Home Blog Page 1469

हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास ईडीची छापेमारी!

कोल्हापूर – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापेमार केली. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी तब्बल १२ तासांनी संपली आहे. संध्याकाळी साधारण ७ वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर निघाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. ईडीच्या या छापेमारीबाबत मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

“आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आहेत. आमच्या घरासमोर जे लोक उभे होते, त्यांचे मी आभार मानतो. चौकशी शांततेत पार पडलेली आहे. ही धाड राजकीय हेतूने झालेली आहे,” असे नावीद यांनी सांगितले.

दरम्यान, ईडीच्या कारवाईदरम्यान हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. तसेच “माझ्यावरील ईडीच्या या कारवाईविरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले होते.ही कारवाई राजकीय हेतू समोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. “चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या म्हणतात अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

मानसिक व शारिरीक स्वास्थ्यासाठी एक लाख युवक येणार एकत्र

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध शैक्षणिक संस्थांचा पुढाकार ; एज्युयूथ मीट कार्यक्रमात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे प्रमुख मार्गदर्शन ; सर्वांना विनामूल्य प्रवेश
पुणे : आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी मानसिक शक्तीची आवश्यकता आहे. मानसिक शक्ती वाढवून आणि व्यसनमुक्त राहून स्वत:ची व देशाची प्रगती साधण्याची प्रेरणा मिळावी, याकरिता एक लाख युवक पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकत्र येणार असून शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आर्ट आॅफ लिव्हिंग चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे उपस्थिांना मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणीस सुरुवात झाली असून एड्यूयुथ च्या अधिकृत हेल्पलाईन च्या ८४४७८०७८३७ या नंबर वर संपर्क साधून क्यू आर कोड स्कॅन करुन नोंदणी करायची आहे. 
कार्यक्रमाची आशिया बुक आॅफ रेकॉर्डस मध्ये नोंद होण्यास प्रयत्न करण्यात येणार असून उपस्थित युवक व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत. शपथ कार्यक्रमास एक लाख विद्यार्थी आणि दहा हजार शिक्षणतज्ञ उपस्थित राहणार आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी, डॉ.डी.वाय.पाटील संस्था, सूर्यदत्ता, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे  स्त्री शिक्षण  संस्था, एसपी, सीओईपी अशी महाविद्यालये, एनआरडीसीएम आणि एमआरडीसी यांसारख्या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. मानवी मूल्ये आणि व्यसनमुक्त भारत या गोष्टींवर सदर कार्यक्रमात भर असणार आहे.

आर्ट आॅफ लिव्हिंग शैक्षणिक संस्था कार्यक्रम संचालक हिमांशू नगरकर म्हणाले, कार्यक्रमात सहभागी सभासदांना सर्व सहभागी संस्थांनी अधिकृत केलेले ई प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आणि परीक्षा, अभ्यास याचा ताण घालवण्यासाठी विविध प्रात्यक्षिके देखील गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहेत. 
एनएसएस राज्य सल्लागार समितीचे राजेश पांडे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी मानसिक शक्तीची आवश्यकता आहे, तसेच या दबावाखाली व्यसन लागण्याची शक्यताही खूप आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागींना मानसिक शक्ती वाढवून आणि व्यसनमुक्त राहून स्वत:ची व देशाची प्रगती साधण्याची प्रेरणा मिळेल, असा कार्यक्रम आखला आहे. हीच भावना नव्या शिक्षण धोरणात अपेक्षित आहे. 
आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजय शास्त्रेय म्हणाले, विविध विषयांवरील जागतिक तज्ञ मंडळींच्या आॅनलाईन व्याख्यानाची लिंक कार्यक्रमातील सहभागी सभासदांना दिली जाईल. त्याद्वारे ते सध्या जागतिक पातळीवरील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतील. हा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरील महाविद्यालयांसाठी मेटाव्हर्स वर प्रक्षेपित केला जाईल. सहभागासाठी क्यू आर कोड स्कॅन करुन तरुणांनी नोंदणी करायची आहे. अधिक माहिती साठी व नोंदणीसाठी एड्यूयुथ च्या अधिकृत हेल्पलाईन च्या ८४४७८०७८३७ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

चीनीआणि नायलॉन मांजा विक्रेत्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानतर्फे हेल्पलाईन सुरु

पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मांजाने गळा कापल्याच्या घटना ताज्या आहेत. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही छुप्या पद्धतीने त्याची विक्री होत आहे. माणसांच्या जीवावर बेतणारा हा चीनी मांजा विकणार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या आधी घडलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे. ”
या मांजाला माणसांसह अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १८ वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या सात वर्षात जवळपास २००० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली असून, यामध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेस्क्यू वाइल्डलाइफ टीटीसी या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. जखमी पक्ष्यांबाबत ९८९०९९९१११, ९८२३०१७३४३, ९१७२५१११०० या क्रमांकावर माहिती देऊन अहिंसा प्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.

