Home Blog Page 1479

दिनेश कुमार शुक्ला यांनी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची  सूत्रे स्वीकारली

नवी दिल्ली -अणू ऊर्जा नियामक मंडळाचे  माजी कार्यकारी संचालक आणि नामांकित शास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला यांनी अणू ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारली. या पदावर त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनेश कुमार शुक्ला हे आण्विक संरक्षण या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ म्हणून ओळखले जातात.मध्य प्रदेशातील जबलपूरच्या   शासकीय अभियंता  महाविद्यालयातून 1980 मध्ये मेकॅनिकल  अभियांत्रिकीची  पदवी घेतलेल्या शुक्ला यांनी 1981 मध्ये भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली. ध्रुव या उच्च दर्जाच्या  संशोधन अणुभट्टी उभारण्याच्या कामात त्यांचा सहभाग होता. पुढे भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात अणुभट्टी विषयक  विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी  स्वीकारली. 2015 मध्ये ते अणुऊर्जा नियमक मंडळ दाखल झाले. तेथे त्यांनी  मंडळाचे सदस्य, अणुभट्टी संचालन सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि  कार्यकारी संचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. फेब्रुवारी 2021 मध्ये शुक्ला हे अणुऊर्जा नियामक मंडळातून निवृत्त झाले. त्यानंतर ते अणू उर्जा व्यावसायिकांना संरक्षण आणि नियम यावर मार्गदर्शन करत आहेत.

अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना राष्ट्रपतींनी 15 नोव्हेंबर 1983 रोजी अणुऊर्जा कायदा, 1962 द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्याअंतर्गत विशिष्ट  नियामक  आणि सुरक्षा कार्ये पार पाडण्यासाठी केली होती.

डिसेंबर-2022 एका महिन्यात वस्तू आणि सेवा करातून दीड लाख कोटी रुपयांचा महसूल,देशात महाराष्ट्राचा नंबर १ कायमच .


गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 15% ची वाढ-सलग दहा महीने वस्तू आणि सेवा करातून मिळणारा मासिक महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून जास्त

नवी दिल्ली– डिसेंबर 2022 मध्ये देशाचे सकल वस्तू आणि सेवा कर संकलन 1,49,507 कोटी रुपये झाले असून त्यामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन  26,711  कोटी रुपये,  राज्य वस्तू आणि सेवा कर 33,357 कोटी रुपये,  वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 40,263 कोटी रुपयांचा समावेश असलेला एकात्मिक वस्तू आणि सेवा कर 78,434 कोटी रुपये  आणि वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 850 कोटींसह 11,005 कोटी रुपये अधिभारातून मिळालेला महसूल यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून अधिभारातून केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 36,669 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 31,094 कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर 2022 साठी नियमित तडजोडीनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल केंद्रीय वस्तू आणि सेवा करासाठी 63,380 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 64,451 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2022 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 18% नी जास्त आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 7.9 कोटी ई-वे बिल तयार झाली, ऑक्टोबर 2022 मध्ये तयार झालेल्या 7.6 कोटी ई-वे बिलांहून ही संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या महसुलाचा कल दर्शविला आहे. डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यनिहाय आकडेवारी सारणीमध्ये दिसत आहे.

State-wise growth of GST Revenues (Rs crore) during December 2022[1]

 StateDec-21Dec-22Growth
1Jammu and Kashmir32041028%
2Himachal Pradesh6627087%
3Punjab1,5731,73410%
4Chandigarh16421833%
5Uttarakhand1,0771,25316%
6Haryana5,8736,67814%
7Delhi3,7544,40117%
8Rajasthan3,0583,78924%
9Uttar Pradesh6,0297,17819%
10Bihar9631,30936%
11Sikkim24929017%
12Arunachal Pradesh536727%
13Nagaland344430%
14Manipur4846-5%
15Mizoram202316%
16Tripura687815%
17Meghalaya14917115%
18Assam1,0151,15013%
19West Bengal3,7074,58324%
20Jharkhand2,2062,53615%
21Odisha4,0803,854-6%
22Chhattisgarh2,5822,5850%
23Madhya Pradesh2,5333,07922%
24Gujarat7,3369,23826%
25Daman and Diu2-86%
26Dadra and Nagar Haveli23231737%
27Maharashtra19,59223,59820%
29Karnataka8,33510,06121%
30Goa592460-22%
31Lakshadweep11-36%
32Kerala1,8952,18515%
33Tamil Nadu6,6358,32425%
34Puducherry14719230%
35Andaman and Nicobar Islands2621-19%
36Telangana3,7604,17811%
37Andhra Pradesh2,5323,18226%
38Ladakh152668%
97Other Territory14024978%
99Center Jurisdiction186179-4%
 Grand Total91,6391,08,39418%

अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वीकारला पदभार

नवी दिल्ली-श्री अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे (रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), म्हणून पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्री अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. याआधी श्री अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे सदस्य (पायाभूत सुविधा) म्हणून काम केले आहे.

श्री.लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सच्या 1984 सालच्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते. त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि रुरकी विद्यापीठातून (IIT, रुरकी) अभियांत्रिकी (स्ट्रक्चर्स) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे.

श्री लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी अनेक महिने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.महाव्यवस्थापकीय पदावरील त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मालवाहतूक आणि सर्वाधिक संख्येने किसान रेल्वे चालवण्यासह सर्वाधिक संख्येने पार्सल वाहतूक टनेज वाहून नेण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते, ज्यातून रेल्वेला अधिक लाभदायी महसूल प्राप्त झाला. भाडे न देता, भंगार विक्री आणि व्यापक तिकीट तपासणी या मोहिमांद्वारे त्यांनी महसुलात विक्रमी सुधारणा घडवून आणली.मुंबईतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला आणि सोडवला.  त्यांच्या कार्यकाळात,मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणी करून त्या आणि कार्यान्वित करण्यात मोठी झेप घेतली तसेच मध्य रेल्वेचा ठाणे उपनगरीय मुंबईतील दिवा आणि ठाणे दरम्यानचा बहुप्रतिक्षित पाचवा आणि सहावा मार्ग सुरू केला.

गजबजलेल्या गाझियाबाद-प्रयागराज-DDU मार्गाला पर्याय म्हणून लखनौ-वाराणसी-DDU मार्गावरील मालवाहतूक सुधारण्यासाठी त्यांनी लखनौ, उत्तर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यांच्या कार्यकाळात लखनौ विभागातील स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली.

उत्तर रेल्वेवर मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि मुख्य अभियंता (बांधकाम) या नात्याने त्यांनी नवीन रेल्वेमार्ग, ट्रॅकचे दुहेरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग, यार्डांची पुनर्रचना, महत्त्वाचे पूल, स्टेशन बांधणी इत्यादी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. आनंद दिल्लीतील विहार टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूच्या स्थानकाच्या इमारतीची बांधकाम योजना त्यांनी तयार केली होती. नवी दिल्ली स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास करण्याच्या नियोजनाशीही त्यांचा जवळचा संबंध होता, ज्यात जमीन आणि हवाई जागेच्या व्यावसायिक विकासाचा समावेश होता.

श्री लाहोटी यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग, यूएसए येथे धोरणात्मक व्यवस्थापन आणि नेतृत्व कार्यक्रमांचे; तसेच बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली;आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद, अशा नामवंत संस्थांतून प्रशिक्षण घेतले आहे.त्यांनी हाँगकाँग, जपान, यूके, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील स्थानकांच्या विकासासह रेल्वेच्या जमिनीवरील व्यावसायिक विकासाचा अभ्यास केला आहे.रेल्वेमार्ग तंत्रज्ञान आणि   (ट्रॅक टेक्नॉलॉजी) आणि रेल्वेमार्ग परिरक्षण यंत्रांच्या  (ट्रॅक मेंटेनन्स मशीन) विकासासंदर्भात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.

***

जीवनातील कोणतीही समस्या दीर्घकाळ राहत नसते – सुदर्शन साबत

पुणे, – कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची मनाची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. आनंदी, परिपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यास प्रत्येकजण पात्र आहे. कोणत्याही औषधाला एक्सपायरी डेट असते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येला सुद्धा एक अंतिम तारीख असते. मनाच्या शक्तीचा उपयोग करून व्यक्ती, समाज आणि संस्था यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी पुढील ५ वर्षात १ हजारहून अधिक प्रशिक्षक तयार करण्याबरोबरच जगातील पहिले “माईंड पॉवर कॉलेज” सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध माइंड ट्रेनर सुदर्शन साबत यांनी केले.

पुण्यात आयोजित मनशक्ती प्रशिक्षण शिबिरात बोलताना सुदर्शन साबत म्हणाले की, मनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांनी केवळ सकारात्मक विचार करण्याची शक्तीच वाढवली नाही तर अनेक लोकांच्या जीवनातही परिवर्तन घडवून आणले आहे. वर्षानुवर्षे मनशक्ती तंत्राद्वारे लोकांनी जीवनात हव्या असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी साध्य केल्या आहेत. हे प्रशिक्षक एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या समस्यांना कसे सामोरे जायचे आणि जीवनातील अडथळे कसे दूर करायचे हे शिकवतात. करिअरमधील आणि जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याबरोबर यशस्वी कसे व्हावे आणि स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणावीत याविषयी सुदर्शन साबत यांनी माहिती दिली आहे.

