Home Blog Page 1484

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २७: हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत.

यादरम्यान शिक्रापूर ते चाकण अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील.

मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक(ट्रक/टेम्पो) ही वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील. तसेच हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरकडे जातील.

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्यावेळी नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा रिदमिक क्रीडाप्रकारात पुणे विभाग द्वितीय स्थानी

पुणे ता. २७: जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रिदमिक या क्रीडा प्रकारामध्ये पुणे विभागाने द्वितीय स्थान पटकावले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे.

पुणे विभागाच्या व्रिती शहा हिने १४ वर्षाखालील मुलींच्या हुप व ऑल राउंड स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या सांघिक क्रीडाप्रकारात मुंबई विभागाने प्रथम क्रमांक तर पुणे संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-

१४ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:
बॉल- १. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग २. साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग ३. व्रिती शहा, पुणे विभाग.
हुप- २. व्रिती शहा, पुणे विभाग, २. साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग ३. अनुश्री बापट, मुंबई विभाग.
क्लब्स- १. स्वरांगी नार्वेकर,मुंबई विभाग, २. अनुश्री स्वप्नील बापट़़, मुंबई विभाग, ३. शमिका जोशी, पुणे विभाग
रिबन- १.साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग, २. व्रिती शहा – पुणे विभाग. ३. अनुश्री बापट़, मुंबई विभाग
ऑल राउंड- १.व्रिती शहा, पुणे विभाग, २.साईज्ञा शिंदे – मुंबई विभाग, ३. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग
सांघिक- १. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग २. साईज्ञा शिंदे, अनुश्री बापट़, पुणे विभाग २. अमरावती विभाग

१७ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:
हुप- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग
बॉल- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग
क्लब्स- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग
रिबन- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग
ऑल राउंड- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग

१९ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:
हुप- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग
बॉल- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग
क्लब्स- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. स्पृहा साहू ,मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग
रिबन- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रेवती मिलिंद झिंगे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग
ऑल राउंड- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग २. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग
0000

नोव्हेंबर अखेर सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यत तंबाखू दुष्परिणामाची माहिती पोहोचवा- हिम्मत खराडे

पुणे, दि. २७: जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिले.ग्रामीण आणि शहर पोलिसांनी २०२२-२३ मध्ये नोव्हेंबर अखेर अन्न व औषध अधिनियमाखाली २ कोटी ७५ लाख ५७ हजार २०९ रकमेचा गुटखा आणि कोटपा कायद्याअंतर्गत ११ लाख ८० हजार ६७५ रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने २७ प्रकरणात कारवाई करुन १ कोटी ६ लाख ३१ हजार ८५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर, समितीचे सदस्य उपस्थित होते.

श्री. खराडे म्हणाले, तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या तबांखूमुक्त शाळा उपक्रमाला गती द्यावी. पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एकाच दिवशी संयुक्त कारवाई मोहिम राबवावी. एकूणच राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे श्री. खराडे म्हणाले.

डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात तबांखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेर ५४ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून ४ हजार ३०८ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २६ तंबाखू नियंत्रण कक्षांमार्फत ५ हजार ३८६ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने ७६ नागरिकांवर कारवाई करुन ३ हजार ७६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून ५३० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ६ नागरिकांवर कारवाई करुन ७०० हजार रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

यश, मीर, हृदान उपांत्य फेरीत

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत हृदान पाडवे, सिबतैनरझा सोमजी, यश मोरे, मीर शहझार अली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. अकरा वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित हृदानने आरुष दुग्गलला १५-३, १५-१२ असे पराभूत केले. हृदानची आता सोमजीविरुद्ध लढत होईल. सोमजीने उपांत्यपूर्व फेरीत जतिन सराफवर १७-१५, १५-८ असा विजय मिळवला. यानंतर यश मोरेने शरव जाधवचे आव्हान १५-१२, १३-१५, १५-१२ असे परतवून लावले. यशची आता उपांत्य फेरीत मीरशी गाठ पडणार आहे. मीरने दुसऱ्या मानांकित मिहीर इंगळेला १५-९, १५-९ असा पराभवाचा धक्का दिला.

