Home Blog Page 1404

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची  भूमिका महत्त्वाची

0

रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत व रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह इमारतीमध्ये तयार  करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ‘सोनचिरैया सुपर मार्केट’चे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सोनचिरैया सुपर मार्केटची पाहणी करुन या मार्केटमधील उत्पादनांची माहिती घेतली.  या सुपर मार्केटमधील सर्व उत्पादने ही महिला बचतगटांनी तयार केलेली आहेत.  त्यामुळे या उत्पादनांचा दर्जा निश्चितच उत्तम असेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीमध्ये सुरु करण्यात आलेल्या सुपर मार्केटप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये बचतगटांसाठी सुपर मार्केट तयार करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योगमंत्री श्री. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील 160 बचतगटांनी एकत्र येऊन हे मार्केट उभारले आहे.  महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता सोनचिरैया सुपर मार्केट उभारण्यात आले असून राज्यातील पहिले बचतगटांचे सुपरमार्केट रत्नागिरी जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला. रत्नागिरीमध्ये उभारण्यात आलेल्या या सुपर मार्केटप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही बचत गटांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार असून त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन महामंडळाच्या बसचे लोकार्पण

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागांतर्गत नवीन बसचे लोकार्पण आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याकरिता 50 नवीन बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय किरण कुलकर्णी, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

0

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनीही श्री. बैस यांचे स्वागत केले.

म्हणूनच भाजपाला पाठींबा:मनसे

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली पुण्यातील मनसे नेत्यांची भेट

पुणे:

हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेतला असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. तेव्हा मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप सोबत असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

श चव्हाण यांनी मनसे नेते दीपक पायगुडे, बाळा शेडगे, सुशिलाताई नेटके, अजय शिंदे, प्रल्हाद गवळी यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

श्री. चव्हाण म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनसेचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजसाहेब दोन दिवसात पुण्यात येणार आहे, त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाप्रमाणे काम अधिक गती घेईल. त्यामुळे कसबा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना मोठे बळ मिळाले असून विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा विश्वास वाटतो.

निवडणूक आयुक्ताने शेण खाल्लं, आता सुप्रीम कोर्ट हीच उरली एक आशा:निर्णयानंतर उद्धव ठाकरे संतप्त (व्हिडीओ)

लोकशाही संपली आहे असे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावे

-देशात बेबंदशाही सुरू झाली आहे हे मोदींनी जाहीर करावे

 बाळासाहेबांनी पुजलेलं धनुष्यबाण आमच्याकडे आहे

निवडणूक आयोगाने शपथ पत्रे मागविण्याचे थोतांड का केले ?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे. लोकाशाही संपवून बेबंदशाहीला सुरुवात केली आहे. आजपर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिलेलं आहे, जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. न्याययंत्रणा सरकारच्या दबावाखाली याबाबत गेले काही दिवस केंद्रीय कायदा मंत्री बोलत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलताहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार पाहिजे. त्यामुळे देशातील लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत, असं बोलण्याचं धाडस सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवलं पाहिजे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे अनपेक्षित आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.आजचा हा जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, तो अत्यंत अनपेक्षित आहे. कारण जवळपास सहा महिने ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही निकाल देऊ नये, अशी आमची मागणी होती. पक्ष कोणाचा बरोबर आहे, कोणाच्या बरोबर आहे? हे जर का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवायला लागतो तर मात्र कोणही धनाढ्य माणूस निवडून आलेला आमदार, खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हेही मी मागे बोललो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दक्षिण कमांडद्वारे सदर्न स्टार आर्मी -शिक्षण -उद्योग सन्मुखता कार्यक्रम संपन्न

