Home Blog Page 1426

पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री. फडणवीस यांनी आज श्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री

पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.

वर्धेच्या ज्ञान यज्ञातील विचाराचे अमृत समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल – नितीन गडकरी

वर्धा, दि. ५ – वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप श्री.गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर पाहुणे म्हणून आ.पंकज भोयर, माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप दाते आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे, चांगल्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. जे त्रिकालाबाधित आहे ते जनतेपर्यंत नेण्याचे काम साहित्य करते. साहित्य, संस्कृतिचे समाजात फार मोठे योगदान आहे. साहित्य, काव्य,  नाटक, संगीताचा समाज व्यवहारावर परिणाम होत असतो. समाज जीवन कशा पध्दतीने घडवायचे याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. मराठीत पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासह संत मंडळींनी सामाज जिवनावर परिणाम करणारे साहित्य दिले, असे पुढे बोलतांना श्री.गडकरी यांनी सांगितले.

समाज बदलायचा असेल तर व्यक्तीला बदलले पाहिजे. व्यक्ती बदलासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार विचारातून येतात आणि सकस विचारासाठी सकस साहित्य महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचनाचा परिणाम विचारांवर होतो. यातूनच नवी ज्ञान पिढी निर्माण होते. समाजाला ताकद देण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, असे श्री.गडकरी म्हणाले.

आताच्या पिढीत फार झपाट्याने बदल होत आहे. पिढीतील या बदलाची नोंद आणि अंतर लक्षात घेता साहित्य, काव्य, सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. नवनवीन माध्यमे येत असली तरी पुस्तकांचा वाचक वर्ग कायम आहे. मात्र नवीन पिढी पाहिजे तेवढे स्वारस्य वाचनात दाखवत नाही, हे दुर्दैवी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढीला वाचकप्रिय बनविण्यासाठी केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवतगिता, कुराण, बायबल यातून समाजकल्याणाचा संदेश देण्यात आला आहे, असे सांगून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, गजानन महाराज यांची गाथा डिजिटल स्वरूपात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाठी प्रशासनाने केलेल्या चांगल्या सहयोगाबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन साहित्य संमेलनात एकत्र येण्याची परंपरा आजवर टिकली आहे. कोणत्याही संमेलनाध्यक्षाला मिळाले नसेल इतके प्रेम मला मिळाले आहे. माणसे जोडली गेली पाहिजे हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनात मनातला आवाज उमटला जातो, बुलंद होतो, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले.

महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.दाते यांनी प्रास्ताविकातून संमेलनात तीन दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणाऱ्या व्यक्तींसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी वंचित समाजाचा सहभाग महत्त्वाचा –साहित्य संमेलन परिसंवादातील वक्त्यांचा सूर

वर्धादि.5 : लोकशाही ही समाजातील विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने समृद् होत असतेपरंतु अजूनही वंचित समाजातील काही घटकांचा सहभाग पूर्णपणे झाला असल्याचे दिसत नाहीयासाठी या घटकातील व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवून त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहेअसा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आचार्य विनोबा भावे सभामंडपात ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीन प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होतापरिसंवादात संवादक म्हणुन डॉदीपक पवार यांच्यासह बाळकृष्ण रेणकेदिशा पिंकी शेखहर्षद जाधवरझिया सुलतानामुफीद मुजावर वक्ते म्हणून सहभागी झाले होतेव्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉश्रीकांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

सुरुवातीस डॉ.देशपांडे यांनी मतदार होणे लोकशाहीची पहिली पायरी असल्याचे सांगितलेबेघरभटके विमुक्तदेहव्यवसायातील महिलापारलिंगी या वंचित समाजातील घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लोकशाहीची संकल्पना अधिक मजबूत आणि दृढ करण्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ अत्य उपयुक्त असल्याचे सांगितलेवंचित समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पारलिंगी कवयित्री असलेल्या दिशा पिंकी शेख यांनी सांगितले कीपरंपरेने पारलिंगी समाजाची विशिष्ट प्रतिमा निर्माण केली आहेती प्रतिमा बदनामी करणारी आहेअजूनही पारलिंगी व्यक्तीशेजारी कुणी बसायला तयार होत नाहीही भावना अतिशय क्रूर आहे. 2014 पर्यंत साधे नागरिकत्वही आम्हाला मिळाले नव्हतेमी माझ्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतेमलाही काहीतरी व्हावं वाटतत्यासाठीच लिहायला लागलेलेखणी आधुनिक काळातील मोठ शस्त्र आहेहे शस्त्र समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकतेपारलिंगी साहित्याची चांगली चळवळ भविष्यात उभी राहीलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी मुसलमान साहित्यातील अभ्यासक असलेल्या मुफिद मुजावर म्हणालेराज्यातील मुसलमानांमध्ये सुफी आणि भक्ती परंपरेचा समावेश दिसतोवारकरीनाथदत्त परंपरेचा प्रभाव देखील दिसतोपारंपरिक साहित्यात मुसलमानांची एकसाची प्रतिमा निर्माण झाली आहेसय्यद अमिन यांनी अनेक चरित्र लेखन केलेशिवाजी महाराजांच्या चरित्रात त्यांनी महान उदारमतवादी शिवाजी राजनेता अशी मांडणी केली आहेमुस्लीम साहित्यिकात अलिकडे सामुहीक स्वरुप आले आहेअसे मुजावर यांनी सांगितले.