शरयू, आर्याची आगेकूच
यानंतर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित शरयू रांजणे, आर्या कुलकर्णी, चौथ्या मानांकित अनुषा संजना, दुसऱ्या मानांकित सोयरा शेलार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत शरयूने मधुरा काकडेला १६-१४, १५-१२ असे नमविले. शरयूची आता आर्या कुलकर्णीविरुद्ध लढत होईल. आर्याने तिसऱ्या मानांकित ख्याती कत्रेला ११-१५, १७-१५, १८-१६ असा पराभवाचा धक्का दिला. यानंतर अनुषाने सई आगवणेला १५-१०, १५-७ असे नमविले, तर सोयराने आयुषी मुंडेवर ७-१५, १७-१५, १५-८ असा विजय मिळवला.


निकाल : उपांत्यपूर्व फेरी – महिला एकेरी –  
ओजल रजक वि. वि. दिव्यांश वहाळ १४-१६, १५-७, १५-८; श्रेया भोसले वि. वि. खुशी सिंग १५-९, १३-१५, १५-५; सारिका गोखले वि. वि. रक्षा पंचांग १५-११, १५-१२; अस्मिता शेडगे वि. वि. अनन्या देशपांडे १५-१२, १५-८.

११ वर्षांखालील मुले –अरहम रेदासनी वि. वि. ध्रुव बर्वे १५-३, १५-९; एल. अभिज्ञान सिंह वि. वि. स्वरित सातपुते १५-१२, १५-१२; कपिल जगदाळे वि. वि. तनिष्क अदे १५-५, १५-९; विराज सराफ वि. वि. रघवेंद्र यादव १५-१२, १५-६.

१५ वर्षांखालील मुले –  कोणार्क इंचेकर वि. वि. अरहम रेदासनी १६-१४, १५-९; ध्रुव निकम वि. वि. अवधूत कदम १२-१५, १५-१३, १५-५; निक्षेप कत्रे वि. वि. चैतन्य परंडेकर १५-९, १५-१३; सार्थक पाटणकर वि. वि. अर्जुन देशपांडे १५-५, १०-१५, १५-५.

१५ वर्षांखालील मुली – 
श्रेया चौधरी वि. वि. प्राजक्ता गायकवाड १५-७, १५-९; राधा गाडगीळ वि. वि. सफा शेख १७-१५, १५-१३; नव्या रांका वि. वि. सन्मती रूगे १५-१०, १५-८; यशस्वी काळे वि. वि. भक्ती पाटील १३-१५, १५-४, १५-८.

१७ वर्षांखालील मुले –
 सार्थक पाटणकर वि. वि. वेदांत सरदेशपांडे १७-१५, १२-१५, १५-११; कृष्णा जसुजा वि. वि. श्लोक डागा १५-१०, १५-८; क्रिश खटवड वि. वि. यशराज कदम १५-९, ८-१५, १५-९; आद्य पारसनीस वि. वि. ईशान देशपांडे १५-११, ७-१५, १५-११.

१९ वर्षांखालील मुले – 
लौकिक ताथेड वि. वि. सुजल लखारी १५-१२, १५-६; वेदांत सरदेशपांडे वि. वि. चैतन्य खरात १०-१५, १५-१२, १५-१३; कृष्णा जसुजा वि. वि. ईशान देशपांडे १२-१५, १८-१६, १५-११; सर्वेश हाउजी वि. वि. वर्धन डोंगरे १५-१२, १५-८.

१९ वर्षांखालील मुली – अनन्या गाडगीळ वि. वि. आंचल जैन १५-१०, १३-१५, १५-१३; अस्मिता शेडगे वि. वि. अनन्या देशपांडे ११-१५, १६-१४, १५-१०; श्रेया शेलार वि. वि. दिव्यांश वहाळ १५-७, १५-९; ओजल रजक वि. वि. सानिका पाटणकर १५-७, १५-१७, १५-१२

मुख्यमंत्री असताना फडणवीस असे नव्हते वागत .. आताच का असे वागतात ? अजित पवारांचा सवाल

