Home Blog Page 1470

राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही:- नाना पटोले

पंतप्रधान मोदी ५० दिवसानंतरही मणिपूर हिसांचारावर गप्पच !

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची कृती ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील.

मुंबई, दि. २९ जून 23
मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी मणिपूरच्या जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखले जाणे हे मोदींच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरच्या लोकांचे दुःख जाणून घेण्यासाठी गेले होते. राहुल गांधी यांना रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवातीला परवानगी दिली, मणिपूरची जनता हजारोंच्या संख्येने राहुल गांधींचे स्वागत करण्यास उभी होती. राहुल गांधी यांची लोकप्रियता पाहून भाजपा सरकार घाबरले व त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवले. राहुल गांधींना परत पाठवून स्थानिक लोकांवर पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मणिपुरी जनता मोठ्या संख्येने राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेली होती पण भाजप सरकारने त्यांना लोकांना भेटू दिले नाही. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. राहुल गांधी प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूर येथे पोहचले होते पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावे असे वाटत नसावे म्हणूनच राहुल गांधींना रोखण्यात आले.

मणिपूर जळत असताना पहिले २५ दिवस केंद्राचा एकही प्रतिनिधी मणिपूरला गेला नाही. २५ दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला जाऊन आले पण मणिपुरच्या जनतेचा भाजपा व मोदी सरकारवर विश्वासच नाही म्हणून आजही मणिपूर जळत आहे. मणिपूरच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. पोलीस स्टेशनवर हल्ले होऊन शस्त्रास्त्र पळवली जात आहेत. प्रार्थना स्थळे जाळली जात आहेत. जीवित व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे पण मनमानी, लहरी, अडेलतट्टू स्वभावाचे केंद्र सरकार मात्र मणिपूरला अग्निकांडात होरपळत सोडून भाषणबाजी, इव्हेंटबाजी व जाहिरातबाजीत मग्न आहे. मणिपूरच्या लोकांना राहुल गांधींना भेटू न देण्याच्या भाजपा सरकारल्या भूमिकेला केवळ मणिपूरच नाही तर देशातील जनताही माफ करणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

तळेगाव दाभाडे येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २९: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तळेगाव दाभाडे, गुरुदत्तनगर, वराळे (ता. मावळ) या संस्थेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून बाहेरगावातील परंतु मावळ तालुक्यातील इच्छुक मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.
0000

शरद पवार यांनी पालकमंत्री अन् जिल्हेही ठरवले होते,पण त्यांनी धोका दिला, फडणवीसांनंतर भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर डबल गेम केल्याचा आरोप केल्यानंतर भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याने पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. फडणवीस यांनी सांगितलेले 100 टक्के खरे आहे. भाजप – राष्ट्रवादीची आघाडी फायनल झाली होती. शरद पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही ठरवले होते असे या नेत्याने म्हटले आहे.शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा डबल गेम केला. त्यांच्या पुढाकारानेच राष्ट्रवादी व भाजपची महाराष्ट्रात सत्ता येणार होती. पण ऐनवेळी 4 दिवस अगोदर पवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुढच्या गोष्टी जमल्या नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप व राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही वाटप केले होते. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. देवेंद्र फडणवीस जे काही म्हणाले ते 100 टक्के खरे आहे. पवारांचा राजकीय इतिहास पाहता याची पुष्टीही होते.

मुनंगटीवारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जातील असे आमच्या मनातही आले नव्हते. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठ्या मनाने त्यांना जागाही दिल्या. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवार दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून जाहीर केला. कोणत्याही राजकीय पक्षात असे होत नाही. पण आम्ही ते केले, असे मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना-भाजप आघाडीचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरून सध्या खमंग चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणीस यांनी हा निर्णय भाजप संसदीय मंडळाचा असल्याचे म्हटले आहे. मुनगंटीवारांनीही त्याला दुजोरा दिला आहे. हे स्वाभाविकच आहे. हे शिंदेना जरी विचारले तरी ते हेच सांगतील. पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेतात, असे ते म्हणाले.

माझा पाठिंबा होता, तर मग चोरून शपथ का घेतली? शरद पवारांचा फडणवीसांना टोला …

मुंबई-अजित पवारांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामागे शरद पवार होते, असे विधान फडणवीसांनी केले. त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले.  देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सगळं ठाऊक होतं आणि त्यांनी डबल गेम केल्याचं म्हटलं आहे. याविषयी शरद पवारांना विचारलं असता मी डबलगेम केला असं ते म्हणत असतील तर ते यात का फसले? अगोदर मी पाठींबा दिला आणि नंतर जर मी २ दिवसात भूमिका बदलली होती तर ते माहिती असतानाही त्यांनी २ दिवसानंतर पहाटेचोरून शपथ का घेतली ?असा प्रतिसवाल केला आहे.

