पुणे-कोरोना काळात भ्रष्टाचार झाला हे निश्चित आहे. या काळात अनुभव नसलेल्या कंपन्यांना कोविड सेंटर उभारणीचे कंत्राट देण्यात आले. लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कोविड कोटाळा झाला हे निश्चित आहे. मात्र, ईडीने नेमकी काय कारवाई केली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईत धाडी टाकल्या. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण तसेच, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया देताना पुणे येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना काळात ज्या कंपन्यांना कोणताही अनुभव नव्हता, अशा कंपन्यांना कोविड सेंटर उभारण्याचे काम देण्यात आले. आधी कंत्राट दिले, त्यानंतर कंपन्या स्थापन करण्यात आला. असे गंभीर प्रकार कोरोना काळात घडले आहेत. यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात तर अशा गलथान कारभारामुळे एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणी चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत आली आहे, एसआयटीला काही मिळाले का?, याबाबत मला माहिती नाही. तसेच, आज ईडीने जी छापेमारी केली, त्यासंदर्भातही मला काही माहिती नाही. यासंदर्भातील माहिती ईडीकडूनच मिळेल.दरम्यान, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. त्यासंदर्भत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावरच धाड टाकण्यात येत असेल. यासंदर्भात ईडीच अधिकृत माहिती देऊ शकेल”.
भाजप आमदार गीता जैन यांनी मनपाच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, राग अनावर होऊ शकतो. पण तरीही त्यांनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणे योग्य आहे.