विद्युत सुरक्षेसोबतच आरोग्याची काळजी घ्या

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे आवाहन

पुणे, दि. ११ जानेवारी २०२३:अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची प्रत्येक क्षणी काळजी घ्यावी. सोबतच स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व नियमित वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणच्या पुणे परिमंडल व लोकमान्य हॉस्पीटल यांच्यामध्ये आरोग्यविषयक सुविधा, तपासणी व प्रशिक्षणाबाबत एक वर्षासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार मुळशी विभाग अंतर्गत नसरापूर उपविभाग कार्यालयात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री प्रकाश राऊत, सतीश राजदीप व डॉ. सुरेश वानखडे, लोकमान्य हॉस्पीटलचे डॉ. जयंत श्रीखंडे, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्युत अपघातानंतर घ्यायची काळजी, प्रथमोपचार, कृत्रिम श्वासोश्वास आदींची माहिती देण्यात आली. तसेच वीजसुरक्षेबाबत विविध उपाययोजनांची माहिती डॉ. संतोष पटनी यांनी दिली. या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्रीमती ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब हळनोर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटुळे आदींसह नसरापूर उपविभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.  

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमचे पुरस्कार जाहीर

अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव’; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वितरणडॉ. अरविंद नातू, संदीप कर्णिक, राहुल देशपांडे, नीता मेहता आदींचा होणार सन्मान

पुणे : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्योजक अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, तर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (कला व साहित्य), टेक्नोक्रॅट आनंद शिराळकर (युवा उद्योजक), पॉवरलिफ्टर नीता मेहता (क्रीडा), ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अरविंद नातू (विज्ञान व तंत्रज्ञान), जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके (सार्वजनिक आरोग्य), पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके (प्रशासन) यांना सन्मानित केले जाणार आहे.
सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२२’चे वितरण होणार आहे. शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, नगर बायपास, खराडी पुणे येथे हा पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी सिम्बायोसिस चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टीएमसी’चे अध्यक्ष अश्विनी मल्होत्रा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘टीएमसी’चे महासचिव डॉ. जयसिंग पाटील यांनी दिली आहे.

पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे मोठे शत्रू -कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) 

श्री शिवाजी कुल संस्थेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाल कार्य सन्मान प्रदान ; बालरंजन केंद्राला पुरस्कार प्रदान
पुणे : वेळेचे पालन, परिश्रम करण्याची तयारी आणि सतत हसतमुख राहणे प्रत्येकाने गरजेचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर ज्ञान, रक्षा हे मंत्र आणि हास्य व ध्यान योग आपण अंगिकारायला हवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे काम करीत आपण शिस्तीचे पालन करायला हवे. पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे आपले मोठे शत्रू असून त्यापासून आपण दूर रहायला हवे, असे मत कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांनी व्यक्त केले. 
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे आयोजित कुलरंग महोत्सवात बाल कार्य सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाचे नरेंद्र धायगुडे, कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम, यश गुजराथी, सानिका काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
पुण्यात ३५ वर्षे मुलांच्या शारिरीक, मानसिक विकासासाठी काम करणा-या बालरंजन केंद्र, भारती निवास सोसायटी, कर्वे रस्ता या संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते. बालरंजन केंद्राच्या माधुरी सहस्त्रबुद्धे व सहका-यांनी हा सन्मान स्विकारला.
अण्णा थोरात म्हणाले, संगणकाच्या युगात मुलांकडून शिक्षणासोबतच खेळ होणे गरजेचे आहे. अनेक पालक शिक्षणासाठी मुलांवर खूप दबाव आणतात. काही मुले ही शिक्षणापेक्षा खेळामध्ये प्रविण असतात. त्यांना प्रोत्साहन देणे देखील गरजेचे आहे. खेळामुळे बुद्धी तल्लख होऊन आपली सर्वांगिण प्रगती होत असते. 
माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, द्या खेळाला एक तास, विधायक उपक्रमांतून बालविकास हे ब्रीद घेऊन आम्ही बाल रंजन केद्राच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे कार्यरत आहोत. व्यायाम, खेळ, साहित्य, कला, संस्कृती यातून मुलांचे शिलसंवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मैदानावर ख-या अर्थाने मुले घडत असतात. मुलांसाठी आनंदक्षणांची निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मुलांना मानसिक व शारिरीकदृष्टया खंबीर करण्याकरिता आपण पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.  धनश्री देवधर, किर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र धायगुडे यांनी आभार मानले.