पुणे, 17 फेब्रुवारी  2023

दक्षिण कमांड  क्षेत्रीय तंत्रज्ञान कक्षाने (आरटीएन) 17 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यातील कमांड रुग्णालयाच्या चरक सभागृहात ‘सदर्न स्टार आर्मी – शिक्षण -उद्योग सन्मुखता’ (S2A2I2) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दक्षिण सैन्य कमांडर, अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींच्या मेळाव्याला संबोधित केले. दक्षिण कमांड मुख्यालयाचे सैन्य प्रमुख, लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विविध भागधारकांना परस्परसंवादी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि लष्कर अशा विविध क्षेत्रातील सुमारे 100 सहभागींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आयआयटी मुंबई  आणि स्थानिक उद्योगांकडून स्वदेशी निर्मित नवोन्मेषांचे स्वारस्यपर प्रदर्शनही आयोजित केले गेले.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी आपल्या भाषणात, विशेषत: अलीकडील जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर, स्वदेशी संरक्षण उत्पादनाकडे वळण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, सशस्त्र दलांनी सूचना मिळताच अल्पावधीत कारवाईसाठी सज्ज असणे आवश्यक आहे आणि पारंपरिक युद्धाला समकालीन तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाले पाहिजे. स्वदेशीकरणामुळे आपल्या स्वतःच्या सुरक्षेच्या गरजा सोडवण्यास मदत होईल आणि राष्ट्राला स्वतःच्या शस्त्रास्त्र प्रणालीचा निर्माता म्हणून समोर येण्यास मदत होईल यावर त्यांनी भर दिला.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी नमूद केले की व्यवसाय करण्याचे नियम सोपे केले आहेत आणि उद्योगांना मदत करण्यासाठी नवीन नियम लागू करणे, जलदगती संशोधन आणि विकास (R&D) आणि खरेदी प्रक्रियेला गती देणे यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय, संरक्षण संपादन प्रक्रियेत नवीन बदल आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीय वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे संरक्षण खरेदीला अपेक्षित गती मिळेल. लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी उपस्थितांना विचारांची देवाणघेवाण सुरू ठेवण्याचे आवाहन केले जेणेकरुन उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील क्षमता समजून घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लष्कराची क्षमता प्रभावीपणे वाढू शकेल.

एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमातील इतर वक्त्यांमध्ये भारत फोर्ज डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष आणि सीईओ राजिंदर सिंग भाटिया यांचा समावेश होता, ज्यांनी ‘भारतीय सैन्यात तंत्रज्ञान अंतर्भावाचे समर्थन’ याविषयी तर आयआयटी मुंबईतील  एनसीईटीआयएस प्राध्यापक सुहास राऊतमारे यांनी ‘लष्करी स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक संधी आणि वाव ‘ या विषयावर माहिती दिली. आरटीएनचे अध्यक्ष ब्रिगेडियर एनपी सिंग यांनीही भारतीय लष्करातील ‘आत्मनिर्भरता’ याबाबत माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई-शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून, शिवसेना हे नाव देखील शिंदे गटालाच दिले आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

काय म्हणाले निवडणूक आयोग

  • 21 जूनला 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
  • त्याच दिवशी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली गेली.
  • परंतु 21 जूनलाच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 34 आमदार होते.
  • त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले. त्यामुळे अजय चौधरींची झालेली निवड बेकायदेशीर
  • शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.

शिवसेना हे पक्षनाव शिंदे गटालाच

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. यानंतर आता याबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

ठाकरे यांना मोठा धक्का

ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे.

पक्षचिन्हाच्या हक्काबाबत 12 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती.

हा खोक्यांचा विजय आहे-खासदार संजय राऊत

ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. तोच खोक्यांचा वापर लक्षात घेता हा तोच विजय आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आता स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे

कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांनी भेटीगाठीचा धुमधडाका, बाळासाहेब दाभेकरांसह,राजेश शहा आणि व्यापारी,शिक्षक वर्गाशी केली चर्चा

पुणे- कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत काल खासदार बापटांच्या एन्ट्री ने रंगत आणल्या नंतर आता आज पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी कॉंग्रेसचे माघार घेतलेले बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली . माजी खासदार संजय काकडे, संदीप खर्डेकर यावेळी त्यांच्या सोबतीला होते. या शिवाय राजेश शहा आणि त्यांच्या कसब्यातील सहकारी व्यापाऱ्यांशी पाटलांनी थेट चर्चा केली ,तर अनेक शिक्षक शिक्षिकांशी देखील संवाद साधला .भाजपचे उमेदवार हेमंत रासने या रणनीतीने फुललेल्या चेहऱ्याने वावरत असल्याचे दिसत होते .

कसबा मतदार संघात कॉंग्रेसच्या धंगेकर यांनी प्रचारात पहिल्याच टप्प्यात आघाडी घेतली होती , अजित पवार , नाना पटोले , अशोक चव्हाण यांच्या सभेने आणि धंगेकर यांच्या पदयात्रेने वातावरण ढवळून निघालेले असताना गेली ३ दिवसांपासून भाजपने आपल्या वेगळ्या व्यूहनीतीला प्रारंभ केल्याचे दिसले आहे .

चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार हेमंत रासने यांना बरोबर घेऊन फडके हाैद चौकातील आरसीएम गुजराती हायस्कूलला सदिच्छा भेट दिली आणि शाळा व्यवस्थापनाशी अनौपचारिक संवाद साधला. या वेळी भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे आदीही सोबत होते.

