Home Blog Page 1468

चातुर्मास मंगल प्रवेशानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात आज शोभा यात्रा

पुणे-पिंपरी चिंचवड जैन समाज संघाच्या वतीने चार महासाध्वी यांचे शहरात आगमन होत असल्याने आज ( शनिवारी) भव्य शोभायात्रा काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती यांनी आज पत्रकार परिषदेत युवा मंडल चे महामंत्री आशीष झगड़ावत आणि अन्य युवा मंडलचे साथी, युवा अध्यक्ष पवन लोढ़ा यांनी उपस्थितांना दिली.जैन समाज संघ, निगडी प्राधिकरणाच्या वतीने पुणे येथील जैन दिवाकरीय  दक्षिण चन्द्रिका महासाध्वी, प.पु.डॉ.श्री संयमलताजी म.सा., प.पु. साध्वी श्री अमितप्रज्ञाजी म.सा., प.पु. साध्वी श्री कमलप्रज्ञाजी म.सा., प.पु. साध्वी श्री सौरभप्रज्ञाजी या चार महासाध्वी यांचा चातुर्मास प्रारंभास शनिवार पासून सुरूवात होत आहे. मंगल प्रवेश व शोभा यात्रेला  आज शनिवारी सकाळी साडेसात वाजता निगडी येथील ‘मितेशकुंज’ येथून भव्य मिरवणूकीने  सुरूवात होऊन लोकमान्य हॉस्पिटल TV-भेळ चौक -बिग इंडिया -हुतात्मा चौका मार्गे पाटीदार भवन येथे समाप्त होईल. या यात्रेत एक राजा राणी रथ, १४ स्वप्न रथ,बाल शिवाजी,भगत सिंग,झाशीची राणी या वेशभूषेत शेकडो शालेय विद्यार्थी,महिला,तरुण-तरुणी सहभागी होणार आहेत.तिथे साध्वीजी सर्वांना संबोधित करणार आहेत. मंडळाचा संपूर्ण चातुर्मास पाटीदार भवन मध्ये होणार असून येणाऱ्या पाच महिन्यात प्रवचन, धार्मिक व सामाजिक कामेही केली जाणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील लहानांपासून थोरांपर्यंत समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा अध्यक्ष पवन मनोहरलाल लोढा यांनी दिली आहे.

फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी सेवानिवृत्त

पुणे:

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी आज सेवानिवृत्त झाले.

डॉ. परदेशी यांनी 39 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी भूगर्भशास्त्र विषयात संशोधन केले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदा, कार्यशाळा आणि परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला.

डॉ. परदेशी यांनी 2009 पासून सलग चौदा वर्षे फर्ग्युसनचे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून त्यांनी सन 2000 पासून योगदान दिले.

त्यांच्या कारकिर्दीत फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायतत्ता आणि तीन वेळा नॅकची ए श्रेणी मिळाली. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले.

फर्ग्युसन महाविद्यालयात आज सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते डॉ. परदेशी आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री यांचा सन्मान करण्यात आला. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे योजना -डॉ. प्रशांत नारनवरे

महामंडळाकडे त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि.३०- ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून ऊसतोड कामगारांनी त्वरीत महामंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

ऊसतोड कामगार संबंधातील विविध प्रश्न आणि अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्तालयात आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.नारनवरे यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कामगार उपआयुक्त डॉ. संतोष कानडे, साखर आयुक्तालयाचे सहसंचालक संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जातो. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. नारनवरे म्हणाले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत विविध विभागांचा एकत्रितपणे मसुदा तयार करण्यात येईल व त्यानुसार शासन निर्णय करण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

कामगार विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष कानडे यांनी कामगार विभागाच्या निर्देशानुसार कामगार विभागाचे अधिकारीदेखील भेटी देऊन निरीक्षण करतील असे यावेळी सांगितले.

