Home Blog Page 1487

पिस्तूलचा धाक दाखवून पुण्यातील हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न; मुलीची पती आणि सासरच्या चौघांविरूद्ध तक्रार

पुणे: बंदुकीचा धाक दाखवून फर्गसन रस्त्यावरील वैशाली हॅाटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी या हॅाटेलचे कुलमुख्यत्यारपत्र बंदुकीच्या धाकाने नावावर करून घेतल्याचा आरोप एका महिलेने पतीवर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जून २०१८ ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सदरचा प्रकार 2018 ते आतापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा पती असलेल्या आरोपीने लग्न होण्यापूर्वी जानेवारी 2018 मध्ये त्याच्या पुण्यातील एका घरी नेऊन त्या महिलेला दारु व ड्रग्ज पाजून तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यानंतर तिला गरोदर करुन जबरदस्तीने लग्नानंतर त्यांना आरोपींनी संगनमताने मारहाण करुन शारिरिक व मानसिक छळ केला.

फिर्यादीच्या पतीने त्याच्याकडील पिस्तूलचा धाक दाखवून व जबरदस्तीने अनैसर्गिक शारिरिक संबंध प्रस्थापित करून या महिलेकडून बळजबरीने महिलेच्या वडिलांचे प्रसिध्द हॉटेल वैशाली पॉवर ऑफ अॅटर्नी करुन स्वत:च्या नावावर करुन घेतले. तसेच कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या ५२ कोटी 50 लाख रुपये किंमतीच्या कार परस्पर विक्री करुन त्यांची फसवणुक केली आहे. तसेच लग्नातील दागिने व वस्तू असा एक कोटी 70 लाख रुपये किंमतीचा ऐवज तसेच दोन कार घेवून आरोपी व त्याचा भाऊ वापरत आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्य़ाचे पोलिस निरीक्षक (गुन्हे्) विक्रम गौड पुढील तपास करत आहेत.

आदिपुरुष:मुंबईत शो बंद पाडला

मुंबई

चित्रपट निर्मात्यांनी वादग्रस्त संवादाचा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करून चित्रपटाबाबत स्पष्टीकरण दिले आणि चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठवड्यात बदलले जातील असे सांगितले.तरीही मुंबईतील नालासोपारा येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चित्रपटाचा शो बंद पाडला. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घोषणाबाजी करत प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यानंतर शो रद्द करण्यात आला.

आदिपुरुष चित्रपटाबाबतचा वाद सुरूच असतानाच दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोज नवनवीन विक्रम रचत असल्याचे समोर येत आहे. पहिल्या दोन दिवशी वर्ल्डवाइड 140 कोटी आणि 100 कोटींची कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 100 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडला 340 कोटींची वर्ल्डवाईड कमाई करत चित्रपटाने इतिहास रचला आहे.

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये रविवारी संध्याकाळी हिंदूत्ववादी संघटनांनी रॅली काढली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मॉलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंगही केले होते, मात्र ते तोडून कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. नंतर सभागृहासमोर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. पोलिसांनी त्यांना अटक करून तिथून काढले.

विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आवश्यक – केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

पुणे दि.19: लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, केंद्रीय कौशल्य विकास सचिव अतुल कुमार, युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.सिंह म्हणाले, ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ हा विषय शिक्षण कार्यगटाच्या प्राधान्याच्या विषयापैकी एक आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची (एफएलएन) ओळख नसल्याची बाब विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आली आहे. ‘एफएलएन’च्यादृष्टीने मूलभूत कौशल्यावर  आधारीत कृतियोजना निश्चित करण्यासाठी गरज आहे. अध्ययन आणि अध्यापनाचा दृष्टीकोन, पालक व समाजघटकांची भूमिका आणि शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षण या तीन उद्दीष्टांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राच्या अध्ययनासाठी मुलांना सहाय्यभूत ठरणाऱ्या  आणि त्यासाठी वातावरण निर्मितीत उपयुक्त ठरणाऱ्या उत्तम कल्पना चर्चासत्राच्या माध्यमातून पुढे याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची उत्तम प्रकारे ओळख व्हावी यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. 2025 पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट कालबद्धरित्या गाठण्यासाठी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कार्यक्रम आखला आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करून त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीद्वारे पुण्यातून शिक्षण पद्धती अधिक सहज, समावेशक आणि नाविन्यपूर्ण करण्यासाठीचा  संदेश दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा.भार्गव म्हणाले, भूक आणि दारिद्र्याची समस्या दूर करण्यासाठी मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. याबाबतीत मागे पडल्याने शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. जगातील 56 टक्के आणि युरोपासारख्या प्रगत भागातही या विषयाचे ज्ञान नसलेल्यांची संख्या 14 टक्के आहे. विद्यार्थ्यांचे योग्य अध्ययन, प्रयोगशीलता, नवनिर्मितीचे ज्ञान आणि कौशल्य विकसित केल्यास शाश्वत विकासाचे उद्दीष्ट गाठता येईल. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रमावर भर देत शिक्षकांची अध्यापन क्षमताही विकसीत करावी लागेल.