प्रथमतः गिरीश महाजन यांच्या मार्फत या व्यूहनिती ला प्रारंभ केला त्यांनी काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणविसांनी पुण्यात येऊन काही भेटीगाठी घेतल्या आणि त्याच बरोबर आजारी असलेल्या खासदार गिरीश बापटांच्या भेटीला जाऊन चर्चा केली . त्यानंतर काल खुद्द बापट केसरीवाड्यात आजारी असूनही कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मोहिमेला प्रारंभ केला तेही माजी खासदार संजय काकडे यांना बरोबर घेऊनच .

भाजपच्या या रणनीतीने आता कसब्यात वर्चस्व निर्माण केलेल्या धंगेकर यांच्या माताधीक्याला भेदून जाऊ शकेल काय ? भाजपचा बालेकिल्ला या रणनीतीने अभेद्द राहू शकेल काय ? या प्रश्नांची उत्तरे अर्थात मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार

0

औरंगाबाद, दि.17 – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजना, उपक्रमांच्या प्रसारासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.

मराठवाडा विभागाच्या माहिती संचालक पदाची सूत्रे यापूर्वी श्री. हेमराज बागूल यांच्याकडे होती. खडकेश्वर येथील संचालक (माहिती) कार्यालयात किशोर गांगुर्डे यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी मीरा ढास यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. गांगुर्डे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. आज माध्यम क्षेत्रातील बदल ओळखून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कामकाज करण्यासोबतच समाजमाध्यमांच्या प्रभावीपणे वापरावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येईल, असेही श्री. गांगुर्डे यांनी सांगितले.

मराठवाडा विभागात शासकीय माहिती प्रचार-प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करताना संघभावनेने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००६ मध्ये सरळसेवेने सहायक संचालक (माहिती) या पदावर निवड झालेल्या श्री. किशोर गांगुर्डे यांनी विविध शाखांमध्ये काम केले आहे.  २००८ मध्ये पुन्हा सरळसेवेने वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)- गट अ पदावर त्यांची निवड झाली. विभागीय संपर्क कक्ष, वृत्त, समाजमाध्यम, महान्यूज, माध्यम प्रतिसाद केंद्र आदी विविध शाख़ांमध्ये त्यांनी काम केले आहे. गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. उत्कृष्ट लिखाणाबद्दल श्री. गांगुर्डे यांना २००७ च्या राज्य शासनाच्या ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट विकासवार्ता पुरस्कारा’ने देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे समाजमाध्यमांवर प्रतिनिधित्व आणण्यात आणि अद्ययावत अशा माध्यम प्रतिसाद केंद्राच्या उभारणीत योगदान दिल्याबद्दल श्री. गांगुर्डे यांचा २०१७ मध्ये नागरी सेवा दिनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. १९९७ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केलेल्या श्री. गांगुर्डे यांनी २००४ मध्ये चंद्रपूर येथे जाग़तिक बॅंक अर्थसहाय्यित प्रकल्पात ‘माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ’ म्हणून काम पाहिले आहे. २०१४ मध्ये जळगाव जिल्हा माहिती अधिकारी आणि नाशिक येथे २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथील प्रसारमाध्यम केंद्राचे नियंत्रण अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे हे मंत्रालयात कार्यरत होते. नुकतीच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संचालक (माहिती) पदावर सरळसेवेने थेट निवड झाली आहे. या पदावर थेट निवड झालेले श्री. गांगुर्डे हे विभागातील दुसरे संचालक आहेत.

महाराष्ट्र जोशी समाज विकास संस्थेचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठींबा

पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना या निवडणुकीत महाराष्ट्र जोशी समाज विकास संस्थेने जाहीर पाठींबा दिला आहे. तसे आशयाचे पत्र परिषदेचे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी आज कॉंग्रेस भवन येथे आमदार संग्राम थोपटे आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांना भेटून दिले. याप्रसंगी खा. वंदना चव्हाण, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार दीप्ती चवधरी, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.

पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र जोशी समाज, विकास संस्था, (महाराष्ट्र प्रदेश) या संस्थेला मानणारा व संबंधित मतदारांचा मोठा वर्ग कसबा मतदारसंघात आहे. आपल्याला विजयी करण्यासाठी या मतदारांना आपल्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आंबील ओढा कॉलनी, मंगळवार पेठ, रास्ता पेठ-गणेश पेठ आदी भागातील समाजाच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी आपल्या मोठ्या मनाने आपण आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करा यासाठी आपल्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिड वर्षात पाच वर्षांचं काम करून दाखवेन- रविंद्र धंगेकर

पुणे-कसबा मतदार संघ ही माझी कर्मभूमी आहे. इथेच मी नगरसेवक म्हणून काम केले आहे.  येथील प्रश्नांची मला चांगली जाण आहे आणि ते सोडविण्यासाठी सतत कष्ट करण्याची माझी वृत्ती आहे. आताच्या पोटनिवडणुकीत आमदारकीचा कालावधी दिड वर्षांचा असला तरी या काळात पाच वर्षांचे काम करण्याची जिद्द माझ्यात आहे, असा विश्वास कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केला. पदयात्रा संपल्यानंतर झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, २६ फेब्रुवारी हा कसबा मतदार संघाच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ आहे. एवढेच नव्हे, तर कसब्याच्या दृष्टीने हा परिवर्तनाचा दिवस आहे. कसब्याच्या विकासाबाबत भाजपच्या निष्क्रियतेला मतदार कंटाळले असून त्यांना आता खराखुरा नियोजनबद्ध विकास हवा आहे. हा विकास करण्याची जिद्द व दृष्टी माझ्यात असून मतदार यावेळेस परिवर्तन निश्चित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्र. २९, नवी पेठ-पर्वती मध्ये ना.सी.फडके चौकात दुपारी ४:३० वाजता पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत कॉंग्रेसचे माजी आमदार अनंतराव गाडगीळ, सचिन आडेकर, सुधीर काळे, किरण गायकवाड, नंदू वीर, विजय घोलप, आनंदराव गांजवे, राजू नाणेकर, कुणाल काळे, शंकर थोरवे, बाळासाहेब साठें, संदीप चौधरी, महेश शहाणे, किरण गंजकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, गणेश नलावडे, संतोष बेंद्रे, गजानन लोंढे, अभिजित बारवकर, मदन कोठुळे, मच्छिंद्र उत्तेकर, दीपक पोकळे, शाम ढावरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, प्रसाद काकडे, उमेश गालिंदे, देवेंद्र शेळके, वरद बांदल, गौरव सिन्नरकर, चंदन साळुंके हे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.  कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्ष यांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.

तिन्ही पक्षांचे झेंडे, धंगेकरांचे पोस्टर्स असलेल्या या पदयात्रेत महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय दिसून येत होता. पुढे ना.सी. फडके चौकातून साने गुरुजी नगर- लोकमान्य नगर-  न्यू इंग्लिश स्कूल मागील रस्ता- अशोक विद्यालय- अलका चौक- सेनादत्त पेठ परिसर- राजेंद्र नगर- दत्तवाडी चौक यामार्गे शास्त्री पुतळा येथपर्यंत जाऊन या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.    

या पदयात्रेत अनेक ठिकाणी धंगेकर यांना ओवाळले गेले. मार्गातील गणेशमंडळानी धंगेकरांचे सत्कार केले तसेच प्रत्येक ठिकाणी धंगेकर यांनी श्री गणेशाची आरती केली. चौकाचौकात पुष्पगुच्छ व फुलांचा हार देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी पाणी व सरबत दिले जात होते. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या निवडणुकीत परिवर्तन निश्चित होईल हा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत

0

मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

सदर अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर, (पूर्व) येथे १५ मार्च २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.१७:- दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता १०० टक्के कॉपीमुक्त अभियान पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची परीक्षा २ ते २५ मार्च, २०२३ या कालावधीत होणार आहे.

शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उदबोधन करण्यात येणार आहे. तसेच अभियानाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी, परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विभागनिहाय व जिल्हानिहाय भरारी पथक, दक्षता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थांच्या जीवनातील दहावी, बारावी हा महत्वपूर्ण टप्पा असतो. या महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षा निकोप वातावरणात होणे, त्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावणे यासाठी हे महत्वपूर्ण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी केले आहे.

अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवराय

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी रावरंभा या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येत आहे. येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने रावरंभा चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर आपल्यासमोर प्रदर्शित झाले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या रावरंभा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.

‘मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेता शंतनू मोघे व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्द्दल अभिनेता शंतनू मोघे सांगतो , की ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘मला  शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला  मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.

रावरंभा चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक,  रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनी संकलन दिनेश उच्चील यांचे आहे.  

आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर वन बनवणार  – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित

पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात नंबर वन  राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला
महाराष्ट्राला अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी आरोग्य कार्ड बनविले जाईल असेही ते म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य फिल्म फेस्टिवल २०२२-२३ चे आयोजन आणि पारितोषिक वितरण समारंभ बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा समारंभ पार पडला. 

