Home Blog Page 1480

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं तुळजाभवानी चरणी साकडं.

तुळजापूर, दि. २३ जून २०२३
राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन काँग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धाराशिव व सोलापूरच्या दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यासमोर सर्वबाजूंनी संकटं उभी आहेत पण भाजपाचे हे सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचतच नाही. शेतकरी विरोधी भाजपाला पावसाळी अधिवेशनात जाब विचारू. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे, तसेच लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. मोठ्या संघर्षानंतर, काँग्रेस विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आज देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान धोक्यात आहे. मणिपूर ५० दिवसांपासून पेटलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिकेत भाषणे देत आहेत. देशावरचे भाजपाचे हे संकट दूर झाले पाहिजे व स्वातंत्र्याचा सूर्य कायम राहिला पाहिजे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा ईडी, सीडी, सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील आजचे राजकीय चित्र अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी भाजपा मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे. परंतु काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेचीच इच्छा असून जनसमर्थन व आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने केंद्रात व राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल.

भाजपच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीचे नाही.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीवर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पोपट काहीही बोलला की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, त्यांचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचेही नाही. ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना जर लोकशाही मान्य असती तर नवीन संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असते असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

केंद्र तसेच राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची अपेक्षा

पुणे-माणसाची जेव्हा प्रगती होते ती वेगवेगळ्या टप्प्यात होते. आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, वैचारिक प्रगती तशी आपली एका टप्प्यावर प्रगती झालेली आहे. परंतु विधवा महीलांबरोबर काम करताना आपल्याला अजूनही खूप प्रयत्न करण्याची गरज दिसून येते. केंद्र व राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्र पुणेच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

दिल्ली येथील मुक्ती अभियान राष्ट्रीय आयोजित राष्ट्रीय विधवा महिला परिषदेत दृकश्राव्य माध्यमातून बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आज आपण एका विशिष्ट टप्यावर येऊन पोहोचलो आहोत. मात्र, पुढे अजून काम करण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी रितीपरंपरानुसार एखादी महिला विधवा झाली तर महिनोन्महिने तिचे घराबाहेर पडणे बंद केले जाते. आजूबाजूची कामे करण्यासाठी, अनेक निर्णय घेण्यासाठी जमीन- जुमल्याचे काम करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणाची काम करण्यासाठी तिला इतर व्यक्तींवर, अवलंबून राहावे लागते. आणि त्याचा परिणाम असा होतो की, अनेक वेळेला प्रॉपर्टीचा किंवा अनेक गोष्टींचा हक्क या महिला दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतात.

कुठल्याही धर्माची महिला असली तरी दहा ते पंधरा दिवसांमध्ये सगळे विधी संपू शकतात आणि त्यानंतर ती स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते आणि तो घेतलाही पाहिजे. तसेच अनेकदा अनेक लोक या महिलांना मदत करण्यासाठी येतात, परंतु त्या वेळी देखील थोडे जागरूक राहून समोरील व्यक्तीचा मदत करण्याचा हेतू काय आहे? याचा विचार केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

शरद पवार म्हणाले,’देशात धार्मिक तेढ वाढविली जाते आहे,त्यामुळे एकत्र यायलाच हवे

बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षाची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत देशभरातील प्रमुख नेते सामील झाले होते. संबंधित नेत्यांनी आगामी निवडणुकीमध्ये एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्षाची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे

ज्या ठिकाणी भाजप विरोधकांची सत्ता आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या वतीने सामाजिक, सांप्रदायिक स्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्रच लढावे लागणार आहे. आमच्यात काही मतभेद असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, ‘जयप्रकाशजी यांच्या नेतृत्वात एक संदेश देण्याचे काम या ठिकाणी झाले होते. अनेक आंदोलनाची सुरवात या ठिकाणावरुन झाली आहे. तेच पुढे जन आंदोलने झाले आहेत. आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन आपसातील मतभेद सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय आणि देशातील जनता आम्हाला पाठिंबा देईल असा मला विश्वास आहे.’

शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “सध्या देशात आपण दररोज नवनवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्यांचा सामना केला पाहिजे. आमच्यात काही मतभेद असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्परांमधील मतभेद विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, पाटण्यापासून देशात बदल घडवण्याची सुरुवात झाली आहे.”“मला आठवतंय की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने पाटणा येथून एक संदेश दिला होता. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासाने याची दखल घेतली. आजच्या परिस्थितीत नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्रपक्ष इथे आले. या बैठकीत आम्ही एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही देशाला नवी वाट दाखवण्याचं काम सुरू केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता आमच्या निर्णयाचं स्वागत करेन” असंही शरद पवार म्हणाले.

 कितीही रक्त सांडलं तरी रक्त सांडू द्या, आम्ही देशाच्या जनतेची रक्षा करू

पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना UPA चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक 10 ते 12 जुलैदरम्यान होऊ शकते.

ठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही रक्त सांडलं तरी रक्त सांडू द्या, आम्ही देशाच्या जनतेची रक्षा करू, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, “पाटणा येथील बैठकीमधून जनआंदोलनाला सुरुवात झाली आहे. याआधीही खूप सारे आंदोलन पाटणामधून सुरू झाले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यापूर्वी दिल्लीत आम्ही अनेक बैठका घेतल्या पण त्यातून काहीही सकारात्मक घडलं नाही. पण पाटणा येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.”

“भाजपाचं सरकार हुकूमशहाकडून चालवलं जात आहे. जर कुणी सत्ताधारी पक्षाविरोधात बोललं तर त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. प्रसारमाध्यमांना पूर्णपणे नियंत्रित केलं आहे. वकिलांची फौज न्यायालयात पाठवून आमच्याविरोधात खटले दाखल केले जातात. पण ते (नरेंद्र मोदी) बेरोजगारीच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सामान्य लोकांच्या हिताचं ते बोलत नाहीत. अर्थव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, दलितांवरील अन्याय यावरही काही बोलत नाही. आवास योजना, ग्राम सडक योजनेचे पैसेही दिले जात नाहीत,” अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“त्यामुळे मोदी सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात आम्ही सगळे मिळून एकत्र लढाई लढू. कितीही रक्त सांडलं तरी सांडू द्या, पण देशाच्या जनतेची रक्षा करू. २०२४ ला पुन्हा हुकूमशाही सरकार सत्तेत आलं तर यापुढे देशात निवडणुकाच होणार नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी
तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये (1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 ) या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.
युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.
मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कव‍िय‍त्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादामीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांच्या हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कव‍ियत्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रीया दिली.’ कुटूंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगुन आपल्याला जे आवडत ते लिहीण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटींग मध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50 नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटींग आणि कॉपीरायटींग त्यांनी केलेलं आहे.
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.)विलास पाटिल यांचा समावेश होता.
सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आंनद’ या मराठी बाल कव‍िता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिह‍ित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’
साहित्य‍िक आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाटयछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता.

समान संधी केंद्रे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आधार

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यामुळे भविष्यातील संधी ओळखून नियमित अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतत दिशादर्शक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत.”ज्ञान ही शक्ती आहे, माहिती म्हणजे स्वातंत्र्य तर शिक्षण हा प्रत्येक कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे…”

विद्यार्थ्यांचे सामान्य जीवन सद्या गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील आज आपण खूप बदल होतांना बघत आहोत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्री-शिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षेसह उद्योजकता, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाकडून ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन ‘समान संधी केंद्र’ सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. ‘समान संधी केंद्र’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच उद्योजक निर्मिती किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षणासह सर्वसमावेशी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेचे सर्वच स्तरातून स्वागतही करण्यात येत आहे.

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसली तरी प्रत्येक महाविद्यालयात केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश तसे देण्यात आलेले आहेत. यामध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय साधाण्याची सूचना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी महत्त्वाचे मानायला हवे. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि योग्य समुपदेशन ‘समान संधी केंद्रा’ द्वारे होवू शकते.
मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. मागासवर्गीय मुला-मुंलीना उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता, व्यावसायिक, कौशल्य शिक्षण आदि महत्वाकांक्षी उपक्रम “समान संधी केंद्र”च्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
शाळांमधील करिअर समुपदेशनाची सध्याची प्रणाली आणि मुख्य शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती नेमकी काय आहेत या सर्व बांबीचा विचार करूनच “समान संधी केंद्र” उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. व्यावसायिक शिक्षणाबाबत असलेल्या धारणा पासून मुक्त करण्यासाठी आणि त्या महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी सर्व संबंधितांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्रे’ तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालयनिहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा किंवा इतर समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, ‘समान संधी केंद्रा’चे उद्दिष्ट्य आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे,(भा.प्र.से.)
आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. २३: सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.

ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.

सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.

भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.

यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.
0000

देशाची एकता- अखंडता आबाधीत ठेवण्यासाठी एकत्र; विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरे यांचे मत

पाटणा

आमच्यात काही मतभेद असू शकतील. पण देशाची एकता आणि अखंडता आबाधीत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. बिहार मधील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना UPA चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली आहे.

या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमागील उद्देष्ट स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘तुम्ही पाहात आहात की, जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. सर्वांना हे माहित आहे की, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत, त्यामुळे आमच्यात काही मतभिन्नता असू शकते. मात्र, आमचा देश एक आहे. आणि या देशाला वाचवण्यासाठी आणि देशाची एकता अखंडीतता अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि यापुढे जेव्हा कधी देशाच्या लोकशाहीवर हल्ला होईल, त्याचा आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणार आहोत. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यावर कायमच शंका उपस्थित केली जाते. मात्र मी स्वतःला विरोधी पक्ष मानत नाही. जे देशद्रोही आहेत, त्यांचे आम्ही विरोधक आहोत. आज पासून चांगली सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की, सुरुवात चांगली झाली की, पुढील काळात देखील सर्व चांगले होईल. आता यापुढे आम्ही भेटत राहू आणि बाकीच्या गोष्टी नक्की ठरवलेल्या जातील.’

पूर्व भागातील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती 

गुरूवार पेठेतील प्रभात जनप्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम ; तब्बल २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याला ओळखले जाते. विद्येच्या या माहेरघरामध्ये कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने व सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने शहराच्या पूर्व भागातील तब्बल २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला एक महापुरूषाची प्रतिमा देखील देण्यात आली. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांसमोर महापुरूषांचा आदर्श निर्माण व्हावा, म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने व सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने पुण्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याची मदत कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाहट्टी चौकातील नाकोडा भैरव जैन धर्मशाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव, सेवा सहयोग संस्थेचे पुणे प्रतिनीधी विजय जोशी, प्रभात जनप्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, अमोल थोरात,  उदय वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यामध्ये  दप्तर, वह्या, कंपास पेटी व महापुरूषाची प्रतिमा देण्यात आली. 

विजय जोशी म्हणाले, शिक्षण घेत असताना मुलांनी अभ्यासाबरोबर मैदानावर देखील जायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक किल्ले आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. तसेच या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांबरोर अनेक मावळे लढले त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वतःचा सर्वांगीण विकास देखील केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

किशोर चव्हाण म्हणाले, दरवर्षी प्रभात जनप्रतिष्ठानच्यावतीने पूर्व भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. परंतु विद्यार्थ्यांसमोर शालेय जीवनातच चांगले आदर्श निर्माण व्हावेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एका महारूषाची प्रतिमा दिली आहे. यामुळे मुले त्यांची माहिती स्वतःहून मिळविण्याचा प्रयत्न करतील व  विद्यार्थ्यांना महापुरूषांची ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, गौरव मळेकर यांनी आभार मानले.

हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पंढरपूर दि. २३ :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी  पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 पालकमंत्र्यांनी केले सारथ्य

धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.  पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटला

सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे  आगमन सकाळी 10.40 वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र  डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

हरिनामात वारकरी तल्लीन

टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी,

वाट ती चालावी पंढरीची

या संत वचनानुसार  टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते.  प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे.

धर्मपुरी येथे पालखी अगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व  स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने उभारलेल्या तात्पुरत्या अतिदक्षता कक्षास  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर  माऊलींची पालखी पाटबंधारे  विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

नातेपुते येथे पालखीचा मुक्काम

धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गस्थ झाली.

परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना

समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थी अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अंमलबजावणी केली जाते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना ही शासनाची महत्वाची योजना आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेणे कठीण असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

हा लाभ दिला जातो

योजनेसाठी पात्र असणा-या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ योजनेतून दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असते. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी, एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये ज्या परदेशी विद्यापीठांचे रँकिंग 300 पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही योजना देय आहे.

