Home Blog Page 1467

वीजग्राहकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण करा-महावितरणचे संचालक संजय ताकसांडे

पुणे: वीजग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी मुख्यालयाकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून प्राप्त कोणत्याही तक्रारींचे निराकरण तत्परतेने झाले पाहिजे. सोबतच वीजबिलावरील नावात बदल किंवा दुरुस्तीच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. यात हेतुपुरस्सर हयगय आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. ३०) झालेल्या आढावा बैठकीत दिला.

पुणे परिमंडल अंतर्गत वीजग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, सुरळीत वीजपुरवठा, वीजबिल वसूली, वीजहानी आदी मुद्द्यांवर येथील रास्तापेठ कार्यालयात आढावा घेताना संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. यावेळी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.

संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, अचूक बिलिंगसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वीजग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. मात्र बिलिंगसह इतरही विविध तक्रारींची दखल घेत त्याचे तत्परतेने निराकरण करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेने अधिक संवेदनशील व सजग राहिले पाहिजे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कमीतकमी कालावधीचा राहील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वीजयंत्रणेद्वारे पर्यायी व्यवस्था करावी. खंडित वीजपुरवठ्याबाबत देखील मुख्यालयाकडून गांभीर्याने आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेत बिघाड होणार नाही याची खबरदारी घ्यावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात. सोबत नियमाप्रमाणेच वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरूस्तीची कामे करावी असे संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

नवीन वीजजोडण्यांसाठी पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्यांची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याची सूचना संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी केली. दरमहा चालू वीजबिलांच्या १०० टक्के वसूलीसह मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या थकबाकी वसूलीचे देखील उदिदष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास त्याची जबाबादारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक वीजवाहिनीचे नियमित ऊर्जा अंकेक्षण व पडताळणी करून वीजहानी कमी करण्याचे उपाय करावेत अशी सूचना संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी केली. या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड (प्रभारी), डॉ. सुरेश वानखेडे यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत राज्य पुन्हा प्रगतीपथावर-महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक

मुंबई – उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत गेल्या वर्षभरात सरकारी वीज कंपन्यांनी भरीव कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतीपथावर आले आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केले.

विश्वास पाठक म्हणाले की, शेती, उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, नागरी सुविधा अशा सर्व क्षेत्रात वीज ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यावर लोडशेडिंगचे सावट आले होते, वीज क्षेत्रातील विकास प्रकल्प रखडले होते आणि सरकारी वीज कंपन्या आर्थिक संकटात आल्या होत्या. मा. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर निश्चित धोरणात्मक दिशा दिली, स्पष्ट उद्दीष्टे ठरवून दिली आणि ती गाठण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय पाठबळ दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे गेल्या वर्षभरात महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या सरकारी वीज कंपन्यांची गाडी पुन्हा रुळावर आली असून राज्याच्या आर्थिक विकासासाठी विजेची गरज पुरविण्यास या कंपन्या सज्ज होत आहेत.

त्यांनी सांगितले की, भाजपा शिवसेना युती सरकारच्या वर्षभराच्या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी सात हजार मेगावॅट विजेची सौरऊर्जेद्वारे निर्मिती करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात किमान तीस टक्के कृषी फीडर सौर उर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याचा हेतू या योजनेमुळे साध्य होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीत महानिर्मिती कंपनीने उच्चांकी वीजनिर्मिती केली. काळाची पावले ओळखून या कंपनीने रिन्यूएबल एनर्जीसाठी नव्या कंपनीला चालना दिली आहे. राज्याची विजेची वाढती गरज ध्यानात घेऊन महापारेषण कंपनी वीजवहनाच्या बाबतीत यशस्वी झाली. महापारेषणचे विजेचे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला ३० टक्क्यांनी वाढविण्यात आला.

