Home Blog Page 1410

राष्ट्रीय लोक अदालतीमधून राज्यभरात सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली,वाहतूक विभागाला ५१ कोटींहून अधिक महसूल

0

मुंबई, दि. १४ : राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून ७.८० लाख वाहतूक विभागाच्या ई- ट्रॅफीक चलन प्रकरणांमध्ये सुमारे  ५१.२० कोटीं रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व प्रभारी मुख्य न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला, प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व न्यायमूर्ती रमेश धानुका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमित्या आणि ३०५ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोक अदालतीच्या ५ दिवस आधी घेण्यात आलेल्या विशेष अभियानामध्ये ५५ हजार ६८७ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीततेसाठी न्यायमूर्ती बी. रमेश धानूका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी लोक अदालतपूर्व बैठका आयोजित करण्यावर भर दिला होता. न्यायमूर्तींच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीपूर्वी अनेक समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली होती. ज्यामुळे पक्षकारांना विरोधी पक्षाशी संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली. राज्यभरात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, वैवाहिक प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती. विशेष बाब म्हणजे वैवाहिक वाद प्रकरणामध्ये १०० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आपसात तडजोड झाली.

ही राष्ट्रीय लोक अदालत आणि यापूर्वीच्या लोक अदालतीचे प्राप्त यशावरुन असे दिसून येते की, वैकल्पिक वाद निवारण केंद्रासोबत राष्ट्रीय लोक अदालत देखील विवादांचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ अंतर्गत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या संमतीने लेखी तडजोड  नोंद केली जाते व त्याआधारे ॲवार्ड पारीत केला जातो. तो ॲवार्ड हा अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरुप प्राप्त होते. त्या ॲवार्डच्या विरुद्ध अपीलाची तरतूद नाही. लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यावर पक्षकारांना संपूर्ण कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.

मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे एका धनादेश अनादरित प्रलंबित प्रकरणामध्ये दृकश्राव्य माध्यमाद्वारे तडजोड झाली. त्यात या प्रकरणातील एका पक्षकाराने अमेरिकेतून दृकश्राव्य पद्धतीने हजेरी लावली व एक पक्षकार न्यायालयात हजर होते. तसेच एका पुनर्विलोकन अर्जामध्ये (धनादेश अनादरित प्रकरणामध्ये) तडजोड झाली. त्यामधील धनादेशाची रक्कम ही रुपये 200 कोटी एवढी होती.

जळगाव विधी सेवा प्राधिकरणातील एका मोटार अपघात नुकसान भरपाईमध्ये उभय पक्षकाराकडून तडजोड होऊन लोक अदालतीच्या दिवशीच पक्षकाराला नुकसान भरपाई रक्कम रुपये 2.25 कोटी रुपयेचा धनादेश देण्यात आला.

पुढील राष्ट्रीय लोक अदालत ही दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीमध्येही सर्व संबंधित लाभधारकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.

निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण यांची मतदान केंद्रांना भेट

पुणे,दि.१४ : जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन केंद्रांची तपासणी केली आणि मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आवश्यक सुविधा आणि रचना याबाबत संबंधित अधिकारी आणि समन्वयकांना मार्गदर्शन केले.

मागील निवडणुकीत कमी संख्येने मतदान झालेल्या भागात विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पोरेडी, समन्वयक थॉमस नरोन्हा, उत्तम भारती, अशोक कुटे यांच्यासह संबंधीत समन्वय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मामुर्डी येथील सेंट जॉर्ज इंग्लिश मिडीयम स्कूल, किवळे येथील विद्या भुवन स्कूल, विकासनगर, भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळा आणि दिवंगत मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, पुनावळे येथील महापालिका शाळा, चिंचवडगाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा आणि मरहूम फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय, थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व महापालिका शाळा तसेच जी.के. गुरुकुल, पिंपळे निलख येथील महापालिका शाळा, पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा आणि विशालनगर येथील विद्याविनय निकेतन शाळा या मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांनी भेटी दिल्या. त्यांनी मतदान केंद्राची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी तेथील व्यवस्थेबाबत चर्चा केली.

‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न!

जेष्ठ सिने पत्रकार व लोकप्रिय लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या नव्या मराठी पुस्तचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून अनौपचारिक पद्धतीने करण्यात आले. या विशेष सोहळ्याला सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर तसेच लोकप्रिय संगीतकार जतिन पंडीत (जतिन-ललित), ABP News व ABP MAZA चे  वरिष्ठ संपादक श्री. राजीव खांडेकर, बाॅम्बे, रंगीला, हम दिल दे चुके सनम, हिरोपंती 2 आदि चित्रपटांचे सुप्रसिद्ध गीतकार श्री.मेहबूब आलम कोतवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले, “अनिता पाध्ये यांची पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतलं असल्याने पुस्तक संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवलं जात नाही. हे पुस्तकही त्याच दर्जाचं असेल, मी वाचल्यानंतर त्यावर माझा अभिप्राय देईन, या पुस्तकासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा”

लेखिका अनिता पाध्ये म्हणाल्या ‘राज ठाकरे यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. त्यांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेल्या माझ्या सर्व पुस्तकांना लोकाश्रय मिळविला आहे. त्यांच्याकडून माझ्या साहित्यकृतींचे प्रकाशन व्हावे ही माझी कायम ईच्छा असते. आज ते प्रचंड व्यस्त असूनही हा सोहळा ‘शिवतीर्थ’वर करण्यासाठी मला परवानगी देऊन माझ्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचा आणि माझ्या लेखनकलेचा सन्मान केला आहे.

या सोहळ्याला लोकप्रिय संगीतकार जतिन पंडीत (जतिन-ललित), ABP News व ABP MAZA चे  वरिष्ठ संपादक श्री. राजीव खांडेकर, बाॅम्बे, रंगीला , हम दिल दे चुके सनम, हिरोपंती 2 आदि चित्रपटांचे सुप्रसिद्ध गीतकार श्री.मेहबूब आदि मान्यवर पाहुणे उपस्थित होते. *’प्यार जिंदगी है’ या पुस्तकात 12 लोकप्रिय हिंदी रोमॅन्टिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास असल्याने व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधून पुस्तकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी दिलवाले दुल्हनिया ले जायंगे मधील एक गाणे संगीतकार जतीन यांचे चिरंजीव राहुल यांनी गाऊन सर्वांची वाहवा मिळविली.

चित्रपटांशी नाळ जोडलेल्या भारतीय प्रेक्षकांना रोमॅन्टिक चित्रपट फार जवळचे आहेत. ज्यांचं प्रेम सफल झालेलं असतं ते तर रोमॅन्टिक चित्रपटांमधील नायक-नायिकांशी, रुपेरी पडद्यावरील त्यांच्या प्रेमाची आपल्या प्रेमाशी साधर्म्य शोधत असतात तर ज्यांचं प्रेम विफल झालं असतं असे प्रेक्षक प्रेमपटातील सफल प्रेम पाहून आपल्या दु:खी मनावर फुंकर घालत असतात. अनिता पाध्ये यांचे नवं मराठी पुस्तक ‘प्यार जिंदगी है’ मधील चित्रपटांच्या सुरस कथाप्रवास गुंतून जातील.

‘देवदास’, ‘आराधना’, ‘बाॅबी’, ‘एक दूजे के लिए’, ‘तेरे घर के सामने’, ‘कभी कभी’, ‘अनुपमा’, ‘छोटी सी बात’, ‘आशिकी’, ‘कयामत से कयामत तक’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’,  ‘हम दिल दे चुके सनम’ आदी 12 लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा निर्मिती प्रवास, या चित्रपटांची वैशिष्ट्य, सामाजिक मूल्य, हे चित्रपट बनत असताना घडलेल्या अनेक खऱ्या आणि रंजक घटना ‘प्यार जिंदगी है’ मध्ये वाचायला मिळतील. ३२७ पाने आणि दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे व रेखाचित्रांमुळे हे आणखी मौल्यवान झाले आहे.