स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान

पुणे, दि. ३०: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असून इच्छुक स्वयंसहायता गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार या मर्यादेत (९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा) किमान ९ ते १८ अधशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के हिस्सा पूर्ण भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल ३ लाख १५ हजार रुपये) अनुदान देय राहील.

स्वयंसहायता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी असावी.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांतील लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६१ या कार्यालयात ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

खबरदार ..तर तंगड्या तोडून हातात देऊ-पाक कलाकार,खेळाडूंना मनसेचा इशारा

मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरयांनी पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना सज्जड दम दिला आहे. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसले तर खळ्ळखट्याक केला जाईल, असा इशारा मनसे नेते खोपकर यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांनी ही धमकी भारतीय चित्रपट आणि मालिका निर्मात्यांना दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.

पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबली, बद्रीनाथ महामार्ग 17 तासांनंतर खुला; गुजरात-आसाममध्ये 15 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली-देशभरात मान्सूनने प्रगतीचा टप्पा गाठला आहे. या आठवड्यात जवळपास सर्वच राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह १९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मात्र, देशात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. वायव्य राज्यांमध्ये सामान्यपेक्षा ४०% जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याच वेळी, दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ४५% कमी पाऊस झाला आहे.

दुसरीकडे मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. भूस्खलनानंतर 17 तासांनी बद्रीनाथचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला आहे.

IMD मुंबईनुसार, शुक्रवारी दुपारपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये 40 हजारांहून अधिक लोक अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. गुरुवारी आणखी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गुरुवारी छिंकाजवळ दरड कोसळली. त्यामुळे बद्रीनाथकडे जाणारा महामार्ग ठप्प झाला. येथे पर्यटक अडकून पडले आहेत.

गुजरातच्या पंचमहालमध्ये मुसळधार पावसामुळे कारखान्याची भिंत कोसळली. या अपघातात 4 मुलांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले.

पुढील २४ तास कसे असतील…

या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस : उत्तराखंड, आसाम, पश्चिम-पूर्व राजस्थान, पश्चिम-पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पूर्व-पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र , किनारी कर्नाटक, केरळ, गोवा, सिक्कीम आणि अंदमान-निकोबार.

या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: मुसळधार पाऊस झालेल्या सर्व राज्यांच्या काही भागात हलका पाऊसही पडेल. या व्यतिरिक्त हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल.

या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील: छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख.

लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 यांचा हीरक महोत्सवी सोहळा संपन्न

पुणे-

पुण्यतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – CME ) येथे लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 चे माजी लष्करी अधिकारी या अभ्यासक्रमाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकत्र आले होते, 29 जून 1963 रोजी या अभ्यासक्रमाअंतर्गत ते भारतीय लष्करात रुजू झाले होते.
या तुकडीचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुवारी त्यातील 40 जणांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगला भेट दिली. या अभ्यासक्रमाने 1965 आणि 1971 चे युद्धात भाग घेतला आहे. या तुकडीचे मेजर सुरिंदर वत्स यांना त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी आणि लढाऊ वृत्तीसाठी मरणोत्तर वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते, हा 1971 च्या युद्धादरम्यानचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. अनेक माजी अधिकारी सपत्नीक उपस्थित होते तसेच “वीर नारी” देखील उपस्थित होत्या.
सीएमईच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या समोर माजी अधिकाऱ्यांचे छायाचित्र काढून या सोहळ्याला सुरुवात झाली, त्यानंतर या कोर्सचे सर्वात वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल एनपी औल, एव्हीएसएम (निवृत्त) यांचे स्वागतपर भाषण झाले , त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. कमांडंट, सीएमई यांनी देखील माजी विद्यार्थी संमेलनाला संबोधित केले आणि त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त केला तसेच हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी देशभरातून इथे एकत्र जमल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. त्यांनी लष्करी कारवाया , लष्करी खेळ आणि नागरी सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरी तसेच अभ्यासक्रमाच्या यशाचा उल्लेख केला. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि काही अपरिहार्य कारणांमुळे जे येऊ शकले नाही त्यांनाही शुभेच्छा दिल्या. अभ्यासक्रमाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.
संध्याकाळी, कॉम्बॅट लायब्ररी फॅकल्टी, सीएमई येथे खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने माजी अधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