त्यांनी सांगितले की, वर्षभरात महावितरण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि राज्य लोडशेडिंगमुक्त ठेवण्यात कंपनीला यश आले. शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक कृषी वीज कनेक्शन आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या बाबतीत भरीव कामगिरी ही या वर्षाची वैशिष्ट्ये आहेत. आगामी काळातील विजेची गरज ध्यानात घेऊन पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी आरडीएसएस ही योजना सुरू करण्यात आली. तसेच काळाची पावले ओळखून छतावरील वीजनिर्मिती आणि इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या बाबतीत कंपनीने लक्षणीय कामगिरी केली. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आर्थिकदृष्ट्या मागास विभागातील उद्योगांना वीजदराबाबत मिळणारी सबसिडी तसेच वस्त्रोद्योग आणि यंत्रमागाच्या वीजदरातील सबसिडीबाबत गेल्या अडीच वर्षातील थकबाकी देण्यात आली.

ते म्हणाले की, महाऊर्जाने वीज क्षेत्रातील जागतिक प्रवाह ध्यानात घेऊन नविनीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर दिला. हायड्रोजन आणि सौर ऊर्जा या बाबतीत कंपनीने भक्कम पावले टाकली. पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी सुमारे ९६००० कोटी रुपये गुंतवणुकीचे करार आणि सौर तसेच पवन ऊर्जा निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचे गुंतवणूक करार हे या वर्षाचे वैशिष्ट्य ठरले.

 श्री ओंकारेश्वर मंदिरात हिमालयातील १००१ वनस्पतींचा जलाभिषेक

 मंदिराच्या २८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन : छप्पन भोग नैवेद्य अर्पण

पुणे : शनिवार पेठेतील श्री ओंकारेश्वर मंदिराच्या २८५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिमालयातील १००१ वनस्पतींचा जलाभिषेक शिवलिंगावर करण्यात आला. काशी येथील पाच पंडितांच्या पौरोहित्याखाली वनस्पतींचा जलाभिषेक झाला. छपन्न भोग नैवेद्य देखील यावेळी अर्पण करण्यात आला. मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती. 

कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, विश्वस्त गंगाधर लोणकर, रोहीत लोणकर, गौरव बापट, सल्लागार मंडळातील मिथिलेश राॅय, विशाल घरत आदी यावेळी उपस्थित होते.  दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य रमेश कापले, पं. अविनाश त्रिपाठी, पं. मानंजय दीक्षित, पं. पंकज शुक्ला, पं. प्रीतम पाठक हे पंडित सहभागी झाले होते. 

सायंकाळी ६.३० वाजता ॠत्विक लोणकर या ९ वर्षाच्या कलाकाराचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला. संपूर्ण दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ८ वाजता महाआरती देखील करण्यात आली.

पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त ७५ सनदी लेखापालांचा सन्मान

पुणे : पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने ७५ सनदी लेखापालांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सनदी लेखापाल, ‘आयसीएआय’चे माजी केंद्रीय समिती सदस्य, विभागीय समिती सदस्य व कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश होता.

७५ व्या सीए स्थापना दिनानिमित्त आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सारसबाग ते बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन पर्यंत वॉकेथॉन, आयसीएआय भवनात ध्वजारोहण, ज्येष्ठ सदस्यांचा कृतज्ञता सन्मान, सह्याद्री हॉस्पिटलच्या साहाय्याने आरोग्य तपासणी शिबीर, रिबर्थ ट्रस्टच्या सहकार्याने अवयवदान जागृती, तळजाई टेकडीवर वृक्षारोपण व स्वच्छता, विविध सीए फर्मच्या मदतीने १२ ठिकाणी रक्तदान शिबीर, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, अर्थसाक्षरता आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी दिल्ली येथील ‘आयसीएआय’च्या मुख्य कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण झाले.

ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “गेल्या ७५ वर्षांत सनदी लेखापालांनी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा कणा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे व सचोटीने आपले काम करत राहावे.”

सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार, सीए राजेश अग्रवाल यांनी ज्येष्ठ सनदी लेखापालांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सनदी लेखापालांच्या गेल्या ७५ वर्षांतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले. सीए ऋषीकेश बडवे यांनी गुरुवंदना सादर केली.

यावेळी आयसीएआयच्या विभागीय समितीचे सदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, पुणे विकासाचे अध्यक्ष सीए सचिन मिनियार,कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे,  सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे, सीए मौशमी शहा आदी उपस्थित होते.

मनुष्यासह सॄष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांचे कल्याण हाच भगवानांचा संदेश- महासाध्वी दक्षिण चंद्रिका

पुणे-

या सॄष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे व सुखी जीवनाचा आनंद त्यांनी घ्यावा हाच चातुर्मास पर्वातील भगवानांचा संदेश असल्याचे महासाध्वी दक्षिण चंद्रिका यांनी आज येथे म्हटले.

पिंपरी चिंचवड जैन संघाचे वतीने चातुर्मास पर्वाच्या प्रारंभ दिनी आज शोभायात्रा संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशीच्या प्रवचन संदेशात त्या बोलत होत्या.

प्रारंभी सकाळी साडेसात वाजता भव्य शोभायात्रा व पराक्रमी महापुरूषांच्या वेषातील विद्यार्थ्यांच्या रॅलीने  संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

 आपल्या संदेश प्रवचन पर्वात बोलताना महासाध्वी दक्षिण चंद्रिका यांनी पुढे म्हटले की, मनुष्य जन्म हा कर्म आणि परिश्रमाची सुखद व आनंददायी अनुभूती असून मनावरील नियंत्रण हाच जीवन संकल्प पूर्तीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी प.पू.डॉ. श्री संयमलताजी, साध्वी श्री अमित प्रज्ञा जी, साध्वी श्री कमल प्रज्ञा जी,आणि सौरभ प्रज्ञा जी यावेळी उपस्थित होते.

निगडी येथील मिशनकुंज पासून सुरू झालेल्या भव्य मिरवणूकी मध्ये राजा राणी रथ, १४ स्वप्न रथ, तसेच बाल शिवाजी, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

कलश घेतलेल्या पारंपारिक वेशातील महिला, शेकडो विद्यार्थी  आणि पांढर्याशुभ्र कपड्यातील हजारो स्थानकवासी जैन बांधव या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. पंचरंगी जैन ध्वजांमुळे शोभा यात्रेचा सौंदर्यात भरच पडत होती.  मंगल प्रवेश व शोभा यात्रेला सकाळी साडेसात वाजता निगडी येथील ‘मितेशकुंज’ येथून भव्य मिरवणूकीने  सुरूवात होऊन लोकमान्य हॉस्पिटल TV-भेळ चौक -बिग इंडिया -हुतात्मा चौका मार्गे पाटीदार भवन येथे समाप्त झाली. संपूर्ण चातुर्मास पाटीदार भवनमध्ये होणार असून येणाऱ्या पाच महिन्यात प्रवचन, धार्मिक व सामाजिक कामेही केली जाणार आहे.

कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द

पीडित तरुणीलाही मुख्यमंत्र्याच्या वतीने पाच लाखाची मदत

पुणे: शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे,हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे व शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली, यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या तरुणांशी संवाद ही साधला,तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय असून या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परिक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना दिला, पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत करण्यात आली, पिडीत तरुणीला ही मदत तिच्या घरी जावून देण्यात आली, तसेच तरुणीला मदत करण्यासाठी तिच्या सोबत आलेल्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत व होणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे, यानंतर शिवसेनेच्या वतीने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवित महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली, पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे , पुण्यात नोकरीच्या निमित्याने व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या असेही पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या यावेळी सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले,शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना राज्य सचिव किरण साळी,महिला आघाडी अध्यक्ष लीना ताई पानसरे, पूजा रावेतकर, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,शहर संघटक प्रमोद प्रभुणे,श्रीकांत पुजारी,शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे,धनंजय जाधव, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,राजाभाऊ भिलारे,विकी माने,श्रद्धा शिंदे, सुदर्शना त्रिगुणाईत,श्रुती नाझीरकर, सुरेखा कदम,कांचन दोडे व अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेत्या , राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुण्याई हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमात प्रभागातील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या ४५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला. यावेळी निलेश शिंदे, नवनाथ खिलारे, कांताताई खिलारे, कानडे काका, भूषण शिर्के आणि दिवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

