वायनाड (केरळ)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अपमान केल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ते मोदींच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख करत म्हणाले – ‘मोदींनी माझे नाव गांधी का आहे, नेहरू का नाही असा प्रश्न केला. हा माझा अपमान आहे. भारतात वडिलांचे आडनाव लावलात. कदाचित हे मोदींना ठावूक नसावे.’
राहुल गांधी केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदार संघातील एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून अदानींचे नाव बाहेर पडत नाही. ते राज्यसभा व लोकसभेत जोरदार भाषण करतात. पण एकदाही अदानींचे नाव त्यांच्या तोंडात आले नाही. याचा अर्थ सरकार या दलदलीत अत्यंत वाईट पद्धतीने फसली आहे. सरकार तपासापासून पळ का काढत आहे.राहुल म्हणाले की, PM स्वतःला खूप ताकदवान समजतात. आपल्याला सर्वचजण घाबरतात असे त्यांना वाटते. पण तसे नाही. आम्ही त्यांना घाबरत नाही. मी संसदेत खरे तेच सांगितले. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. माझा अपमान केल्याने काहीच होणार नाही. सत्य उजेडात आल्याशिवाय राहणार नाही.
राहुल म्हणाले की, माझा चेहरा पाहा व जेव्हा ते बोलतात त्यांचा चेहरा पाहा. त्यांनी बोलताना कितीदा पाणी पिले हे पाहा. पाणी पितानाही त्यांचा हात थरथर कापत होता. माझ्या भाषणातील एक भाग संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला. पण पंतप्रधानांचा एकही शब्द वगळण्यात आला नाही. मी कुणाचाही अपमान केला नाही. याऊलट मी जे म्हणालो त्यासंबंधी मला पुरावे दाखवण्याची नोटीस बजावण्यात आली. मी यासंबंधी लोकसभेच्या अध्यक्षांना एक पत्रही लिहिले आहे.
या देशातील प्रत्येकाने संसदेचे कामकाज पाहून देशात काय चालले आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे राहुल म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले- काही दिवसांपूर्वी मी संसदेत पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. मी माझा मुद्दा अतिशय सभ्य व आदरपूर्वक मांडला. मी कोणतीही असभ्य भाषा वापरली नाही. कुणाला शिवीगाळही केली नाही. मी केवळ वस्तुस्थिती मांडली.
अदानींसाठी नियमांत बदल
मी केवळ अदानी कशाप्रकारे पंतप्रधान मोदींसोबत परदेश दौऱ्यांवर जातात. त्यानंतर लगेचच त्यांना त्या-त्या देशांत कंत्राट मिळतात हे सांगितले. अदाीनंना एअरपोर्ट मिळण्यासाठी नियमांत बदल करण्यात आले. पूर्वी ज्या लोकांकडे विमानतळाच्या संचलनाचा कोणताही अनुभव नव्हता, त्यांना अर्ज करता येत नव्हता. पण अदानींना हे काम मिळण्यासाठी या नियमांत दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अदानींना विमानतळ संचलनाचा कोणताही अनुभव नसताना हे काम मिळवण्यासाठी अर्ज करता आला.नीती आयोग व अन्य संस्थांनी यावर भाष्य केले. त्यांनी अनुभव नसणाऱ्यांना परवानगी न देण्याची भूमिका घेतली. पण त्यानंतरही सरकारने त्यांना परवानगी दिली. श्रीलंकेतील एका अधिकाऱ्यानेही मोदींनी अदानींना बंदराचा ठेका देण्यासाठी दबाव टाकल्याचे मान्य केले आहे.
अदानी व पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात. त्यानंतर भारताताली स्टेट बँक अदानींना एका खाण प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देते. माझ्या भाषणानंतर हा उल्लेख संसदेतील कामकाजातून वगळण्यात आला.
अदानी व अंबानी यांचे एकत्र नाव घेणे पंतप्रधानांचा अवमान मानले गेले. पण तुम्ही इंटरनेटवर पंतप्रधान व या दोघांचे फोटो एकत्र पाहू शकता. पंतप्रधान कोणत्याही परदेश दौऱ्यावर गेले, तरी अदानी तिथे जादूने पोहोचतात. मी जे म्हटले ते सर्वकाही इंटरनेवर उपलब्ध आहे. तुम्ही हे गुगलला विचारा. ते तुम्हाला सर्वकाही सांगेल.