Home Blog Page 1482

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि.२२: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

मुक्तांगण इंग्रजी विद्यालयात पुणे विद्यार्थी गृह आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षणाच्या खाजगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी.जी. सीताराम, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुनील रेडकर आदी उपस्थितीत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्व देण्यात आले आहे. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी विषयाची पुस्तके लवकरच मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला आणि सृजनशीलतेला चालना मिळते. संशोधनाला चालना मिळून बौद्धिक संपदा हक्क अधिक प्रमाणात मिळविता येतात.

या धोरणात रोजगाराभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. शैक्षणिक संस्थांनी परिसरातील उद्योगांशी जानेवारी महिन्यात चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सादर करावेत, त्यास त्वरित मान्यता देण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात देशाच्या गतवैभवाच्या समावेशावरही भर देण्यात आला आहे. आपल्या परंपरेचा अभिमान विद्यार्थ्यांना वाटेल असे आणि नीतिमत्तेचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल.

तंत्रशिक्षण मंडळाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगात काम करून त्याच ठिकाणी तंत्रनिकेतनच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक शिक्षणासोबत कला विषयाचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

श्री.सीताराम म्हणाले, संशोधन, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, भारतीय मूल्यविचार हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा गाभा आहे. हे धोरण निरंतर चालणाऱ्या अध्ययन प्रक्रियेवर आधारित आहे. शिक्षण सर्वसमावेशक करण्याचा, शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. ८४ संस्थांमध्ये प्रादेशिक भाषेतील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची किंवा इच्छेनुसार नवा अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.रेडेकर यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी येणाऱ्या समस्यांबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विद्यार्थी गृहाने कौशल्य विकासावर भर दिला असल्याचेही ते म्हणाले.

कार्यशाळेला विविध खाजगी शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन सदस्य, संचालक, प्राचार्य उपस्थित होते.

इंद्रायणी व पवना नदीत होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करा -उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, दि.२२ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड, चाकण व हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील व शहरातील सांडपाण्यामुळे इंद्रायणी व पवना नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणावर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करा अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, इंद्रायणी व पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्व संबंधित यंत्रणानी एकत्रितपणे काम करूनच प्रकल्पाचे काम होणार आहे. सुमारे १५०० कोटीचा हा प्रकल्प असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पीएमआरडीए व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निधीची तरतूद करावी व तातडीने हा प्रकल्प कार्यान्वित करावा. निधीची कमतरता भासल्यास शासनही निधी उपलब्ध करुन देईल. या कामासाठी तात्काळ महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांचाही समावेश करावा.

उगमस्थानापासून नदी स्वच्छ झाल्याने अनेकांना त्याचा फायदा होईल. या प्रकल्पासाठी शासन सकारात्मक असून प्रशासनाने ऑक्टोबर २०२३ पर्यंत निविदा काढाव्यात तसेच दोन वर्षात प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल याकडे लक्ष द्यावे. डीपी रस्त्यामध्ये येणाऱ्या ९२ लघुउद्योजकांच्या स्थलांतरासाठी चऱ्होली येथे १० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, देहू-आळंदी येथे लाखो भाविक येत असतात. इंद्रायदी नदीच्या प्रदूषणाबाबत त्यांची तक्रार दूर करण्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावा.

प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाबाबत व महापालिकेमार्फत जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, हिंजवडी, माण, तळेगाव, देहू, आळंदी नगरपरिषद, उद्योग संघटनांचे आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे, दि. २२: नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन कार्यवाही अधिक गतिमानतेने करा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन वाळू धोरण अंमलबजावणी व वाळू डेपो सुरु करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, संग्राम थोपटे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सुरेंद्र नवल, ज्योगेंद्र कट्यार, गोविंद शिंदे, मिनाल मुल्ला, राजेंद्र कचरे व वैभव नावडकर उपस्थित होते.महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये वाळू उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती, वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी, यावर राज्य शासनाने भर दिला आहे, असेही मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी नवीन वाळू धोरण अंमलबजावणी व वाळू डेपो सुरु करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा सादर केला. जिल्ह्यात वाळू ३२ ठिकाणी वाळू गट निश्चित करण्यात आलेले आहेत. तालुकास्तरीय समितीने निश्चित केलेल्या वाळूगट नुसार ई-निविदा राबविण्याची कार्यवाही सुरु असून त्यानुसार पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याचेही श्री. मोरे म्हणाले.

