Home Blog Page 1486

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट

पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

पुणे दि. २०: जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले, तर लाल महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेत स्तिमितही झाले.

सकाळी शनिवारवाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले. येथे पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला. तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव,
पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले. गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखल्याने पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. यावेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला. पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या. शनिवारवाडा आवारात लावण्यात आलेल्या आर्टिफिशयल ज्वेलरी, कलाकुसरीच्या वस्तूंच्या स्टॉलमधील बांगड्या, कानातील आभूषणांनी महिला प्रतिनिधींना आकर्षित केले.

अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली.

यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
000

PM मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर; न्यूयॉर्कमध्ये योगा करणार, 6 वेळा भेट घेतलेल्या बायडेनसोबत डिनर करणार

व्यापारी शिष्टमंडळही मोदींसोबत,मंत्र्यांची एक टीम आणि आयटी, संरक्षण, एव्हिएशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध क्षेत्रातील लोक मोदींसोबत

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे दुसरे भारतीय पंतप्रधान आणि तिसरे मोठे नेते आहेत.यापूर्वी 1963 मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि 2009 मध्ये मनमोहन सिंग हे दौऱ्यावर अमेरिकेला गेले होते. यामुळेच पंतप्रधान मोदींच्या मागील 7 अमेरिका दौऱ्यांच्या तुलनेत ही भेट खूप खास आहे. यादरम्यान ते 72 तासांत 10 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून न्यूयॉर्कमध्ये योगा करणार आहेत.

अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, भारत-अमेरिकेचे घनिष्ठ संबंध आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आमची भागीदारी सातत्याने वाढत आहे. अमेरिका वस्तू आणि सेवांमध्ये आमचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. याशिवाय, आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रात भागीदार आहोत. इंडो-पॅसिफिक मुक्त आणि मुक्त करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.

मोदी म्हणाले- राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि इतर अमेरिकेच्या नेत्यांशी माझी चर्चा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी पुढे नेईल. मला विश्वास आहे की माझ्या अमेरिका भेटीमुळे लोकशाही, विविधता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित आमचे संबंध अधिक दृढ होतील. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही एकत्र उभे आहोत.

पीएम मोदींसोबत मंत्र्यांची एक टीम आणि व्यापारी शिष्टमंडळही अमेरिकेला जाणार आहे. शिष्टमंडळात आयटी, संरक्षण, एव्हिएशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध क्षेत्रातील लोक असतील.

मंत्र्यांच्या टीममध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उपस्थिती निश्चित असल्याचे मानले जात आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण, तंत्रज्ञान, धोरणात्मक आणि व्यावसायिक सौदे होतील. पंतप्रधान मोदी 20 अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंनाही भेटणार आहेत.

पीएम मोदींची ही भेट किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, पंतप्रधानांच्या जाण्याआधी 15 दिवसांत अमेरिकेचे दोन मोठे नेते भारतात आले आहेत.तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले होते की, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर करार झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान याची घोषणा केली जाईल.

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2022-2023 या आर्थिक वर्षात $128 अब्ज ओलांडला आहे. म्हणजेच या मध्यांतरात भारत आणि अमेरिकेने 10 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय केला.

अमेरिका अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याशी भारताचा व्यापार अधिशेष आहे. म्हणजेच भारत अमेरिकेला जास्त माल विकतो आणि तिथून कमी माल घेतो. 2021-22 मध्ये, भारताचा अमेरिकेसोबत 32.8 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष होता. भारताला हा व्यापार अधिशेष कायम ठेवायचा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा आहे.

सामरिक आणि मुत्सद्दी दृष्ट्याही ही भेट विशेष आहे. वास्तविक, चीनच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेची चिंता जवळपास सारखीच आहे. LAC आणि हिंदी महासागरात चीनच्या हस्तक्षेपाला भारताचा विरोध आहे.त्याचबरोबर तैवान आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांनाही अमेरिका विरोध करत आहे. अशा परिस्थितीत चीनशी सामना करण्यासाठी दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या या भेटीत भारताला जगातील सर्वात प्रगत MQ-9 ड्रोन आणि फायटर जेट इंजिन बनवण्यासाठी अमेरिकेकडून 11 तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.

