Home Blog Page 1410

पुणे विमानतळावर दीड कोटींचे परकीय चलन जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

पुणे-केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने पुणे विमानतळावर चार जणांना ताब्यात घेत दीड कोटींचे परकीय चलन जप्त केले आहे. प्रोफाइलिंगच्या आधारे दोन वेगवेगळ्या प्रकरणात हे परकीय चलन जप्त करण्यात आले.

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी पुण्याहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्याकडून 9,22,000 रुपये किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम हे विदेशी चलन जप्त करण्यात आले.तर दुसऱ्या एका प्रकरणात 31 जुलै रोजी दुबईला जाणाऱ्या तीन प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1,41,11,578 किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम चलन जप्त करण्यात केले. या सर्व प्रवाशांनी परवानगीच्या मयदिपेक्षा जास्त परकीय चलन स्वतः जवळ बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ओबीसी ऐक्य महापरिषदेचे विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांच्याहस्ते सोमवारी उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व ओबीसी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी ऐक्य महापरिषदेचे दि. 7 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.ओबीसी ऐक्य महापरिषदेचे उद्घाटन विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसीचे नेते कल्याणराव दळे तर स्वागत अध्यक्ष म्हणून  लेखक तथा साहित्यीक श्रावण देवरे हे राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून ओबीसीचे नेते ॲड. अण्णाराव पाटील, साहित्यीक प्रल्हाद लुलेकर, माजी आ. ॲड. रामराव वडकुते, प्रख्यात विचारवंत प्रा. सुशिला मोराळे, शेतकरी नेते लक्ष्मण वडले, ओबीसी नेते एकबाल अंसारी, शब्बीर अंसारी, संजय विभुते, देवराव सोनटक्के, नविनचंद्र बांधीवडीकर, प्रा. प्रभाकर गायकवाड, सतिश दादा दरेकर, भगवान श्रीमंदिलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या ओबीसी ऐक्य महापरिषदेत मंडल आयोगाच्या शिफारसिंची तंतोतंत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याने ओबीसीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. संविधानिक कलम 340 नुसार ओबीसींना देशातील प्रत्येक क्षेत्रात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ओबीसींची जात निहाय जनगणना होणे ही काळाची गरज आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करून खाजगीकरणाच्या माध्यमातून ओबीसींचे संविधानिक आरक्षण नष्ट करणे. शासक जातीचे एक भयानक षडयंत्र आहे. लोकशाही असलेल्या देशात खऱ्या अर्थाने बहुसंख्य समाज हा सत्ताधीश व शासक वर्ग असतो. परंतू भारत देशात मात्र ओबीसींची संख्या जवळपास साठ टक्के पेक्षा जास्त असतांनाही तो सत्ताधीश का नाही? यावरील सविस्तर कारणमिमासा व उपययोजना  ओबीसींना लागू असलेली क्रिमीलेअरची असंविधानिक अट रद्द केल्याशिवाय मंडळ आयोगाचा हेतू साद्य होणार नाही, ओबीसींचे धार्मिक धुव्रिकरण करून राजकीय फायद्यासाठी मुस्लीमांच्या विरोधात केवळ वापर होत आहे हे ओबीसींनी तत्परतेने घेणे ही काळाची गरज आहे आदी विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.या परिषदेचे निमंत्रक म्हणून सोमनाथ शेळके, सतिष दरेकर, संग्राम माने, प्रतापराव गुरव, आनंदा कुंदळे, हासिक नद्दाक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन दिनकर चौधरी, विद्यानंद मानकर, संगीता खाडे, महेश भागवत, किशोर गुरव, अशोक मगर, निळखंट गुरव, प्रा. राजेंद्र गुरव, सुवर्णा सुर्वे,  दत्तात्रय चेचर, संग्राम माने, प्रा. बी. आर. माळी, दामोधर बिडवे, अस्लम बागवान, किशोर सुर्यवंशी, वैशालीताई पवार, ॲड. सतिष कांबळे, संजय परदेशी, सुरेश पवार, संतोष साळुंके, रमेश राऊत, शंकरराव रायकर, वंदना कुमावत, प्रकाश गुरव, गणेश वाळुजकर, सुनिल वाळुजकर, महेंद्र गायकवाड, बाळकृष्ण भांबरे आदींनी केले आहे.

देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान देण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई : भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.mm

एचएसएनसी विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे किशीनचंद्र चेल्लाराम महाविद्यालयातील (के. सी. महाविद्यालय) सभागृहात आज सकाळी ‘जी २० युवा संवाद- भारत @२०४७’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एच. एस. एन. सी. विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. निरंजन हिरानंदानी, विश्वस्त माया साहनी, कुलगुरू डॉ. हेमलता बागला, प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, एच. एस. एन. सी. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान बलानी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कोलते आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील. येत्या २५ वर्षांत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी स्टॅण्डअप, स्टार्टअपसारखे उपक्रम सुरू करीत उद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातून रोजगार निर्मितीबरोबरच भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. विकसित राष्ट्रांनी संशोधन, पेटंट आणि स्वामित्व धनावर (रॉयल्टी) भर दिला आहे. तरुणांनीही संशोधन कार्यावर भर दिला पाहिजे. विकसित राष्ट्रांच्या जी- २० या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील मुंबईसह पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरातही कार्यक्रम झाल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंसेवकांचे संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामे केली जातात. अशाच लहान- लहान कार्यक्रमातून परिवर्तन घडून येते. देशात पायाभूत सोयीसुविधांच्या विकास होत आहे. तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगारक्षम मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी पूरक आहे. त्यामुळे आगामी काळात देशात बदल घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. बागला यांनी विद्यापीठ आणि जी २० परिषदेच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

रायगड :- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन सुरू होईल तर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच  इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून  सिमेंट ट्रीटेड बेस (Cement Treated Base) या अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी  एक मार्गिकेचे काम पूर्ण होऊन ती मार्गिका सुरु होईल. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरु होणार असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.चव्हाण यांनी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन हे काम  कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या.  सध्या पावसाळ्यात महामार्गाचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे यामध्ये हलगर्जीपणा नको तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी असलेल्या वन विभाग, भूसंपादन, न्यायालयीन प्रक्रिया व अन्य बाबींच्या परवानग्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून येत्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.

मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलदरम्यान रस्त्यांच्या कामांची पाहणी करतेवेळी त्यांनी पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत  सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

‘संगीत मेघदूत’ च्या सादरीकरणाला रसिकांची दाद.


३ दिवसीय हिरवाई महोत्सवाचा  समारोप.
पुणे :जिविधा ‘ संस्थेतर्फे आयोजित ३ दिवसीय  हिरवाई महोत्सवाचा समारोप शनीवारी सायंकाळी झाला.
या महोत्सवाची सांगता दरवर्षी प्रमाणे महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.शनिवार , दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी महाकवी कालिदास रचित कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित ‘संगीत मेघदूत’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संहिता लेखन डॉ.मंदार दातार यांचे होते.  संगीत  अमोल अशोक काळे यांचे होते.  अमोल काळे व स्वामिनी कुलकर्णी  (गायन ) , महेश कुलकर्णी( तबला )   ,  रुद्र जोगळेकर ( तबला, डफ, घटम, खंजिरी ), ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी ( तालवाद्य ), गौरव बर्वे (यक्ष वाचन ),स्वामिनी कुलकर्णी ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली.  इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र( राजेंद्रनगर ) येथे  हा महोत्सव झाला.

बांबू लागवडीवर मार्गदर्शन
त्याआधी दोन दिवस  ‘ बांबू आणि पर्यावरण’ या विषयावर डॉ. हेमंत बेडेकर  यांची व्याख्याने झाली. बदलते निसर्ग चक्र, बांबूचे पर्यावरणातील स्थान, पाऊस,वारा, माती आणि पाणी संवर्धन, बांबू आणि पाणी शुद्धीकरण,  बांबू उद्यान आणि आपले स्वास्थ्य, बांबू आणि प्राणवायू, नदीकाठ आणि बांबू  या विषयाचा उहापोह या व्याख्यानात झाला
डॉ. बेडेकर म्हणाले, ‘दुष्काळी भाग वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या धरणांचा उपयोग उस लागवडीसाठी केला जात आहे. पावसाचे पाणी अडवायला गवत उरले नाही. अती चराई, अती झाड तोडीने जंगले संपली. गुरांच्या पोषणासाठी गवताच्या नर्सरी कराव्या लागणार आहेत.निसर्गचक्र पूर्ववत केले पाहिजे .शेतीत मोनो कल्चर आले असून मिश्र पिकांची सवय गेल्याने शेतीतील कार्बन कमी झालेला आहे.झाड,पाणी, प्राणी, माणूस एकत्र राहिले पाहिजे.परिसंस्थेचे पुनरूज्जीवन झाले पाहिजे. शाश्वत शेतीची कास धरली पाहिजे.
‘जिविधा ‘ चे संस्थापक राजीव पंडित, सौ.वृंदा पंडित यांनी स्वागत केले.
 .देशी वनस्पतींच्या  लागवडीच्या कामात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा यासाठी गेली १२ वर्षे हा उपक्रम जीविधा संस्था आयोजित करते.
      या वर्षीच्या हिरवाई महोत्सवातून ‘बांबू’ या वनस्पतीच्या माहिती आणि जनजागृतीवर  भर दिला गेला. 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज पुण्यात CRCS कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे करणार उदघाटन