विद्यार्थ्यांच्या संतुलित आहार आणि आरोग्यावर भर दिल्यास शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. लवचिक, बहुपर्यायी, मनोरंजक, क्रियाशीलतेवर आधारीत, आणि शोधप्रवृत्तीला चालना देणारा अभ्यासक्रम विकसीत करणे, लहान वयात विविध भाषांची ओळख करून देणे, तंत्रज्ञानाचा वापर निश्चित करणे आणि पूर्व प्राथमिक शिक्षणावर एकूण शिक्षण खर्चाच्या 10 टक्के खर्च करणे ‘एफएलएन’ साठी आवश्यक आहे असेही प्रा. भार्गव यांनी सांगितले.

युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन यांनीदेखील ’मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर सादरीकरण केले.  विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसीत होण्यासाठी शिक्षणातील नाविन्यता, विविध घटकात समन्वय आणि नव्या शैक्षणिक पद्धती आवश्यक आहेत.  विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ कमी करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी कार्यक्रम आखणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात शिक्षण सचिव संजय कुमार यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 परिषदेच्या घोषवाक्यानुसार जगभरात सर्वत्र समानरितीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यादृष्टीकोनातून कार्यगटाच्या पहिल्या तीन बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. चौथ्या बैठकीत ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर चर्चा होणार असल्याने देशभरातील साडेचार कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनात 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील उत्तम शैक्षणिक संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चर्चासत्राला जी-20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेले सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

पाहुण्यांचे महाराष्ट्रीय पद्धतीने स्वागत

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. बैठकीस उपस्थित झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे ढोल ताशांचा गजरात स्वागत करण्यात आले.

एआयसीटीई’ व पुणे विद्यार्थी गृह यांच्यातर्फे गुरुवारी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर संस्था चालकांसाठी चर्चासत्र 

पुणे : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) व ११४ वर्षांची शैक्षणिक व सामाजिक परंपरा असलेल्या पुणे विद्यार्थी गृह या संस्थांच्या वतीने संस्था चालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण यावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या गुरुवारी (दि. २२ जून) पुणे विद्यार्थी गृहाचे सभागृह, मुक्तांगण इंग्लिश स्कुल, पर्वती दर्शन, पुणे येथे हे चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते.
सुनील रेडेकर म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षण संस्था, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व औद्योगिक क्षेत्र यांची महत्वाची भूमिका आहे. या नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे चर्चासत्र महत्वपूर्ण ठरणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, महाराष्ट्र राज्याचे तंत्र व शिक्षण प्र-संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि विविध विद्यापीठाचे कुलगुरु सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 
“एक दिवसाच्या या चर्चासत्रात सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये सहा ज्येष्ठ वक्त्यांची व्याख्याने तसेच मार्गदर्शक तत्वे, महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षणासंबंधी सर्व शिक्षण संस्थांचे संस्थाचालक व प्राचार्य यांचेसाठी असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘एनईपी-२०२०’ची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. डी. कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य संचालक उच्च शिक्षण विभाग व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सदस्य डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. अनिल राव, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, महेश दाबक, राम सुब्रमण्यम् या तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. शेवटच्या सत्रामध्ये शिक्षण संस्थांना येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने यासंबंधी तज्ज्ञांबरोबर प्रश्नोत्तरांच्या स्वरुपामध्ये आपापली मते मांडता येणार आहेत,” असे सुनील रेडेकर यांनी नमूद केले.
सुनील रेडेकर पुढे म्हणाले, “यातून संस्था चालकांना नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करुन नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने शिक्षक तयार करणे आणि शिक्षकांच्या माध्यमातून भविष्यात कुशल तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे विद्यार्थी घडविण्याचे कार्य होण्यास मदत होणार आहे. येत्या काळामध्ये विविध देशांशी शैक्षणिक देवाण-घेवाण यासंबंधी तंत्र शिक्षणाशी निगडित अभ्यासक्रम तयार करणे, क्लस्टरच्या नियोजनाचा विचार, मुक्त विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, विद्यार्थी आदान-प्रदान इत्यादी गोष्टींवर सखोल चर्चा तसेच मार्गदर्शन होणार आहे.”
संस्थाचालक, प्राचार्य या चर्चासत्रात सहभागी होऊ शकणार असून, विनामूल्य नाव नोंदणी व सहभागासाठी डॉ. मनोज तारांबळे (९८२२११७४२७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अदिती राव हैदरी हिच्या  “ज्युबिली” मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर चा पटकावला पुरस्कार ! 

