Home Blog Page 1479

प्रिया बेर्डे नंतर सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीला रामराम

BRS मध्ये प्रवेश

पुणे: लोकप्रिय नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत BRS पक्षात प्रवेश केला आहे.

सुरेखा पुणेकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता सुरेखा यांनीही पक्ष सोडत थेट हैदराबाद येथील BRS पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी गुरूवारी (ता. २२ जून) पक्षप्रवेश केला

सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेकर या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात किती फरक पडणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार – चंद्रशेखर बावनकुळे

  • चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर टोला
    • पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एक
    • मोदींनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला

पुणे – विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही.एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

पैशापासून सत्ता व सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे.म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत.अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही.आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही,असेही बावनकुळे म्हणाले.

विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीए ४०० हून अधिका जागांवर विजय मिळविणार ऐवढी ताकद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे.भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आजसुद्धा नरेंद्र मोदी अमेरिकेत भारताला मांडत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या तक्रारीची चौकशी व्हावी महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की, तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा महानाट्य ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहे. म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा,अशी मागणी पुढे आली आहे.राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत.त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील

होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी जपानला रवाना

स्पोर्ट्सलँड सुगो (जपान)23 जून २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत केलेल्या कौशल्य प्रदर्शनानंतर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची (एचएमएसआय) इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या वीकेंडला तिसऱ्या फेरीसाठी सज्ज झाली आहे. स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे होणार असलेल्या या फेरीत दिमाखदार कामगिरी करण्यासाठी टीम उत्सुक आहे.

रेसिंगचा सीझन ऐन मध्यावर असून होंडा रेसिंग इंडियाने २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या फेरीच्या अखेरीस (एआरआरसी) एकूण ११ पॉइंट्स मिळवले असून एशिया प्रॉडक्शन २५० सीसीमध्ये (AP250cc) आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी टीम सज्ज आहे.

आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, जपानमध्ये होत असलेल्या एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी आम्ही सज्ज आहोत. मला खात्री आहेकी इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या फेरीत कठोर परिश्रम करत आपले स्थान उंचावेल. स्पोर्ट्ललँड सुगो इंटरनॅशनल सर्किट आमच्या रायडर्ससाठी नवे असलेतरी अविरत प्रयत्न करत टीम नक्की चांगले यश मिळवेल. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या आणि या प्रतिष्ठित चॅम्पियनशीपमध्ये ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रायडर्सना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. या वीकेंडला जपानमध्ये त्यांची दमदार कामगिरी पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

एशिया प्रॉडक्शन (AP250) क्लासमध्ये एआरआरसी चार्जचे नेतृत्व आणि रेसिंग कौशल्याचे जबरदस्त प्रदर्शन अशी दुहेरी जबाबदारी कविन समर क्विंतल यांनी निभावली. २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत AP250cc मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ते भारतीय टीममधले एकमेव रायडर आहेत. दुसऱ्या रेसमध्येही प्रगती करण्यासाठी कविन सज्ज होते, मात्र दुसऱ्या लॅपमध्ये बाइकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. असे असूनही सेपांग इंटरनॅशनल सर्किटच्या दुसऱ्या फेरीत त्यांनी २ पॉइंट्स मिळवत संपूर्ण चॅम्पियनशीपच्या पहिल्या १५ मध्ये आपले स्थान राखले.

चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीविषयी उत्सुकता दाखवत कविन समार क्विंतल म्हणाले, ‘एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी मी खूप उत्सुक आहे. स्पर्धा आणखी तीव्र असून प्रसिद्ध स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग आव्हानाला तोंड देण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम केले असून कौशल्य उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यापूर्वी केलेल्या चुका टाळण्यावर माझा भर असेल. या वीकेंडला सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.’

दर्देवाने देशांतर्गत होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मोहसिन परांम्बेन जपानमधील फेरीत सहभागी होणार नाहीत. ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.

२०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपविषयी (एआरआरसी)

एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनीपची २६ वी आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून तिचे आयोजन केले जात आहे. २०२३ च्या हंगामात एकूण सहा फेऱ्या असून अधिकृत चाचणी आणि २४ मार्च २०२३ रोजी चँग इंटरनॅशनल सर्किट थायलंड येथे सीझन ओपनरचे आयोजन करण्यात आले होते. सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया) येथे दुसरा टप्पा होणार आहे. या वीकेंडला तिसरी फेरी स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे होणार असून चौथी, पाचवी व सहावी फेरी अनुक्रमे ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये इंडोनेशिया, चीन व थायलंडमध्ये होईल.