एसएनडीटी बस थांबा: माजी महापौरांच्या सूचनेने काढून टाकला अन आप च्या पाठपुराव्याने सुरु केला..PMP चा कारभार

पुणे-तो होता वर्षानुवर्षे होता, अगदी एस एन डी टी च्या दारात होता, पण आता माजी महापौर असलेल्या एका नेत्याच्या सूचनेने पूर्वीच तो काढून टाकला …पण त्यामुळे अडचणी सुरु झाल्या मागील तीन वर्षांपासून मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे एसएनडीटी कॉलेज समोरील बस थांबा नव्हता अनेक नागरिक व विद्यार्थिनींना बस पकडण्यासाठी अर्धा किलोमीटर पौड फाटा या ठिकाणी जावे लागत होते. वारजेला बस प्रवास करायचा असेल तर दशभुजा गणपती मंदिरानंतर यात्री हॉटेल पर्यंत पायी जावे लागत होते, ज्यांना पौड ला जायचे आहे त्यांना सलग उड्डाणपुलाच्या आधी सोनल हॉल पर्यंत पायी जावे लागत होते. जवळपास दररोज नागरिकांना व विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ एक किलोमीटर चालावे लागत होते.यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही नागरिकांची व विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होत नव्हती परंतु आम आदमी पार्टी प्रवासी आघाडी चे चेथिल अय्यर, निलेश वांजळे व सहकारी यांनी याबाबत त्वरित पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याकडे पाठपुरावा केला.
पी एम पी एम एल चे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया, नारायण करडे वाहतूक आणि मार्ग प्रभारी, निरंजन तुळपुळे, या अधिकाऱ्यांना बस स्थानकाची अंमलबजावणी करा हे सांगण्यात आले त्यावर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. अखेर आम आदमी पार्टी च्या लढ्याला यश मिळाले.या ठिकाणी विद्यार्थिनींच्या हस्ते याचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.सर्व पी एम पी एम एल अधिकाऱ्यांचे आभार मानले. नागरिकांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले या प्रसंगी एस एन डी टी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता पाटील, इन्चार्ज संगीता गांगुर्डे, चेंथिल अय्यर आम आदमी पार्टी प्रवासी आघाडी अध्यक्ष, निलेश वांजळे, अभिजीत परदेशी, राजू परदेशी, साहिल परदेशी, सुरेखाताई भोसले, रोहन रोकडे , नागरिक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि. ३०- बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही. त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी विविध माध्यमांद्वारे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, त्यावर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ या दोन्ही कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी, आव्हाने याविषयी विचार विनिमय करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे श्याम चांडक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे शहर रामनाथ पोफळे, उपायुक्त महिला व बालविकास विभाग पुणे राहूल मोरे आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, बालहक्का विषयी जगात होणाऱ्या चांगल्या कामांचे आदानप्रदान करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येत आहे. त्यात बाल हक्क आयोगाने आपलेही कामांची माहिती द्यावी. आयोगाने जिल्हा नियेाजन समितीला बालकांच्या हक्कांविषयी काम करण्यासाठी प्रस्ताव द्यावा. मुलांना केवळ वस्तू स्वरुपात मदत न देता मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतील अशा बाबींवर अधिक लक्ष द्यावे. पालकांनीही मुलांवर अभ्यासाचा आणि गुणांचा दबाव न टाकता त्याला समजून घेणे गरजेचे आहे.

बाल हक्क आयोगाच्या विभागीय बैठका होणे कौतुकास्पद आहे, त्यामुळे कामात येणाऱ्या अडचणी समोर येऊ शकतील. बालमजुरी, सुरक्षितता, बालकांचे मानवी अधिकार, पोक्सोसारखा कायदा असे पैलू महत्वाच्या पैलूंवर यानिमित्ताने चर्चा करणे शक्य होते. विधानसभा आणि विधान परिषदेतही या संदर्भात चर्चा होत असते. विधान परिषद उपसभापती या नात्याने बालकांच्या संस्थांच्या बैठका अनेकवेळा घेतल्या आहेत.

