मुंबई, दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्थानिक सामाजिक संस्था, महाविद्यालयीन एनएसएस, स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडावा.
युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत
पहिला दिवसमहिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.
तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी
होतील
दुसरा दिवस
स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक
स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
तिसरा दिवस
प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.
मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार-महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार – बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह
मुंबई, दि. 22 : पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग) दीपक पांडे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे, खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीचे सदस्य व जेजेबी च्या सदस्यांनी पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा राबवताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली व कायद्यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी सूचना केल्या.
अध्यक्ष ॲड. शाह यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे सांगितले. तसेच सपोर्ट पर्सन, सदस्यांकडून शिफारशी मागवून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. सर्व कर्मचारी व सदस्यांनी आपसात संवाद साधल्यास अजून जोमाने व गंभीरपणे कार्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बैठकीस उपस्थित लोकायुक्त (निवृत्त) न्या. वि. एम. कानडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. पोलीस दल आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियमासंदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण व मजलिस संस्थेच्या संचालक ऑड्री डिमेलो यांनी केले. यावेळेस सखी सावित्री कायद्याची जनजागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जी-20 शिक्षण मंत्र्यांची बैठक
पुणे, 22 जून 2023
पंतप्रधान मोदी यांनी आज पुण्यात झालेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली, जी-20 सदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला, जी-20 सदस्य देशांच्या मंत्र्यांसह 80 प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि युनिसेफ, यूनेस्को तसेच ओईसीडी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, पायाच उभा नाही, तर शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला, आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा ‘स्वयं’ ह्या ऑनलाईन शिक्षण मंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.34 दशलक्षाहून अधिक जणांची नोंदणी आणि 9000 हून अधिक अभ्यासक्रमांसह, हे एक अतिशय प्रभावी शिक्षण साधन बनले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे शालेय शिक्षण देण्याचा उद्देश असणाऱ्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ किंवा ‘दीक्षा पोर्टल’चाही उल्लेख केला. दिक्षा पोर्टलद्वारे 29 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमध्ये शिक्षण घेता येते आणि या पोर्टलद्वारे आतापर्यंत 137 दशलक्षाहून अधिक जणांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आहेत. भारताला आपला हा अनुभव आणि संसाधने विशेषत्वाने ग्लोबल साऊथमधील देशांबरोबर सामायिक करण्यात आनंद वाटेल हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.
उद्घाटन सत्रात शिक्षण मंत्री, जी-20 देशांचे प्रतिनिधी आणि युनेस्को, युनीसेफ तसेच आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या (OECD) अधिकार्यांचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले. जी-20 च्या भारतीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिक्षण कार्य गटाने शिक्षणाची सर्वांना उपलब्धता, गुणवत्ता आणि परिणाम सुधारण्यासाठी संयुक्त कृती करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी याप्रसंगी केला.
शिक्षण आणि कौशल्य विकासात केलेली गुंतवणूक ही मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असल्याचे ते म्हणाले. ज्ञान, कौशल्ये तसेच सामाजिक-आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या संधींद्वारे अधिक न्याय्य आणि समृद्ध जगाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-20 सदस्य आणि आमंत्रित देश एकत्र आले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
उत्तम प्रशासनासह मानवतेचे कल्याण आणि दर्जेदार शिक्षण या पंतप्रधानांच्या संकल्पनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिक्षणाने भू-राजकीय सीमा ओलांडल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. जगातील सर्व मुले आणि तरुणांना सर्वांगीण शिक्षणाचा फायदा होईल तसेच तरुण पिढी 21 व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज असेल हे आपण सर्वांनी एकत्रित येऊन सुनिश्चित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
2023 मधील जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील फलनिष्पत्ती , धोरणात्मक दिशानिर्देश आणि वचनबद्धतेचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ब्राझीलच्या आगामी जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी भारत पाठिंबा देईल असे आश्वासनही त्यांनी दिले. शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्राझीलसोबत काम करण्यास तयार असून जी-20 शिक्षण कार्य गट व्यासपीठाला सकारात्मक बदलाचे आश्रयस्थान बनवू, असेही ते म्हणाले.