अमेरिकास्थित शेंदूरे परिवाराकडून विद्यार्थी सहाय्यक समितीला साडेतीन लाख डॉलर्सची देणगी

पुणे, ता. २३ : अमेरिकेतील सौ. रजनी व अशोक शेंदुरे परिवाराने विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पुण्यातील मुलींच्या वसतिगृहासाठी साडेतीन लाख डॉलर्सची (सुमारे २ कोटी ८० लाख रुपये) देणगी नुकतीच जाहीर केली. ग्रामीण भागातील मुलींची पुण्यात उच्च शिक्षणाला येण्यासाठी संख्या वाढते आहे. परवडणारा दर आणि सुरक्षितता यादृष्टीने त्यांचा समितीकडे कल असतो. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रवेशाला अडचणी येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीने शिवाजी हौसिंग सोसायटी जवळील जागेत मुलींसाठी नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरु केले आहे.
या वसतिगृहाच्या एका विंगसाठी ही देणगी देण्यात आली. त्यातून ८४ मुलींच्या निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेंदुरे परिवार मूळचे कोल्हापूरजवळील असून पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहेत. महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव काही महिन्यांपूर्वी पुण्यात आल्यावर समितीचे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी या विधायक कामाला आर्थिक मदत उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. अमेरिकेत गेल्यावर शेंदुरे परिवाराशी समितीच्या कामाबाबत चर्चा करून या देणगीबाबत विनंती केली. त्यांच्या आणि समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांच्या पाठपुराव्यामुळे या मुलींच्या वसतिगृहाच्या कामासाठी मोठा आर्थिक हातभार लाभला आहे.

उलगडली ‘आयकॉनिक ‘ इमारतींची निर्माण कथा !

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धांतील  राष्ट्रीय विजेत्यांचा संवाद
 पुणे :
शहराचे वैभव ठरणाऱ्या ‘ आयकॉनिक ‘ इमारती तयार होताना त्या मागे असणारी वास्तुरेखाकाराची दृष्टी, योगदान, कष्ट याची निर्माण कथा शुक्रवारी उलगडली.. निमित्त होते ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् ‘ संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे .. 
सार्वजनिक उपयोजन असलेल्या महत्वपूर्ण सरकारी इमारतींना सुंदर रुपडे देताना काय करावे लागते, याचा रोचक प्रवास त्यातून उलगडला.. ! या स्पर्धा आर्किटेक्ट टीमला अद्ययावत ठेवते, त्यामुळे सहभाग घेत राहावे, हार -जीत न मानता नव्या गोष्टी शिकत राहावे, असा सूर या चर्चासत्रात उमटला.
‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज’या संस्थेतर्फे ‘आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन्स -पुशिंग द एज इन आर्किटेक्चर प्रोफेशन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.  सुनील पाटील (संचालक सुनील पाटील अँड असोसिएट्स),कल्पक भंडारी( संचालक, विकास स्टुडिओ), विजय साने (पार्टनर, व्ही.के.: यु ,अर्बन) हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले. राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन मधील विजेते असलेल्या या मान्यवरां  त्यांचे अनुभव आणि विचार या चर्चासत्रात मांडले.
२३ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान  सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या  सुमंत मुळगावकर सभागृह येथे हे चर्चासत्र झाले .आर्किटेक्चर चे विद्यार्थी,आर्किटेक्ट व्यावसायिक,तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी झाले. ‘ अनबिल्ट ‘ या पुस्तकाची माहिती चर्चासत्रात देण्यात आली.
अतुल चव्हाण म्हणाले, ‘सामान्य जनतेच्या संबंधित सरकारी इमारती आल्हाददायक , उपयुक्त , पर्यावरणपूरक व्हाव्यात, चांगल्या वास्तू उभारण्यात आर्किटेक्ट समुदायाचे योगदान मिळावे. ‘
सातारा नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याची माहिती कल्पक भंडारी यांनी दिली.  सुनील पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आराखड्याचे सादरीकरण केले.विजय साने यांनी कटरा (जम्मू ) येथील इंटरमोडल स्टेशन इमारतीच्या आराखडयाचे सादरीकरण केले.

द्वैपायन चक्रवर्ति यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास भंडारी,ह्रषिकेश कुलकर्णी , आर्किटेक्ट असोसिएशनचे  पराग लकडे , अमोल उंबरजे,  विजय साने,   विशाल देशमुख, दीपा बोकील आदी उपस्थित होते.

‘सस्टेनॅबिलिटी  इनिशिएटिव्हज’  ही संस्था आर्किटेक्चर क्षेत्रातील व्ही.के. ग्रुप या कंपनीचा  एक उपक्रम आहे. व्ही.के. ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोल्डन डायलॉग ही चर्चासत्रांची मालिका आखण्यात आली असून हे चर्चासत्र या मालिकेतील तिसरे चर्चासत्र होते. 

