भोपाळ-महाराष्ट्राच्या समृद्धी घोरपडे,उत्कर्ष ढमाळ व महादेव माने या कुस्तीगीरांना येथे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर तृप्ती गुरव व प्रणय चौधरी यांनी कांस्यपदक मिळविले.तात्या टोपे क्रीडा नगरीत आजपासून सुरू झालेल्या कुस्त्यांच्या लढतीपैकी मुलींच्या ४६ किलो गटात समृद्धी हिला हरियाणाच्या मुस्कान हिने चिवट लढतीनंतर १२-६ असे हरविले. ही लढत अतिशय रंगतदार झाली. मात्र मुस्कानच्या ताकदवान खेळापुढे समृद्धीचा बचाव निष्प्रभ ठरला.
कांस्यपदकाच्या लढतीत तृप्तीने दिल्लीच्या ज्योती कुमारी हिला ४-० असे सहज पराभूत केले. मुलांच्या ५१ किलो गटात उत्कर्ष याला छत्तीसगडच्या मनु यादव याने ४-० असे हरविले. उत्कर्ष पेक्षा यादव हा अधिक बलवान होता, त्यामुळेच उत्कर्ष याला अपेक्षित डावपेच करता आले नाहीत. ६० किलो गटाच्या अंतिम फेरीत महादेव याला हरियाणाच्या आशिष कुमार याने उत्कंठापूर्ण लढतीनंतर ३-१ असे नमविले. याच गटातील कांस्यपदकाच्या लढतीत चौधरी यांनी उत्तर प्रदेशच्या जुबेर याचा ६-५ असा पराभव केला. ही कुस्ती अतिशय रंगतदार झाली मात्र महाराष्ट्राच्या चौधरी याने शेवटपर्यंत वर्चस्व ठेवीत विजयश्री संपादन केली.
मुंबई, दि. 08 : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध दृढ असून दुग्ध उत्पादने, आयुर्वेदिक औषधे, पर्यटन विस्तार, मसाल्याचे पदार्थ, वायनरीसारखे कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापार कक्षा आणखी वृध्दिंगत व्हावी अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
आज विधानभवनात ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल, वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल, उप वाणिज्यदूत श्री.मायकल ब्राऊन यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. महिला सक्षमीकरणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देताना त्या बोलत होत्या.
उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील शासकीय आणि अशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात भरीव कार्य केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात 10 लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणारा व्यापार आणखी वाढविता येईल. योग विद्या आणि आयुर्वेदिक औषधे यांना जगभराप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक प्रगतीशील शेतकरी केवळ औषधी गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांची लागवड करतात. या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहान मिळावे, या मुद्यावर उभयपक्षी विस्ताराने चर्चा झाली. विधानसभा सदस्य श्री.आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना सागरी किनारा सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविला होता, तो यापुढेही सुरू ठेवण्यात यावा असे मत यावेळी वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल यांनी नोंदविले.
येणाऱ्या जागतिक महिलादिनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत महिलांच्या प्रश्नांसदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. “समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिली.
या भेटीप्रसंगी मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी, प्रदीप ठाकरे, डॉ.अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.
मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.
हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.
दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.
पुणे : दुचाकीला रिक्षाचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाचा ; दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपचौकात घडली. येथून पसार झालेल्या दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले की,’किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी मुकील गफूर शेख (रा. कोंढवा), अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे
रिक्षाचालक किरण याचा भाऊ मधुकर याने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण, त्याचा भाऊ मधुकर, बंटी कसबे आणि मित्र भापकर चौकातील पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार मुकील याला रिक्षाचा धक्का लागला. या कारणावरून रिक्षाचालक किरण आणि दुचाकीस्वार मुकील यांच्यात वाद झाला. आरोपी मुकील, त्याचा मित्र अरबाज यांनी किरण याला मारहाण केली. एका आरोपीने किरणच्या छातीवर लाथ मारली. मारहाणीत किरण बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आरोपी मुकील आणि अरबाज पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दोघांना अटक करण्यात आली.सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे तपास करत आहेत.
