पुणे दि. ३०:- वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
लष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर ३१ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.
त्यानुसार वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.
नो-व्हेईकल झोन:
३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ७ वा. ते १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन घोषित करणत आला आहे.
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम:
३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहनही पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी केले आहे.