जी-20 भारतीय अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील सहयोगी कृती मंत्रिस्तरीय प्रतिबद्धतेच्या पलीकडे गेली असून शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेमध्ये पसरलेल्या 5.2 कोटी भागधारकांचा सहभाग दिसून आल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. यातून‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेत भर दिल्याप्रमाणे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेला मूर्त रूप मिळत असल्याचे ते म्हणाले.
शबाना आझमी म्हणाल्या, ‘लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा,जावेद अख्तर म्हणाले ,काहीजण काळाचे चक्र उलटे फिरवू पाहत आहेत पण ते शक्य नसते .
पुणे -कमानेवाला खायेगा, लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा अशी घोषणा आज येथे प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिली तर प्रख्यात गीतकार जावेद अख्तर म्हणाले, काही लोक काल चक्र उलटे फिरबून मागील काळ पुन्हा आणू पहात आहेत, मात्र असे कधी ही शक्य होत नाही हे ते विसरलेत, काळ कधी मागे जात नाही, तो पुढे पुढेच जात राहतो… या दोहोंनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान यांच्या उपस्थितीत पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव केला.
यावेळी शरद पवार म्हणाले, नारी शक्तीच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा असा हा आजचा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांपासून यशस्विनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपले सहकारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की कर्तृत्वाचा वारसा हा केवळ पुरुषांकडे नाही. संधी मिळाली तर कर्तृत्व गाजवण्याबाबत मुली किंवा स्त्रिया कधीही कमी पडत नाहीत. याठिकाणी महिला धोरणाचा उल्लेख करण्यात आला. आम्ही महिला धोरण ठरवले आणि काही नवे कायदे केले. हे करताना त्याचे स्वागत झाले असे नाही. सुरुवातीच्या काळात याला छुपा विरोध झाला. मात्र मला आनंद आहे की हे महिला धोरण संपूर्ण देशाने स्वीकारले. त्यामुळे अनेक क्षेत्रात अतिशय उत्तम कर्तृत्व मुली दाखवत आहेत. ज्यातून देशाला पुढे नेण्यासाठी योगदान मिळत आहे. या सर्व निर्णयाबद्दल मला कोणी विचारते तेव्हा मला माझी आई आठवते. माझ्यावर जे संस्कार घडले, जे विचार आले, त्यामागे माझी आई आहे. तिच्या कष्टांमुळेच कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो हे चित्र घरात निर्माण झाले. त्यामुळे आम्ही सर्व भावंडं जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो. एखादी भगिनी एक व्यक्तिमत्व कसे घडवते, एक कुटुंब कसे घडवते, याची शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे अशी उदाहरणं देण्यासंबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व ज्या व्यक्तींकडे आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना अधिकार दिला पाहिजे. हे जसे आपण करत राहू तसा हा देश आणि समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आज देशात जे बदल दिसत आहेत त्यात पुरूष आणि महिलांच्या अधिकारात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत काही अंतर नाही. देशात स्वातंत्र्यानंतरच्या शक्तीशाली प्रधानमंत्री कोण हे विचारल्यावर इंदिरा गांधी हे उत्तर येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंदिरा गांधींनी देशात एक प्रतिष्ठा देण्याचे काम केले. रशियासारख्या बलाढ्य देशाने तेव्हा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा जो सन्मान करायला हवा होता तो केला नाही म्हणून आपला स्वाभिमान गहाण टाकू शकत नाही, हे दाखवण्याची भूमिका तेव्हा इंदिरा गांधींनी घेतली. त्या एक शक्तीशाली प्रधानमंत्री होत्या म्हणून हे घडलं. कर्तृत्व दाखवण्याऱ्या यशस्विनींचा सन्मान याठिकाणी झाला. त्याबद्दल यशस्विनी आणि सर्व टीमचे पुनश्च अभिनंदन करतो.असेही पवार म्हणाले .