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश

मुंबई, दि. ११ – राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. यावेळी  राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व  नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ८४९० पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन पद्धती वापरा

डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस-ऑनलाईन’ आणि ‘बीपीएमएस टीपी- क्लायंट’ ॲपवर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

रुग्णालये, शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात

महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेकडे रुग्ण खाटा, व्हेंटिलेटर, डायलिसिस यंत्रे आदी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून नगरपालिकांना ती विनामूल्य देण्यात येणार आहे, नगरपालिकांनी ही सामुग्री घेऊन जाण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करुन  खाजगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे असे  कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्या, शिक्षणाबरोबरच शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. शालेय स्वच्छतागृहांची नियमित सफाई करण्यासाठी पाण्याच्या सुविधा निर्मितीकरिता निधी देण्याचीही तयारी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

उत्पन्नवाढीवर भर द्या

महानगरपालिकांच्या विशेषतः ‘ड’ वर्ग महापालिकांच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित केली आहे. सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोद्वारे आकारण्यात येणारे सेवाशुल्क १ नोव्हेंबर २०२२ पासून आकारण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असून केवळ महापालिकेमार्फतच हे सेवाशुल्क आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बचत गटनिर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी योजना तयार करा

नागरी भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी त्यांच्या वस्तूंना मॉलमध्ये स्थान मिळावे, ऑनलाईन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करण्याचे  निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अमृत, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, रात्र निवारा आदी विषयांचा आढावा घेतला.

बंद वीज कनेक्शन पुन्हा सुरू होण्यासाठी सवलत योजनेचा ४३ हजार ग्राहकांना लाभ

मुंबई, दि. ११ जानेवारी २०२३ : आर्थिक अडचणीमुळे वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या योजनेचा राज्यातील घरगुती व औद्योगिक अशा एकूण ४३,३४५ ग्राहकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

       कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक वीज ग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते शिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकित रक्कम अधिक वाढली होती. थकित बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीज पुरवठा पुन्हा सुरू व्हावा म्हणून महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ लागू केली होती. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी या योजनेत वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.

योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यभरातील एकूण ३०,५७१  घरगुती ग्राहकांपैकी सर्वाधिक १४५०५ ग्राहक कोकण विभागातील आहेत. त्यांच्या खालोखाल औरंगाबाद विभागातील ७,९६० ग्राहक आहेत. पुणे विभागातील ३,६८६ तर नागपूर विभागातील ४,४२० ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला आणि पुन्हा वीज कनेक्शन मिळाले.

बंद पडलेली वीज कनेक्शन पुन्हा सुरू करून घेण्यासाठी ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला व त्यांच्याकडून एकूण ९५.७१  कोटी रुपये महावितरणला मिळाले. यामध्ये कोकण विभागाचा एक्केचाळीस  कोटींचा वाटा आहे.

मकर संक्रांती- भोगी’चा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

पुणे, दि. १०: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे तसेच सर्व शासकीय विभागांनीही उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहाचवण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहोत. कृषी विभागाने ६ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय जारी करुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ‘मकर संक्राती भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या दिनाचे औचित्य साधून कृषि सहाय्यकांना गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्रांचे आयोजन आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ याची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यत येणार आहे.