हर्षद जाधव म्हणालेपूर्वी अपंगांना गुप्त मतदान करता येत नव्हतेसहाय्यकाच्या मदतीने मतदान करावे लागत होतेसहाय्यकाला मात्र कुणाला मतदान केले ते कळत असतईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशीन मधील सुविधेमुळे आम्हाला गुप्त मतदानाचा अनुभव घेता येत आहेअपंगांचे जीवनजाणिवात्यांचा संघर्ष काही साहित्यिकांनी मांडला आहेपरंतु अजुन आणि अधिक स्पष्टपणे हा संघर्ष मांडण्याची आवश्यकता आहेप्रत्येक अपंग व्यक्ती आपल्या कार्यातून अपंगत्व भरुन काढण्याचा प्रयत्न करत असतेअपंगांच्या समाजात चांगल्या प्रतिमा निर्माण केल्या जाव्याअशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आपल्या संबोधनात रझिया सुलताना म्हणाल्या कीसमाजाचे सगळे प्रश्न कायद्याने सुटत नाहीयासाठी संवेदनशीलता देखील असावी लागतेमुसलमान तरुणांमध्ये अलीकडे चिंतनशिल आणि प्रश्न विचारणारी पिढी निर्माण झाली आहेवाईट प्रथापरंपरा बदलवायला सांगणारी ही पिढी आहेप्रथम भारतीय नंतर मुसलमान ही भावना 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी रुजविलीपुढे अनेकांनी ही प्रथा पुढे चालविलीमुसलमान महिलांना वेगवेगळ्या प्रवाहाला बळी पडावे लागत आहेपरंतु सामाजिक अभिसरण देखील चांगल्या पध्दतीने होत असल्याचा आनंद आहेसर्व अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम साहित्य करत आहेअधिक संवेदनशील लिखानाने लोकशाही उच्च पातळीवर जात आहे.

भटक्या विमुक्त समाजासाठी दीर्घ काळापासून काम करीत असलेले बाळकृष्ण रेणके म्हणालेचौकटीचाकोरी बाहेर जावून वंचित घटकात आवश्यक लोकशाही रुजविण्यासाठी प्रचार प्रसाराचे काम निवडणुक आयोग करीत आहेवंचित घटकात लोकशाही रुजवून देश बलवान करण्याकडे लक्ष द्यावे लागेलसाहित्य म्हणजे समाजाचे वास्तव दाखविणारा आरसा आहेब्रिटीश काळात भटक्यांना बदनाम करणारे नकारार्थी साहित्य तयार केले गेलेदलित लेखकांची आत्मकथने त्यांच्या अस्मितेची तर भटक्या समाजातील व्यक्तींची आत्मकथने हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा आहेआत्मकथने त्या त्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असतेवंचित समाजाच्या समस्या कशा सुटतील याचा संवेदनशिलपणे विचार केल्यास लोकशाही समृध्द होईलभटक्या हा विकास प्रक्रियेतला अदृष्य समाज आहेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना विकासाची गोड फळे चाखण्याची संधी मिळावीअसे बाळकृष्ण रेणके यांनी पुढे सांगितले.

परिसंवादाचे संवादक डॉ.दीपक पवार यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिलाश्रोतेवक्ते  आयोजकांमध्ये संवादकांची उत्कृष्ट भूमिका त्यांनी पार पाडलीयावेळी श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिलीशेवटी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी आभार मानलेपरिसंवादाला साहित्य रसिकशिक्षकविद्यार्थीवंचित समाजातील अभ्यासकवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपाचा मास्टर स्ट्रोक : अविनाश बागवे भाजपाच्या वाटेवर …?

पुणे- एकीकडे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हक्काची जागा आणि सत्यजित तांबे यांच्यासारखा युवा नेता कॉंग्रेसने गमावला असताना आता पुण्यातही कॉंग्रेस पक्ष अविनाश बागवे यांच्यासारखा महापालिकेच्या राजकारणात  आणि रस्त्यावरच्या आंदोलनात वाघ म्हणून वावरलेला चेहरा गमावण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे .गेल्या काही महिन्यांपासून अविनाश बागवे यांना प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची कुजबुज देखील पक्षात सुरू होती, आज त्यांच्या प्रभागातील रशीद शेख यांचा स्थानिक कुठल्याच पदाधिकारीशी चर्चा न करता काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश कारणीभूत ठरल्याचे समजते.काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ नगरसेवक आपल्या मुलांसह भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या आल्या होत्या ,त्यानंतर आता भाजपाने मास लीडर खेचून न्यायचे असे ठरवून आज कसबा निवडणुकीच्या तोंडावर ‘मास्टर स्ट्रोक’ देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते आहे.