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा होणार
पुणे, दि. २२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून हा “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्यादृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यादृष्टिने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत यावर्षीही २६ जून रोजी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा आणि राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा पुणे येथून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
**
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार -2022 आणि 2023 प्रदान; महाराष्ट्रातील तीन जणींचा गौरव
नवी दिल्ली, 22 जून 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज परिचर्या व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना वर्ष 2022 आणि 2023 साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. आज (22 जून 2023) राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील, परिचारिका ब्रिगेडियर अमिता देवराणी तसेच पुष्पा श्रावण पोडे, सहाय्यक परिचारिका सुजाता पीटर तुसकानो यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 सालापासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली. परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाशी संबंधित सेवेकऱ्यांनी समाजात केलेल्या सेवाकार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मुंबई यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 जून 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
पं.बिरजू महाराज यांच्या नावच्या नृत्य महोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन : कृष्णकुमार गोयल
समर्पित नृत्यकला ही पूजाच : उमा खापरे
पुणे :
नंदकिशोर कल्चरल सोसायटी व कोहिनूर ग्रुप यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी शानदार कार्यक्रमात करण्यात आले. मुंबईतील ज्येष्ठ कथक नर्तिका पद्मा शर्मा व आसामचे ज्येष्ठ कथक नर्तक बिपुल चंद्रदास यांना नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज राष्ट्रीय पुरस्कार तर नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज युवा पुरस्कार बनारसचे युवा कथक नर्तक सौरव व गौरव मिश्रा यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यास पं.नंदकिशोर कपोते, आमदार उमा खापरे , ज्येष्ठ उद्योजक तसेच कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष होते.संदीप साकोरे, सुनील सुंकरा यांनी सूत्रसंचालन केले. मानपत्राचे वाचन किरण जावा यांनी केले.
बुधवार, दि. २१ जून २०२३, सायंकाळी सहा ते आठ या वेळात घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
पं.कपोते म्हणाले, ‘ पं. बिरजूमहाराज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती आपल्यासोबत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत ते नृत्य शिकवत राहिले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा महोत्सव आणि पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘ पुणे ही कलांची राजधानी आहे. या ठिकाणी पं. बिरजू महाराज यांच्या स्मृती जपणारा महोत्सव होतो आहे, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे.डॉ.पद्मा शर्मा यांचे नृत्य क्षेत्रातील योगदान श्रेष्ठ असून त्यांचा गौरव करणे हेच भाग्य आहे.कलेचे सादरीकरण आनंद निधान असते. या महोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मता पुढे जात आहे, याचा आनंद आहे. या महोत्सवामुळे देशभरातील कलाकारांना व्यासपीठ मिळत राहील. ‘
आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘ पं. बिरजू महाराज महोत्सव पिंपरी -चिंचवड मध्येही आयोजित केला गेला पाहिजे. नृत्याचे शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यात वय आडवे येत नाही, हे पं. बिरजू महाराज, विपुल चंद्रदास , पं.कपोते यांच्याकडे पाहून लक्षात येते.पं.कपोते यांनी समर्पित जीवनातून नृत्याला वाहून घेतले आहे, ही एक पूजाच आहे.
डॉ.पद्मा शर्मा म्हणाल्या, ‘ गुरूंनी दिलेले ज्ञान, परंपरा पुढे चालविण्याचे काम आम्ही करीत आहोत. हे कर्तव्यच आहे. सुगंधाचा प्रसार होतो, तसा नृत्याचा प्रसार झाला पाहिजे. ‘
बिरजू महाराजांना नृत्यातून आदरांजली
ज्येष्ठ कथक नर्तिका डॉ.पद्मा शर्मा (मुंबई), ज्येष्ठ कथक नर्तक बिपुल चंद्रदास (आसाम), युवा नर्तक सौरव- गौरव मिश्रा(बनारस) यांनी कथक नृत्यातून बिरजू महाराज यांना जणू आदरांजलीच अर्पण केली ! डॉ. पद्मा शर्मा यांनी ‘बाजी कहे ‘ ही रचना सादर केली. विपुल चंद्रदास यांनी बिरजू महाराज यांचे पद ‘ वर्णत छवी श्याम सुंदर ‘, परन,तिहाई ,दादरा का चलन सादर केले. सौरव गौरव यांनी युगल नृत्य सादर केले. भगवान शिव आराधना ने सुरुवात करण्यात आली. नंतर प्रसिद्ध घराण्यांच्या चिजा सादर केल्या. माखनचोरी, दादरा सादरीकरणाने मने जिंकली. पं.कपोते यांनी पं.कपोते यांनी पं.बिरजू महाराज यांच्या तीन ताल मधील बंदिशी, बिरजू महाराजांचे भजन ‘ गोविंद गोपाल मुरारी ‘ सादर केले. या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले.
सुरक्षेत कपाती नंतर ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवसेना शाखेवर बुलडोझर, मुंबई महापालिकेची कारवाई
अरविंद सावंत म्हणाले ,’40 वर्षांपूर्वीची इमारत अनधिकृत कशी?
मुंबई-मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. तब्बल 40 वर्षांपासून ही शाखा तेथे अस्तित्वात होती. त्यामुळे या कारवाईवरून राजकारण तापले आहे.ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईवरुन शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. खासदार अरविंद सावंत म्हणाले, ज्या शाखेवर महापालिका कारवाई करत आहे, ती शाखा 40 वर्षे जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील पालिका प्रशासनाने अधिकृत केल्या आहेत. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असे महापालिका कसे म्हणू शकते?. गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेने ठाकरे गटाविरोधात कारवाई करत आहेत. हे योग्य नाही.
मुंबई महापालिकेच्या या कारवाईमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार शाखेतील उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे प्रथम फोटो हटवले. त्यानंतर बुलडोझरने पाडकाम करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कारवाईवरून माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. हाजी हलीम खान यांनी म्हटले आहे की, शिंदे गटात येण्यासाठी मला 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर नाकारल्यामुळेच माझे कार्यालय असलेल्या या शाखेवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातच शेताच्या जागेवरून मारहाण
पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हाणामारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर, एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे.जमिनीचे कागदपत्राबाबत कामासाठी शेतकरी कार्यालयात आला असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता पुणे पोलीस) या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने झालेल्या घटनेबाबत खुलासा करताना असे म्हटले आहे कि ,
राजू चव्हाण आणि कैलास चव्हाण या दोघा भावंडांमध्ये शेताच्या जागेवरून वाद होता. अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर त्याबाबतच्या सुनावणीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यात राजू चव्हाण याने कैलास चव्हाणचे वकील यांना शिवीगाळ केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा होता. याच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याचा संबंध नाही. याबाबत आवश्यक कार्यवाही बंडगार्डन पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा pic.twitter.com/4bK7JAVAg4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 22, 2023
उपनगर वार्ताहरावर झालेल्या गोळीबाराचे गूढ उकलले, ६ जण पकडले, पोलीस म्हणाले सूत्रधारही लवकरच ताब्यात घेणार
पुणे- येथील उपनगर वार्ताहर हर्षद कटारिया यांच्यावरील हल्ला जमिनीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतले आहे यातील दोघांना अटक केली आहे .तर चार जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले . या हल्ल्यामागील सूत्रधाराची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली असून लवकरच त्यास हि ताब्यात घेऊन त्याचा पर्दाफाश पोलीस करतील असे सांगण्यात आले आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे वय २० रा.११४ सी बिल्डींग पीएमसी कॉलनी ,राजेंद्रनगर आणि अभिषेक शिवाजी रोकडे वय २२ रा. जाधवरांच्या वाड्याशेजारी ,नांदेड गाव अशी आहेत .धायरी आणि नांदेड गावातूनच अन्य ४ अल्पवयीन आरोपीना देखील पोलसांनी ताब्यात घेतले आहे.परिमंडल २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
दि. 24/05/2023 रोजी रात्री 19.00 वा. चे सुमारास कटारिया नावाचे उपनगर वार्ताहर ,ज्याचा जमिनी खरेदी विक्रीचाही व्यवसाय आहे हे त्यांचे दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या 05 अज्ञात आरोपींनी त्यांचे दुचाकीला गाडी आडवी लावुन त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकुन कोयता घेवुन त्यांच्या अंगावर धावुन गेले असता कटारिया हे सदर ठिकाणाहून त्यांचा जीव वाचवुन पळुन गेले. त्यानंतर दि. 11/06/2023 रोजी रात्री 21.00 वा. चे सुमारास कटारिया यांचा पाठलाग करून त्यांच्या घराजवळ आले असता त्यांचेकडील पिस्तुलमधून एक राउंड फायर केला प्रांती कटारिया गाडीवरच खाली वाकल्याने ते त्यातुन वाचले व तेथुन ते सोसायटीचे आतमध्ये गाडी घेवुन गेले व त्यांचेवर झालेला प्राणघातक व जिवघेणा हल्ला झाल्याने पोलिसात तक्रार दाखल झाली होती .