व्याजाच्या नावाने आर्थीक लुटमार करणाऱ्या सावकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करून अटक


पुणे- पोलिसांच्या शहर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, यांच्याकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेत आर्थिक लुटमार करणाऱ्या सावकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. १) यश संजय मेमाणे व २) मानव संजय मेमाणे (दोघे रा. शिवांजली मित्र मंडळाचे शेजारी,कस्तुरे चौक, १ न्यु रविवार पेठ, पुणे)३ सुरज मनोज परदेशी( रा. खोपडे नगर, गुजरवाडी, कात्रज) अशी या खंडणीखोर सावकारांची नावे आहेत .

याप्रकरणी प्लोसांनी सांगितले कि,’एक अर्जदार, धंदा दुध डेअरी, रा. गुलटेकडी पुणे यांनी त्यांचे गरजेपोटी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारे सावकार नामे १) यश संजय मेमाणे व २) मानव संजय मेमाणे (दोघे रा. शिवांजली मित्र मंडळाचे शेजारी, १ न्यु रविवार पेठ, कस्तुरे चौक, पुणे )यांचेकडुन येथे एकुण १,९०,०००/- रुपये दरमहा १० टक्के व्याजदराने घेवुन त्यांचा मारुती सुझुकी टेम्पो हा सदरचे अवैदय सावकारांकडे गहाण ठेवुन अर्जदार यांनी सावकारांना गुगल पे व रोख स्वरुपात असे मुद्दल व १,७१,०००/- रुपये व्याज देवुन स्वतःचा गहाण ठेवलेला टेम्पो परत मागीतला असता तो न देता सावकारांनी अर्जदार यांचेकडे आणखीन २,००,०००/- रुपयांची अवाजवी रक्कमेची मागणी करुन ती न दिल्यामुळे अर्जदार यांना शिवीगाळ हाताने मारहाण करुन अर्जदार यांचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच काढुन घेतले म्हणुन अर्जदार यांनी दिले फिर्यादीवरुन सदरचे दोन अवैद्य सावकारांचे विरुध्द खडक पो.स्टे. येथे गुन्हा रजि.नं.२०९/२०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास कामी खडक पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच दुसरे अर्जदार रा. शनिवार पेठ पुणे यांनी होम लोन व मॉरगेज लोनचा व्यवसाय सुरु करण्यासाठी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारा सावकार नामे सुरज मनोज परदेशी रा. खोपडे नगर, गुजरवाडी, कात्रज पुणे याचेकडून शनिवारवाडा चौपाटी, शनिवारपेठ पुणे येथे एकुण ४५,०००/- रुपये दरमहा २० टक्के व्याजदराने घेवुन त्या मोबादल्यात अर्जदार यांनी त्यांचे गुगल पे व फोन पे व्दारे सावकार सुरज परदेशी याचे गुगल पे व फोन पे वर ४ लाख रुपये अॅनलाईन व ५० हजार रुपये रोख स्वरुपात असे एकुण ४,५०,०००/- रुपये दिले असताना देखील सावकार सुरज परदेशी याने अर्जदार यांना वारंवार फोन करुन व भेटून शिवीगाळ करुन घरी येवुन बदनामी करण्याची धमकी देवुन आणखीन व्याज व मुद्दल असे एकूण १,५३,०००/- रुपयांची अवाजवी मागणी करीत असल्यामुळे अर्जदार यांनी दिले फिर्यादीवरुन सावकार सुरज मनोज परदेशी याचेविरुध्द विश्रामबाग पो.स्टे. येथे गुन्हा रजि. नं. १३६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास कामी विश्रामबाग पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे – २ ,सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा.पो.निरी. चांगदेव सजगने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात,शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात

समृद्धी महामार्गावरील बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. १ :- “नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

सावधान आपण बँकेत पैसे भरताय ..हि बातमी वाचा ..