ईडीचे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत छापे,ठाकरेंना कोंडीत पकडण्याची खेळी

मुंबई

मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईत छापेमारी केली. ईडीच्या पथकाने आज आज सकाळी मुंबई महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड मारली.उद्धव ठाकरे यांना मुंबईत कोडींत पकडण्यासाठीच या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

दरम्यान, काल ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांसह तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापे टाकले. यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, संजय शहा, नितीन गुरव यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित 15 ठिकाणांची झडती घेण्यात आली. सूरज चव्हाण यांच्या घरातून ईडीचे पथक तर रात्री दीड वाजतात बाहेर पडले. सकाळी आठवाजेच्या सुमारास ईडीचे पथक सूरज चव्हाण यांच्या घरी धडकले होते. त्यामुळे कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या तपासाने आता वेग घेतल्याचे दिसत असून ईडी आणखी काही पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीचे अधिकारी सध्या महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार या दोन्ही अधिकाऱ्यांची विचारपूस करत असल्याची माहिती आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात असून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. तसेच, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही घरात येऊ दिले जात नाहीये.

कोरोना काळात ठाकरे सरकारने दिलेल्या कंत्राटांची ईडी सध्या कसून चौकशी करत आहे. त्यामुळे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व तत्कालीन पालिका अधिकारी ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यानुसारच आज आणखी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. कोविड कंत्राट पुरवण्याच्या प्रक्रियेत या पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.

भाजपने उद्धवसेनेवर कोविडकाळात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्याला पलटवार म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रशासक काळात या मनपातील 9 हजार कोटींच्या ठेवी मोडून उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात 1 जुलै रोजी माेर्चा काढून शक्तिप्रदर्शन करण्याची त्यांची रणनीती होती. मात्र त्यापूर्वीच दिल्लीतून सूत्रे हलली व ईडीने ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले. त्यातच आता राज्य सरकारनेही एसआयटीमार्फत मुंबई मनपातील तत्कालीन कोविड घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. यातून केंद्र व राज्य सरकार उद्धवसेनेची चोहोबाजूने कोंडी करत आहे. या दबावतंत्राचा वापर करून ठाकरे गटाचे काही लोक शिंदे सेनेत खेचून घेण्याचीही त्यांची रणनीती आहे

फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना पंतप्रधान मोदींनी दिला 7.5 कॅरेटचा हिरा: भेटीत पहा काय काय दिले ..

बायडेन दाम्पत्याला पंतप्रधान मोदींनी दिले ,महाराष्ट्रातील गूळ, पंजाबचे तूप,राजस्थानचे सोन्याचे नाणे, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतील तीळ,कर्नाटकातील म्हैसूरचे चंदन, पश्चिम बंगालमधील चांदीचे नारळ अन गुजरातचे मीठ/पंतप्रधान मोदी फर्स्ट लेडीसोबत नॅशनल सायन्स फाउंडेशनला पोहोचले

वॉशिंग्टन-

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी ते एका खासगी डिनरसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. येथे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी यांनी त्यांचे स्वागत केले. या डिनरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिव्हन देखील उपस्थित होते. रात्रीच्या जेवणात बायडेन यांचा आवडता पास्ता आणि आईस्क्रीमचाही समावेश होता.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना लॅबमध्ये बनवलेला 7.5 कॅरेटचा पर्यावरणपूरक ग्रीन डायमंड भेट दिला. त्याचवेळी, ‘उपनिषदाची 10 तत्त्वे’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसोबतच राष्ट्रपती बायडेन यांना जयपूरच्या कारागिरांनी बनवलेली म्हैसूर चंदनाची खास पेटी भेट देण्यात आली. या पेटीच्या आत गणपतीची मूर्ती आणि दिवा सोबत 10 दान आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना बॉक्समध्ये दान केलेल्या गोष्टी खूप खास आहेत. यामध्ये पंजाबचे तूप, राजस्थानचे हाताने बनवलेले २४ कॅरेट हॉलमार्क असलेले सोन्याचे नाणे, महाराष्ट्रातील गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतील तीळ, कर्नाटकातील म्हैसूरचे चंदन, पश्चिम बंगालमधील कुशल कारागिरांनी बनवलेल्या चांदीच्या नारळात गुजरातचे मीठ समाविष्ट आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान मोदींना 20 व्या शतकातील एक बुक गॅली, एक विंटेज अमेरिकन कॅमेरा, अमेरिकन वन्यजीव छायाचित्रणावरील पुस्तक आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीची एक प्रत भेट देतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी स्टेट डिनरचा मेनू शेअर केला. तत्पूर्वी, मोदींनी जिल बिडेन यांच्यासह अलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया) येथील नॅशनल सायन्स फाउंडेशनलाही भेट दिली. पीएम मोदी म्हणाले- भारत आणि अमेरिका हे दोन सर्वसमावेशक देश आहेत जे शाश्वत विकासाचे इंजिन बनतील.