श्री. धीरज कुमार. आयुक्त, आरोग्य सेवा, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा, पुणे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर , डॉ. केतन खाडे, जागतिक आरोग्य संघटना, डॉ. वैशाली बिऱ्हाडे, जेएसआय, डॉ. तृप्ती शिंदे, परीक्षक म्हणून काम केलेले स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, गेल्या सहा महिन्यात आमच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन योजना राबविल्या आहेत. ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या माता आणि भगिनीसाठी राबविलेल्या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेला ही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्व सदृढ आणि निरोगी बनविण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच.
आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी आरोग्य आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत असे सांगितले .

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले की, या महाआरोग्य फिल्म फेस्टिवल निमित्त अनेक लपलेले दिग्दर्शक पुढे येतील. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो आणि आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे.

 राज्यभरातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५५ प्रवेशिका राज्यभरातून प्राप्त झाल्या. त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडीत होत्या. ११८ प्रवेशिकांचे ८ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. यापैकी ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट असे एकूण १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या १० हजार रुपये, तर तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या प्रत्येकी दोन  विजेत्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. उर्वरित 98 सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आली. 

यातील विजेते लघुपट/माहितीपट गटात, रोहन शाह (प्रथम, साखरेपेक्षा गोड), अनुपम बर्वे (द्वितीय, गोष्ट अर्जुनाची), प्रवीण अजिनाथ खाडे (तृतीय, ताजमहाल), आर के मोशन पिक्चर (चतुर्थ, फॉरएवर), रायबा अंजली (चतुर्थ, बबाते)

टीव्ही स्पॉट गटात, राहुल सोनावणे (प्रथम, अडाणी), शैलेंद्र गायकवाड (द्वितीय, टीबी हारेगा देश जितेगा), लोकेश तामगिरे (तृतीय, साल्ट रिडकशन शोले), निखील राहुल भडकुंबे (चतुर्थ, शेतकरी), सय्यद बबलू (चतुर्थ, एंड ऑफ लाईफ).

सार्वजनिक आरोग्य विभागाने 2020 पासून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल या महोत्सवाचे आयोजन करून आरोग्य विषयक जनजागृतीसाठी लोकांचे योगदान वाढावे, तसेच चित्रपट निर्माते, निर्मिती कंपन्या, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी व चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे यांच्यासाठी आरोग्य या विषयावर लघुपट तयार करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी मानले सूत्र संचालन रजनी वाघ यांनी केले .

चित्रपट हे जागृती वाढविण्याचा आरोग्य शिक्षणाचा व आरोग्यदायी वर्तन सुधारण्याचा आणि कृतीला प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. लोकसहभागाने व भागीदारीने आरोग्य शिक्षण या संकल्पनेने महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.

कल्पक उपक्रमाद्वारे आरोग्य शिक्षण लोकसहभागातून जनसामान्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. स्पर्धा आयोजित करून एक मिनिट आरोग्य विषयक व्हिडिओ स्पॉट व 10 मिनिट पर्यंत माहितीपट / लघुपट याद्वारे मागविण्यात आले व या क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांकडून प्राप्त फिल्मपैकी उत्कृष्ट फिल्मची निवड करून विजेत्यांना बक्षीस स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून उपस्थिती होती.

कौटुंबिक स्नेहमेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

राज्यस्तरीय विजेते खेळाडू, नाट्यकलावंत व पाल्यांचा गौरव

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा गुरुवारी (दि. १६) येथील अल्पबचत भवनात उत्साहात साजरा झाला. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कौटुंबिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नवी ऊर्जा मिळाली.

महावितरणच्या वर्धापनदिनासह कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा व मनोरंजनपर असे वर्षभरात दोन कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा पुणे परिमंडलाने राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद तसेच नाट्यस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा करंडक पटकावला आहे. यातील विजेत्यांचा गुणगौरव करण्याचे औचित्य साधून पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या स्नेहमेळाव्यात प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, महाव्यवस्थापक (वित्त) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता सर्वश्री प्रकाश राऊत, सतीश राजदीप, शंकर तायडे, डॉ. सुरेश वानखेडे, सौ. पुनम रोकडे, उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे), श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांच्यासह परिमंडलातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी कुटुंबियांसह सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात राज्यस्तरीय क्रीडा व नाट्यस्पर्धेतील विजेत्या खेळाडू व नाट्यकलांवतांचा तसेच शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, श्री. संतोष गहेरवार यांनी केले तर वरिष्ठ व्यवस्थापक सौ. अपर्णा माणकीकर यांनी आभार मानले.