Home Blog Page 1485

युवक काँग्रेसचे १० ते १२ जुलैला बंगळुरूमध्ये महाअधिवेशन

एहसान खान यांची पत्रकार परिषदेत माहिती; पाच ते सहा हजार युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सहभाग
पुणे : “भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन १० ते १२ जुलै २०२३ या कालावधीत बंगळुरूमध्ये होणार आहे. या महाअधिवेशनची संकल्पना ‘बेहतर भारत की बुनियाद’ अशी असून, पाच ते सहा हजार युवा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून युवक काँग्रेसचे ५००-६०० पदाधिकारी महाअधिवेशनाला जाणार आहेत,” अशी माहिती भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एहसान खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, राष्ट्रीय सरचिटणीस वैष्णवी किराड, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू ठोंबरे, सचिव रोहित बहिरट, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे शहर सचिव सचिन सुडगे आदी उपस्थित होते.
एहसान खान म्हणाले, “भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात हे महाअधिवेशन होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, युवकांचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. २०२४ मध्ये होऊ घातलेली लोकसभा निवडणूक, त्यात युवक काँग्रेसचा सहभाग व युवकांवरील जबाबदारी यासह देशातील विविध समस्यांवर विचारमंथन व्हावे, युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्वाचे आहे. कर्नाटकातून ऊर्जेचा संचार पूर्ण देशभरात होणार असल्याने हे अधिवेशन बंगळुरूमध्ये होत आहे.”
राहुल शिरसाठ म्हणाले, “पुणे शहरातून युवक काँग्रेसची अधिकाधिक ताकद राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. या अधिवेशनाला पुण्यातून ७०-८० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.”

रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘आधार शिबिर’ व ‘डाक जीवन विमा’ विषयक कार्यशाळा संपन्न

पुणे-
डाक सेवेच्या संबंधित सरकारी धोरण आणि सुविधांविषयी जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 19 जून 2023 रोजी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘डाक जीवन विमा’ या विषयावर एक अतिशय महत्त्वपूर्ण कार्यशाळा आणि आधारची माहिती अद्ययावतीकरण व नोंदणीकरण करण्यासाठी ‘आधार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे आणि प्रधान डाक कार्यालय (जीपीओ) पुणे यांच्या द्वारे संयुक्त रूपाने केले गेले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी; पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस आणि अन्य भारतीय रक्षा लेखा सेवेच्या अधिकाऱ्यांद्वारे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर रक्षा लेखा वरिष्ठ उपनियंत्रक श्री ओंकार मोघे आयडीएएस यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप व त्याच्या उपयोगितेविषयी सविस्तर माहिती दिली.
रक्षा लेखा अपर नियंत्रक श्रीमती पनवीर सैनी, आयडीएएस यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाच्या संयुक्त आयोजनासाठी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालय व प्रधान डाक कार्यालय, पुणे यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये या कार्यक्रमामुळे जागरूकता निर्माण होईल आणि त्यांच्यात आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण होईल. आधार शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले की आधार ही या देशातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली आहे आणि त्यामध्ये नागरिकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्वांना या शिबिराचा लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबीयांची माहिती देऊन ‘आधार कार्ड’ अद्ययावत करण्यासाठी प्रेरित केले.
पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस यांनी आपल्या भाषणामध्ये डाक जीवन विमा योजनेच्या संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की पूर्वीच्या नियमाप्रमाणे फक्त केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते, परंतु आता कोणताही पदवीधारक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतो. प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन सुविधासुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी पुढे सांगितले की एक ग्राहक डाक जीवन विमा योजनेच्या आधारावर दहा टक्के सामान्य व्याजदराने कर्ज प्राप्त करू शकतो; जे अन्य बँकांच्या व्याजदरापेक्षा कमी व लाभदायक आहे. डाक जीवन विमा योजना फक्त एक विमा योजना नसून ती गुंतवणूक करण्यासाठी एक हितकर विकल्प आहे. याबरोबरच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या माध्यमातून चार टक्के व्याजदर असा लाभही आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. आधार माहितीचे अद्ययावतीकरण करण्याबद्दल त्यांनी सांगितले की दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक माहितीचे अद्ययावतीकरण करणे बंधनकारक आहे. आधार शिविर आयोजित करण्यासाठी त्यांनी प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी यांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या हेतूविषयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विस्तृत माहिती दिली. डाक विभागाच्या अभूतपूर्व योगदानाची प्रशंसा करत त्यांनी सांगितले की 1884 पासून आजपर्यंत इतक्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये डाक विभागाने जीवन विमा व सामान्य विमाद्वारे अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोककल्याणाचे काम सफलतापूर्वक केलेले आहे. या विभागाने सामान्य नागरिकांना त्यांच्या विषम आर्थिक परिस्थितीमध्ये वित्तीय सहाय्य प्रदान केलेले आहे. कोणत्याही ग्राहकाभिमुख सेवा योजनेचा प्राथमिक उद्देश सामान्य जनतेपर्यंत संतोषजनक रीतीने सेवा पोहोचवणे हे असते. डाक विभागाने हे कार्य कौशल्यपूर्वक साध्य करून दाखविले आहे. त्यांनी पुढे पीएलआय स्कीमविषयी आयोजित कार्यशाळा आणि आधार शिबिराचा लाभ घेण्याचा सल्ला सर्वांना दिला. त्यांनी सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक जागरूकता व चिकित्सक वृत्ती बाळगण्याविषयी सल्ला दिला. शेवटी त्यांनी अशा हितकारक कार्यशाळा भविष्यातही आयोजित करण्याविषयी सर्वांना आश्वासन दिले.
यावेळी डाक विभागाचे पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ अभिजीत इचके, रक्षा लेखा उपनियंत्रक श्रीमती सुनालिनी बोईड, आयडीएएस आणि रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री ऋषिकेश देशमुख,आयडीएएस आयडीएस हे उपस्थित होते. डाक जीवन विमा कार्यशाळेतील सादरीकरणांमध्ये SURAKSHA, SUVIDHA, SANTOSH, SUMANGAL,SURAKSHA व CP यासारख्या अनेक PLI योजनांविषयी विस्तृत माहिती श्री संदीप रेपे यांच्याद्वारे दिली गेली. शेवटी रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री स्वप्निल हनमाने, आयडीएएस यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

