Home Blog Page 1483

“पंतप्रधान मोदींचं स्वागत करा, पण भारतातले चिंतेचे विषय देखील मांडा …”, अमेरिकेतल्या ७५ खासदारांचं जो बायडेन यांना पत्र

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल (२० जून) ते अमेरिकेसाठी रवाना झाले. या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर तीन बैठका घेणार आहेत. यामध्ये एक खासगी बैठक आणि एका डिनरचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही ते जाणार आहेत. तसेच, युएस काँग्रेसच्या नेत्यांकडूनही मोदींचं स्वागत केलं जाणार आहे.

. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेतील ७५ खासदार आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी अध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहिलं आहे, जे आता समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी अध्यक्षांना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी काम करण्यास सूचवलं आहे. यासह काही गंभीर विषयांवर चर्चा करण्यास सांगितलं आहे.

अमेरिकेतील खासदारांनी अमेरिकन परराष्ट्र विभाग आणि सिव्हिल सोसायटीच्या अहवालांचा हवाला देत राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान मोदींबरोबर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास सांगितलं आहे. यामध्ये भारतातली पॉलिटिकल स्पेस कमी होणे, तिथला मानवाधिकाराचा मुद्दा, धार्मिक असहिष्णुता वाढणे, सिव्हिल सोसायटी संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे, माध्यमं आणि इंटरनेटवरील वाढते निर्बंध हे मुद्दे उपस्थित करण्यास सांगितलं आहे.

या पत्रात तिथल्या लोकप्रतिनिधिंनी म्हटलं आहे की, भारतात मानवी हक्क हिरावले जाण्यावरून जी टीका होत आहे, ती सातत्याने भारत सरकारने फेटाळली आहे. यासंबंधीचे सर्व अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे.भारत आणि अमेरिका यांच्यात रणनीतिक, आर्थिक, व्यावसायिक आणि संरक्षण संबंध असल्याचे खासदारांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत आणि मित्रांनी नेहमी आपल्या मित्रांशी प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने बोललं पाहिजे.अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे की, दोन्ही देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत, म्हणूनच आम्ही तुम्हाला (अध्यक्ष) विनंती करतो की भारत आणि अमेरिका यांच्यातील हितसंबंधांच्या विषयांव्यतिरिक्त तुम्ही मोदींसमोर थेट तिथले (भारतातले) चिंतेचे विषय मांडा. हे पत्र लिहिणाऱ्या खासदार, काँग्रेसमन आणि इतर लोकप्रतिनिधींचं नेतृत्व वॅन हॉलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केलं आहे

देशात प्रथमच रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकीत्सालय स्थापन

पुणे, दि. २१ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत विधि सेवा व मध्यस्थी चिकीत्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. देशात प्रथमच या प्रकारचे चिकीत्सालय रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कामगार विभाग, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगारांचा बचाव व पुनर्वसन करण्याकरीता सात दिवसांचे विशेष अभियान रबविण्यात येणार असून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाद्वारे सर्व गरजू व पिडीत व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्या सर्व व्यक्तींना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार आहे. असे कार्यक्रम वेळोवेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने घेण्यात येतील, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील यांनी सांगितले.
*

राहुल गांधी भारताचे PM झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात डांबणे सोपे होईल, ED कारवाईवर नाना पटोले आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विक्रमी भ्रष्टाचार 75 रु. किलोची सुतळी 550 रुपयांना

मुंबई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आदित्य ठाकरे यांच्या निटकवर्तीयांवर टाकलेल्या छापेमारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी केंद्र व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत सत्ता बदल झाल्यानंतर जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. देशात जे काही भ्रष्टाचारी लोक होते, ज्यांच्या ईडी व सीबीआय चौकशा सुरू होत्या, त्या सर्वांना भाजपने दबाव टाकून आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतले. आता हे सर्वजण भाजपचे नेते म्हणून एकत्र आलेत. उद्या आमचे काँग्रेस नेते देशाचे पंतप्रधान झाले तर या सर्वांना तुरुंगात डांबणे आम्हाला सोपे होईल, असे नाना पटोले भाजपला इशारा देत म्हणाले.

आता निवडणुकांची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काहीच नाविन्य नाही. विरोधी पक्ष तपास यंत्रणांच्या दबावाला भीक घालणार नाहीत. भाजपला सत्तेतून बेदखल करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. देश व संविधानाच्या संरक्षणासाठी भाजपला सत्तेतून पायऊतार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे नाना पटोले म्हणाले.

