Home Blog Page 1411

पुण्याच्या कॉंग्रेस भवनात आनंदोत्सव

पुणे-  मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर या घटनेचा आनंद व्‍यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ‘आनंदोत्सव’ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना साखर व पेढे भरवून आनंद व्‍यक्त केला. यावेळी ‘देश की आंधी राहुल गांधी’ या घोषणा देण्यात आल्या.

      काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दिलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने राहुल गांधी यांना खासदार म्हणून लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणाले की, ‘‘विरोधकांना संपविण्यासाठी भाजपाने जी हुकूमशाही चालविली आहे त्याला आज सुप्रिम कोर्टाने चाप लावला आहे. संसदेमध्ये अदानी, अंबानी यांच्या विरोधात आवाज उठवू नये म्हणून सुडबुध्दीने केलेली कारवाई सुप्रिम कोर्टाने आज हानून पाडली

      यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,अजीत दरेकर, लता राजगुरू, संगीता तिवारी, सुनिल शिंदे, मेहबुब नदाफ, सुधीर काळे, प्रकाश पवार, राहुल शिरसाट, राजाभाऊ कदम, अजित जाधव, बळिराम डोळे, विशाल जाधव, अशोक जैन, रवि आरडे, विशाल गुंड, गुलामहुसेन खान, सिमा महाडिक, रेखा गेलोत, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्‍हाळ, संजय डोंगरे, इम्रान शेख, आशिष जाधवराव, अक्षय जैन, फैय्याज शेख, नितीन परतानी, मनिषा ओव्‍हाळ, सुनिता खरात, परवेज तांबोळी, बाबा सय्यद, सचिन बहिरट, युवराज मदगे, विजय जगताप, ॲन्थोनी आय, अजित थेरे, गौतम जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

किणी व तासवडे येथील टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोल वसुलीचा प्रश्न विधानसभेत

राज्यातील पथकर संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

             मुंबईदि.4 :  राज्यातील पथकर (टोलवसुली) संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे येथील टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोल वसुली होत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीसातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून सन २००६ मध्ये पूर्ण झाले आहे. या करारानुसार जून २०२२ पर्यंत टोल आकारणी सुरू होती. त्यानंतर सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. किणी टोल नाका येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत व तासवडे टोल नाका येथे सवलतीच्या दरात टोल आकारणी सुरू आहे. राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी  टोल आकारणी संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक लवकरच घेण्यात येईल आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाणपृथ्वीराज चव्हाणराजेश पवाररोहित पवारबाळासाहेब पाटीलशिवेंद्रसिंह भोसलेप्रकाश आबिटकर  यांनी सहभाग घेतला.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 04 :- वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे होणाऱ्या मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसाह्यात वाढ करण्यात आली आहे. व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महसूल व वन विभागाने 3 ऑगस्ट, 2023 रोजी निर्गमित केला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सध्याच्या आर्थिक तरतुदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक साहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणी होत होती. त्या अनुषंगाने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या आर्थिक मदतीत वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दिनांक 03 रोजी त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार प्रति व्यक्ती, अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

वाघ,  बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तीला खासगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी रुपये 10 लाख देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लाख पाच वर्षांकरिता मुदत ठेव म्हणून ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये 10 वर्षाकरिता मुदत ठेवीत ठेवावेत. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार माधुरी मिसाळ आक्रमक

मुंबई-वर्गात शिक्षक शिकवायला येत नाहीत, मुला – मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्य आणि सुरक्षिततेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत अशी टीका करीत, पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला.