शह आणि काटशह चे राजकारण– 

कसबा विधानसभेच्या  पोटनिवडणूकित आता राजकीय रंगांना उधाण येत असून भाजपाच्या उमेदवाराशी प्रमुख लढत देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने याच मतदार संघातील आपल्या भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाला आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये खेचण्यात यश मिळविले असताना दुसरीकडे या ‘शहास काटशह’म्हणून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज थेट कॉंग्रेसच्या युवा आणि अभ्यासू म्हणून लौकिक मिळविलेल्या माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याशी त्यांच्या राहत्या घरी जावून संपर्क केला असून लवकरच ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अविनाश बागवे भाजपात प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.प्रत्यक्षात बागवे आणि भाजपा पदाधिकारी यांच्यातील बोलणी समजू शकली नसली तरी येत्या ४/५ दिवसात त्यांचा प्रवेश होईल असे सूत्रांकडून सांगितले जाते आहे. बागवे यांना मानणारा  केवळ कसब्यातला ,पुण्यातच नव्हे तर  महाराष्ट्रातला मातंग आणि दलित वर्ग मोठ्या संख्येने आहे. भ्रष्टाचारविरोधातील आणि अन्यायाविरोधातील त्यांची अभ्यासू आक्रमकता या त्यांच्या गुणामुळे ते लोकप्रिय आहेत . शहर आणि परिसरात त्यांनी केलेल्या आंदोलनांची संख्या सर्वात वरच्या क्रमांकाची राहिली आहे, पुणे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाच्या अवघ्या ३ नगरसेवकांचाच दबदबा राहिला आहे . त्यातीलच 1भाजपच्या वाटेवर असल्याचा वृत्ताने खळबळ उडते आहे.कसब्यातील रोहित टिळक सारखा युवा नेतृत्व असलेला चेहरा देखील काँग्रेस च्या काही नेते मंडळींवर नाराज असल्याचे बोलले जात असून अनेक दिवस ते राजकीय कार्यक्रमातून अलिप्त असल्याचे दिसते आहे.

महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी:जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेला चार सुवर्ण १ रौप्य

कबड्डीत संमिश्र यश

ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण

उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा

भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ब्रॉंझ अशी ७९ पदके झाली आहेत. *हरियाणा २२, १६, १५ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे.
महाराष्ट्राला आता उद्यापासून सुरु होणाऱ्या वेटलिफ्टिंग प्रकारातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्याचवेळी कुस्तीतही महाराष्ट्र यश मिळवेल अशी आशा आहे. मात्र, या दोन्हीत महाराष्ट्राला हरियाणाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाबरोबरच जलतरण स्पर्धेतील पदकावर आता पदकतालिकेतील क्रमवारी अवलंबून राहणार असेल यात शंका नाही.

कबड्डीत मुलांचा विजय
गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक विजेत्या महाराष्ट्राने बिहारचा सुरशीच्या लढतीत ३८-३२ असा पराभव करून विजयी सलामी दिली. अजित चौहानच्या खोलवर चढाया आणि जयेश महाजन, अनुज गाढवेचा भक्कम बचाव यामुळे महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. बिहारकडून विशाल कुमार आणि अंकित सिंगचा खेळ उल्लेखनीय ठरला. मुलांची गाठ आता राजस्थानशी पडणार आहे. मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्राला हरियानाकडून २५-४१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.

४ बाय ४०० मीटर रिलेत मुलींना सुवर्ण
महाराष्ट्राच्या मुलींनी ४ बाय १०० मीटर पाठोपाठ ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महेश जाधवने लांब ऊडीत रौप्यपदकाची कमाई केसली. श्रावणी देसावळेचीही उंच उडी रुपेरी यशापर्यंत गेली.
ईशा जाधव, वैष्णवी कस्तुरे, रिया पाटील, अनुष्का कुंभार या महाराष्ट्राच्या मुलींच्या चमूने ३ मिनिट ५२ सेकंद वेळ देत सुवर्णुपदक कमावले. श्रावणीने १.६३ मीटर, तर महेश जाधवने ७.११ मीटर उंची उडी मारली. दोघांचे प्रयत्न त्यांना रौप्यपदकापर्यंत घेऊन गेले. ८०० मीटर शर्यतीत रिया पाटीलने २ मिनिट १२.५६ सेकंद वेळ देताना ब्रॉंझपदक मिळविले. रिया कोल्हापूरला अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णभरारी

महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने आपल्या जबरदस्त कामगिरीने महाराष्ट्राची पदकतालिकेतील बाजू भक्कम केली. संयुक्ताने तालबद्ध जिम्नॅस्टिक प्रकारात ४ सुवर्ण, १ रौप्य असी पाच पदकांची कमाई केली. किमयाने ३ ब्रॉंझपदके मिळविली. संयुक्ताने सुवर्णपदक पटकाविताना हूप प्रकारात २६.२५, बॉल मध्ये २६.१५, क्लबमध्ये २५.४५, रिबनमध्ये २४.५५ गुण पटकावले. तिची जोडीदार किमयाने बॉलमध्ये २२.३५, क्लबमध्ये १९.९५, रिबनमध्ये १९.६५ गुण मिळवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला असून, महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ ब्रॉंझपदके मिळविली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले, तर मुलांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

संयुक्ताची कामगिरी निश्चितच महाराष्ट्राचा लौकिक उंचावणारी आहे. तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भविष्यात तिला नक्कीच या कामगिरीने प्रेरणा मिळेल आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावेल.

  • सुहास दिवसे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त

संयुक्ता गुणी खेळाडू आहे. त्यामुळेच या वयातही तिने राष्ट्रीय स्तराबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. भविष्यात ती ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे नाव मिळवेल.

  • पूजा आणि मानसी सुर्वे, संयुक्ताच्या प्रशिक्षक

सलग दुसऱ्या वर्षी चार सुवर्णपदकांची मानकरी होताना खूप आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकमध्ये भारताला अजून कुणी पदक मिळवून दिलेले नाही. मला ते करून दाखवायचे आहे आणि त्यासाठी खेलो इंडियाने मला मोठा आत्मविश्वास मिळवून दिला.

  • संयुक्ता काळे, महाराष्ट्राची सुवर्ण जिम्नॅस्ट

संघाच्या कामगिरीवर निश्चित समाधानी आहे. मुलांमध्ये उत्तर प्रदेशचे नेहमीच आव्हान राहते. मुलांकडून थोड्याशा चुका झाल्या. पण, शेवटी खेळ आहे. काही पदके थोड्याफार फरकाने हुकली. संयुक्ताने तर कमाल केली. सारा राऊळने मिळविलेले यश सर्वात महत्वाचे आहे. पदार्पणाच्या स्पर्धेत ऑल राऊंड प्रकारात सुवर्णपदक ही मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेचे ती फाईंड आहे असे म्हणता येईल.

  • महेंद्र बाभुळकर, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक

‘ पालकांशी हितगुज,’व ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ यां पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल -डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे, ता. ५ : अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या चाइल्ड लाईनच्या माध्यमातून झालेल्या कामावर आधारित ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या पुस्तकांतून प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल. समाजाने देखील अशा कामात पुढे यावे, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली.मुलांच्या जगात गेली चाळीस वर्षे काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित ज्ञानदेवी चाइल्ड लाइन संस्थेच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुण्यामध्ये सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बालमानस शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला, वंचित विकास या सामाजिक संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि कार्यकर्ते गायत्री पाठक उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार डॉ. गोर्‍हे यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, ‘डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेली ओघवत्या भाषेतील ही दोन्ही वाचनीय पुस्तके आहेत. पुस्तक आणि वाचक या दोन्हींच्या भेटीचा हा अपूर्व योग आहे. विपरीत परिस्थितीतही सकारात्मक काम करणाऱ्या अनेकांना ऊर्जा कशी मिळते. ते आपले काम सातत्याने करतात यातच त्यांच्या यशाचे गमक आहे. समाजाने त्यांना विश्वासाने दिलेला पुरस्कार हा फार मोठा असतो. पुण्याच्या सुसंस्कृत भागात स्वयंसेवी संस्थांनी उभे केलेले काम अतिशय परिणामकारक आहे. अनेकांनी त्याला गौरवले आहे. आव्हानात्मक स्थितीमध्येही काम ज्ञानदेवी संस्थेने केले आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना शिक्षा देखील झाली आहे. अनेक कायद्यांमध्ये आजही काही मर्यादा आहेत. पण बदलत्या परिस्थितीनुसार समाजाची नजर मात्र प्रत्येक घडामोडींवर असते. न्याय व्यवस्थेतही अनेकदा न्यायाच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातात. यामुळे लोकशाहीवर विश्वास निर्माण करण्याचे काम मुलांच्या मनावर केले, याबद्दल चाइल्ड लाईनच्या कामाचे कौतुक त्यांनी केले. या कामात आवश्यक ती मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले.