यावेळी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी हेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी अमेरिका आणि भारतातील विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. पीएम मोदी म्हणाले- इथे येताच मला खूप तरुण आणि सर्जनशील लोकांशी जोडण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. जिल बिडेन इतका व्यस्त असूनही हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यांच्याशी जोडले जाणे हा सन्मान आहे. कौशल्य विकासाला आमच्यासाठी प्राधान्य आहे.

ते म्हणाले- आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांचे चांगले भविष्य सुनिश्चित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, योजना, नवकल्पना आवश्यक आहे आणि भारतात आपण या दिशेने अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत.

दर्शना पवार खून प्रकरणाचे गूढ उलगडणार संशयित राहुल हांडोरेला अटक, मुंबईहून पुण्याला येताना पोलिसांच्या जाळ्यात

सीसीटीव्हीमुळे मित्राचा सहवास उघड आणि संशय बळावला

पुणे-एमपीएससी परीक्षेत राज्यात चमकलेली दर्शना दत्ता पवार (वय २६, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) या तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या परिसरा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. तपासादरम्यान दर्शना पवारचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. अखेर या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरे यास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना सापळा रचून अटक केली आहे. त्यामुळे दर्शना पवार खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दर्शना पवार एमपीएससी परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झालेली होती. 12 जूनरोजी ती मित्र राहुल हंडोरेसोबत (रा. नाशिक) राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेली होती. विशेष म्हणजे या दिवसापासून राहुल हंडोरे फरार होता. त्यामुळे खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिस पथके संशयित राहुल हंडोरेच्या मागावर होती. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सुरुवातीला दर्शना हिचा खून झाला आहे की नाही याबाबत पोलिसांना संशय होता. मात्र, शवविच्छेदन अहवालामध्ये दर्शनाच्या डोक्यावर तसेच शरीरावर जखमांच्या खुना आढळल्या आहेत. या जखमा या किल्ल्यावरून पडून झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले होते. तिला कोणत्यातरी वस्तूने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे 12 जून रोजी घटनेच्या दिवशी नेमके काय झाले? याबाबतचा तपास पोलिस पथके करत आहेत.

पोलिसांच्या तपासात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शना आणि राहुल हे दोघे किल्ल्याच्या दिशेने जाताना पाहावयास मिळाले. मात्र, ते परतत असताना केवळ राहुल हा दुचाकीवर आल्याचे दिसून आले. त्यानंतर राहुलने बंगळुरू येथे जाऊन एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, बंगळुरू या ठिकाणी न थांबता, राहूल लगेच चंदिगड याठिकाणी गेला. त्याठिकाणी काही काळ घालवल्यानंतर हावडा एक्सप्रेस रेल्वेने कलकत्त्याच्या दिशेने तो गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस पथके आरोपीच्या मार्गावर होती.

एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या पुण्यातील एका संस्थेकडून दर्शना हिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हांडोरे होता. 12 जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला.

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.

मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत.

मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

सजावट विभागात १०० कारागिर दिवस-रात्र सलग ७५ दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’वरील सुरक्षाही केली कमी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना – भाजप सरकारने बुधवारी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. सरकारने उद्धव, आदित्य व तेजस यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही कमी केल्यात. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची भीती आहे.शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार, यापुढे उद्धव ठाकरे यांना झेड ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा मिळेल. सरकारने मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत कपात केली आहे. तसेच ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी व पायल व्हॅनही कमी केली आहे. राज्याच्या गृह विभागाने या सुरक्षा कपातीसाठी कोणतेही कारम दिले नाही. यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्याचे गृह खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

दुसरीकडे, सरकारच्या या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्हाला कोणतेही आश्चर्य वाटत नाही. हे सरकार सूडबुद्धीचे राजकारण करण्यात आपली शक्ती खर्च करत आहेत. त्यांची ही कृती अपेक्षितच होती. एका सन्मानिय पक्षप्रमुखाची सुरक्षा अशा पद्धतीने करून मुख्यमंत्री आपला लैकिक कमी करुन घेत आहेत, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षप्रमुखांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आमचा प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

२५ ऑगस्टला  ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची  यशोगाथा

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे. 

“आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’!