शिक्षकांची रिक्त पदे, खाजगी संस्थांशी कराराद्वारे चालविले जाणारे वर्ग, खाजगी संस्थांना चालवायला दिलेली क्रीडांगणे, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची असुविधा, रखवालदार आणि सुरक्षा रक्षक जागेवर नसणे, विद्युत व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसणे, परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधी आदी समस्यांवर लक्षवेधी सूचनेद्वारे मिसाळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून शिक्षण मंत्र्यांनी या शाळांना अचानक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी. ज्या शाळा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘ शिक्षण विभागाच्या गैरकारभारामुळे निर्माण झालेल्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नसून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आठवी ते दहावीचे माध्यमिक विभागाचे वर्ग खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविले जातात. या संस्थांचे शालाव्यवस्थापन समाधानकारक नाही. माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या नियुक्त्या खासगी संस्था कंत्राटी पद्धतीने करतात. या नियुक्त्या करताना शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे यासंस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यात अपयशी ठरतात. या माध्यमिक शाळांची जबाबदारी राज्य सरकार किंवा महापालिकांनी घ्यावी. ‘

सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीला उत्तर दिले. सामंत म्हणाले, ‘ पुणे महापालिका शिक्षण विभागाकडे एकूण २७२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या १८५, इंग्रजी माध्यमाच्या ५२, उर्दू माध्यमाच्या ३३ आणि कन्नड माध्यमाच्या २ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २४२५ शिक्षकांच्या पदांना मान्यता असून, त्यापैकी ३५२ पदे रिक्त आहेत. समाविष्ट ३४ गावांमधील जिल्हा परिषदेच्या ६६ प्राथमिक शाळा महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘

सामंत म्हणाले, ‘ माध्यमिक विभागाच्या २६ शाळा चालविल्या जातात, या शाळांसाठी २०५ शिक्षक पदे मंजूर आहेत. परंतु केवळ ७५ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या १३० इतकी आहे. २०१ ९ पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती झालेली नाही. उच्च न्यायालयाची मनाई असल्याने ही भरती झाली नाही. आता न्यायालयाने भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून, पुढील काही दिवसांत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात शिक्षकांच्या ३० हजार जागा भरण्यात येणार आहेत. ‘ सामंत पुढे म्हणाले, ‘ मिसाळ यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. पर्वती विधानसभा मतदारसंघातील सरसेनापती हैबतराव शिळीमकर शाळा, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, सिताराम आबाजी बिबवे इंग्रजी माध्यमिक शाळांची गैरसोयींची माहिती घेतली जाणार आहे. शाळांना अचानक भेटी देऊन ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मिसाळ यांची सूचना मान्य करीत आहोत. माध्यमिक शाळांनी राज्य सरकारची मान्यता घ्यावी यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार आहेत.

आयएमडीआरमध्ये संशोधन केंद्रसुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरूवात

0

पुणे-व्यवस्थापन शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या ( आयएमडीआर ) माध्यमातून या पुढे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संशोधनावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशने ( एआयसीटीई ) मान्यता दिली असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ( डीईएस ) अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

आयएमडीआरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची आजपासून सुरूवात झाली. या वेळी डॉ. कुंटे बोलत होते.

संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्राहम थॉमस यांचे ‘ व्यवस्थापन शिक्षणाचे भवितव्य व त्याचे जागतिक उद्योग क्षेत्र घडविण्यात योगदान ‘ या विषयावरील व्याख्यान या निमित्त आयोजित करण्यात आले होते.

आयएमडीआरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आठवले, संचालिका डॉ. शिखा जैन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. श्रुती नागर यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. प्राजक्ता प्रधान यांनी आभार प्रदर्शन केले.

महावितरणच्या झटपट वीज कनेक्शन मोहिमेचा एक महिन्यात आठ हजार ग्राहकांना लाभ

मुंबई दि.४ ऑगस्ट २०२३: नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण ८०६३ वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले . यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या ५१० असून ३७७५ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात कनेक्शन मिळाले . ग्रामीण भागात ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे ४८ तासात कनेक्शन मिळाले तर ३१६२ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात वीज जोडणी मिळाली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याचा भाग म्हणून महावितरणने जून महिन्यात दहा दिवसात एक लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली. आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज कनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम चालू आहे.

ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासात कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला. राज्यभरात अशा एकूण ३७७५ ग्राहकांना जुलै महिन्यात लाभ झाला. महावितरणकडे अर्ज केल्यानंतर सूचना मिळाल्यावर तातडीने शुल्क भरणाऱ्या ५१० ग्राहकांना अर्ज केल्याच्या दिवशीच नवीन कनेक्शन मिळाले.

ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन ४८ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ग्राहकांनी तातडीने शुल्क भरले अशा ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळाले. तर अर्ज केल्यानंतर आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या ३१६२ आहे.

शेतकऱ्यांनाही झटपट कनेक्शन – कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे. जुलै महिन्यात राज्यात १२२७ शेतकऱ्यांना झटपट वीज कनेक्शन मिळाली. त्यापैकी ७४ शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच तर ४९३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ११७ आहे तर ५४३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळाले.

विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि सायकल कशी सर्वाधिक सोयीस्कर ठरेल यासाठी प्रशासनाने उपक्रम राबवावे – विक्रम कुमार

शालेय विद्यार्थी प्रवास योजना या अभिनव उपक्रमाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे -विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांपेक्षा कितीतरी पटीने सार्वजनिक वाहतूक आणि सायकल कशी सर्वाधिक उत्तम आणि सोयीस्कर ठरेल यासाठी प्रशासनाने उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी येथे केले.

महानगरपालिका पथ विभागाने मागील वर्षी शालेय विद्यार्थी प्रवास योजना हा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. विद्यार्थ्यांना शाळेत व परत घरी सुरक्षित व स्वतंत्र पणे प्रवास करता यावा यासाठी ही योजना राबविली गेली. त्याच्या पहिल्या टप्यात ३ विद्यार्थी प्राधान्य झोन निवडण्यात आले व तेथील प्रत्येकी ३ अश्या ९ शाळांच्या रस्त्यांवर ही योजना प्रायोगिक पद्धतीने राबविली गेली. खराडी झोन मध्ये EON ज्ञानांकुर शाळा, राजाभाऊ पठारे शाळा व PDEA शाळा , पर्वती झोन मध्ये राजीव गांधी विद्यालय , मुक्तांगण शाळा व सिटी प्राइड शाळा व डेक्कन झोनमधील गरवारे प्रशाला, पंडित आगाशे शाळा व सिम्बोयसीस विद्यालय या शाळांचे प्राचार्य उपस्थित होते व त्यांनी प्रमाणपत्र स्विकारले, पुढील टप्यात प्रायोगिक शाळांभोवती कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी व त्या स्वरूपाचे उपाय शहरातील इतर शाळां भोवती करण्या साठी एक मार्गदर्शक पुस्तिका आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. विकास ढाकणे व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ)श्री. कुणाल खेमनार , पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी , अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, वाहतुक नियोजक निखिल मिजार हे उपस्थित होते.
शाळांचे प्राचार्य, या योजनेत काम करणारे ३ विजेते व महापालिकेला मदत करणार्या् स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या योजनेत पुढे जास्तीत जास्तं विद्यार्थी कसे स्वतंत्रपणे सार्वजनिक वाहतुक व सायकलने प्रवास करतील या साठी शाळांनी सहभाग घ्यावा व अश्याच अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतंत्र पणे खासगी वाहन विरहित प्रवास करण्यासाठी उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी केले.

देशातील हुकूमशाही शक्तींच्या पुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसचा राज्यभर मिठाई वाटून जल्लोष.

मुंबई, दि. ४ ऑगस्ट
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे मागील ९ वर्षापासून देश पहात आहे. राहुलजी गांधी हे सातत्याने केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारत होते. राहुलजी यांच्यामुळे मोदी सरकारची कोंडी होत होती. संसदतेच राहुलजी गांधी यांनी मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीची चिरफाड केली होती. यातूनच राहुलजी यांच्याविरोधात भाजपाने षडयंत्र रचले व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांची खासदारी रद्द करण्यात आली व शिक्षा सुनावताच अवघ्या २४ तासात त्यांना सरकारी निवासस्थानही सोडण्यास सांगितले होते. यामागे भाजपाचा हात आहे हे उघड दिसत होते. राहुलजी गांधींना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी भाजपाने ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाज कष्टकरी व स्वाभिमानी आहे. निरव मोदी, ललित मोदी जनतेचा पैसा लूटून परदेशात पळून गेले, त्यांच्यावर भाजपाने कारवाई केली नाही उलट मोदी आडनावावरून ओबीसी समाजालाच चोर ठरवण्याचा भाजपाचा डाव होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने मात्र भाजपाचा हा डाव हाणून पाडला गेला.

भाजपा खासदारांवर बलात्कार, खूनासारखे गंभीर गुन्हे असतानाही त्यांच्यावर कारावई केली जात नाही मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तात्काळ कारवाई केली जाते. कर्नाटकातील एका प्रचार सभेतील विधानाचा आधार घेत गुजरातच्या सुरत न्यायालयात तक्रार दाखल केली जाते. व राहुलजी गांधी यांची खासदारी रद्द होती हा घटनाक्रम भाजपाचे राहुलजी गांधी यांच्याविरोधातील षडयंत्र उघड करण्यास पुरेशी आहे. मोदी सरकारला देशातभरात थेट भिडणारा नेता राहुलजी गांधीच आहेत म्हणून त्यांना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला चपराक लगावली आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी देशातील हुकूमशाही वृत्तीविरोधात लढत राहील, असेही नाना पटोले म्हणाले.
राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचा आनंद काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर व्यक्त केला. तसेच राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटत जल्लोष केला.

महागाई कमी करण्याबाबत सरकारकडे धोरण नाही, शेतकरी, कामगारांचे जगणे कठीण.

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही :- नाना पटोले

पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले.

मुंबई, दि. ४ ऑगस्ट
पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार रुपयांच्या पगारात शहरातील कुटुंबाला खर्च परवड नाही. नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. हे शेतकरीविरोधी सरकार असून केवळ घोषणा केल्या जात आहेत. अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.


विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महागाई दिवसेंदिवस वाढत असून लोकांचे जगणे महाग झाले आहे, याचा सत्ताधारी आंनद व्यक्त करत आहेत का? महागाईवर या सरकारकडे काय उत्तर आहे. राज्यस्थान सरकार ५०० रुपयात सिलिंडर देते महाराष्ट्र सरकार सिलिंडरचे दर कमी करणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. राजस्थान सरकारने १० लाखापर्यंत खाजगी व शासकीय ह़ॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय केली आहे, सरकराने ती जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी कागदपत्रे जोडावी लागत नाहीत. मोफत आरोग्य देणे हे सरकारचे काम आहे. या सरकारने शासकीय रुग्णालयात सर्व उपचार मोफत देण्याची घोषणा केली, यात नवे काय? सरकारी रुग्णालयात मोफतच उपचार होतात. पण सरकारी दवाखानेच आजारी पडलेले आहेत, मशिनरी आहेत पण डॉक्टर व नर्सेस नाहीत अशी अवस्था आहे आपल्या आरोग्य विभागाची. सरकार आरोग्याचा कायदा करून प्रत्येक व्यक्तीला खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देणार असा कायदा आणणार आहे का, ह्याचे उत्तर दिले पाहिजे.
महागाई कमी करण्यात राज्य व केंद्र सरकारकडे धोरण नाही. राज्य सरकारने विद्युत दर वाढवले आहेत. दोन बल्ब असणाऱ्यांनाही हजाराचे बील येत आहे. शेतकऱ्यांचे तर बेहाल सुरु आहेत, १२ तास वीज देण्याची घोषणा सरकारने केली पण ८ तासही विज मिळत नाही. शेतातील उभी पीकं जळून जात आहेत. विद्यूत डीपी बसवण्याबाबतही राज्य सरकारची अन्यायी व्यवस्था आहे. शेतकऱ्याला मदत मिळत नाही, त्याच्या तोंडाचा घास हिरावून घेतला जात आहे. हे सरकार आंधळे व बहिरे सरकार आहे.
सामाजिक न्यायाच्या बाबतीतही गोंधळच आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा सरकारने केली पण परिस्थिती काय आहे. मुंबई विद्यापीठातील लॉ अकादमीच्या दोन मुलींना हॉस्टेलमध्ये जागा नाही म्हणून हाकलून लावले. त्या मुली ओबीसी कोट्यातून आल्या होत्या. ग्रामीण भागातून मुंबईत शिकण्यासाठी आलेल्या मुलींना हाकलून लावता हा ओबीसीवरचा अत्याचार आहे. भटके, विमुक्त, आदिवासींवरही हे सरकार अन्याय करत आहे. चर्चगेट येथील सावित्रिबाई फुले हॉस्टेलमध्ये एका मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली त्यानंतर मुलींच्या सुरक्षेवर ठोस भूमिका सरकारने घ्यायला हवी होती पण तीही घेतली नाही.

