Home Blog Page 1480

धारावी देशातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर दि. 30 : धारावी हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 46 हजार 191 निवासी परिवारांचे तर 12 हजार 974 अनिवासी असे एकूण 59 हजार 165  परिवाराच्या पुनर्विकासाचा हा प्रकल्प आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली. या संदर्भातील लक्षवेधी सदस्या प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती.

गाळे संदर्भात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या प्रकल्पातील प्रत्येक व्यक्तीला सध्याच्या घरापेक्षा अधिक क्षेत्राची सदनिका मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

श्री. फडणवीस  म्हणाले की,  धारावीत राहणाऱ्या लोकांना आता राहतात त्यापेक्षा चांगल्या सदनिका देण्याच्या उद्देशाने निविदा काढण्यात आली होते.  या निविदेनंतर रेल्वेची जागा मिळाली. त्यामुळे नव्याने निविदा काढायचे ठरले. यासाठी मोठी  कामे केलेल्या कंपन्यांना आमंत्रित केले. या निविदेमध्ये मध्ये सुधारणा करुन पुन्हा निविदा काढण्यात आली. तीन कंपन्यांनी ती भरली. अटी शर्तींची पुर्तता करुन ही निविदा मान्य करण्यात आली.

धारावी हे बिजनेस हब आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. देशाच्या व राज्याच्या आर्थिक घडामोडीत धारावीचे योगदान मोठे आहे. या गोष्टी नजरेसमोर ठेवून नियोजन करावे लागणार आहे. म्हणूनच इथे इंडस्ट्रीयल आणि बिझनेस झोन तयार करण्यात येणार आहे. या मध्ये सुविधा केंद्र तयार करुन देणार आहे. याचा धारावीतील उद्योजकांना फायदा होणार आहे. त्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी कर माफी देखील करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून घेतलेल्या जीएसटीचा परतावा देखील देण्यात येणार आहे. या पुनर्विकसीत इमारती  मेंटेंनंस फ्री असतील. अधिकृत धार्मिक स्थळे संरक्षित केले जातील. सन 2011 पर्यंतचे रहिवासी संरक्षित आहेतच परंतु त्यानंतरचे जे अपात्र ठरतात त्यांना भाड्याने घरे देण्यात येतील, असा कायदेशीर मार्ग काढण्यात आला आहे. या ठिकाणी ज्या आकाराची घरे आहेत त्यापेक्षा जास्त आकाराची घरे देण्यात येणार आहेत. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला चांगले घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सर्व विद्यापीठांचे एकत्रित वेळापत्रक जाहीर करणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे, निकाल लागण्याचे एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्र सिक्षणामंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान सभेत आज एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

सन 2022-23 मध्ये एल एल बी अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेसाठी उशीरा प्रवेश सूचना निघाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यासंदर्भात सदस्य प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. पाटील पुढे म्हणाले, “राज्यातील विविध विद्यापीठे हे वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतात व निकाल जाहीर करतात. त्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख बदलत जाते. या सर्व विद्यापिठांच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता यावी, यासाठी राज्यपाल महोदयांच्या दालनात एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे.

मे महिन्यात परीक्षा घेण्यात याव्यात आणि जून अखेर निकाल लावून एक ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत”.

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लवकरच नवी नियमावली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • आ. माधुरी मिसाळ यांची विधानसभेत लक्षवेधी
  • पुनर्विकास योजनेत होणार आमुलाग्र बदल
  • आ. मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
  • झोपडीधारकांना होणार मोठा फायदा; प्रकल्पांनाही मिळणार गती

नागपूर (प्रतिनिधी)

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन नवी नियमावली लवकरच लागू केली जाणार आहे. या संदर्भात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत नव्या नियमावलीची घोषणा केली. विशेष म्हणजे ही नवी नियमावली आमुलाग्रल बदलांसह असणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ५८६ झोपडपट्ट्या असून त्यापैकी १७ वर्षांत केवळ ८१ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून सुधारित नियमावली राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. या संदर्भातील मुद्दा आ. मिसाळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री फडणवीस आ. मिसाळ यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना म्हणाले’, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सुमारे अडीच लाख झोपडपट्टीधारक आहेत. बदलत्या परिस्थितीत आणि स्थानिक गरजा विचारात घेता, झोपुप्रा विकास नियंत्रण नियमावलीचा नवीन प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्यावर सदर हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सदर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेवून पुणे झोपुप्राने प्रारुप नवीन नियमावलीमध्ये २५ प्रमुख बदल अंतर्भूत करून सन २०२१ ची नियमावली शासन मान्यतेसाठी सादर केली आहे. त्यानुषंगाने गृहनिर्माण विभाग व नगर विकास विभाग स्तरावर विविध बैठका झालेल्या आहेत’

आ. मिसाळ म्हणाल्या, ‘माझ्या पर्वती विधानसभा मतदारसंघात ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही ही संख्या मोठी आहे. मात्र पुनर्विकास प्रकल्पांची गती कमी आहे. हे प्रकल्प बदलत्या गरजांसह लवकर मार्गी लागावेत यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत मांडला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहत नव्या नियमावलीसंदर्भात माहिती दिली. मला विश्वास आहे, आता झोपुप्रला निश्चितच वेग येईल’.

नव्या नियमावलीत काय आहे प्रस्तावित बदल?

  • पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ७० टक्के ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती
  • पुनर्वसन सदनिकांची घनता प्रती हेक्टरी ३६० ऐवजी किमान ४५० प्रती हेक्टर
  • चटई क्षेत्र निर्देशांकाची मर्यादा 4.0 किंवा प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र जेवढे निर्माण होईल तेवढे भूखंडावर अनुज्ञेय
  • पुनर्वसन इमारतीची अनुज्ञेय उंची ४० मीटर ऐवजी कमाल ५० मीटर
  • सरकारी जागांवर असलेल्या झोपडपट्ट्या स्वतः एसआरएने प्रक्रिया पूर्ण करावी. विकासकाऐवजी व टेंडर काढावे, या पद्धतीच्या एका पायलट प्रोजेक्टला मान्यता देणार
  • खासगी जागांवरील प्रकल्पांसाठी मालकांना १ टीडीआर देऊन शासन जागा ताब्यात घेऊन पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव
  • सेल कॉम्पोनेंट इमारतीची उंची युनिफाईड रुलप्रमाणे

अनन्या गाडगीळला दुहेरी मुकुट

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत अनन्या गाडगीळने दुहेरी मुकुट मिळवला. तिने १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित अनन्याने ओजल रजकवर १५-८, १५-७ अशी १६ मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर अनन्याने १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत श्रेया शेलारवर १५-१७, १५-११, १५-९ अशी ३९ मिनिटांत मात केली आणि दुहेरी मुकुट मिळवला. १६ वर्षीय अनन्या ही केळकर अकादमीत नीता केळकर यांच्याकडे सराव करते.
स्पर्धेतील अकरा वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सिबतैनरझा सोमजीने मीर शहझार अलीवर १५-५, १५-५ अशी बारा मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. अकरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित ख्यात्री कत्रेने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावले. तिने दुसऱ्या मानांकित तेजस्वी भुतडावर १५-३, १५-३ अशी मात केली. यानंतर १३ वर्षांखालील मुलांच्या गटात अरहम रेडासनीने बाजी मारली. अग्रमानांकित अरहमने चौथ्या मानांकित कपिल जगदाळेला १५-७, १५-७ असे पराभूत केले. तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित शरयू रांजणेने जेतेपद मिळवले. तिने विजेतेपदाच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सोयरा शेलारला १६-१४, १५-११ असे २२ मिनिटांत पराभूत केले.

अंतिम फेरीचे काही निकाल : ४० वर्षांवरील पुरुष एकेरी – चेतन शाह वि. वि. शरदचंद्र चवली १५-११, १५-१३. उपांत्य फेरी – चेतन शाह वि. वि. श्रीकांत वाडेकर १५-१२, १६-१४; शरदचंद्र चवली वि. वि. सत्यजित तरदलकर १५-८, १९-२१, १५-१२.

४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – 
आदित्य उमराणी – शिवकिरणसिंग ठाकूर वि. वि. चेतन शाह-मकरंद चितळे १५-६, १६-१४. उपांत्य फेरीत – आदित्य उमराणी – शिवकिरणसिंग ठाकूर वि. वि. विनीत दबक – विवेक कांचन १६-१४, १५-१०; चेतन शाह – मकरंद चितळे वि. वि. अजय नागवडे – शशिकांत रूगे ८-१५, १५-८, १५-६.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – आदित्य काळे वि. वि. जयंत पारखी १६-१४, १६-१४. उपांत्य फेरी – आदित्य काळे वि. वि. स्वप्नील चौधरी १५-२, १५-३; जयंत पारखी वि. वि. आनंद साबू १५-११, १५-९.

३५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अक्षय गद्रे – जयंत पारखी वि. वि. निखिल गोसावी – तेजस खिंजवाडेकर १५-१२, १५-७. उपांत्य फेरी – अक्षय गद्रे- जयंत पारखी वि. वि. विनीत दबक – विवेक कांचन १५-१०, १५-४; निखिल गोसावी – तेजस किंजावाडेकर वि. वि. निखिल फडणीस – सारंग गांधी १५-६, १५-६.

लघु उद्योगांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ३० : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास १० जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात असून पात्र लघुउद्योजकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार १५ हजार, द्वितीय पुरस्कार १० हजार व मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.

लघुउद्योगाच्या उद्योगाची उद्योग संचालनालयाकडे १ जानेवारी २०१९ पूर्वीची अर्थात मागील तीन वर्षांपासून नोंदणी असावी. त्याच बरोबर उद्योगात मागील दोन वर्षांपासून उत्पादन प्रक्रिया सुरू असावी. उद्योग कोणत्याही अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेचा अथवा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जदारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर,पुणे दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३९५८७/२५५३७५४१ येथे संपर्क साधावा.
0000

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल-वाहनतळांची जागाही निश्चित

पुणे, दि. ३०: हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.

जयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी वाहतूक ही खराडी बायपास येथून उजवीकडे वळून केशवनगर मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी वाहतूक हडपसर मगरपट्टा चौक येथे उजवीकडे वळून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जाईल.

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणारी वाहने हडपसर – पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

इंद्रायणी नदीवरील आळंदी – तुळापूर हा पूल १० जानेवारी २०२२ रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.

सोहळ्यासाठी वाहनतळे निश्चित
जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळेही या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून जयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच अनुयायांनी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहनही श्री. मगर यांनी केले आहे.

पुण्याकडून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- आपले घर शेजारी हनुमंत कंद यांचा प्लॉट तसेच संदीप सातव यांचा प्लॉट लोणीकंद, लोणीकंद बौद्धवस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सामवंशी अकॅडमी समोर थेऊर रोड, खंडाबाचा माळ

खासगी बस पार्किंग- आपले घर सोसायटीच्या मागील प्लॉट.

१ जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सामेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग पीएमपीएमएल बसेस वगळता इतर वाहनांसाठी एकेरी राहील.

आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- तुळापूर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग, फुलगाव सैनिकी शाळा मैदान

थेऊर, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- खंडोबाचा माळ

अष्टापूर डोंगरगावडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मोकळे मैदान

दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे:
तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरुमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरुमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलीस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट.

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे, दि. ३०: पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचा विचार करता त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्यावतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व विभागाच्यावतीने नियोजनाप्रमाणे कामे करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. पोलीस विभागाच्यावतीने उत्तम पद्धतीने बंदोबस्त करण्यात येणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सुविधा निर्माण करण्यात येत असून जयस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. चारही बाजुंनी बॅरिकेट तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

पुणे दि. ३०:- पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

पुणे दि. ३०: नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

१ जानेवारी रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.

त्यानुसार पूरम चौकातून बाजीराव रोडने शनिवार वाडा हा मार्ग बंद करण्यात येणार असून नागरिकांनी त्याऐवजी पूरम चौकातून टिळक मार्गाने अलका टॉकीज चौकातून इच्छितस्थळी जाणाचा पर्याय अवलंबवावा. अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक हा मार्ग बंद असणार आहे, त्याऐवजी नागरिकांनी आप्पा बळवंत चौक- बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा व पुढे इच्छीतस्थळी जावे.

स.गो.बर्वे चौक ते पुणे महानगरपालिका भवन तसेच शनिवारवाडा हा रस्ता बंद राहील. त्याऐवजी नागरिकांनी स.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोडमार्गे झाशीची राणी चौकातून इच्छितस्थळी जावे. गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक हा रस्ता देखील बंद असणार असून त्याऐवजी गाडगीळ पुतळा-डावीकडे वळून कुंभारवाडा किंवा सूर्या हॉस्पिटल समोरून इच्छितस्थळी जाता येईल, असे पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

३१ डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल

पुणे दि. ३०:- वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

लष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर ३१ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.

त्यानुसार वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.

नो-व्हेईकल झोन:
३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ७ वा. ते १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन घोषित करणत आला आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम:
३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहनही पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२

0

किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत

पुणे, दि. ३०: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या २ ते १२ जानेवारी २०२३ जानेवारीदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून ४ जानेवारी २०२३ रोजी बालेवाडीकडे प्रयाण करणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ च्या आयोजनाबाबत राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी, क्रीडा स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व क्रीडा ज्योत ३ जानेवारी २०२३ पर्यंत शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आणण्यात येणार आहेत. स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता निघणार असून ताम्हिणी घाट मार्गे सायंकाळी ६ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मुक्कामी येणार आहे.

ऑलिम्पिक हॉकीपटू अजित लाकरा, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू समिक्षा खरे, राष्ट्रीय पदक विजते हॉकीपटू अक्षदा ढेकळे, प्रज्ञा भोसले, राहुल शिंदे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकर सोहम ढोले, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू गायत्री चौधरी, आंतरराष्ट्रीय वुशु खेळाडू श्रावणी कटके आणि स्वराज कोकाटे हे खेळाडू किल्ले रायगड ते पुणे दरम्यान क्रीडज्योत धावक असतील.नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई व पुणे या ८ विभागातील मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणाहून क्रीडा ज्योतींचे आगमन दि. ३१ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे समायोजनासाठी येणार आहेत. किल्ले रायगडवरुन आलेली मुख्य क्रीडा ज्योत ५ जानेवारी २०२३ रोजी एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथम ऐतिहासिक शिल्प येथे येईल. याच ठिकाणी आठ विभागातून आलेल्या आठ क्रीडा ज्योत एकत्रित येऊन या सर्व क्रीडा ज्योतींचे मुख्य क्रीडा ज्योतीत दुपारी १ वाजता समायोजन करण्यात येणार आहे. ऑलिम्पियन खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कारार्थी यांच्या समवेत लक्ष्मी रोड -डेक्कन, फर्ग्यूसन महाविद्यालय मार्गे, शिव छत्रपती क्रीडा संकूल, महाळूंगे, बालेवाडी येथे ही क्रीडा ज्योत पोहोचणार आहे.

विभागीय क्रीडा ज्योत रॅलींचा मार्ग
नागपूर विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग नागपूर – वर्धा – समृद्धी महामार्गाने शिर्डी – अहमदनगर – येरवडा, अमरावती विभाग रॅली अमरावती – अकोला – शेगांव – खामगांव – शिंदखेड (राजा) – औरंगाबाद – अहमदनगर -येरवडा, औरंगाबाद विभाग रॅली औरंगाबाद- अहमदनगर – येरवडा, लातूर विभाग- लातूर – उस्मानाबाद- येरवडा, कोल्हापूर विभाग- कोल्हापूर – कराड – सातारा – येरवडा, पुणे विभाग रॅली- बारामती ते येरवडा, नाशिक विभागीय रॅलीचा मार्ग नाशिक – संगमनेर-येरवडा आणि मुंबई विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग गेट वे ऑफ इंडिया – वाशी – लोणावळा – येरवडा असा असणार आहे, अशी माहिती माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दिली आहे

ठाकरे-शिंदेंच्या वादाचं आम्हाला देणं-घेणं नाही; राज्याचे हित बघा

नागपूर-मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नये, असा असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे नेहमी प्रमाणे जुन्या गोष्टीमध्ये रमले असा टोला अजित पवारांनी सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तर राज्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचा समस्या याकडे लक्ष घालावे, आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आमच्याकडून घेतलेल्या दीपक केसरकरांना वेळ द्या, ते योग्य गोष्टी हेरून टीका करतात असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. यावेळी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोगावले यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, जास्त बोलू नका तुम्हाला मंत्रिपदाला अडचण येईल असा उपहासात्मक टोला पवारांनी लगावला.

शेवटच्या १५ मिनिटात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा ते सोडून राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.तर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासोबत चांगल्या संबंधातून महाराष्ट्रासाठी काय मिळणार असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदेंच्या भाषणावरुन टोला लगावला आहे. राज्यातील 13 कोटी जनतेचे पालक आहात असे वागावे म्हणत एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्या अपमान केल्याचा निषेध व्हायला हवाच. सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 6 महिन्यांपूर्वी काय झाले हे सर्वांना माहिती आहे. झाले गेले ते सर्व सोडून कामाला लागा, जुने उकरुन काढू नका, त्यांचा काहीच फायदा होणार नाही असेही म्हणताना अजित पवार यांनी नव्या वर्षांत एकनाथ शिंदेंनी राज्यातील समास्यावर लक्ष द्यावे असेही म्हटले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले कीमहाराष्ट्रातील अधिवेशनात एखादे दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेलं भाषण पूर्णपणे राजकीय होते.स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होते.

विधानसभेत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

0

नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्यावतीने अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकसंदेश वाचून दाखविला.

शोकसंदेशात ॲड. नार्वेकर म्हणाले, हिराबेन मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आईंचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तसे एका मुलाखतीत बोलून दाखविले होते. आपल्या आईने जीवनात अनेक कष्ट केले असल्याचा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री निवासस्थानी त्या केवळ एकदाच गेल्या होत्या. नोटाबंदीच्या आपल्या मुलाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ  त्या एटीएमच्या रांगेतही उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे जीवन ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा आहे. त्यांच्या बालवयातील संघर्षाचे स्मरण औचित्यपूर्ण ठरेल. त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘काम करो बुद्धीसे और जीवन जीयो शुद्धी से’ असा जीवन संदेश दिला होता, असे श्री. नार्वेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सभागृहाच्या वतीने दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाबद्दल स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकप्रस्तावाची एक प्रत शोकाकुल कुटुंबाला पाठविण्यात आली आहे.

आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 30 : बेरोजगार तरुणांना नोकरीची प्रलोभने दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

प्लेसमेंट कार्यालयाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असल्याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

नोकरीच्या आमिषाने फसवून देशाबाहेर नेलेल्या तरुणांना देशामध्ये परत आणण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. राज्यातील अशा प्रकारच्या तक्रारी त्या कक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची वरिष्ठ पातळीवर चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाइपलाइनद्वारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उध्वस्त होत असल्याने या प्रकरणाची व्यवस्थापकीय संचालक किंवा संचालक यांच्यामार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.

या संदर्भातील लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली होता, या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांचे युनिट क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीज निर्मिती होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विधवा महिलांविरुद्ध कुप्रथा बंद करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विधवा महिलांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा करण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रामराव पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यास श्री.फडणवीस यांनी उत्तर दिले.

विधवा महिलांच्या कुप्रथेच्या परिणामाबाबत 31 मे रोजी महिला विशेष ग्रामसभा घेतली जाईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाईल, असे श्री फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी.. मुख्यमंत्री शिंदेंचे जोरदार टीकास्त्र आणि इशारे (व्हिडीओ)

तालुका स्तरावर हेलिकॉप्टर सेवा देणार ..आम्ही फक्त देना बँक . लेना बँक नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर – ज्याला सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत त्यांना आव्हान देऊ नका .. टीकेची, आरोपांची मर्यादा असते ती ओलांडू नका असा स्पष्ट इशारा नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला, एवढेच नव्हे तर इशारा हिऱ्या पोटी गारगोटी अशी उपमा देखील उद्धव ठाकरेंना दिली.

कंगना राणावतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. उद्योजकांकडे टक्केवारी मागितली, असा घणाघात शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल केलेल्या आरोपांना उदाहरणे वाचून दाखवत उत्तर दिले.

प्रबोधकारांचे वारस म्हणवणारे लिंबू- टिंबूची भाषा करतायत. मी वर्षांवर जाण्याआधी तिथे वाटीभर लिंबे सापडली, असा दावा करून त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला.

रेशीमबागेत गेलो गोविंद बागेत नाही

बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार कुणाला आहे. गोविंद बागेत जाणाऱ्यांना का असा सवाल उपस्थित करताना, बाळासाहेबांच्या विचारांमुळेच रेशीम बागेत गेलो असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. यामुळेच ‘राष्ट्रवादी’ची शिवसेना असे जयंत पाटील योग्यच बोलले असा टासेलाही त्यांनी लगावला. काँग्रेससोबत गेले तेव्हाच बाळासाहेबांच्या नाव घेण्याचा अधिकार तुम्ही गमावला असेही त्यांनी म्हटले. एक माणूस चुकेल हो, पण 50 लोक कशी चुकतील म्हणत आम्ही 50 जण सत्तेतून बाहेर पडलो असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

‘मविआ’ने पत्रकारांनाही त्रास दिला

शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. बाळासाहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा मी तुमच्या पाठिशी आहे, पण हे तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेत होते. कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले असा, आरोपही शिंदेंनी केला आहे. मविआ विरोधात बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला गेला असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिंदेचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, दिव्यागांसाठी मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. आपल्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. सरकार बदलले नसते, तर नागपुरात अधिवेशन झाले नसते, असा दावाही त्यांनी केला. शिंदे म्हणाले की, धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. अतिवृष्टीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत दिली. शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टने फिरले पाहिजे. त्यासाठी तालुकास्तरावर हेलिपॅड करू. हेलिकॉप्टरने फिरणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे टोमणे मला मारले. मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.

अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी – मंत्री दीपक केसरकर

0

नागपूर, दि. 30 : राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारण्याची कार्यवाही करू. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधील, शाळांमधील पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालाबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाच्या शिफारशी शासनाला सादर झाल्या आहेत. याबाबत योजना शिक्षण संचालक यांच्याकडून आर्थिक बाबींचा सविस्तर माहिती मागविली आहे. सध्या 50 टक्के पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आधार लिंकद्वारे विद्यार्थीसंख्या समजल्यानंतर पुढील 30 टक्के पदभरती करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांप्रमाणे अल्पभाषिक शाळांचीही पदभरती करू.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे यांनी उपप्रश्न उपस्थितीत करून सहभाग घेतला.

शिक्षकांचा पगार थेट खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न

शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन अधिकारी कार्यालयांत शिक्षकांना जावे लागू नये, यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू करणार आहे. शिवाय शिक्षकांचा पगार थेट बँकेत जमा होण्यासाठीही राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

शिक्षण कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने कामात दिरंगाई होत असल्याबाबत सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. श्री. केसरकर यांनी सांगितले की, कागदपत्रे योग्य असतील कामात दिरंगाई होत असेल तर कारवाई करण्यात येईल. राज्यात पदभरतीची मोहीम सुरू असून काही पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. जनतेला किंवा शिक्षकांना कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी कॅशलेस आणि डिजीटलायझेशन पद्धती सुरू करण्यात येणार आहे. खाजगी, अंशत: अनुदानित शाळांना न्याय देणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

या विषयाचा प्रश्न सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे, प्रवीण दटके, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला होता.

अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराबाबत पर्यायी व्यवस्था

अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराबाबत निविदा प्रक्रियेसंदर्भात न्यायालयात स्थगिती असल्याने दोन वर्षांपासून पोषण आहार देण्यात आला नाही. मात्र राज्य शासनाने सध्या पर्यायी व्यवस्था करीत पोषण आहार सुरू केला आहे. मागील दोन वर्षांचा पोषण आहार घरपोच केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शालेय पोषण आहाराबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, शालेय पोषण आहारांतर्गत स्वयंपाकी, मदतनीस यांचे ऑक्टोबर 2022 पर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. शिवाय खाद्य तेलाचे अनुदानही वितरित केले आहे. इंधन आणि भाजीपाल्यांचे अनुदान, तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीचे 70 टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही देण्यात येणार आहे.

नागपूर येथील सुसंस्कार बचत गटावर तांदळाचा गैरव्यवहार केल्याने त्यांचे काम रद्द करून काळ्या यादीत टाकून पोलीस कारवाई करण्यात येत आहे. पोषण आहार योजनेच्या निविदेमध्ये सध्या 19 महिला बचत गट सामील असून ई-निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राबविली जाते. यामुळे यामध्ये कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, उमा खापरे, डॉ. रणजित पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी

शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पगार थेट बँकेत जमा करण्याची पद्धती राज्य शासन सुरू करणार असून पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकित वेतन, प्रलंबित वैद्यकीय बिले, सातव्या वेतनाचे हप्ते याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. श्री. केसरकर यांनी सांगितले की, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तिसरा हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. शिवाय सर्व जिल्हा परिषदांना वेतनांचा निधी वेतनावर खर्च करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच वैद्यकीय देयकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दराडे, निरंजन डावखरे, डॉ. सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.