मुंबई दि. 8 – दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच मला धक्का बसला. निष्पक्ष निडर झुंजार पत्रकार विचारवंत मार्गदर्शक म्हणून बबन कांबळे यांचे योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी पत्रकारितेचा सम्राट हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत संपादक बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पत्रकार संपादक दिवंगत बबन कांबळे यांनी भारतीय दलित पँथर च्या चळवळीला पाठिंबा दिला. वरळी मध्ये ते राहत असताना भारतीय दलित पँथरमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पँथर म्हणून त्यांनी काम केले. ते नवाकाळ मध्ये पत्रकार म्हणून काम करताना त्यांमी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे त्यांनी स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे असते हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याचा निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रात या वृत्तपत्राला वाचक लाभले. बबन कांबळे हे सम्राट ला आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र करण्यात यशस्वी झाले. त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दिवंगत बबन कांबळे यांच्याशी माझे जिवलग मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गावी ते मला दोन वेळा घेऊन गेले होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेतून भारतीय दलित पँथर पासून आमच्या कार्यक्रमांना आंदोलनांना प्रसिद्धी दिली. माझ्या भूमिकेला वेळोवेळी पाठिंबा दिला.त्यांची अनेक विषयांवर माझ्याशी चर्चा होत असे. बबन कांबळे आणि सम्राट चा माझे नेतृत्व वाढविण्यात मोठा वाटा राहिला आहे.आंबेडकरी चळवळीत सम्राट आणि बबन कांबळे यांचे अढळ आदराचे स्थान कायम राहील असे सांगत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संपादक ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे आज सकाळी दि 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता ठाणे येथील खाजगी रुग्णालयात वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी; कुणाल आणि कृपाल दोन मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 फेब. रात्री 8 वाजता ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ठाण्यातील बाळकुम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोदरेज इंटेरिओतर्फे विकसीत करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण बेड मुळे नवमाता आणि त्यांची काळजी घेणाऱ्याना खात्रीशीरपणे मिळणार आरोग्यपूर्ण बाळंतपणाचा अनुभव
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्थात्मक विभागातील भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेली आपली व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओतर्फे एक अनोखा आरोग्य सेवा सुविधा देणारा बर्थिंग बेड ‘सोलेस’ सादर करत असल्याची घोषणा केली आहे. सोलेस बेड ही एक अनोखी संकल्पना असून प्रसवकाळ, प्रसूती, सुधारणा आणि प्रसवोत्तर प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या हालचाली सुलभ करण्यास सक्षम करते. या नवीन श्रेणीसह गोदरेज इंटेरिओ नव्याने झालेल्या आईसाठी आणि तिची काळजी घेणाऱ्यांसाठी प्रसूतीचा अनुभव निरोगी बनवण्याच्या गरजेकडे लक्ष देत आहे. ब्रँड सध्या आरोग्यसेवा उद्योगातून १३% पेक्षा जास्त संस्थात्मक महसूल निर्माण करत आहे आणि देशभरातील १०० हून अधिक रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांना फर्निचर सुविधा पुरवत आहे.
नवीन माता आणि मुलांमध्ये ४०% पेक्षा जास्त मृत्यू प्रसव काळ आणि प्रसूतीच्यावेळी होत असल्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार योग्य प्रकारे घेतलेली काळजी ही माता आणि नवजात जन्मलेल्या बाळांच्या आरोग्य स्थितीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून ओळखली जात आहे. प्रसवकाळ, प्रसूती, सुधारणा आणि प्रसवोत्तर या सर्व प्रवासात आईला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि पाठबळ आवश्यक असते. सुरळीत आणि सुरक्षित प्रसूतीसाठी, आई आणि आरोग्य सेवा काळजीवाहक या दोघांसाठी कमी कष्टाचा प्रवास सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हा महत्वाचा मुद्दा ध्यानात घेऊन एक नामांकित हेल्थकेअर फर्निचर ब्रँड इंटिरिओ प्रसूती प्रक्रियेला अधिक चांगले बनविण्याचा उद्देश असलेला बेड सादर करत आहे.
