Home Blog Page 1484

जीवनाला कंटाळून पत्नी, दोन मुलांची हत्या करत दौंडमध्ये डॉक्टरने स्वत:लाही संपवले

पुणे-जीवनाला कंटाळून डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांचा खून करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे मंगळवारी घडली. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (४२) आणि पत्नी पल्लवी दिवेकर (३५) यांचे मृतदेह घरात छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. मुलगा अद्वित अतुल दिवेकर (११) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (७) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत.

डॉ. दिवेकर हे गुरांचे डॉक्टर,तर त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका होती, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली असून त्यात “जीवनाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे.मुलांना जगताप मळ्यातील विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली आहे. आमच्यानंतर मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना मारले आहे. या गोष्टीस सर्वस्वी मी जबाबदार आहे,’ असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

डॉ. दिवेकर यांच्या घराजवळ विहीर असून ती जवळपास १० परस इतकी खोल आहे. तीत ४५ फूट एवढे पाणी होते. त्यामुळे बुडालेली मुले वर काढण्यात मोठी अडचण आल्याचे सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दौंड पोलिस याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

महिला आमदाराने महापालिका अधिकाऱ्याच्या कानफाडात लगावली

मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कॉलर धरत कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या प्रकरणाची संपूर्ण माहिती अशी की, मनपाच्या अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते. त्या पथकात मनपाचे अभियंताही सहभागी होते. यामुळे संतपालेल्या आमदार गीता जैन यांनी त्यांची कानउघडणी करत त्याच्या श्रीमुखात भडकवली आहे.

आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर कारवाई करण्यासाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचे काम करता, तुम्ही माणसे आहात की राक्षस? असा सवाल आमदार जैन यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

आमदार बोलत असताना मनपाचे अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीता जैन यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी थेट कॉलर धरत त्यांच्या थेट श्रीमुखात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत, असे आहेत शासन आदेश आहेत, असेही त्यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.

‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!

मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ!

एका विलक्षण कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल परब करीत आहे. त्यांनी ‘सून माझी भाग्याची’, ‘छावणी’, ‘चंद्री’, ‘पहिली भेट’ या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘दिल मलंगी’ या महत्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त मुंबई, मढ येथील ‘शनाया’ या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी, नारायण जाधव, विनम्र भाबल, निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे, दिग्दर्शक सुनिल परब यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची कथा प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सरळमार्गी, स्वप्नाळू सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं…पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ ह्या संकल्पने वरचा त्याचा विश्वास उडतो… साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर तो ‘ग्लोबल ट्रान्स मिडिया’ या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैंनदिन धक्काधकीच्या प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते… उत्कंठा शिगेला पोहोचविणारी ही फँटसी मनोरंजनाचं अनोखं सरप्राईज असणार आहे. 

दिल मलंगींच्या मुहूर्त प्रसंगी अभिनेता चिन्मय उद्गीरकर म्हणाला, “मी इतक्या मालिकांमधून, चित्रपटातून काम केलंय… लव्हस्टोरीज मधनं काम केलंय पण ‘दिल मलंगी’ चित्रपटाच्या माध्यमातून जी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे ती माझ्या करिअरमधली पहिली हटके लव्हस्टोरी आहे. अशक्य वाटावी अशी ही प्रेमकथा आहे.” चित्रपटाची नायिका अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर म्हणते, “मला मेकअप तसाही कमी करायला आवडतो. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात माझी भूमिकाच अशी आहे की तिथं ‘नो मेकअप लूक’ हा सध्याचा ट्रेन्डिंग लूक मला कॅी करायला मिळणार आहे. जे अगदी माझ्या मनासारखं पहिल्यांदाच घडतंय.”, तर अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली, ”मी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होणार..” 

‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ अत्यंत मनमोहक कथा ‘दिल मलंगी’ची असून आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक संदेशाची खुसखुशीत झालर असलेले हे मनोरंजन करण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम ऍक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. आघाडीचे लेखक स्वप्निल गांगूर्डे यांची कथा असून पटकथा – स्वप्निल गांगूर्डे, प्रथमेश शिवलकर तर संवाद ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उदगीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, अपूर्वा गोरे, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ आणि सुनिल परब दिग्दर्शित ‘दिल मलंगी’ या चित्रपटाचा भव्य कॅनव्हास डीओपी नाना खेडकर आणि सचिन लोखंडे यांच्या सिनेमॅटिकल नजरेतून दिसणार आहे. तो सजविण्यासाठी कलादिग्दर्शक समीर चिटणवीस यांचे सहयोग लाभले आहे. अभिनयासोबतच कार्यकारी निर्मितीची सूत्रे संजीव सत्यविजय धुरी सांभाळत असून निर्मिती व्यवस्थापन दीपक शिंदे यांच्या हाती आहेत. वेशभूषा वंदना राय करीत आहेत तर प्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर अझीम भाई शेख यांनी उत्कंठावर्धक स्टंट्स डिझाईन केले आहेत. चित्रपट अधिक गतिवान करण्याची किमया संकलक संजय लोखंडे साधणार आहेत. प्रसिद्ध जाहिरात संकल्पनाकार सचिन डगवाले या चित्रपटाच्या जाहिरात प्रसिद्धीचे डिझाईन करीत आहेत. राहुल काळे या युवा गीतकाराने दिल मलंगीतील गीतरचना केली असून ‘इंडियन आयडॉल’ फेम युवा गायक आशिष कुलकर्णी यांनी संगीतकार म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. लोकप्रिय गायिका आनंदी जोशी, कविता राम, आशिष कुलकर्णी इत्यादी गायकांचा सुरेल स्वर बहार आणणार असून प्रख्यात नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे त्यावर साजेसे नृत्याविष्कार चढवणार आहेत.

सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद; जनजागृतीद्वारे सलोखा योजना गतिमान करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

मुंबई :  सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आगामी काळात गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमांद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सलोखा योजनेंतर्गत राज्यभरात सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. तर पुणे आणि ठाणे विभागात प्रत्येकी १७ एवढ्या दस्त नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात १२, नाशिक विभागात १०, औरंगाबाद विभागात ९, लातूर विभागात ८ एवढ्या दस्त नोंद झालेली आहे. राज्यात एकूण १४९ दस्त नोंद झाली असून योजनेतील सवलतीनुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क असे अनुक्रमे १ लाख ४९ हजार २०० एवढे प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेतीमधील वहिवाटीसंदर्भात गावपातळीवर पिढ्यानपिढ्या वादाचे विषय सामंजस्याने मिटवितानाच गावात सलोखा राखण्याच्या दृष्टीने महसूल विभागाच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सलोखा योजनेसारखा व्यापक जनहिताचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला. शेतजमिनीचा ताबा एका शेतकऱ्याकडे व अभिलेख दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या प्रकरणी सहमतीने अदलाबदल करुन अभिलेख दुरुस्त करण्याच्या उद्देशाने शासन निर्णयान्वये सलोखा योजना प्रत्यक्षात दि. ३ जानेवारी २०२३ पासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत नोंद होणाऱ्या अदलाबदल दस्तावर मुद्रांक शुल्कासाठी १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये अशी नाममात्र रक्कम ठेवण्यात आली होती.

महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल असून सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, शेतकरी बांधव वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत राहतात म्हणून जनहित डोळ्यासमोर ठेवून महसूल विभागाने सलोखा योजना सुरु केली. या योजनेमुळे समाजात सलोखा निर्माण होण्यास, एकमेकांतील सौख्य, शांतता आणि सौहार्द वाढण्यास मदतच होणार आहे. गाव तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने स्थानिक प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमांद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई दि.२०- पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चाफेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

यावेळी श्री. प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.

संगीतमय मेघदुताने साजरा झाला आषाढाचा पहिला दिवस

पुणे : महाकवी कालिदास रचित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित मेघदूत या महाकाव्यावर आधारित  काव्य, स्वर आणि ताल या त्रिबंधातील ‘संगीत मेघदूत’ सांगीतिक महोत्सवाने आषाढाचा पहिला दिवस साजरा झाला. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे सदाशिव पेठेतील नारद मंदिरात हा श्रवणीय कार्यक्रम आयोजिला होता. दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वनस्पती शास्त्रज्ञ व कवी डॉ. मंदार दातार आणि संगीतकार अमोल काळे यांच्या कल्पनेतून ‘संगीत मेघदूत’ साकार झाले आहे. कार्यक्रमात अमोल काळे, विजय काळे, स्वामिनी कुलकर्णी यांनी गायन केले. गायनासह स्वामिनीने सिंथेसायझरवर पार्श्वसंगीत दिले. महेश कुलकर्णी, रुद्र जोगळेकर व अनघा फाटक यांनी तबल्याची साथसंगत केली. तालवाद्द्यावर ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी यांनी साथ केली. यक्ष वाचन गौरव बर्वे यांनी केले.
मेघदूतातील अनेक श्लोकांना अनेक रागांमध्ये संगीतबद्ध करतानाच त्यातील अर्थ लक्षात घेऊन अनेक तालवाद्यांचाही वापर केला होता. त्यामुळे श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद कार्यक्रमाला मिळाली. अमोल काळे यांच्या सर्व चालीतून गीत रामायणाची आठवण करून देणाऱ्या, तर दातार यांची संहिता संपूर्ण मेघदूत महाकाव्य उलगडणारी असल्याची प्रतिक्रिया रसिकांनी दिली. 