याआधी पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची ६ वेळा भेट घेतली आहे. त्यांची पहिली बैठक सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेत झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये व्हाईट हाऊसमध्ये सुमारे ९० मिनिटे चर्चा झाली.त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इटलीत झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि बायडेन यांची भेट झाली होती. दोन्ही नेत्यांची पुढील बैठक मे २०२२ मध्ये क्वाड शिखर परिषदेदरम्यान झाली.त्यानंतर जून 2022 मध्ये जर्मनीमध्ये G-7 शिखर परिषदेदरम्यान दोघांची भेट झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेदरम्यान मोदी-बायडेन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांची शेवटची बैठक मे 2023 मध्ये G7 देशांच्या शिखर परिषदेदरम्यान झाली होती. येथे बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना त्यांचा ऑटोग्राफ मागितला.

तुमचा गुरू सूर्य, तर तो मणिपूरमध्ये का उगवत नाही; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका, तर राहुल गांधींचे कौतुक

मुंबई-57 वर्षांपूर्वींच्या शिवसैनिकांचा जोश अजूनही कायम आहे. इथ आपल्या मेळाव्याला गर्दी झाली असून नेस्को सेंटरमध्ये गारदीची टोळी जमली आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.षण्मुखानंद हॉलमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर कोण सुर्य? तुमचा सुर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर का जात नाही, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला आहे.

अमित शहा म्हणजे एक इंजिन जाऊन आले आहे. दुसरे इजिन जातच नाही. मणिपूर पेटले आहे आणि मोदी अमेरिकेला जात आहे. तुमचे डबल इंजिन सरकार पुढे जातच नाहीये. हे सरकार वाफेवर चालते का? डबल इंजिन सरकार रुळावरुन घसरल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.“एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे म्हणजे गारद्यांची टोळी, वसुली करायला…” उद्धव ठाकरेंची टोलेबाजआज आपल्या सभेला शिवसैनिकांची गर्दी झाली आहे आणि मुंबईच्या एका कोपऱ्यात गारदी जमले आहेत. गारदी शब्दाचा अर्थ माहित आहे का? गारदी म्हटल्यावर राघोबादादा, नारायणराव सगळे आठवतात. गारदी शब्दाचा अर्थ असा आहे की पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करण्यासाठी अशा काही गारद्यांची टोळी तिकडे जमली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.मी माझ्या भाषणात म्हटलं की पंतप्रधान मोदी अमेरिकेला चालले आहेत पण मणिपूरला गेले नाहीत. मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे म्हटल्यावर नवे गुलाम चिडले. लाचार मिंधे त्यांनी सांगितलं की सूर्यावर थुंकू नका. कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरु सूर्य असेल तर मग तो मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे सूर्य उगवणार नसेल तर करायचं काय? प्रत्येक वेळी संजय राऊतनेच प्रतिक्रिया द्यायला हवी असं काही नाही. मणिपूरमध्ये मी जे बोललो तिथेच राहणारे रिटायर्ड ले.जन. निशिकांत सिंग. त्यांनी ट्विट करुन मणिपूर हे स्टेटलेस स्टेट म्हणजेच तिथे कायद्याचं राज्य संपून तिथे सीरियासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे. सीरिया, लिबिया, नामिबिया असं म्हटलं आहे. जनता पिसाळल्यावर काय होतं याची उदाहरणं त्यांनी दिली आहे.लिबियामध्ये गडाफी होता. तो हुकूमशाह होता. जनता पेटल्यावर तो पळाला आणि कुठे सापडला तुम्हाला आठवतोय? गटाराच्या पाईपमध्ये लपला होता. मग बंडखोरांनी त्याचे केस धरुन त्याला बाहेर खेचला आणि हाल हाल करुन आणि तुडवून मारला. अशी परिस्थिती सिंग यांनी सांगितली आहे. डबल इंजिन सरकार नुसतं वाफा सोडतंय पुढे जातच नाही. डबल इंजिन सरकार तिकडे कोसळलंय, घसरलंय. अमित शहाम्हणजे एक इंजिन जाऊन आलं दुसरं जातंच नाही. लिबियासारखी परिस्थिती म्हणजे भाजपाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत, घरं जाळली जात आहेत. तसं बघायला गेलं तर भाजपावाले मार खात आहेत, आम्हाला आनंद व्हायला हवा. पण भाजपावाले असले तरीही त्यांच्यासह असं होऊ नये हे आम्हाला वाटतं आहे कारण हे आमचं हिंदुत्व आहे.मी आत्ता हास्यजत्रेच्या कलाकारांना भेटलो त्यांना मी म्हटलं की तुम्ही आम्हाला हसवलंत चांगलं केलं. आमची हास्यजत्रा सुरुच असते. कालच हास्यजत्रेचा एक प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी सादर केला. एवढंच बोलल्यावर तुम्ही हसता आहात. त्यांचा प्रयोग सांगितल्यावर किती हसाल असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर कोव्हिडची व्हॅक्सिन मोदीजींनी तयार केली हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य त्यांनी दाखवलं. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे माहित नाही. कोव्हिडची लस मोदीजींनी तयार केली मग बाकीचे संशोधक काय गवत उपटत होते का? असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. असे अंधभक्त आणि त्यांचे गुरु म्हटल्यावर त्यांना व्हॅक्सिन द्यायची गरज आहे.मला वाटतं की या सगळ्यांना समुपदेशनासाठी समीर चौगुलेंच्या केंद्रात पाठवलं पाहिजे कारण सगळे अवली आहेत. लवली कुणीच नाही असं म्हणत भाजपाला टोला लगावला. तुम्ही अवली असलात तरीही जनता कावली आहेत. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.

