पुणे : भगवान शंकराची स्तुती करणारे हर हर महादेव…आदी शंकराचार्य रचित श्री काल भैरवाष्टकम्… आणि श्री भगवान शंकर – माता पार्वती यांच्या अर्ध नारीश्वर रूपाचे वर्णन करणारे आदी शंकराचार्य विरचित अर्धनारीश्वर स्तोत्र तसेच संत पुरंदर दास रचित चंद्रचूड शिव पदम… या रचनांवर सादर झालेल्या भरतनाटयम् नृत्यातून पुणेकरांना परमेश्वरभक्तीची अनुभूती मिळाली. गुरुपौर्णिमा उत्सवात झालेल्या नृत्य सेवेला उपस्थितांना भरभरुन दाद दिली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मैत्रेयी बापट संचलित लास्य नृत्यालय मधील विद्यार्थीनींनी उत्सव मंडपात भरतनाटयम् नृत्य सेवा सादर केली. यावेळी सायं आरती रुबी हॉल क्लिनिकचे संचालक डॉ.परवेझ ग्रांट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे शहराध्यक्ष अली दारुवाला, आदी मान्यवरांच्या हस्ते झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.

नृत्यसेवेचा प्रारंभ ज्ञानेश्वरी च्या सुरुवातीची ओवी असलेल्या ओम नामोजी आद्य ने झाली. त्यानंतर जगद््गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग मन हा मोगरा, सगुण आणि निर्गुण भक्ती सांगणारा संत गोरा कुंभार यांचा अभंग निगुर्णाचा संग, भक्तीचा व्यवहार सांगणारे संत नरहरी सोनार यांचा देवा तुझा मी सोनार या अभंगावर नृत्य सादरीकरण करीत संतांनी दिलेला उपदेश व परमेश्वर कृपेची महती उलगडण्यात आली.

भगवान श्री विष्णू यांचे दशावतार वर आधारित पारका डल, प्रवीण दवणे यांनी लिहिलेले निघालो घेऊन दत्ता ची पालखी यावर आधारित नृत्यांना विशेष दाद मिळाली. नृत्यांगना कल्याणी पाटील, वागविलासिनी कुलकर्णी, ईशा वेलणकर, हेमांगी ठाकूर, आकांक्षा ब्रह्मे, तनया कानिटकर, साक्षी जोशी, गायत्री शहरकर आणि मैत्रेयी बापट यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता विष्णु दास रचित येई ओ विठ्ठले… या आरतीने झाली.

दिनांक ३ जुलै पर्यंत मंदिरासमोरील उत्सवमंडपात दुपारी १ ते रात्री १० यावेळेत कीर्तन महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.