गोदरेज इंटेरिओचा वैशिष्ट्यपूर्ण सोलेस बेड प्रसूती प्रक्रियेदरम्यान आई आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अधिक आरामदायी वाटावे यादृष्टीने डिझाइन केला आहे. बाळंतपणाचे वेगवेगळे टप्पे लक्षात घेऊन, बाळाच्या जन्मादरम्यान सुलभ आणि सुरक्षित अनुभव देण्याच्या दृष्टीने बेडची रचना करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक नियंत्रित बॅकरेस्ट आणि उंची, 360° अॅडजस्ट होणारे काल्फ सपोर्ट, आपत्कालीन परिस्थितीसाठी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक CPR आणि मागे घेता येण्याजोगा लेग रेस्ट यांचा समावेश आहे. यात सुसंगत टीआर उंची हालचाली वैशिष्ट्य देखील असून जे ट्रेंडेलेनबर्ग (एका बाजूने बेड वर करणे) नंतर बेडला त्याच्या नेहमीच्या स्थितीत परत आणते. सोलेस बेडची सानुकूलता आणि साधेपणा हे हॉस्पिटलमध्ये उबदार, आरामदायी आणि अर्गोनॉमिक काळजी प्रदान करताना समकालीन, प्रगतीशील लेबर सूटसाठी एक उपयुक्त, परवडणारा पर्याय बनवते.
नवीन उत्पादन सादर करताना गोदरेज इंटेरिओच्या विपणन (B2B) विभागाचे उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, “गोदरेज इंटेरिओमध्ये दररोज आणि हरप्रकारे जीवनमानाचा दर्जा समृद्ध करणे हे आमचे ध्येय आहे. गोदरेज इंटेरिओचा आरोग्यसेवा व्यवसाय रुग्ण, कुटुंब आणि काळजी घेणारे यांच्यासाठी एर्गोनॉमिकली सुरक्षित, चांगला अनुभव देणाऱ्या हेल्थकेअर स्पेस तयार करणे यावर लक्ष केंद्रित करतो. नव्याने सादर केलेला सोलेस बेड प्रसूती अनुभव चांगला करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन उपायसुविधा वापरून डिझाइनकडे असलेला आमचा मानव-केंद्रित दृष्टिकोन ठळक करते. सोलेस बेड प्रसूती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर मातांना आणि काळजीवाहक यांना आराम आणि आधार पुरविणारी उत्तम उपाय सुविधा आहे. संपूर्ण भारतभर आरोग्यसेवा अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पुढे जाऊन आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये आम्ही ५ नवीन आरोग्य सेवा सुविधा सुरू करण्याची योजना आखत असून आमच्या आरोग्य सेवा उद्योगात 30% महसूल वाढीचे लक्ष्य आहे.”
पुणे:निबे लिमिटेड या संरक्षण दलासाठी सामग्री तयार करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कंपनीने आयोजित केलेल्या ‘एमएसएमई डीफ एक्सपो -2023’ या संरक्षण सामग्री विषयक प्रदर्शनाला पंधराशे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आज भेट दिली. कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी त्यांना संरक्षण साहित्याची आणि या क्षेत्राची माहिती दिली .यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हेही उपस्थित होते.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी ,प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनांना येऊन माहिती घेतली .निबे लिमिटेडच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हे प्रदर्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये शस्त्रास्त्रे ,रोबो,रॉकेट लॉन्चर,मिसाईल लाँन्चर, ट्रक, मशीन गन,पूल उभारण्याची सामग्री, इलेक्ट्रिक वाहने अशा अनेक गोष्टींचा समावेश होता
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने स्वामी समर्थ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी निमित्त आयोजित सोहळ्यात स्वामी भक्त बंडोपंत तिखे यांना श्री स्वामी समर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अॅड. प्रताप परदेशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले होते. पुणेरी पगडी, पुष्पगुच्छ, महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष होते. सोहळ्यात हर्षद कुलकर्णी यांनी ‘स्वामी आणि भक्ती गीते’, मुकुंद बादरायणी यांनी ‘स्वर समर्थ अभंगवाणी’, योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी ‘स्वामीगीत सुगंध’ हे कार्यक्रम सादर केले. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती झाली पालखी सोहळ्यात रक्तदान महायज्ञाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २७५ पिशव्यांचे संकलन झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनायक घाटे यांनी केले.