६२ वर्षाच्या निवृत्त बँक कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

शुक्रवार पेठेत राहत होते दोघेच …

पुणे-६२ वर्षे वयाच्या निवृत्त बँक कर्मचाऱ्याने आपल्या ५८ वर्षीय पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यातील शुक्रवार पेठेत घडला. खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर अधिक तपास करत आहेत.

हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६२,रा.स.नंबर २९०,आशा को ऑप. सोसायटी ,शुक्रवार पेठ पुणे )असे या निवृत्त बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. हेमंत हे आपली पत्नी सुनीता (वय ५८ ) यांच्या समवेत येथे ३ क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते , मुले त्यांच्यासमवेत राहत नव्हती .काल्साकली पावणे आठ पूर्वी म्हणजे रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हेमंत यांनी प्रथम आपल्या पत्नीला गळा आवळून ठार मारले त्यानंतर स्वतः दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . मानसिक त्रास सहन न झाल्याने हेमंत यांच्या कडून हे कृत्य घडले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे.

भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक-सिद्धार्थ भांगेचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

पुणे-पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या सिद्धार्थ किशोर भांगे या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने यूपीएससीची सीएसई परीक्षेत मोठं यश मिळवलं असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याचे कौतुक केले आणि आज आपल्या निवासस्थानी सिद्धार्थचा सत्कार करुन, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये UPSC ची नागरी सेवा परीक्षा अर्थात Civil Services सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेमधील यशासाठी जसे परीक्षार्थीचे बौद्धिक श्रम महत्त्वाचे असतात. तसेच त्याच्या सभोवतालचे वातावरणही महत्त्वाचे असते.

महाराष्ट्रातील यंदाच्या सर्वच यूपीएससी यशवंतांचे कौतुक आहे. मात्र सभोवतालचे वातावरण आव्हानात्मक असतानाही केवळ आपल्या आई-वडिलांवरील श्रद्धा, स्वतःवरील विश्वास आणि आपल्या अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर यशश्री खेचून आणणाऱ्या पुण्याच्या खराडी भागातील सिद्धार्थ भांगे याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