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम – २०२४ जाहीर

मुंबई, दि. २० : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यामध्ये पूर्व -पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष  येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी ॲप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण दि. 01 जून, 2023 (गुरुवार) पासून ते दि. 20 जुलै, 2023 (गुरुवार) असेल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 21 जुलै, 2023 (शुक्रवार) ते दि. 21 ऑगस्ट, 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग  यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे दि. 22 ऑगस्ट, 2023 (मंगळवार) ते  दि. 29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार) नमुना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे, दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार) ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार) असा कार्यक्रम आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमात एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार) ते  दि. 30 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी, मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, दि. 26 डिसेंबर,2023 (मंगळवार) पर्यंत, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे दि. 05 जानेवारी, 2024 (शुक्रवार) दि.21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन पडताळणीसाठी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांचा तपशिल घेण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोबत एक बूथस्तरीय एजंट (BLA), नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  हे नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 ऑक्टोबर, 2023 रोजी पात्र असलेले),संभाव्य मतदार (01 जानेवारी, 2024 रोजी पात्र होणारे),संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती  ही माहिती गोळा करणार आहेत.

अर्जदार नमुना अर्ज क्र. ६ व नमुना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. तथापि, आधार कार्ड क्रमांक कळविला नाही किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमुना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून  1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यात  सध्या वयोगटनिहाय अंदाजे  असलेली मतदार संख्या  आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार  नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.

१८ ते १९ वयोगटातील  ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०,

२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१,

३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०,

४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३

५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१

६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१

७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८

८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६  प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८

वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.

गणेशोत्सवासाठी टिळक पुतळा मेट्रोचे काम १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा – आमदार रवींद्र धंगेकर

पुणे : गणेशोत्सव. दहीहंडी, श्रावण महिना इ.  सणांचे दिवस जवळ आले आहेत. यामुळे मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील मेट्रोचे काम येत्या १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे असे आवाहन आमदार रवींद्र धंगेकर आणि प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. 

पुणे शहरातील मानाचे गणपती यांचे प्रमुख, पुणे मेट्रोचे अधिकारी  यांच्या बरोबर टिळक पुतळा ते मंडई परिसरामध्ये पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गणेश मंडल, छोटे व्यापारी व घटकांच्या अडचणीवर सारविस्तार चर्चा झाली. त्यावर उपाय योजना काय असाव्यात, काय कराव्यात याबद्दल सुद्धा कालबद्ध वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या अॅड. रुपाली ठोंबरे पाटील, बाळासाहेब मारणे, प्रवीण परदेशी, महेश सूर्यवंशी, भोळा वांजळे, विकास पवार, प्रसाद कुलकर्णी, सुरेश कांबळे आदि या भेतीप्रसंगी उपस्थित होते.

सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाप्रती केंद्र सरकार समर्पित – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

