मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे आयोजन ; तरुणाईचा मोठा सहभाग
पुणे : तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच आहात, तुम्ही कोणीही वेगळे नाही… ही भावना चिमुकल्यांमध्ये जागृत करीत माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या उक्तीप्रमाणे तरुणाईने वेश्यावस्तीतील महिलांच्या लहान मुलांना आपुलकीने बोरन्हाण केले. हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन बोरन्हाण साजरे होत असताना त्या वस्तीतील महिलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात आपुलकीचे बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेश्यावस्तीत काम करणा-या महिलांच्या मुलांसाठी कार्यरत सहेली संघ संस्थेतील मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सेवासदन सोसायटीचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, पुणे सार्वजनिक सभेचे विश्वस्त सुरेश कालेकर, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, सहेली संघ संस्थेच्या अध्यक्षा महादेवी मादर, तेजस्वी सेवेकरी, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, वेश्यावस्तीतील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहेली संघ तत्पर आहे. महिलांप्रमाणेच त्यांच्या मुलांसाठी देखील अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातील हा एक उपक्रम आहे. समाजासोबत वस्तीतील महिला व त्यांच्या मुलांना जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच महिलांच्या मुलांच्या शिक्षणाकरीता देखील पाऊल उचलले जाते.
संकेत देशपांडे म्हणाले, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीच्या परिसरात जाऊन काम करण्याकरीता तरुणाईला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. वस्तीतील महिलांप्रमाणे मुलांना देखील सण-उत्सवांचा आनंद मिळावा आणि आपले देखील कोणीतरी कौतुक करते, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याकरीता बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जाणार आहेत.