सिद्धार्थच्या या यशाबद्दल आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कौतुक केले असून, आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये UPSC ची नागरी सेवा परीक्षा अर्थात Civil Services सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. पण सिद्धार्थ भांगे याचे विशेष कौतुक वाटते. कारण, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन, त्याने हे यश संपादन करुन, पालकांच्या कष्टाचे खरे चीज केले आहे. त्याने भविष्यातही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर नावलौकिक कमावावा. सिद्धार्थचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल यात शंका नाही, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कोल्हापूरच्या विद्या प्रबोधिनीचे संचालक श्री राजकुमार पाटील आणि सिद्धार्थचे पालक उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती-मुख्यमंत्र्यांचे आदेश

अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी केली होती मागणी

मुंबई दिनांक १९: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबवा-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे चार लाख बालकांपर्यंतपोहोचला ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमउषा काकडे यांची माहिती; युनिसेफ व ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय परिषद
पुणे : “बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण यासाठी युनिसेफ व भारत सरकार यांच्यात सहकार्य करार झाला आहे. याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम बालकल्याण व शिक्षण विभागाने राज्यभर राबवावा,” अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केली. बाल न्याय अधिनियम आणि बालकांच्या सुरक्षिततेचे इतर कार्यक्रम मराठीमधून उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा उषा काकडे यांच्या पुढाकाराने युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे ‘बाल आरोग्य, विकास व त्यांचे अधिकार’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या परिषदेला युनिसेफच्या महाराष्ट्र प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, ‘सिंबायोसिस’च्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, दिग्दर्शिका फराह खान, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, बालनाट्य दिग्दर्शक संजय हळदीकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस, ऍड. दिव्या चव्हाण, ट्रान्सजेंडर ॲक्टीविस्ट लक्ष्मीनारायण त्रिपाठी, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या जुगनू गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी विचार मांडले. बालकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
उषा काकडे म्हणाल्या, “युनिसेफच्या सहकार्याने बालहक्कांबद्दल जागरूकता करण्याच्या उद्देशाने ही परिषद महत्वाची ठरली. बाल आरोग्य व विकास, बालकांची लेखन-वाचन क्षमता आणि पाणी व्यवस्थापनात युवकांचा सहभाग यावर चर्चा झाली. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमांतर्गत आजवर चार लाख मुलांना याविषयी मार्गदर्शन केले आहे. युनिसेफच्या सहकार्याने सोलापूर, कोल्हापूर व नागपूर येथे तीन महिन्यांनी परिषद घेणार आहोत.”
अमिताभ गुप्ता म्हणाले, “बालकांना पोलिसांचा आधार वाटावा, यासाठी ‘चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशन’ची संकल्पना राबविली. कायदा सक्षम आहे. यंत्रणाही योग्य काम करते. परंतु, गुन्हा घडण्याआधी तो समजण्यासाठी संवाद, माहिती नेटवर्क चांगले असावे.”
फराह खान म्हणाल्या, “सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी चित्रपट प्रभावी माध्यम आहे. बालकांच्या आरोग्य, सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी, रील याचा उपयोग करावा.”
पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “आपले मूल चांगला नागरिक घडावे, यासाठी पालकांनी संस्कार, चांगला आहार, शिकवण द्यावा. मूल जन्मल्यानंतर करिअर पेक्षा पालकत्व गांभीर्याने घ्यावे. पालकांचे प्रेम बालकाचा मूलभूत अधिकार आहे.”
लक्ष्मीनारायण त्रिपाठी म्हणाल्या, “भारतामध्ये तृतीयपंथियांसाठी कायदे, धोरण चांगले आहे. मात्र, समाजाचा दृष्टीकोन अजूनही बदलेला नाही. युनिसेफने स्त्री-पुरुष यापलीकडे जाऊन ट्रान्सजेंडरचाही विचार करायला हवा.”
डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, “चांगले पालकत्व, मुलांचे मानसिक आरोग्य, चांगला आहार यावर लक्ष केंद्रित करावे. जडणघडणीच्या वयात त्यांना चांगली संगत, मुलांशी मुक्तसंवाद, प्रोत्साहन द्यायला हवे.”
राहुल मोरे म्हणाले, “वेगवेगळ्या घटकांतील मुलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे वस्ती, गावपातळीपासून ते राज्य पातळीवर जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. त्यांचा सर्वांगीण विकास, सुरक्षित वातावरण मिळावे.”
डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, “प्रत्येक मुलीचा आदर करण्याचा संस्कार पालक व शिक्षकांनी द्यावा. मुलांशी मोकळेपणाने संवाद व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. मोबाईल, इंटरनेटचा वापर पालकांनी मर्यादित करावा.”
संजय हळदीकर म्हणाले, “बालनाट्याच्या माध्यमातून जागृतीचे प्रभावी काम होईल. नाटक ही बालकांची सांस्कृतिक गरज असून, ‘गुड टच बॅड टच’ यासारखे विषय नाट्य व पथनाट्यातून मांडणार आहे.”
ऍड. दिव्या चव्हाण यांनी सांगितले की, न्यायालयातील वातावरण बालस्नेही व्हावे, यासाठी ‘चाईल्ड फ्रेंडली कोर्ट’ कल्पनेचा विचार व्हावा.” जुगनू गुप्ता, स्वाती मोहापात्रा, अरुण खोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. लीना सलढाणा-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संघमित्रा खोरे यांनी आभार मानले.

