पुणे :
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी चोख नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील खासगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये भरवण्यात आलेल्या ‘जी-२०’च्या ‘अभिरूप परिषदे’त पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलच्या विद्यार्थांनी गुणवत्तेची चुणूक दाखवत अव्वल असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रशासनाकडून शहरातील तीन खासगी आणि पालिकेच्या तीन अशा सहा शाळांमध्ये अभिरूप परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे भरवण्यात आलेल्या अभिरूप परिषदेत विद्यार्थ्यांनी २० देशांचे प्रमुख म्हणून सहभाग घेताना त्या त्या देशातील विकासाभिमुख कार्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. या अभिरूप परिषदेत महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल, शिक्षण मंडळाच्या शिक्षणप्रमुख मीनाक्षी राऊत,उप शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण, प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर,पेसच्या प्रा. संजीवनी पाटील, आर्किटेक्ट हेमंत बागुल, डी. एस. एम स्कुलच्या प्राचार्या रमा कुलकर्णी, गरवारे कॉलेज ऑफ सी.ई.ओ चे शरयू साठे, समग्र शिक्षाचे प्रकल्प अधिकारी मनोरमा आवारे, राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलच्या प्रिंसिपल अश्विनी ताठे आदी उपस्थित होते.