बालहक्क आयोगाच्या अंमलबाजवणी विषयी अनेकवेळा विधीमंडळात चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या सुचनांच्या आधारे न्यायाची प्रक्रीया सोपी होते आहे. शासनस्तरावर बालस्नेही न्यायालय, पोलीस स्टेशनबाबत प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून येणाऱ्या शिफारसी एकत्रित करून द्याव्यात. बालहक्काच्या सुचना शिक्षण विभागाने स्विकाराव्यात यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. लहान मुलांना चांगली स्वप्ने मिळावी म्हणून या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते चांगले काम करीत असून विधीमंडळात या कामाचे प्रतिबिंब पडण्यासाठी बालहक्क आयोगाला पूर्ण समर्थन राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यशाळेत पुणे विभागातील बालहक्कांसंबंधित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी बाल हक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे, जयश्री पालवे, विधी सल्लागार प्रमोद बाडगी, पुणे विभागातील बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण युनिट व विशेष बाल संरक्षण युनिट चे प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, परीविक्षा अधिकारी, चाईल्ड लाईन व खाजगी स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शिंदे फडणवीसांची वर्षपूर्ती नव्हे हे तर संपूर्ण धुळवडीचे वर्ष!

देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असं डबल इंजिन असणार्‍या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे परंतु जनतेच्या वाट्याला मात्र हे वर्ष म्हणजे धुळवडीच वर्ष ठरलं आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी फडणवीस – शिंदे सरकार आणि दुसरीकडे विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी- ठाकरे शिवसेना – काँग्रेस या सर्वांनी वर्षभर केवळ एकमेकांवर कुरघोडी करणारी विधाने करणे तसेच चिखलफेक करणे एवढाच उद्योग करण्यात धन्यता मानली आहे.

ईडी आणि सीबीआय या दोघांच्या जीवावर केंद्रातील भाजपने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणायचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत तसेच प्रयत्न महाराष्ट्रातही दिसले. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा सुप्रीम कोर्टात प्रश्र्नंकित झाली.
त्यामुळे अवकाळी पाऊस, उशिरा आलेला पाऊस इत्यादी अडचणींकडे दुर्लक्ष केले गेले. 75 हजार नोकरी देण्याचा विषय सहा सात वर्ष प्रलंबित असून काही मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. असंघटित घरकामगार, रिक्षाचालक यांच्या महामंडळाचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट पायमोजे देणार अशी घोषणा जाहिरातीतही केली पण प्रत्यक्षात मात्र फक्त वंचित गटातील मुलांना गणवेश दिला गेला आहे. जलयुक्तशिवारा बाबत घोषणा मोठ्या केल्या गेल्या आहेत परंतु मार्च २३ अखेर परिस्थिती अतिशय वाईट होती. कोल्हापूर , अकोला सारख्या काही शहरांमध्ये दंगली घडल्या तर खारघर येथे सरकारी कार्यक्रमात नागरिकांचे जीव गेले. कोयता गॅंग, मुलींचे अपहरण अश्या घटना वाढताना गृहखात्याचे अपयश दिसत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका सुद्धा घेणे टाळले जात आहे,त्यामुळे बहुतेक ठिकाणी प्रशासनाच्या हातामध्ये सत्ता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून शहरी भाग ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकार कोणतीही सक्रियता दाखवत नाही.

सर्वच समाज घटकांचे प्रश्न प्रलंबित रहात असल्याने हे प्रस्थापित सत्ताधारी आणि प्रस्थापित विरोधक यांची जुगलबंदी हताशपणे पाहत आहे.

मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पार पडली द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा..