संपूर्णपणे कागदरहित वापर ,बहु -राज्य सहकारी संस्था कायदा आणि नियमांचे स्वयंचलित पालन, व्यवसाय सुलभता , डिजिटल संवाद  आणि पारदर्शक प्रक्रिया ही केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाची मुख्य उद्दिष्टे

हा संगणकीकरण प्रकल्प नवीन बहु -राज्य सहकारी संस्थांच्या  नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल तसेच त्यांचे कामकाज सुलभ बनवेल

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री श्री. अमित शहा यांचे आज आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी काल पुण्यात आगमन झाले. यावेळी पुणे विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले.

पुणे –

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी ” या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.  या अनुषंगाने , सहकार क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.

केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

i पूर्णपणे कागदरहित वापर आणि प्रक्रिया

ii सॉफ्टवेअरद्वारे बहु -राज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस कायदा) आणि नियमांचे स्वयंचलित पालन,

iii. व्यवसाय सुलभतेला चालना

iv. डिजिटल संवाद

v.  पारदर्शक प्रक्रिया

vi. सुधारित विश्लेषण आणि एमआयएस (व्यवस्थापन माहिती प्रणाली)

केंद्रीय रजिस्ट्रार पोर्टलमध्ये खालील मॉड्युल्सचा समावेश केला जाईल :

i नोंदणी

ii पोट कायद्यांमध्ये सुधारणा

iii वार्षिक विवरणपत्र दाखल करणे

iv अपील

v. लेखा परीक्षण

vi तपासणी

vii चौकशी

viii लवाद

ix. संस्थांचे कामकाज बंद करून मालमत्ता विक्रीद्वारे थकित रक्कम अदा करणे (वाइंडिंग अप आणि लिक्विडेशन)

x लोकपाल

xi निवडणूक

नवीन पोर्टल एमएससीएस कायदा, 2002 आणि त्याच्या नियमांमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या सुधारणांचाही समावेश करेल.  पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक वर्क फ्लोद्वारे अर्ज/सेवा विनंत्यांसंबंधी प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने हाताळली जाईल. हा संगणकीकरण प्रकल्प नवीन एमएससीएसच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांचे कामकाज सुलभ बनवेल.

देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. बहु-राज्य सहकारी संस्था  कायदा, 2002 च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय निबंधक कार्यालय जबाबदार आहे. बहु-राज्य सहकारी संस्थांचे सर्व कामकाज सुलभ करण्यासाठी आणि नवीन बहु-राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसह डिजिटल व्यवस्था तयार करण्यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.

नव्याने विकसित केंद्रीय निबंधक कार्यालय पोर्टल डॅशबोर्ड तयार करण्यासाठी युवकांचा सहभाग आणि कल्पना आमंत्रित करण्यासाठी ‘हॅकेथॉन’ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी

मुंबई: विविध मागण्यांसाठी बीईएसटी (बेस्ट ) कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे.  या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यास्तव प्रस्तावित आंदोलनाच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून उदा. सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, स्कूल बस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशा प्रकारची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ थे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून (पी एस व्ही सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास शासन परवानगी देत आहे. संप मागे घेतल्यास सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे गृह (परिवहन) विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद आहे.

दिल्ली हादरली!:भूकंपाचे तीव्र धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी दिल्ली

दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता तब्बल 5.5 रिश्टर स्केल होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आज रात्री 9 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान येथील हिंदूकूश पर्वत येथे भूकंपाचे केंद्रबिंदू होते. सध्या तरी कोणत्याप्रकारच्या जीवितहानीची किंवा इतर नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपाची तीव्रता जास्त होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अफगाणिस्तानच्या हिंदूकूश येथे भूकंपाचे केंद्र असल्यामुळे भारतासह पाकिस्तानतही धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे भूकंपाची घटना ही पहिली नाही. याआधी देखील वारंवार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.