सुनील पाटील म्हणाले, ‘ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची उभारणी करताना शंभरहून अधिक झाडे वाचविणे हे आव्हान होते. नैसर्गिक उजेड, हवा खेळती राहील, कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना थांबायला जागा मिळेल, वाहनांना चांगली जागा मिळेल याचा विचार केला. सरकारी यंत्रणेला आपण चांगल्या संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितल्या तर त्या स्वीकारल्या जातात, असा अनुभव या प्रकल्पातून आला.  सरकारी काम करताना संयम ठेवावा लागतो. या दरम्यान अधिकारी बदलतात, सरकारे बदलतात, ब्रीफ बदलतात. पण, आपण आपल्या संकल्पनांवर ठाम राहावे लागते. कारण, या इमारती दशकानुदशके समाजाकडून उपयोगात येतात. एक योगदान म्हणून आर्किटेक्ट मंडळींनी याकडे पाहावे. ‘
‘क्लायंट ब्रीफ देतात  तेव्हा त्यातील आशय लक्षात घ्यावा लागतो, दोन ओळींच्या मध्ये न लिहिलेला आशय समजून घेणे आवश्यक असते ‘, असे विजय साने यांनी सांगीतले.
‘कटराला रोज ५० हजार भाविक भेट देतात. त्यांना बस, रेल्वे, हेलिकॉप्टर, कार, रोपवे सहित राहण्याची सुविधा असणारा परिसर उभारायचा होता. २५ एकर जागेत जागतिक दर्जाच्या या सेंटरची उभारणी करण्यात यश आले ‘, असे विजय साने यांनी सांगितले.

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी  आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकूण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोलीनिहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा  1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे  योजनेमध्ये नमूद  आहे.

औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही,  याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमूद  आहेत.

धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतून साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजिटल अनावरण लवकरच होणार आहे.

या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची  प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे,  रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची  महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.

धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमूद  केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमूद  केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.

निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकीय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधितांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येऊन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतूने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतून या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा वाटा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि२३ भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे. मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा,मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर,महाविद्यालयचे प्राचार्य,प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले,
स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातले बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून रहावे लागत नाही. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगार संधी,नवीन संशोधन याचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी,समानता, समावेशकता आणि नाविन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल,कला, सायन्स, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊन शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रील प्रशिक्षण सुद्धा घेता येईल.हे या शैक्षणिक धोरणाचे महत्वपुर्ण वैशिष्टे आहे.
या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

सुशोभीकरण म्हणजे पुण्याचा विकास नव्हे,शिवाजीनगर भागासाठी एकही सुसज्ज इस्पितळ नाही

पुणे- शिवाजीनगर भागामध्ये महानगरपालिका, विद्यापीठ, अभियांत्रिकी कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत. परंतु या सर्व ठिकाणी नुसताच सुशोभीकरणाचा धडाका चालू आहे. सुशोभिकरण म्हणजे विकास नव्हे.उड्डाणपूल पाडले जात आहेत. मेट्रोचे खांब उभे होत आहेत. नदी रुंदी कमी केली जात आहे. परंतु जनसामान्याचा मुख्यत्वे गोखले नगर जनवाडी वैदुवाडी या भागाचा विकास हा थांबलेला आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला. गुरुवार दिनांक 22 रोजी गोखलेनगर भागातील कुसाळकर चौकामध्ये आम आदमी पार्टीतर्फे स्वराज्य संवाद सभा घेण्यात आली, त्यावेळेस ते बोलत होते

प्रभात ७ आणि १४ मधील निम्मे नगरसेवक गायब आहेत आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. गेले दीड वर्ष प्रशासनाचा कारभार असल्यामुळे तिथे बंद पडलेली ई टॉयलेट, अनेक वर्षे बांधकाम चालू असलेले भाभा हॉस्पिटल, सतत वाहतूक कोंडी झालेला फर्ग्युसन रोड आहे. या भागात एकही सुसज्ज इस्पितळ नाही. त्यावर कोणीही बोलत नाही अशी टीका सनी मुरुडकर यांनी केली. या सर्वच पक्षांच्या बेफिकिरी मुळे आणि बेताल कार्यपद्धतीमुळे आता आम आदमी पार्टी हाच एकमेव पर्याय उरला आहे असं अभिमान विटकर यांनी म्हटले.
शंकर थोरात यांनी मेट्रो डी पी प्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप केला.