पुणे – मॅरेथॉन धावपटू, साहसी खेळाडू आणि निसर्गप्रेमींनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून, घनदाट जंगलातील आव्हानात्मक पायवाट पार करीत प्रचंड चढ आणि तेवढ्याच खडतर उताराच्या कडे कपाऱ्यातून पायवाटा सर करत द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा उत्साहात संपन्न केली.
द जंपिंग गोरिला माउंटन ट्रेल रन हा भारतातील सर्वात नवीन उपक्रम असून द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी छत्रपती शिवरायांच्या साहसी मावळ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध गटातील खेळाडूंनी सलग तीन दिवस पावसाच्या अविरत सरींना शौर्य दाखवत आणि विश्वासघातकी भूभागावर विजय मिळवत, अतुलनीय उत्साह दाखवला.
१० किमी, २५ किमी, ५०किमी आणि ७५ किमी बरोबरच भारताच्या पहिल्या १०० मैल आव्हानापर्यंत, सहभागींनी त्यांची अदम्य इच्छाशक्ती आणि ट्रेल रनिंगची आवड दाखवली. उत्तराखंडमधील कलाम सिंग बिश्त यांनी १०० मैल आव्हानाचा टप्पा पार करत उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळवला. त्यांनी मानवी क्षमतांच्या मर्यादा ओलांडत सर्वांना प्रेरणा दिली. ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन इव्हेंट अविस्मरणीय ३ दिवसांचा होता, जो चित्तथरारक भूप्रदेश, पावसाच्या सरी आणि विजयाच्या क्षणांनी भरलेला होता. नेपाळ, केनिया देशातील खेळाडूंबरोबर भारतातील सर्वच राज्यातील ६०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

द जंपिंग गोरिल्ला माउंटन ट्रेल रन सिरीजचे संस्थापक आदिनाथ नाईक आणि जय गोविंद यादव यांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, “ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन २०२३ हे खेळाडूंच्या लवचिकता आणि दृढनिश्चयाचे प्रतीक होते. खेळाडूंनी मर्यादेच्या पलीकडे जाऊन अविश्वसनीय खेळाचे प्रदर्शन केले.

जंपिंग गोरिला माउंटन ट्रेल रन मालिका गरजू खेळाडूंसाठी क्रीडा प्रशिक्षण आणि समर्थनदेण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन सारख्या इव्हेंटसह, या मालिकेचा उद्देश लोकांना रोमांचकारी अनुभव देण्याबरोबरच ट्रेल रनिंगसाठी धावपटूंना प्रेरित करणे आहे.

जंपिंग गोरिल्ला माउंटन ट्रेल रन बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया www.jumpgorilla.com भेट द्या किंवा +91 7030200104 यावर संपर्क करावा.

======================विजेते

१०० किमी प्रथम क्रमांक- कलाम सिंग बिश्त

७५ किमी पोडियम फिनिशर्स
प्रथम- जीवन लामा
द्वितीय- नीलेश कुळये
तृतीय- हेमंत लिंबू

५० किमी – पुरुष
प्रथम- संग्राम पाटील
द्वितीय- राहुल पवार
तृतीय- अनिकेत पवार

५० किमी – महिला
प्रथम- रुतुजा माळवदकर
द्वितीय- पूनम साळुंखे

२५ किमी – पुरुष
प्रथम- संजय पटेल
द्वितीय- प्रवीण राय
तृतीय- सूरज सुनील मुंगसे

२५ किमी – महिला
प्रथम- रशिला तमांग
द्वितीय भावना शिळीमकर
तृतीय- रसिका परब

१० किमी – पुरुष
प्रथम- निखिल
द्वितीय- दर्शन काळभोर
तृतीय- शेषाकंद ढगे

१० किमी – महिला
प्रथम- सोनाली गौंडसे
द्वितीय- दिक्षा घाडगे
तृतीय- क्षितिजा गुंड

‘अफलातून’साठी जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र

चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश  होणार आहे. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर, आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. ‘अ डिफेक्टीव्ह कॅामेडी; असं म्हणत ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

जॉनी लिव्हर यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. आता ‘अफलातून’ च्या माध्यमातून आपल्या मुलासोबत ते एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे वडील आणि मुलाच्याच भूमिकेत दिसणार आहेत. यात  जॉनी लिव्हर ‘नवाब साहब’ च्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या मुलाची ‘आफताब’ची  भूमिका जेसी लिव्हरने  साकारली आहे.  ‘अफलातून’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं दोघेही सांगतात.

