पुणे, दि. ३० : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास १० जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात असून पात्र लघुउद्योजकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार १५ हजार, द्वितीय पुरस्कार १० हजार व मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
लघुउद्योगाच्या उद्योगाची उद्योग संचालनालयाकडे १ जानेवारी २०१९ पूर्वीची अर्थात मागील तीन वर्षांपासून नोंदणी असावी. त्याच बरोबर उद्योगात मागील दोन वर्षांपासून उत्पादन प्रक्रिया सुरू असावी. उद्योग कोणत्याही अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेचा अथवा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
अर्जदारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर,पुणे दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३९५८७/२५५३७५४१ येथे संपर्क साधावा.
0000