पीरियड ड्रामाची राणी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीने “ज्युबिली” मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदिती ला ओळखलं जातं. 
“ज्युबिली” हा एक अफलातून सिनेमॅटिक  अनुभव असून त्याचा कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदिती राव हैदरी हिने”सुमित्रा कुमारी ” हे पात्र अनोख्या तऱ्हेने साकारून या भूमिकेला चार चाँद लावले आहेत. 
ही अभिनेत्री संजय लीला भन्साळीच्या हीरा मंडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

‘पीएनबी हाउसिंग फायनान्स’ने ‘रोशनी’ या आपल्या परवडणाऱ्या गृहकर्ज योजनेचा केला विस्तार

टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये उघडल्या शाखा

·         पीएनबी हाउसिंग फायनान्सतर्फे १२ नवीन शाखांमध्ये रोशनी-केंद्रित योजनेच्या उद्घाटनाची घोषणा.

·         ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीसाठी रोशनी गृहकर्जाची संधी; प्रथमच कर्ज घेणाऱ्या, तसेच कमी वा मध्यम उत्पन्न असलेल्या स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही होणार लाभ.

·         कमी ईएमआय आणि ३० वर्षांपर्यंतच्या मुदतीसह परतफेडीचे विविध पर्याय.

वाघोली,१९ जून २०२३ : ‘पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने परवडणाऱ्या घरांसाठीची रोशनी ही वित्त योजना प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यासाठी १२ नवीन शाखा उघडल्या आहेत. सामान्य जनांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टाच्या अनुषंगाने घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात ही योजना मदत करते. या योजनेच्या कार्यान्वयासाठी कंपनीने आपल्या एकंदर संरचनेत एक वेगळा विभाग निर्माण केला असून त्यामध्ये विक्रीवित्त, वसुली आणि कामकाज यांसाठी समर्पित कर्मचारी पथकांचा समावेश केला आहे.

कंपनीने देशभरातील लहान शहरांमध्ये आपला विस्तार चालविला आहे. या अनुषंगाने होस्कोटकेंगेरीयेलाहंकाअट्टीबेलेवाघोलीबोलिंजजुने पनवेलतिलाई नगरनागरकोइल, मथुरा, जोधपूर आणि अहमदाबाद अशा सहा राज्यांतील शहरांमध्ये रोशनी-केंद्रित शाखांच्या उद्घाटनाची घोषणा कंपनीतर्फे आज करण्यात आली.

विशेषकरून टियर-१, टियर-२ आणि टियर-३ या श्रेणीतील शहरांच्या बाहेरील भागांत रोशनीच्या माध्यमातून परवडणारी गृहकर्जे पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनी प्रदान करीत आहे. या योजनेत विविध गरजा भागवणाऱ्या कर्जांचे प्रकार समाविष्ट आहेत. घराची खरेदीस्वतः करीत असलेले बांधकामघराचा विस्तार किंवा त्याचे नूतनीकरणभूखंड खरेदी करून त्यावर बांधकाम आणि मालमत्तेवरील तारण कर्ज अशी कर्जे रोशनी योजनेत मिळू शकतात. त्यामुळेप्रथमच एखादे कर्ज घेणारा नागरीक असो, औपचारिक स्वरुपाचे उत्पन्न नसलेला स्वयंरोजगार करणारा ग्राहक असो, १० हजार रुपये इतके कमी घरगुती उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील पगारदार असो किंवा मध्यम उत्पन्न गटातील पगारदारहे सर्वजण या कर्जांसाठी पात्र असतील.

पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कौसगी म्हणाले, “स्वतःच्या मालकीचे घर असावे अशी इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न साकार करण्याच्या धोरणातून आम्ही हे प्रयत्न करीत आहोत. व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना देऊन त्याद्वारे सुलभ गृहकर्ज उपलब्ध करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे‘ उपक्रमाच्या अनुषंगाने देशभरातील व्यापक ग्राहकांपर्यंत आम्ही रोशनीच्या माध्यमातून पोहोचतो आहोत. येत्या तीन वर्षांत, परवडणारी गृह कर्जे आणि प्राइम कर्जे या दोन्ही कर्जांचा आमचा पोर्टफोलिओ बळकट झालेला असेल.