नादिर गोदरेज यांचा ‘मोस्ट रिस्पेक्टेड इंडियन इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान

पुणे-

व्यवसायाच्या माध्यमातून भारताला नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपायसुविधा सादर करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री. नादिर गोदरेज यांना हुरुन इंडिया तर्फे ‘मोस्ट रिस्पेक्टेड इंडियन इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हुरुन इंडियाचे वार्षिक ‘मोस्ट रिस्पेक्टेड एंट्राप्रूनर डिनर’ हे भारतीय व्यवसायातील पिढ्यानपिढ्या आणि अनेक काळ काम करणारे समविचारी उद्योजक आणि अग्रणी यांच्या कल्पनांचा मिलाफ साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. भारतातील काही आघाडीच्या उद्योजकांचा  प्रवास आणि इंडिया इंकमधील त्यांचे योगदान साजरे करण्यात आले आणि पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकण्यात आला.

श्री. गोदरेज यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, “हुरुन इंडियाकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे खरोखरच एक सन्मान आहे. गोदरेज मध्ये आम्हाला आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपायसुविधा यांच्याद्वारे आपल्या देशाची  सेवा करण्यासाठी सक्षम बनून आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासाचा एक भाग बनण्याचा बहुमान मिळाला आहे असे मला वाटते. व्हेक्टर- बोर्न रोगांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कृषी सुविधा उपायांपासून  शाश्वत जीवनशैली पुरविण्यापर्यंत समूहाच्या विविध व्यवसायांनी सतत स्वतःला भारताच्या आकांक्षांशी सुसंगत ठेवले आहे. आमचे अनेक दशकांपासूनचे कार्य भारताप्रती आमची अखंड वचनबद्धता व्यक्त करते आणि आपल्या राष्ट्रासाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी सादर करण्यासाठी काहीतरी नवीन बनवण्याचा आमचा प्रयत्न अखंड सुरू राहील. या सन्मानाबद्दल मी भारतातील आमचे ७५० दशलक्ष हून अधिक ग्राहक, गोदरेज मधील आमचे सहकारी आणि हुरुन इंडिया यांचे आभार मानतो.”

पहाटेचा शपथविधीबाबत फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला ?

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपाची खेळी.

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारून काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे आहेत व त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्याची आज काय अवस्था झाली आहे? कापूस, कांदा, सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि केंद्र सरकार कापसाच्या गाठी आयात करत आहे. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, आमदार सुरक्षित नाहीत, जनता सुरक्षित नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फुसकी सोडून लोकांना मुळ मुद्द्यापासून दुसरीकडे वळवायचे ही भाजपाची खेळी आहे पण जनतेला भाजपाची ही खेळी समजल्याने आता हे चालणार नाही.
२०१९ साली सरकार स्थापनेवेळी काय झाले यावर आज चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला खूप कालावधी लोटला आहे, त्यावर चर्चा करण्याची ही काही वेळ नाही. असेच असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली काय झाले होते तेही सांगावे, त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते, सत्तेसाठी भाजपा काहीही करते. आताही राज्यात असंवैधानिक सरकार आहे, या शिंदे-फडणवीस सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, जनतेचा विश्वासघात केला आहे. महागाईने जगणे कठीण झाले आहे. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. या प्रश्नांवर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे पण त्याकडे हे सरकार लक्ष देत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्षाला अटक करा : चित्रा वाघ

0

पुणे- वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना अटक करण्यात आली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे ,तर इरकल यांच्यावर केवळ गुन्हा दाखल झाल्याची माहिती देखील मिळते आहे.दरम्यान भाजपानेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणातील आरोपी इरकल आणि साथीदारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ट्वीटर वर आपला व्हिडीओ पोस्ट करत केली आहे.