भारताचे सर्वोत्तम माईंड ट्रेनर सुदर्शन साबत हे “सुदर्शन ग्रुप ऑफ कंपनी”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या अर्ध्या दशकात ११ व्यवसाय विकसित केले आहेत. त्यांनी ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट माइंड ट्रेनर पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही उपाधिपेक्षा ‘इन्फोप्रेन्योर’ या उपाधीला त्यांनी मान्यता दिली. “माइंड विनर वर्ल्ड विनर”, “रिच माइंड ब्लूप्रिंट” आणि “डेअर युअर माइंड-टु थिंक बियॉन्ड” या पुस्तकांचे ते लेखक आहेत. इंग्रजी, हिंदी, ओडिया, गुजराती आणि मराठी भाषेतील त्यांची इतर २१ पुस्तके २०२३ मध्ये प्रकाशित होणार आहेत.

सुदर्शन साबत हे भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या माइंड ट्रेनर्सपैकी एक आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो प्रशिक्षण कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेकांना त्यांच्या जीवनात उत्तम यश मिळाले आहे. लोकांना त्यांचे ध्येय शोधण्यात आणि साध्य करण्यात मदत करण्यासाठी सुदर्शन साबत यांनी अनेक मनशक्ती कार्यशाळा आयोजित केल्या. व्यापक अनुभव आणि लोकांचे वर्तन समजून घेण्याचे सखोल ज्ञान असल्याबरोबर सुदर्शन साबत यांना विविध उद्योगांमध्ये मिळालेल्या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

शिक्षणाद्वारे गरिबीचे चक्र तोडण्याच्या उद्देशाने साबत यांनी आर्यन फाउंडेशनची स्थापना केली. आर्यन फाउंडेशनद्वारे भारतातील गरिबी कमी करण्यासाठी लहान मुलांना शिक्षण त्याचबरोबर महिला, तरुण आणि वृद्धांना मदत दिली जाते आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणही दिले जाते.

नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या दिवशी दारू नको दूध प्या उपक्रम ;  गुडलक चौकात दूधाचे वाटप

पुणे : दारू नका दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… दारुचा पाश जीवनाचा नाश… एक दोन तीन चार दारुबंदीचा करा प्रचार… दारु सोडा आनंद जोडा…असे सांगत नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू पिऊन न करता चांगल्या पद्धतीने आनंदात करावे, याकरीता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाई व कलाकारांनी जनजागृती केली.

डेक्कन जवळील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि पुणे पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, कात्रज डेअरीचे कुमार मारणे, धनवीर वाडकर, संतोष पटवर्धन, केतन जैन, दत्तात्रय सोनार, संजय हिरवे, अनिरुद्ध हळंदे, विजय शिंदे, प्रसाद चांदेकर, शैलेश बढाई, जयंत हिरे, विवेक राजगुरु, निखिल कदम, मनीष भोसले, प्रकाश पवार, राहुल बोंबे, मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचे प्रा. प्रा.डॉ.देविदास गोल्हार, प्रा.प्रवीण कड, प्रा. सुशील गंगणे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा.कल्पना वैद्य यावेळी उपस्थित होते. कात्रज डेअरीच्या संचालक केशर पवार यांनी विशेष सहकार्य केले. 
कलाकार पलाश साठे यांनी देखील लोकांना दूध वाटप करुन जनजागृती केली. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्सच्या एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याकरिता सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष असून यावेळी महाविद्यालयीन तरुणाईने घोषणा देत दारू करते कुटुंब उध्वस्त… असे संदेश फलक घेऊन जनजागृती देखील केली.  पथनाट्य, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करीत सरत्या वर्षाला निरोप दिला.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला २०२२ ला निरोप …

0

राज्यातील जनतेला दिल्या नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 31: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रय़त्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार सुनील कांबळे ,भीमराव तापकीर यांच्या विधानसभेतील तक्रारी वाऱ्यावर ?

पुणे- महापालिका आयुक्त हे आता प्रशासक असून ते स्थायी समिती आणि मुख्य सभा बेकायदेशीरपणे घेत असल्याची आमदार सुनील कांबळे यांची तक्रार आणि सिनिअर आमदार भीमराव तापकीर यांनी स्वारगेट ते कात्रज या मार्गावर बीआरटी चे डिव्हायडर बसविण्यासाठी १०५ कोटीचा खर्च कसा ? हि विधानसभेत केलेली तक्रार … जणू वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप आता होऊ लागला आहे .

