महाराष्ट्र महिला संघ सलामीला पराभूत
अजितचे विजयामध्ये मोलाचे योगदान
जबलपूर–
राष्ट्रीय खेळाडू वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने रविवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मधील किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. रेडर अजित चौहान (१३गुण), जयेश महाजन (५ टॅकल पॉईंट्स) आणि अनुज गाढवे (५ टॅकल पॉईंट्स) यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने सलामी सामन्यात बिहारचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने ३८-३२ अशा सहा गुणांचे आघाडीने गटातील पहिला सामना जिंकला. पृथ्वीराज, अजित यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र पुरुष संघाने स्पर्धेत दमदार विजय सलामी दिली. यादरम्यान निकिता लंगोटेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाला गटातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणा संघाने सलामी सामन्यात महाराष्ट्रावर ४१-२५ अशाप्रकारे मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
राष्ट्रीय खेळाडू वैभव याने कुशल नेतृत्वाची उत्तम चढाई आणि अचूक पकडीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान चढाई पटू अजित याची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने सर्वोत्तम कामगिरीतून बिहार संघाविरुद्ध सर्वाधिक तेरा गुणांची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला दमदार विजय सलामी देता आली.
मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी
बिहार आणि महाराष्ट्र पुरुष गटातील सलामी सामना पहिल्या हाफ मध्ये रंगतदार झाला. या अटीतटीच्या लढतीत बिहार संघाने मध्यंतरापूर्वी चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र प्रशिक्षक दादासो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने खास डावपेच आखले. त्यानंतर अचूक कौशल्याने वेळेवर महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी देत विजयी पताका फडकवली. आपल्या ६ फूट उंचीचा पुरेपूर फायदा घेत अजितने बोनस गुणासह गडी मारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
महाराष्ट्र संघाला दुसऱ्या विजयाची संधी
सलामीला दणदणीत विजय संपादन करणारा महाराष्ट्र पुरुष संघ आता गटातील दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी राजस्थान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचा दावेदार मानले जात आहे. तसेच सलामीच्या पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र महिला संघाला गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाची संधी आहे. सोमवारी महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा संघ समोरासमोर असतील.
युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद; किताबाचा दावा मजबूत :कोच दादासो
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील सलामीच्या लढतीत कौतुकास्पद कामगिरी केली. प्रचंड गुणवत्ता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्राचे खेळाडू मैदानावर विजयाचे मानकरी ठरले. त्यामुळे सलामीच्या सर्वोत्तम खेळीमुळे महाराष्ट्र संघाचा यंदाच्या सत्रातील किताब जिंकण्याचा दावा मजबूत झाला आहे. सोनेरी यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता संघातील खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दादासो आव्हाड यांनी पुरुष संघावर कौतुकाचा वर्षाव केला.