नागपूर – मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस असे वागत नव्हते आता उपमुख्यमंत्री असताना असे का वागत आहेत ? असा सवाल करत इडी , सीबीआय , एस आय ती , मोका चा उल्लेख करत , होय मी बदला घेतला, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा विधानांचा देखील उल्लेख करत देवेन्द्रजी हे तुमच्या इमेजला शोभत नाही .कोणी काहीही म्हणू द्यात भाजपमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्रमांक १ चा नेता म्हणून फडणवीसांचेच नाव येते असे फटकारे आज विधानसभेत आपल्या १ तासाच्या भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मारले ,

अजित पवार सभागृहात बोलताना म्हटले की उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, यावेळी सभागृहातून गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशा घोषणा देण्यात आल्या. यावर अजित पवारांनी गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवण्यास पाठवायचे आहे, त्यांचे काॅन्टॅक्ट सगळीकडे आहेत, यावर सभागृहात हास्याचे कारंजे उसळले.

आता वहिनींनाच सांगतो थांबा

यापुढे बोलताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी आता येऊन वहिनींनाच सागणार आहे की जरा बघाहो यांच्याकडे, त्यांनी मनावर घेतले की हे एका महिलेला मंत्री करतील. राज्यात अजून एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, हा महिलांचा अपमान आहे. फडणवीस यांच्याकडे आधीच सात सात मंत्र्यांचा कारभार आहे. त्यात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेलो की फडणवीसांना विचारतो असे सांगतात, खरे म्हणजे तुम्ही मंत्री कोणालाही करा, पण मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

विदर्भात एखादा रिफायनरी उद्योग आणता येईलका याचा विचार करा. तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मिहानचा विकास झाला नाही. खरे तर मिहान वेगाने धावायला हवे होते. आमच्याही काळात विकास झाला नाही हे कबुल करतो. यात विदर्भाचा काय दोष. विदर्भाने आम्हालाही निवडून दिले. आमोवादग्रस्त कामात विकासकामांसाठी निधी द्या.

अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून अनेकांनी सुट शिवले. त्यांच्या घरचे आता विचारतात की हा सूट कधी घालणार आहे म्हणून. अनेकांचे सूट वाया चालले आहे असा टोला विस्तारासाठी उशीर लागत असल्याबद्दल लावला. गोंदीया इंदौर आणि गोंदीया हैद्राबाद ही बंद झालेली विमानसेवा सुरू करावी असे अजित पवार यांनी सांगितले. विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचे काम करा.

यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, घोषणा करताना दहादा विचार करा. आता काही काही मंत्र्यांना धीरच राहात नाही. काय बोलू आणि काय नको असे त्यांना वाटते. त्यांचा उत्साह जरा आवरा असे अजित पवारांनी म्हटले. डीएपीचा तुटवडा भरून काढण्याचे काम करा. आमच्या सरकारकडून काही चुका झाल्या तर तुम्ही दुरूस्ती करा असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

मी एखाद्याला चॅलेंज केलेना तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. सरकार आल्यानंतर तुम्ही संधी दिलेले एक नेते बारामतीत आले. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा “करेक्ट’ कार्यक्रम करू असे ते म्हणाले. आता मी मनावर घेतलेना तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. जरा सबुरीने घ्या म्हणाव. खूपच स्पीडने चालले ते, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू केलेल्या चर्चेत बोलताना केले. अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.

अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला!

आपल्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे. दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलं आहेय आणि स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला.

अहिल्यादेवी शाळेत स्नेहसंमेलन

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) अहिल्यादेवी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. लेखीका डॉ. संगीता बर्वे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, कार्याध्यक्षा मेघना वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या बालसाहित्य पुस्तकाला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला आहे.

बर्वे म्हणाल्या, ‘मला तुमची शाळा खूप आवडते. टेरेसवर बाग फुलवने, मातीविना शेती या उपक्रमांमुळे तुमची सृजनशीलता वाढते.’  तसेच लिखानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.’

कुंटे म्हणाले, शिक्षण म्हणजे फक्त खडू, फळा नसून कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होते.’ जानेवारी महिन्यात होणाऱ्या सूर्यनमस्कार आणि क्रीडा सर्धेची घोषणा त्यांनी योवळी केली.

मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी कुलकर्णी, रोहिणी रावते, अर्चना कुलकर्णी यांनी संयोजन केले.

लोकसहभागातून कोथरुडमधील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती:मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-कोथरुड मधील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनवरील झाकणे खचल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे वाहतूककोंडीच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, लोकसहभागातून ड्रेनेज लाईन्स वरील झाकणे दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.

यंदा मुसळधार पावसामुळे कोथरुडमधील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. यातून मार्ग काढताना कोथरुडकरांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेकदा खड्ड्यातून जाताना दुचाकी स्वारांचा तोल जाऊन पडल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्री म्हणून नामदार पाटील यांनी खराब रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. आयुक्तांनी तातडीने कोथरुडमधील खचलेले रस्ते दुरुस्त केले होते.

मात्र त्यानंतरही अनेक भागातील ड्रेनेज लाईनची झाकणे खचल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर ड्रेनेज लाईनवरील झाकणे लोकसहभागातून दुरुस्त करण्याचा निर्णय घेऊन, कार्यवाही सुरु केली.

त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आशिष गार्डन परिसरातील खचलेल्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने इतरही भागातील खचलेल्या रस्त्यांवरील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात येणार आहे. दरम्यान, खचलेले रस्ते सुस्थितीत होत असल्याने, नागरिकांकडून सदर कामाप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मातांकडून मिळाला गर्भवतींना कानमंत्र

  • मदर सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ
  • उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलचा उपक्रम

पुणे, २७ डिसेंबर, (प्रतिनिधी) :
गर्भवती असताना कामानिमित्ताने दररोज करावा लागणारा ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास.., हार्मोन्सच्या बदलामुळे होणारी चिडचिड.., नवव्या महिन्यात अचानक वाढलेली शुगर…, काही कारणाने करावा लागलेला गर्भपात आणि त्यानंतर झालेला  मानसिक त्रास आणि त्यावर यशस्वीपणे केलेली मात असे अनुभव कथन करत गर्भावस्थेत कधीही खचून न जाता प्रत्येक समस्येला धैर्याने सामोरे जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असा मोलाचा सल्ला महिला भगिनींनी गर्भवतींना दिला. निमित्त होते ते मदर सपोर्ट ग्रुपच्या कार्यशाळेचे!
बाळाला दूध पाजताना येणाऱ्या अडचणी, प्रसूती नैसर्गिक की सिझेरियन, डिलिव्हरीनंतर येणारे नैराश्य, वंध्यत्वावरील उपचारानंतरची प्रसूती, अशा विविध प्रश्नांबाबत मातांना मार्गदर्शन करण्यासाठी मदर सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे. उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने हा ग्रुप स्थापन करण्यात आला असून अशा पद्धतीचा हा पहिलाच ग्रुप ठरला आहे. या ग्रुपचा पहिला मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये आई होताना आलेल्या विविध अडचणी आणि त्यावर केलेली मात याबाबत उपस्थित महिलांनी आपले अनुभव सांगितले.
नवी दिल्ली येथील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. अशोक खुराना,  हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. चिन्मय उमरजी, डॉ. केतकी उमरजी, प्रियांका उमरजी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. संभाजी महाडिक, चाइल्ड सर्जन डॉ. विशेष दीक्षित, स्त्री मनोरोग तज्ज्ञ डॉ. सविता गायकवाड, डॉ. प्रणाली काकडे, डॉ. श्रृती माहेश्र्वरी, श्वेता वाटवे, टीम सृजनम यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. सुलभ प्रसूतीसाठी ‘जिवंती’ यासह अन्य सपोर्ट ग्रुप यावेळी स्थापन करण्यात आले.
या कार्यशाळमध्ये सहभागी झालेल्या मातांनी आपले अनुभव सांगताना विविध गुणदर्शन देखील सादर केले.  यामध्ये नृत्य, गाणे, रॅम्प वॉक यांचा समावेश होता.