दयानंद इरकल यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ आणि स्पर्श करत मारहाण केल्याची घटना काल रात्री ही घडली होती. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्री पावणे ९ च्या सुमारास घडली.तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी तरुणी ही काल रात्री पुण्यातील सेनापती बापट रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच १२ डी डब्ल्यू ०००१) वाहनाला तिने हॉर्न दिला. हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीला विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चपलेनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 भूकंपग्रस्त तुर्की आणि सीरियाला भारताकडून जीवनरक्षक वैद्यकीय सहाय्य

0

नवी दिल्ली-केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भूकंपग्रस्त सीरिया आणि तुर्किला मानवतावादी वैद्यकीय मदत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी आज एका ट्विट संदेशात एरो आणि सीरियाला पुरविण्‍यात आलेल्या  आपत्कालीन मदत सामग्रीची माहिती  दिली.  “वसुधैव कुटुंबकम् या प्राचीन परंपरेनुसार भारत दोन्ही देशांना मदत करत आहे” असे ते म्हणाले.

सीरिया आणि तुर्किएमधे 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या दोन विनाशकारी भूकंपानंतर 12 तासांच्या आत हिंडन विमानतळांवर 3 ट्रक भरून मदत सामग्रीची व्यवस्था करण्यात आली होती. जीवनरक्षक आपत्कालीन औषधे आणि सुरक्षात्मक वस्तूंचा यात समावेश होता. 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत ट्रक पोहोचायला सुरुवात झाली आणि 04:00 वाजेपर्यंत भारतीय हवाई दलाला (आयएएफ) मदत सामग्री सुपूर्द करण्यास सुरुवात झाली. शेवटचा ट्रक रात्री 09:30 पर्यंत पोहोचला आणि त्याच दिवशी रात्री 10:00 वाजता मदत कार्यासाठी आपत्कालीन मदत सामग्रीसह विमान सीरियाला रवाना झाले. या खेपेत 5,945 टन आपत्कालीन मदत साहित्याचा समावेश होता. त्यात 27 जीवरक्षक औषधे, दोन प्रकारच्या सुरक्षात्मक वस्तू आणि तीन श्रेणीतील महत्वाची काळजीवाहू उपकरणे होती. त्यांची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे.

तुर्की  आणि सीरिया या दोन्ही देशांसाठी 10 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्रीची व्यवस्था करण्यात आली होती.  सीरियासाठी महत्वाची 72 औषधे, उपयुक्त वस्तू आणि 7.3 टन सुरक्षात्मक वस्तूंचा समावेश आहे. त्यांची किंमत 1.4 कोटी रुपये आहे.  तुर्किएसाठी पाठवलेल्या मदत सामग्रीमध्ये 14 प्रकारच्या वैद्यकीय आणि काळजीवाहू उपकरणांचा समावेश आहे. त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.

इलेक्ट्रिक टू – व्हीलर टीम बोल्ट संघाचे राष्ट्रीय पातळीवर यश

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस

पुणे, दि.१४ फेब्रु.भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) गोवा यांनी ०९ ते ११ फेब्रुवारी २०२३ आयोजित केलेल्या सिफेस २३ एक्स अथर इलेक्ट्रिक टू व्हीलर डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग स्पर्धेत भारतातून आलेल्या २५ संघांनी सहभाग घेतला होते. या स्पर्धेत  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या संघाने राष्ट्रीय पातळीवर  प्रथम क्रमांक मिळवून  रु. ३००००/- चे पारितोषिक पटकाविले आहे.
इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज असून या स्पर्धेमधून विध्यार्थाना इलेक्ट्रिक वाहन बनविताना येणार्‍या सर्व सुरक्षा प्रणालींचे चे प्रयोजन करणे बंधनकारक असते. १ किलो वॅट मोटर, ३० अँपिएर  ४८ वोल्ट ची बॅटरी वापरून हे वाहन बनविण्यात आले आहे. या वाहनात अल्कोहोल डिटेक्टर सेन्सर, क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस ब्रेकींग अशीविविध अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आल्या आहेत.
अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील ज्ञान, संघटन कौशल्य, प्रकल्प नियोजन, आर्थिक नियोजन इत्यादी गोष्टी आत्मसात होतात. भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) चे प्राध्यापक आणि अथर या कंपनीचे  चे इंजिनिअर्स यांच्या कडून या इलेक्ट्रिक टू व्हीलर डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंगचे मूल्यांकन स्टॅटिक व डायनॅमिक अशा दोन उपविभागात केल्या गेले. संघ प्रमुख सिद्धांत देशमुख, उप संघ प्रमुख अतुल झा, सदस्य प्रणव जाधव, मयुरेश ओक, दीपेश चारथड व संघाचे इतर सदस्य यांनी अत्यंत कुशाग्रतेने हि गाडी बनविताना अथक परिश्रम घेतले. यांना संघाचे सल्लागार प्रा. आशिष पवार व प्रा. निलेश बिराजदार आणि प्रा. प्रल्हाद पेसोडे याचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. गणेश काकांडीकर, उप विभाग प्रमुख डॉ.दीपक हुजरे आणि डॉ. कुंडलिक माळी व अधिष्ठाता डॉ. दिनेश सेठ यांनी अभिनंदन केले.

विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्राचे १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन

0

पुणे, दि. १४: स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची उन्नती व्हावी यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे मार्फत १७ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान ‘विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्रा २०२३’चे पुणे कॅन्टामेंट बोर्ड गोळीबार मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, पुणे कडून हे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाची योजना असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत (एनआरएलएम) महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या आर्थिक उन्नतीसाठी या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विक्री प्रदर्शने आयोजित करण्यात येतात.

विभागीय स्तरावरील पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांचे विभागीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. यापूर्वीच्या विक्री प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थांना चोखंदळ पुणेकरांची प्रचंड मागणी राहिली आहे. या ‘विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्रा २०२३’ विक्री प्रदर्शनात पुणे महसुली विभागातील जिल्हे व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके सहभागी आहेत. या प्रदर्शनामध्ये १५० स्टॉल उभारणीचे नियोजन असून काही वस्तुंचे व काही खाद्यपदार्थांचे समूह सहभागी होणार आहेत.

सदर प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या महिला सदस्यांची सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृव स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, अभियानांतर्गत गटाचे महत्व, विविध रोजगाराच्या संधीचे महत्व आदी विषयांवरील चर्चा होणार आहेत. या प्रदर्शनात पुणेकरांना ग्रामीण महिला कारागीर व स्वयंसहाय्यता समुहांतील वस्तुंची उत्पादने व अस्सल ग्रामीण चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर खाद्यपदार्थांची खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. होम मिनिस्टर, महाराष्ट्राची लोकधारा व विविध खेळ ही या प्रदर्शनाचे विशेष आर्कषणे आहेत.

पुणेकर नागरिक, सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण महिला समुहांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी भरघोस प्रतीसाद देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

वडगाव पुलावर ट्रकची १० वाहनांना धडक; पोलिसांच्या गाडीलाही उडवलं!

0

पुणे : पुण्यातील वडगाव पुलावर मोठा अपघात घडला आहे. मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रक ने समोर असलेल्या दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे.हा अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघातात काही जण किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे पाहयला मिळाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून खाली येत होता. यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. यात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

व्हॅलेंटाईन डे नाही, मातृ-पितृ दिन साजरा

श्री योग वेदांत सेवा समिती पुणे यांच्यावतीने मातृ-पितृ पूजन
पुणे : भारतीय संस्कृतीत अनेक चांगले सण, उत्सव आहेत. यामध्ये आई-वडिल, गुरू यांना आदर दिला आहे. परंतु काळाच्या ओघात तरुणाईला आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे. व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस तरुणाई उत्साहात साजरी करते, परंतु माता पित्यांचा सन्मान देखील करायला हवा, यासाठी व्हॅलेंटाईन डे ऐवजी पुण्यात मातृ-पितृ दिन व पूजन उत्साहात करण्यात आले.