“पहाटेच्या शपथविधीच्या आधी आमची बैठक शरद पवारांसह झाली. त्यानंतर दोन ते चार दिवसांनी शरद पवारांनी भूमिका बदलली असं फडणवीस म्हणाले. २०१४ चा विषय तुम्हाला आठवतोय का? त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर मी सांगितलं होतं की बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. आम्हाला काही फडणवीसांचं कौतुक नव्हतं. पण त्यांच्यात आणि त्यांच्या मित्रामध्ये(शिवसेना) कसं अंतर पडेल यासाठी आम्ही ते केलं. त्यानंतरच्या काळात जे सांगितलं की भेट झाली ती गोष्ट खरी आहे. त्यानंतर ते स्वतःच म्हणाले की दोन दिवसात शरद पवारांनी भूमिका बदलली.”“जर दोन दिवसांमध्ये मी भूमिका बदलली तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांनी शपथ का घेतली? काय कारण होतं? शपथविधी चोरुन घेतली पहाटे? जर फडणवीसांना खात्री होती पाठिंबा आहे तर हे करायची आवश्यकता नव्हती. पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर जर आमचा पाठिंबा होता म्हणतात तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिलं का? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती ती पावलं समाजासमोर यावीत यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या.”

आम्ही फसवलं तुम्ही का फसलात?

“आम्ही फसवलं असं आता फडणवीस म्हणत आहेत माझा प्रश्न आहे फसले का? उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला तर लगेच शपथ घ्यायला याल का? मोदींचा यात काही संबंध नाही. सत्तेशिवाय करमत नव्हते ते राज्यातले नेते होते. भेट झाली होती. मी याआधीही सांगितलं. आजही भेटलो होतो त्याचा अर्थ असा होत नाही की अशा काही गोष्टी असतात. सत्तेशिवाय त्यांची अस्वस्थता होती ती लोकांसमोर आणली. आमच्या चर्चा सगळ्या झाल्या. काही करुन त्यांना आमची मदत हवीच होती. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का?”

गुगली बॉलवर विकेट दिली तर काढायची नाही का?

“मी दोन ते तीन दिवसात माघार घेतली होती असं ते म्हणत आहेत तर त्यांनी शपथ का घेतली?” हा शरद पवारांचा डाव होता असा अर्थ काढायचा का? असं विचारल्यावर पवार म्हणाले, “तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा. हा डाव होता की नाही मला माहित नाही. माझे एक सासरे होते, त्यांचं नाव सदू शिंदे. ते गुगली बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नव्हतो तरीही गुगली कसा टाकायचा मला माहित होतं. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे. अजित पवारांना नामुष्की सहन करावी लागली असं फडणवीस म्हणाले असतील पण त्यांची विकेट गेली हे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे लोक सत्तेसाठी किती पुढे जाऊ शकतात हे दाखवून दिलं. “

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
शरद पवार म्हणाले की, राज्यात पुणे, ठाणे, सोलापूर या सारख्या शहरात एकूण 2458 महिला, मुली बेपत्ता आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील आहे. तसेच बुलढाणा, वाशिम, अमरावती, रायगड, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया य अशा पोलिस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या 14 जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 23 मे या काळात 4,431 मुली महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर गेल्या 2022-23 मे अखेर या दीड वर्षांच्या काळात एकंदरीत 6,989 मुली बेपत्ता आहेत. त्यांना शोधणार कधी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या बघिणींच्या सुरक्षेसाठी व बेपत्ता झाल्यांचा शोघ घेऊन याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्य विधाने करण्यापेक्षा त्यांनी महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

समान नागरी कायद्याला शिख धर्मीयांचा विरोध
देशाच्या पंतप्रधानांनी काही गोष्टी सांगितल्या. समान नागरी कायदा, त्याचे म्हणणे आहे की, देशात दोन वेगवेगळे मत कसे असू शकतात. केंद्र सरकारने लॉ कमिशन यांच्याकडे हा विषय सोपवला. नऊशे प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावात काय म्हटले ह्याची माहिती मला नाही. किंवा लॉ कमिशनने देखील तसे मांडले नाही. ज्याअर्थी ही जबाबदार संस्था काम करते, प्रस्ताव मागते, त्यांच्यात काय तरी असावे. पण संस्था उघडपणे काही माहित देत नाही. दुसरीकडे समान नागरी कायदा मध्ये शिख, ख्रिश्चन, जैन यांचे काय होणार आहे. यात शिख समाजातील लोकांचे वेगळे मत आहे, अशी माहिती समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा विचार केलाशिवाय निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.