दक्षता घेऊनच ; अधिकृत कर्मचाऱ्याकडेच करा व्यवहार

पुणे- बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी येणा-या ग्राहकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन तसेच बँकेतील स्लिप भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात फसवणुक करणा-या चोरास पुण्यातील लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आजवर एकूण 50 लाख रुपये अशाच मार्गाने हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे

याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीमध्ये संबंधित चोरट्यांनी तब्बल 49 गुन्ह्यात 50 लाख रुपयांचा गंडा आतापर्यंत वेगवेगळ्या नागरिकांना घातल्याचे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ दोनच्यापोलिस उपयुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चोरट्यांनी लुटमार केलेली रक्कम लॉटरीच्या व्यसनात घालवण्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय- 47 ,राहणार- पानिपत, हरियाणा), सुनील रामप्रसाद वर्ग (वय -37 ,राहणार – पानिपत, हरियाणा )आणि सुरज कुमार ओम प्रकाश मेहंगी( वय – 39 ,राहणार – हरियाणा , पानिपत )अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नितीन रामचंद्र पवार (वय 53, राहणार- उंड्री, पुणे) यांनी लष्करपोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केलेली आहे .13 जून रोजी कॅम्प परिसरातील इंडसइंड बँकेत तक्रारदार नितीन पवार यांचे मॅनेजर हे चार चेक करण्यासाठी आले होते. त्यावेळी कॅशियरकडून तीन लाख रुपयांची रक्कम घेण्यात आली. त्यावेळी कॅश काऊंटर जवळ उभा असणारा आरोपी दीपक कुमार मेहंगी यांनी बँकेचाच माणूस असल्याचे भासवून बँकेतून काढलेल्या रकमेत रंग लागलेल्या पाचशे रुपये दराचे दोन बंडल घेऊन कॅशियार कडून बदलून देतो असे सांगितले. त्यानुसार आरोपी हा संबंधित बंडल मधील एक लाख रुपये घेऊन पसार झाला.
गुन्हयाची मोडस
मुख्य आरोपी हा बँकेत थांबुन पैसे भरण्यासाठी येणा-या ग्राहकास स्लिप भरण्यास मदत करतो तसेच त्यांचे सोबत कॅश काऊंटरवर जाऊन ग्राहकाची दिशाभुल करुन कॅशियर यास ग्राहकाचे सोबत असल्याचे भासवुन बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी येणा-या ग्राहकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन तसेच ग्राहक पैसे मोजत असताना काही नोटांचे बंडल खराब आहेत नोट बदलुन आणण्याचा बहाणा करुन ग्राहकांची फसवणुक केली आहे.
करण्यात आली असुन ०९ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन आरोपीकडे पोलीस कस्टडीदम्यान तपास केला असता त्याने पुणे शहर, नाशिक, मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, कल्याण, शिर्डी, अहमदनगर, पनवेल, वाशी, अशा वेगवेगळया ठिकाणी १९ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांची बोळवण …शहरातील प्रकल्प रखडलेलेच..

पुणे- मुख्यमंत्री चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकल्याने येथील पुढील काम अधिक वेगाने पुढे सरकले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबतही बैठक घेण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केली होती आणि ही बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते मात्र तरी ती केव्हा होणार, याची प्रतीक्षा गेल्या वर्षभरापासून कायम आहे.पुणे रिंग रोड, पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा (डीपी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) करण्यात येणारा २३ गावांचा विकास आराखडा, महापालिका हद्दीतील नगररचना योजना (टीपी स्कीम), हडपसर साठी स्वतंत्र महापालिका अशा अनेक प्रलंबित मुद्द्यांबाबतही सरकारने भूमिका जाहीर करण्याची गरज आहे.

पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, पुण्याच्या मेट्रोचा पुढील टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यासह त्याच्या विस्तारित मार्गांना मान्यता, रिंग रोड आणि इतर पायाभूत प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केव्हा वेळ देणार, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.गेल्या वर्षी ३० जूनला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुरंदर येथे झालेल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्याचे विमानतळ जुन्याच जागेत होणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात या स्वतंत्र विमानतळाचे गाडे इंचभरही पुढे सरकलेले नाही. देशात अनेक नव्या विमानतळांची उद्घाटने आणि काही ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम होत असताना, ‘पुरंदर येथील विमानतळ नक्की होणार’, या एका वाक्याच्या आश्वासनावर पुणेकरांची बोळवण केली जात आहे.विमानतळाबरोबरच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची तत्त्वत: मान्यता मिळूनही बराच कालावधी उलटला; पण त्याचे पुढे काय झाले? या प्रकल्पाला अंतिम मान्यता कधी मिळणार? याविषयीची नेमकी माहिती शिंदे-फडणवीस यांनी द्यायला हवी. पुण्याची पुढील टप्प्यातील मेट्रो लवकरच कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन एप्रिलपासून देत आहेत. दुर्दैवाने, जून संपला, तरीही ही मेट्रो पुढचा प्रवास करीत नाही; तसेच मेट्रोच्या विस्तारित मार्गांना केंद्राकडून मान्यता मिळविण्यात सरकार यशस्वी ठरलेले नाही. नागपूर मेट्रोच्या टप्पा-२ ला मान्यता देऊन त्यासाठी निधीची तजवीज करणारे सरकार पुण्याच्या मेट्रो टप्पा-२ ला कधी मान्यता देणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

‘पद्म’ पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत नामांकने पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली: केंद्र सरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षी पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2023 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर ऑनलाइन स्वीकारल्या जात आहेत.

पद्म पुरस्कार, अर्थात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील ‘असामान्य कर्तृत्वाचा’ सन्मान करण्यासाठी दिला जातो.

कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारखी सर्व क्षेत्रे/ विषयांमध्ये विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरीसाठी/ सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानले जातात.

पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ मध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. यास्तव, सर्व नागरिकांना स्वतःच्या नामांकनासह इतरांचे नामांकन/ शिफारशी पाठवण्याचे आवाहनही केले जात आहे. नामांकन /शिफारशींमध्ये उपरोक्तप्रमाणे निर्देशित केलेल्या पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील दिले असून, यामध्ये शिफारस केलेल्या व्यक्तिबद्दल संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/ सेवा ठळकपणे मांडणाऱ्या वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) उद्धरण समाविष्ट केलेले असावे.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in या संकेतस्थळावर ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि https://padmaawards.gov.in या पद्म पुरस्कार पोर्टलवर देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

000

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन 

मुंबई : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.

वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.

रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री श्री.पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेत रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा निश्चित करून शासनाला प्रस्ताव सादर करावा. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील इतर विषयांबाबत आढावा घेताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा विधी व न्याय विभागाला  सादर करण्यात येईल. यासंदर्भात विधी व न्याय मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विधी महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुख्य इमारत व हायड्रोलिक वर्कशॉप इमारतीचे बळकटीकरण, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे बळकटीकरण आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या तसेच  रत्नागिरी येथे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देखील मंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला अपघात :21 प्रवाशांचा मृत्यू

पुणे- नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस मध्ये एकूण 29 प्रवासी होते, त्यातील सात प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावात हा अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर रात्री एक ते दीडच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्स ला अपघात झाला. ही बस एका खांबाला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली. बस डाव्या बाजूला पलटी झाल्यानं दार बंद झालं आणि बाहेर पडण अशक्य झालं. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार २५जणांचा मृत्यू झालाआणि बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर हा अपघात झाला.