बालके, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांना विविध योजनेअंतर्गत उपहारगृहातून फराळ, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते अशा सर्व शासकीय विभागांनी ‘मकर संक्राती-भोगी’ या दिवशी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा जाणीवपूर्वक वापर करावा. मकर संक्रांती- भोगी हा दिवस जिल्ह्यामध्ये ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कुस्तीगिरांचा सर्वांगीण विकास सरकारच्या प्राधान्यावर

चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन; ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
पुणे : “आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. उद्घाटनाची कुस्ती माती विभागातील ८६ किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले व पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडे यांच्यात झाली. अभिषेक परीवले याने १४-४ अशा गुणांच्या फरकाने लोखंडेवर विजय मिळवला. 
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, अभिनेत्री दिली सय्यद, अभिनेते प्रवीण तरडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उद्योजक सूर्यकांत काकडे, प्रवीण बढेकर, विशाल गोखले, विशाल चोरडिया यांच्यासह कुस्ती संघटनांचे, शहर भाजपचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय वस्ताद दामोदर लक्ष्मण टाकले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुरलीधर मोहोळ यांच्या कल्पनेतून भव्यदिव्य स्वरूपाचे हे आयोजन झाले आहे. आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. जेणेकरून कुस्ती न खेळणाऱ्यांनाही कुस्ती खेळण्याचा मोह होईल. खेळाडूंची सर्व व्यवस्था चोखपणे केली आहे. १४ तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कुस्तीगिरांसाठी चांगल्या घोषणा करतील.”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेतील विजेत्या खेकाडूंच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करणार आहे. अशा स्पर्धांमुळे मोबाईल, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना अशा पद्धतीच्या आयोजनामुळे खेळाकडे आकर्षित करू शकणार आहेत.”

प्रास्ताविकात मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयांकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आली. मोठ्या आनंदाने आम्ही आयोजनास सुरुवात केली आणि असंख्य मदतीचे हात पुढे आले. ४५ संघातून ९५० पेक्षा अधिक कुस्तीगीर सहभागी झाले आहेत. पुढील पाच दिवस चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महिन्द्रा थार, ट्रॅक्टर व जावा गाड्यांसह रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. रामदास तडस यांनीही कुस्तीगिरांसाठी विविध मागण्या मांडल्या. राज्य सरकराने कुस्तीगिरांच्या विकासासाठी निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

आशिष तोडकर, सुरज अस्वले, स्वप्नील शेलार, प्रतिक जगताप, ओंकार भोईर यांची विजयी सलामी

बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सुरज अस्वले, पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार यांनी ५७ किलो गटातून तर, पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी ८६ किलो वजनी गटातून आपापल्या प्रतीस्पर्धीना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.
८६ किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले याने पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडेला १४-४ असे पराभूत केले. कोल्हापूरच्या ऋषिकेश पाटीलने गिरीधर डुबेला ४-० असे पराभूत केले. जळगावच्या योगेश वैरागीने अमरावतीच्या विवादासला चीतपट करताना आगेकूच केली. कल्याणच्या ओंकार भोईरने चंद्रपूरच्या फैजान शेखला १०-० असे पराभूत केले. पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापने सांगलीच्या भरत पवारवर ७-६ अशी मात केली.
५७ किलो वजनी गटात बीड आशिष तोडकरने कोल्हापूर शहरच्या अतुल चेचर याला ९-४ असे एकतर्फी पराभूत केले. याच गटात कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने जळगावच्या यशवंतवर ११-० अशी मात करताना आगेकूच राखली. पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारने नागपूरच्या अंशुल कुंभारकरला थेट चीतपट केले. यवतमाळच्या यश राठोडने नाशिकच्या समर्थ गायकवाडला १२-५ असे पराभूत केले. भंडारा जिल्ह्याच्या अतुल चौधरीने रत्नागिरीच्या भावेशला १०-० असे एकतर्फी पराभूत केले.

दिमाखदार व नेत्रदीपक आयोजनसंस्कृती प्रतिष्ठानचे वतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरवातीपासूनच चर्चेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शहरातील तालीम संघातील स्पर्धकांनी देखणे संचलन यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. उद्घाटनालाच कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी पाहता शेवटच्या दिवशी अंतिम कुस्ती पाहण्यासाठी किती गर्दी होईल याचीच प्रचिती आज आली.

‘जी-२०’च्या अभिरूप परिषदेतही राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल अव्वल !