स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर –

व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा सचिन शामसुंदर मालपाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट विक्रेता, उत्कष्ट महिला व्यापारी, कै.साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक २६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी  यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे  उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, मदनसिंह रजपूत, सूर्यकांत पाठक, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, नितीन पंडीत, सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती हे असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदा २६ वे वर्ष आहे.
शिरीष बोधनी म्हणाले, दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापा-यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यंदाच्या वर्षी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार शनिवार चौकातील जीवन जनरल स्टोअर्स चे राजेंद्र सुगंधी, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार शनिवार मंडई रस्त्यावरील दीप इलेक्ट्रिकल्स च्या नेहा शहा, कै. साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार रंजीता होडे, फिनिक्स पुरस्कार सखी तुळशीबागचे गणेश रामलिंग आणि उत्कृष्ट दुकान पुरस्कार तुळशीबाग येथील श्री ज्वेलर्स चे चंद्रशेखर खोडके यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.
दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गिरीकंद ट्रॅव्हल्स चे विश्वास जोशी, गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अ‍ँड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर ट्रेडिंग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दर्शना पवार सोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याने पोलीस संभ्रमात ..

पुणे- एमपीएससीमधील टॉपर दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे हादेखील बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या हाती आलेल्या CCTV फुटेजवरून लक्षात आले आहे. एवढेच नव्हे तर, अनोखळी व्यक्तीच्या मोबाईलवरून राहुलने कुटुंबियांना घडलेल्या घटनेत आपण काहीही केले नसल्याचे सांगितले आहे. जर राहुलने काहीच केलेले नाही असे जर तो सांगत असेल तर, तो अद्यापपर्यंत पोलिसांसमोर का आला नाही? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. राहुल समोर येईपर्यंत दर्शनाच्या मृत्युचे कारण गुलदस्त्यात राहणार आहे.

दरम्यान, दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडालेली असताना आता राजगडावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये दर्शना आणि राहुल दोघेही 12 जून रोजी दुचाकीवरून राजगडावर गेले होते. येथे गेल्यानंतर दोघांनी गड चढण्यास सुरूवात केली. मात्र, 10 वाजण्याच्या सुमारास गडावरून राहुल एकटाच परततांना दिसून येत आहे. ही सर्व माहिती गडाशेजारी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आली असून, राहुल घटनेपासून बेपत्ता आहे. दुसरीकडे, राहुल गडावरून एकटाच खाली येत असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून राहुलचा कसुन शोध घेतला जात आहे. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे.

उध्दवजी तुम्ही मालवणीत तरी जाऊन दाखवा–मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. १९ जून २०२३
उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत,
अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा… म्हणून मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा तुम्ही आधी मुंबईच्या मालवणीतला गेलात होतात काय…? स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही, पडला तर थेट विमानातून लंडनला जायचं… तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचं नाही.. आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पलटवार केला.