निवडणुका वारंवार विविध कारणांनी टाळणाऱ्या निवडणूक आयोगाने निवडणुका घ्यायच्या नव्हत्या तर महापालिका लोकप्रतिनिधींना मुदतवाढ द्यायला हवी होती परंतु तसे झाले नाही , या लोकप्रतिनिधींना घरी बसवून म्हणजे महापालिका बरखास्त करून महापालिकेवर प्रशासक लादण्याचा खेळखंडोबा का करण्यात आला ? या मागे नेमे कोण कोणा चे हित संबध जपले आहेत हा आता संशोधनाचा विषय होऊ शकणार आहे. या मागे कारण हि तसेच आहे. जे खुद्द सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत मांडलेली हि तक्रार आहे. महापालिका प्रशासक सर्व नियम धाब्यावर बसवून महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आणि मुख्य सभा घेत असल्याची तक्रार विधानसभेत करण्यात आली पण ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोहोंनी अगदी किरकोळीत घेतलेली दिसले आहे. मंत्री उदय सामंत यांनी यावर दिलेले उत्तर देखील अगदीच जुजबी आणि मुल उत्तर नसल्याचे दिसले आहे. आता महापालिका बरखास्त झाल्याने लोकप्रतिनिधी नसतात त्यामुळे सभा अशा घेतल्या असाव्यात असे कारण त्यांनी दिले आहे. पण कायदेशीर बाबींचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे. या मागे नेमके काय गौडबंगाल आहे ते त्यांनाच ठाऊक असणार आहे.

दुसरी बाब अशी कि बीआरटी मार्ग , सायकल मार्ग यावरील तक्रार राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे ,चेतन तुपे यांनी केली .त्याच बरोबर हीच तक्रार भाजपचे सिनिअर आमदार भीमराव तापकीर यांनी हि केली . तुपे यांनी जसा स्वारगेट ते हडपसर मार्गावरील बीआरटी च्या दुभाजाकांसाठी केलेल्या खर्चाची चौकशीची मागणी केली तशीच मागणी भीमराव तापकीर यांनीही केली . अवघ्या ५ किमी अंतराच्या दुभाजाकांसाठी १०५ कोटीचा खर्च कसा ? आम्ही हि बीआरटी आणतानाच विरोध केला होता असेही तापकीर यांनी नमूद केले .एकंदरीत आमदारांच्या या तक्रारीवरून बीआरटी आणि सायकल मार्गीकेमुळे पुण्यात किमान ५० टक्के तरी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच विधानसभेत पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग काढून टाकण्याची लेखी केलेल्या सूचनेचा देखील उल्लेख करण्यात आला . मात्र या मंत्री सामंत यांनी जुमानल्या नाहीत आणि मेट्रोच्या कामाचे कारण वाहतूक कोंडी मागे असल्याचे सांगून या सर्व तक्रारी वाऱ्यावर सोडल्या आहेत .

यामुळे बीआरटी , सायकल मार्ग यावर केलेल्या शेकडो कोटीच्या खर्चाची चौकशी होणार नाही हे तर स्पष्ट झालेच , पण महापालिका प्रशासकांना नियमानुसार , कायद्यांचा अवलंब करत मुख्य सभा घ्या आणि स्थायी समितीची हि सभा घ्या असे हि आदेश देण्यात येणार नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे .

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

समाज कल्याण आयुक्तांकडून पाहणी व आढावा

पुणे, दि.३१: पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करुन कोविड-१९ च्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे. सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. डॉ. नारनवरे यांनी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या सोहळ्यादरम्यान १ जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात येणार असून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वा. नंतर अभिवादन स्थळ सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले असणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महसुल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागांकडून नियोजन पुर्ण करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने या कार्यक्रमाचे सकाळी ६ वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

समन्वयसाठी विविध समित्या
या कार्यक्रमासाठी शासनाने समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समिती गठित केली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे अध्यक्ष आहेत. तर समाजकल्याणचे पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी हे समितीचे सदस्य सचिव असून त्यांनी शासनाच्या इतर विभागाच्या समन्वय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. संनियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती, नियत्रंण कक्ष- पुणे, नियत्रंण कक्ष-भिमा कोरेगाव, नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, बुक स्टॉल समिती आदी समित्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.

स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष.
अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महिलाची संख्या विचारात घेता लहान बाळांना स्तनपानासाठी स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर हिरकणी कक्षाचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य दूत
विजयस्तंभ ते पार्किंग चे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य दूत’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकी वरील आरोग्य दूत तात्काळ आरोग्य सेवा देतील, आरोग्य विभागाची ही संकल्पना नव्याने येथे अंमलात येत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती येथे निर्धार व्यसनमुक्तीचा

संकल्प नवीन वर्षाचा उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पुणे, दि. ३१ डिसेंबर:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट आणि टाकळकर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्धार व्यसनमुक्तीचा, संकल्प नवीन वर्षाचा’ हा उपक्रम शनिवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पार पडला. यावेळी टाकळकर क्लासेसच्या १०० विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प सोडून शपथ घेतली. या कार्यक्रमाची सुरूवात अथर्वशीर्ष पठणाने झाली. तसेच काही विद्यार्थी हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातात वेगवेगळे संदेश असलेले बोर्ड घेऊन उभे होते.यावेळी केदार टाकळकर,शीतल पाटील, चंद्रकांत शहासने आणि २० शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