पुणे :
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी चोख नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील खासगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये भरवण्यात आलेल्या ‘जी-२०’च्या ‘अभिरूप परिषदे’त पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलच्या विद्यार्थांनी गुणवत्तेची चुणूक दाखवत अव्वल असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रशासनाकडून शहरातील तीन खासगी आणि पालिकेच्या तीन अशा सहा शाळांमध्ये अभिरूप परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे भरवण्यात आलेल्या अभिरूप परिषदेत विद्यार्थ्यांनी २० देशांचे प्रमुख म्हणून सहभाग घेताना त्या त्या देशातील विकासाभिमुख कार्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. या अभिरूप परिषदेत महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल, शिक्षण मंडळाच्या शिक्षणप्रमुख मीनाक्षी राऊत,उप शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण, प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर,पेसच्या प्रा. संजीवनी पाटील, आर्किटेक्ट हेमंत बागुल, डी. एस. एम स्कुलच्या प्राचार्या रमा कुलकर्णी, गरवारे कॉलेज ऑफ सी.ई.ओ चे शरयू साठे, समग्र शिक्षाचे प्रकल्प अधिकारी मनोरमा आवारे, राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलच्या प्रिंसिपल अश्विनी ताठे आदी उपस्थित होते.

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे, दि. १० जानेवारी २०२३: मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या सहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरु असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय पतंगाच्या मांज्यामध्ये धातु मिश्रित कोटींग असल्यामुळे विजेचा धक्क्याने विद्युत अपघातामध्ये जिवितहानी तसेच वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.  

नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा तसेच तातडीच्या मदतीसाठी २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर; जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

मुंबई, दि. 10 : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध कऱण्यात आला असून सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबद्दल बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  आभार मानले. या निर्णयासाठी मंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा या हेतूने, मंत्री श्री. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा कार्यभार असताना नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था असावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन – 2022 काळात या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही शासन स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेसाठी आवश्यक असलेला एक कोटी 17 लाख 65 हजार रुपये निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सन 2021 मध्ये घेतला. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी भारतातील पहिली मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे मंजूर करण्यात आली आहे. जून, 2023 पासून ही प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ राज्यातील मुलींनी घ्यावा. या संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी ३० व द्वितीय वर्षासाठी ३० विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल. या विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात येणार असून पोलिस अकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

आधार क्रमांक/कार्ड पडताळणी करणाऱ्या सर्व संस्थांनी आधार’च्या वापराबाबतच्या शुचितेचे काटेकोर पालन करावे- यूआयडीएआय चे आवाहन

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2023

यूआयडीएआय -म्हणजेच, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने, आधारची प्रत्यक्ष पडताळणी करणाऱ्या सर्व संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात, आधारची पडताळणी करतांना, स्वच्छता आणि शुचितेच्या सर्व नियमांचे पालन केले जावे, वापरकर्त्याच्या पातळीवर, सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन केले जावे, तसेच आधारचा कायदेशीर बाबींसाठी स्वयंस्फूर्तीने वापर करतांना, नागरिकांचा त्यावरचा विश्वास वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

आधार क्रमांक धारकांची स्पष्ट परवानगी घेतल्यानंतरच आधारची पडताळणी केली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे. हे काम करतांना संबंधित कर्मचाऱ्यांनी, नागरिकांशी सभ्यतेने वागावे तसेच, त्यांची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही त्यांना द्यावी, असेही म्हटले आहे.

यूआयडीएआय कडून भविष्यात कधीही केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाबाबत अथवा इतर कोणत्याही कायदेशीर संस्थेकडून केल्या जाणाऱ्या आधार पडताळणी बाबत, नागरिकांनी दिलेल्या स्पष्ट आणि नि:संदिग्ध परवानगीची लेखी नोंद/पत्र सर्व घटकांनी कायम सांभाळून ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.

त्याशिवाय, अशी पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, आधार वर असलेले चारही घटक- आधार पत्र, ई-आधार, एम-आधार आणि आधार पीव्हीसी कार्ड यांची कयू आर कोडद्वारे तपासणी -पडताळणी करावी, प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार कार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणून मागू नये.

यूआयडीएआयच्या मध्यवर्ती ओळख क्रमांकविषयक डेटा भांडाराशी संपर्क न करता, ओळख पडताळणी आणि केवायसी (KYC) प्रक्रिया स्थानिक पातळीवर पार पाडण्यासाठी आधारचा वापर म्हणजे ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी. कायदेशीर हेतूने आधार क्रमांक धारकाची ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थांना ओव्हीएसई असे म्हणतात.

