पुणे, दि. १०: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे तसेच सर्व शासकीय विभागांनीही उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहाचवण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहोत. कृषी विभागाने ६ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय जारी करुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ‘मकर संक्राती भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या दिनाचे औचित्य साधून कृषि सहाय्यकांना गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्रांचे आयोजन आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ याची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यत येणार आहे.
बालके, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांना विविध योजनेअंतर्गत उपहारगृहातून फराळ, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते अशा सर्व शासकीय विभागांनी ‘मकर संक्राती-भोगी’ या दिवशी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा जाणीवपूर्वक वापर करावा. मकर संक्रांती- भोगी हा दिवस जिल्ह्यामध्ये ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.