या प्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर ट्रस्टचे उपाध्यक्ष हेमंत रासणे, केदार टाकळकर आणि शितल पाटील यांच्या हस्ते डिजिटल व्यसनमुक्ती पोस्टर प्रकाशन करण्यात आले.
सूर्यवंशी म्हणाले,“सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असून ३१ डिसेंबर म्हणजे व्यसनाधीनतेची दिवसच असे काही वातावरण तयार झाले आहे. या दिनी वाढत असलेल्या बीभस्तपणा लक्षता घेता विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम होतांना दिसत आहे. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संकल्प देणे गरजेचे आहे.”
केदार टाकळकर म्हणाले,“ वाढत्या डिजिटल युगात विद्यार्थी रात्रीचा दिवस करून फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप, नेटफ्लिक्सच्या जाळ्यात अडकलेला आहे. त्यामुळे त्याचे मन हे अभ्यासापासून विचलित झाले आहे. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना बाप्पा समोर ही शपथ दिली आहे. आमच्या सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांना ही शपथ दिली जाणार आहे.”


शितल पाटील म्हणाले,“व्यसनांची वाढती उपलब्धतेमुळे समाजाची शारीरिक, आर्थिक व सामाजिक मोठी हानी होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या उत्सवाला येत असलेले बीभत्सरूप व या दिवशी वाढत असलेली व्यसनाधीनता रोखणे काळाची गरज आहे. आजच्या विद्यार्थी हा डिजिटलच्या जाळ्यात अडकलेला आहे. त्यामुळे आमच्या क्लासेसमध्ये केवळ मार्क्सच मिळवून दिले जातात असे नव्हे तर मार्क्स बरोबर मूल्यांचे शिक्षण देखील येथेे दिले जाते.”
यावेळी विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा, नववर्षी निर्धार, दगडूशेठ बाप्पाचा आशिर्वाद, हाच आमुचा आधार आणि टाकळकर क्लासेसची साद, त्याला दगडूशेठ बाप्पाचा आशिर्वाद,
विद्यार्थ्यांची होवो संकल्पपूर्ती, शाबासकी देतील मंगलमूर्ती या सारखे स्लोगन घेऊन उपस्थित होते.

स्वराज्य संघटनेच्या वतीने’दारू नको दूध प्या’ उपक्रम

पुणे -शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ‘दारू नको, दुध प्या’ आपण आपले आरोग्य जपुया हा अभिनव उपक्रम पारपडला.
नववर्षाच्या स्वागतासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवक मद्यपान करतात. मद्यपान केल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न उदभवत असतात. नवी वर्षाची सुरवात नविन संकल्प करुन केली जाते त्यामुळे स्वराज्य च्या वतीने पुणे शहरात दारू नको, दुध प्या उपक्रम राबविण्यात आला. 
या उपक्रमांतर्गत जवळपास २०० लीटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले, येणा जाणाऱ्या वाहनचालकांना दूध देण्यात आले. ‘दारू नको, दुध प्या’, आपण आपले आरोग्य जपुया , स्वराज्य संघटनेचा विजय असो, दारूला नकार, दुधाला होकार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 
तरुणांचे व्यसनाकडे झुकण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सर्वांचेच आरोग्य व्यवस्थीत राहण्यासाठी दुध सेवन महत्वाचे आहे तसेच व्यसनमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत, स्वराज्य चे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. 
यावेळी स्वराज्य चे निमंत्रक गणेश सोनवणे, निखील काची, अमोल वीर, विनोद परांडे ,दिनेश कदम, द्वारकेश जाधव, गौतम जाधव, राजू फाले, समीर वीर, अजय बांडे,  प्रविण कदम, प्रणय शेंडे, प्रविण भोसले, प्रवीण भोसले,आशिष भोसले,संकेत सोनवणी, लक्ष्मण वडणे, विक्रम कदम, आकाश करंजेकर, गणेश गवळी, सोन्या शितोळे, शैलेश तारडे, किशोर दाताळ, तौफिक इनामदार, प्रसाद रासकर, अविनाश शितोळे, युवराज बाबर, हेमंत दाभाडे, सुमित बोऱ्हाडे, संजय चोरगे, निलेश वाघ,  यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुन्हा भरली सावित्रीमाईंची शाळा… 

इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने भिडे वाड्यास वास्तुमानवंदना : भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेला १७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजन

पुणे : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना शिक्षित करण्याचा निर्धार त्यांनी केला…आणि असंख्य हाल अपेष्टा सहन करीत आपला निर्धार सुरूच ठेवला… त्यांच्या एका विचारामुळे आज सावित्रीमा ई फुले ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असा यशस्वी पल्ला भारताच्या महिलांनी गाठला. असे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भिडे वाड्याला मानवंदना देण्यात आली. त्यांच्या कार्याचे जागरण करण्यासाठी भिडे वाड्याशेजारी पुन्हा एकदा सावित्रीबाईंची शाळा भरली. 
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने भिडे वाड्यामध्ये मुलींच्या शाळा सुरू होण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त भिडे वाड्यास वास्तू मानवंदना देण्यात आली. यावेळी कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शिक्षिका मनीषा पाठक यावेळी उपस्थित होत्या. 
दिव्या सौरभ जगताप हिने सावित्रीमाई फुले यांची तर अभिषेक शाळू यांनी महात्मा फुले यांची भूमिका केली. सुंदराबाई राठी प्रशाला आणि सेवा सदन संस्थेच्या रमाबाई रानडे प्रौढ प्रशालेतील विद्यार्थिनींनी फुले दांपत्याबद्दल आदर व्यक्त केला.
मृणालिनी कानिटकर जोशी म्हणाल्या, सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांनी ज्ञानज्योत लावली आणि स्त्रियांचे आयुष्य उजळून निघाले. समाजाने त्यांचे ऋणी असायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आलो. त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घेऊन घरी बसू नका आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काम करा, असेही त्यांनी सांगितले. 
मोहन शेटे म्हणाले, १ जानेवारी १८४८ पासून भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या घटनेला यावर्षी १७५ वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त स्त्री शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या भिडे वाड्यास मानवंदना देण्यात आली. 

…तर अब्रूनुकसानीचा दावा करेल :वरुण सरदेसाई यांचा भाजपा नेत्यांना इशारा

पुणे–हिवाळी अधिवेशनमध्ये 6 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले. त्यांचे राजीनामे घेण्यात आले नाही. मात्र, विरोधकांना कुठे तरी अडचणीत आणण्यासाठी घाणेरडे राजकारण करून केविलवाणा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. विधानसभेमध्ये कोणते ही आरोप केले तर कारवाई होत नाही. ही बाब हेरून आमच्यावर आरोप करण्यात येतात. बाहेर आरोप केले तर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

युवासेना नेते वरुण सरदेसाई म्हणाले की, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. भाजप आमदार योगेश सागर यांनी माझ्यावर आरोप केले. याबाबत मी स्पष्टीकरण देणार नव्हतो परंतु माझ्याबाबत चुकीच्या बातम्या सुरु होत्या त्यामुळे माझी बाजू मी मांडत आहे. चिपळूण येथे पुरात स्काऊट अँड गाईड यांनी चांगल्या प्रकारे काम केले.

वरुण सरदेसाई म्हणाले की, त्यांच्या विनंती वरून मी ऑक्टोबर 2021 मध्ये हिंदुस्तान स्काऊट आणि गाईड यांचे राज्य अध्यक्ष पद घेतले. सदर संस्थेस केंद्र आणि राज्य सरकार यांची मान्यता आहे. माझ्याकडे मागील एक वर्षापासून ही जबाबदारी आली. त्याचा एक कॅम्प नागपूर येथे झाला, त्याव्यतिरिक्त काही काम झाले नाही.तरी विद्यार्थी यांनी आमच्याकडून पैसे घेतले सांगितले गेले. ज्या विद्यार्थी यांनी आरोप केले त्यांना मी ओळखत नाही.

वरुण सरदेसाई म्हणाले की, राज्यात अनेक संस्था असून त्यांची कोणीतरी फसवणूक केली असेल. त्याबाबत चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, उगीच माझी बदनामी करण्यात येऊ नये. सध्याचे राजकारण वाईट पद्धतीने सुरू आहे. कोणी आरोप केले की त्याची पडताळणी करून माहिती मांडण्यात यावी. केंद्र सरकारने केवळ भारत स्काऊट आणि गाईड आणि हिंदुस्तान स्काऊट आणि गाईड या दोन संस्थांना परवानगी दिली असून त्या नोकर भरती करत नाही.

लौकिक, राधाने पटकावले विजेतेपद

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत लौकिक ताथेड आणि राधा गाडगीळ यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १९  वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित लौकिक ताथेडने सर्वेश हाउजीवर १२-१५, १५-१३, १५-७ अशी ४२ मिनिटांत मात करून जेतेपद पटकावले. ही लढत अतिशय चुरशीची झाली. पहिल्या गेममध्ये सर्वेशने आघाडीपासूनच वर्चस्व राखले. लौकिकने त्याला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वेशने चांगला खेळ करून बाजी मारली. पहिल्या गेमच्या पिछाडीनंतर लौकिकने आत्मविश्वास न गमावता जबरदस्त पुनरागमन केले. त्याने पुढील दोन गेम जिंकून जेतेपद निश्चित केले.

यानंतर १५  वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत राधा गाडगीळने दुस-या मानांकित नव्या रांकाला १५-११, १५-१० असे पराभूत करून जेतेपद पटकावले.