कोरोना काळात रेमडिसीवरचा काळाबाजार सुरु होता, हे इंजेक्शन ५० हजारापासून एक लाख रुपयांना विकले जात होते. रेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या गुजरातच्या उद्योगपतीला पोलीस स्टेशनमधून सोडवण्यासाठी रात्री २ वाजता कोण गेले होते हे सर्वाना माहित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ डिसेंबर २०१९ ला कोविडचा इशारा दिला होता, देशाच्या सीमा सील करण्यास सांगितले. राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही इशारा दिला होता पण भाजपा सरकारने त्यांची थट्टा केली. भाजपा सरकार मात्र गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प करण्यात मस्त होते, कोविड आला त्यावेळी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवण्यास सांगितले. ताट वाजवले तर घरात द्रारिद्र्य येते असे संगितले जाते. भाजपाने थाळ्या वाजवून देशात दारिद्र्य आणले. रेल्वे बंद, बस बंद, विमान सेवा बंद केली आणि हजारो किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागली, त्यात शेकडो लोक मरण पावले, त्यातही भाजपाने हिंदू-मुस्लीम राजकारण केले. कोविड मध्ये मोदी सरकारने जनतेला सुविधा दिल्या नाहीत.
विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर सरकार म्हणून राज्याच्या प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. हे जनतेचे प्रश्न आहेत. तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधकांना पूर्ण वेळ मिळाला नाही ही खंत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 4 :- मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी म्हाडाच्या इमारतींच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्याबाबत तसेच संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने त्यांची घरे मिळण्याकरिता कार्यवाही करण्यासंदर्भातील लक्षवेधी मांडली.

याबाबत अधिक माहिती देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले की, दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) येथील एकूण 44 भाडेकरू / रहिवाशांपैकी 35 भाडेकरूंनी मंडळाकडे कागदपत्रे जमा केली. यापैकी 34 भाडेकरू यांना देकारपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित एक भाडेकरू यांचे नाव सोडतीमध्ये नसल्यामुळे त्यांना देकारपत्र देण्यात आले नाही. 34 भाडेकरूंपैकी सहा भाडेकरू यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे पुनर्रचित गाळ्यांचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित 28 पैकी 12 प्रकरणे ही खरेदी विक्रीची असून त्याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत सादर न केल्याने व उर्वरित 16 प्रकरणे ही वारसाहक्काची असल्याने वारसाहक्क प्रमाणपत्र / नोंदणीकृत हक्कसोड प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना ताबा देण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सचिन अहिर, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

‘महाडीबीटी’ मार्फत मिळणारा लाभ नाकारता येण्यासाठी;दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई, दि. 4:- राज्य शासनामार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत अनुदानाचे थेट हस्तांतरण करण्यात येते. मात्र एकदा मिळालेले अनुदान परत करण्यासंदर्भात व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही त्यांना ते नाकारता येण्यासाठी दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत या प्रश्नी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी ‘पहल’ सुविधा निर्माण केली होती. या अंतर्गत अनुदानाची आवश्यकता नसणाऱ्या महाराष्ट्रातील 16 लाख 52 हजार लाभार्थ्यांनी आपले अनुदान नाकारले. या योजनेचे सर्वत्र कौतुक झाले. यामुळे एक वेगळा, चांगला पायंडा पडला. या योजनेत नाकारलेले अनुदान इतर गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मिळू शकते. राज्य शासनामार्फत विविध योजनांचे अनुदान ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून दिले जाते. मात्र ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही त्यांना अनुदान नाकारण्यासाठी कोणतीही व्यवस्था पोर्टलमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वित्त विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधून अनुदान नाकारण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. ही प्रक्रीया जलद गतीने राबवून येत्या दोन महिन्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत,96 तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार-मंत्री धनंजय मुंडे