मुंबई, 20 जून 2023

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर मुंबई भेटीसाठी आले आहेत. मुंबई दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, आज, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्यकला गुरू डॉ.संध्या पुरेचा आणि सुप्रसिद्ध मराठी हिंदी सिने आणि नाट्य अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांमध्ये सरकारने केलेल्या अभूतपूर्व कार्यांची माहिती दिली. सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाप्रती केंद्र सरकार समर्पित असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना त्यांच्या निवासस्थानी भेटल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी त्यांना केंद्र सरकारने केलेल्या कार्यांची नोंद असलेली पुस्तिका भेट म्हणून दिली. या प्रसंगी वंदना गुप्ते म्हणाल्या की माझ्यासाठी ही अत्यंत अनोखी आणि आनंददायी भेट होती. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. चित्रपट क्षेत्राप्रमाणेच नाट्य क्षेत्राला देखील उद्योगाचा दर्जा दिला जावा, जेणेकरुन या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती देखील त्यांच्या हक्कांची मागणी करू शकतील असे वंदना गुप्ते यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या गेल्या 9 वर्षांतील यशस्वी कामगिरीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची भेट घेतली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज डब्ल्यू 20च्या अध्यक्ष आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित नृत्यकला गुरु डॉ.संध्या पुरेचा यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान ठाकूर यांनी डॉ.पुरेचा यांना केंद्र सरकारने केलेल्या कार्यांची नोंद असलेली पुस्तिका भेट म्हणून दिली. या भेटीबाबत बोलताना डॉ.संध्या पुरेचा म्हणाल्या की केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांना ‘मन की बात’ वर आधारित पुस्तक भेट म्हणून दिले आणि डॉ. पुरेचा यांनी पाचवा वेद म्हणून प्रसिध्द असणारी नाट्यशास्त्र भाषांतरविषयक पुस्तके केंद्रीय मंत्री ठाकूर यांना भेटीदाखल दिली. डब्ल्यू-20 अध्यक्ष म्हणून डब्ल्यू-20 पत्रकाबाबत आम्ही चर्चा केली. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष या नात्याने भारतीय कला आणि संस्कृती यांतील तरुणांच्या सहभागाबाबत देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती डॉ.पुरेचा यांनी दिली. त्या म्हणाल्या की समाज आणि समुदाय यांच्या हिताच्या संदर्भात विस्तृत चर्चा झाली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित नृत्यकला गुरु डॉ.संध्या पुरेचा यांची भेट घेतली

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे: दि.२०: ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅट्रिअना जॅक्सन, सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थितीत होते.

या परिषदेला ४७ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेले महत्वाचे घटक यानिमित्ताने जागतिक स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र येतात. त्यासोबतच स्थानिक स्तरावर महाविद्यालयांशी निगडित बाबींवरही चर्चा होते. कोविड, आर्थिक आणि भुराजकीय समस्या, शिक्षणाची उपलब्धता आणि समान संधीची वाढती मागणी, ऑनलाईन शिक्षणाची तातडीची गरज, पर्यावरण बदल आणि तंत्रज्ञान विषयक समस्या हे आजचे वास्तव आहे . या बदलत्या शैक्षणिक वातावरणावर व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा पुण्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत. पुण्यात १५ विद्यापीठे आणि ४५० पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शहर असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आजपर्यंत ६ लाखांहून अधिक विद्यार्थी देशातील सर्व राज्यांतून तसेच ८५ वेगवेगळ्या देशांतून येथे आलेले आहेत. यामुळेच शहरामध्ये लक्षणीय रोजगार निर्माण झालेला आहे. परिणामी पुण्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. विद्यापीठांच्या माध्यमातून बहुशाखीय आणि विद्यार्थ्याला सक्षम बनविणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. श्रृंगला म्हणाले, ‘जी-२०’ च्या अंतर्गत राबविण्यात येणारा जनभागीदारी हा लोककेंद्रीत कार्यक्रम असून त्याचा पाया ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ आहे. या जनभागीदारीमध्ये एकूण २ कोटी ३० लाख व्यक्तींनी सहभाग नोंदवलेला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जी-२० परिषदेच्याच्या बैठका अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत आहेत. पुढील दोन महिन्यांत आणखी काही बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. जी-२० संवाद आणि ‘युनिव्हर्सिटी २०’ परिषद या दोन्ही मध्ये समन्वय असल्याचे देखील श्री. श्रृंगला म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅक्सन म्हणाल्या, ‘युनिव्हर्सिटी-२०’ कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा हा सुवर्णकाळ आहे. उच्च शिक्षणासाठी दोन्ही देशांचा परस्पर सहकार्याचा इतिहास आहे. दोन्ही देशांसाठी शिक्षण हे सर्वात आश्वासक क्षेत्र आहे. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया १०० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, विज्ञान आदी विषयांच्या अभ्यासासाठी भारतात पाठवणार आहे, असेही श्रीमती जॅक्सन म्हणाल्या.

