींचा समावेश आहे. 

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व घेण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

पुणे -शहरातील सर्व नागरिकांसाठी पुणे महापालिकेकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना . या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विनोद नाईक यांनी केले आहे.

शहरी गरीब वैद्यकीय योजनेंतर्गत पॅनेलवरील खासगी हॉस्पिटलमधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने 50 टक्के किंवा 100 टक्के हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करता येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च रुग्णांनी भरणे आवश्यक आहे.

सभासदत्व घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1. एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला.
2. पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
3. झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे नोंद असलेली पावती
4. अपत्यांचे आधार कार्ड (25 वर्षा खालील)
5. कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधार कार्ड (मनपा कार्यक्षेत्रातील)
6. पात्र सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
7. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण 200 रुपये (सभासद नोंदणी शुल्क रु.100 आणि वार्षिक शुल्क रु.100) शुल्क आकारले जाते.

राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.

संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नाविन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्टअप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.

माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री. बिर्ला यांच्याकडून कौतुक

देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

दिवंगत एस. पी. हिंदुजा यांना प्रार्थना सभेमध्ये अनेक राज्य प्रमुखांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, १६ जून २०२३:  हिंदुजा कुटुंबाचे पूज्य पितामह आणि हिंदुजा समूहाचे माजी अध्यक्ष, दिवंगत श्रीचंद पी हिंदुजा, यांना मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राजकीय मान्यवर, उद्योगपती, हितचिंतक, परदेशी सल्लागार आणि आध्यात्मिक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. १०८ वर्षांच्या हिंदुजा समूहाच्या अध्यक्षपदी असताना श्री. एस. पी. हिंदुजा हे परोपकारासाठी समर्पित होते, समूहाच्या मूल्यांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले अशा त्यांच्या स्मृती यावेळी जागवल्या गेल्या. विविध स्तरांमधून २५०० हुन अधिक व्यक्ती या प्रार्थना सभेला उपस्थित होत्या.

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी आपले प्रिय दिवंगत बंधू श्रीचंद हे कुटुंब व मित्रपरिवाराचे मित्र, मार्गदर्शक व गुरु होते असे सांगितले. श्री. जी पी हिंदुजा म्हणाले, आम्हा भावंडांसाठी ते आमच्या विश्वाचा केंद्रबिंदू होते. एकमेकांसोबत शांततेत व समन्वयाने राहण्याचाआमच्या कुटुंबाची तत्त्वे व मूल्ये यांचे पालन करण्याचा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला. व्यक्तिशः माझ्यासाठी त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते लहानपणापासून माझे मार्गदर्शक होते आणि मी त्यांचेच बोट धरून मोठा झालो. लहान  वयापासूनच मला त्यांचा खूप लळा होता. आम्ही सतत एकत्र असायचो.  लोक अनेकदा आम्हाला राम-लक्ष्मणाची जोडी म्हणत. आमच्यात प्रकाश म्हणजे भरत आणि अशोक शत्रुघ्न…. मायदेश आणि इतर देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी श्रीचंद यांनी अथक प्रयत्न केले. ते पडद्याआडूनप्रसिध्दीझोतापासून दूर राहून काम करणारे असे भारताचे खूप महान राजदूत होते. जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी आम्हा भावांना सोबत घेऊन खूप मेहनत केली. प्रिय एसपी आम्ही तुम्हाला वचन देतो की पिढ्यांपिढ्यांपासून चालत आलेला हा प्रवास आपला परिवार पुढे अखंड चालू ठेवेल. दादा व अम्मांकडून तुम्हाला वारसा म्हणून जी तत्त्वे व मूल्ये मिळाली व जी आमच्या भविष्यातील एकजुटता व कल्याणासाठी आमच्याकडे सुपूर्द केलीत त्यांचे पालन आम्ही सतत करत राहू.”

श्री. नितीन गडकरीरस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे माननीय केंद्रीय मंत्री यांनी दिल्लीहून पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले, “श्रीचंद हिंदुजा यांनी फक्त संपत्तीच निर्माण केली नाही तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील केली.  ४८ देशांमध्ये त्यांनी नोकऱ्यांच्या २००००० संधी निर्माण केल्या.  या उद्योगसमूहासोबत भारत सरकारचे संबंध खूप चांगले आहेत. नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्यकाळात या समूहाने देशाला विशेष साहाय्य पुरवले.”

इस्कॉनचे माननीय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजऋषिकेशच्या परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वतीबीएपीएस स्वामीनारायणचे पूज्य स्वामी ब्रह्मविहारी आणि इशा फाऊंडेशनचे सद्गुरू या प्रमुख आध्यात्मिक गुरूंनी दिवंगत एस पी हिंदुजा यांना श्रद्धांजली वाहिली.

इस्कॉनचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु माननीय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांनी सांगितले की एक  मजबूत पारिवारिक पुरुष म्हणून एस पी हिंदुजा यांचे विचार अतिशय ठाम होते. ते म्हणाले, एकजुटता व प्रगती यांचे सच्चे पुरस्कर्ते एस पी हिंदुजा यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यांची अफाट उदारता आणि सामाजिक कारणांप्रती समर्पण यांचा जागतिक स्तरावरील समुदायांवर परिवर्तनात्मक प्रभाव पडला आहे. त्यांचे परोपकारी कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”

ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनचे अध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद सरस्वती यांनी श्री एस पी हिंदुजा यांच्या पूज्य स्मृतींना उजाळा देताना सांगितले, “द्रष्टे नेते आणि परोपकारी व्यक्ती म्हणून एस पी हिंदुजा यांनी एक महान वारसा निर्माण केला आहे. त्यांच्या महान योगदानामुळे असंख्य जीवनांमध्ये प्रकाश आला आहे. त्यांची उणीव सतत भासत राहील.”

बीएपीएस स्वामीनारायणचे पूज्य ब्रह्मविहारी यांनी सांगितले की,श्रीचंद हिंदुजा यांचे मन विशाल होते…परोपकार हा त्यांच्या जीवनाचा एक भाग होता.”

कैलाश खेर, अनुप जलोटा आणि राहत फतेह अली खान या दिग्गज गायकांनी आपल्या भक्तिमय गाण्यांमधून दिवंगत एस पी हिंदुजा यांना आदरांजली वाहिली. 

श्री अशोक हिंदुजा यांच्या पत्नी श्रीमती हर्षा हिंदुजा यांनी सांगितले की दिवंगत एस पी हिंदुजा यांनी त्यांच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केले.  हिंदुजा कुटुंबातील तिसरी पिढी संजय हिंदुजा, अजय हिंदुजा, धीरज हिंदुजा आणि शोम हिंदुजा यांनी सांगितले की ते दिवंगत एस पी हिंदुजा यांचा महान वारसा पुढे जपत राहतील.

हिंदुजा कुटुंबाला जगभरातील मान्यवर व्यक्तींकडून शोकपत्रे आणि संदेश प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये प्रख्यात राजपरिवार, राष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यात्मिक आणि व्यावसायिक नेते, प्रसिद्ध कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित  आणि प्रेमळ सहकारी आहेत.  सर्वांनी मनापासून सहानुभूती व्यक्त केली आहे व सांगितले आहे की दिवंगत एस. पी. हिंदुजा यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा गहिरा परिणाम सदैव जाणवत राहील.