सध्या १५० जिल्ह्यांमध्ये ५००हून अधिक ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. रोशनीची सुविधा असणाऱ्या आताच्या या शाखा उघडल्यानंतर, यातील एकूण रोशनी शाखांची संख्या ८८ इतकी होणार आहे. त्यांचा आणखी विस्तार व्हावा, याकरीता कंपनी सक्रियपणे काम करीत आहे.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनी ३४ वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहे. ग्राहकांचा विश्वाससंपूर्ण भारतात शाखांचे नेटवर्क आणि चांगली सेवा देणारी यंत्रणा यांच्या आधारावर कंपनी देशभरातील गृहकर्ज हवे असणाऱ्या नागरिकांना सेवा देते. उत्तर प्रदेशउत्तराखंडमध्य प्रदेशछत्तीसगडराजस्थानगुजराततामिळनाडूआंध्र प्रदेशतेलंगणाकर्नाटकमहाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआर अशा १५ राज्यांमध्ये वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे.

चांगल्या कार्यास हितचिंतक वाढणे हे सुचिन्ह!- डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे-कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांनी एचआयव्ही संसर्गित मुला-मुलींचे संगोपन, आरोग्य आणि शिक्षण हे मानवतेचे अभूतपूर्व कार्य केले असून त्यांची पुढची पिढी तेवढ्याच आत्मीयतेने हे कार्य पुढे नेत आहे ही कौतूकास्पद बाब आहे. विशेष म्हणजे आता या संस्थेत लाभार्थींची संख्या कमी होत असून, हितचिंतकांची संख्या वाढत आहे. ही विशेष आनंदाची बाब आहे. अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणतज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ‘मानव्य’ संस्थेच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त भूगाव येथील ‘गोकुळ’ या संस्थेच्या वास्तूत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘मानव्य’ चे अध्यक्ष शिरीष लवाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर विश्वस्त सौ. उज्वला लवाटे आणि विश्वस्त विनया देसाई उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेतील विद्यार्थिनी साक्षी हिने गणेशवंदना सादर केली.
डॉ. विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की, विशेष म्हणजे या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थीच संस्थेत परत येवून संस्थेतला कारभार संभाळण्यात भरीव योगदान देत आहेत. हे अनुकरणीय ‘मॉडेलच’ मानावे लागेल.
‘मानव्य’ चे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, ‘कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांनी सुरु केलेल्या या कार्याचा आज वटवृक्षाएवढा विस्तार झाला आहे. संस्थेतील एचआयव्ही संसर्गित मुले आता योग्य संगोपन, औषधोपचार आणि शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. याचा संस्थेला मोठा अभिमान आहे. संस्थेतील विविध उपक्रमांची व नविन प्रकल्पांची माहिती देऊन. ‘जोपर्यंत एचआयव्ही संसर्गित मुलं-मुली आहेत तोपर्यंत ‘मानव्य’ चे काम चालतच राहिल असे सांगून, या कार्यास सहाय्य करणार्या  सर्वांचे त्यांनी आभार मानले.’
यासोबतच संस्थेतील विद्यार्थीनी प्रिती इंगळे बी.ए सायकॉलॉजि करत असून पेंटा फाऊंडेशन मार्फत निवड झाल्यानंतर ती आता ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे यंग रिपोर्टर म्हणूंन  कॉन्फरन्ससाठी जात असल्याचे सांगून शिरीष लवाटे यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे विशेष कौतूक केले.
यावेळी संस्थेतच मोठे झालेल्या व आता संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सहभाग देणार्याक अमित, गणेश आणि शुभम यांच्यापैकी अमितचे मनोगत झाले. त्याने म्हटले की, या संस्थेत लहान वयातच दाखल केले गेले. आई-वडिलांचे प्रेम येथे लाभले. तसेच उत्तम औषधोपचार आणि शिक्षणामुळे ‘एचआयव्ही संसर्गित’ हा शब्दच जणू आमच्यातून हद्दपार झाला आहे. संस्थेतून बाहेर पडल्यावर तो परदेशी गेला. ते अनुभवही त्याने याप्रसंगी कथन केले.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले. तसेच संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ‘आम्ही स्वच्छतेचे सारथी’ ही चित्तवेधक नाटिका समर्थपणे सादर केली. याचे लेखन, दिग्दर्शन करणार्याआ संस्थेबाहेरील मुग्धा थोरात, पराग बद्रिके आणि ऋतुजा खैरनार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या जमिला ढलाईत यांनी आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेतील विद्यार्थ्यांनीच केले होते. याप्रसंगी संस्थेच्या हितचिंतकांची मोठी गर्दी होती.