भाजपा महिला मोर्चाच्या दादर येथे आयोजित सहकार संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी काल उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
तुम्हाला मुंबईच्या मालवणीत ही जायला जमत नाही त्यामुळे तुम्ही मोदींना सल्ला देऊ नका, भाजपा
मणिपूर तर शांत करून दाखवेलच आणि मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भारतीय जनता पार्टीच शांत करेल, उद्धवजी तुमच्या गटात तो दम नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

उपस्थितीत महिला भगिनींना आवाहन करताना ते म्हणाले की,
सहकाराचे काम करताना एकमेकांच्या सहकारणी बना पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सांगतो विरोधकांनी विपर्यास प्रचार केला तर रणरागिनी पण बना. अशावेळी तुम्हाला रणरागिणी बनावेच लागेल कारण खोटं बोलणाऱ्यांच पीक वाढलंय आहे. काळं म्हटलं की सफेद का नाही असं विचारायचं, सफेद म्हटलं की पिवळ का नाही, असं विचारायचं.. तर पिवळा म्हटलं तर लाल का नाही? असं विचारायचं हे उद्योग सुरु आहेत. म्हणून आजूबाजूला विरोधकांचा जो खोटा प्रचार सुरु आहे त्याकडे ही लक्षद्यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या नऊ वर्षात महिलांसाठी संवेदनशील कसे काम करते आहे याचा सविस्तर उहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला.

बरं झालं समान नागरी कायद्याला समर्थन तुम्ही दिले आहे. तोंड देखलं का होईना, उबाठाने समर्थन दिले आहे. पण त्यात माझी विनंती आहे असंच कृषी कायद्याला तुम्ही समर्थन करता म्हणून सभागृहात म्हणालात मात्र बाहेर आल्यावर आणि जनतेत गेल्यावर युटर्न घेतलात. युटर्नचा आजकाल दुसरा अर्थ म्हणजे उद्धव ठाकरे असे लोक बोलू लागलेत.
त्यामुळे तुम्ही समान नागरी कायद्याला समर्थन बोलून दाखवले आहे पण याच्यावर ना जनतेचा विश्वास आहे, ना आमचा विश्वास आहे., असेही आमदार ॲड.
आशिष शेलार म्हणाले.

सहकारातून महिलांचा उद्धार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविल्या आहेत. तळागाळातील महिलांचा आर्थिक विकास हेच भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे.
सहकार क्षेत्रात महिलांचा थेट सहभाग वाढावा त्यांना सहकारातून समृद्धीचा, प्रगतीचा थेट लाभ मिळावा यासाठी आजचे प्रशिक्षण शिबिर महत्वाचे ठरेल. सहकारातूनच महिलांचा उद्धार होईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबिर दादर येथे पार पडले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ. प्रवीण दरेकर, चित्राताई वाघ यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे मोठे क्षेत्र आहे. येणाऱ्या काळात महिलांच्या मदतीने सहकारी चळवळ बळकट केली जाईल.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सहकाराच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये आर्थिक भान आणण्याचे काम केले जात आहे. सहकारातूनच महिलांचे प्रश्न सोडवणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘देना बँक’ आहेत; ‘लेना बँक’ नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला हवं ते मागून घ्या असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. देशाला महासत्ता बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. काँग्रेसच्या काळात महिला सक्षमीकरण झाले नाही. कर्नाटकात काँग्रेसने अभ्यासक्रमातून स्वा. सावरकरांच्या विषयीचा अभ्यासक्रम वगळला आहे. गोहत्या बंदीचा कायदा रद्द करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पंज्याला दिलेले एक मत किती घातक ठरू शकते याची प्रचिती येतेय असेही श्री. बावनकुळे म्हणाले. २०४५ पर्यंत देशाला आत्मनिर्भर करायचे आहे. यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ. प्रवीण दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. अनेकांना ताकद देण्याचे काम सहकारातून झाले आहे. महिलांचा सहकार क्षेत्रात सहभाग वाढावा याकरिता हे शिबिर महत्वपूर्ण ठरणार आहे. कर्तुत्वान महिला पुढे आल्या पाहिजेत त्याच सहकारातून समाजाला ताकद देण्याचे काम करतील असा विश्वास आ. दरेकर यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात महिलांच्या पाच हजार सहकारी संस्थांचे जाळे उभारण्याचा मानस आ. दरेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सहकारी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवून राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला सहकारी बँक उभारणार असल्याचे आ. प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