लकडी पूल विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट:फुलवडे येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची मदत
पुणे : पेशवेकालीन २०० वर्षे पुरातन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने टिळक चौकातील लकडीपूल विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. एकादशीनिमित्त आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील आदिवासी आश्रम शाळेतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे संच मंदिरातर्फे देण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्योध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार उपस्थित होते. मंदिरात अनुजा पंडीत यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला.

दीपक थोरात म्हणाले, आषाढी एकादशी निमित्त पहाटे मंदिरात पंढरपूर प्रमाणेच विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. माजी सरपंच निर्मला विलास तुपे आणि सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा पाटील यांनी ही महापूजा केली. यावेळी १ हजार किलो खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात ३ दिंड्या मुक्कामी असतात. यावेळी वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.

पी एम मोदींच्या कार्याचा अहवाल घेऊन माजी खासदार संजय काकडेंचा थेट नागरी संपर्क सुरूच ..

पुणे- पी एम नरेंद्र मोदी यांच्या कार्यबाहुल्याची माहिती असलेली पुस्तिका नागरिकांच्या थेट हाती पोहोचविण्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांनी आज शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आपले संपर्क अभियान राबविले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यावेळी त्यांच्यासमवेत होते .

या मोहिमेअंतर्गत शहर आणि परिसरातील नागरिकांच्या पंतप्रधान मोदी यांच्याबाबत असलेल्या भावना समजून घेऊन त्यांना मोदींच्या कार्याच्या बाबत असलेल्या माहितीस उजाळा देऊन काकडे यांचे कार्यकर्ते संवाद देखील साधत आहेत.

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन

पुणे, : मराठवाडा इको बटालियन अंतर्गत येत असलेल्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांची एकूण २४९ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.

१०१ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, जनरल परेड ग्राउंडच्या मुख्य गेटजवळ, अर्जुन मार्ग पुणे येथे २४ जुलै ते २७ जुलै व मुख्यालय ९७ आर्टी ब्रिगेड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजित करण्यात येणार आहे.

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची ६ , सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) ६, शेफ समुदाय ५, वॉशरमन २, ड्रेसर ३, घरकाम पाहणारी व्यक्ती ३, लोहार १, मेस किपर १, कारागीर (लाकूड – कामगार ) १, मेस शेफ १ अशी एकूण २४९ पदे रॅलीच्या माध्यमातून भरावयाची आहेत. १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच पूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.

पात्रता/सेवेची अट पुढीलप्रमाणे: माजी सैनिक पेन्शन धारक असावेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांची किमान 20 वर्षाची सेवा गृहित धरली जाईल. माजी सैनिकांचा सेवानिवृत्ती झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांपेक्षा जास्त नसावा. उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी 1 मधील असावी. सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सैनिकांचे चारित्र्य प्रशंसनीय आणि खूप चांगले असावे. पोलिस प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा. माजी सैनिक (इतर पदे) वयाच्या 50 वर्षापर्यंत तर माजी सैनिक (जेसीओ) वयाच्या ५५ वर्षापर्यत भरतीस पात्र ठरतील. भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि उपदान मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल.

भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या कोणत्याही अपघातास, दुखापतीस भरती करणारे प्राधिकारी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. सामान्य कर्तव्य (जनरल ड्यूटी) पदांसाठी माजी सैनिक हे फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. ट्रेड्समेन या पदासाठी राज्याचे अधिवास लागू नसून पूर्ण भारतातील उमेदवार पात्र असतील.

भरती झालेले कर्मचारी हे नोकरी करण्यास कोणत्याही कारणान्वये असमर्थ ठरल्यास कमांडर टेरिटोरियल आर्मी ग्रुप मुख्यालय दक्षिणी कमांडच्या मान्यतेनुसार युनिट बोर्ड ऑफ ऑफिसर्सद्वारे त्यांना सेवेतून काढण्यास जबाबदार राहतील. भरती झालेले माजी सैनिक (इतर पदे) ची नियुक्ती फक्त शिपाई पदावर तर माजी सैनिक (जेसीओ) ची नियुक्ती नायब सुबेदार च्या पदावर केली जाईल. पूर्व सेवेतील पद विचारात घेतले जाणार नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा ३० दिवस आणि प्रासंगिक रजा १५ दिवस अनुज्ञेय राहिल.