श्री योग वेदांत सेवा समिती पुणे यांच्यावतीने अखिल मंडई मंडळाच्या प्रांगणात मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साध्वी रेखा बहन यांच्या गीता भागवत सत्संगाचे आयोजन देखील करण्यात आले होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, समिति चे अध्यक्ष चेतन चरवड, सचिव राकेश श्रीवास्तव, मीडिया प्रमुख सचिन परदेशी व इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. 
साध्वी रेखा बहन म्हणाल्या, व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करायला हवा. शाळेमध्ये घराघरांमध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश जायला पाहिजे. आपला दिवसच आपल्या आई-वडिलांपासून चालू होतो, हीच आपली संस्कृती आहे. काळ बदलतो तसे काळासोबत अनेक गोष्टी बदलतात, परंतु आपले संस्कार आपण विसरता कामा नये.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, भारतीय लोक कोणताही विचार न करता अंधानुकरण करतात. अनेकदा याचे दुष्परिणाम देखील होतात. भारत देशात व्हॅलेंटाईन डे  साजरा करण्यापेक्षा मातृ पितृ दिन साजरा करायला पाहिजे. आई वडिलांना परमेश्वर मानून त्यांची पूजा करणे, ही भारत देशाची संस्कृती आहे. भारत देशातील चांगल्या प्रथा पुढे नेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

चेतन चरवड म्हणाले, हा उपक्रम समिती सॅन २००५  पासून साजरा करत आहे. आज संपूर्ण भारतामध्ये आणि 1१५६ देशांमध्ये मातृ पितृ दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकाने याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. 

धारा 2023 “रिव्हर सिटीज अलायन्स” जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह  शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ

पुणे-

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययुए) यांनी पुणे येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या  “धारा” अर्थात शहरी नद्यांसाठी समग्र कृती विषयक उपक्रमाअंतर्गत वार्षिक बैठकीच्या उद्घाटन सत्राला  केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह  शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली 13 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला.    

धारा 2023 ही “रिव्हर सिटीज अलायन्स” च्या सदस्यांची वार्षिक बैठक असून  या माध्यमातून स्थानिक जलस्रोतांचे व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे उपाय जाणून घेण्यासह विचारमंथन करण्याच्या उद्देशाने  सह शिक्षणासाठी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी,  भारतातील 100 सदस्यीय नदी शहरांचे ज्येष्ठ नियोजक तसेच मुख्य अभियंता यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

एनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार,पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, एनआययुएचे संचालक हितेश वैद्य, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरुवातीच्या सत्रात अयोध्या आणि औरंगाबादसाठी नागरी नदी व्यवस्थापन योजना आणि ‘75 रिव्हर इनिशिएटिव्ह्स’ – या विषयावर एक संकलनही सादर करण्यात आले.

नद्या या नेहमीच नागरी सभ्यतेशी  एकरूप होत असतात आणि गेली कित्येक दशके आपण आपल्या जगण्यासाठी या नद्यांचा वापर केल्यानंतर आता आपण या नद्यांना काय देऊ शकतो यावर चिंतन  करण्याची वेळ आली आहे, अन्यथा आपल्या भावी पिढीला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल, असे श्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. आज या कार्यक्रमाला 40 हून अधिक महापालिका आयुक्त उपस्थित आहेत आणि जलस्त्रोतांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी वि-केंद्रीकृत नियोजनाचे महत्त्व याविषयी वचनबद्धता दाखवल्याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर नियोजन उत्तम प्रकारे केले जाऊ शकते आणि म्हणूनच त्यांच्या उपस्थितीला येथे खूप महत्त्व आहे,” असे ते म्हणाले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपण लोकांशी थेट जोडले  जाऊ शकतो आणि पाण्याशी संबंधित कोणत्याही उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ते अत्यंत महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

देश एका निर्णायक काळातून जात असून, स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शेखावत म्हणाले. जग आपल्या विकासाकडे  मोठ्या अपेक्षेने पाहत असून विशेषतः जेव्हापासून भारताने  जी 20 चे अध्यक्षपद ग्रहण केले आहे, तेव्हापासून जगाचे भारताकडे लक्ष आहे, असे ते म्हणाले.

