एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे ‘जागृती – निरोगी जीवनशैलीकडे’ या विषयावर परिसंवाद
: ‘ व्यसनाधिनता ही मॉडर्न फॅशन नसून तो विनाशाचा मार्ग आहे हे युवकांनी वेळीच लक्षात घेऊन त्यापासून दूर राहिले पाहिजे. भारतीय तरूणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. ही चिंताजनक बाब आहे. याला आळा घालण्यासाठी तरूणांमध्ये व्यसना संबंधीची जागृती करणे गरजेचे आहे. असे मत मानसशास्त्रीय आरोग्य संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त व मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीच्या क्लीनिकल सायकॉलॉजी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागृती- निरोगी जीवनशैलीकडे – अस्वास्थ्यकारक पदार्थांना नाही म्हणा या विषयावरील परिसंवादाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. निरज महिंद्रो, डॉ भानुदास कुचेकर, डॉ. मृदुला कुलकर्णी व डॉ. अश्विनी गिजरे हे उपस्थित होते.
डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, भारतीय तरूणांमध्ये ड्रग्ज, धुम्रपान, अल्कोहोल, अंमली पदार्थ यांसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेले स्क्रिन अॅडिक्शन, गेम अॅडिक्शन आणि पॉर्न अॅडिक्शन अशा गोष्टींपासून तरूणांना परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी जोपासणे, त्यांना व्यसनांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरांवरील दुष्परिणामांची जाणीव करून देणे व त्यांना वाईट सवयींपासून दूर नेणे आवश्यक आहे. भारतीय समाजावर व्यसनांचा अतिरेकी वापर आणि परिणाम दिसून येत आहेत. व्यसन हा पर्याय नाही हा एक जूनाट विकार आहे. जो योग्य उपचाराने व हस्तक्षेपाच्या मदतीने सोडविले जाऊ शकतो.
मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक जीवनपद्धतीमुळे तरूणांमध्ये ताणतणाव वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची तरूण पिढी व्यसनाधिनतेकडे झुकत चालली आहे. तरूणांनी आपल्या सवयी व संगतीत बदल केला पाहिजे. वाईट सवयींपासून आपल्या मनाला आवर घातला पाहिजे. चांगल्या सवयी अंगी बाणविल्या पाहिजेत. व्यसनाधिनता ही मॉडर्न फॅशन नसून तो विनाशाचा मार्ग आहे हे युवकांनी वेळीच लक्षात घेऊन त्यापासून दूर राहिले पाहिजे.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
डॉ. अश्विनी गिजरे यांनी प्रास्ताविक केले.
प्रकृती व निहारिका यांनी सुत्रसंचालन केले.
सिओना रोहेकर हिने आभार मानले.