मुंबई – शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे बोलत होते.
कृषीमंत्री मुंडे म्हणाले की,अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे,मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देण्यास बहुतांश शेतकरी असमर्थ ठरतात. अशावेळी या कालावधीत आणखी काही तासांची वाढ करून हा कालावधी किमान 96 तास केला जावा, म्हणून केंद्र सरकार कडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.
सन 2022 च्या हंगामात एकूण विमाधारक शेतकऱ्यांना 3180 कोटी इतकी पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 3,148 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांची विम्याची रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कमीत कमी एक हजार रुपये मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळणारी रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यात उर्वरित रक्कम राज्य शासन देईल व शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा हा निश्चित मिळेल, अशी घोषणाही मंत्री श्री. मुंडे यांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविणार

मुंबई, दि. 04 : पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्या माधुरी मिसाळ यांनी पुणे महापालिकेच्या शाळांच्या समस्यांबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या एकूण 272 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी मराठी माध्यमाच्या 185, उर्दू माध्यमाच्या 33, इंग्रजी माध्यमाच्या 52 व कन्नड माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण शिक्षकांची मंजूर पदे 2,425 असून त्यामधील 352 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येतील. ज्या शाळांमध्ये मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह नाहीत. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय केळकर यांनी सहभाग घेतला.

ओबीसी शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनियमितेची तपासणी करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.4 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने आढळलेली अनियमितता तपासण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रादेशिक उपसंचालक या पदावरील नियुक्ती रद्द करण्याबाबत सदस्य आमश्या पाडवी व सचिन अहीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2023 पर्यंत याबाबत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे म्हणाले की, या विभागातील रिक्त पदे भरण्याच्या पार्श्वभूमीवर 19 एप्रिल 2022 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समितीवर कार्यरत अधिकाऱ्यांपैकी ज्या अधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागात प्रतिनियुक्तींची इच्छुकता दर्शवली होती, त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या.

राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट;विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात 109 देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार 825 कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर आल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 259 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर तसेच सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर एकत्रित उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.

कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य

कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन हा अधिक महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला सुरक्षित वाटणे महत्त्वाचे असते. मुंबई ही इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना अधिक सुरक्ष‍ित वाटते. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. राज्यात दर लाख गुन्ह्यांमागे भादंविच्या गुन्ह्यांचे प्रमाणे 294.3 इतके आहे. यात राज्याचा क्रम देशात दहावा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यात यावर्षी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यामध्ये 5,493 गुन्ह्यांची घट आहे. महिला आणि बालकांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. तर, बाललैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक 17 व्या क्रमांकावर आहे. महिला बेपत्ता होण्याची विविध कारणे आहेत, त्यात परत आलेल्या महिलांचे प्रमाण सरासरी 90 टक्क्यांपर्यंत जाते. हे प्रमाण 96-97 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महिला परत येण्याचे हे प्रमाण 10 टक्के जास्त आहे. बालकांच्या बाबत राज्याने केलेली कामगिरी चांगली आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’च्या माध्यमातून 34 हजारांपेक्षा अधिक बालकांना त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्यात यश आले असून हे प्रमाण 96 टक्क्यांपर्यंत जाईल. हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या या कामगिरीचा केंद्र सरकारने संसदेत केला आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पोलिसांचे विशेष अभिनंदन केले.