सांधे व हृदयाच्या आरोग्यासाठी वेळीच उपचार करवून घेण्याला भारतीयांनी प्राधान्य द्यावे, महेंद्रसिंग धोनीने केले आवाहन

मुंबई वैद्यकीय साधने बनवणारीजागतिक पातळीवरील भारतीय कंपनी मेरीलने #ट्रीटमेंटजरुरीहै अर्थात उपचार करवून घेणे गरजेचे आहे हे जनजागृती अभियान सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु केले होते आणि ते अजूनही सुरु आहे. नितंब व गुडघे यासारखे मोठे सांधेहृदय (एओर्टिक स्टेनोसिस आणि कोरोनरी आर्टरी आजार) यांच्याशी संबंधित विशिष्ट आजारांविषयी विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती पुरवून भारतीय नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. रुग्णत्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती यांच्या दरम्यानचे अंतर दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

डिजिटलसोशल मीडिया आणि मायक्रो इन्फ्ल्यूएंसर्स यांना सहभागी करवून घेऊन राबवण्यात येत असलेल्या प्रचंड मोठ्या मार्केटिंग योजनेसह या अभियानाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर या अभियानाला १० मिलियनपेक्षा जास्त इम्प्रेशन्स मिळाले असून११ महिन्यांमध्ये प्रिंट व टेलिव्हिजनमार्फत संपूर्ण भारतभर जवळपास २० मिलियनपेक्षा जास्त ओटीएस (OTS) निर्माण केले आहेत.

या अभियानात महेंद्रसिंग धोनी सहभागी झाले असूनघरी वृद्धांची काळजी घेत असताना त्याला करुणेचा परिपूर्ण स्पर्श असावा हे दाखवून देत आहेत.  उपचार आवश्यक आहेत आणि सोपे देखील हा महत्त्वाचा संदेश महेंद्रसिंग धोनी यांनी सर्व प्लॅटफॉर्म्सवरून सर्व वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवला आहे.

मेरीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजीव भट यांनी सांगितलेनिरोगी जीवन जगण्याकडे देशवासियांचा कल वाढत आहेअशावेळी हृदय व हाडांना होणाऱ्याअसंसर्गजन्य आजारांवरील उपचार योजना आणि त्यांना आळा घालण्याचे उपाय याविषयी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेल्या दृष्टिकोनासह देशातील जनतेला साहाय्य प्रदान करणे खूप महत्त्वाचे आहे. ट्रीटमेंट जरुरी है‘ सारख्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. #TreatmentZarooriHai मार्फत आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूनत्यांना आजारांचे निदान व त्यावरील उपचार वेळीच करून घेण्याचे महत्त्व पटवून देऊ इच्छितो. यामध्ये आम्ही एकात्मिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोतत्यामुळे रुग्णांच्या (सर्वसामान्यतः ४० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या) बरोबरीनेच त्यांच्या कुटुंबातील डिजिटल जाणकार असलेली मुलेनातवंडे यांच्याशी देखील संपर्क साधू शकत आहोत.”

राष्ट्रीय हाडे व सांधे दिवसाच्या निमित्ताने सांधेदुखीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. जसजसे वय वाढत जाते, खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी गंभीर सांधेदुखीमुळे शारीरिक हालचाली करणे कठीण होऊन बसते, याचा विपरीत परिणाम त्यांच्या दिनचर्येवर, रोजच्या कामांवर होतो. सर्वसामान्यतः ऑस्टिओआर्थरायटिस, ऱ्हेउमटोइड आर्थरायटिस आणि सांध्यांमधील दुखापती या समस्या वयोमानापरत्वे उद्भवतात.

