पुणे–हिवाळी अधिवेशनमध्ये 6 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले. त्यांचे राजीनामे घेण्यात आले नाही. मात्र, विरोधकांना कुठे तरी अडचणीत आणण्यासाठी घाणेरडे राजकारण करून केविलवाणा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. विधानसभेमध्ये कोणते ही आरोप केले तर कारवाई होत नाही. ही बाब हेरून आमच्यावर आरोप करण्यात येतात. बाहेर आरोप केले तर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
युवासेना नेते वरुण सरदेसाई म्हणाले की, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. भाजप आमदार योगेश सागर यांनी माझ्यावर आरोप केले. याबाबत मी स्पष्टीकरण देणार नव्हतो परंतु माझ्याबाबत चुकीच्या बातम्या सुरु होत्या त्यामुळे माझी बाजू मी मांडत आहे. चिपळूण येथे पुरात स्काऊट अँड गाईड यांनी चांगल्या प्रकारे काम केले.
वरुण सरदेसाई म्हणाले की, त्यांच्या विनंती वरून मी ऑक्टोबर 2021 मध्ये हिंदुस्तान स्काऊट आणि गाईड यांचे राज्य अध्यक्ष पद घेतले. सदर संस्थेस केंद्र आणि राज्य सरकार यांची मान्यता आहे. माझ्याकडे मागील एक वर्षापासून ही जबाबदारी आली. त्याचा एक कॅम्प नागपूर येथे झाला, त्याव्यतिरिक्त काही काम झाले नाही.तरी विद्यार्थी यांनी आमच्याकडून पैसे घेतले सांगितले गेले. ज्या विद्यार्थी यांनी आरोप केले त्यांना मी ओळखत नाही.
वरुण सरदेसाई म्हणाले की, राज्यात अनेक संस्था असून त्यांची कोणीतरी फसवणूक केली असेल. त्याबाबत चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, उगीच माझी बदनामी करण्यात येऊ नये. सध्याचे राजकारण वाईट पद्धतीने सुरू आहे. कोणी आरोप केले की त्याची पडताळणी करून माहिती मांडण्यात यावी. केंद्र सरकारने केवळ भारत स्काऊट आणि गाईड आणि हिंदुस्तान स्काऊट आणि गाईड या दोन संस्थांना परवानगी दिली असून त्या नोकर भरती करत नाही.