महिला अत्याचारासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल

महिला अत्याचारासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल होऊन 60 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ते केले जाऊन गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अपहरणासंदर्भात राज्याचा क्रमांक 10 वा असून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण होणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात गुन्हेगारांवर जरब आणण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. अंमलीपदार्थांचा अंमल सर्वत्र वाढताना दिसत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून संयुक्त कारवाई सुरू असून शाळांच्या परिसरातील टपऱ्या उध्वस्त केल्या जात आहेत. कुरियर आणि पोस्ट ऑफिसमध्ये तसेच बंदरांवर स्कॅनर लावण्यात आले आहेत. अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंमलीपदार्थ बाळगण्यासंदर्भातील कायद्यात बदल करण्याची विनंती केंद्राला केली असल्याचे ते म्हणाले. कफ सिरपचा दुरूपयोग होत असल्याने औषधी दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले असून अवैध दारू विक्री, जुगार यावरही कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलाची रचना बदलण्यात येत आहे. आता 2023 नुसार नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून शहरी भागात दोन पोलीस स्थानकांमधील अंतर चार किमीपेक्षा अधिक नसेल तर ग्रामीण भागात ते 10 किमीपेक्षा अधिक नसेल. पोलिसांच्या 18 हजार 331 पदांची भरती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस स्थानकांची निर्मिती करण्यात येत असून आदर्श कार्यप्रणाली लागू करण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागात 57 कोटींचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. डायल 112 मुळे प्रतिसादाची वेळ कमी झाली असून आता 8.14 मिनिटांवर आला आहे. सीसीटीएनएस-2 चे काम सुरू झाले आहे. यामुळे मोबाईल ॲपद्वारे काम होणार असून केस डायरी डिजिटल होणार आहे. यामुळे माहिती देखील तत्काळ उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलिसांनी केलेल्या कामाचा देखील उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौतुक केले. राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचा दर वाढला असून खून, बलात्कार, दंगली यामध्ये एकूण दर 97 टक्क्यांपर्यंत गेला आहे. काही घटकांनी 100 टक्के दर गाठला असून त्यांचे श्री.फडणवीस यांनी अभिनंदन केले.

अन्य विषयांबाबत माहिती देताना श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यात मागील वर्षात एक लाख 27 हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली असून एक लाख 62 हजार 317 इतका रोजगार उपलब्ध होणार आहेत. बारसू येथील रिफायनरी राज्याच्या हिताची असून नागरिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला ही वस्तुस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाचे पोस्टर्स, मिरवणुकी, स्टेटस हा योगायोग नाही, असे सांगून तो देशातील मुस्लिमांचा हिरो कधीच होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. धर्म आणि जातीच्या आधारे भेदभाव करणार नाही. तथापि, औरंगजेबाचे महिमामंडन केले तर ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हा आयोगाचा विषय

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हा निवडणूक आयोगाचा विषय असून याबाबत एकत्रित विनंती करू, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील सुशोभिकरणाची कामे नियमित सुरू असून याचा जी-20 सोबत संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरी रस्त्यांवर पुनर्पृष्ठीकरण करण्यात येत असून काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर खड्डयांचा प्रश्न संपेल, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू असून पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजना सुरू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत बाजारभावापेक्षा कमी दराने आणि तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या करारासह प्रायोगिक तत्वावर केवळ 200 सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन घेण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

कुपोषणाची टक्केवारी खाली येत आहे

कुपोषणाबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बालकांमधील तीव्र कमी वजनाची टक्केवारी राज्यात 2021 मध्ये 1.43 टक्के होती. मार्च 2022 मध्ये ती 1.24 टक्के तर मार्च 2023 मध्ये 1.22 टक्के होती. ही टक्केवारी खाली येत असून आदिवासी बहुल 16 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी होत आहे. घरपोच आहारसारख्या विविध योजना राबवून बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थलांतरितांना सुद्धा योजनांचा लाभ दिला जात आहे. गृहनिर्माण प्रकल्पांबाबत बोलताना रखडलेल्या कामांना गती देण्यात येत असून बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्रतेचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येणार असून खासगीकरणाला प्राधान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतिबिंब सभागृहात उमटावे यासाठी हे सभागृह तयार झाले आहे. येथे मांडल्या जाणाऱ्या सूचना आणि टीकांचे स्वागत करून राज्य शासन त्यावर सकारात्मक वाटचाल करणार करेल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.