सैनिकी मुला- मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २०: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सैनिकी मुलांचे, मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्याच्या वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेसंबंधित माहिती पत्रक व प्रवेश अर्ज पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे २१ जूनपासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी संबंधित वसतिगृहामध्ये उपस्थित राहून सेवानिवृत्तीबाबतचे पुस्तक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र, विधवा ओळखपत्र, ईसीएचएस ओळखपत्र आदी सैन्यातील कागदपत्रे सोबत आणावीत.

विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्यास वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून देण्यात येणार आहे, असेही कळवण्यात आले आहे.
000

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये भरतीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २०:- सैनिकी मुलांच्या-मुलींच्या वसतिगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, इतर नागरिकांनी १० जुलैपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत.

पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक ४ (पुरूष), मानधन २३ हजार २८३ रुपये, स्वयंपाकी ९ (महिला) मानधन १२ हजार ९६२ रुपये, सफाई कर्मचारी ३ (महिला/पुरूष), मानधन १२ हजार १२७ रुपये, माळी १ (महिला/पुरूष) मानधन १२ हजार १२७ रुपये तसेच नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), मानधन २३ हजार २८३ रुपये, स्वयंपाकी ७ (महिला) मानधन १२ हजार ९६२ रुपये, सफाई कर्मचारी २ (महिला), मानधन १२ हजार १२७ रुपये, माळी १ (महिला/पुरूष) मानधन १२ हजार १२७ रुपये अशी पदे भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र.ध्व. क्र. ७०२०४१०९५४) आणि वसतिगृह अधीक्षिका वर्षाराणी कांबळे (भ्र.ध्व. क्र. ९१५६२०३०४५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.

जानेवारी ते मे ५ महिन्यात ८८ हजार १०८ तरुणांना रोजगार दिल्याचा मंत्री मंगल प्रभात लोढांचा दावा

मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये  जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार १०४ रोजगार मेऴाव्यांचे  चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छुक उमेदवारांचा मेऴाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे,तसेच ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनही जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर २८८ समुदेशन सत्र आयोजित केले असून यामध्ये ८४ हजार ८९० उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घेतला आहे अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम् वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे  जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर विभागाकडे ६१ लाख ०६ हजार ०५८ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १० लाख ३७ हजार ७४७, नाशिक विभागात ९ लाख ४७ हजार ७८६, अमरावती विभागात ६ लाख ३५ हजार ९२०,औरंगाबाद विभागात १२ लाख ०५ हजार ६८७, नागपूर विभागात  ८ लाख ५१ हजार ३०१ पुणे विभागात १४ लाख २७ हजार ६१७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जानेवारी ते  ३१ मे २०२३ अखेर कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे यात मुंबई विभागात २३ हजार ६३४, नाशिक विभागात १४ हजार २११, अमरावती विभागात ३ हजार ३६७,औरंगाबाद विभागात १७ हजार ४५१, नागपूर विभागात  १ हजार १६५ ,पुणे विभागात २८ हजार २८० बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरीइच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट

शालेय विद्यार्थ्यांना मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव

पुणे, दि.२०: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा परिसर विद्यार्थ्यांनी जणू फुलून गेला होता…मोठ्या उत्सुकतेने भव्य मंडपात प्रवेश करणारे विद्यार्थ्यांचे चेहरे आत जाताच खुलत होते. खेळणी, इलेक्ट्रॉनिक साधने, उपकरणे, विविध खेळ, व्यायामासोबत ज्ञान, हस्तकला, विविध अभ्यासक्रम आणि कौशल्याची माहिती घेताना होणारा आनंद…आणि रोबोटसोबत मज्जा आणि ड्रोनची करामत… शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देताना जणू शालेय विद्यार्थ्यांनी मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव घेतला.

‘जी-२०’ च्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भेट देऊन माहिती घेतली. शहरातील शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी शिक्षक आणि पालकांसोबत येत आहेत. त्यांना सुलभतेने माहिती घेता यावी यासाठी विद्यापीठातर्फे चांगले नियोजनही करण्यात आले आहे.

प्रदर्शनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयटी मुंबई, मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, एनसीईआरटी, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस, राष्ट्रीय बालभवन अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या संधीविषयी माहिती देण्यात येत आहे. एनसीईआरटीने विविध कौशल्याची माहिती पुस्तके, खेळणी आणि प्रतिरुपांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, ई-लर्निंग, रोबोटिक्स, विज्डम वॉल, फोटो मेमरी, विज्ञानाधारीत मॉडेल्स अशा नाविन्यपूर्ण विषयांची माहिती मिळत असल्याने विद्यार्थी उत्साहाने प्रदर्शनाला भेट देत आहेत. काही विद्यार्थी माहितीवर आधारीत टिपणे घेतानाही पहायला मिळत होते. उत्तराखंड, मिझोरम, आसाम अशा दालनात प्रदर्शित त्या-त्या राज्याच्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही घेत आहेत.

हस्तकला कौशल्य जाणून घेण्याची संधी, अभिनव शैक्षणिक साहित्य, मोबाईलपेक्षाही अधिक आनंद देणारे शैक्षणिक खेळ, सोबत सेल्फी पॉईंट, जी-२० लोगोसोबत प्रदर्शनाची आठवण म्हणून ग्रुप फोटो, उपकरणे हाताळताना ज्ञानाच्या बाबतीत मित्रांशी गमतीदार स्पर्धा यासोबतच विविध उपकरणे हाताळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळत आहे. सोबत आवडते कॉमिक्सही भेट मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिकच उत्साह जाणवतो.

एवढे मोठे शैक्षणिक प्रदर्शन प्रथमच पहात असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यांच्यात दडलेल्या क्षमतेला आणि उत्तमतेला चालना देणारे जग जणू त्यांच्यासमोर उभे राहिल्याचा आनंद या प्रतिक्रियांमधून समोर आला. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणारे विद्यार्थी हस्तकलेविषयी तेवढ्याच उत्सुकतेने विविध राज्याच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारत होते. एकूणच या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिक्षणाचे विस्तारलेले विश्व पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना जी-२० च्या निमित्ताने मिळाली. २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

साईराज कागणे, विद्यार्थी- हस्तकला, घरी बनविलेल्या वस्तू, सायकलींग, विविध कलाप्रकार प्रदर्शनात पहायला मिळतात. प्रदर्शनाला भेट देऊन खूप छान वाटते.

मयुरी मस्करे,ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कुल -या प्रदशर्नातून खूप माहिती मिळाली. भविष्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त् ठरेल. अनेक नव्या गोष्टी समजावून घेतांना मजा आली. आयोजनही खूप छान आहे.

राम मुळे, एसनबीपी स्कुल पुणे -नागालँडची खेळणी आणि उत्तराखंडची बांबूकला खूप आवडली, कॉमिक्सही भेट मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला. हस्तकला प्रकार खूपच सुंदर आहेत. कला आणि तंत्रज्ञानाचा छान संगम आहे.