आद्य पारसनीसला दुहेरी मुकुट

आद्य पारसनीस याने १९  आणि १७  वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवून दुहेरी यश संपादन केले. आद्यने १९  वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत अनय चौधरीसह खेळताना अश्वजित सोनावणे-क्रिश खटवड जोडीवर १५-७, १२-१५, १६-१४ अशी मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर आद्यने १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत कृष्णा जसूजासह खेळताना बाजी मारली. आद्य-कृष्णा जोडीने क्रिश खटवड-वेदांत सरदेशपांडे जोडीवर १५-१३, १५-११ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. कृष्णाचेही हे दुहेरी यश ठरले. याआधी त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले. त्या वेळी कृष्णाने आद्यला पराभूत केले होते. 

अंतिम फेरीचे काही निकाल : १७  वर्षांखालील मुली – दुहेरी – अदिती गावडे – जिज्ञासा चौधरी वि. वि. राधा फाटक – सुखदा लोकापुरे १५-१३, १५-११ उपांत्य फेरी – राधा फाटक – सुखदा लोकापुरे वि. वि. सिमरन धिंग्रा – सिया रासकर १५-११, ४-१५, १५-१२, अदिती गावडे – जिज्ञासा चौधरी वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १५-८, १५-५.

१७  वर्षांखालील मिश्र दुहेरी – श्लोक डागा – सिया रासकर वि. वि. व्यास खोंडे – सिमरन धिंग्रा १५-८, १५-१७, १५-१२. उपांत्य फेरी – व्यास खोंडे – सिमरन धिंग्रा वि. वि. आदित्य कदम – श्राव्या शिवदे १५-६, १५-३, श्लोक डागा – सिया रासकर वि. वि. ओजस जोशी – अद्विका जोशी १६-१४, १५-१७, १५-१२. 

१५  वर्षांखालील मुली दुहेरी – जुई जाधव – यशस्वी काळे वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १४-१६, १५-७, १५-४. जुई जाधव – यशस्वी काळे वि. वि. आर्या कुलकर्णी – सुखदा लोकापुरे १५-६, १५-८, शरयू रांजणे – सोयरा शेलार वि. वि. भक्ती पाटील – नाव्या रांका १७-१५, १५-११ .

महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा:क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध

( २ जानेवारी रोजी पुणे येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने विशेष लेख )

पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते १२ जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर शासनाच्या पुढाकाराने या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धांना विशेष महत्व आहे. ३९ क्रीडा प्रकारात राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी होणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात देशातील महत्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे. १९९४ मध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ‘कदम कदम पे नक्श है, विजय हमारा लक्ष है..’ हे स्वर जणू राज्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे होते. त्याच क्रीडा नगरीने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ती परंपरा पुढे नेण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा महत्वाची आहे.

खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे. मात्र शासनाने क्रीडा सुविधांचा विकास आणि प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिल्याने इतर खेळातही आपले खेळाडू आंतररराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करताना दिसत आहेत. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी तसेच खेळ व खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी २००१ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण आखण्यात आले. असे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

राज्याच्या क्रीडा लौकीकात भर घालण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘ऑलिम्पिक व्हिजन’ तयार करण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. त्यासोबतच शालेय आणि स्थानिक स्पर्धांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील शासनाने १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नुकतेच बालेवाडी येथे खेलो इंडिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा असेल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासोबत क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्याची क्षमता असलेले गुणवंत खेळाडू अशा स्पर्धांमधून पुढे येतात. त्यांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यासोबत नव्या दमाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्पर्धांना महत्व आहे.

बालेवाडी-म्हाळुंगे येथील १५३ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी हे देशाचे क्रीडावैभव आहे. सर्व प्रकारचे ऑलिम्पिक खेळ असणारे हे देशातील पहिले क्रीडासंकुल आहे. इथल्या अत्याधुनिक सुविधा लक्षात घेता या क्रीडानगरीत येऊन खेळ दाखविण्याचे स्वप्न राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. राज्यभरातील ३ हजार ८५७ पुरुष व ३ हजार ५८७ महिला खेळाडू असे एकूण ७ हजार ४४४ खेळाडुंना या स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. स्पर्धेत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्यासह एकूण १० हजार ४५६ जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात असा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिक असोसिएशनदेखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यातील आठ विभागीय मुख्यालयातून क्रीडा ज्योत स्पर्धास्थळी आणली जाणार असल्याने राज्यभरात क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रायगडावर प्रज्वलित करण्यात येऊन ५ जानेवारीला मिरवणूकीने ती क्रीडानगरीत येणार आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे, प्रतिष्ठा आहे हा संदेश यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे.

मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खेळाडूंना उत्तम संधी आणि योग्य मैदान मिळाले तर त्यांच्यातील प्रतिभा उंचावते, अशी संधी देणारी ही स्पर्धा आहे. यातून पुढे येणारे खेळाडू देशाचे नेतृत्व करतील आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येदेखील यश मिळवतील अशी अपेक्षा करीत त्यांना शुभेच्छा देऊया!