प्रकाश आंबेडकरांच्या कृतीने वाईट वाटले, औरंगजेब आपला नेता कसा होऊ शकतो?- देवेंद्र फडणवीस

अकोला-वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यांच्या कृतीने वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अकोला येथे जाहीर सभेत यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचे आणि आमचे विचार वेगळे असतील पण प्रकाश आंबेडकरांकडे पाहत असताना आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. हैदराबादच्या निजामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यासोबत सामील करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमिषे दिली. बुद्ध धम्म घेऊ नका, असे निजाम बाबासाहेबांना म्हणत होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, मी तोच धम्म स्वीकारेन जो भारताच्या भूमित तयार झाला असेल. अशा बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही वशंज आहात. त्यामुळे तुमच्याकडून असे वर्तन अपेक्षित नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कुठल्याही धर्माचा विरोधात नाही. पण औरंगजेब आमचा नेता, आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. औरंगजेब आणि त्याचे खानदान बाहेरून आले होते. भारतातील मुस्लिमांचा आणि औरंगजेबाचा काहीच संबंध नाही. ते औरंगजेबाचे वंशज नाही. भारतीय मुस्लिम हा राष्ट्रवादी विचारांचा मुस्लिम आहे. ते औरंगजेबाला मानत नाही. भारतातील, या मातीत जन्मलेला मुस्लिम फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या राज्यात काही लोक शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. अचानकपणे काही लोक औरंगजेबाचा स्टेटस कसा ठेवू लागले? छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि कोल्हापूरला जे घडल तो योगायोग नाही तर एक प्रयोग आहे. काही लोक जाणीवपूर्वक अशांतता झाली पाहिजे म्हणून प्रयोग करत आहेत. राज्यात एवढ्या औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या? त्यांना कुणीतरी पैदा करत आहे. काही लोकांना मळमळ आणि जळजळ होते आहे. असे लोक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावचा स्टार स्टडेड अवॉर्ड्स नाईटमध्ये आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान!

” पुरस्कार ” मय वर्ष ! 
यंदा च वर्ष अभिनेता राजकुमार राव याच्यासाठी खास मानलं जातंय आणि त्याचं कारण देखील तितकच खास आहे. त्याच्या चमकदार कामगिरीसह 2023 मध्ये त्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेक पुरस्कारांच्या सोबतीने “मोनिका ओ माय डार्लिंगमधील ” अभिनयासाठी बी-टाउनच्या शेपशिफ्टरने डिजिटल फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) पुरस्कार जिंकला. अनेक प्रतिष्ठित अवॉर्ड ने हे वर्ष राजकुमार साठी ” पुरस्कार ” मय वर्ष झाल्याचं बघायला मिळतंय. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम  कथा आणि आणखी कमालीच्या भूमिकावर हा राजकुमार काम करताना दिसतोय. 
सह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि  अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्यांच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
राजकुमार याने अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित स्त्री  2 च्या रिलीजची तारीख त्यांच्या टीमसोबत जाहीर केली. 2023 मध्ये राजकुमार राव मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक मध्ये दिसणार आहे.

Sharad Lonkar

मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी आणू नका,यावर्षीही पीओपीच्याच गणेशमुर्ती

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

मुंबई-
कोटींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा गणेशमूर्ती कारखाने हा उद्योग बंद करुन मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका, यावर्षी ही पिओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या म्हणजे मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार उपस्थितत होते.

यावेळी ते म्हणाले की, मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्माण करणारे राज्यातलं मोठं साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रातला निर्माण केलेल्या या मुर्त्याच्या देवाण-घेवाणीमधून 70 हजार 80 हजार कोटीपर्यंत उलाढाल होते.
एवढं मोठं काम असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाकडे बोट दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा विरोध आहे.पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही. महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मुर्त्यासुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरता सुद्धा विसर्जन होऊ शकते, या गोष्टी समोर आणल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा.
विशेषतः मुंबई महानगरपालिकेने जे परिपत्रक काढले आहे की, चार फुटाकांच्या खालील मुर्ती ह्या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पालिका आयुक्त मा. उपमुख्यमंत्री, मा. मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. सकारात्मक चर्चा आहे, न्यायालयीन काही आदेश असले तरी या पद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे. पण हा मराठी माणसाचा रोजगार कुठे बंद होता कामा नये, यासाठीच भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
जी मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे मुंबईतील 3,500 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करात सोडते आहे त्या मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा अधिकार आहे का? 80 हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवाल यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

