अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत लौकिक ताथेड आणि राधा गाडगीळ यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित लौकिक ताथेडने सर्वेश हाउजीवर १२-१५, १५-१३, १५-७ अशी ४२ मिनिटांत मात करून जेतेपद पटकावले. ही लढत अतिशय चुरशीची झाली. पहिल्या गेममध्ये सर्वेशने आघाडीपासूनच वर्चस्व राखले. लौकिकने त्याला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वेशने चांगला खेळ करून बाजी मारली. पहिल्या गेमच्या पिछाडीनंतर लौकिकने आत्मविश्वास न गमावता जबरदस्त पुनरागमन केले. त्याने पुढील दोन गेम जिंकून जेतेपद निश्चित केले.
यानंतर १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत राधा गाडगीळने दुस-या मानांकित नव्या रांकाला १५-११, १५-१० असे पराभूत करून जेतेपद पटकावले.
आद्य पारसनीसला दुहेरी मुकुट
आद्य पारसनीस याने १९ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवून दुहेरी यश संपादन केले. आद्यने १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत अनय चौधरीसह खेळताना अश्वजित सोनावणे-क्रिश खटवड जोडीवर १५-७, १२-१५, १६-१४ अशी मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर आद्यने १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत कृष्णा जसूजासह खेळताना बाजी मारली. आद्य-कृष्णा जोडीने क्रिश खटवड-वेदांत सरदेशपांडे जोडीवर १५-१३, १५-११ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. कृष्णाचेही हे दुहेरी यश ठरले. याआधी त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले. त्या वेळी कृष्णाने आद्यला पराभूत केले होते.
अंतिम फेरीचे काही निकाल : १७ वर्षांखालील मुली – दुहेरी – अदिती गावडे – जिज्ञासा चौधरी वि. वि. राधा फाटक – सुखदा लोकापुरे १५-१३, १५-११ उपांत्य फेरी – राधा फाटक – सुखदा लोकापुरे वि. वि. सिमरन धिंग्रा – सिया रासकर १५-११, ४-१५, १५-१२, अदिती गावडे – जिज्ञासा चौधरी वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १५-८, १५-५.
१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी – श्लोक डागा – सिया रासकर वि. वि. व्यास खोंडे – सिमरन धिंग्रा १५-८, १५-१७, १५-१२. उपांत्य फेरी – व्यास खोंडे – सिमरन धिंग्रा वि. वि. आदित्य कदम – श्राव्या शिवदे १५-६, १५-३, श्लोक डागा – सिया रासकर वि. वि. ओजस जोशी – अद्विका जोशी १६-१४, १५-१७, १५-१२.
१५ वर्षांखालील मुली दुहेरी – जुई जाधव – यशस्वी काळे वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १४-१६, १५-७, १५-४. जुई जाधव – यशस्वी काळे वि. वि. आर्या कुलकर्णी – सुखदा लोकापुरे १५-६, १५-८, शरयू रांजणे – सोयरा शेलार वि. वि. भक्ती पाटील – नाव्या रांका १७-१५, १५-११ .