या दोघांसोबत ‘अफलातून’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा,  रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटाचा धमाल टीझर आज  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन  सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन  रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा  मीनल डबराल गज्जर हिची असून  कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर,  शीला जगताप, अश्विन  पद्मनाभन,  सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत.ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे 

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता विविध योजना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता असलेल्या विविध योजनांबाबत जाणून घेऊया…

  • मार्जिन मनी योजना :

केंद्र शासनाने 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केलेली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येतो. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 9 डिसेंबर 2020 आणि 26 मार्च 2021 नुसार शासनस्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

स्टँड अप इंडिया योजनेतील सर्व निकषांची पूर्तता करण्याबरोबरच अर्जदाराने मार्जिन मनीतील स्वत:चा 10 टक्के हिस्सा भरल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज वितरीत केल्यानंतर जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी स्वरुपात संबंधित बँकेस समाजकल्याण आयुक्तांमार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.

  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना :

राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. इयत्ता अकरावी, बारावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम या योजनेद्वारे जमा केली जाते.

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना :

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनि:सारण, पाहोचरस्ते, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालये, गटारे, समाजमंदिरे, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र कामे या योजनेंतर्गत करण्यात येतात.

  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना :

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याकरिता त्यांना कसण्याकरिता 2 एकर ओलिताखालील जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन उपलब्ध जमीन उपलबध करुन देण्यात येते. ही योजना 100 टक्के अनुदान तत्वावर सुरु आहे.

  • अनुसूचित जातींच्या मुलां-मुलींसाठी शासकीय निवासी शाळा :

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत प्रवेश दिला जातो. सद्यस्थितीत राज्यात एकूण 90 निवासी शाळा कार्यरत आहेत.

यासेरोद्दीन काझी

जिल्हा माहिती कार्यालय,उस्मानाबाद.

गुरुपौर्णिमा उत्सवात भरतनाटयम मधून परमेश्वर भक्तीची अनुभूती

पुणे : भगवान शंकराची स्तुती करणारे हर हर महादेव…आदी शंकराचार्य रचित श्री काल भैरवाष्टकम्… आणि श्री भगवान शंकर – माता पार्वती यांच्या अर्ध नारीश्वर रूपाचे वर्णन करणारे आदी शंकराचार्य विरचित अर्धनारीश्वर स्तोत्र तसेच संत पुरंदर  दास रचित चंद्रचूड शिव पदम… या रचनांवर सादर झालेल्या भरतनाटयम् नृत्यातून पुणेकरांना परमेश्वरभक्तीची अनुभूती मिळाली. गुरुपौर्णिमा उत्सवात झालेल्या नृत्य सेवेला उपस्थितांना भरभरुन दाद दिली. 


श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मैत्रेयी बापट संचलित लास्य नृत्यालय मधील विद्यार्थीनींनी उत्सव मंडपात भरतनाटयम् नृत्य सेवा सादर केली. यावेळी सायं आरती रुबी हॉल क्लिनिकचे संचालक डॉ.परवेझ ग्रांट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे शहराध्यक्ष अली दारुवाला, आदी मान्यवरांच्या हस्ते झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. 


नृत्यसेवेचा प्रारंभ ज्ञानेश्वरी च्या सुरुवातीची ओवी असलेल्या ओम नामोजी आद्य ने झाली. त्यानंतर जगद््गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग मन हा मोगरा, सगुण आणि निर्गुण भक्ती सांगणारा संत गोरा कुंभार यांचा अभंग निगुर्णाचा संग, भक्तीचा व्यवहार सांगणारे संत नरहरी सोनार यांचा देवा तुझा मी सोनार या अभंगावर नृत्य सादरीकरण करीत संतांनी दिलेला उपदेश व परमेश्वर कृपेची महती उलगडण्यात आली. 