भारतीय वारसा का आक्रसला याचा अभ्यास व्हावा : शेफाली वैद्य

पुणे :
 विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित ,सौ.दीपाली पाटवदकर लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’  या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ  पुण्यात  लेखक -समीक्षक सौ. शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग तसेच साप्ताहिक विवेकच्या संपादक सौ. अश्विनी मयेकर, किरण कीर्तने यांच्या हस्ते  झाले. रविवार, १८ जून २०२३ रोजी,सायंकाळी सहा वाजता स्वा. सावरकर अध्यासन केंद्र ( कर्वे रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला. 

शेफाली वैद्य म्हणाल्या,’ आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्ह पावलोपावली दिसतात. तेथील आचार विचार, रितीरिवाजावर भारतीय संस्कृतीचा ठसा आहे. हे ठसे विनाशकारी नव्हती तर मंगलमय होती.भारताने जगाला काय काय दिले, याचा अभ्यास करताना आपण काय हरवलं याचीही नोंद ठेवली पाहिजे. आपण पूर्वी महान होतो, हा अभिमान मानून थांबता कामा नये, तर आपल्या देशाचा विस्तार कमी कमी का होत गेला, याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि इथून पुढे सतर्क राहिले पाहिजे. धडा घेतला पाहिजे.आपला वारसा का आक्रसला याचा अभ्यास करून तसे पुन्हा होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे ‘.
‘ असत्यमेव जयते ‘ पुस्तकाचे लेखक अभिजीत जोग म्हणाले, ‘ आपण कोण होतो, कुठून आलो हा प्रवास म्हणजे इतिहास आहे. खरा इतिहास हीच आपली ओळख आहे. आपल्या देशाची खरी ओळख शोधली पाहिजे. भविष्यासाठी ते आवश्यक आहे.काही शक्तींनी चुकीची ओळख देशावर लादली.इस्लामी आक्रमकांनी वास्तूंचा विध्वंस केला, माणसं मारली. पण,ब्रिटिशांनी कारकुनी लादून आपल्याला गुलाम केले. संस्कृती विसरायला लावली. तत्पूर्वी सर्व ज्ञानशाखांचा पाया भारताने घातला, हे मान्य केले पाहिजे ‘.
‘सनावळयांच्या पालिकडे इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा, पूरक वाचन म्हणून  अशी पुस्तके अभ्यासक्रमात घेतली पाहिजे ‘, असे मत अश्विनी मयेकर यांनी व्यक्त केले.
पुस्तकाच्या लेखिका दीपाली पाटवदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाती कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. वसुधा करंदीकर यांनी प्रास्ताविक केले.  मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले.दीप्ती खरे यांनी आभार मानले.
मनोवेधक प्रवास : ” स्वस्तिचिन्हे “

देव, धर्म, भाषा, शब्द, लिपी, ग्रंथ, कथा, काव्य, पंचांग, गणित, विज्ञान, कला या क्षेत्राद्वारे जी भारतीय संस्कृती देशविदेशात पोचली, तिथल्या मूळ संस्कृतीशी एकजीव झाली, तिचा मनोवेधक प्रवास ” स्वस्तिचिन्हे ” या ग्रंथातून लेखिकेने घेतला आहे. रामकथेच्या अशाच वाटचालीवरच्या रामकथामाला या ग्रंथानंतरचे लेखिकेचे हे नवे पुस्तक आहे.

कंबोडियाच्या ध्वजावर विष्णूचे मंदिर, थायलंडच्या राज्याच्या झेंड्यावर ऐरावत, इंडोनेशियामधील विद्यापीठांच्या लोगोवर गणपती, आग्नेय आशियाई देशांच्या समुद्री स्पर्धेचे चिन्ह समुद्रस्नान करणारा हनुमान,आशियाई तिरंदाजी खेळांचे चिन्ह धनुर्धारी राम, पांडव वंशातील मातेच्या पोटी घटोत्कचाचा पुनर्जन्म आणि त्याचा बदला घेण्यासाठी आलेला चिरंजीव अश्वत्थामा यांची कहाणी सांगणारा इंडोनेशियाचा 2021 चा चित्रपट ” क्षत्रिय देव घटोत्कच अशा अनेक गोष्टींचा या पुस्तकात समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी-२०’ निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १७: शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जी- २० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, समन्वयक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध शैक्षणिक साधने आणि शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा समावेश आहे. आदर्श बालवाडी, ५५ भाषांतील पुस्तके, आयुकाद्वारे निर्मित ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी ‘द वेलो ग्यानेश्वरी’ सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपरिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा, गोष्टी, कविता, डिजिटल साहित्य आदीची रेलचेल प्रदर्शनात आहे.

पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाबरोबर मुलांचा गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य शिक्षण, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित व्हाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात शिक्षणसंस्था, उत्पादक, स्टार्टअप आदींची सुमारे १०८ दालने असून २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. यापैकी ३६ राज्यांची दालनेदेखील आहेत.

प्रदर्शनात सहभागी प्रमुख संस्था
युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टम्स्‌‍ डिव्हिजन (आयकेएस), मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, आयसर, विविध स्टार्ट अप यांच्यासह विविध राज्य शासनांचे शिक्षण विभाग अशा एकूण १०८ प्रदर्शन दालनांचा प्रदर्शनात सहभाग आहे.

प्रदर्शनाचे महत्व:
पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक विकास, बौद्धिक व कौशल्य वृद्धी यासह लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठीची कौशल्ये येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी या प्रदर्शनातील बाबी सहाय्यभूत ठरणार आहेत.
000

मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी

मुंबई-मुंबईत आयोजित युथ काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी झाली असून दोन गटांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या आहेत. कुणाल राऊत यांना विरोध केल्याने सदरील प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्लावर हे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. मात्र, बैठक सुरू असतानाच युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधातील एक गट आक्रमक झाला. काँग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी देखील कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना बदलण्याची मागणी केली. त्यामुळे कुणाल राऊत समर्थक आक्रमक झाले.

सध्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कुणाल राऊत यांना पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यातील शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना बैठकीमध्येच विरोध केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आप चे राजकारण सगे सोयरे भाऊकीच्या पुढे जाणारे!प्रस्थापित पक्षांबाबतची मतदारांची श्रद्धा भाबडीच!

-अजित फाटके पाटील यांचे मत

पुणे-महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाही भावकी आणि खोके- बोके यामध्ये गुरुफटले गेले असून जनतेचा आवाज प्रस्थापित विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही उमटत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच जनहिताचे राजकारण करू शकते असे आप चे अजित फाटके पाटील यांनी स्वराज्य संवाद सभेदरम्यान सांगितले.

मागील पंधरवड्यामध्ये आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी आठ जिल्ह्यातून जाणारी स्वराज्य यात्रा काढली होती. आता त्यानंतर प्रभाग पातळीवरती संवादासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी फुले वाडा येथे सभा घेण्यात आली. पाऊस असतानाही त्यास स्थानिक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र मध्ये चार वर्ष सर्वचपक्ष हे एकमेकांशी सत्तेसाठीच्या तडजोडी करताना दिसले आहेत. त्यामध्ये कुठली विचारधारा अथवा समान कार्यक्रमही दिसत नाही. त्यामुळे एखाद्या सत्ताधारी पक्षाला मतदारांचे प्रश्न सोडवण्यास अपयश आल्यावर पर्याय म्हणून असणारे विरोधी पक्ष हेही हा प्रश्न सोडवत नाहीत असा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. एकमेकांची उणिदुणी काढणे, शाब्दिक कुरघोडी करणे यामध्येच हे सर्व नेते मग्न आहेत. प्रस्थापित पक्ष आपले प्रश्न सोडवेल ही श्रद्धा भाबडी ठरेली आहे. आता जनतेने आपला आवाज उठवणाऱ्या आम आदमी पार्टी याला संधी देण्याची गरज आहे. दिल्ली मधली कामे ही प्रत्यक्षामध्ये दिसलेली आणि जगभर कौतुक झालेली अशी असून गुजरात मॉडेल प्रमाणे ती फसवी नाहीत. महिलांसाठी मोफत बस योजना, मोफत उत्तम शिक्षण योजना घरोघरी घरपोच कागदपत्र सेवा, मोफत वीज अशी पंजाब आणि दिल्लीमध्ये केलेल्या कामांची मोठी यादी आहे असे यावेळी जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

फुलेवाडा परिसरातील जनतेचे राहणीमान उंचावण्याचे सर्व प्रयत्न आम आदमी पार्टी करेल असे आश्वासन यावेळेस शेखर ढगे यांनी दिले.
आनंद अंकुश यांनी सरकारी तिजोरीत जमा होणारा कर हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाकडूनच जमा होत असल्याने तो सरकारने कल्याणकारी कामांसाठी राबवावा अशी मागणी केली.
तरुणांना हातास काम ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी उत्तम कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इरफान रोड्डे यांनी केले. रुबीना काझमी यांनी दिल्ली मॉडेलमुळे महिलांचे सक्षमीकरण झाल्याचे सांगितले.