आगामी निवडणुकांत जनताच भाजपला घरी बसवेल, असा दावाही पटोलेंनी यावेळी केला. सरकार शेतमालाची खरेदी करते. त्याला सुतळी लागते. ती बाजारात अवघ्या 75 रुपयांना किलो मिळते. याऊलट सरकार हीच सुतळी 550 रुपये किलो दराने विकत घेते. या पद्धतीने हे सरकार कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे, असे पटोले म्हणाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विक्रमी भ्रष्टाचार झाल्याचा दावाही नाना पटोले यांनी यावेळी केला.

‘जी-२०’ शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग

पुणे, दि. २१: ‘जी- २०’ अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित अंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांसह परदेशी पाहुण्यांनी यावेळी आयोजित योगवर्गात सहभाग घेतला. प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शिथिल दंडासन, भद्रासन, वज्रासन, उत्तान मंडुकासन, भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, सेतूबंधासन आदी विविध प्रकारची आसने यावेळी करण्यात आली.

कुलगुरू प्रा.गोसावी यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. योगगुरू डॉ.संप्रसाद विनोद आणि डॉ.विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांना योगासनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी युवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. परदेशी प्रतिनिधींनी ही प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्यासोबत योगशास्त्राची माहिती अत्यंत लक्षपूर्वक जाणून घेतली.
0000

‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२१ : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त राहण्यासाठी रोज योगा करूया आणि निरोगी राहूया”, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित योगाभ्यासादरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी योगाभ्यासामध्ये सामील झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगभरात योग पोहोचविला. योगदिनाचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला होता. योगाचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) मान्यता दिल्याने जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री हे सध्या न्यूयार्कमध्ये योग करीत आहेत. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी ३५ लाख नागरिक, अधिकारी, कर्मचारी योग करीत आहेत, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे. योग ही आता काळाची, समाजाची चळवळ होत आहे. आपला देश जगाला नवनवीन कार्यक्रम देत असून जी-२० ची थीम ‘वसुदैव कुटुंबकम’ असून संपूर्ण देश हा आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मानतात, याचाही आपल्याला अभिमान आहे.         सकाळपासून योग कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन केले आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही योगाभ्यास झाल्याने त्यांनाही नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. योगाभ्यासात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सहभाग घेतला. द योग इन्स्टिट्यूट, सांताक्रूजच्या डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या योगसाधकांनी योगप्रात्यक्षिके केलीत.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची घोषणा

मुंबई, दि. २१ :- राज्यातील सर्व  शासकीय वैद्यकीय, आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व  महाविद्यालयांत डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ  योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीष महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने केली.

नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी येथील डोम सभागृह येथे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘वसुधैव कुटुंबकम् साठी योग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री महाजन म्हणाले, “आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे की आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहित व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जात आहे”, असे त्यांनी सांगितले.

“योगासन म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. उत्तम आरोग्य तसेच शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तणावमुक्त जगण्याबरोबरच तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो”. असे श्री. महाजन यांनी सांगितले.

कैवल्यधाम संस्थेच्या योग मार्गदर्शकांनी उपस्थित मान्यवर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. तसेच पोतदार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत योगाचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्व सांगून २०२३ ची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ असल्याचे सांगितले. ‘हर घर योगा, हर आंगन योगा’ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे योगाविषयीचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले. आभार वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी मानले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २१  :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर,नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसूली विभागतील शहरात व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते, अशी माहिती श्री. डिंगळे यांनी दिली.

कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळ, घोटाळा झाला हे निश्चित; ईडी कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

पुणे-कोरोना काळात भ्रष्टाचार झाला हे निश्चित आहे. या काळात अनुभव नसलेल्या कंपन्यांना कोविड सेंटर उभारणीचे कंत्राट देण्यात आले. लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कोविड कोटाळा झाला हे निश्चित आहे. मात्र, ईडीने नेमकी काय कारवाई केली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईत धाडी टाकल्या. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण तसेच, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया देताना पुणे येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना काळात ज्या कंपन्यांना कोणताही अनुभव नव्हता, अशा कंपन्यांना कोविड सेंटर उभारण्याचे काम देण्यात आले. आधी कंत्राट दिले, त्यानंतर कंपन्या स्थापन करण्यात आला. असे गंभीर प्रकार कोरोना काळात घडले आहेत. यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात तर अशा गलथान कारभारामुळे एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. ​​​​​​​

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणी चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत आली आहे, एसआयटीला काही मिळाले का?, याबाबत मला माहिती नाही. तसेच, आज ईडीने जी छापेमारी केली, त्यासंदर्भातही मला काही माहिती नाही. यासंदर्भातील माहिती ईडीकडूनच मिळेल.दरम्यान, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. त्यासंदर्भत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावरच धाड टाकण्यात येत असेल. यासंदर्भात ईडीच अधिकृत माहिती देऊ शकेल”.