ऑस्टिओआर्थरायटिस (ओए) हा दीर्घकाळपर्यंत त्रास देत राहणारा आजार असून आज जगभरातील लाखो लोक याने ग्रस्त आहेत. जवळपास१५ कोटी भारतीयांना(ज्यांच्यापैकी बहुतांश ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत) गुडघ्यांचा काही न काही आजार आहे.  कुटुंबात अधिक कोणाला तरी गुडघ्याचा आजार असणे, वयोमानामुळे होणारी झीज, शारीरिक हालचालींचा अभाव, स्थूलपणा, जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि दाह निर्माण करणारे आजार ही यामागची काही कारणे आहेत. भारतात दरवर्षी २.५ लाखांपेक्षा जास्तव्यक्ती टोटल नी रिप्लेसमेंट अर्थात संपूर्ण गुडघ्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेतात ही बाब जरी खरी असली तरी आजही अनेक लोक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेला घाबरतात. पण वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपचारांचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत, यामध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा समावेश आहे ज्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसवरील उपचार पद्धतींमध्ये क्रांती घडून आली आहे.

ग्रामविकासाची चळवळ गावखेड्यात रुजायला हवी-हणमंतराव गायकवाड यांचे मत

तुम्ही-आम्ही पालक’च्या १०० व्या अंकाचे प्रकाशन
पुणे : “ज्यावेळी गावातील युवकांना नोकरीसाठी शहरात यायची गरज भासणार नाही; ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल. त्यामुळे ग्रामविकासाची चळवळ गावखेड्यात खोलवर रुजवायला हवी,” असे मत बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले. पालक म्हणून मुलांवर चांगले संस्कार करण्याची, त्यांना ग्रामसंस्कृतीची ओळख देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुजाण पालकत्व घडविण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या शंभराव्या अंकाच्या प्रकाशनावेळी गायकवाड बोलत होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात ‘तुम्ही-आम्ही पालक’साठी मोलाचे योगदान दिलेल्या लेखकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते. प्रसंगी लेखक डॉ. श्रीराम गीत, ‘तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक व साद माणुसकीची फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले, डॉ. रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. यावेळी डीपर व महाएक्झाम परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा, शिक्षकांचा तसेच साद माणुसकीची फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, “महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला होता. याचा अर्थ जेव्हा देशातील खेडी समृद्ध होतील, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल, हा विचार त्यामागे होता. हाच विचारांचा वारसा सक्षमपणे पेलत साद माणुसकीची फाऊंडेशनच्या माध्यमातून हरीश बुटले यांचे कार्य सामाजिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील विकास घडविण्यासाठी स्वतःपासून पुढाकार घेणे महत्वाचे असते. त्यांचे सुरु असलेले सामाजिक दायित्व भावनेतील कार्य प्रेरणादायी आहे.”

डॉ. शरद कुंटे म्हणाले, “शैक्षणिक काम हे पंढरीच्या वारीप्रमाणे असते. विद्यार्थी हाच आपला परमेश्वर असतो. दरवर्षी तो वेगवेगळ्या रुपात येतो. त्या विद्यार्थीरुपी परमेश्वराची शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा करणे महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक जण कोणत्या तरी स्वरूपात पालक असतो. आज सामाजिक, शैक्षणिक पालकत्व घेण्याची गरज आहे. ‘तुम्ही-आम्ही पालक’च्या माध्यमातून पालक सुदृढ, सुजाण व सुसंस्कृत होण्यासाठी बुटले करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
हरीश बुटले म्हणाले, “सलग १०० अंक प्रकाशित करणे जिकिरीचे होते; पण मनातील आत्मविश्वास आणि सामाजिक आत्मीयता या भावनेतून सर्वांच्या सहकार्याने शब्दक्रांतीचा हा ठेवा निर्माण करू शकलो याचा विशेष आनंद आहे. समाजातील वाचन संस्कृती टिकली पाहिजे, हा विचार घेऊन काम केल्याने यशाचा टप्पा गाठता आला. मनाची प्रगल्भता वाढवण्यासाठी ‘तुम्ही-आम्ही पालक’ हा अंक उपयुक्त आहे.”
सूत्रसंचालन माया प्रभुणे यांनी केले. आभार संदीप बर्वे यांनी मानले.

