दिल्ली-BBCच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (IT) छापेमारी केली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, 60 ते 70 अधिकाऱ्यांचा समावेश असणारे आयटी विभागाचे एक पथक मंगळवारी सकाळीच बीबीसीच्या कार्यालयात धडकले. त्यानंतर त्यांनी तातडीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन बंद केले. तसेच कार्यालयाबाहेर येण्या-जाण्यावरही बंदी घातली. BBC इंडियाच्या मॅनेजमेंटने या छाप्याची माहिती लंडन स्थित मुख्यालयाला दिली आहे.
प्राप्तिकर विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, BBCवर आंतरराष्ट्रीय करात अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी हा सर्व्हे केला जात आहे. प्राप्तिकर विभाग किंवा BBCने या छापेमारीवर अद्याप अधिकृत निवेदन केले नाही. पण काँग्रेसने एका ट्विटद्वारे यासंबंधी केंद्रावर टीका केली आहे. काँग्रेसने ट्विट केले – ही अघोषित आणीबाणी आहे.
बीबीसीच्या माहितीपटामुळे देशात खळबळ
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.