माजी सैनिकांचे डिस्चार्ज बुक, सैनिक ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ). शिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व आधार कार्डची छायांकित प्रत आदी आणणे आवश्यक राहील.

इच्छुक उमेदवारांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ आणि दुरध्वनी क्रमांक ०२०-०२३०१९५ किंवा ईमेल पत्ता ecoterriersone36@gmail.com वर संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
0000

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम सारथी संस्थेमार्फत केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वप्नांना बळ मिळत आहे…

‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या ‘सारथी’चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने, सुलभरित्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई (खारघर नवी मुंबई) व लातूर अशी एकूण आठ विभागीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली या संस्थेचे कामकाज चालते. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या तसेच इतर समकक्ष स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने ‘सारथी’मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदत केली जाते. ‘सारथी’ संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करणे सहज शक्य झाले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन

‘सारथी’ संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’मार्फत देण्यात येते. त्यामुळे त्याचा बोजा पालकांवर पडत नाही. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत केली जाते. नवी दिल्ली व पुणे येथे पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन म्हणून दिली जाते. मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक मदत देण्यात येते. ‘सारथी’कडून झूम मिटींग व अभिरूप मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी अधिकची तयारी करून घेतली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा 2022 च्या निकालामध्ये 17 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा राजपत्रित, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, वन सेवा इत्यादी परीक्षांविषयी ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’मार्फत देण्यात येते. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाते. पूर्व परीक्षेचे प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन देण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य देण्यात येते. परिणामी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा – 2022 परीक्षेत 103 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत अधिकारीपदी निवड झाली. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कृषि सेवा परीक्षेत ‘सारथी’मार्फत सहाय्य देण्यात आलेल्या 67 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत अधिकारीपदी निवड झाली आहे.
यासोबतच ‘सारथी’मार्फत बँकिंग पूर्व परीक्षा, कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन) स्पर्धा परीक्षांविषयक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट, सेट परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येत आहे.

एम.फील. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये एम.फिल. किंवा पीएच.डी. करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत अधिछात्रवृत्ती दिली जाते. यामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दरमहा 31 हजार रुपये असून सिनीअर रिसर्च फेलोशिप दरमहा 35 हजार रुपये आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एचआरए, आकस्मिक निधी देण्यात येतो. या अधिछात्रवृत्ती योजनेचा 2 हजार 109 विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून दरवर्षी संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.

‘सारथी’ कौशल्य विकास कार्यक्रम

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण (CSMS-DEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व तालुकास्तरावर 20 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच इंडो जर्मन टुल रूम (IGTR), औरंगाबाद अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रममार्फत 950 विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे प्रशिक्षण सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 2 हजार 400 केंद्रांतर्गत सर्व कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मर्सिडीज-बेंझ व यामाहा या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील पालकाचे आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 9 हजार 600 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. आज अखेर या योजनेतून 32 हजार 539 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे.

‘सारथी’चे इतर महत्त्वपूर्ण उपक्रम

‘सारथी’मार्फत अग्नीवीर भरती पूर्व अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते. तसेच परदेशी भाषा अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरु करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनाही सुरु करण्यात आली आहे. नाशिक येथे 200 मुलींसाठी मातोश्री मुलींचे वसतिगृह सुरु करण्यात आले आहे.

कृषिविषयक प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील आयएफएटी, डब्ल्यूबीएटी शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (एनआयपीएचटी) संस्थेमध्ये शेतकऱ्यांसाठी नऊ प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.पुणे येथील महाराष्ट्र सेंटर फोर डेव्हलपमेंट (एमसीडीसी) मार्फत शेतकरी उत्पादन संस्था, कंपनी यांचे संचालक व सीएफओ यांचा क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम ‘सारथी’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

‘सारथी’ संस्थेच्या कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर व नवी मुंबई (खारघर) येथील विभागीय कार्यालये, मुला-मुलींचे वसतिगृह, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-अभ्यासिका इत्यादीसाठी राज्य शासनाने ‘सारथी’ संस्थेस मोफत जागा उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी इमारत उभारणीचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहेत. तसेच सारथी संस्थेच्या पुणे येथील मुख्यालय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.

‘सारथी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

“सारथी” च्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी समाजाच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील लोकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व ‘सारथी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

– तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के या प्रमाणात निधी दिला जातो.

या योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जून 2023 मध्ये 27 कोटी 31 लाख 76 हजार रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी क्षेत्रीय कार्यालयांना खर्च करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यात मुंबई विभाग 4 कोटी 39 लाख 68 हजार, पुणे विभाग 5 कोटी 33 लाख 50 हजार, नाशिक विभाग 5 कोटी 79 लाख 50 हजार, अमरावती विभाग 3 कोटी 86 लाख 50 हजार, नागपूर विभाग 6 कोटी 52 लाख, औरंगाबाद विभाग  64 लाख 50 हजार, लातूर विभाग 76 लाख 8 हजार याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून 5,460 पेक्षा अधिक जोडप्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत प्रति जोडप्यास रुपये 50 हजार अर्थसहाय्य देण्यात येते. ही रक्कम पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने देण्यात येते. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

****

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी वारीत स्वच्छतेचे उत्तम नियोजन

पंढरपूर दि. 28 : –  पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या  माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त केला.

पंचायत समिती पंढरपूरच्या आवारात पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा  दिंडी 2023 समारोप मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गेल्या 17 वर्षापासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्यारितीने झाले आहे.

पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासन-प्रशासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि इतर सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. विशेषत: स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छता दिंडीत सहभागी वारकरी बंधु-भगिनींचे अभिनंदन केले.

वारकाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व जनतेला देण्याचा आणि 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावर्षीच्या आषाढी वारीत पंढरपूर येथे स्वच्छतेचे चांगले नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

यावेळी गरीब कुटुंबातील विद्यार्थींनींना ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.  पंढरपूर पंचायत समितीतर्फे 300 विद्यार्थीनींना सायकल देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ‘सायकल बँक’च्या माध्यमातून 3 हजार विद्यार्थीनींना सायकल देण्यात आल्या आहेत.

प्रास्ताविकात श्री. स्वामी यांनी स्वच्छता दिंडीविषयी माहिती दिली. स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 17 वर्षापासून या दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्ही पालखी मार्गावरील 74 ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांवर येतात. या मार्गावर स्वच्छतेसोबत स्नानगृह, महिलांना आरोग्य सुविधा, फिरते आरोग्य पथक आदी सुविधा देण्यात आल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सोलपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दत्तात्रय येवडे आणि संजय बिदरकर यांनी जनजागृतीपर सादरीकरण केले.

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर, दि. २8 – सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि लक्ष्मणराव ढोबळे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, समाधान आवताडे आणि शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहायक वन संरक्षक बाबा हाके आणि लक्ष्मण आवारे यांचे सहकार्य लाभले.

या कॉफी टेबल बुकमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन काळातील शिल्प कलेचा यादव कालिन अर्धनारी नटेश्वर, माचणूर, पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, हेमाडपंथी भगवंत मंदिर, वडवळचे नागनाथ मंदिर, दहिगाव येथील जैन मंदिर, अक्कलकोट मधील खाजा सैफुल मलिक दर्गाह, सोलापुरातील फस्ट चर्च आदि धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

त्यासोबत प्राचीन वारसा असलेला सोलापूर येथील भुईकोट किल्ला, मंगळवेढा, माढा, माचणूर, करमाळा, पिलीव येथील भुईकोट किल्ला, अक्कलकोट येथील राजवाडा, चार हुतात्मा स्मारक, सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन, डॉ. कोटणीस स्मारक, वारकरी संप्रदायाची वारी परंपरा, महालिंगरायाची हुलजंती यात्रा, सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा, वडवळ नागनाथ यात्रा, उद्योग, कृषि पर्यटन केंद्र चिंचणी, कला व क्रीडा क्षेत्रातील सोलापूरचे योगदान, निसर्ग संपदा, जैवविविधता, सोलापूर शहराच्या मधोमध असलेले 200 हेक्टर क्षेत्रातील सिद्धेश्वर वनविहार, नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य यांचाही समावेश पुस्तकात आहे. याशिवाय या ठिकाणी आढळणारे विविध प्रकारचे शिकारी पक्षी, तृणभक्षक पक्षी, स्थलांतरीत होणारे पक्षी, फ्लेमिंगो (रोहित पक्षी), विविध सर्प प्रजाती, फुलपाखरे प्रजाती, विविध कोळी प्रजाती यांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

पंढरपूर, दि. २९ : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.

या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले.

राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्य मानाचे वारकरी

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे (वय ५६) मंगल काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. हा मोफत पास श्री. शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रताप जाधव, आमदार समाधान आवताडे, भरत गोगावले, मंगेश चव्हाण, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार  देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी, ता. आष्टी, जि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडी, ता. हवेली, जि. पुणे (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, यशवंतनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद (५० हजार व सन्मान चिन्ह) या दिंडीला प्रदान करण्यात आले.