ऑसेनडिऑन तर्फे निटॉर इन्फोटेकचे संपादन करून सॉफ्टवेयर उत्पादन इंजिनियरिंग आणि एआय क्षमता आणखी बळकट

ऑसेनडिऑन या अमेरिकास्थित सॉफ्टवेयर इंजिनियरिंग कंपनीने निटॉर इन्फोटेक या जनरेटिव्ह एआय क्षेत्रातील आघाडीच्या सॉफ्टवेयर उत्पादन इंजिनियरिंग कंपनीचे संपादन केले आहे.निटॉर इन्फोटेकचे ७०० कर्मचारी आता असेनडिऑनमध्ये समाविष्ट झाले असून ते सॉफ्टवेयर उत्पादन इंजिनियरिंग आणि जनरेटिव्ह एआयमध्ये निष्णात आहेत.
ऑसेनडिऑन निटॉर इन्फोटेकच्या बलस्थानांच्या मदतीने आरोग्यसेवा, रिटेल आणि पुरवठा साखळी इत्यादी क्षेत्रांसाठीच्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार.

पुणे -भारत येथे नवे सॉफ्टवेयर उत्पादन इंजिनियरिंग केंद्र उभारत ग्लोबल सर्व्हिस डिलीव्हरी आणखी मजबूत करणार निटॉर इन्फोटेक आपल्या सद्य ब्रँडअंतर्गत असेंडियन कंपनी म्हणून राहाणार.ऑसेनडिऑन या सॉफ्टवेयर इंजिनयरिंग सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने निटॉर इन्फोटेक या सॉफ्टवेयर उत्पादन इंजिनियरिंग कंपनीचे संपादन केल्याचे जाहीर केले आहे. निटॉर इन्फोटेक जनरेटिव्ह एआयासारख्या क्रांतीकारी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ग्राहकांसाठी नवी उत्पादने तयार करते.हे संपादन नव्या बाजारपेठेत विस्तार करण्याच्या आणि ग्राहकांना वैविध्यपूर्ण सेवा पुरवण्याच्या ऑसेनडिऑनच्या धोरणाचा भाग आहे. निटॉर इन्फोटेकचे ७०० कर्मचारी अॅसेनडिऑनमध्ये समाविष्ट होणार असून जनरेटिव्ह एआय क्षेत्रातील त्यांच्या कौशल्याचा असेनडिऑनला आपल्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरवण्यासाठी फायदा होईल. या संपादनामुळे निटॉरचे कौशल्य व ग्राहकवर्गाच्या मदतीने आरोग्य, रिटेल आणि साखळी पुरवठा क्षेत्रासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे अॅसेनडिऑनला शक्य होईल.
‘अॅसेनडिऑनने निटॉर इन्फोटेकचे केलेले संपादन हे सॉफ्टवेयरच्या मदतीने ग्राहक उत्पादनक्षमता आणि विकासाला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे महत्त्वाचे पाऊल आहे,’ असे अॅसेनडिऑनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक (केके) कृष्णमूर्ती, म्हणाले. निटॉर इन्फोटेक असेनडिऑनसाठी योग्य कंपनी आहे, कारण या दोन्ही कंपन्या सॉफ्टवेयर इंजिनियरिंग, जनरेटिव्ह एआय सुविधा आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन्ही कंपन्या इंजिनियरिंग क्षेत्रात कुशल असून नाविन्यपूर्ण एआय आणि ग्राहक सहयोगावर असलेला भर है त्यांच्यातील समान मुद्दे आहेत. एकत्र येण्याने आमची इंजिनियरिंग क्षेत्रातील ताकद वाढली आहे. त्यामुळे नव्या बाजारपेठात प्रवेश, कर्मचारी भरती आणि सॉफ्टवेयर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना सेवा देण्याची क्षमता विस्तारणे निटॉर इन्फोटेकमुळे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणारे स्वतंत्र टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्सही समाविष्ट झाले आहे. हे केंद्र डीप लर्निंग मॉडेल्स, इंजिनियरिंग, लर्निंग व प्रोबॅलिस्टिक प्रोग्रॅमिंगला चालना देण्यासाठी मदत करते. या केंद्रामुळे ग्राहकांना एआयद्वारे मूल्य मिळवण्यास मदत होते. निटॉर इन्फोटेक आतापर्यंत आरोग्य, रिटेल आणि इतर क्षेत्रांतील विविध ग्राहकांना एआय व क्लाउड इंजिनियरिंग वर्कचे वितरण केलेले आहे.
‘असेंडियन कंपनी बनताना आम्हाला आनंद होत आहे. असेंडियन ही अत्याधुनिक सॉफ्टवेयर इंजिनियरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून त्यांची दमदार संस्कृती व मूल्ये निटॉर इन्फोटेकच्या तत्वांशी सुसंगत आहे. असेंडियनमध्ये रूजू होण्याने ग्राहकांना सेवा देण्याची आमची क्षमता तसेच मूल्य वाढेल. एकत्रितपणे जेनआय अनेबल्ड तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन इंजिनियरिंग क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे,’ असे निटॉर इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव फडणवीस म्हणाले.