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे ‘जागृती – निरोगी जीवनशैलीकडे’ या विषयावर परिसंवाद
: ‘ व्यसनाधिनता ही मॉडर्न फॅशन नसून तो विनाशाचा मार्ग आहे हे युवकांनी वेळीच लक्षात घेऊन त्यापासून दूर राहिले पाहिजे. भारतीय तरूणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. ही चिंताजनक बाब आहे. याला आळा घालण्यासाठी तरूणांमध्ये व्यसना संबंधीची जागृती करणे गरजेचे आहे. असे मत मानसशास्त्रीय आरोग्य संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त व मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीच्या क्लीनिकल सायकॉलॉजी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागृती- निरोगी जीवनशैलीकडे – अस्वास्थ्यकारक पदार्थांना नाही म्हणा या विषयावरील परिसंवादाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. निरज महिंद्रो, डॉ भानुदास कुचेकर, डॉ. मृदुला कुलकर्णी व डॉ. अश्विनी गिजरे हे उपस्थित होते.
डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, भारतीय तरूणांमध्ये ड्रग्ज, धुम्रपान, अल्कोहोल, अंमली पदार्थ यांसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेले स्क्रिन अॅडिक्शन, गेम अॅडिक्शन आणि पॉर्न अॅडिक्शन अशा गोष्टींपासून तरूणांना परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी जोपासणे, त्यांना व्यसनांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरांवरील दुष्परिणामांची जाणीव करून देणे व त्यांना वाईट सवयींपासून दूर नेणे आवश्यक आहे. भारतीय समाजावर व्यसनांचा अतिरेकी वापर आणि परिणाम दिसून येत आहेत. व्यसन हा पर्याय नाही हा एक जूनाट विकार आहे. जो योग्य उपचाराने व हस्तक्षेपाच्या मदतीने सोडविले जाऊ शकतो. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक जीवनपद्धतीमुळे तरूणांमध्ये ताणतणाव वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची तरूण पिढी व्यसनाधिनतेकडे झुकत चालली आहे. तरूणांनी आपल्या सवयी व संगतीत बदल केला पाहिजे. वाईट सवयींपासून आपल्या मनाला आवर घातला पाहिजे. चांगल्या सवयी अंगी बाणविल्या पाहिजेत. व्यसनाधिनता ही मॉडर्न फॅशन नसून तो विनाशाचा मार्ग आहे हे युवकांनी वेळीच लक्षात घेऊन त्यापासून दूर राहिले पाहिजे. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. डॉ. अश्विनी गिजरे यांनी प्रास्ताविक केले. प्रकृती व निहारिका यांनी सुत्रसंचालन केले. सिओना रोहेकर हिने आभार मानले.
लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन
पुणे, दि. ८: प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान होण्याच्या हेतूने आणि नागरिकांच्या समस्यांवर गतीमान कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यरत आहे. नागरिकांनी या कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आपले लहानमोठे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयापर्यंत जावे लागू नये. त्यांच्या प्रश्नांची जिल्हास्तरावरच तातडीने आणि परिणामकतेने सोडवणूक व्हावी या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार २६ डिसेंबर २०२२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आणि कक्षप्रमुख म्हणून तहसिलदार दिपक आकडे हे काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बी विंग २ रा मजला (करमणूक कर शाखा) येथे हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
अशी असेल कार्यपद्धती: जिल्हास्तरावरील या कक्षात (सीएमओ) सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ आदी स्वीकारण्यात येणार आहे. शासनस्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हा स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या अर्जांवर त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांना मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकरिता स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची (नोडल अधिकारी) नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे.