यावेळी भूवैकुंठ या वारीसंदर्भातील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन तसेच ‘आरोग्यदूत’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले.

राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेतला होता ; देवेंद्र फडणवीस

पुढचा मुख्यमंत्र्यांचा कोण? याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा

सरकार बनवण्यासाठी शरद पवारांसोबत आमची बैठक झाली होती ,पण त्यांनी डबल गेम केली .

मुंबई-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेण्यात आला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उकल केली. शरद पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, अचानक शरद पवार यांनी माघार घेतली.

तरी देखील अजित पवार यांना विश्वास होता की, शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले. मात्र, नंतर शरद पवार आमच्या सोबत आले नाही आणि पुढे आम्हाला राजीनामा द्यावा लागला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना आहे. याविषयी बोलण्याचा अधिकार देखील मला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया आहे. त्यानुसार संसदीय मंडळ याविषयीचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेले सरकार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आणि स्वतः उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय या वेळीच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली.

राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत सत्तेत येण्यास नकार दिला. त्यांना खुर्ची हवी होती. त्यामुळे ते काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्याचवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण सोबत स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करायला हवा, असा प्रस्ताव आला. या संदर्भात आमची शरद पवारांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सरकार स्थापनेचे अधिकार अजित पवार आणि मला देण्यात आले. हे सर्व ठरल्यानंतर शरद पवारांनी अचानक यातून माघार घेतली, असेही ते म्हणाले.

जाहिरात देणे हे चूक होती

एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये उत्तम समन्वय आहे. एखाद्या छोट्या गोष्टीवरून आमच्यात मतभेद होणे शक्य नाही. ती जाहिरात देणे हे चूक होती, हे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. त्यांनी स्वतःहून मला फोन केला, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असलेला मान मी त्यांना देतो तर मी उपमुख्यमंत्री असल्याचे ते मला कधीही जाणवू देत नाहीत. आज पर्यंत कोणत्याही युती सरकारमध्ये नव्हता एवढा समन्वय आमच्या दोघांमध्ये असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

चपरासी होण्यास सांगितले असते तरी…

माझ्या पक्षाने मला उपमुख्यमंत्री करून माझा सन्मान केला. वास्तविक पक्षाने चपरासी होण्यास सांगितले असते तरी देखील मी झालो असतो. भारतीय जनता पक्ष आहे, म्हणून देवेंद्र फडणवीसचे अस्तित्व आहे. भारतीय जनता पक्ष बाजूला काढला तर देवेंद्र फडणवीस यांचे काहीच अस्तित्व नाही. त्यामुळे माझा पक्ष मला जो आदेश देईल तो मी पूर्ण पाळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मी पक्षाला म्हणालो होतो की, मला सरकारमध्ये कोणताही पद नकोय. यामुळे मला पदाची लालसा असल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल. त्यामुळे मी सरकारमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला होता. मला पक्ष संघटनेमधील काम देण्यात येईल, असे आमचे ठरले देखील होते. मात्र, नंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आघाडी सरकार चालवायचे असेल तर त्यासाठी अनुभवी व्यक्ती त्या ठिकाणी हवा होता. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला की मी उपमुख्यमंत्री पदी बसायला हवं हा माझ्यासाठी देखील धक्का होता मात्र पक्षाने दिलेला आदेश मान्य करत मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. त्यानुसार मी उपमुख्यमंत्री झालो असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पक्षाचा तो निर्णय योग्यच होता

त्यावेळी माझी मानसिकता ही पक्ष चालवण्याची झाली होती. मात्र, अचानक मला उपमुख्यमंत्री बनायला सांगितले गेले. आज तुम्ही मला विचारलात तर आमच्या नेत्यांचा तो निर्णय योग्य असल्याचे मला जाणवते. कारण मी तिथे आहे म्हणून आमच्या पक्षाचा अजेंडा व्यवस्थित चालवतोय. आमच्या पक्षाला सांभाळतो. आमच्या सरकारला माझ्या अनुभवाचा फायदा मिळतोय. त्यावेळी पक्षाने घेतलेला तो निर्णय योग्यच होता, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