आपल्या जल विषयक उपक्रमांची व्याप्ती केवळ पायाभूत सुविधांच्या  विकासापुरती  मर्यादित न ठेवता लोकांना नद्यांशी जोडण्याचा प्रयत्न आपण जोमाने करायला हवा, असे त्यांनी सांगितले.  आपल्या पूर्वजांच्याकडून चालत आलेल्या  पारंपारिक ज्ञानाचा  भाग म्हणून आणि आता एकेक पिढीनंतर कमी होत गेलेला पाण्याबद्दलचा आदर पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले, “सध्याच्या काळातल्या एका शक्तिशाली साधनाच्या म्हणजे समाज माध्यमांच्या मदतीने   आपणच  ती भावना तरुण पिढीमध्ये निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले

जलशक्ती मंत्रालय प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित पेय जल पुरवण्यासाठी , भूजल व्यवस्थापन आणि पुनर्भरण, एक्वाफर मॅपिंग, नदी पुनरुज्जीवन या सर्व स्तरावर कार्य  करत आहे आणि जलक्षेत्रासाठी  सर्वात जास्त आर्थिक निधी देणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे, असे शेखावत म्हणाले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात  एनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार  यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.  गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “नमामि गंगा कार्यक्रमाची निवड  160 हून अधिक देशांमधून जगातील अव्वल 10 प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून करण्यात आली आहे आणि हेच  नमामि गंगे कार्यक्रमाच्या यशाचे द्योतक आहे.” असे ते म्हणाले.

धारा 2023 च्या पहिल्या दिवशी  ‘भारतातील नदी व्यवस्थापनाची अभिनव उदाहरणे’, ‘नदी व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय केस स्टडीज’, ‘शहरी नदी व्यवस्थापनासाठी अजेंडा मजबूत करणे’, ‘नद्यांसाठी युवा ’, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नदी शहरांचे अनुभव’. या विषयांवर विविध सत्रे आयोजित करण्यात आली होते.

PM मोदींनी माझा अपमान केला,भारतात वडिलांचे आडनाव लावतात हे मोदींना ठावूक नाही काय ? :-राहुल गांधी

वायनाड (केरळ)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अपमान केल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ते मोदींच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख करत म्हणाले – ‘मोदींनी माझे नाव गांधी का आहे, नेहरू का नाही असा प्रश्न केला. हा माझा अपमान आहे. भारतात वडिलांचे आडनाव लावलात. कदाचित हे मोदींना ठावूक नसावे.’

राहुल गांधी केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदार संघातील एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून अदानींचे नाव बाहेर पडत नाही. ते राज्यसभा व लोकसभेत जोरदार भाषण करतात. पण एकदाही अदानींचे नाव त्यांच्या तोंडात आले नाही. याचा अर्थ सरकार या दलदलीत अत्यंत वाईट पद्धतीने फसली आहे. सरकार तपासापासून पळ का काढत आहे.राहुल म्हणाले की, PM स्वतःला खूप ताकदवान समजतात. आपल्याला सर्वचजण घाबरतात असे त्यांना वाटते. पण तसे नाही. आम्ही त्यांना घाबरत नाही. मी संसदेत खरे तेच सांगितले. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. माझा अपमान केल्याने काहीच होणार नाही. सत्य उजेडात आल्याशिवाय राहणार नाही.

राहुल म्हणाले की, माझा चेहरा पाहा व जेव्हा ते बोलतात त्यांचा चेहरा पाहा. त्यांनी बोलताना कितीदा पाणी पिले हे पाहा. पाणी पितानाही त्यांचा हात थरथर कापत होता. माझ्या भाषणातील एक भाग संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला. पण पंतप्रधानांचा एकही शब्द वगळण्यात आला नाही. मी कुणाचाही अपमान केला नाही. याऊलट मी जे म्हणालो त्यासंबंधी मला पुरावे दाखवण्याची नोटीस बजावण्यात आली. मी यासंबंधी लोकसभेच्या अध्यक्षांना एक पत्रही लिहिले आहे.

