राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउंट डाउन कार्यक्रमात ॲपचे अनावरण
पुणे : खेळ कुठलाही असो, त्यातील स्पर्धा ही महत्त्वाची असते. अशा स्पर्धेतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळताना पाहून नवोदित मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. यातूनच त्या खेळासाठी भविष्यात चांगले खेळाडू मिळू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने होणाऱ्या ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम काउंटडाउनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथे होणार आहे. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम अमनोरा पार्क टाउनमधील छत्रभूज नरसी विद्यालयात झाला. यावेळी भारतीय बॅडमिंटन महासंघाचे सहसचिव ओमर रशीद, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजित नातू आदी उपस्थित होते. उपसंचालक सुहास पाटील आणि सिरम फाऊंडेशनचे जसविंदर नारंग यांच्या हस्ते स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले.
सुहास दिवसे म्हणाले, राज्य सरकार या स्पर्धेला शक्य ती सर्व मदत करीन आणि त्यात सहभागही नोंदवेल. कारण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे. स्पर्धा ही महत्त्वाची असते. कारण अशा मोठ्या स्पर्धांमुळे मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आपण या स्पर्धेत सर्व शाळांना सहभागी करून घ्यायला हवे. विशेष करून ज्या शाळेत बॅडमिंटनच्या चांगल्या सुविधा आहेत, तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून निमंत्रित करावे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ विद्यार्थ्यांना बघायला मिळेल आणि भविष्यात यातूनच चांगले खेळाडू मिळतील.
पूना गेम ॲपचे कौतुक
दिवसे यांनी या वेळी अनावरण करण्यात आलेल्या पूना गेम ॲपचे कौतुक केले. ते म्हणाले, एखाद्या स्पर्धेची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणारे ॲप ही संकल्पनाच भारी आहे. हे ॲप गेम चेंजर ठरणार आहे. कारण अशा गोष्टी तयार करण्यासाठी कार्यकुशलता महत्त्वाची असते. एखाद्या खेळाचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागत असते. यात व्यवस्थित सुसंवाद आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे या अपचा निश्चितच या खेळासाठी उपयोग होईल. हा स्त्युत्य उपक्रम राबविला, त्याबद्दल आयोजकांचे कौतुक करायला हवे. हे अॅप महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करुन देण्याची विनंती केली ज्यामुळे सर्व शासकीय स्पर्धांसाठी अॅपचा वापर करता येईल, अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.
सुहास दिवसे म्हणाले, या संघटनेचे हे ७५ वे वर्षे आहे. या इतक्या वर्षात या संघटनेने शिस्तीने काम केले आहे. कारण फारच थोड्या अशा संघटना देशात, राज्यात आहे जे अशा शिस्तीत काम करतात. त्या खेळाबद्दलची समर्पितता, पॅशन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मी इतर संघटनांनाही बॅडमिंटन संघटनेचे उदाहरण देत असतो. तुमचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, तुम्ही कोणाला तरी जबाबदार आहात याची जाणीव असली पाहिजे. पीडीएमबीएकडे हे गुण आहेत म्हणूनच त्यांनी राज्यात खेळाडूंच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे. राज्यात आपल्याकडे ९४ क्रीडा प्रकार आहेत. यातील केवळ १० ते १२ टक्के खेळाच्या संघटना अशा असतील, ते त्यांचे काम चोखपण बजावत असतील. याकडे लक्ष दिले नाहीत, तर मग घराणेशाही आणि इतर समस्या निर्माण होत असतात.
ओमर रशीद यांनी पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवालसारखे अव्वल खेळाडू या खेळात सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली. पुणे आयोजनात कधीच कमी पडत नाही, असा आमचा मागील इतिहास आहे. तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानाने आणलेले हे अॅप क्रीडा जगतातील पहिले अॅप आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा एका क्लिकवर असेल. स्पर्धा संस्मरणीय आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आमच्याकडे १५० हून अधिक स्वयंसेवकांची टीम अहोरात्र काम करत आहे.
रणजित नातू म्हणाले, १९९७मध्ये वरिष्ठ गटाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुण्यात झाली होती. २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. तेव्हा सर्वच अव्वल खेळाडू यात भाग घेतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरून एक वेगळी उंची या स्पर्धेला मिळेल. स्पर्धेच्या आयोजनात आम्ही कुठलीच उणीव राहू देणार नाही.