एमटीडीसी सोबत लुटा वर्षा पर्यटनाचा आनंद, मिळणार खास सोयी आणि सवलती…

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, आल्हाददायक गुलाबी थंडी आणि वर्षा-पर्यटन हे अनुभवायचं असेल तर पर्यटनाला जावंच लागेल…..
अरबी समुद्रात रेंगाळलेल्या पावसानं थोडी गती घेतली कि हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता यासाठी पर्यटन करायचंय, मग या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निसर्गरम्य ठिकाणं आपणास साद घालीत आहेत. फक्त शासनानं दिलेल्या सुचनांच पालन करायचं आणि धोकादायक ठिकाणी न जाता पर्यटनाचा आनंद लुटायचा….
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे आणि निसर्गरम्य परिसरात असलेली जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे ……
निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेची ठिकाणे तसेच जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. महामंडळाची छत्रपती संभाजीनगर विभागातील अजंठा येथे अजंठा टी पॉईंट आणि फर्दापुर, लोणार येथील पर्यटक निवास आणि लवकरच पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असलेले पर्यटक निवास वेरूळ ही पर्यटक निवासे निसर्गरम्य परिसरात आहेतच, त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले आणि अनुपम केलेचा उत्कृष्ट नमुना असलेली अजंठा लेणी, संपुर्ण एका दगडामध्ये कोरलेली वेरुळची मंदीरे आणि लेणी, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर, ही ठिकाणं आणि इथं असणारी निसर्गसंपदा, धबधबे यांच सौदर्य डोळयांत साठविण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या सर्व पर्यटकांच्या आरामदायी वास्तव्याची आणि चवादर भोजनाची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये करण्यात येत आहे. महामंडळाची ही पर्यटक निवासे वर्षा पर्यटनासाठी सर्वतोपरी सज्ज करण्यात आली असुन याठिकाणी पर्यटकांना सर्व सोयी उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. तथापि, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासुन सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरडया धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असुन त्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत.
नयनरम्य अशा मनोहारी लोणार सरोवराच्या सानिध्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास लोणार असुन या ठिकाणी 8 अद्ययावत असे वातानुकुलित सुट पर्यटकांना सेवा देत आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या परिसरामध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासात चवदार भोजनाची सोय करण्यात येत आहे. अजंठा लेण्यांच्या पसिरात आणि जवळच फर्दापुर येथे महामंडळाकडुन आरामदायी अशा कॉटेज बांधलेलल्या आहेत. लेण्यांपासुन जवळच असल्याने सदरची पर्यटक निवासांचे पर्यटक मोठया प्रमाणावर आरक्षण करताना दिसत आहेत. सदर पर्यटक निवासांच्या ठिकाणी प्री-वेडींग फोटोशुट, डेस्टिनेशन वेडींग, कंपन्यांच्या कॉन्फरन्स यासाठी महामंडळाकडुन सोय करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अशा निसर्गरम्य वारसा स्थळांच्या ठिकाणी कॉन्फरन्स घेण्यासाठी वेगवेगळया कंपन्या नियोजन करीत असुन अशा कंपन्यासाठी महामंडळ एकत्रित रूम बुकिंगवर सवलत देत आहे. डेस्टिनेशन वेडींगसाठीही महामंडळ खास सवलत देत असुन निसर्गाच्या सानिध्यात विवाह करण्यासाठी आणि या आठवणी यादगार करण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.
महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही सुसज्ज असे 83 सुटचे पर्यटक निवास आहे. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग साठी खास लॉन ची सोय करण्यात आली असुन सुसज्‍ज असा कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचीही सोय करण्यात आली आहे.
सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत असुन पर्यटकांनाही धोकादायक ठिकाणी वर्षापर्यटनास न जाण्यासाठी सुचना देण्यात येत आहेत.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्‍यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “टुर पॅकेजची” सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. सोयी सवलतींमुळे आणि वर्षा ऋृतुतील आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनासाठी उत्साह दिसुन येत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा पर्यटनास बहर येणार आहे.
आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत पर्यटक निवासाच्या बुकिंगच्या अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

मुदतपूर्व लोकसभा निवडणुकांसाठी केंद्राची चाचपणी..