चौकट
स्पर्धांची ठिकाणे –
१. पुणे-ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग, स्क्वॅश, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटींग, गोल्फ, सॉफ्ट टेनिस
२. नागपूर- बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
३. जळगांव – खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
४. नाशिक- रोईंग, योगासन
५. मुंबई- याटींग, बास्केटबॉल
६. बारामती- कबड्डी
७. अमरावती- आर्चरी,
८. औरंगाबाद- तलवारबाजी
९. सांगली- कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय पुणे

अधिवेशनात 12 विधेयके मंजूर..

नागपूर – दोन वर्षांच्या कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात 12 विधेयके मंजूर करण्यात आली.

या अधिवेशनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भाचा सर्वांगीण विकासाचा आराखडा आम्ही मांडू शकलो. ज्याचे विरोधी पक्षाकडून देखील स्वागत झाले आहे. आम्ही या अधिवेशन काळात महत्त्वाचे असे अनेक निर्णय घेऊ शकलो. त्यामुळे हे अधिवेशन यशस्वी झाले, असे आम्ही समजतो.

विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

  • विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.
  • समतोल प्रादेशिक विकासासाठी समिती.
  • नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा’इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार.
  • विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार आहोत.
  • गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार
  • मुख्यमंत्री समृद्धी चषक या निबंध स्पर्धेचे आयोजन
  • सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य.
  • राज्याचे नवीन खनिज धोरण तयार करणार.
  • विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यु चेन्स (मुल्य साखळ्या) विकसित करणार.
  • कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला अधिक मजबूत करणार.
  • धान उत्पादकांना शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता.
  • गोसीखुर्द प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करणार
  • पारशिवनी येथील पेंच प्रकल्प टप्प्याटप्प्याने जून २०२५ पर्यंत पूर्ण करणार.
  • अकोट तालुक्यातील शहापूर लघु पाटबंधारे योजनेचा प्रस्तावाला लवकरच मंजूरी.
  • वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदीवऱ 11 बॅरेजेस बांधण्यात आली असून, या प्रकल्पाच्या 787 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणार
  • जिगाव प्रकल्पाला देखील गती देण्यात येणार.
  • माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती आणि पुनरूज्जीवन यावर निश्चित भर देणार.
  • जलयुक्त शिवार अभियान आदर्श निर्माण करणारे राहील, अशा पद्धतीने राबवणार.
  • पोकरा- नानाजी देशमुख जलसंजीवन प्रकल्प टप्पा दोनला जागतिक बँकेचीही मान्यता.
  • राज्यासाठी आकांक्षित (Aspirational)तालुका कार्यक्रम
  • मित्र आणि आर्थिक सल्लागार परिषद
  • वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण

याशिवाय महत्त्वाच्या अशा काही बाबी….

  • महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मांडण्यात आले.
  • कर्नाटकच्या मराठी विरोधी प्रवृत्तीच्या निषेधाचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर
  • जत तालुक्यातील ४८ गावांसाठी म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता २००० कोटींची योजना.
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील भिडे वाड्यात स्मारक उभारणीबाबत आठवडाभरात अहवाल देण्याचे निर्देश दिले.
  • पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांवरील शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय
  • राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक
  • कोयना, धोम, कन्हेर, वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात पर्यायी जमिनी वाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हा प्रश्न गंभीर असून याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही
  • स्वमग्नता (ऑटिझम), गतिमंदता या मेंदूविकारांनी त्रस्त मुलांवरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार
  • कोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे.
  • वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार
  • सिंधुदुर्ग विमानतळाचे “बॅ.नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” अशा नावास मंजुरी. ठराव केंद्राकडे पाठविण्यात येणार
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवार, दिनांक २३ जानेवारी, २०२३ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
  • सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार. त्याचा एमओयू नागपूरला अधिवेशन काळात झाला
  • औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करणार

हिवाळी अधिवेशन 2022 – विधेयकांची माहिती

दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके      12

विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके     03

दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके

(1)     मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्र. 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग)

(2)     महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्र.11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (सहकार व पणन विभाग)

(3)     जे.एस.पी.एम. युनिर्व्हसिटी विधेयक, 2022 (नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

(4)    महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग)

(5)    पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक स्थापन करणेबाबत) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(6)     युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, कर्जत विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक स्थापन करणेबाबत)   (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(7)    उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) विधेयक, 2022  (नगर विकास विभाग)

(8)    महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती (सुधारणा) विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

(9)     यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगूरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022, (सन 2022 चा अध्यादेश क्र. 13 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगूरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(10)   महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्र. 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्येत बदल करणेबाबत) (ग्रामविकास विभाग)

(11)   महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (गृह विभाग)

(12)   आय.टी.एम. कौशल्य विद्यापीठ विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक स्थापन करणेबाबत)  (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

विधान परिषदेत प्रलंबित

(1)    महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)

(2) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (3) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)