डी डी नॅशनल वाहिनी 11 फेब्रुवारीपासून वर ‘स्वराज’ ही लोकप्रिय मालिका दर शनिवार रविवारी दुपारी एक वाजल्यापासून बिंग वॉच मोड मध्ये म्हणजे एकापाठोपाठ एक एपिसोड्स स्वरूपात दाखवली जाणार आहे.
पंधराव्या शतकात, भारतात वास्को द गामाचे आगमन झाल्यापासूनचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवास्पद इतिहास रंजकपणे दाखवणारी “स्वराज- भारत की स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा” ही 75 भागांची मेगा मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात आली. या मालिकेत भारतीय इतिहासाचे अनेक आजवर न दाखवले गेलेले पैलू उजेडात आणण्यात आले असून, स्वातंत्र्यलढ्याच्या अज्ञात नायकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा दाखवण्यात आल्या आहेत.
पाच ऑगस्ट 2022 रोजी स्वराज ह्या मालिकेचा शुभारंभ, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, राज्यमंत्री डॉ. एल, मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. मालिकेचे प्रसारण 14 ऑगस्ट, 2022 पासून डीडी नॅशनल वर हिन्दी भाषेत आणि त्यानंतर नऊ प्रादेशिक भाषांत (तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी) प्रादेशिक वाहिन्यांवर दाखवण्यात आली. रविवारी सकाळी 9 वाजता आणि रात्री नऊ वाजता डीडी नॅशनल वर तिचे प्रसारण होत असे. तर पुनर्प्रसारण मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी एक वाजता तर शनिवारी रात्री 9 वाजता होत असे. तर याच मालिकची ध्वनिमुद्रित आवृत्ती आकाशवाणीवर, शनिवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जात असे.
मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ‘संकल्प महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.
श्री.फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले. अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर – गोवा, विरार-अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.
आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयीसुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा – वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.
आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेतीमालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.
मुंबई दि 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.
14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात
रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.
या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.
बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
पुणे- येथील एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेल मधील ग्राहकांची संख्या वाढावी याकरिता ‘माेफत सूप’ देण्याची याेजना राबविण्यास सुरुवात केली आणि त्यास ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला. परंतु यामुळे आपल्या हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या राेडवली या रागातून दुसऱ्या हाॅटेल चालकाने त्यास मारहाण करत धारदार हत्याराने वार करत जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात सिध्दार्थ भालेराव, दिगवीजय गजरे (रा.खडकी,पुणे) यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आराेपी विराेधात मुलायम रामकृपाल पाल (वय-27,रा.खडकी,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सदरची घटना सहा फेब्रुवारी राेजी मेवाड पावभाजी सेंटर समाेर चाैपाटी खडकी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलायम पाल यांचे संबंधित ठिकाणी ‘ओ शेठ’ नावाचे हाॅटेल आहे. तर त्यांचे हाॅटेल जवळच आराेपींचे ‘साहेब’ नावाचे हाॅटेल आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढावी याकरिता जेवणा अगाेदर ‘माेफत सूप’ देण्याची याेजना नुकतीच सुरु केली हाेती. त्यामुळे ग्राहक माेठया प्रमाणात हाॅटेलला येऊ लागल्याने दुसऱ्या हाॅटेल मधील ग्राहकांची संख्या कमी हाेऊ लागली. या गाेष्टीचा राग मनात धरुन आराेपी सिध्दार्थ भालेराव आणि दिग्वीजय गजरे यांनी तक्रारदार मुलायम पाल याच्या डाेक्यात लाेखंडी धारदार हत्याराने मारुन जखमी करुन ‘येथे धंदा का करता’ म्हणून शिवीगाळ केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, खडकी पोलिस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी आराेपींना ताब्यात घेतले आणि जखमी झालेल्या इसमास रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस रिकीबे करत आहे.