पुणे-(प्राब )

गामी लोकसभा निवडणुका ३ महिने मुदतपूर्व घेण्याबाबत केंद्राकडून चाचपणी केली जात आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख १७ राजकीय पक्षांनी एकत्रितपणे बैठक घेऊन भाजपच्या १५० जागांवर एकासएक उमेदवार देवून रोखण्याच्या निर्णयावर एकमत झाले. या बैठकीचे गांभीर्य ओळखून भाजपकडून तात्काळ निवडणूक पूर्वतयारीसाठी हालचालींना वेग दिला जात आहे. विरोधकांना पूर्वनियोजनाला वेळ न देता गाफील ठेवून मुदतपूर्व निवडणुकांसाठी केंद्राकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या २ रिक्त जागांवरील निवडणुका देखील टाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्वनियोजन करण्यासाठी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील ५ जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या कार्यशाळेला गैरहजर असलेले पाच जिल्हाधिकारी अडचणीत आले असून कर्तव्यात कसूर केल्याने कार्यवाही प्रस्तावित आहे. 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उपस्थित राहणे बंधनकारक होते. जे अधिकारी काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नव्हते, त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची योग्य कारणासह पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या कार्यशाळेला गैरहजर राहिले होते. त्यांच्याकडून निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. कोणतेही सबळ कारण न देता गैरहजर राहिलात, हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे स्पष्टीकरण मागवण्यात आल्याने या कार्यशाळेला गैरहजर असलेले सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचे पाच जिल्हाधिकारी अडचणीत आले आहेत. 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “समान नागरी कायदा” आणि “वन-नेशन…वन-इलेक्शन” अजेंडा राबविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कोरोना काळापासून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन बाबीमुळे प्रलंबित आहेत. प्रशासक राज असून त्याद्वारेच पालिकांचा कारभार हाकला जात आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींना निष्क्रियतेच्या गर्त्तेत जात असताना निवडणुकांची वाट पाहत आहेत. लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याची शक्यता मध्यंतरी वर्तवली जात होती मात्र भाजपला कोणतीही जोखीम पत्करावयाची नाही त्यामुळे विधानसभा निवडणुका निर्धारित वेळेतच घेण्याचा मनोदय आहे मात्र लोकसभा निवडणुका पुढील वर्षी एप्रिलमध्ये नियोजित आहेत त्या ३ महिने मुदतपूर्व घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरमध्ये 4 राज्यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व राजस्थान या चार राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या बरोबर लोकसभा निवडणुका घेण्याची चाचपणी केंद्राकडून होत असल्याचे प्रशासनाकडून शक्यता वर्तवली जात आहे. 
दरम्यान देशातील विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता फेटाळून लावणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक घेण्याची मात्र तयारी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकारपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हंटले होते कि, ‘चार राज्यांच्या निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेण्यास आयोगाची पूर्ण तयारी आहे. सप्टेंबर अखेरीपर्यंत ईव्हीएम मशिन उपलब्ध होतील. १६ लाख व्हीव्हीपॅट मशिन नोव्हेंबरपूर्वी उपलब्ध होतील, तर उर्वरीत दीड लाख व्हीव्हीपॅट मशिन नोव्हेंबरअखेरपर्यंत हाती येतील’, अशी माहिती आयुक्त रावत यांनी दिली. ‘३० सप्टेंबरपर्यंत १३ लाख ९५ हजार मतदान मशिन उपलब्ध होतील. त्यामुळे डिसेंबरमध्ये कोणतीही अडचण होणार नाही’, असेही रावत म्हणाले.
विरोधकांना गाफील ठेवून मुदतपूर्व निवडणुकांसाठी केंद्राची चाचपणी केली जात असल्याने महाविकास आघाडीला कुणकुण लागल्याने गाफीलपणा टाळून निवडणूक पूर्वतयारी करावी म्हणूनच तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जागावाटपाचे दीर्घकालीन प्रक्रियेला वेग देऊन भाजपला शह देण्याचे धोरण भाजप विरोधी पक्षांकडून राबविले जात आहे. मुदतपूर्व लोकसभा निवडणुका घेतल्या तरी भाजप युतीला महाराष्ट्रात अनुकूलता नाही, प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व लोकसभेच्या २ रिक्त जागांवरील निवडणुकांबाबत टाळाटाळ केली जात असल्याची टीका महाविकास आघाडीकडून कली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान विदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर जाहीर सभेत प्रमुख राजकीय पक्षांच्या तथाकथित भ्रष्टाचार घोटाळ्याची आकडेवारी देवून टीका केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून मुदतपूर्व लोकसभा निवडणुकांचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

राज्यसभेच्या 10 जागांसाठी 25 जुलै रोजी निवडणूक

२८ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान राज्यसभेच्या तीन राज्यांतील दहा जागा रिक्त होत आहेत. यापैकी गुजरातमध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये ६ आणि गोव्याला एक जागा आहे. या जागांसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, विनय डी. तेंडुलकर, जुगलसिंह माथुरजी लोखंडवाला आणि दिनेशचंद्र अनावडिया यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्यासोबत तृणमूलचे सदस्य डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर हेही पश्चिम बंगालमधून आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.