पेशंटला सर्वात अधिक दिलासा हा त्रास अनुभवलेली व्यक्तीच देऊ शकते. या उद्देशानेच मदर्स सपोर्ट ग्रुप ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक दोन महिन्यांनी या ग्रुपची बैठक होणार आहे. हे काम विनामूल्य स्वरूपात केले जाणार आहे. पुण्याबाहेरील मातांना यामध्ये सहभागी होता यावेत, यासाठी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली जाणार आहे. या सपोर्ट ग्रुपची मुहुर्तमेढ यानिमित्त रोवली गेली आहे.

  • डॉ. चिन्मय उमरजी, संचालक,
    (उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल)

‘सीबीआय’ने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली;अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

0

मुंबई-१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची ( सीबीआय ) मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाची दहा दिवस अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यावेळी ‘सीबीआय’कडून या जामीनावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या जामीनाला स्थगिती देण्यात आली होती.या जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपत होती. ‘सीबीआय’च्या वकीलांकडून आज पुन्हा एकदा स्थगितीची मागणी करण्यात आली. मात्र, आता मुंबई हायकोर्टाने ती फेटाळून लावली आहे.

बुधवारी (दि. 28) अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येतील. ‘सीबीआय’च्या वकिलांकडून आज सायंकाळपर्यंत कुठल्या हालचाली होतात हे देखील पाहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टातून रिलीज ऑर्डर घेतली जाईल. शुअ‌ॅरीटी बाँड भरून इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिल देशमुख उद्याच तुरुंगातून बाहेर येतील.

1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते तुरुंगातच आहेत. ईडीने अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ‘सीबीआय’कडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात तपास सुरू होता.

मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’च्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येत आहे.

कारभार बिघडला:धरणात मुबलक पाणी असूनही पुण्याच्या काही भागात ३ दिवस पाणी बंद .

पुणे-गेली ३ दिवस अघोषित पाणीपुरवठा बंद असून विद्युत आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याने राष्ट्रवादीचे दक्षिण पुण्यातील नेते नितीन कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, संपूर्ण सहकार नगर, अरण्येश्वर, संभाजीनगर, तळजाई परिसर, बिबेवाडी परिसर, मार्केट यार्ड परिसर भागातील नागरिकांना गेले तीन दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्यास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठीही अक्षरश: पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.असे त्यांनी म्हटले आहे .

कदम यांनी याप्रकरणी सांगितले कि,’ शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी पासून विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पर्वती जल केंद्रातील गोल व चौकने टाकीवरील भागाचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असा मेसेज पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आला होता.आज मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी तिसरा दिवस असूनही पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे.
या संदर्भामध्ये मी विद्युत विभागाचे रामदास तारू व कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अशीश जाधव यांच्याशी बोललो असता त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत..शेवटी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांच्या कानावर मी ही बाब घातली असता त्यांनी ते कबूल केले व पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करू असे आश्वासन दिले..

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण देण्याचा संकल्प -जांबुवंत मनोहर 

संघटनवाढ,शेतकरी, विद्यार्थी, दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम

पुणे :
युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदावर जांबुवंत मनोहर यांची निवड झाली आहे.जांबुवंत मनोहर हे युवक क्रांती दलाचा लढाऊ चेहरा मानले जातात.ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे.’संघटना वाढविण्यासाठी महाराष्ट्र भर दौरा काढणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत’,अशी माहिती या निवडीनंतर बोलताना जांबुवंत मनोहर यांनी  दिली. 
युवक क्रांती दलाची राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुण्यात  पार पडली. या बैठकीत राज्य कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर यांची एकमताने निवड झाली.युक्रांदचे जेष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी, सदस्य निवडण्यात आले. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते गांधी भवन येथे नियुक्ती पत्रे देऊन अभिनंदन करण्यात आले. 
युक्रांद च्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, राज्यसंघटक पदी अप्पा अनारसे, सहकार्यवाह पदी राजकुमार डोंबे व डॉ. रश्मी सोवनी, मराठवाडा संघटक शाम तोडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे, विवेक काशीकर, रोहन गायकवाड, मयुर शिंदे,आदित्य आरेकर, दीपक मोहिते, आबेद सय्यद उपस्थित होते.