आधारची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल कोणत्याही रहिवाशाला कोणतीही सेवा नाकारली जाणार नाही हे सुनिश्चित केले जावे, असे आवाहन, या सर्व संस्थांना करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी,  रहिवासी इतर व्यवहार्य आणि कायदेशीर पर्यायांद्वारे स्वतःची ओळख पटवू देऊ शकले पाहिजेत, याचीही खात्री केली जावी. ओव्हीएसई ने रहिवाशांना सेवा प्रदान करण्यासाठी आधार व्यतिरिक्त ओळखीचे व्यवहार्य पर्यायी माध्यम प्रदान करणे आवश्यक आहे, असेही यात अधोरेखित करण्यात आले आहे. 

आधारची ऑफलाईन पडताळणी केल्यानंतर, सामान्यपणे पडताळणी संस्थांनी रहिवाशाच्या आधार क्रमांकाचे संकलन, वापर अथवा संग्रह करू नये, अशी सूचना यूआयडीएआय ने ओव्हीएसई ला दिली आहे. पडताळणी नंतर, ओव्हीएसई ला कोणत्याही कारणासाठी आधार कार्डची प्रत संग्रहित करण्याची आवश्यकता भासली, तर आधार क्रमांक दुरुस्त केलेला/झाकलेला आणि अपरिवर्तनीय असेल, हे ओव्हीएसई ला सुनिश्चित करावे लागेल. 

एमआधार अॅप, किंवा आधार क्यूआर कोड स्कॅनरचा वापर करून सर्व प्रकारच्या आधार (आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार) वर उपलब्ध क्यूआर कोडच्या मदतीने   कोणत्याही आधार कार्डची वैधता पडताळून पाहता येईल. 

ऑफलाइन पडताळणीद्वारे आधार कागदपत्रांमधील छेडछाड शोधली जाऊ शकते, आणि आधार मधील छेडछाड हा दंडनीय गुन्हा असून, आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत शिक्षेसाठी पात्र आहे.

पडताळणी संस्थांना माहितीचा दुरुपयोग आढळून आला, तर त्यांनी यूआयडीएआय आणि संबंधित रहिवाशाला 72 तासांच्या आत याबाबत सूचित करणे आवश्यक आहे.

ओव्हीएसई ने इतर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीच्या वतीने ऑफलाइन पडताळणी करू नये आणि आधारच्या गैरवापराशी संबंधित कोणत्याही तपासाच्या बाबतीत प्राधिकरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना पूर्ण सहकार्य सुनिश्चित करावे, असे निर्देश यूआयडीएआयने दिले आहेत.

वेश्यावस्तीतील महिलांच्या मुलांकरिता ‘आपुलकीचे बोरन्हाण’  

मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे आयोजन ; तरुणाईचा मोठा सहभाग
पुणे : तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच आहात, तुम्ही कोणीही वेगळे नाही… ही भावना चिमुकल्यांमध्ये जागृत करीत माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या उक्तीप्रमाणे तरुणाईने वेश्यावस्तीतील महिलांच्या लहान मुलांना आपुलकीने बोरन्हाण केले. हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन बोरन्हाण साजरे होत असताना त्या वस्तीतील महिलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 
मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात आपुलकीचे बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेश्यावस्तीत काम करणा-या महिलांच्या मुलांसाठी कार्यरत सहेली संघ संस्थेतील मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सेवासदन सोसायटीचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, पुणे सार्वजनिक सभेचे विश्वस्त सुरेश कालेकर, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, सहेली संघ संस्थेच्या अध्यक्षा महादेवी मादर, तेजस्वी सेवेकरी, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. 
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, वेश्यावस्तीतील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहेली संघ तत्पर आहे. महिलांप्रमाणेच त्यांच्या मुलांसाठी देखील अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातील हा एक उपक्रम आहे. समाजासोबत वस्तीतील महिला व त्यांच्या मुलांना जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच महिलांच्या मुलांच्या शिक्षणाकरीता देखील पाऊल उचलले जाते. 
संकेत देशपांडे म्हणाले, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीच्या परिसरात जाऊन काम करण्याकरीता तरुणाईला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. वस्तीतील महिलांप्रमाणे मुलांना देखील सण-उत्सवांचा आनंद मिळावा आणि आपले देखील कोणीतरी कौतुक करते, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याकरीता बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जाणार आहेत.