88 हजार कोटी रुपयांच्या नोट घोटाळ्याची जेपीसीकडून चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

मुंबई-मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून 2016-17 या वर्षात 500 रुपयांच्या 8810.65 दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे 7250 दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच 88 हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या 176 कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, नाशिक, देवास आणि बंगलुरुच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक व देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून थेट रिझर्व्ह बँकेकडे जातात व नंतर बाजारात चलनात येतात, ही प्रक्रिया आहे. मग या नवीन 500 रुपयांच्या नोटा गायब कशा झाल्या? या कारखान्यात छापलेल्या नवीन 500 रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल 88 हजार कोटी रुपये गेले कुठे? हा गंभीर प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे आधीच सांगितलेले आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर 500 व 1000 रुपयांच्या जुना नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. 1660 कोटी नोटा चलनात होत्या पण रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा जमा झाल्या त्यावेळी २ लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्या होत्या, अशी माहिती आहे. नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटा किती छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे.

खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

0

पुणे, दि. १९:खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

इयता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित टक्केवारीप्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल १०० आहे. विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुण- पांघरुण व दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता दिला जातो. वसतिगृहामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष, अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जासाठी व अधिक माहितीसाठी वसतिगृहात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
000

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत अनुदानासाठी गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. १९: जिल्ह्यात सन २०२३ – २४ मध्ये सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यामधून एका गोशाळेस अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव १९ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेवून एकरकमी १५ लक्ष ते २५ लक्ष रुपये मर्यादेत अनुदान देय असणार आहे. योजनेचा मुलभूत उद्देश, देय अनुदान व अर्जाचा विहीत नमुना व अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालय यांचेकडे उपलब्ध आहे.

निकषात पात्र असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील इच्छुक गोशाळा संस्थांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती येथे संपर्क साधून प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी कळविले आहे.
0000

‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या बैठकीअंतर्गत ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञानाच्या सुनिश्चिती’बाबत चर्चासत्रे संपन्न

बहुमाध्यम प्रदर्शन पाहून परदेशी पाहुणे प्रभावित

पुणे, दि. १९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञानाची सुनिश्चिती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राअंतर्गत आज तीन वेगवेगळ्या सत्रात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पहिल्या सत्रात भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, ‘मिश्र पद्धतीने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवण्याचे शिक्षण, दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र’ या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सदस्य चर्चेत सहभागी झाले.

दुसऱ्या सत्रामध्ये ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा अभ्यास घरामध्ये राहून (होम लर्निंग) करताना पालक, मुलांची काळजी घेवून त्यांना सांभाळणारे आणि समुदायातील सदस्यांच्या भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सामाजिक-भावनिक कौशल्ये आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण, याविषयावर वक्त्यांनी विचार मांडले. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राउत यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी गट चर्चेत सहभागी झाले.

तिसरे सत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षा निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. हे चर्चासत्र बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण यावर केंद्रित होते. या सत्रातील चर्चेत ब्रिटन, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), सौदी अरेबिया आणि युनिसेफचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ प्रदर्शनाला प्रतिनिधींची भेट
दरम्यान ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस जोडून आयोजित शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या बहुमाध्यम प्रदर्शनाला प्रदर्शनाला ‘जी-२०’ बैठकीला आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधींनी भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित या प्रदर्शनात भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमात परदेशी प्रतिनिधींनी विशेष रुची दाखविली. भारतातील संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा जगातील इतर देशांना लाभ मिळत असल्याने या क्षेत्रात भारताकडून येणाऱ्या काळात सहकार्य मिळेल अशी अपेक्षा यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली. युनिसेफ, ओईसीडी, स्पेन, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि युएई च्या प्रतिनिधींनी आयुका, एनसीईआरटी, सीबीएसई, गुवी, आयुका, आयसरच्या उपक्रमांची माहिती उत्सुकतेने घेतली.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांबरोबरच भारतीय ज्ञान परंपरेतील बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे. पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.