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  ‘पहिला मानाचा मुजरा’ असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.   

‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २१: बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे आणि हे काम ‘महारेरा’कडून अतिशय उत्तम पद्धतीने होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

ऑल इंडिया फोरम ऑफ रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीजच्या (एआयएफओ रेरा) नियामक मंडळाच्या हॉटेल कॉनरॅड येथे आयोजित बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी बोलत होते. यावेळी महारेराचे अध्यक्ष तथा फोरमचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्यासह देशभरातील १५ रेरा प्राधिकरणांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने ‘रेरा’ चे जन्मस्थान आहे. २५ वर्षांपासून ग्राहक संघटना, कार्यकर्त्यांची विशेषत: मुंबईत स्थावर संपदेबाबत नियामक व्यवस्था असावी, अशी मागणी होती. राज्य शासनही त्याबाबत गांभीर्याने विचार करत होते. त्यामुळे केंद्र शासनाने रेरा कायदा केल्याबरोबर या संधीचा लाभ घेत राज्याने ‘महारेरा’ ची स्थापना केली.

मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशाप्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो. याबाबतच्या मोठ्या तक्रारी येत होत्या. मात्र ‘रेरा’च्या स्थापनेमुळे याला मोठा आळा बसला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाद्वारे नागरिक, क्रेडाई-एमसीएचआय यासारख्या संस्थाचेही या कायद्याविषयी विचार जाणून घेतले जातात. त्यामुळे ‘महारेरा’ला विकासक, बांधकाम व्यावसायिकांचा विरोध न होता सहकार्यच होते. महत्त्वाचे म्हणजे फसवणुकीविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे घर खरेदीदार नागरिकही समाधानी आहेत. गृहप्रकल्पाच्या जाहिरातीमध्ये पूर्वी बिल्टअप, सुपर बिल्टअप असे उल्लेख करुन ग्राहकांची फसवणूक होत असे. तथापि, आता जाहिरातील ‘महारेरा कार्पेट एरिया’ चा उल्लेख होत असल्याने फसवणुकीला वाव राहिला नाही, असेही ते म्हणाले.

संपूर्ण देशात रेरा अंतर्गत नोंदणी होणाऱ्या बांधकाम प्रकल्पातील ४० टक्के प्रकल्प ‘महारेरा’ कडे नोंदणी झालेले आहेत. यातूनच महाराष्ट्रातील या कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, तंत्रज्ञान कोणताही भेद करत नसल्याने ‘महारेरा’चे सर्व कामकाज, परवानग्यांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, ही भूमिका घेतली. प्रकल्प मंजुरी आदींसाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण केल्यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यासह वेळेत परवानग्या आणि प्रकल्पांना गती मिळाली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे आता तिसरी मुंबई विकसित होत आहे. असे होत असताना शहरांची स्वत: आर्थिक सक्षम होण्याचीही क्षमता निर्माण होत आहे. त्यासाठी नवीन परिसंस्था (इकोसिस्टीम) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

देशभरातील रेरा प्राधिकरणांच्या या क्षेत्राच्या नियमनासंदर्भातील चांगल्या कार्यपद्धतींची माहिती परस्परांना दिल्यास तसेच आव्हानांविषयी चर्चा केल्यास नियामक क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करेल. त्यासाठी ही ‘एआयएफओ रेरा’ नियामक मंडळाची बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री. मेहता म्हणाले, महाराष्ट्राने सर्वप्रथम रेराची स्थापना केली. त्यानंतर देशातील एकूण २५ राज्यात ‘रेरा’ची स्थापना झाली आहे. ‘महारेरा’च्या स्थापनेपूर्वी बांधकाम प्रकल्प रखडण्याचे प्रमाण २५ टक्के होते ते आता ३ टक्क्यावर आले आहे. महारेराने प्रकल्प मंजुरी, अर्ज आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वेगाने मंजुरी दिली जात आहे. नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारीतही मोठी घट झाली आहे, असेही ते म्हणाले.