शालेय विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल पासेसचे वितरण सुरु

पुणे-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील इ. ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक
वर्षाकरिता १०० % अनुदानित मोफत बस प्रवास पास व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते
१० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरु करण्यात आली असून
पासेससाठी दि. १५ जून २०२३ पासून सर्व आगारामध्ये व सर्व पासकेंद्रावर अर्ज वितरीत केले जात आहेत.तसेच भरून दिलेले
अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील
विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून
एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे
शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे
प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी
पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक
कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेस करीता अर्ज वितरण दि.
१५/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येत आहे.
प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पिंपरी चिंचवड मनपाचे
शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ
घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे
अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस साजरा; ‘गुवाहाटी चले जाव’ची घोषणाबाजी

पुणे : ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस साजरा करत आंदोलन करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करत महाविकास आघाडी सरकारमधील ४० आमदार पळून गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. पुढे या चाळीस आमदारांनी महाराष्ट्राशी गद्दारी करत दिल्लीश्वरासोबत हात मिळवणी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यांच्या या गद्दारीची सर्वांना माहिती व्हावी, या हेतूने आजचा दिवस “गद्दार दिवस” म्हणून पाळण्यात आला तसेच या गद्दारांच्या गद्दारीची खरी ओळख जनतेसमोर यावी यासाठी “50 खोके एकदम ओके” हे आंदोलन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे घेण्यात आले,असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले
या आंदोलन प्रसंगी “आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी”..,
“चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव..!”
“महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त.., “पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…””गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!””महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., “
“खोके सरकारचा चालणार नाही थाट गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट…”
“पन्नास खोके, गद्दार ‘Not’ ओके…”
“खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय… “
अशा विविध घोषणांनी जंगली महाराज रस्त्याचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप पुढे म्हणाले की,” नेहमी आपण कुठलाही दिवस साजरा करत असताना आपल्या राष्ट्राला किंवा आपल्या राज्याला अभिमानास्पद अशा गोष्टी ंचा उत्सव साजरा करतो.आजचा दिवस मात्र गद्दार दिवस म्हणून सगळीकडे कूप्रसिद्ध झाला याला कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसोबत गद्दारी करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस गद्दार आमदारांनी सरकार पाडले होते.महाविकास आघाडी सरकारला पायउतार करत हे गद्दार भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले. संपूर्ण देशाला महागाई बेरोजगारीने वेठीस धरणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन यांनी सत्ता स्थापन केली.आजही राज्यातल्या लहान लहान मुलांना सुद्धा “पन्नास खो… म्हणून विचारले तर ते एकदम ओके…..” असं उत्तर देतात.या गद्दारांना यांच्या कामाचा ठसा उठवता तर आला नाही पण त्यांच्या गद्दारीची चर्चा मात्र गेली वर्षभर अव्यातपणे सुरूच राहिली.महाराष्ट्रात गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर हे गद्दार कुठेतरी राज्याच्या हितावह काम करतील अशा अपेक्षा असताना यांनी मात्र फक्त दिल्लीवाऱ्या केल्या राज्यात येणारे उद्योग गुजरातला नेले, राज्यात येणारा रोजगार गुजरातला नेला. कुठल्याही प्रकारचा मोठा उद्योग राज्यात आणता आला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हे सरकार गेल्या वर्षभरात सपशेल अपयशी ठरले.चर्चा होत राहिली फक्त खोक्यांची. येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेने सज्ज व्हावे” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यानिमित्ताने केले.
आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड,बाळासाहेब बोडके, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, राकेश कामठे, सुषमा सातपुते , महेश हांडे, उदय महाले, राजू साने, अर्चना कांबले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, आता पश्चात्ताप करून फायदा नाही- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर 

मुंबई-पालघरमधील साधू हत्याकांडाचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर तिखट हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असे ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणालेत.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचे काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केले आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपली विचारसरणी सोडून अशा विचारसरणीला जवळ केले तिला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोध करत होते. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा? असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगाने मान्य केले आहे की जगातल्या 160 देशांना औषध व लस पोहोचवण्याचे काम भारताने केले आहे. देशात 220 कोटी लसी मोफत देण्याचे काम मोदींनी केले आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे

उद्धव ठाकरेंनी तर त्या पक्षाशी हातमिळवणी केली, जो देशावरील हल्ल्यानंतर मौन बाळगून होता. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला. तुम्ही तर त्यांच्याशी हातमिळवणी केली, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर सैन्याच्या वीर जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असंही ठाकूर म्हणाले