या गुन्हयातील काही आरोपी हे तोंडाला रुमाल व मास्क घालुन तसेच काही आरोपी हे तोंड लपवत डोक्यावर टोपी परिधान करुन रात्रीच्या वेळी हल्ला करीत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले परंतु त्यांची ओळख व गाडयांचे नंबर ओळखणे अतिशय जिकरीचे व अवघड झाले होते. आरोपी हे इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपचे कॉलींगद्वारे एकमेकांचे संपर्कात असल्याने त्याबाबत तात्रीक विश्लेषनामध्ये अडचण येत होती. स्वारगेट तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जवळ जवळ 100 ते 120 सीसीटिव्ही फुटेज चेक केले परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळुन आली. नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग 15 दिवस अहोरात्र चिकाटीने आरोपीचा शोध घेतला असता पो. अं. अनिस शेख, पो. अं. शिवदत्त गायकवाड, पो.अं. संदीप घुले, पो.अं. फिरोज शेख व पो.अं सोमनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि या गुन्हयातील संशयित आरोपी रांजणगाव येथे जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक व पोलीस उप निरीक्षक अशोक येवले यांचे पथक असे दोन पथके तयार करुन सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक रांजणगावकडे रवाना केले तसेच पो. उप निरी येवले यांचे पथक धायरी भागात थांबुन होते. संशयित आरोपी हे पेरणेफाटा लोणीकंद याठिकाणी थांबले आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावला असता त्या ठिकाणी आकाशी रंगाचा हाफ बाहयाचा टि शर्ट व काळया रंगाचा फुल बाहयाचा टि शर्ट घातलेले दोन इसम सदर ठिकाणी संशयीत रित्या फिरत असल्याचे दिसुन आले तसेच पोलिसांची चाहुल लागताच ते जोरात पळुन जात असताना पोलिसांनी त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचे इतर साथीदारांचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो. हवा. तारु,पो.अं.दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे व रमेश चव्हाण असे मिळुन धायरी, नांदेडगांव या परिसरामध्ये पहाटेचे सुमारास सापळा लावुन 04 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता ते अल्पवयीन असुन त्यांचा दाखल गुन्हयामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान 01 गावठी पिस्टल, 01 जिवंत काडतुस 03 कोयते, गुन्हयात वापरलेल्या 04 दुचाकी गाडया व 03मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हा हा जमिनीच्या आर्थिक व्यवहारातुन सुपारी घेवुन घडला असल्याचे प्रथमदर्शनी तपासावरुन निष्पन्न झाले आहे. आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असुन ते सराईत व घातक हत्यारानीशी वावरत असल्याने त्यांना पकडणे धोकादायक होते तरी वरील स्टाफच्या मदतीने अतिशय सावधगीरीने व शिताफीने त्यांना जेलबंद करण्यात स्वारगेट तपास पथकाला यश आले आहे.असे स्मार्तना पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर , यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकअशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पो.हवा मुकुंद तारु, पो.शि सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
बार्टी मार्फत मिळणार रोजगार व स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण
पुणे, दि. २२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील उमेदवारांना रोजगाराचे व स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जात असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जातीतील २५ हजार उमेदवारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली आहे.
विज्ञान तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल लक्षात घेता प्रगत, प्रशिक्षित, मनुष्यबळाला मोठी मागणी निर्माण होणार आहे, हे लक्षात घेऊन बार्टीने रोजगार, स्वयंरोजगार तसेच परदेशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बार्टी मार्फत पहिल्या टप्यामध्ये ५ हजार उमेदवारांना टाटा स्ट्राईव्ह, लर्नेट स्किल लि., आयसीआयसीआय, स्किल ॲकॅडमी तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात काढणी तंत्रज्ञान संस्था, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, खादी व ग्रामोद्योग मंडळ, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था, व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान संस्था या शासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल आत्मसात करण्यासाठी विविध कौशल्य असणारे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी बार्टीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू आहे. मागील वर्षी ३ हजार १८० उमेदवारांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यात आले आहे.
अनुसूचित जातीतील युवक-युवती आणि महिलांना विकासाची दिशा दाखविणारे समुपदेशन, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, परेदशी भाषा प्रशिक्षण, नोकरी व स्वयंरोजगारासाठी लागणारे कौशल्याचे प्रशिक्षण बार्टीमार्फत दिले जाते. लक्षित गटातील शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती उंचविण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही आदी कामे बार्टीच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
परदेशात रोजगाराची संधी मिळविण्यासाठी बार्टी मार्फत ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्रामची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील ५०० उमेदवारांना बहरीन,कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया,आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बार्टीचे महासंचालक श्री. वारे यांनी केले आहे.
रिक्षा चालक मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ गठीत होणार :- उदय सामंत
बाबा कांबळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पिंपरी येथे उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली,
पुणे-महाराष्ट्रातील विस लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उद्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय प्राधान्याने घेऊन तातडीने रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ गठित करण्याचे कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रिक्षा चालक मालकांच्या शिष्टमंडळास दिले,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एका महत्त्वाच्या विषयासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे आले असता यावेळी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वावरील शिष्टमंडळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व रिक्षा चालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळा संदर्भात चर्चा केली असता त्यांनी हे आश्वासन दिले असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती व देशव्यपी फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,
बाबा कांबळे म्हणले गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांनसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी रिक्षा चालक मालकांनी केली आहे, या साठी अनेक आंदोलने व मोर्चा देखे रिक्षा चालक मालकाने काढला होता त्याची देखील सरकारने आता कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली आहे परंतु याची अंमलबजावणी व्हावी, रिक्षा चालक मालकांना इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान मिळावे मुक्त रिक्षा परवाना बंद व्हावा यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी कृती समिती व नॅशनल ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने, महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे, या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले.
अली दारूवाला यांची रुबी हॉलच्या सल्लागार पदी नियुक्ती
पुणे :
येथील सामाजिक कार्यकर्ते अली दारूवाला यांची ग्रँट मेडिकल फाउंडेशन संचालित रुबी हॉल या हॉस्पिटलच्या सल्लागार पदावर नियुक्ती झाली आहे .ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.परवेझ ग्रँट यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.’रुबी हॉल हे ९०० बेडचे देशातील अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरविणारे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला अली दारूवाला नवीन उंचीवर घेऊन जातील’, असा विश्वास डॉ.परवेझ ग्रँट यांनी यावेळी व्यक्त केला.अली दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत.अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग(नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती झाली आहे.
वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्र आणा.
मुंबई, दि. २२ जून २०२३
महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणतात की, महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चीपचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १. ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती व लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होते. तसेच पूरक उद्योगांमधूनही मोठया प्रमाणात रोजगार मिळणार होते पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रात व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्रातील पुणे परिसरात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकुल वातावरण आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, त्यांना आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणा-या कंपनीसाठी इथे प्रकल्प लवकर उभा करून उत्पादन सुरु करणे सोपे होणार आहे.