लोकशाहीची मंदिरे अप्रत्यक्षपणे उद्ध्वस्त केली जात आहेत – उपराष्ट्रपती

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

संविधानाने बंधनकारक केलेले कार्य सर्व लोकप्रतिनिधी निष्ठेने करतील हे सुनिश्चित करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन उपराष्ट्रपती, जगदीप धनखड यांनी आज नागरिकांना केले. 

“लोकशाहीची मंदिरे अप्रत्यक्षपणे उद्ध्वस्त होत आहेत” अशी चिंता व्यक्त करून, उपराष्ट्रपतींनी नागरिकांना सावध केले की, जर ही स्थाने चर्चा, संवाद आणि वादविवादाचे व्यासपीठ म्हणून जोपासली नाहीत, तर ती प्रतिनिधी नसलेल्या किंवा राष्ट्राप्रती उत्तरदायित्व नसलेल्या शक्तींनी व्यापले जाण्याची शक्यता आहे. 

उपराष्ट्रपतींनी  संविधान सभेचे उदाहरण दिले.  संवाद आणि चर्चेद्वारे  मतभेदाचे रुपांतर निषेधात होऊ न देण्यावर उपराष्ट्रपतींनी जोर दिला. “संविधान सभेला दुही आणि वादग्रस्त समस्यांचा सामना करावा लागला, परंतु त्या  नेहमी समन्वय, सहकार्य आणि सहयोगाच्या भावनेने सोडवल्या गेल्या,” असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला आज नागपुरमध्ये संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी आर्थिक राष्ट्रवादाबाबत विचार व्यक्त केले. “व्यापार, उद्योग आणि व्यवसाय या बाबतीत अत्यंत संवेदनशील असले पाहिजेत. आर्थिक राष्ट्रवादाचे महत्त्व नागरिकांनी स्वतः जाणले तरच हे साध्य होऊ शकते,” असे त्यांनी आवाहन केले.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेपर्वा वापराला परवानगी देता येणार नाही यावर जोर देऊन उपराष्ट्रपतींनी नागरिकांना आठवण करून दिली की त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार ऊर्जा किंवा जलस्रोत वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. “या संसाधनांचा इष्टतम वापर सुनिश्चित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” हे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक स्तरावर भारताने मिळवलेला मान, प्रतिष्ठा आणि स्थान यावर प्रकाश टाकत उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, “कोणत्याही व्यक्तीला, “अनावश्यकपणे आणि अतार्किकपणे, संवैधानिक संस्थांना कलंकित, मलीन आणि अपमानित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.” त्यांनी नागरिकांना राष्ट्रहिताच्या विरोधी अशा गोष्टींना निष्प्रभ करण्याचे आवाहन केले. 

विद्यार्थ्‍यांचा दृष्‍टीकोन बदलण्‍यासाठी मोकळे मन ठेवण्‍याचे महत्‍त्‍व पटवून देताना, उपराष्ट्रपतींनी आवाहन केले कि  “प्रतिक्रिया सावकाश द्या पण समजून लवकर घ्या.” “जेव्हा तुम्ही इतरांच्या भूमिकेचे कौतुक करायला शिकाल तेव्हा तुम्ही शहाणे व्हाल,” त्यांनी सांगितले. ‘वॉरियर्स ऑफ 2047’ ला त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी प्रोत्साहित करत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना  त्यांच्या निवडलेल्या मार्गांमध्ये “गांभीर्याने विचार करा, विस्तृत वाचन करा, सातत्य ठेवा  आणि  क्षितीज व्यापक करा” असा सल्ला दिला.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

केंद्र सरकारच्या गेल्या 5 वर्षातल्या हस्तक्षेपामुळे साखर क्षेत्र बनले स्वावलंबी

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

केंद्र सरकार देशातील साखरेच्या किरकोळ किमती स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. एप्रिल-मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमतींनी दशकातील सर्वोच्च पातळी गाठली असली तरीही, साखरेच्या देशांतर्गत किमतींमध्ये सुमारे 3% इतकी नाममात्र दरवाढ झाली आहे. ही दरवाढ उसाच्या रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) वाढीशी सुसंगत आहे.

आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती भारतातील साखरेच्या किंमतीपेक्षा जवळपास 50 % जास्त आहेत. देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत सुमारे ₹ 43 प्रति किलो आहे आणि ती केवळ याच मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे. किंबहुना, खालील तक्त्यावरून असे दिसून येते की, गेल्या 10 वर्षांत देशात साखरेच्या किमतीत 2% हून देखील कमी वार्षिक दरवाढ झाली आहे. सरकारच्या व्यावहारिक धोरणात्मक हस्तक्षेपामुळे देशांतर्गत किमती थोडी दरवाढ नोंदवत स्थिर राहिल्या आहेत.

सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने साखर क्षेत्र संकटातून बाहेर आले आहे. साखर क्षेत्राची भक्कम मूलभूत तत्त्वे आणि देशात ऊस तसेच साखरेचे पुरेसे उत्पादन यामुळे प्रत्येक भारतीय ग्राहकाला साखर सहज उपलब्ध होईल हे सुनिश्चित झाले आहे.

चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) 2022-23, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 43 लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे 330 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे, देशातील एकूण साखर उत्पादन सुमारे 373 लाख मेट्रिक टन असेल जे गेल्या 5 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी उत्पादन आहे. शिवाय, गेल्या 10 वर्षांत साखरेच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे; मात्र, त्याच प्रमाणात साखरेचा खप वाढलेला नाही; त्यामुळे, कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत देशात पुरेसा साखर साठा उपलब्ध असल्याची खात्री आहे.

जुलै 2023 च्या अखेरीस, भारतात सुमारे 108 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा आहे, जो चालू ऊस हंगाम 2022-23 च्या उर्वरित महिन्यांसाठी तसेच हंगामाच्या शेवटी सुमारे 62 लाख मेट्रिक टन च्या उद्दिष्टित साठ्यासह देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांना वर्षभर पुरेशी साखर रास्त दरात उपलब्ध असेल.

याशिवाय, रास्त व किफायतशीर भाव तसेच साखर कारखानदारांकडून वेळेवर परतावा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जात आहे. साखर कारखान्यांनी 2021-22 पर्यंतच्या साखर हंगामासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांची 99.9% थकबाकी आधीच मंजूर केली आहे. चालू साखर हंगाम 2022-23 मध्ये देखील 1.05 लाख कोटी रुपयांहून अधिक परतावा देऊन सुमारे 93% उसाच्या थकबाकीचे परतावे तारखेनुसार आधीच मंजूर झाले आहे.

अशा प्रकारे, भारत सरकारने साखर क्षेत्राची योग्य धोरणे, स्थिर दर आणि शेतकऱ्यांची उसाची देणी वेळेवर मंजूर करून तिन्ही प्रमुख भागधारक, ग्राहक, शेतकरी आणि साखर कारखानदारांचे हित संरक्षित केले आहे.

19 हजार 460 पदांची मेगा भरती; जाहिरात उद्या,राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गात भरती :मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि. 4 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.मंत्री श्री महाजन म्हणाले की, माहे मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे. 5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकता : प्रक्रिया (IBPS) कंपनीमार्फत

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार आयबीपीएस (IBPS) तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावलेला आहे.

ज्यांनी मार्च, 2019 मध्ये अर्ज केलेला होता, वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास पात्र

ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता

ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला-मोहन जोशी

पुणे: काँग्रेसचे नेते राहूल जी गांधी यांना गुजरात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली . मणीपूर हिंसाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल केंद्र सरकारला सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही आणखीएक चपराक केंद्र सरकारला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला लगावली आहे.
विरोधी पक्ष संपवण्याच भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली. भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देशात विविधतेत एकता असे वातावरण निर्माण केलेले राहूल जी गांधी यांची भाजपला भीती वाटत होती. त्यामुळेच दुसर्या राज्यात राहूल जी यांनी केलेल्या एका भाषणाचे खोटे निमित्त करून गुजरातमध्ये खटला दाखल करण्याचे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रुहमंत्री अमीत शाह यांनी रचले. मात्र देशातील सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान हाणून पाडले आहे असे जोशी म्हणाले.
आता ८,९ व १० ऑगस्ट या दिवशी संसदेत होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी देखील राहूल गांधी सहभागी होऊ शकतील ही देशातील जनतेच्या दृस्ठीने ही उत्साहाची बाब आहे असे जोशी यांंनी सांगितले.