‘सुर्या’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण

अॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रदर्शित

 अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’  या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी ‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या ‘सुर्या’ या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.

सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार.. ‘सुर्या’… अशा जबरदस्त टॅग लाईनसह प्रसाद मंगेश हा नवोदित अभिनेता या चित्रपटात नायकाच्या रूपात आपला धमाका दाखविण्यास सज्ज झाला आहे. अॅक्शनने ठासून भरलेला’ ‘सुर्या’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग सुर्या आलेल्या संकटावर कशी मात करतो याची रंजक कथा दाखवतानाच मैत्रीचं अबोल नातं जपणारी रिया आणि सुर्याच्या प्रत्येक लढ्यात त्याची ढाल बनून राहणारी काजल या दोघींच्या प्रेमाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. या तिघांसोबत हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

सुर्या चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

रमणबाग शाळेत स्नेहसंमेलन

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत ‘विविधतेतून एकता’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 
विविध राज्यांच्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. विविध प्रांतांची माहिती देण्यात आली. क्रमिक अभ्यासक्रमाच्या विषयांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ई-कचरा संकलन मोहिम राबविण्यात आली. 
दलित इंडिया कॉमर्स ॲण्ड इंडस्जिचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा वसा रमणबाग शाळा चालवित असल्याचे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. शाला समितीचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, शालाप्रमुख सुनील शिवले, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सुरेश वरगंटीवार, ब्रम्हेंद्र शेटे, जयंत टोले, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल परब आणि विद्या थोरात यांची उपस्थिती होती.

कर्नाटक सीमावर्ती भागातल्या 865 गावात महात्मा फुले जनआरोग्य, सारथीसह इतर योजना लागू

नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती दिली.

सीमा भागातील मराठी बांधवाना संरक्षण मिळावे व त्यांची प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांबाबतची माहिती :

• महाराष्ट्र – कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये ज्या व्यक्तींनी बलिदान दिले आहे त्या व्यक्तींना “हुतात्मा” म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकास स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा २० हजार निवृत्ती वेतन करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला

• सद्यस्थितीत कोल्हापूर येथे ८, मुंबई व मुंबई उपनगर येथे ३, पुणे व रत्नागिरी येथे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १३ लाभार्थी निवृत्तीवेतन घेत आहेत.

• सीमावादीत ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सेवाभरती नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास नेमणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्याची छाननी करताना ८६५ गावातील १५ वर्षाचे वास्तव्य विचारात घेऊन वास्तव्याचा विहित नमुन्यातील दाखला सक्षम अधिकाऱ्‍यास सादर करणे आवश्यक आहे.

• महाराष्ट्रातील गृहनिर्माण मंडळामार्फत गाळेवाटपाचे अर्ज करताना कर्नाटक राज्यात असलेल्या व महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या सीमावादीत ८६५ गावांतील १५ वर्षे वास्तव्य हे त्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य असल्याचे समजण्याबाबत गृहनिर्माण विभागाला सूचना दिल्या आहेत.

• पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी प्रयोगात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमाभागातील नोंदणीकृत संस्था शासन निकषानुसार सहाय्य अनुदान मिळण्यास पात्र होतील.

• डी.एड., पदवीका अभ्यासक, डी.एड. शिक्षक, कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या टि.सी.एच. अर्हता धारकास शिक्षणसेवक पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरविण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाकडून सीमावादीत भागातील उमेदवारांना सवलती देण्यात आलेल्या आहेत.

• सीमावादीत भागातील मराठी भाषिक उमेदवारांना इतर मंत्रालयीन विभागांकडूनही सवलती देण्यात येतात. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत या भागातील उमेदवारांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पूर्व प्रशिक्षण केंद्रात ५ टक्के राखीव जागा व अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी २० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

• वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ८ जागा, दंत महाविद्यालये २ जागा व शासकीय अनुदानीत आयुर्वेदीक महाविद्यालये ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

• सीमाभागातील अल्पभाषिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे व घटनेनुसार द्यावयाच्या सुविधा/ सवलती यांचा आढावा घेऊन सवलती प्रस्तावित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.

• महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमध्ये मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्‍या मराठी संस्थांना/ मंडळांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

• मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रमास कमाल १ लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. एका मराठी भाषिक संस्थेने/ मंडळाने एकापेक्षा जास्‍त उपक्रम राबविल्यास अशा उपक्रमांसाठी मिळून १ कोटीच्या कमाल मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय

• महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत, ७/१२ उतारे तसेच कार्यालयातील सूचना फलक मराठी भाषेत लावणे, मराठी भाषेचा सर्व स्तरावर उपयोग करणे तसेच कन्नड भाषेची मराठी भाषिक जनतेवर सक्ती न करणे यासाठी कर्नाटक शासनाशी समन्वय साधण्याचा निर्णय.

• मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागास निर्देश.

• मुख्यमंत्री सहायता देणगी या योजनेत सीमाभागातील ८६५ गावांचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकच्या अत्याचारी प्रवृत्तीचा एकमताने निषेध , ८६५ गावे आमची, इंच इंच जागा घेऊ -विधिमंडळात ठराव संमत

नागपूर- कर्नाटक सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव विधिमंडळात मांडण्यात आला. तो एकमतानं मंजूर करण्यात आला. याचबरोबर बेळगाव, कारवार, निपानी, बिदर या शहरांसह सर्वोच्य न्यायालयातील दाव्यातील सर्व गावं कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल. सनदशीर मार्गानं लढा देण्यात येईल. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभे राहील, अशा आशयाचा ठराव एकमतानं मंजूर झाला.सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठराव संमत केला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच सर्व सदस्यांचे त्यांनी आभारही मानले. त्याचबरोबर सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती सभागृहाला दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव असा :

ज्याअर्थी, नोव्हेंबर, १९५६ मध्ये राज्यांची पुर्नरचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव (चंदगड तालुका वगळून) विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी करून कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ सीमावादीत गावांवर दावा सांगितला आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्याविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालयात असलेला मूळ दावा क्र.४/२००४ (Original Suit) च्या अनुषंगाने दाखल केला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्र. I.A. 11/2014 वर सुनावणी अंती दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी, दाव्यातील साक्षी, पुरावे नोंदविण्यासाठी मा.कोर्ट कमिशनर म्हणून मा.श्री.मनमोहन सरिन, भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू-काश्मीर यांची नियुक्ती केली. परंतु सदर दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी पारित केलेल्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दि.०६ डिसेंबर २०१४ रोजी अंतरिम अर्ज क्र. I.A. 12/2014 मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे. महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालविण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणाऱ्या ज्येष्ठ, अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सीमा भागातील प्रश्न, सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षोनुवर्ष होणारे अन्याय, मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक, त्यांचेवर अत्याचार केले जाणे, त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर होणे, इतकेच नव्हे तर मा. समन्वयक मंत्री, सीमाप्रश्न यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे, मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे, त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे, तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणांकरिता संपादित करुन त्याचे भुखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मा. उच्च न्यायालयांनी दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे, आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इ. बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केला जात आहे.

या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता दोन्ही राज्यांमध्ये शांतता ठेवण्याकरिता एकमत केले असतांना देखील विपरित भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे. दरम्यान, कर्नाटक विधिमंडळाने एकही इंच जमीन न देण्याच्या दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरुन नाही. एकाच देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी या बाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे. आपण कायदेशीर बाजू मांडण्यासाठी नियमीत विधीज्ञांच्या टीम, व्यतिरिक्त ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील ८६५ मराठी भाषिक खेडे घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे, त्याअनुषंगाने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी विविध सोईसुविधा व सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या लाभांबरोबरच अभियांत्रिकी / वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षणासाठी सवलत, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांचे फायदे व इतर शासकीय संस्थांच्यामार्फत विहीत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करते आहे, धिक्कार करते आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० नुसार..

१.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यांसह मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा, प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.

२.      मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद सोडविण्यासाठी हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल.

३.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह  ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील महाराष्ट्र शासन विनंती करते, असा ठराव ही विधानसभा निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे.

४.      तसेच याबाबत केंद्र शासनाने गृह मंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा, तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी.