नागपूर-मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नये, असा असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे हे नेहमी प्रमाणे जुन्या गोष्टीमध्ये रमले असा टोला अजित पवारांनी सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तर राज्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचा समस्या याकडे लक्ष घालावे, आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आमच्याकडून घेतलेल्या दीपक केसरकरांना वेळ द्या, ते योग्य गोष्टी हेरून टीका करतात असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. यावेळी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोगावले यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, जास्त बोलू नका तुम्हाला मंत्रिपदाला अडचण येईल असा उपहासात्मक टोला पवारांनी लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा ते सोडून राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.तर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासोबत चांगल्या संबंधातून महाराष्ट्रासाठी काय मिळणार असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदेंच्या भाषणावरुन टोला लगावला आहे. राज्यातील 13 कोटी जनतेचे पालक आहात असे वागावे म्हणत एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्या अपमान केल्याचा निषेध व्हायला हवाच. सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 6 महिन्यांपूर्वी काय झाले हे सर्वांना माहिती आहे. झाले गेले ते सर्व सोडून कामाला लागा, जुने उकरुन काढू नका, त्यांचा काहीच फायदा होणार नाही असेही म्हणताना अजित पवार यांनी नव्या वर्षांत एकनाथ शिंदेंनी राज्यातील समास्यावर लक्ष द्यावे असेही म्हटले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील अधिवेशनात एखादे दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेलं भाषण पूर्णपणे राजकीय होते.स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होते.