भाजप आमदार गीता जैन यांनी मनपाच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, राग अनावर होऊ शकतो. पण तरीही त्यांनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणे योग्य आहे.

जेनोवाने तयार केलेल्या, भारतातील पहिल्या एमआरएनए बेस्ड ओमिक्रोन-स्पेसिफिक बूस्टर वॅक्सीनला डीसीजीआयची मंजुरी 

·         हे ओमिक्रोन-स्पेसिफिक एमआरएनए वॅक्सीन GEMCOVAC®-OM या नावाने उपलब्ध असणार आहे.

·         १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती हे वॅक्सीन बूस्टर डोस म्हणून घेऊ शकतील.

·         कोवॅक्सीन® किंवा कोविशील्ड™ यांच्यापैकी कोणत्याही वॅक्सीनचे दोन डोस ज्यांनी घेतलेले आहेत अशा व्यक्ती बूस्टर वॅक्सीन सुरक्षितपणे घेऊ शकतील.

·         हे इंट्राडर्मल वॅक्सीन असून सुई नसलेले डिव्हाईस वापरून ते देता येते.

·         हे वॅक्सीन २-८ अंश सेल्सियसला स्थिर राहते.

पुणे: जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड या पुणे स्थित कंपनीने घोषणा केली आहे की त्यांच्या GEMCOVAC®-OM या एमआरएनए कोविड-१९ बूस्टर वॅक्सीनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (EUA) मिळाले आहे. सार्स-सीओव्ही-२ च्या ओमिक्रोन व्हेरियंटच्या विरोधात हे वॅक्सीन वापरता येणार आहे.

GEMCOVAC®-OM हे अतिशय संसर्गजन्य ओमिक्रोन व्हेरियंटच्या विरोधात भारतात विकसित करण्यात आलेले पहिले बूस्टर कोविड-१९ वॅक्सीन आहे. भारतातील १३ शहरांमधील २० केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल परीक्षणांमध्ये GEMCOVAC®-OM च्या खूप चांगल्या रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आढळून आल्या आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणांमध्ये जवळपास ३००० व्यक्तींना GEMCOVAC®-OM देण्यात आले आणि हे वॅक्सीन सुरक्षित असल्याचे आढळून आले.

प्रतिबंधात्मक/बूस्टर डोस म्हणून वापरली जाणारी, सध्या मंजुरी देण्यात आलेली वॅक्सीन सार्स-सीओवी-२ या आधीच्या व्हेरियंटविरोधात वापरासाठी तयार करण्यात आली होती.  ही वॅक्सीन अँटीबॉडी टायटर वाढवणारी जरी असली तरी सार्स-सीओवी-२ च्या पसरत चाललेल्या ओमिक्रोन प्रकाराला न्यूट्रलाइज करण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. ओमिक्रॉन वेरियंटसाठी विशिष्ट अँटीबॉडीज आणि मेमरी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित केल्याने संसर्ग आणि हॉस्पिटलायझेशनची संभाव्यता कमी होईल आणि भविष्यातील साथीच्या लाटा टाळता येतील. भारतात तयार करण्यात आलेले GEMCOVAC®-OM या कमतरता दूर करते.

GEMCOVAC®-OM हे लायोफिलाइज्ड (फ्रीझ ड्राइड) वॅक्सीन आहे जे २-८ अंश सेल्सियसला स्थिर राहते.   

फार्माजेट, यूएसएने विकसित केलेले ट्रॉपिस® हे साधन वापरून हे वॅक्सीन दिले जाते. या साधनामध्ये सुई नाही त्यामुळे सुईची भीती वाटणे, वेदना आणि सुईमुळे होणारी जखम यासारखे सुईच्या वापराचे धोके टाळले जातात.

जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ डॉ संजय सिंग यांनी सांगितले, आजवर पूर्ण न केल्या गेलेल्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याच्या जागतिक वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जेनोवा टीम आरोग्याशी संबंधित आणीबाणीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. कोविड-१९ राहणार आहे आणि त्यामध्ये बदल होत राहणार आहेत, त्याच्या नवनवीन व्हेरियंटचा सामना करू शकतील अशा वॅक्सीन विकसित करून तयार राहणे आपल्यासाठी गरजेचे आहे.  भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या एमआरएनए प्लॅटफॉर्ममुळे भविष्यातील कोणत्याही व्हेरियंटसाठी तातडीने वॅक्सीन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  अनेक जीवघेण्या आजारांपासून मनुष्यजातीचे रक्षण करण्यात वॅक्सीन्सनी खूप मोलाची भूमिका बजावली आहे.”

अधिक चांगल्या आरोग्यासाठी उपाययोजना शोधून काढण्यासाठी संशोधन करण्यासाठी जेनोवा बांधील असल्याचे सांगून जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीओओ श्री समित मेहता यांनी सांगितले, “जेनोवाने भारतातील पहिले ओमिक्रोन-व्हेरियंट वॅक्सीन अवघ्या काही महिन्यांमध्ये यशस्वीपणे विकसित केले आहे.  कोविड-१९ वॅक्सीन्ससाठी संपूर्ण जगभरात उपलब्धतेच्या बाबतीत जी आव्हाने उभी राहिली त्याची पुरेपूर कल्पना असल्यामुळे आम्हाला आनंद आहे की आम्ही एमआरएनए या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वॅक्सीन पुरवू शकत आहोत. एमआरएनए तंत्रज्ञान आणि आता ओमिक्रोन विशेष वॅक्सीनसाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला याबद्दल आम्ही वैद्यकीय विश्व, सरकार आणि वैज्ञानिक या आमच्या सर्व हितधारकांचे आभारी आहोत. एमआरएनए प्लॅटफॉर्म हा कोरोना विषाणूच्या विरोधात भारत आणि संपूर्ण जगासाठी संरक्षक ढाल बनून उभा आहे.”

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे:कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी कारवाई

मुंबई-मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे.ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड सेंटर घोटाळासंबंधी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीने एकाचवेळी छापेमारीला सुरूवात केली. विशेषकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे सोमवारीच (ता. 19) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत 12 हजार 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तत्कालीन मविआ सरकार हे घोटाळेबाज सरकार होते, असा आरोप करत हे सरकार भ्रष्टाचाराचा एक-एक पैसा वसूल करेल, असे फडणवीस म्हणाले होते. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटले आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिंदे सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे.

मणिपूरमध्ये इंटरनेट बंदी 25 जूनपर्यंत, शाळाही 1 जुलैपर्यंत बंद

इंटरनेट बंद झाल्याने एटीएममधून पैसे काढणेही बंद,ऑनलाइन पेमेंट बंद

मणिपूरमध्ये ३ मे रोजी सुरू झालेला हिंसाचार परिस्थिती पाहता 4 मे पासून बंद असलेल्या शाळांच्या सुट्या पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी २१ जून रोजी शाळा सुरू करण्याची तयारी होती, मात्र परिस्थिती नियंत्रणात नसल्याने शाळांच्या सुट्या १ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.दुसरीकडे, राज्यातील इंटरनेट बंदी 25 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि, मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मर्यादित नेट सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती अहंथेम बिमोल सिंग आणि ए गुणेश्वर शर्मा यांनी काही लोकांसाठी इंटरनेट आवश्यक आहे, विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत , असे निरीक्षण नोंदविलेले आहे.

इंटरनेट सेवा बंद झाल्याने लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. एटीएममधून पैसे काढणेही अवघड झाले आहे. इम्फाळ खोऱ्यातील वांगखाई येथील रहिवासी असलेल्या प्रीतम सिंह यांनी सकाळपासून पैसे काढण्यासाठी तीन-चार एटीएम शोधले, पण पैसे काढता आले नाहीत.

यानंतर ते दुसऱ्या भागातील सिंगजेमे मार्केटमध्ये पोहोचले. प्रीतम सिंह सांगतात, ‘येथे जवळपास 100 एटीएम आहेत, त्यापैकी फक्त 5 ते 10 एटीएममध्ये पैसे आहेत. इंटरनेट बंद असल्याने ऑनलाइन पेमेंट बंद, खरेदी रोखीनेच करावी लागत आहे. त्यामुळे रोज एटीएममध्ये जावे लागते. अनेक वेळा रांगेत असताना एटीएममधील पैसे संपतात.