महिलाविषयक कोणत्याही गुन्ह्यात पीडितांची नावे जाहीर न करण्याची सूचना विधिमंडळात डॉ. गोर्‍हे यांनी प्रथम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. यामुळे महिला अत्याचाराच्या अनेक घटनांचा उल्लेख आणि आढावा विधीमंडळाकडे अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे, त्या म्हणाल्या.

यावेळी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर आणि बालमानसशास्त्रज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनीही आपले विचार मांडले. डॉ. सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.

आत्मशोधाचा प्रवास यशाकडे घेऊन जातो : अभिनय कुंभार

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप

पुणे : “जीवनात अमर्याद संधी व अनेक वाटा असतात. त्या संधी, वाटांवर चालताना आपण आत्मशोधाचा प्रवास केला पाहिजे. त्यातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. यशापेक्षा पात्रता अंगिकारण्यावर आपण भर द्यायला हवा,” असे प्रतिपादन पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त अभिनय कुंभार यांनी केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोपावेळी अभिनय कुंभार बोलत होते. या अभ्यासक्रमात नरेंद्र शहाने प्रथम, अमिताभ भावे यांनी द्वितीय, तर मनीषा तापडिया यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
प्रसंगी सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. मकरंद वाझल, जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. सुनील खुशलानी, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, उपाध्यक्ष ॲड. अमोल शहा, सचिव प्रसाद देशपांडे, खजिनदार ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिव ॲड. अनुरुद्र चव्हाण, अभ्यासक्रम चेअरमन मनोज चितळीकर, समन्वयक प्रणव सेठ, मिलिंद हेंद्रे, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, विलास अहेरकर आदी उपस्थित होते.
अभिनय कुंभार म्हणाले, “तज्ज्ञ सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्या मार्गदर्शनातून समर्पित भावनेने आपण ज्ञानार्जन करत आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जगण्याचे आयामही बदलले आहेत. स्पर्धा परीक्षा, बँकांच्या, विविध आर्थिक संस्थांच्या परीक्षा देत त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. तसेच सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवायला हवे.”

ॲड. सुनील खुशलानी म्हणाले, “उद्योग क्षेत्रात लेखापालांची, कर सल्लागारांची मोठी गरज आहे. कर कायदे, कर प्रणाली सातत्याने प्रगत होत आहे. सरकारकडून कर प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेसह नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. त्यामुळे या नव्या प्रणाली आत्मसात करायला हव्यात.”

डॉ. मकरंद वाझल म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांना अशा अभ्यासक्रमाची संधी मिळायला हवी. करप्रणालीतील गुणवत्तापूर्ण शिक्षण ‘एमटीपीए’ देत आहे. असे अभ्यासक्रम शिकायला बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय करावी.” 

श्रीपाद बेदरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मनोज चितळीकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रणव शेठ यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अमोल शहा यांनी आभार मानले.

मुलींच्या रिलेच्या विजेतेपदासह महाराष्ट्राची सोनेरी सांगता

भोपाळ-
मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.

महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदात पार केले.

इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्स पर्यंत उडी घेतली. दुस-या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. “पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता”, असे श्रावणी हिने सांगितले. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक तिला खुणावत आहे.

शेतकऱ्याचे पोर लई हुशार !!
शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडी मध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्स पर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.

क्रीडा प्राधिकरणाच्या नैपुण्य चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली. सांगली येथील प्रबोधिनीचे केंद्र बंद पडल्यानंतर तो पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये महेश पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आता सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्याचे त्याचे ध्येय आहे आणि त्यासाठी कसून सराव करण्याची त्याची तयारी आहे.‌

पदकाची खात्री होती- रिया
आठशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरावर अनेक पदके मिळवली होती तसेच येथील स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता त्यामुळे पदक मिळवण्याची मला खात्री होती असे या शर्यतीत कांस्यपदक मिळवणाऱ्या रिया पाटील हिने सांगितले. तिने हे अंतर दोन मिनिटे १२.५६ सेकंदात पार केले. या आधी या स्पर्धेत तिने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. ती कोल्हापूर येथे अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाची विजय सलामी; बिहारवर सहा गुणांनी मात

महाराष्ट्र महिला संघ सलामीला पराभूत
अजितचे विजयामध्ये मोलाचे योगदान

जबलपूर
राष्ट्रीय खेळाडू वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने रविवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मधील किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. रेडर अजित चौहान (१३गुण), जयेश महाजन (५ टॅकल पॉईंट्स) आणि अनुज गाढवे (५ टॅकल पॉईंट्स) यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने सलामी सामन्यात बिहारचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने ३८-३२ अशा सहा गुणांचे आघाडीने गटातील पहिला सामना जिंकला. पृथ्वीराज, अजित यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र पुरुष संघाने स्पर्धेत दमदार विजय सलामी दिली. यादरम्यान निकिता लंगोटेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाला गटातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणा संघाने सलामी सामन्यात महाराष्ट्रावर ४१-२५ अशाप्रकारे मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
राष्ट्रीय खेळाडू वैभव याने कुशल नेतृत्वाची उत्तम चढाई आणि अचूक पकडीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान चढाई पटू अजित याची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने सर्वोत्तम कामगिरीतून बिहार संघाविरुद्ध सर्वाधिक तेरा गुणांची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला दमदार विजय सलामी देता आली.

मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी
बिहार आणि महाराष्ट्र पुरुष गटातील सलामी सामना पहिल्या हाफ मध्ये रंगतदार झाला. या अटीतटीच्या लढतीत बिहार संघाने मध्यंतरापूर्वी चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र प्रशिक्षक दादासो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने खास डावपेच आखले. त्यानंतर अचूक कौशल्याने वेळेवर महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी देत विजयी पताका फडकवली. आपल्या ६ फूट उंचीचा पुरेपूर फायदा घेत अजितने बोनस गुणासह गडी मारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

हाराष्ट्र संघाला दुसऱ्या विजयाची संधी
सलामीला दणदणीत विजय संपादन करणारा महाराष्ट्र पुरुष संघ आता गटातील दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी राजस्थान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचा दावेदार मानले जात आहे. तसेच सलामीच्या पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र महिला संघाला गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाची संधी आहे. सोमवारी महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा संघ समोरासमोर असतील.

युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद; किताबाचा दावा मजबूत :कोच दादासो
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील सलामीच्या लढतीत कौतुकास्पद कामगिरी केली. प्रचंड गुणवत्ता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्राचे खेळाडू मैदानावर विजयाचे मानकरी ठरले. त्यामुळे सलामीच्या सर्वोत्तम खेळीमुळे महाराष्ट्र संघाचा यंदाच्या सत्रातील किताब जिंकण्याचा दावा मजबूत झाला आहे. सोनेरी यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता संघातील खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दादासो आव्हाड यांनी पुरुष संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदान प्रक्रीया, मतदान ओळखपत्रासोबत आधार ओळखपत्र जोडणी, टपाली मतदान याबाबत माहिती देत आहेत. राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवरील मतदारांसाठी असलेल्या सुविधेबाबत तसेच ऑनलाईन मतदान प्रकियेबाबतही माहिती यावेळी देण्यात येत आहेत. ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता अशा पात्र मतदारांकडून ‘नमुना १२ डी’ हा अर्ज भरून घेण्यात येत आहे.

शाळा व महाविद्यालयीनस्तरावर विद्यार्थ्यांच्या मतदान जागृतीबाबत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून रॅली आणि गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विविध शाळांमधूनदेखील मतदानाच्या महत्वाविषयी शिक्षकांना माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा दिवसे- देवकाते यांनी दिली आहे.

‘मेक इन इंडिया’ ऐवजी ‘जोक इन इंडिया’ झाला

भाजप आणि काॅंग्रेसने 70 वर्षे सत्ता भोगली. देशाच्या समस्यांसाठी हे दोन पक्ष जबाबदार

नांदेड-स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काॅंग्रेस – भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’ बनवणार होते पण ‘जोक इन इंडिया’ झाला. कुठे गेला ‘मेक इन इंडिया’ देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला.बीआरएस पक्षाची सभा आज नांदेडमध्ये झाली. या सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सीआर बोलत होते.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, देशाच्या विचारधारेला बदलण्याचे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामुळे आम्ही बीआरएसचे उद्घाटन केले. देशात समर्थन मिळत आहे. मी विनम्रतेने पार्थना करतो की, माझे भाषण येथेच विसरू नका. गाव, शहरात गेल्यानंतर या माझ्या भाषणावर चर्चा करा. देशाला चालवण्यासाठी मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. अनेक नेते स्वातंत्र्यानंतर देशाने पाहीले. अनेक मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले. परंतु भाषण मोठे मोठे येते.

केसीआर म्हणाले, साधी गोष्ट आहे. मी जे सांगतोय ती सोपी गोष्ट आहे. ते राॅकेट सायन्स नाही. आज देशात पिण्याला पाणी मिळते ना..? सिंचनाला पाणी मिळते का? या गोष्टी देशात नाहीत का? सरकार का देत नाही, गौडबंगाल काय आहे ते समजून घ्या. ते समजले तर एकजूट व्हाल.

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काय कारण असावे विचार करा. आत्महत्या कोणताही शेतकरी केव्हा करतो? देशात शेतकऱ्यांची संख्या सोळा कोटी शेतकरी परिवार आहे. मजुरांची संख्याही तेवढीच आहे. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी मोठे कष्ट उपसण्याची गरज पडणार नाही. या गोष्टीला लोकांमध्ये पोहचवा.

केसीआर म्हणाले, भारत बुद्धीजीवींचा देश आहे. मुर्खांचा देश नाही. देशात आणीबाणी लागली तेव्हा लोकनायक जयप्रकाश नेत्यांच्या एका आवाजाने लोक एकत्रित झाले आणि बलाढ्य नेत्यांना नेस्तनाबूत केले. शेतकऱ्यांना केवळ शेतात नांगर चालवणे नव्हे तर कायदा बनवायलाही शिकायला हवे.केसीआर म्हणाले, स्वतः आमदार, खासदार बना तेव्हाच शेतकऱ्यांचे सरकार येईल. निवडणुका लागल्यावर कोणता न कोणता पक्ष जिंकतोच पण जनतेचा पराभव होतो. आता निवडणुका झाल्यास जनतेने, शेतकऱ्यांनी जिंकायला हवे.

केसीआर म्हणाले, भारत गरीब देश नाही. मला राजकीय जीवनाचा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. आपला देश अमेरिकेपेक्षाही बलवान आहे. नेत्याचे काम दमदार असेल तर आपण अमेरिकेपेक्षाही बलशाली आर्थिक शक्ती बनवू शकतो. भारतात संपत्ती आहे पण संपत्तीपासून जनता वंचित आहे. निसर्गाने पाणी, जमीन, कोळसा आणि काम करणारी जनता आपल्याकडे आहे. अमेरिका, चीन भारतापेक्षा मोठे देश आहे पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन भारताच्या तुलनेत कमी आहे.

केसीआर म्हणाले, भारताकडे 83 करोड एकर शेती असून 41 कोटीएकरजमीन शेती योग्य आहे. पाण्याचा अपव्यय होतो नेते तमाशा बघतात. महाराष्ट्र नद्यांनी संपन्न असून पाणी का नाही..? देशात सरकार काॅंग्रेसने 54 वर्षे चालवले. त्यानंतर भाजपने सोळा वर्ष तर अन्य काही तुरळक लोकांनी सरकार चालवले. भाजप आणि काॅंग्रेसने 70 वर्षे सत्ता भोगली. देशाच्या समस्यांसाठी हे दोन पक्ष जबाबदार आहे.

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…

बार्शी,दि.४- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर जिल्हा प्रतिनिधी पदा पासून महाराष्ट्रातील अवल दर्जाच्या दैनिकाच्या संपादकापर्यंत तसेच, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एका पोर्टल पासून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांपर्यंत ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला, असे पत्रकारितेतील महागुरू राजा माने यांचा 61 वा अभिष्टचिंतन सोहळा, भाग्यकांता ग्रुप व राजा माने मित्र परिवाराच्या वतीने बार्शी येथील आर. के. क्लब मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सन्मान सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापतेवेळी सूर्यकांत वायकर दादांच्या सुमधुर गाण्याने सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. याचवेळी बार्शीचे सुपुत्र, राष्ट्रपती पदक विजेते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचा देखील सहकुटुंब सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, बार्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष ऍड असिफभाई तांबोळी, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांच्या समवेत बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रशासकीय, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतीक, सामाजिक, औद्योगिक, कृषी, व्यवसाय, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तसेच दैनिक, साप्ताहिक व डिजिटल मीडियाचे पत्रकार, नातेवाईक, माने कुटुंबीय व राजा माने यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या अभिष्टचिंतन मनोगतातून राजा माने यांनी पत्रकारीता क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक करत, त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवत आणि राज्याला दिशा देणारे ठरेल असेही व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी राजा माने यांना 61 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत अराजकीय व्यासपीठ असल्यामुळे मनमोकळेपणाने विनोदात्मक फटकेबाजी करत हास्यांचे फवारे उडविले.

सत्काराला उत्तर देताना राजा माने यांनी म्हटले की, बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मी मुलगा असून, माझ्यावर असलेले आक्का आणि बापूंचे संस्कार, माझ्या मित्र परिवाराचे अनमोल सहकार्य, माझ्या कुटुंबाची साथ, माझ्याकडे असलेला प्रामाणिकपणा, जिद्द आणि सातत्य यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील प्रवासामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी मला कळत नकळतपणे सहकार्य केलं, अनेकांनी जीवापाड प्रेम केलं त्याची उतराई मी कधीही करू शकत नाही. माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असून, तो कायमस्वरूपी अविस्मरणीय राहील. येणाऱ्या काळात देखील याच उमेदीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यासाठी एक प्रेरणादायी कार्य करत राहील असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनीयर अमित इंगोले यांनी केले, सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाग्यकांता ग्रुपचे मुरलीधर चव्हाण व रोहन नलावडे यांनी मानले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुंबई, दि. 5 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत  3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.

जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट – 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर – 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर – 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर – 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

निवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढावे- अजित पवार

0

पुणे -चिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी बिनविरोध करण्याबाबत निर्णय घेतला म्हणजे बाकीच्या निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावे. लोकशाही आहे त्यामुळे जनतेला ज्यांना मतदान द्यायचे त्यांना देतील अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला आज दिला. ते पुण्यात आज माध्यमांशी बोलत होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक होणारच.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबच चालल्या आहेत. निवडणुका आणखी लांबू शकतात. मात्र निवडणुका कधी घ्यायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.

चांगली स्पर्धा भविष्यातील खेळाडू बनविण्याचे काम करते-क्रीडा आयुक्त सुहास दिवसे 

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउंट डाउन कार्यक्रमात ॲपचे अनावरण
पुणे : खेळ कुठलाही असो, त्यातील स्पर्धा ही महत्त्वाची असते. अशा स्पर्धेतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळताना पाहून नवोदित मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. यातूनच त्या खेळासाठी भविष्यात चांगले खेळाडू मिळू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने होणाऱ्या ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम काउंटडाउनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथे होणार आहे. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम अमनोरा पार्क टाउनमधील छत्रभूज नरसी विद्यालयात झाला. यावेळी भारतीय बॅडमिंटन महासंघाचे सहसचिव ओमर रशीद, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजित नातू आदी उपस्थित होते. उपसंचालक सुहास पाटील आणि सिरम फाऊंडेशनचे जसविंदर नारंग यांच्या हस्ते स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले.

सुहास दिवसे म्हणाले, राज्य सरकार या स्पर्धेला शक्य ती सर्व मदत करीन आणि त्यात सहभागही नोंदवेल. कारण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे. स्पर्धा ही महत्त्वाची असते. कारण अशा मोठ्या स्पर्धांमुळे मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आपण या स्पर्धेत सर्व शाळांना सहभागी करून घ्यायला हवे. विशेष करून ज्या शाळेत बॅडमिंटनच्या चांगल्या सुविधा आहेत, तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून निमंत्रित करावे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ विद्यार्थ्यांना बघायला मिळेल आणि भविष्यात यातूनच चांगले खेळाडू मिळतील.

पूना गेम ॲपचे कौतुक
दिवसे यांनी या वेळी अनावरण करण्यात आलेल्या पूना गेम ॲपचे कौतुक केले. ते म्हणाले, एखाद्या स्पर्धेची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणारे ॲप ही संकल्पनाच भारी आहे. हे ॲप गेम चेंजर ठरणार आहे. कारण अशा गोष्टी तयार करण्यासाठी कार्यकुशलता महत्त्वाची असते. एखाद्या खेळाचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागत असते. यात व्यवस्थित सुसंवाद आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे या अपचा निश्चितच या खेळासाठी उपयोग होईल. हा स्त्युत्य उपक्रम राबविला, त्याबद्दल आयोजकांचे कौतुक करायला हवे.  हे अॅप महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करुन देण्याची विनंती केली ज्‍यामुळे सर्व शासकीय स्पर्धांसाठी अॅपचा वापर करता येईल, अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली. 

सुहास दिवसे म्हणाले, या संघटनेचे हे ७५ वे वर्षे आहे. या इतक्या वर्षात या संघटनेने शिस्तीने काम केले आहे. कारण फारच थोड्या अशा संघटना देशात, राज्यात आहे जे अशा शिस्तीत काम करतात. त्या खेळाबद्दलची समर्पितता, पॅशन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मी इतर संघटनांनाही बॅडमिंटन संघटनेचे उदाहरण देत असतो. तुमचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, तुम्ही कोणाला तरी जबाबदार आहात याची जाणीव असली पाहिजे. पीडीएमबीएकडे हे गुण आहेत म्हणूनच त्यांनी राज्यात खेळाडूंच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे. राज्यात आपल्याकडे ९४ क्रीडा प्रकार आहेत. यातील केवळ १० ते १२ टक्के खेळाच्या संघटना अशा असतील, ते त्यांचे काम चोखपण बजावत असतील. याकडे लक्ष दिले नाहीत, तर मग घराणेशाही आणि इतर समस्या निर्माण होत असतात.
ओमर रशीद यांनी पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवालसारखे अव्वल खेळाडू या खेळात सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली. पुणे आयोजनात कधीच कमी पडत नाही, असा आमचा मागील इतिहास आहे. तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानाने आणलेले हे  अॅप क्रीडा जगतातील पहिले अॅप आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा एका क्लिकवर असेल. स्पर्धा संस्मरणीय आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आमच्याकडे १५०  हून अधिक स्वयंसेवकांची टीम अहोरात्र काम करत आहे. 

रणजित नातू म्हणाले, १९९७मध्ये वरिष्ठ गटाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुण्यात झाली होती. २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. तेव्हा सर्वच अव्वल खेळाडू यात भाग घेतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरून एक वेगळी उंची या स्पर्धेला मिळेल. स्पर्धेच्या आयोजनात आम्ही कुठलीच उणीव राहू देणार नाही.