मुंबई-१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची ( सीबीआय ) मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाची दहा दिवस अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यावेळी ‘सीबीआय’कडून या जामीनावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या जामीनाला स्थगिती देण्यात आली होती.या जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपत होती. ‘सीबीआय’च्या वकीलांकडून आज पुन्हा एकदा स्थगितीची मागणी करण्यात आली. मात्र, आता मुंबई हायकोर्टाने ती फेटाळून लावली आहे.
बुधवारी (दि. 28) अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येतील. ‘सीबीआय’च्या वकिलांकडून आज सायंकाळपर्यंत कुठल्या हालचाली होतात हे देखील पाहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टातून रिलीज ऑर्डर घेतली जाईल. शुअॅरीटी बाँड भरून इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिल देशमुख उद्याच तुरुंगातून बाहेर येतील.
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते तुरुंगातच आहेत. ईडीने अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ‘सीबीआय’कडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात तपास सुरू होता.
मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’च्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येत आहे.