हिंसाचाराच्या काळात तांदळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. साधारणत: तांदूळ ३० रुपयांच्या खाली मिळत होता, मात्र भाव ५० रुपये किलोवर पोहोचला आहे.बटाट्याचा भाव 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. वस्तूंच्या किमती वाढल्याने आमचे बजेटही बिघडले आहे. दुसरीकडे, चिंगखाम संगीता या महिला दुकानदाराने सांगितले की, ‘आम्ही ज्यांच्याकडून वस्तू खरेदी करतो त्यांनी त्यांच्या किमती वाढवल्या आहेत, त्यामुळे आम्हालाही वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागल्या.

त्याचवेळी लष्कराने युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) या प्रतिबंधित संघटनेच्या चार सदस्यांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून 51 मिमी मोर्टार आणि बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. लष्कराने ट्विट करून माहिती दिली की, 19 जूनच्या संध्याकाळी त्यांना लिलाँग भागात केलेल्या तपासणी मोहिमेत पकडण्यात आले.

दोन हजार विद्यार्थी – विद्यार्थिनींकडून  योग प्रात्यक्षिके

पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे बुधवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत  ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा  करण्यात आला. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार , संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख,  मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे झाला.  ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक डॉ. गुलझार शेख, शबनम पिरजादे,माजिद सय्यद यांनी संयोजन केले.’शारीरिक, मानसिक स्वास्थ जपण्याची योग परंपरा हजारो वर्षांपासून भारतात आहे. ही परंपरा घराघरात, जगभर पोहोचविण्याचे काम सर्वांनी करावे. सुदृढ , बलशाली भारताचे स्वप्न त्यातून साकार होईल ‘, असे प्रतिपादन डॉ.पी.ए.इनामदार यांनी यावेळी केले.

भारताचे G20 अध्यक्षपद म्हणजे जागतिक शांततेसाठी विविधतेचा लाभ घेण्याची संधी-  हर्षवर्धन श्रृंगला

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाच्या  (एडडब्ल्यूजी)  चौथ्या  बैठकीचा  पुण्यामध्ये प्रारंभ

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाची (एडडब्ल्यूजी) चौथी बैठक काल पुण्यामध्ये सुरु झाली. 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सादर केल्या जाणार्‍या फलनिष्पत्ती दस्तऐवजाना या बैठकीत अंतीम स्वरूप दिले जाईल.

भारताचे शिक्षण विषयक कार्य गटाचे अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी, शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार, आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या सह या बैठकीचे पाळीपाळीने अध्यक्षपद भूषविले.

चौथ्या शिक्षण विषयक कार्य गटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी G20 प्रतिनिधींबरोबर  मंत्री स्तरीय घोषणापत्राच्या मसुद्यावर चर्चा झाली. युनिसेफ (UNICEF), OECD आणि युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संघटनांनी शिक्षण कार्य गटाचा अहवाल सादर केला. एडडब्ल्यूजी अहवाल आणि संकलनाद्वारे संपूर्ण गटासाठी सर्वसमावेशक पद्धतीने एक समान उद्दिष्ट ठरवून, शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम ठरवण्याच्या, भारताचे G20 अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सातत्त्यपूर्ण  प्रयत्नांची G20 सदस्य आणि निमंत्रित देशांनी प्रशंसा केली. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत हा जागतिक आणि स्थानिक आव्हानांसाठी उपायांचा स्त्रोत मानला जात आहे, यावर भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी भर दिला. चेन्नई, अमृतसर आणि भुवनेश्वर इथल्या एडडब्ल्यूजीच्या मागील तीन बैठकींमध्ये तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण, संशोधन आणि सहयोग तसेच भविष्यातील काम, यावर भर देत, झालेल्या सर्वोत्तम पद्धतींच्या मौल्यवान देवाणघेवाणीवर प्रकाश टाकण्यात आला. चौथी आणि शेवटची बैठक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) या संकल्पनेवर आधारित असेल. ते म्हणाले की, वैचारिक मतभेद असूनही शाश्वत जागतिक हितासाठी एकत्र काम करणाऱ्या सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भारताचा भर आहे.

के. संजय मूर्ती यांनी चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या  बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले. शैक्षणिक कार्यगटाच्या  बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी केलेली अनुभवांची देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धती ही  प्रत्येक मुलासाठी मूलभूत साक्षरता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाची  लक्ष्यपूर्ती करण्‍यासाठी  मार्ग प्रशस्त  करेल, असे ते म्हणाले.  त्यांनी मागील तीन बैठकांचे महत्त्वही   अधोरेखित केले.  मागील सर्व शैक्षणिक कार्यगटाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साही सहभागासाठी त्यांनी जी 20 प्रतिनिधींचे कौतुक केले.

चौथ्या  शैक्षणिक कार्यगटाच्या  पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या ‘मूलभूत साक्षरता आणि संख्‍याशास्त्र परिचय’ यामध्‍ये मिश्र  शिक्षण पद्धती,  या विषयावर एक बैठक आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याशिवाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्‍ये 17 ते 22 जून 2023 पर्यंत एक मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्‍ये 12,000 हून अधिक प्रतिनिधी  आणि 80 पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनामध्‍ये  मूलभूत संख्‍याशास्त्रीय शिक्षणासंबंधी  उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शनातील एनसीईआरटी, आयकेएस (इंडियन नॉलेज सिस्टम), मायक्रोसॉफ्ट, निपुण भारत उपक्रम, इंडोनेशिया, युनिसेफ, युनेस्को आणि इतर अनेकांचा उल्लेखनीय सहभाग आहे.

जी- 20 प्रतिनिधींनी पुणे शहरामध्‍ये ‘हेरिटेज वॉक’ चा अनुभव घेतला. यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाडा या स्थळांना प्रतिनिधींनी  भेटी दिल्या. याचबरोबर या प्रतिनिधीसाठी, प्रफुल्ल  मन आणि आत्मा,  यासाठी, आंतरराष्ट्रीय योग दिनी योगासने आयोजित करण्यात आली आहेत.

अनधिकृत बांधकामांसह महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्स व दोन कंपन्यांवर कारवाईचा बडगा

कर आकारणी व संकलन विभागाकडून थकबाकी वसूल करण्यावर भर

पुणे- ः पुणे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाकडून थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे, त्यानुसार महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या पथकाने नऱ्हे, आंबेगाव, धायरी, वडगाव परिसरातील २५ मिळकतींची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यावेळी अनधिकृत बांधकामांसह महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्स व दोन कंपन्यांवर पथकाने कारवाईचा बडगा उगारला.
कर आकारणी व संकलन विभागाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निश्‍चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांकडून अधिकाधिक थकबाकी वसुल करण्यासाठी मिळकतींची प्रत्यक्षात पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांच्या पथकाने नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द या परिसरातील २५ मिळकतींना पथकाने प्रत्यक्षात भेटी दिल्या. तपासणीवेळी अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती, रुफ टॉप, साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधण्यात आल्या. त्यामध्ये थकबाकी असणाऱ्या काहींनी तत्काळ धनादेश दिल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. तर थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकतींना टाळे ठोकण्यात आले.आंबेगावमधील हॉटेल वेदांतच्या फ्रंट मार्जिन व रुफ टॉपची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे त्यांच्याकडून तीन पटीने कर आकारण्यात आला. धायरी येथील केडीसी फूड वर्ल्डची ३१ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्या मिळकतीला टाळे ठोकण्यात आले. धायरीतील ओके पॅकेजिंगचे १४०० चौरस फुटांचे अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांच्यावर २०१९ पासून अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आला

मोदी हीरो आहेत, मी त्यांचा फॅन-टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क

मोदी हीरो आहेत, मी त्यांचा फॅन आहे, मोदींना भारतासाठी खूप काही करायचे आहे ,मोदीं भारतात नवीन कंपन्यांचे स्वागत खुल्या हातांनी करतात अशा शब्दात टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. त्यांनी मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली.यावेळी टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार? याप्रश्ना वर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही मस्क म्हणाले. तसेच मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे देखील मस्क यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. ते अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे सांगत एलॉन मस्क म्हणाले की, मी भारताच्या भविष्याबाबत खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत.पंतप्रधान मोदींना भारताच्या उज्जवल भविष्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. नवीन कंपन्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन, धोरण उदारमतवादी आहे. मोदीं भारतात नवीन कंपन्यांचे स्वागत खुल्या हातांनी करतात त्यामुळे मी त्यांचा फॅन आहे.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची माहिती देताना मस्क म्हणाले की, पंतप्रधानांशी भेट चांगली होती. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली. पुढील वर्षी मी भारतात येण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत विचारल्यावर मस्क म्हणाले की, मोदींना त्यांच्या देशाची खूप काळजी आहे. म्हणूनच ते भारतात गुंतवणुकीसाठी खूप सक्रिय आहेत. आम्ही देखील भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहोत. आम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. तसेच मोदींना ब्रॉडबँड इंटरनेट सेवा स्टारलिंक भारतात आणायची आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचण्यास मदत होणार आहे. एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की, भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाबद्दल खूप प्रेम आणि काळजी आहे. म्हणूनच ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.