अर्ज कुठे करावा

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा. परिपूर्ण अर्ज समाजकल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्यास मुदतवाढ

वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळवून देणारी ही महत्वपूर्ण योजना आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जूनपर्यंत होती. ती आता 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.

–  उपायुक्त सुनील वारे, प्रादेशिक समाजकल्याण कार्यालय

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

             मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती‘ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

                ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), मुंबई – गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलै, २०२३ पर्यंत  अर्ज करावेत.

0000 

ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’

राज्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक उद्योग असणा-या साखर उद्योग क्षेत्रात ऊसतोडणीचे काम करणारे बहुतांश कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. ऊसतोडणीच्या ऐन हंगामात विविध गाव- तांड्यावरून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. या हंगामी स्थलांतरामुळे त्यांच्या कुटुंबीयाना अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि ते तितकेच भेडसावतातही. त्यांच्या या स्थलांतरामुळे वृद्धांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ आजारी नागरिकांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेणे, लहान मुलांची शाळेतील अनुपस्थिती वाढणे, शालेय किशोरवयीन मुलींची काळजी घेणे किंवा मग अनिच्छेने का होईना त्यांचा विवाह करणे, त्यांच्या घरे, पाळीव जनावरे, प्राण्यांच्या देखभाल करणे यासह ऊसतोड कामगाराची गरोदर पत्नी असल्यास एकतर तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबणे किंवा मग तिला सोबत ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच त्या ऊसतोड कामगाराकडे राहत नाहीत. यासह इतर अनेक समस्यांना या कामगारांना तोंड द्यावे लागते.

या व्यवसायातील कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून दरवर्षी होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजुरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरी ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना विशेष अशा शैक्षणिक सुविधा पुरविणे देखील आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे सुरु आहे. यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम गतीने सुरु आहे.

आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात करण्यात आलेल्या योजनेत परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल व तत्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार १८ हजार ११३ असून, ते व त्यांचे कुटुंबीय अस्थिर व हलाखीचे जीवन जगत आहेत. या ऊसतोड कामगारांच्या राहणीमानात बदल होण्यासाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ४ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना स्थिर व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत.  वास्तव्यास असलेल्या ठिकाणी व सतत मागील तीन वर्षांपासून ऊसतोड कामगार असणाऱ्यांना ग्रामसेवकाने ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, कामात सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास तातडीने निराकरण करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती देण्यासाठी महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे ३ एप्रिल २०२२ रोजी सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना शासकीय पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात येत आहे. भविष्यात ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये घरकुल, वैद्यकीय सुविधा, ऊसतोड करतेवेळी होणारे अपघात लक्षात घेता, भविष्यासाठी राज्य विमा योजना, त्यांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, कौशल्य विकास योजना, कमी व्याजदराने भांडवली कर्ज योजना, ऊसतोड वाहक व चालकांसाठी विमा योजना, स्वस्त धान्य योजना, अंगणवाडी शाळा इ. योजना राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात ७ साखर कारखाने कार्यरत असून, त्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांची संख्या ही १८ हजार ११३ एवढी आहे.  यामध्ये श्री. रेणुका शुगर लिमिटेड, देवनांद्रा ता. पाथरी येथे १ हजार ६५५, श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर एल.एल. पी. अमडापूर ता. जि.परभणी. येथील कारखान्यात ६७२, योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, लिंबा ता. पाथरी  येथे ४ हजार २८९, गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड, माखणी ता. गंगाखेड येथे ५ हजार ११९, बळीराजा साखर कारखाना लिमिटेड, कानडखेड ता. पूर्णा येथे ७२०, ट्वेंटी वन शुगर लिमिटेड, देवीनगर तांडा, सायखेडा, ता. सोनपेठ येथे ५ हजार २०८ आणि श्री. तुळजाभवानी शुगर प्रा.लि. आडगाव (दराडे), ता. सेलू येथे ४५० असे एकूण १८ हजार ११३ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत या योजनेंतर्गत ५ हजार ६४८ ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आले असूनत्यांची तालुकानिहाय आकडेवारी ही पुढीलप्रमाणे आहेपरभणी ४२४, जिंतूर ३९२, गंगाखेड ९७५, सेलू १६५, मानवत ६५८, पाथरी २ हजार २६१, पालम १९२, पुर्णा ४१२ आणि सोनपेठ तालुक्यात १६९ कामगारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ओळखपत्राचे वितरण हे पाथरी तालुक्यात झाले असून, सर्वात कमी ओळखपत्र सेलू तालुक्यात वितरीत करण्यात आले आहेत.

 ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी दिनांक ०६ जून २०२३ अखेर माहे मे – २०२३ मध्ये परभणी जिल्ह्यात एकूण ९०० ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली आहे. या आरोग्य तपासणीत १३ गर्भवती ऊसतोड कामगार होत्या. त्या सर्व महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यांना व नवजात बालकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नियमित सुरु आहे.

ऊसतोड कामगार असलेल्या सर्जेराव तोडके या लाभार्थ्याचा अभिप्राय 

सर्जेराव पाराजी तोडके, रा. तुरा पो. रामपुरी ता. पाथरी जि. परभणी येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार ओळखपत्र वितरीत केले आहे. जवळपास दहा वर्षांपासून विविध साखर कारखान्यात ऊसतोडणीचे काम करतो. मागील तीन ते चार वर्षांपासून गंगाखेड शुगर लि. विजयनगर, माखनी येथे सलग काम करीत आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी माझ्या (तुरा) गावचे ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधून माझे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करून मला ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेने ऊसतोड कामगारांना संपर्क केलेला नसून यावर्षीच पहिल्यांदाच समाजकल्याण विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मला व माझ्या काही सहकारी ऊसतोड कामगारांना समाजकल्याण विभागाच्या वर्धापनदिन निमित्त दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमास बोलावून सत्कार केलेला आहे. तसेच येणाऱ्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत माझ्या मुला-मुलींसाठी व एकूणच कुटुंबासाठी शासकीय वसतिगृह, घरकुल योजना, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य, आरोग्य विषयक सुविधा, विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबद्दल तसेच मला शासकीय कार्यालयामार्फत ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ मिळवून दिल्याबाबत मी समाजकल्याण कार्यालय परभणी  आणि ग्रामपंचायत कार्यालय तुरा यांचा मनापासून आभारी आहे.’

  • प्रभाकर बारहाते,

     माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

कैद्यांना आता महिन्यातून ३ वेळा घरी फोनवर बोलण्याची संधी :तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची महत्त्वपूर्ण योजना…

पुणे-कारागृहातील कैद्यांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईनबॉक्सऐवजी स्मार्टकार्ड फोनद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी चांगल्यारितीने झाल्यास संपुर्ण राज्यात स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित सुविधेचे उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.कैद्यांना नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉइन बॉक्स सुविधा आहे. परंतु, कॉईन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध होत नाहीत. कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास दुरूस्त करून मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी सुविधा बंद झाल्यामुळे कैद्यांचा नातलगांसोबत संवादाला आडकाठी निर्माण झाली होती. त्याशिवाय अति सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स असलेल्या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरण्याची शक्यता होती.त्यापार्श्वभूमीवर काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्याची शिफारस शासनाकडे केली होती.

जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

पुणे, दि. २२ : जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.

आगाखान पॅलेसमधील अनेक दालनांना परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि खासगी सचिव महादेव भाई देसाई यांच्याशी निगडित घटना आणि इतिहास जाणून घेतला. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधी हे सर्व पाहून भारावून गेले होते. अन्य परदेशी प्रतिनिधींनीदेखील येथे छायाचित्रे काढून घेऊन आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक प्रतिनिधींनी आपल्या जवळील मोबाईलमध्ये छायाचित्रण कैद करुन घेतले.

महात्मा गांधी यांच्या वापरातील अनेक वस्तू आणि अनेक प्रसंगाशी निगडित छायाचित्रे येथे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्याचाही आनंद परदेशी पाहुण्यांनी घेतला. या स्मारकाशी संबंधित असलेल्या नीलम महाजन यांनी परदेशी प्रतिनिधींना या ऐतिहासिक वास्तूविषयी संपूर्ण माहिती दिली.

यावेळी कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन परदेशी पाहुण्यांनी अभिवादन केले.
000