उद्धव ठाकरेंनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी पालघरमधील साधू हत्याकांडाचा मुद्दा मांडला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले, त्यांची हत्या झाली. ज्याच्या सत्ताकाळात साधूसंतांच्या बाबतीत हे असे प्रकार झाले, त्याला तर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात धुमश्चक्री

पुणे-येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात जोरदार मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी एकूण 15 कैद्यांच्या विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रणव अर्जुन रणधीर, प्रकाश शांताराम येवले, विजय चंद्रकांत वीरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनील साळुंखे, श्री गणेश वाघमारे, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे,आदित्य नानाजी चौधरी, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, मेहबूब फरीद शेख, शुभम गणपती राठोड, अनराग परशुराम कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांनी या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, येरवडा कारागृहातील मध्य भागात सर्कल क्रमांक तीन आणि बराक क्रमांक 8 मध्ये कैद्यांचा दोन गटामध्ये झालेल्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार घडला. या मारहाणीत दगड, तसेच पत्र्याच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. कैद्यांमध्ये पळापळ झाली.

दरम्यान कारागृहातील सुरक्षारक्षकांनी तातडीने धाव घेत वाद घालणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे करत संबंधित ठिकाणी शांतता प्रस्थापित केली. येरवडा कारागृहातील बराकीत वर्चस्वाच्या वादातून संबंधित मारहाणीचा प्रकार घडल्याचा संशय आहे. येरवडा कारागृह प्रशासनाकडून पोलिसांकडे याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे( ̈8805179775)पुढील तपास करत आहेत.

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वाहतूक पोलीस आणि महापालिकेला निर्देश

गरवारे महाविद्यालयाजवळ पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

पुणे-कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल दिले‌. तसेच, गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरपुडे उपस्थित होते.

कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटीदरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने या पूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी होती. मात्र, २०१८ मध्ये या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलासाठीही काम सुरू झाले. सदर दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने आज महापालिकेत बैठकीत होऊन सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार संभाव्य वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी; असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌.

तसेच, भविष्यातील वाहने पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी ‘पे ॲन्ड पार्क तत्वावर’ वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने याची व्यवस्था उभी करावी, अशी सूचना ही नामदार पाटील यांनी आजच्या बैठकीत दिली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निर्णयावर सर्व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांच्या मानधनाचा शासन आदेश तातडीने लागू करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे-पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण सेवकांच्या मानधनासंदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌. तसेच, महापालिकेने ९३ शिक्षण सेवकांसदर्भातील नगरविकासकडे पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा करु, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.‌ या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल‌ खेमनार, शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह शिक्षण सेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये २००९ आणि २०११ मध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली होती. सदर शिक्षण सेवकांच्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील शासन आदेश राज्यभर लागू करण्यात येत आहे. सदर शासन आदेशाची तातडीने अंमलबजावणी करुन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले.

तसेच, ९३ शिक्षण सेवकांना सेवेत नियमीत करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करुन, लवकरच शिक्षण सेवकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

चंद्रशेखर आजादांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आपली : सुधीर मुनगंटीवार

| हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला भेट

चंद्रशेखर आजाद नगर, (जि.अलिराजपूर, मध्य प्रदेश) , दि. 20 जून 2023:

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतीकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आजाद यांच्या स्मारकातून मी प्रचंड ऊर्जा घेऊन परत जात आहे, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या अमर हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला सोमवारी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. ना.श्री सुधीर मुनगंटीवार सध्या मोदी@9 महासंपर्क अभियानासाठी मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदीवासी बहुल भागातील भापरा (चंद्रशेखर आजाद नगर) येथील हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला स्थानिक जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांसह सोमवारी भेट दिली. चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी या स्मारकात असलेल्या चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनावरील चित्र व छायाचित्र प्रदर्शनला भेट दिली. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बोलतांना त्यांनी भारावून गेल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी बोलतांना ना.श्री मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रशेखर आजाद हे अनेक क्रांतिकारकांची प्रेरणा होते. अत्यंत गरीबीत जन्मलेल्या चंद्रशेखर आजाद यांनी शाळेत असल्यापासूनच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आजाद होते. त्यांच्या या जन्मस्थळाला भेट दिल्यावर प्रचंड ऊर्जेचा शक्तिसंचार झाल्याचा अनुभव मी घेत आहे. आजाद यांच्यासारख्या शेकडो हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य आणि लोकशाही अनुभवत आहोत. देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या या अमर हुतात्म्यांचे आपल्यावर मोठे ऋण आहे. आता त्यांच्या स्वप्नातील भारतीय सुराज्य निर्माण करण्याचे उत्तरदायीत्व आपल्यावर आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जनामस्थळ स्मारकाच्या या भेटीच्या वेळी मध्य प्रदेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष श्री माधोसिंग डावर यांच्यासह अलिराजपूर जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्य शासनाचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मात्र, आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या ‘आयआयटी’ येथे या मिशनची सुरूवात करण्यात यावी, नंतर यामध्ये अधिक सुसुत्रता आणण्यात यावी. शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण याद्वारे संनियंत्रण करु शकतो. शेती क्षेत्रासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे तसेच यासंदर्भातील आदर्श कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

‘आयआयटी’चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी सादरीकरण केले. जागतिक दर्जाचे ड्रोन हब तयार करणे, मुख्यालय स्थापन करणे, त्याचे विकेंद्रीकरण करणे, या सर्व यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ड्रोन पोर्ट तयार करणे, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे, एकात्मिक यंत्रणा उभारणे, ही कामे याअंतर्गत करण्यात येतील. विविध क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडू शकतात. उद्योग क्षेत्रालाही याद्वारे चालना मिळेल, रोजगार निर्मितीलाही याद्वारे चालना मिळू शकेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने ठेकेदाराला मारहाण केल्याच्या चर्चेने खळबळ

पुणे : काम करण्यापूर्वी आम्हाला भेटला का नाही..? अशी विचारणा करत महापालिकेच्या ठेकेदाराला भाजपच्या महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार महापालिकेत चर्चिला जातो आहे . मात्र या तथाकथीत पदाधिकाऱ्याचे किंवा ठेकेदाराचे नाव कोणी स्पष्ट घेईनासे झाले आहे. यामुळेच , मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण वाढू नये याची दक्षता घेण्यात आली असून या प्रकरणी पालिका प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे,महापालिकेत गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या करण्यात येत असलेल्या आरोपांचे असे प्रकार पुरावेच असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.

काही अधिकारी आणि कर्मचारी हे टार्गेट केले जात असून प्रशासकीय पातळीवर देखील त्यांना आधार मिळेनासा झाल्याचे यामुळे दिसून येते आहे. दक्षिण पुण्यात तर दादागिरी आणि दहशत निर्माण करून ठेवल्याचे सोशल मिडिया तून देखील स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी फक्त भाजपच नाही तर अन्य काही राजकीय माजी लोकप्रतिनिधीं स्वतःच पण कार्यकर्त्यांचे नवे पुढे करून ठेकेदार बनलेले आहेत. आणि जिथे ते नाहीत अशा ठिकाणी अन्य ठेकेदारांना दहशतीला तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व सर्वांना ठाऊक असले तरी पुढे यायला मात्र कोणी तयार होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा समान पाणी योजना हा महत्वांकांक्षी प्रकल्प असून तो आधीच उशीर झाल्याने महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला फटका बसेल म्हणून तो वेगाने पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाकडून शहरभर खोदाईसाठी बंदी असतानाही समान पाणी योजनेसाठी पावसाळयातही जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाईस सहमती दिली आहे. त्यानुसार, जलवाहीनीचे काम मिळालेल्या कंपनीने एका सब कॉन्ट्रॅक्‍टरकडे हे काम दिले आहे. महापालिकेस सूचना देऊन मार्केटयार्ड परिसरात हा ठेकेदार खोदाई सुरू करण्यास गेला होता.

त्यावेळी महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारास काम करण्यास मनाई केली. तसेच, आमच्या साहेबांना का भेटला नाही.. कामाची कल्पना का दिली नाही अशी विचारणा केली. मात्र, आता महापालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्याने तसेच पदाधिकारीपदही नसल्याने या ठेकेदाराने “मी तुमच्या साहेबांना ओळखत नाही.. ” असे सांगत काम सुरूच ठेवले. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांसह ठेकेदाराला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकारण आंगलट येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी हे प्रकरण मिटविण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची चांगलीच चर्चा महापालिकेत रंगली असून, “या पूर्वी याच ठेकेदाराने साहेबांना भेटून काम होते तेव्हा या साहेबांनी या ठेकेदाराचे कौतुक केले होते. मात्र, अचानक काय झाले अशी चर्चा प्रशासकीय वर्तूळात रंगली आहे.