 पालखी सोहळ्यात भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणार्‍यांना अटक-120 संशयितांची धरपकड

पुणे-संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेउन चोरी करणार्‍यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी साध्या वेशात बंदोबस्त तैनात करीत 120 संशयितांची धरपकड केली. भाविकांच्या ऐवजाची चोरी करताना पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

राजेंद्र रामु माने (वय 34) पांडुरंग सोन्याबापू मासळकर ( वय 46 दोघेही रा.पाथर्डी, नगर) राजेंद्र सिंग बहालसिंग (वय 48 रा.सिंकदरपुर पालबल हरियाणा) सुनिल नामदेव काळे (वय 38 रा. जोगेश्वरी मुंबई ) रिजवान उर्फ सद्दाम कुरेशी ( रा. वार्ड 1 श्रीरामपूर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांसह त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मीतेश घट्टे, अपर अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी वारकर्‍यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली होती. साध्या वेशातील अमलदारांसह महिला कर्मचारी दोन्ही पालखी सोहळ्यावेळी तैनात करण्यात आले होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी बंदोबस्तावेळी पोलिसांनी 22 जणांची धरपकड केली होती. त्यामध्ये राजेंद्र माने हा वारकर्‍यांचे साहित्य चोरताना अटक करण्यात आला. त्याच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्तावेळी संशयातून 98 जणांची धरपकड करण्यात आली. त्यामध्ये 68 पुरूष आणि 30 महिलांचा समावेश होता. आरोपी राजेंद्र बहालसिंग याने महिला वारकर्‍याच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावुन चोरीचा प्रयत्न केला. पळून जात असताना त्याला ताब्यात घेउन अटक करण्यात आली. तर पालखीच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना पुलाखालील बोगद्यात अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेणार्‍या सुनिल काळे, रिजवान उर्फ सद्दाम कुरेशी यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच कैलास पवार (रा. साने चौक भीमशक्तीनगर चिखली ) याला अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसका मारुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वारकर्‍याच्या खिशात हात घालुन रोकड काढून घेताना संकेत राहुल अब्दुले याला रंगेहात पकडण्यात आले.

कोंढव्यात दहशत माजविणारा गुंड मंगेश माने टोळीवर मोक्का कारवाई

पुणे- -कोंढवा-सुखसागनर भागात दहशत माजविणारा गुड मंगेश माने याच्यासह चार साथीदारांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.मंगेश अनिल माने (वय 26, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर कृष्णा जाधव (वय 30, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे),पवन रवींद्र राठोड (वय 23, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक), अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर (वय 21, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), सूरज पाटील अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 29 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

मंगेश माने आणि साथीदारांनी कोंढवा, सुखसागरनगर, अप्पर इंदिरानगर, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मानेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. मंगेश माने यानी साथीदारांसह यापूर्वी देखील गंभीर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते वारंवार आर्थिक फायद्यासाठी जबरी चोरी ,घातक हत्यारेचा वापर करून गंभीर दुखापत करून जबरी चोरी, खून , खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे पूर्व रेकॉर्ड वरून दिसून आले आहे.त्यामुळे माने आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, सहायक निरीक्षक विश्वास भाबड यांनी तयार केला होता. या प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मंजुरी दिली. सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे पुढील तपास करत आहेत.

मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा- जिल्हाधिकारी

पुणे, दि.२१ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांनी मतदार याद्या बारकाईने लक्ष देऊन अद्ययावत कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. प्रशिक्षणाला उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी ११ शहरी व १० ग्रामीण मतदार संघ आहेत. याद्या अद्ययावत करताना अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. याद्या अद्ययावत करताना ८० वर्षावरील मतदारांचे सर्वेक्षण करावे, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या आधुनिक सॉफ्टवेअर येत आहेत. त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी माहिती करुन घ्यावी. मतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये, स्थानिक संस्था याठिकाणी व्यवस्था करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी ‘गरुडा’ ॲपबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील २१ मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागातील २०१९ च्या चालक-वाहकांची प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील चालक व वाहक पदासाठीची २०१९ पासून प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून पुणे विभागाची अंतिम निवड यादी जाहीर करावी, प्रशिक्षण काळात गाड्यांची संख्या वाढवावी, या मागण्यांसाठी एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या आवारात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात वैद्यकीय चाचणी झालेले २५०-३०० उमेदवार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रदेश सचिव राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, वाहिद नीलगर, अक्षय माने, केतन जाधव, प्रसाद वाघमारे, अजित ढोकळे, मुरली बुद्धाराम, विकार शेख, रमेश  कांबळे, सुजित गोसावी, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते. एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राहुल शिरसाठ म्हणाले, “एसटी महामंडळाने २०१९ मध्ये १२ विभागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, पुणे विभागात वैद्यकीय चाचणी होऊनही ट्रायल न झाल्याने, तसेच ट्रायल ट्रॅक नसल्याने त्यांची भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे ट्रायल लवकरात लवकर घेऊन ही भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी नियंत्रकांकडे केली. या मागणीला सकारात्त्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या ५ तारखेपासून ट्रायल सुरू करण्याचे आश्वासन विभागीय नियंत्रकांनी दिले आहे.” शिरसाठ यांच्या पुढाकाराने या तरुणांना न्याय मिळाला, असे सांगत एहसान अहमद खान यांनी शिरसाठ यांचे कौतुक केले.
उमेदवार मोबीन शेख म्हणाले, “पुणे विभागात १६४७ पदांसाठी ही भरती होती. अकरा विभागांची भरती पूर्ण झाली असून, पुणे विभागात ती रखडली आहे. ही भरती प्रक्रिया लवकर सुरु करावी, तसेच प्रशिक्षणासाठी बस उपलब्ध कराव्यात, ट्रायल ट्रॅक सुरु करावा, मुलांच्या अंतिम याद्या जाहीर कराव्यात, यासाठी अनेकवेळा आंदोलन केले. आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नव्हती. युवक काँग्रेसच्या सहकार्याने आज केलेल्या आंदोलनामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून ५ जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.”
———————–“चालक व वाहक पदासाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. त्यांची दुसरी चाचणी ट्रायल ट्रॅकवर होते. मात्र, कोरोना काळात ट्रॅक खराब झाल्याने ती चाचणी प्रलंबित राहिली. आता ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या आठ दिवसात ट्रायल घेण्यास सुरुवात होईल व लवकरच अंतिम यादीही जाहीर केली जाईल.”– कैलास पाटील, प्रभारी विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे विभाग

मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे-उपमुख्यमंत्री

पुणे दि.२१: कृत्रिम बुद्धीमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल. ‘लर्न, अनलर्न, रिलर्न’ अशी त्रिसूत्री स्वीकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात येत्या काळात झपाट्याने बदल होणार आहेत. २१ व्या शतकात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सातत्याने नव्या आव्हानांचा अभ्यास करून त्यानुसार शिक्षणाच्या क्षेत्रात कालानुरूप बदल करावे लागतील, अन्यथा शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल.

नव्या शैक्षणिक धोरणात भविष्याचा विचार
भविष्यातील आव्हाने ओळखूनच देशात नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसुत्रीवर आधारीत असून त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. इच्छा असणाऱ्याला शिक्षण देण्यासाठी विस्तार महत्वाचा आहे. उच्च शिक्षण घेण्याच्या वयातले २३ टक्के शिक्षण घेतात, हे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत घेवून जायचे आहेत. विद्यार्थी दुप्पट करताना मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारून संपूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल. हे मोठे आव्हान आहे.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था
ज्ञान असणाऱ्याला शिक्षण मिळणे तेवढेच गरजेचे आहे. रोजगाराचे प्रश्न समोर उभे असताना शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगारक्षमता महत्वाची आहे. हे करण्यासाठी महाविद्यालयांचे ॲक्रीडीटेशन आणि अभ्यासक्रमासाठी स्वायत्तता यात समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणता येईल. विद्यापीठांनी महाविद्यालयातील शिक्षणातील उत्तमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. नव्या काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवला आहे. नव्या काळातील प्रवाह लक्षात घेऊन पुढे जाणारी ही संस्था देशाच्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.

खाजगी विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत स्वायत्तता-चंद्रकांतदादा पाटील
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रोग्रेसिव्ह संस्थेने नेहमीच उत्तमतेवर भर दिला आहे. मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्याचा वेध आणि भूतकाळाबाबत गौरवाची भावना अशा दोन्ही बाबींचा समावेश आहे. राज्यात १ हजार ५०० महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

ते पुढे म्हणाले, भविष्याचा वेध घेवून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, आपल्या थोर परंपरेची जाणीव आणि मूल्यशिक्षण अशा चार पैलूंचा समावेश नव्या शैक्षणिक धोरणात आहे. खाजगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करण्यातील अडथळे लवकरच दूर करण्यात येतील. खासगी विद्यापीठात १० टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्कही माफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिरोळे म्हणाले, मॉडर्न महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसोबत सामाजिक जाणिवेने काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात संवेदनशिलतेने काम करणारे प्राध्यापक असल्याने राष्ट्रनिर्माणाचे कार्य या माध्यमातून घडत आहे.

यावेळी डॉ.एकबोटे यांनी विचार व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात नाविन्याकडे कल वाढत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. मूल्यशिक्षणासोबत अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात असल्याने विविध क्षेत्रात मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती एकबोटे यांनी नूतन इमारतीविषयी माहिती दिली.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.गजानन एकबोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0000