डॉ. मुजुमदार म्हणाले, देशातील विद्यापीठांनी शिक्षणात आधुनिक शिक्षणात मानवी मूल्यांचा तसेच नैतिक शिक्षणाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाबरोबरच दर्जेदार नैतिक शिक्षण देणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. विद्या येरवडेकर आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी प्रास्ताविक केले.

या परिषदेची संकल्पना ‘विद्यापीठांचे भविष्य- जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनविण्यासाठी विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका’ अशी आहे. परिषदेला विविध देशातील विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

तळजाईलाही वाहनांची मोडतोड …

पुणे- पुण्यातील वारजे परिसरात कोयते हातात घेऊन एका टोळक्याने सार्वजनिक रस्त्यावर सात ते आठ वाहनांची तोडफोड केल्याची घटना धक्कादायक घटना घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी पुण्यातील सहकारनगर परिसरातील वनशिव झोपडपट्टी परिसरात एक टोळक्याने रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या तब्बल 30 वाहनांची तोडफोड करत धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ण्यातील तळजाई परिसरात वनशिव झोपडपट्टी परिसरात मंगळवारी सकाळी तोंडाला रुमाल बांधून सहा जणांचे टोळके आले होते. संबंधित टोळक्याने रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकी, तीन चाकी टेम्पो, कार आदी वाहनाचे काचा फोडून तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत संबंधित आरोपींचा शोध सुरू केला आहे .दरम्यान पुण्यातील कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाल्याचे या निमित्ताने दिसून येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कोयता टोळीच्या दहशतीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे आणि पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केलेली आहे.

कॅम्पात देखील भाईगिरी, कोयते घेऊन दहशत पसरविणाऱ्या १५ जणांवर गुन्हे दाखल

पुणे- कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस जवळील पुना काॅलेज गेट परिसरातील रस्त्यावर एका टाेळक्याने हातात काेयते घेऊन ती हवेत फिरवत दहशत पसरवून ‘आम्ही इथले भाई आहे, आमच्या नादी लागू नका’ असे म्हणत तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अ‍ॅलेक्स गवळी व त्याच्या 10 ते 15 साथीदारांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अनिरुध्द अनिल जगताप (वय-25,रा.कॅम्प,पुणे) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 19 जून राेजी रात्री सव्वाबारा ते साडेबारा वाजण्याचे दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे कॅन्टान्मेंट येथे अतिक्रमण विभागात कामास आहे. साेमवारी रात्री तक्रारदार हे त्यांचा भाउ पंकज जगताप, मित्र साहिल व काैस्तुभ असे बाेलत थांबलेले हाेते. त्यावेळी पाच ते सहा दुचाकीवर त्याठिकाणी तक्रारदार यांचा ओळखीचा अ‍ॅलेक्स गवळी व त्याचे 10 ते 15 साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने त्यांचे हातातील घातक हत्यारे घेऊन येऊन त्यांना गाडया आडव्या लावून पार्क करुन पाठलाग केला. आराेपी गवळी याने ‘यांना जिवंत साेडू नका’, ‘जिवे ठार मारुन टाका‘ असे म्हणत तक्रारदार यांचे डाेक्यात काेयत्याने मारुन गंभीर जखमी करत तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तावडीतून तक्रारदार सुटका करुन पळून जात असताना, त्यांचे गळयातील साेन्याची चैन काेठेतरी पडून गहाळ झालेली आहे. तर त्यांचे चुलत भाऊ पंकज जगताप यांना देखील आराेपींनी हातावर, दंडावर, डाेक्यास काेयत्याने मारुन जखमी केले आहे. तसेच आराेपींनी त्यांचे हातातील हत्यारे फिरवत सदर परिसरात दहशत निर्माण केली. आम्ही इथले भाई आहे, आमचे नादी लागू नका असे म्हणत तेथून निघून गेले आहे. तक्रारदार यांचा मित्र साहिल याचे पाठीस व उजव्या पायावर देखील आराेपींनी काेणत्यातरी हत्याराने मारुन त्यांना जखमी केले आहे तर काैस्तुभ याचे पाेटात मारुन जखमी केले आहे. याबाबत पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.

 महिलेचा नग्न व्हिडिओ कॉल अन ताेतया दिल्ली सायबर पोलिस..आंबट शौकिन तरुणाला घातला ७ लाखाचा गंडा

पुणे-दक्षिण पुण्यातील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका 33 वर्षीय तरुणाला एका महिलेने स्वत: नग्न व्हिडिआे काॅल करुन संबंधित तरुण ते पाहत असल्याचे स्क्रीनशाॅट काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली.