भगवान श्री विष्णू यांचे दशावतार वर आधारित पारका डल, प्रवीण दवणे यांनी लिहिलेले निघालो घेऊन दत्ता ची पालखी यावर आधारित नृत्यांना विशेष दाद मिळाली. नृत्यांगना कल्याणी पाटील, वागविलासिनी कुलकर्णी, ईशा वेलणकर, हेमांगी ठाकूर, आकांक्षा ब्रह्मे, तनया कानिटकर, साक्षी जोशी, गायत्री शहरकर आणि मैत्रेयी बापट यांनी सादरीकरण केले.  कार्यक्रमाची सांगता  विष्णु दास रचित येई ओ विठ्ठले… या आरतीने झाली. 

दिनांक ३ जुलै पर्यंत मंदिरासमोरील उत्सवमंडपात दुपारी १ ते रात्री १० यावेळेत कीर्तन महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

“विष्णुमय जग” कीर्तनाच्या निरूपणातून उलगडली संतांची शिकवण

“श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्र” सार्थ आणि सविवरण या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे,- देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा गजर करत पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. त्याचवेळी पुण्यात आदित्य प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजलेल्या संत तुकाराम महाराजांच्या ‘विष्णुमय जग’ अभंगाचे निरूपण गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केले.  गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केलेल्या निरूपणामध्ये सर्व श्रोते न्हाऊन निघाले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कीर्तनाचा सांगीतिक सोहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. यावेळी सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर लिखित “श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्र” सार्थ आणि सविवरण या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

गुरुदेव शंकर अभ्यंकर म्हणाले की, जसे भगवान विष्णू अंतर्बाह्य सर्वांना व्यापून उरले आहे तसे प्रत्येक वैष्णवाचा धर्म असला पाहिजे. भेदाभेद कुठेहि असता कामा नये. विजातीय, सजातीय, स्वगत असे तीन प्रकारचे भेद असतात. आत्मज्ञानी पुरुषाला भेदाभेद नसते. पायात काटा रुतला की डोळ्यात पाणी येते. शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाल्यास त्याची वेदना मेंदूद्वारे सर्व शरीराला जाणवते त्याचप्रमाणे समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, मानवतेमध्ये कुठेही दुःख उमटलं कि त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. विष्णुमय जग याच्यापेक्षा वेगळे नाही. दुःखावर मात करून सगळ्यांच्या हिताचे काम करता आले पाहिजे. राष्ट्राच्या विनाशाचे नव्हे, हीच शिकवण संतांनी दिली आहे.

गेली ३० वर्षे दर आषाढीला हा कीर्तन सोहळा संपन्न होतो. निरुपणाबरोबर तरुण टाळक-यांचा सहभाग, जितेन्द्र आणि आदित्य अभ्यंकर यांचे अप्रतिम अभंगगायन आणि टाळमृदुंगाच्या घोषात तुडुंब भरलेल्या सभागृहात श्रोत्यांचीही साथ असा हा कार्यक्रम होता. दोन तास रंगलेल्या ‘विष्णुमय जग’ या वारकरी कीर्तनात उच्च विद्याविभूषित तरुण टाळक-यांना साथीला घेऊन शंकर अभ्यंकरांनी श्रोत्यांना भक्तिरंगात न्हाऊ घातले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वंदना जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. टाळकरी आणि विणेकरी यांच्या पंचपदीने  कीर्तनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुदेव शंकर अभ्यंकरांनी सेवेचा अभंग सादर केला. कीर्तनाचा शेवट गुरुदेव स्वत: “भैरवी” गाउन करतात. कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या आरतीने झाली. गेली ३० वर्षे ही कीर्तनसेवा अखण्ड चालू आहे.