यावेळेस एकनाथ ढोले यांनी प्रास्ताविक केले व किरण कद्रे यांनी सूत्रसंचालन केले.पैठणकर यांनी आभार मानले.

एम. टी. डी. सी. च्या पर्यटक निवासांमध्ये योग दिवस साजरा करणार…॥

भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये योगसाधनेला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या आधुनिक काळात प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगभरामध्ये योगसाधनेचे, योगाचे पालन करणे आवश्यक आहे. मानव जातीचे दीर्घ आयुष्य दर्शविणारा दिवस म्हणजेच वर्षभरातील सर्वात मोठा दिवस म्हणुन गणल्या जाणाऱ्या 21 जुन रोजी संपुर्ण जगभरामध्ये जागतिक योग दिन साजरा केला जातो. शाररिक व मानसिक अनारोग्याचे निवारण करणे अत्यंत महत्वाचे असुन 2023 यावर्षीच्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन शरीर आणि मन सुदृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने, योगाचा प्रचार व प्रसार वाढवुन योगमय वातावरण निर्माण व्हावे तसेच योगदिनाची जागृती करुन आरोग्य सुद्दढ कसे राखता येईल यांची पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दि. 21 जुन 2022 या दिवशी महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी मा. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाजी हे खासकरुन आग्रही आहेत.
पर्यटक निवासाच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलवुन वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना योगाचे जीवनामधील महत्व, योगाचे प्रकार, योग केल्याचे शरीरास त्याचा होणारा फायदा तसेच आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात मनाच्या एकाग्रतेसाठी योग किती गरजेचे आहे हे एखादया व्याख्यानाव्दारे पर्यटकांना पटवुन देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनांना त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे तसेच सर्वांचे आरोग्य सुधारण्याकरिता प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन करण्यात येत आहे.

नियमित योगाचे महत्त्व जाणता योग माणसांना आपसांत जोडुन परस्पर प्रेम आणि सध्दभावनेची भावना विकसित करतो त्यामुळे महामंडळाच्या पर्यटक निसासांमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध धर्मांचे लोक जाती, पंथ आणि देशप्रेमाच्या भावनेने प्रेम, सद्भावना आणि आत्मीयतेने योगा करण्यास मार्गदर्शन करण्यात येईल. त्या अनुषंगाने महामंडळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना व्यवस्थापकिय संचालक मा. श्रध्दा जोशी-शर्मा मॅडम यांनी दिल्या आहेत.
सध्याच्या वातावरणात कोरोना सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि निरोगी जीवन शैलीबारोबरच निसर्गाचा आणि पर्यटनाचा आनंद घेणे यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणुन रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अन्नपदार्थ असणारे रुचकर जेवण आणि योगोपचार याबाबत मार्गदर्शन शिबिर पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटकांसाठी आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गातुन सावरलेल्या पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार पध्दती आणि योगोपचार याबाबत माहीती देणे, योगा सत्र सुरु करणे, त्रासलेल्या आणि मनस्वास्थ्य भरकटलेल्या मनाला शांती देण्यासाठी मेडीटेशन-ध्यानधारणा सुरु करणे, अशा विविध सुविधा आगामी काळात पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर निसर्गाचे वैभवशाली रुप जपण्यासाठी आण‍ि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदार पर्यटनाचा (Responsible Tourism) अंगिकार करणे, प्लॅस्टिक आणि प्रदुषण करणाऱ्या वस्तुंचा वापर कमी करणे या बाबींवरही भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यस्थापक मा. श्री चंद्रशेखर जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची जागतिक वारसा स्थळे असलेल्या आणि बौध्द-हिंदु इ. साधु-महंत यांनी ध्यानध्यारणा करण्यासाठी निवडलेल्या अशा अजंठा, वेरुळ आणि निसर्गरम्य असलेल्या लोणार तसेच ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटक निवासामध्येही योगा आयोजित केला जाणार आहे.
ऐतिहासिक गडकिल्ले, निसर्गरम्य डोगररांगांवर आणि समुद्राच्या किनारी असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये योगा करणे ही एक अनोखी पर्वणी असुन त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.
श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.