मात्र, त्यानंतर दिल्ली येथून एका ताेतया सायबर पोलिस अधिकाऱ्याचा फाेन येवून त्याने संबंधित फसवणुक करणाऱ्या महिलेचा शाेध घ्यावयाचे असल्याचे सांगत पैशाची मागणी करुन तरुणास सात लाख 14 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अज्ञात पाच माेबाईल क्रमांक धारक आराेपी विराेधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरचा प्रकार 9/2/2022 ते 14/5/2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणास प्रथम एका महिलेने स्वत: नग्न व्हिडिओ काॅल केला. सदरचा काॅल सुरू असतानाच तक्रारदार तरुण ते पाहत असल्याचे त्याचे स्क्रीनशाॅट महिलेने काढून संबंधित स्क्रीनशाॅट व व्हिडिओ त्याचे मित्रांना पाठवते अशी धमकी देत पैशाची मागणी केली. त्यानंतर एका अनाेळखी व्यक्तीने तरुणास फाेन करुन ‘मी दिल्ली सायबर आयुक्त श्रीवास्तव बाेलत आहे. सदर फसवणुक करणाऱ्या महिलेचा तपास करावयाचा आहे, असे सांगत पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्याकरिता वेगवेगळी कारणे सांगून वेळाेवेळी एकूण सात लाख 14 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक करण्यात आलेली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहे.

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये हि क्षमता नाही : बच्चू कडू यांचे विधान

मुंबई- राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे या सरकारमधील अनेक इच्छूक आमदार नाराज झालेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून येते. आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला आहे.गतवर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले होते. यामुळे अल्पमतात आलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. या घटनेला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असे आम्हाला वाटले नव्हते. या सरकारने काही चांगली कामे केली. त्यामुळे मी नाराज नाही. पण आता मंत्रिमंडळ विस्तार 2024 मध्येच होईल असे वाटत आहे. मी यापूर्वीही हा दावा केला आहे. या सरकारमध्ये ती क्षमता नाही, असे बच्चू कडू यासंबंधी बोलताना म्हणाले.यावेळी त्यांनी गद्दार म्हणून हिणवऱ्यांना न्यायालयात खेचण्याचाही इशारा दिला. ते म्हणाले – आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. याप्रकरणी मानहाणीचा दावा दाखल केला जाईल. आम्ही विकासासाठी त्यांच्यासोबत गेलो. उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.

टिफीन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी लुटला संवादाच्या देवाण घेवाणीचा आनंद

पुणे- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज कोथरूड मध्ये माजी खासदार प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टिफीन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी संवादाच्या देवाण घेवाणीचा आनंद लुटला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व राबविले जात असून, या अंतर्गत देशभर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमध्ये देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये टिफीन बैठकीच्या माध्यमातून एकत्रित येऊन वैचारिक देवाणघेवाण होते आहे.

आज भाजपा कोथरुड मंडलाच्या वतीने वृंदावन बॅंक्वेट येथे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर, पुणे शहर प्रभारी तथा माजी खासदार अमर साबळे, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या टिफीन बैठकीत सहभागी झाले होते. प्रत्येकांनी आपापल्या घरातून टिफीन आणून, सर्वांसह जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील लोकोपयोगी योजनांसह अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला.

याप्रसंगी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब आहे. लाखो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहे. २०१४ साली देशात नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात एक नवीन पर्व सुरू झाले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजनांमुळे देशातील सर्व जनता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा काळ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व म्हणून घोषित केला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. टिफीन बैठक त्यापैकीच एक असून, टिफीन बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या टिफिनमधील पदार्थांच्या देवाण-घेवाणीसह मोदींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करत आहेत. आजचा हा उपक्रम म्हणजे सर्वांसाठी वैचारिक मेजवानीच होती, अशी भावना यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या काळात गरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम आणि योजना राबविल्या. त्यामुळे गरीब जनतेचे जीवनमान उंचावले आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील लोककल्याणकारी योजना ज्या भागात पोहोचल्या नसतील; त्या भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत‌. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क केला पाहिजे. तसेच, आगामी काळ हा निवडणुकांचा काळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीकोनातून ही तयार राहिले पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.