या देशातील प्रत्येकाने संसदेचे कामकाज पाहून देशात काय चालले आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे राहुल म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले- काही दिवसांपूर्वी मी संसदेत पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. मी माझा मुद्दा अतिशय सभ्य व आदरपूर्वक मांडला. मी कोणतीही असभ्य भाषा वापरली नाही. कुणाला शिवीगाळही केली नाही. मी केवळ वस्तुस्थिती मांडली.

अदानींसाठी नियमांत बदल

मी केवळ अदानी कशाप्रकारे पंतप्रधान मोदींसोबत परदेश दौऱ्यांवर जातात. त्यानंतर लगेचच त्यांना त्या-त्या देशांत कंत्राट मिळतात हे सांगितले. अदाीनंना एअरपोर्ट मिळण्यासाठी नियमांत बदल करण्यात आले. पूर्वी ज्या लोकांकडे विमानतळाच्या संचलनाचा कोणताही अनुभव नव्हता, त्यांना अर्ज करता येत नव्हता. पण अदानींना हे काम मिळण्यासाठी या नियमांत दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अदानींना विमानतळ संचलनाचा कोणताही अनुभव नसताना हे काम मिळवण्यासाठी अर्ज करता आला.नीती आयोग व अन्य संस्थांनी यावर भाष्य केले. त्यांनी अनुभव नसणाऱ्यांना परवानगी न देण्याची भूमिका घेतली. पण त्यानंतरही सरकारने त्यांना परवानगी दिली. श्रीलंकेतील एका अधिकाऱ्यानेही मोदींनी अदानींना बंदराचा ठेका देण्यासाठी दबाव टाकल्याचे मान्य केले आहे.

अदानी व पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात. त्यानंतर भारताताली स्टेट बँक अदानींना एका खाण प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देते. माझ्या भाषणानंतर हा उल्लेख संसदेतील कामकाजातून वगळण्यात आला.

अदानी व अंबानी यांचे एकत्र नाव घेणे पंतप्रधानांचा अवमान मानले गेले. पण तुम्ही इंटरनेटवर पंतप्रधान व या दोघांचे फोटो एकत्र पाहू शकता. पंतप्रधान कोणत्याही परदेश दौऱ्यावर गेले, तरी अदानी तिथे जादूने पोहोचतात. मी जे म्हटले ते सर्वकाही इंटरनेवर उपलब्ध आहे. तुम्ही हे गुगलला विचारा. ते तुम्हाला सर्वकाही सांगेल.

BBCच्या दिल्ली-मुंबई कार्यालयावर ITचे छापे:60 ते 70 जणांचे पथक

0

दिल्ली-BBCच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (IT) छापेमारी केली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, 60 ते 70 अधिकाऱ्यांचा समावेश असणारे आयटी विभागाचे एक पथक मंगळवारी सकाळीच बीबीसीच्या कार्यालयात धडकले. त्यानंतर त्यांनी तातडीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन बंद केले. तसेच कार्यालयाबाहेर येण्या-जाण्यावरही बंदी घातली. BBC इंडियाच्या मॅनेजमेंटने या छाप्याची माहिती लंडन स्थित मुख्यालयाला दिली आहे.

प्राप्तिकर विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, BBCवर आंतरराष्ट्रीय करात अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी हा सर्व्हे केला जात आहे. प्राप्तिकर विभाग किंवा BBCने या छापेमारीवर अद्याप अधिकृत निवेदन केले नाही. पण काँग्रेसने एका ट्विटद्वारे यासंबंधी केंद्रावर टीका केली आहे. काँग्रेसने ट्विट केले – ही अघोषित आणीबाणी आहे.

बीबीसीच्या माहितीपटामुळे देशात खळबळ

बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

0

मुंबई, दि. 13 : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टँकर असोसिएशन यांना केले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक घेऊन मुंबईतील पाणी टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करु, पण तत्पूर्वी टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.

बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशीही यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा करुन लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील टँकर्सनी अचानक लोकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. या टँकरधारकांशी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यास शासन कधीही तयार आहे. त्यामुळे टँकरधारकांनी लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत केले. टँकरधारकांच्या प्रश्नासंदर्भात उद्या सकाळी पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे या चर्चेत निश्चित करण्यात आले.