दिल्ली आणि त्यानंतर पंजाब मध्ये उत्तम मोहल्ला क्लिनिक उभे करून आणि जगमान्य शाळा उभ्या करून आम आदमी पार्टीने एक आदर्श घालून दिला आहे आणि हे मूलभूत मुद्दे प्रथमच राजकीय मुद्दे बनले आहेत असे डॉक्टर अभिजीत मोरे यांनी सांगितले.
निलेश वांजळे यांनी सूत्र संचालन केले.
यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच आपचे अजित फाटके पाटील,सतीश यादव, शंकर थोरात विकास लोंढे, नाज शेख , अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं तुळजाभवानी चरणी साकडं.

तुळजापूर, दि. २३ जून २०२३
राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन काँग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धाराशिव व सोलापूरच्या दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यासमोर सर्वबाजूंनी संकटं उभी आहेत पण भाजपाचे हे सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचतच नाही. शेतकरी विरोधी भाजपाला पावसाळी अधिवेशनात जाब विचारू. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे, तसेच लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. मोठ्या संघर्षानंतर, काँग्रेस विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आज देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान धोक्यात आहे. मणिपूर ५० दिवसांपासून पेटलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिकेत भाषणे देत आहेत. देशावरचे भाजपाचे हे संकट दूर झाले पाहिजे व स्वातंत्र्याचा सूर्य कायम राहिला पाहिजे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा ईडी, सीडी, सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील आजचे राजकीय चित्र अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी भाजपा मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे. परंतु काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेचीच इच्छा असून जनसमर्थन व आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने केंद्रात व राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल.

भाजपच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीचे नाही.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीवर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पोपट काहीही बोलला की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, त्यांचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचेही नाही. ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना जर लोकशाही मान्य असती तर नवीन संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असते असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

केंद्र तसेच राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची अपेक्षा

पुणे-माणसाची जेव्हा प्रगती होते ती वेगवेगळ्या टप्प्यात होते. आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, वैचारिक प्रगती तशी आपली एका टप्प्यावर प्रगती झालेली आहे. परंतु विधवा महीलांबरोबर काम करताना आपल्याला अजूनही खूप प्रयत्न करण्याची गरज दिसून येते. केंद्र व राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्र पुणेच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

दिल्ली येथील मुक्ती अभियान राष्ट्रीय आयोजित राष्ट्रीय विधवा महिला परिषदेत दृकश्राव्य माध्यमातून बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आज आपण एका विशिष्ट टप्यावर येऊन पोहोचलो आहोत. मात्र, पुढे अजून काम करण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी रितीपरंपरानुसार एखादी महिला विधवा झाली तर महिनोन्महिने तिचे घराबाहेर पडणे बंद केले जाते. आजूबाजूची कामे करण्यासाठी, अनेक निर्णय घेण्यासाठी जमीन- जुमल्याचे काम करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणाची काम करण्यासाठी तिला इतर व्यक्तींवर, अवलंबून राहावे लागते. आणि त्याचा परिणाम असा होतो की, अनेक वेळेला प्रॉपर्टीचा किंवा अनेक गोष्टींचा हक्क या महिला दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतात.

कुठल्याही धर्माची महिला असली तरी दहा ते पंधरा दिवसांमध्ये सगळे विधी संपू शकतात आणि त्यानंतर ती स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते आणि तो घेतलाही पाहिजे. तसेच अनेकदा अनेक लोक या महिलांना मदत करण्यासाठी येतात, परंतु त्या वेळी देखील थोडे जागरूक राहून समोरील व्यक्तीचा मदत करण्याचा हेतू काय आहे? याचा विचार केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

शरद पवार म्हणाले,’देशात धार्मिक तेढ वाढविली जाते आहे,त्यामुळे एकत्र यायलाच हवे

बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षाची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत देशभरातील प्रमुख नेते सामील झाले होते. संबंधित नेत्यांनी आगामी निवडणुकीमध्ये एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्षाची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे

ज्या ठिकाणी भाजप विरोधकांची सत्ता आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या वतीने सामाजिक, सांप्रदायिक स्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्रच लढावे लागणार आहे. आमच्यात काही मतभेद असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, ‘जयप्रकाशजी यांच्या नेतृत्वात एक संदेश देण्याचे काम या ठिकाणी झाले होते. अनेक आंदोलनाची सुरवात या ठिकाणावरुन झाली आहे. तेच पुढे जन आंदोलने झाले आहेत. आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन आपसातील मतभेद सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय आणि देशातील जनता आम्हाला पाठिंबा देईल असा मला विश्वास आहे.’

शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “सध्या देशात आपण दररोज नवनवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्यांचा सामना केला पाहिजे. आमच्यात काही मतभेद असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्परांमधील मतभेद विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, पाटण्यापासून देशात बदल घडवण्याची सुरुवात झाली आहे.”“मला आठवतंय की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने पाटणा येथून एक संदेश दिला होता. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासाने याची दखल घेतली. आजच्या परिस्थितीत नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्रपक्ष इथे आले. या बैठकीत आम्ही एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही देशाला नवी वाट दाखवण्याचं काम सुरू केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता आमच्या निर्णयाचं स्वागत करेन” असंही शरद पवार म्हणाले.

 कितीही रक्त सांडलं तरी रक्त सांडू द्या, आम्ही देशाच्या जनतेची रक्षा करू

पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना UPA चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक 10 ते 12 जुलैदरम्यान होऊ शकते.

ठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही रक्त सांडलं तरी रक्त सांडू द्या, आम्ही देशाच्या जनतेची रक्षा करू, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, “पाटणा येथील बैठकीमधून जनआंदोलनाला सुरुवात झाली आहे. याआधीही खूप सारे आंदोलन पाटणामधून सुरू झाले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यापूर्वी दिल्लीत आम्ही अनेक बैठका घेतल्या पण त्यातून काहीही सकारात्मक घडलं नाही. पण पाटणा येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.”

“भाजपाचं सरकार हुकूमशहाकडून चालवलं जात आहे. जर कुणी सत्ताधारी पक्षाविरोधात बोललं तर त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. प्रसारमाध्यमांना पूर्णपणे नियंत्रित केलं आहे. वकिलांची फौज न्यायालयात पाठवून आमच्याविरोधात खटले दाखल केले जातात. पण ते (नरेंद्र मोदी) बेरोजगारीच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सामान्य लोकांच्या हिताचं ते बोलत नाहीत. अर्थव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, दलितांवरील अन्याय यावरही काही बोलत नाही. आवास योजना, ग्राम सडक योजनेचे पैसेही दिले जात नाहीत,” अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“त्यामुळे मोदी सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात आम्ही सगळे मिळून एकत्र लढाई लढू. कितीही रक्त सांडलं तरी सांडू द्या, पण देशाच्या जनतेची रक्षा करू. २०२४ ला पुन्हा हुकूमशाही सरकार सत्तेत आलं तर यापुढे देशात निवडणुकाच होणार नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी
तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये (1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 ) या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.
युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.
मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कव‍िय‍त्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादामीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांच्या हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कव‍ियत्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रीया दिली.’ कुटूंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगुन आपल्याला जे आवडत ते लिहीण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटींग मध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50 नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटींग आणि कॉपीरायटींग त्यांनी केलेलं आहे.
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.)विलास पाटिल यांचा समावेश होता.
सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आंनद’ या मराठी बाल कव‍िता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिह‍ित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’
साहित्य‍िक आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाटयछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता.

समान संधी केंद्रे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आधार

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यामुळे भविष्यातील संधी ओळखून नियमित अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतत दिशादर्शक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत.”ज्ञान ही शक्ती आहे, माहिती म्हणजे स्वातंत्र्य तर शिक्षण हा प्रत्येक कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे…”

विद्यार्थ्यांचे सामान्य जीवन सद्या गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील आज आपण खूप बदल होतांना बघत आहोत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्री-शिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षेसह उद्योजकता, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाकडून ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन ‘समान संधी केंद्र’ सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. ‘समान संधी केंद्र’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच उद्योजक निर्मिती किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षणासह सर्वसमावेशी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेचे सर्वच स्तरातून स्वागतही करण्यात येत आहे.

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसली तरी प्रत्येक महाविद्यालयात केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश तसे देण्यात आलेले आहेत. यामध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय साधाण्याची सूचना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी महत्त्वाचे मानायला हवे. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि योग्य समुपदेशन ‘समान संधी केंद्रा’ द्वारे होवू शकते.
मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. मागासवर्गीय मुला-मुंलीना उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता, व्यावसायिक, कौशल्य शिक्षण आदि महत्वाकांक्षी उपक्रम “समान संधी केंद्र”च्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
शाळांमधील करिअर समुपदेशनाची सध्याची प्रणाली आणि मुख्य शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती नेमकी काय आहेत या सर्व बांबीचा विचार करूनच “समान संधी केंद्र” उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. व्यावसायिक शिक्षणाबाबत असलेल्या धारणा पासून मुक्त करण्यासाठी आणि त्या महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी सर्व संबंधितांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्रे’ तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालयनिहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा किंवा इतर समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, ‘समान संधी केंद्रा’चे उद्दिष्ट्य आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे,(भा.प्र.से.)
आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. २३: सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.

ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.

सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.

भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.

यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.
0000