मुंबई-मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे.ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड सेंटर घोटाळासंबंधी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीने एकाचवेळी छापेमारीला सुरूवात केली. विशेषकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे सोमवारीच (ता. 19) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत 12 हजार 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तत्कालीन मविआ सरकार हे घोटाळेबाज सरकार होते, असा आरोप करत हे सरकार भ्रष्टाचाराचा एक-एक पैसा वसूल करेल, असे फडणवीस म्हणाले होते. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटले आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिंदे सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे.